डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बापूजींच्या गोष्टी सांगणारी बा : जगदंबा

चार वर्षांपूर्वी ‘साधना’ साप्ताहिकातून रामदास भटकळ यांची ‘मोहनमामा’ ही लेखमाला क्रमश: प्रसिद्ध झाली, नंतर त्या लेखमालेचे पुस्तकही ‘मौज’ प्रकाशनामार्फत प्रकाशित झाले. आता त्या पुस्तकावर आधारित ‘जगदंबा’ हा एकपात्री नाट्यप्रयोग होत आहे.  ‘मोहनमामा’ वाचून व ‘जगदंबा’ पाहून ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी ‘आपलं महानगर’ या दैनिकात लिहिलेला लेख,

गांधी स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुनर्मुद्रित करणे औचित्यपूर्ण वाटते.

- संपादक.

म. गांधीजींच्या सहवासात फार थोडाच काळ व्यतीत केलेल्या व्यक्तींवर सुद्धा त्यांचा एवढा जबरदस्त पगडा असतो की, गांधी संगतीचे ते क्षण त्यांना आपल्या आयुष्यातून रद्दबातल करता येणंच अशक्य होतं. मग त्यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या ‘बां’चं व्यक्तिचित्र गांधीजींना वगळून कसं प्रकट करता येईल? स्वतंत्रपणे कस्तुरबांची गांधीविरहित मूर्ती साकार करणंही एक कर्मकठीण गोष्ट आहे. ही अडचण धोंडो केशव कर्वेंच्या पत्नीबाबत, बयोबाबत किंवा म.ज्योतिबा फुलेंच्या सावित्रीबाबत किंवा नटसम्राट बेलवलकरांच्या पत्नीबाबत उभी राहत नाही. कारण त्यांना म्हणून स्वत:चं वेगळं असं व्यक्तिमत्त्व होतं. बयो काय किंवा सावित्री काय, नवऱ्याच्या सहाध्यायी होत्या, साह्यकारी होत्या. कावेरीने तर नवऱ्याचं नाटकही पाहिलेलं नव्हतं. बयोनं स्त्री शिक्षणासाठी पायपीट केली नव्हती किंवा फंडही गोळा केला नव्हता. त्यांची पतीराजांच्या कार्याला थेट मदत नाही. सावित्रीने नवऱ्याचंच कार्य द्विगुणीत केलं. पण नवऱ्याच्या कार्यातही ती स्वतंत्रपणे उभी राहिली. कस्तुरबांचं आयुष्य मात्र वरील सर्व महान व्यक्तींच्या पत्नीपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. श्रीरामाच्या सीतेलाही वेगळं व्यक्तित्व देता येतं, पण ती सवलत बांच्या आयुष्यात देता येत नाही. गांधीजींमध्ये बा इतकी मिसळून गेली होती किंवा तिला बापूजींनी आपल्यात इतकं सामावून घेतलं होतं की, बापूंची याद बा शिवाय निघू शकते, पण बांचं चित्र मात्र कुठल्याही दृष्टिकोनातून काढलं तरी ते बापूंशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच कस्तुरबांना केंद्रस्थानी कल्पून त्यांच्याच व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव सर्वाधिक प्रकट होईल अशा रीतीनं सादर करणं, हे एक फार मोठं आव्हान आहे. ‘जगदंबा’ या आपल्या एकपात्री प्रयोगाच्या लेखनात रामदास भटकळ यांनी ते कसं काम पेललं आहे, याबद्दलच मी उत्सुक होतो.

कस्तुरबांच्या व्यक्तिचित्राबद्दलचा मी वर उेख केलेला तिढा सोडवायचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे कस्तुरबांचं चित्र ‘म.गांधीजींची पत्नी’ असं न रेखाटता ‘कस्तुरबाचे पती गांधीजी’ असं चित्र चितारणं आवश्यक होतं. ‘जगदंबा’ या एकपात्रीच्या लेखनात काय किंवा प्रयोगात काय, गांधीजींची जगदंबा दिसते, जगदंबेचे गांधीजी दिसत नाहीत. दोघांचा सुसंवाद किंवा संघर्ष दृगोच्चर होत नाही. रामदास भटकळ यांचा हा लेखनातील पहिलाच नाट्याविष्कार आहे. कादंबरीकार जयवंत दळवींचं ‘बॅरिस्टर’ हे नाटक एक मोठं चोपडं होतं. ते माझ्या नजरेत आलेलं होतं. त्याची योग्य ती संपादणी करून त्यातलं नाटक कोरून काढलं ते दिग्दर्शिका विजया मेहता यांनी. बार्इंनी एक उत्तम नाटककार घडवला. त्यांना गुरूस्थानी मानणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी या ‘जगदंबा’च्या दिग्दर्शिकेनं आपल्या गुरूचं अनुकरण रामदास भटकळांच्या संहितेबाबत केलं असतं तर एक अविस्मरणीम नाट्य उभं राहिलं असतं. नाट्यलेखक,गांधी जीवनाचा गाढा अभ्यासक, ज्या भूमिकेसाठी कलावतीचं नाव जगभर गाजलं तीच रोहिणी हट्टंगडी त्याच कस्तुरबांच्या भूमिकेत आणि एक मान्यवर गुणवती प्रतिमा कुलकर्णींसारखी दिग्दर्शिका असा उत्तमांचा त्रिवेणी संगम साधला असतानाही, ‘जगदंबा’ लक्षणीय होऊ शकली नाही. संहितेच्या संपादनाच्याही पलीकडे जाऊन काही प्रसंग लेखकाकडून लिहून घेऊन, त्याची नाट्यमय मांडणी करणं आवश्यक होतं. लेखकाला नाट्यलेखनाचा पूर्वानुभव नसल्यामुळे हे करणं नितांत गरजेचं होतं.

एकपात्री प्रयोगाचा रूपबंध हा कीर्तनाशी जवळचं नातं जोडतो आणि कीर्तनकार हा केवळ सूत्रधार किंवा निवेदक नसतो, तर तो करीत असलेल्या कथनातही त्याचा सक्रिय सहभाग असतो. याचाच अर्थ असा की, एकपात्री म्हणजे कथन (किंवा निवेदन) आणि प्रसंग असा दुपेडी प्रकार आहे.  या प्रसंगात कथेकरी बऱ्याच वेळा एक पात्रही असतो. कथन करतानाच वेगवेगळया व्यक्तिरेखा तो जगत असतो, जिवंत करत असतो. त्यांच्या त्यांच्या भूमिकेत शिरत असतो. दोन-सव्वा दोन तासांचा हा ‘जगदंबा’चा एकपात्री प्रयोग, काही मोजकेच क्षण वगळता निवेदनाच्या, कथनाच्या, सांगण्याच्याच पातळीवर राहिला. हालचाल करीत सादर केलेलं अभिवाचन, असं त्याचं स्वरूप झालं. त्यातही हालचाल नको तेवढी अधिक झाल्यामुळे निवेदनाचं आस्वादनही चेपलं गेलं. (दोन अंकी प्रयोगात दिग्दर्शिकेने नायिकेला अंदाजे सहा-सात किलोमीटर्स तरी चालायला लावलं आहे).

हा एकपात्री प्रयोग असला तरी मणिलाल आणि हरिलाल या बापूजींच्या दोन मुलांच्या व्यक्तिरेखा इथं साकार केल्या आहेत. या एकपात्री संहितेत, आस्वादकांना बापूजींचं चरित्र पूर्णपणे ज्ञात आहे, असं लेखकानं गृहीतच धरल्यामुळे, बा सोडल्यास संहितेतील इतर व्यक्ती आणि त्यांचे नातेसंबंध अज्ञ प्रेक्षकांच्या ध्यानात येणं कठीण आहे. कथनातून त्यांची जुजबी ओळख करून देणं आवश्यक होतं. इथंच सांगून टाकायला हवं की, ‘जगदंबा’मध्ये बा पेक्षाही लक्षात राहतात ते मणिलाल आणि हरिलाल. कारण ते थोड्याच अवधी पुरते रंगमंचावर दिसत असले तरी ‘व्यक्तिचित्र’ म्हणून ठामपणे उभे राहतात. असीम हट्टंगडी याने आपल्या जोशपूर्ण, तितक्याच भावुक अभिनयाने ही दोन्ही व्यक्तिचित्रं दाद देण्याजोगी वठवली आहेत.  नाटक ‘बा’चं. पण लक्षात राहतात बापू आणि मुलं.

रोहिणी हट्टंगडी यांनी ‘बा’च्या भूमिकेत दोन-तीन ठिकाणीच लक्षणीय आविष्कार प्रकट केला आहे. एकदा महादेवभाई देसार्इंबद्दल सांगताना आणि दुसऱ्यांदा तिच्या अखेरच्या क्षणी. हे दोन प्रसंग प्रत्ययकारी झाले. मुळात या भूमिकेत प्रारंभापासून अखेरपर्यंत रोहिणी यांनी जो एक सूर लावला होता, संपूर्ण निवेदनाला जी एकच एक चाल दिली होती, ती तरी दिग्दर्शिकेने बदलायला हवी होती. तिच्या संपूर्ण बोलण्यात कुठेही आरोह-अवरोह, चढ-उतार नाहीतच. कुठेही बा उत्कट होत नाही, उसळत नाही वा गांधीजींवरची गाढ भक्तीही गडदपणे प्रकट करीत नाही. एक दोन क्षणीच ती किंचित हसल्यासारखं करते आणि एकदाच केव्हा तरी गहिवरल्याचा भास निर्माण करते. एवढा भाग वगळला तर दोन अंक प्रेक्षकांना ‘बा’ला सहनच करावं लागतं. याचं कारण कलावतीच्या असमर्थतेबरोबरच लेखनातील त्रुटी हेही आहे. माहिती सांगितल्यासारखे प्रसंग एका मागोमाग एक सांगितले जातात. कुठल्याही प्रसंगात ‘बा’ गुंतली आहे, काही भूमिका बजावते आहे, असं दिसत नाही. जणू कुणी तरी परकाच तटस्थपणे ‘बा’ची कहाणी सांगतोय! वेगवेगळ्या प्रसंगांत ‘बा’च्या वेगवेगळ्या आविष्काराचं-व्यक्तिचित्रांचं अभिनयांकन समोर आलं असतं, तर विविधतेमुळे प्रेक्षकांचीही गुंतवणूक झाली असती. बा संपूर्ण सादरीकरणात एकच वाक्य गुजरातीत बोलते, तेही पुटपुटते. आणखी काही गुजराती संवादांची भर टाकल्यास कस्तुरबा अधिक ठसेल. लेखनातील नर्मविनोदाच्या दोन जागा दाद द्यावी अशाच आहेत. ‘बा’च्या मनातील घालमेल संपूर्ण प्रयोगातून कुठेही ठळकपणे व्यक्त होत नाही. तसा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री, पार्श्वसंगीतकार कुणीही करीत नाहीत.

बापूजींनी कस्तुरबांचा हात धरून तिला बाहेर काढली, बापूंनी ब्रह्मचर्म पाळण्याचा निश्चय केला, हरिलालला किंवा मणिलालला परदेशी न पाठवता मित्राच्या मुलाला पाठवलं, हरिलाल स्टेशनवर आईसाठी मोसंबी घेऊन येतो, असे कितीतरी क्षण संहितेत येऊन जातात. त्यांचे प्रसंग होत नाहीत. त्या त्या घटनेतील कस्तुरबांच्या भावभावना दबलेल्याच राहतात. चरित्र जिथे मुकं होतं तिथे लेखक बोलायला हवा. तेच तर लेखकाचं योगदान असतं. तो शोध घेणारा लेखकच इथे दिसत नाही. दिग्दर्शिका त्याला जागाही करीत नाही. कस्तुरबाजींना इथे वाचा फुटत नाही. वाटतं, तिनं बापूजींना साथ दिली. अगदी एकनिष्ठपणे. पण ती साथ ‘पती हाच परमेश्वर’ या पारंपरिक भावनेतून दिली (ज्या वातावरणात ती वाढली होती) का ‘नातिचरामी’ अशी लग्नात शपथ घेतल्यामुळे दिली? का बापूजींचे विचार पटले (किंवा बापूजींनी तिला ते समजावून सांगितले) म्हणून दिली? जगदंबा काही बोलत नाही. आंधळेपणाने बापूजींनी कुठलाही विचार वा व्यवहार स्वीकारला नाही, याची प्रचिती रामदास भटकळ यांच्या ‘मोहनमामा’या अत्यंत वाचनीय पुस्तकातून येते. मग तीच प्रचिती कस्तुरबांच्या बाबतीत का येऊ नये? कस्तुरबांना बापूंनी शिकवलं. कसं शिकवलं?काय शिकवलं? नेहमीचं शाळेतलं शिक्षण बापूंनी आपल्या मुलांना घेऊ दिलं नाही. त्याबद्दल तिला काहीच का म्हणायचं नसेल? ‘जगदंबा’बोलत नाही. तिला स्वत:चे, आतले शब्द नाहीत. बापूंना आतला आवाज ऐकू यायचा. बा लाही येत असेल. प्रयोगात ‘जगदंबा’ आतला आवाज न ऐकता केवळ इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरत राहते. केव्हा जमिनीवर झोपते, केव्हा खुर्चीवर बसते, तर केव्हा कठड्याला रेलून काळोखात पांढरी-पाठमोरी उभी राहते. दोन-सव्वादोन तासांच्या संपूर्ण प्रयोगात कस्तुरबा फक्त एकदाच चरखा हलवते(चालवत नाहीच) बाकीचा वेळ रिकामीच, वाड्यात पोरी पाठशिवणीचा खेळ खेळतात तशी फिरत राहते. सर्वांना समान वागणूक देण्यासाठी प्रसिद्ध असलेले बापू, बायकोला म्हणून अशी बिनकामाची फिरण्याची सवलत देतील? दिग्दर्शिकेनं कुठचं गांधी चरित्र वा कस्तुरबा चरित्र वाचलं कुणास ठाऊक? कस्तुरबा रंगमंचावर कसली कृतीच करीत नाही. बोल बोल बोलत राहते. चालत राहते.

रवि रसिक यांनी नेपथ्य आणि प्रकाश योजनेची जबाबदारी पार पाडली आहे. वेगवेगळ्या स्थळांसाठी वेगवेगळ्या छोट्या लेव्हल्स मांडल्या आहेत. पण ही स्थळं नक्की कुठची? हे कळायला काही मार्ग नाही. संवादातूनही स्थळ कळण्याची सोय नाही. बहुधा ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना बा च्या मनात किती दृढ होती, हेच दिग्दर्शिकेला प्रतीकात्मकरित्या दाखवायचं असावं! मिलिंद जोशी यांनी दिलेलं पार्श्वसंगीत समाधानकारक आहे.

पाच-सहा वर्षांपूर्वी जेमिनी पाठक या कलावंताने रामू रामनाथन लिखित दिग्दर्शित ‘महादेवभाई’ या एकपात्री संहितेचा प्रयोग सादर केला होता. म.गांधींच्या निष्ठावान स्वीय सचिवाची ही कथा लेखकानं, दिग्दर्शकानं आणि कलावंतानं कमालीची वेधक आणि गुंतवून ठेवणारी केली होती. छोट्या छोट्या वस्तूंचा प्रतीकात्मक वापर करून महात्माजींचा मोठेपणा आणि महादेवभार्इंची अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी परिणामकारक केली होती. एका क्षणी महादेवभाई बापूजींचीनमिठाच्या सत्याग्रहाची गोष्ट सांगतात. ती सांगत असताना महादेवभार्इंच्या मुठीतली मिठाची धार रंगमंचावर पडत राहते. तिथेच त्या मिठाचा एक छोटा ढीग तयार होतो. धावत पळत महादेवभाई जातात. केरसुणी आणि सूप हातात घेऊन येतात. ती जागा स्वच्छ करतात. मिठाच्या सत्याग्रहाबरोबरच बापूंच्या स्वच्छता आणि टापटिपीबद्दलची शिस्त क्षणभरात प्रेक्षकांच्या मनात कोरली जाते. सायकलच्या एका घंटीच्या आवाजानं गावात गांधीजींच्या सुटकेच्या आनंदात निघालेल्या सायकल मिरवणुकीचा जो भास जेमिनी पाठक निर्माण करतात, तो अजूनही मला आठवतो आहे. समर्थ कलाकार आणि दिग्दर्शक असला तरी तो शून्यातूनही कसं विश्व निर्माण करतो, याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. ‘जगदंबा’च्या प्रयोगात अशी दाद द्यावी, असा एकही प्रतिभासंपन्न क्षण नाही.

‘जगदंबा’ कार्यक्रमानं कस्तुरबा गांधीचं दर्शन दिलं. पण ती भावली नाही. कशी भावणार? ती तर बापूजींचीच परिचित गोष्ट सांगत बसली, पौराणिक पतिव्रतेसारखी! ‘आविष्कार’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेनं, ख्यातनाम नाट्यदिग्दर्शक आणि आविष्काराचे दीर्घकाळचे आधारस्तंभ जयदेव हट्टंगडी यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘जगदंबा’ सादर केली. जयदेवची आठवण तीव्रतेनं जागी झाली. तो असता तर ही जगदंबा स्वयंस्फूर्त आणि तेजस्वी दिसण्याची शक्यता होती.

Tags: प्रतिमा कुलकर्णी रोहिणी हट्टंगडी नाट्यसमीक्षा नाटक समीक्षक कमलाकर नाडकर्णी प्रायोगिक प्रभावहीन स्वतंत्र नाटक बापूची पत्नी बा जगदंबा Unimpressive Drama Bapu’s wife Mahatma Gandhi Bapu Ba Kamlakar Nadkarni Jagdamba weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके