डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हो, आम्ही नुसते नाचत होतो. मग अंगणात आलो. तिथं काही माणसं आमची वाट पाहत होती. ती सगळी वर्तुळ करून उभी होती. बायका, पुरुष, मुले सर्व जण वर्तुळाकार उभे होते. त्याच्या मधोमध काही बायका आम्हाला धरण्यासाठी बसून होत्या. मी, माझ्या बहिणी आणि अन्यही काही मुली त्या मधल्या बायकांपाशी गेलो. त्यातल्या एका बाईपुढे मी गेले. विधी करण्यासाठीही माझा पहिला नंबर लागला होता. मी बायकांत जाऊन बसले. दोन्ही पाय फाकवले. मी पाय फाकवताच एक बाई सुरी घेऊन माझ्या दिशेने आली, तिने माझं क्लिटोरियस धरलं आणि एका क्षणात कापलं.

आफ्रिका खंडातल्या केनिया देशात अशा एका जमातीची माणसं राहतात, ज्यांना पाहण्यासाठी लोक समुद्र पार करून येतात. या जमातीतील माणसं उंच-धिप्पाड असतात. ते लांब उडी मारतात, लाल रंगाचे कपडे परिधान करतात आणि मुख्य म्हणजे ते सिंहाची शिकार करतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, अशी कोणती बुवा जमात? तर, ही मसाई जमात. आणि यातली विशेष गोष्ट कोणती, तर मी त्यांच्यापैकी एक आहे. 

मसाई जमातीत मुलांना वाढवलं जातं ते योद्धा होण्यासाठी आणि मुलींना वाढवलं जातं ते आई होण्यासाठी. मी जेव्हा पाच वर्षांचे होते, तेव्हा मला कळलं की- माझं लग्न ठरलंय अन्‌ माझा मासिक धर्म सुरू झाल्यावर माझं लग्न ताबडतोब लावून दिलं जाणार. गंमत म्हणजे- माझी आई, आजी, माझ्या काकू-मावश्या मला सतत आठवण करून द्यायच्या, ‘बघ- बघ, आत्ताच तुझा नवरा इथून गेला.’ आणि त्या क्षणापासून माझी आदर्श स्त्री होण्याची तयारी सुरू झाली. वयाच्या बाराव्या वर्षी मी एक परिपूर्ण स्त्री होणे अपेक्षित होते. माझा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा. मग गाईची धार काढणं, घर स्वच्छ करणं, माझ्या भावंडांसाठी स्वयंपाक रांधणं, पाणी भरणं, लाकूडफाटा आणणं- अशी एकामागून एक कामं मला करावी लागायची. मी ते सगळं केलं. एक आदर्श पत्नी होण्यासाठी मला ते करावंच लागणार होतं. मी शाळेतसुद्धा गेले. मसाई जमातीतल्या मुली/बायका शाळेत जातातच, म्हणून मीही शाळेत गेले का? तर, तसं नाही. 

मी शाळेत गेले ते माझ्या आईमुळे. माझ्या आईला शिक्षण नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे ती आम्हा भावंडांना सतत आठवण करून द्यायची की- ती जसं जगत आहे, तसं आम्ही मुळीच जगू नये. पण ती असं का म्हणत होती माहितीये? माझे वडील शहरात पोलीस म्हणून नोकरी करत होते. ते वर्षातून कधी तरी एकदा घरी यायचे. काही वेळा तर ते आम्हाला दोन-दोन वर्षं भेटायचे नाहीत आणि समजा ते घरी आलेच, तर ती पुन्हा वेगळी भानगड असायची, म्हणजे भांडण-तंटे व्हायचे.

तर, आम्हा भावंडांना किमान जेवण मिळावं म्हणून आई शेतात खूप राबायची, पिकं काढायची. आम्हाला दूध मिळावं म्हणून ती गाय, बकऱ्या पाळायची. आमची काळजी घ्यायची. पण वडील घरी आले की, ते गाई विकून टाकायचे. इतर काही उत्पादनं असतील, तर विकून टाकायचे आणि त्यातून मिळालेला पैसा बारमध्ये मित्रांसोबत बसून दारू पिण्यात घालवायचे. आई विरोध करू शकत नव्हती, कारण ती एक स्त्री होती. स्त्रियांना संपत्ती जमवण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे जे-जे काही आमच्या कुटुंबात होतं, ते आपसूक माझ्या वडिलांच्या मालकीचं व्हायचं. त्यामुळे अशी उधळपट्टी करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता. आणि यदाकदाचित माझ्या आईने याविषयी जाब विचारला, प्रश्न केला तर वडील तिला मारहाण करायचे, शिवीगाळ करायचे. एकूणच, तो फार कठीण काळ असायचा. 

शाळेत जाऊ लागल्यानंतर माझं एक स्वप्न होतं. मला शिक्षक व्हावं, असं वाटायचं. शिक्षक कसे छान दिसतात. ते अतिशय टापटीप कपडे घालतात, उंच टाचेची चप्पल घालतात (नंतर मला कळलं की, उंच टाचेच्या चपलांमध्ये चालणं फारच अवघड आहे; पण तेव्हा मला ते आवडायचं.) हां तर, मलाही शिक्षक व्हायचं होतं. मला वाटायचं की, शिक्षकांच्या वाट्याला फार कष्टाचं काम नसतं. काय तर फक्त फळ्यावर लिहायचं आणि ते फारच सोप्पं काम आहे. मी जे शेतात राबायचे, त्यापेक्षा तर कैकपटीने सोप्पं. त्यामुळे मलाही शिक्षक व्हायचं होतं. 

मी शाळेत मन लावून अभ्यास करत होते; परंतु मी जेव्हा आठवीत गेले, तेव्हा तो निर्णायक क्षण आला. आमच्याकडे परंपरेनुसार एक विधी केल्यानंतर, मुलगी ‘मोठी बाई’ होते. बाईपणाकडे नेणारा तो संस्कारच मानला जातो. त्या वेळेस मी नुकतीच आठवीची परीक्षा संपवून उच्च माध्यमिक शाळेत जाणार होते. मात्र जर हा विधी पूर्ण केला, तर मी नियोजित वराची लगेच पत्नी होणार होते. त्यामुळे माझं शिक्षक होण्याचं स्वप्न मागे पडणार होतं. म्हणून मी बोलायचं ठरवलं. या संकटावर मात करण्यासाठी मलाच काही तरी क्लृप्ती काढण्याची गरज होती. अनेक मुलींनी जे केलं नव्हतं, ते मी करणार होते. म्हणजे? मी माझ्या वडिलांशी बोलले. मी त्यांना सांगितलं, ‘‘तुम्ही जर मला पुन्हा शाळेत जाऊ देणार असाल, तरच मी या विधीतून जायला तयार आहे.’’ माझ्या वडिलांनी होकार भरला. कारण त्यांना अशी भीती वाटली की, मी जर पळून गेले, तर त्यांना आयुष्यभर अपमान सहन करावा लागला असता. विधी पूर्ण न करता पळून गेलेल्या मुलीचा बाप म्हणून त्यांची नाचक्की झाली असती. त्यांच्यासाठी हे फारच लज्जास्पद होतं. त्यामुळे त्यांनीही मध्यममार्ग काढला आणि मला विधीनंतरही शाळेत जाण्याची परवानगी दिली. 

तर, माझा विधिवत्‌ कार्यक्रम सुरू झाला. उत्साहाने भरलेला संपूर्ण एक आठवडा तो समारंभ चालला. समारंभ असल्याने लोक आनंदात होते. विधीच्या आदल्या दिवशी तर आम्ही खूप नाचत होतों, मजा लुटत होतो. रात्रभर आम्ही झोपलोसुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी विधी होता, त्यामुळे आम्ही घरातून बाहेर आलो आणि पुन्हा नाचायला लागलो. हो, आम्ही नुसते नाचत होतो. मग अंगणात आलो. तिथं काही माणसं आमची वाट पाहत होती. ती सगळी वर्तुळ करून उभी होती. बायका, पुरुष, मुले सर्व जण वर्तुळाकार उभे होते. त्याच्या मधोमध काही बायका आम्हाला धरण्यासाठी बसून होत्या. मी, माझ्या बहिणी आणि अन्यही काही मुली त्या मधल्या बायकांपाशी गेलो. त्यातल्या एका बाईपुढे मी गेले. विधी करण्यासाठीही माझा पहिला नंबर लागला होता. मी बायकांत जाऊन बसले. दोन्ही पाय फाकवले. मी पाय फाकवताच एक बाई सुरी घेऊन माझ्या दिशेने आली, तिने माझं क्लिटोरियस धरलं आणि एका क्षणात कापलं. 

काही क्षण खूप रक्त गेलं. काही वेळातच मी बेशुद्ध झाले. या प्रथेनंतर किती तरी जणींवर मृत्यू ओढवतो. मी नशिबवानच म्हणायचे की, मी फक्त बेशुद्ध झाले. हे सर्रास घडतं. हे करताना कुठल्याही प्रकारे भूल दिली जात नाही. एखादी जुनी, गंजलेली सुरी वापरली जाते. एकूणच भयंकर असतं हे. मी नशिबवान होते ते पुन्हा माझ्या आईमुळे. समारंभाच्या तीन दिवसांनंतर जेव्हा सगळे पांगले, तेव्हा माझ्या आईने एका नर्सला बोलावून घेतलं. हे असं प्रत्येक मुलीची आई करत नाही. माझी तीन आठवड्यांपर्यंत चांगली काळजी घेतली गेली आणि त्यानंतर मला बरं वाटू लागलं. मी पुन्हा शाळेत जाऊ लागले. त्यानंतर तर मी माझ्या कुटुंबात बदल घडवायचा म्हणून शिक्षक होण्याचा निश्चयच केला.

मी शाळेत परत आले, तेव्हा आणखी एक चांगली गोष्ट घडली. तिथं मी माझ्या गावातल्या एका तरुणाला भेटले. हा तरुण अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठात शिकत होता. त्या तरुणाने पांढरा टी-शर्ट, जीन्स घातली होती. गळ्यात कॅमरा अडकवला होता. पायांत स्निकर्स घातले होते. आमच्या गावात तर साधे रस्तेही नव्हते. त्यामुळे त्या स्निकर्सचं मला आकर्षण वाटत होतं. तो तरुण अतिशय आनंदी दिसत होता. त्यामुळे मी त्याला कौतुकाने म्हणाले, ‘‘तुम्ही कुठे असता, तिथं मला जावंसं वाटतंय.’’
आणि तो उत्तरला, ‘‘तुला जायचंय म्हणजे काय? तुझी वाट पाहणारा नवरा नाहीये का तुला?’’
मी म्हणाले, ‘‘त्याची काळजी करू नका. मी ते सांभाळून घेईन. तुम्ही फक्त मला तिथं कसं जायचं, ते सांगा.’’

त्या तरुणाने मला मदत केली. मी शाळेत असताना माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आलेला. त्यामुळे ते खूप आजारी होते. मी पुढे काय करावं, हे सांगू शकण्याच्या अवस्थेत नव्हते. पण मुद्दा असा होता की, माझे वडील हे एकटेच माझे पालक नव्हते. माझ्या समाजातील जे कोणी माझ्या वडिलांच्या वयाचे होते, ते सगळे आपसूक माझे वडील-माझे काका होते. आणि ते माझं भविष्य काय असावं, हे अधिकारवाणीनं ठरवणारे होते.

तर घडलं असं- अमेरिकेमध्ये व्हर्जिनिया प्रांतातील लिंचबर्ग येथील रॅण्डोफ-मॅकॉन वुमन्स कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. परंतु, व्हर्जिनियाला जाण्यासाठी विमानाचे तिकीट घ्यावे लागणार होते आणि गावकऱ्यांच्या मदतीशिवाय मी पैसे उभे करू शकणार नव्हते. मला शिष्यवृत्ती मिळाली होती, परंतु मला गावात पुन्हा यायचं होतं. गावकऱ्यांसाठी काही तरी करायचं होतं, त्यासाठी त्यांची मदत लागणार होती. शिवाय, मला मिळालेल्या संधीविषयी लोक बोलत होते- ‘‘काय हे! एक संधी वाया गेली. एखाद्या मुलाला संधी मिळाली असती, तर ठीक होतं; पण मुलीला मिळालीय, तर आम्ही काही मदत करू शकत नाही.’’

मी घरी आले. मला रीतीप्रमाणे त्यांना मनवावं लागणार, हे माझ्या लक्षात आलं. आमच्या जमातीतील लोकांची अशी श्रद्धा आहे की, रोजची सकाळ शुभ वार्ता घेऊन येते. त्यामुळे मला सकाळशी संबंधित काही तरी करावं लागणार होतं. आमच्या गावात एक मुख्य व्यक्ती- सरपंच असतो. सरपंचाने ‘हो’ म्हटलं की, बाकीचे आपोआप त्याचे पालन करतात. त्यामुळे मी अगदी सूर्य उगवण्याच्या क्षणीच त्या सरपंचांकडे गेले. त्या सरपंचांनी डोळे उघडले आणि त्यांना प्रथम काय दिसलं असेल, तर ती मी होते.

‘‘अरे, बाळ, तू इथं काय करतेस?’’ त्यांनी विचारलं.
‘‘बाबा, मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला अमेरिकेत जाण्यासाठी तुम्ही पाठिंबा द्याल का?’’ मी त्यांना वचन दिलं की, मी सर्वोत्तम मुलगी बनून परत येईन. त्यानंतर त्यांना जे हवं ते मी करायला तयार आहे.
‘‘बरं, पण मी एकटाच तुला यासाठी परवानगी देऊ शकत नाही.’’ असं म्हणून त्यांनी मला आणखी १५ पुरुषांची नावे दिली. यानंतर मी पुन्हा प्रत्येक सकाळी जाऊन एकेका माणसाला भेटत होते. प्रत्येकाकडून परवानगी मिळाली. सगळे जण एकत्र आले. मग गावातील प्रत्येक जण- बाया, पुरुष- सगळ्यांनीच मला शिक्षण घेण्यासाठी मदत केली. पाठिंबा दिला. मी अमेरिकेत आले. तिथं मला प्रथम काय दिसलं, तर बर्फ! त्यानंतर मला तिथं वॉलमाटर्‌स, व्हॅक्यूम क्लीनर काय ते कळलं आणि अन्नाची रेलचेल असणारं कॅफेटेरिया. सर्व वस्तू मुबलक असणाऱ्या जगात मी होते.

मी माझं अस्तित्व पूर्णपणे जगले, उपभोगलं. तिथं मला पुष्कळशा गोष्टी माहीत झाल्या. मी १३ वर्षांची असताना माझ्यासोबत जो विधी झाला होता, त्याला ‘फिमेल जनायटल म्युटिलेशन’ म्हणजेच खत्ना/सुंता म्हणतात, हे मी तिथं शिकले. केनियाच्या कायद्याविरुद्ध ही प्रथा असल्याचं मी शिकले. शिक्षण घेण्यासाठी मला माझ्या शरीराचा कोणताही भाग काढून देण्याची गरज नसल्याचं मी शिकले. शिक्षण हा माझा अधिकार आहे. आज आफ्रिकेतील तीन दशलक्ष मुलींना खत्ना या प्रथेचं बळी ठरावं लागत आहे. माझ्या आईला तिची संपत्ती- मिळकत मिळविण्याचा अधिकार आहे, हे मी शिकले. ती केवळ स्त्री आहे म्हणून तिला शिवीगाळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही, हे मी शिकले. मी शिकत असलेल्या या गोष्टींमुळे माझा क्रोध जागा झाला. मला याविरुद्ध काही तरी करायचं होतं. मी जेव्हा जेव्हा गावी जायचे, तेव्हा मला दिसायचं की, माझ्या कुणा ना कुणा शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होतंय. त्यांची खत्ना होतेय. त्याने मी अस्वस्थ व्हायचे. मी माझी पदवी पूर्ण केल्यानंतर काही काळ अमेरिकेत नोकरी केली. पण मला माझ्या गावात परतून काही तरी करायचं होतं. रडणाऱ्या, भेदरलेल्या मुलींचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोर असायचे. 

मी गावी गेल्यानंतर गावातल्या पुरुषांशी, गावकऱ्यांशी, आयांशी बोलू लागले. मी त्यांना म्हणाले, ‘‘मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे मला या गावासाठी काही तरी करायचं आहे. तुम्हाला कशाची गरज आहे?’’

मी बायकांशी बोलले, तर त्या म्हणाल्या, ‘‘तुला तर माहीतच आहे- आम्हाला काय हवंय. आम्हाला आमच्या मुलींसाठी एक शाळा हवीय.’’ मुलींसाठी तिथे शाळा नव्हती, त्यामुळे त्यांना शाळा हवी होती. पण त्याचं मुख्य कारण वेगळं होतं. शाळेत जाताना काही वेळा मुलींवर बलात्कार व्हायचा, काही जणी लग्न होण्याआधी गर्भवती व्हायच्या. अशा वेळेस मुलीच्या आईलाच दोष दिला जायचा. तिला शिक्षाही व्हायची. त्यामुळे त्या आयांना अशी शाळा हवी होती, जी मुलींसाठी सुरक्षित असेल. त्या म्हणाल्या, ‘‘आम्हाला आमच्या मुलींना एका सुरक्षित ठिकाणी ठेवायचंय.’’

मग मी गावातल्या वडिलधाऱ्यांकडे गेले. या वडिलधाऱ्यांनी मला काय सांगावं- तर तेही म्हणाले, ‘‘आम्हाला मुलांसाठी शाळा हवी.’’ 

मी त्यांना म्हणाले, ‘‘आपल्या गावातली काही मुले बाहेर जाऊन शिक्षण घेऊन आली आहेत. ते का नाही मुलांसाठी शाळा सुरू करत? त्यांनी मुलांसाठी शाळा उघडावी, मी मुलींसाठी शाळा सुरू करते.’’ त्यांना माझ्या बोलण्यात तथ्य वाटले. ते तयार झाले. पण मला त्यांच्या होकाराच्या बांधिलकीचा पुरावा हवा होता आणि तो त्यांनी दिला. त्यांनी मुलींच्या शाळेसाठी जागा दिली. मुलींची शाळा उभी राहिली. सुरुवातीला मुली दाखल व्हायच्या, तेव्हा त्या फारच घाबरलेल्या असायच्या; पण पाचेक महिन्यांत त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल जाणवायचा. हा बदल आम्ही घडवत होतो.

माझ्या शाळेत रोजची पहाट नवी सुरुवात घेऊन येऊ लागली. आज माझ्याकडे १२५ अशा मुली आहेत, ज्यांची कधीही खत्ना होणार नाही आणि त्यांचे वयाच्या १२ व्या वर्षी लग्न होणार नाही... १२५ मुली त्यांची स्वप्नं पाहत आहेत आणि त्यांचा पाठपुरावा करत आहेत. आम्ही त्यांना संधी देत आहोत, जेणेकरून त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहतील. आणखी एक- जेव्हापासून आम्ही मारहाणीसंबंधी ठराव केला, तेव्हापासून आमच्या समाजातील महिलांना मारहाण होत नाही.

मित्रांनो, मला तुम्हाला एक आव्हान द्यायचंय. तुम्ही हे सगळं ऐकत (वाचत) आहात, कारण तुम्ही फार आशावादी आहात. तुम्ही असे लोक आहात, ज्यांच्यात काही तरी करण्याची जिद्द आहे. हे जग अधिकाधिक सुंदर व्हावं, असं तुम्हाला वाटतंय...जगातली युद्धं संपावीत, गरिबी नष्ट व्हावी- असं तुम्हाला वाटतंय. म्हणजे तुम्हाला बदल घडवून आणायचाय. आणि तुम्ही असे लोक आहात, ज्यांना आपल्या उद्याची काळजी आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज इथं एक आव्हान देते की, तुम्हीच त्याचे प्रणेते व्हा, त्या बदलांची सुरुवात तुमच्यापासून करा. लोक तुमच्या पायवाटांवरून चालू लागतील. कणखर व्हा. खंबीरपणे उभे राहा. भीतिमुक्त व्हा. आत्मविश्वासाने वागा. पुढे चला. तुम्ही तुमचा समाज बदललात, तर तुम्ही जग बदलणार आहात. कारण आमचा विश्वास आहे की, जर आम्ही एका मुलीवर प्रभाव टाकला; तर एक कुटुंब, एक गाव, एका देशावर एकाच वेळी प्रभाव टाकत असतो. आम्ही बदल घडवत आहोत.

तुम्हीसुद्धा हे करू शकाल आणि आम्हीसुद्धा हे केलं, तर आपण आपल्या मुलांसाठी एक अधिक सुंदर- चांगलं भविष्य देऊ, नाही का? आणि आपण एका शांततापूर्ण जगात आनंदाने जगू, होय ना?

अनुवाद : हिनाकौसर खान-पिंजार

‘टेड टॉक’च्या विचारपीठावर २०१२ मध्ये हे भाषण इंग्रजीतून केले होते.

 

Tags: बालकुमार दिवाळी अंक प्रेरणादायी महिला सुंता खतना बालविवाह कौमार्य टेड टॉक हिनाकौसर खान स्वप्न आणि शाळा balvivah early marriage Teacher Swapn ani shala Heenakausar Khan Ted talk Inspirational Story Virginity Traditions Woman Kakenya Nataya Teenage 2017 Balkumar Diwali ank Khatna Sunta Female Genital Mutilation weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके