डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एकविसाव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप

डिसेंबर महिन्यात सातारा येथे एक भाषा चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रा. कमलाकर दीक्षित यांनी मराठी भाषेच्या संदर्भात सादर केलेला शोधनिबंध पुढे दिला आहे.

एकविसाव्या शतकात काय बदल होतील हे समजून घेण्याची उत्सुकता सध्या आपल्या देशात सर्वत्र आढळून येते. विसाव्या शतकात दोन महायुद्धे, अणुबाँबचा शोध, साम्यवादाचा उदय आणि अस्त अशा महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या. विज्ञानाची प्रगती अशीच चालू राहिली तर पुढच्या शतकातसुद्धा अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून येतील असे मानायला जागा आहे.

आजवरच्या वैज्ञानिक प्रगतीचा आढावा घेतला तर असे स्पष्ट होते की ज्या प्रमाणात भौतिकशास्त्रात प्रगती झाली त्या प्रमाणात ती मानव्यशास्त्रात झाली नाही. एवढेच नव्हे तर मूलभूत मानवी स्वभावात फारसा बदल झालेला नाही. साम्यवाद अयशस्वी होण्याचे ते एक प्रमुख कारण आहे.  जोपर्यंत दुसऱ्याच्या खिशातून आपल्या खिशात पैसा येण्याचा संभव असतो तोपर्यंत माणूस साम्यवादी असतो जेव्हा स्वतःच्या खिशातून दुसऱ्याच्या खिशात पैसा जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा माणूस साम्यवादाचा त्याग करतो हे कटू सत्य सिद्ध झाले आहे. 

हुकूमशाहीशिवाय साम्यवाद टिकू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सारांश मूलभूत मानवी स्वभाव साम्यवादाला अनुकूल नाही असे दिसते. थोडक्यात म्हणजे ज्या प्रकारच्या समाजरचनेत स्वहिताचे संवर्धन करता येईल त्या प्रकारची समाजरचना मानवी स्वभावाशी सुसंगत ठरते. मुक्त अर्थव्यवस्था पूर्णपणे निर्दोष नसली तरी तुलनेने मानवी स्वभावाशी अधिक जुळणारी आहे असे म्हणणे भाग आहे. तेव्हा एकविसाव्या शतकात जगात मुक्त अर्थव्यवस्था राहील असे दिसते. मुक्त अर्थव्यवस्थेला लोकशाही सुसंगत असते. तेव्हा आगामी शतकात लोकशाही टिकून राहील असे मानायला हरकत नाही.

लोकशाही आणि मुक्त अर्थव्यवस्था या दोन मूल्यांच्या संदर्भचौकटीतच होणारे इतर बदल होतील असे म्हणता येईल. एकविसाव्या शतकाच्या भाषेकडून कोणत्या अपेक्षा असतील या प्रश्नांचा विचार लोकशाही आणि मुक्त अर्थव्यवस्था यांच्या पार्श्वभूमीवर केला पाहिजे. भाषेचा वापर हा एक सामाजिक व्यवहार असतो. सर्व सामाजिक व्यवहाराचे माध्यम भाषा हे असते. माध्यम हे एक साधन असते, साध्य नव्हे. साध्याच्या संदर्भातच साधनाला महत्व असते. तेव्हा सामाजिक व्यवहाराच्या सुकरतेसाठी भाषेत बदल होत राहतात. भाषेच्या नियमांसाठी सामाजिक व्यवहार बदलत नाहीत. म्हणून भाषिक व्यवहारांचा दबाव व्याकरणावर असतो. 

व्याकरणाचा दबाव भाषिक व्यवहारावर राहण्याचे दिवस पूर्वीच संपलेले आहेत. आता व्याकरणाचे आदेशात्मक स्वरूप जाऊन त्याला वर्णनपर स्वरूप आलेले आहे. एकविसाव्या शतकात भाषिक व्यवहारातील आदेशात्मक नियमांचे दडपण अधिकाधिक कमी होत जाईल. असे हे दडपण कमी झाल्यामुळे भाषांचे स्वरूप बदलत जाईल हे उघड आहे. ते कसे बदलत जाईल हे मराठी भाषेच्या संदर्भात पाहू. एकविसाव्या शतकात मुक्त अर्थव्यस्थेमुळे खासगी क्षेत्राचा विकास होईल सार्वजनिक क्षेत्राचा संकोच होत राहील. अर्थव्यवहाराचा प्रभाव राज्यव्यवहारावर राहील. म्हणजे शासनावर उद्योजकांचा दबाव राहील. 

अर्थव्यवहाराच्या गरजांनुसार मराठी भाषा बदलत राहील. अर्थव्यवहारात भाषेची शुद्धता आणि सौंदर्य हे मुद्दे गैरलागू ठरतात. अर्थव्यवहाराचे जागतिकीकरण होईल. जगातील विविध भाषिक लोक अर्थव्यवहारासाठी मराठी भाषिकांच्या संपर्कात येतील. या सर्व भाषांतील शब्द भाषिक व्यवहारात सर्रास वापरले जातील. भाषिक व्यवहारातील मराठी भाषेत परभाषांतील असंख्य शब्द प्रवेश करतील. स्थिर होतील. मिसळूनही जातील. आज आपण ज्यांना मराठी शब्द मानतो त्यापैकी असंख्य शब्द फार्शी आहेत. ते फार्शी आहेत हे फक्त भाषाशास्त्रज्ञ जाणतात. परभाषिक शब्दांचा एक प्रचंड लोंढा मराठी भाषेत प्रवेश करील. शुद्धतेचा आग्रह धरणारी प्रवृत्ती या लोंढ्याच्या किनाऱ्यावर राहील. लोंढ्यात खडकाप्रमाणे स्थिर उभी राहील, किंवा लोंढ्याबरोबर वाहत जाईल. काही झाले तरी या प्रवृत्तीचा या लोंढयावर फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.

परभाषांतील शब्दांबरोबरच परभाषांतील वाक्ये किंवा वाक्यांशसुद्धा मराठी भाषेत प्रवेश करतील. जसे ‘सी यू’, ‘सो लाँग’, ‘बॉन व्हॉयेज’, ‘ये हुई ना बात’ इत्यादी. दहा वाक्यांच्या बोलण्यात दोन तीन वाक्ये इंग्रजी एकदोन वाक्ये हिंदी व बाकीची मराठी असेसुद्धा प्रमाण राहील. ही प्रक्रिया चालू असताना शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्या प्रवृत्ती अनुवादाचा मुद्दा मांडतील. काही परभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवतील. पण तो प्रयत्न फारसा यशस्वी होणार नाही. पाव लिटरच्या भांड्यात पंचवीस लिटर दूध कसे मावणार?

याचा अर्थ असा नाही की शुद्ध मराठी कोठेच ऐकायला मिळणार नाही. एकही इंग्रजी शब्द न वापरता तासतासभर भाषण करू शकणाच्या व्यक्ती आजसुद्धा बघायला मिळतात. त्यांचा गौरवपर उल्लेखही होतो. याचा अर्थ या व्यक्ती अपवादभूत आहेत. हे अपवाद नेहमीच राहतील. पण त्यांचे प्रमाण कमी कमी होत राहील. ही प्रक्रिया अटळ आहे. यापूर्वी झालेले सावरकरादिकांचे भाषाशुद्धीचे प्रयत्न अयशस्वी झालेले होते. हे या संदर्भात आठवून पाहावे. अर्थव्यवहारामुळे मराठी भाषेत घडून येणाऱ्या या बदलाचा प्रसार वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमांच्या प्रभावामुळे अर्थेतर व्यवहारातील भाषेवर झाल्याशिवाय राहणार नाही.

आता एकविसाव्या शतकातील ग्रामीण भागातील भाषेची स्थिती कशी राहील याचा विचार करू. ग्रामीण भाषेतील बरीचशी शब्दसंपत्ती शेतीशी संबंधित असते. ती शब्दसंपत्ती बरीच वर्षे टिकून राहील. पण कायम टिकून राहील असे म्हणवत नाही. शेतकऱ्यांची मुले आता शिकू लागलेली आहेत. शेती विद्यापीठे निघालेली आहेत. शेतीव्यवहारात सुधारलेली यंत्रे तंत्रे, बियाणी, खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाला आहे आणि होईल. 

कृषि-औद्योगिक संस्कृतीचा प्रभाव जसा ग्रामीण भागात वाढत जाईल तसा नागरी मराठी भाषेचा प्रभाव ग्रामीण बोलीवर होत राहील. अनेक परभाषांतील शेतीव्यवहाराशी संबंधित शब्द ग्रामीण बोलीत प्रवेश करतील. ‘संस्कृतायझेशन’ ही प्रेरणा काम करीतच असते. ग्रामीण भागासमोर नागरी भागाचा आदर्श असतो. त्यामुळे शिक्षण, प्रसारमाध्यमे, शहरीकरण इत्यादी कारणांमुळे ग्रामीण भाषेचे स्वरूपही नागरी भाषेच्या वळणावर जाण्याची शक्यता मोठी आहे. याला जरा कालावधी लागेल पण दिशा तीच राहील, असे इतर देशातील भाषांच्या अनुभवाने म्हणता येईल, अशा स्थितीत ग्रामीण साहित्याचे स्वरूप काय राहील, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आतापर्यंत आपण नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात सर्वसामान्य व्यवहारात वापरात येणाऱ्या भाषेच्या स्वरूपाचा विचार केला. आता काही विशेष क्षेत्रातील भाषेचे स्वरूप कसे राहील ते पाहू.

सर्व स्तरावरील शिक्षणात सध्या मराठी माध्यम उपलब्ध आहे. पाठ्यपुस्तकेही मराठी माध्यमात उपलब्ध होत आहेत. या पाठ्यपुस्तकांत नवनवीन संज्ञांना मराठी प्रतिशब्द शोधून काढून ते वापरले जात आहेत. शिकविताना त्या प्रतिशब्दांचा वापरही शिक्षक लोक करीत आहेत. ही प्रक्रिया चालू राहील. मात्र शिक्षण संपल्यानंतर प्रत्यक्ष व्यवहारात हे मराठी प्रतिशब्द वापरले जाण्याचे प्रमाण तपासून पाहिले पाहिजे. 

व्यवहारात काही वेळा मूळ इंग्रजी शब्द वापरले जातात असे आजही दिसते. अर्थात ही गोष्ट कला आणि सामाजिक शास्त्राच्या संदर्भात लागू आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि विज्ञान या शाखांमध्ये आजही मराठी माध्यम नाही. त्यामुळे या शाखांमधील भाषिक व्यवहारात इंग्रजी शब्दांचा वापर होत राहणार असे दिसते. डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकौटंट, आर्किटेक्ट या व्यावसायिकांच्या परिभाषेत इंग्रजी शब्दांचा वापर मोठा आहे. तो वाढता राहण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय विनिमयाची भाषा इंग्रजी आहे. भारत आणि इतर देशांचे परस्पर व्यवहार इंग्रजीतून चालतात. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत इंग्रजी भाषेचा वापर वाढता राहील. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशात व्यापारासाठी येतील आणि तेथील नोकऱ्या मिळविण्यासाठी इंग्रजीची गरज पडेल. आजवर आपण ब्रिटिश इंग्रजी शिकलो. इथून पुढे अमेरिकन इंग्रजी शिकावे लागेल. 

एक इंग्रजी भाषा सोडली तर जवळजवळ सर्व पाश्चात्य संकल्पना आणि वर्तन पद्धती आपण मनोमन स्वीकारलेली आहे. इंग्रजी भाषेला जो विरोध दिसतो तो सामाजिक कारणांतून होत आहे. आणि हा विरोध बराचसा शाब्दिक आहे. प्रत्यक्षात शक्य झाले तर आपल्यालाही इंग्रजी चांगले यावे असे प्रत्येकाला वाटते. यातूनच गावोगावीं इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मागणी आणि पुरवठा वाढत आहे. 

सारांश महाराष्ट्रात इंग्रजी भाषेच्या अभ्यासाचे प्रमाण वाढत राहील असे दिसते. या इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम मराठी भाषेवर उत्तरोत्तर वाढत जाईल. यासंदर्भात मराठी अस्मिता आणि इंग्रजी भाषा यांच्यातील विरोधाभासाचा प्रश्न उभा राहील. इंग्रजी भाषा शिकण्यापासून आर्थिक हित जोपासले जाईल अशी खात्री पटल्यास मराठी अस्मितेच्या आविष्कारासाठी इतर लक्ष्ये निश्चित केली जातील. पूर्वी दाक्षिणात्य विरोध हे मराठी अस्मितेचे लक्षण होते. आता तामिळी वाघांना पाठिंबा देण्याइतपत त्यात बदल झालेला दिसतो. तसेच इंग्रजी भाषेबाबत घडू शकेल. फुले, शाहूमहाराज, डॉ. आंबेडकर या तिघांना उत्तम इंग्रजी अवगत होते. या वस्तुस्थितीचा आधार घेऊन ग्रामीण भागातील जनताही इंग्रजीचा अंगीकार करील.

महाराष्ट्रात आजही राज्यप्रशासन आणि न्याययंत्रणा या दोन्ही क्षेत्रांत इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचा वापर होत आहे. या दोन्ही क्षेत्रांत कनिष्ठ स्तरावर मराठीचा अवलंब बऱ्याच प्रमाणावर होत आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर इंग्रजीचा वापर अधिक आहे. शासनाचे ठराव आणि कायदे मराठीत व्हावेत अशी मागणी जुनी आहे. ही मागणी पूर्णत: मान्य झालेली नाही. याचे कारण त्यासाठी आवश्यक असणारी शब्दसंपत्ती उपलब्ध नाही. सुचविलेले मराठी प्रतिशब्द अर्थवाही असले तरी अपरिचित आहेत. ते हळूहळू परिचित होत जातील. परंतु महाराष्ट्रात एकविसाव्या शतकात परकीय भांडवल, परकीय तंत्रज्ञान आणि परकीय कंपन्या प्रवेश करतील. त्यांना मराठी कायदेकानून समजणे कठीण जाईल. त्यामुळे प्रशासनात आणि न्यायालयात इंग्रजीचा वापर राहावा यासाठी ते आग्रह करीत राहतील. परिणामी मराठीकरणाची प्रक्रिया मंदावेल.

आता आपण कला, संस्कृती या क्षेत्रांचा विचार करू, यापैकी चित्रपट क्षेत्रात आजही इंग्रजी शब्दांचा वापर मोठा आहे. नाट्यक्षेत्रात बहुतेक सर्व नाटकांची नावेसुद्धा इंग्रजीच आहेत. काही थोडी नियतकालिके सोडली तर इतर वृत्तपत्रांत मराठी वाक्यात इंग्रजी शब्द सर्रास वापरले जातात. 

ललित साहित्यात बोलीभाषा वापरली जाते. वर स्पष्ट केल्याप्रमाणे बोलीभाषेत इंग्रजी हिंदी शब्दांचा वापर जसजसा वाढत जाईल तसतसा तो ललित साहित्यातही वाढत जाईल. अर्थात याला धार्मिक ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्याचा नेहमीच अपवाद राहील. ग्रामीण आणि दलित जीवनात ज्या प्रमाणात इंग्रजी हिंदी भाषेतील शब्दांचा वापर वाढेल त्या प्रमाणात तो ग्रामीण आणि दलित साहित्यात वाढेल. वैचारिक साहित्यात मात्र हा बदल जरा सावकाश होईल, पण दिशा तीच असेल. मराठी भाषेचे एक क्षेत्र मात्र इंग्रजी शब्दांच्या प्रभावापासून मुक्त राहील. ते म्हणजे आध्यात्मिक आणि भक्तिमार्गी भाषेचे. या क्षेत्रात संतसाहित्याने पुरेशी शब्दसंपदा निर्माण करून ठेवलेली आहे. या क्षेत्रावर परकीय भाषांचा प्रभाव पडण्याची शक्यता अगदीच कमी आहे. अर्थात याही क्षेत्रात पंचतारांकित अध्यात्मगुरू आहेत. त्यांची भाषा इंग्रजीच आहे. 

जे कृष्णमूर्ती आणि त्यांचे अनुयायी इंग्रजीचाच वापर करतात. मात्र असे लोक कमी आहेत. बहुसंख्य आध्यात्मिक व्यक्ती आणि वारकरी सांप्रदायिक त्यांच्या परंपरागत मराठी शब्दांचाच वापर करीत राहतील. परभाषांतील शब्दांबरोबर परभाषांतील वाक्ये व वाक्प्रचार मराठी भाषेत प्रवेश करून स्थिर होतील हे आपण वर पाहिले. शिवाय परभाषांतील वाक्यरचनासुद्धा मराठी भाषेत प्रवेश करील. 

इंग्रजी वाक्यरचना मराठी भाषेत आजही मिसळून गेलेली आहे. उदाहरण म्हणून लोकमान्य टिळक आणि गोविंद तळवलकर यांच्या अग्रलेखातील वाक्यरचनांची तुलना करून पाहावी. ही प्रक्रिया वेग पकडील. वरील एकूण विवेचनाचा अर्थ असा आहे की एकविसाच्या शतकातील मराठी भाषा - परभाषांतील शब्द आणि वाक्यरचना यांचा स्वीकार करील. जितक्या प्रमाणात हे घडेल तितक्या प्रमाणात मराठी भाषेची समृद्धी वाढेल. इंग्रजी भाषेने परकीय प्रभावाला विरोध केला नाही. मुक्तद्वार दिले, म्हणून तिची प्रगती झाली. मराठीतही तसेच घडेल. अशा भाषेची एकविसाव्या शतकाला गरज असेल. मराठी भाषा ती पूर्ण करील. तिला दुसरा पर्याय असणार नाही.

Tags: फारसी भाषाशास्त्र भाषांचा वसाहतवादी इतिहास भाषा इंग्रजी मराठी Pharasi Linguistics Calonial History of Languge Languages English Marathi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके