डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समलिंगींना जीवनाधार हेच आमचे ध्येय...

कार्यकर्ता पुरस्कार : सामाजिक प्रश्न - बिंदुमाधव खिरे

जग माणसांपेक्षाही त्यांनी घातलेल्या मुखवट्यांचं अधिक असतं. माणसं घरात एक, घराबाहेर दुसरा- असे दोन मुखवटे घालून सर्रास वावरत असतात. काही लोक तर भेटणाऱ्या प्रत्येकासाठी स्वतंत्र मुखवटा चेहऱ्यावर चढवण्याचं कसब अंगी बाणवतात. एरवी, असं हे मुखवटे चढवून जगणं परंपराशरण लोकांसाठी सोईचं असतं, पण बिंदुमाधव खिरें यांच्यासारखे कार्यकर्ते संस्कृती-परंपरांना आव्हान देण्याचं, चेहऱ्यावर मुखवटा धारण न करता वावरण्याचं धाडस दाखवतात. कधी स्वत:शी, तर कधी समाजाशी झगडा देत स्वत:चा ध्येयमार्ग निश्चित करतात. कोणत्याही धर्म-पंथापेक्षा माणुसकीवर विश्वास ठेवतात आणि मानवी हक्क- अधिकारांना सर्वोच्च स्थान देत, समाजाने अव्हेरलेल्या समलिंगींना जीवनाधार मिळवून देणं, हेच जगण्याचे उद्दिष्ट मानतात... तर त्यांच्याशी झालेला हा संवाद.

प्रश्न : ‘मनाचिये गुंती’ या पुस्तकात तुम्ही आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत दर शनिवारी मारुतीला तेल वाहण्याइतपत देवभोळे होतात आणि नंतर पूर्णपणे नास्तिक बनलात, असा उल्लेख आला आहे. तुमचं हे नास्तिक होणं इतरांबद्दलच्या रागातून आलं होतं, की कुणाच्या वैचारिक प्रभावातून हा प्रवास घडला होता?

  - हे खरे की, माझ्या घरचे वातावरण खूप धार्मिक होते. माझा पाप-पुण्यावर विश्वास होता, पण हळूहळू माझ्या लक्षात यायला लागले की, या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. म्हणजे असे की, लोक म्हणतात की उपवास केल्याने पोटाला विश्रांती मिळते, ध्यान करून मन शांत होते. मला असा अनुभव कधी आला नाही. उपवास केला की, पोटात आग पडायची; ध्यान धरलं की, लैंगिक सुखाचे विचार यायचे. दुसरीही एक गोष्ट लक्षात येऊ लागली की, लोक स्वत:च्या सोईने धर्मातल्या विविध गोष्टींचा अर्थ लावतात. अनेक वेळा धर्म हा स्वत:चा अहम्‌ सुखावण्यासाठी वापरतात.

वैचारिक प्रभावाचं म्हणाल तर, अमेरिकन गे ॲक्टिव्हिस्ट लॅरी क्रॅमर, लेखक-राजकीय विचारवंत गोर विडाल यांच्या विचारांचा आणि अमेरिकेतील ‘त्रिकोण’संस्थेच्या कार्याचा माझ्यावर प्रारंभी खूप मोठा प्रभाव पडला. भारतात परतल्यानंतर ‘इंद्रधनु : समलैंगिकतेचे विविध रंग’ या पुस्तकासाठी संशोधन करू लागलो, तेव्हा माझ्यावर र.धों.कर्वेंच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाची छाप पडली. ‘हमसफर ट्रस्ट’चे अध्यक्ष अशोकराव कवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेकराज आनंद यांचाही माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे.

प्रश्न : स्वत:ची ओळख लपवून जगणं आणि ती ओळख जगापुढे आणणं, या दोन अवस्थांमधला काळ एखाद्या समलिंगी व्यक्तींसाठी अत्यंत ताणतणावाचा असू शकतो. तुमच्या वाट्याला आलेल्या अशा ताणतणावपूर्ण क्षणांचं वर्णन कसं कराल?

 - समलिंगी व्यक्तींसाठी दुटप्पी आयुष्य जगणं खूप क्लेशकारक असतं. आपण स्वत:चा द्वेष करायला लागतो. आपण आपल्यासारख्यांची थट्टा करायला लागतो. हे कसे विकृत आहेत, असे बोलू लागतो आणि आपणच आपले सर्वांत मोठे शत्रू बनतो. हे सर्व होताना आपण आतून होरपळत असतो, तडफडत असतो. कोणी तरी आपल्याला स्वीकारेल, आपलासा करेल, तू वाईट नाही- हे मायेनं सांगेल, अशी आशा असते आणि तेच होत नाही. मग विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींशी लग्न करण्याशिवाय पर्याय नसतो. दुटप्पी आयुष्य सुरू होते. फक्त लैंगिक सुखासाठी बाहेर जोडीदार शोधणे सुरू होते. इतर गे तरुण भेटले की, त्यांनाही असेच दुटप्पी आयुष्य जगा, सांगणे सुरू होते. हे ढोंगी जगणे अंगवळणी पडते. अनेकांना तसे जगणे शक्य होते, काहींना ते होत नाही.

प्रश्न : लहानपणी होणारं लैंगिक शोषण, आई- वडिलांकडून होणारं दुर्लक्ष वा तिरस्कारयुक्त वागणूक, मित्रांची संगत यामुळे एखादा माणूस समलिंगी बनतो, असा सर्वसाधारण समज असतो. तुम्ही तुमच्या आत्मकथनात हे स्पष्टपणे म्हटलंय की, तुमच्याबाबतीत असं काहीही घडलेलं नाही. मग, समलिंगी भाव तुमच्यात कसा उत्पन्न झाला किंवा ही जाणीव तुम्हाला कशी झाली?

- सातवीत असताना मला लैंगिक इच्छा होऊ लागल्या. वर्गातील एक-दोन मित्रांबद्दल लैंगिक आकर्षण वाटू लागलं. सिनेमातले एक-दोन पुरुष हीरो लैंगिक दृष्ट्या आवडू लागले, पण मला हे सर्व चुकीचं वाटायचं. इतर मित्रांना मुली आवडत, मग मलाच का मुलगे आवडतात? माझ्या विचारांना मी पाप समजायचो. देवाकडे प्रार्थना करायचो की, मला ‘बरा’ कर. तेव्हा मला ‘गे’ किंवा समलिंगी हा शब्द माहीत नव्हता. तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यावर ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीतल्या एका मेडिकलच्या पुस्तकात वाचला. हेही वाचले की, ही ‘विकृती’ आहे, ‘आजार’ आहे.

प्रश्न : नोकरीनिमित्ताने तुमचं अमेरिकेत जाणं, ‘ब्लेसिंग्ज इन डिस्‌गाइस’ प्रकारातलं ठरलं होतं का? म्हणजे समजा, अमेरिकेतल्या गे-लेस्बियन जगाची ओळख घडली नसती; तर आजवरचा प्रवास जसा झाला, तसा घडला असता का?

- हो, हे खरं आहे की, अमेरिकेत जाणं माझ्यासाठी ‘ब्लेसिंग्ज इन डिस्‌गाइस’ प्रकारातलं ठरलं. अनेक गोष्टींसाठी अमेरिकेचा मी मनापासून ऋणी आहे. कारण तिथे राहिल्यामुळेच भारतीय आणि अमेरिकी संस्कृतीतल्या चांगल्या व वाईट गुणांचं मी तटस्थपणे मूल्यमापन करू शकलो. घटस्फोटानंतर मी सॅन होजे इथल्या ‘त्रिकोण’ या समलिंगींनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये जाऊ लागलो- जिथे मी पहिल्यांदा स्वत:चा स्वीकार केला. जे आपल्यात नैसर्गिक आहे, ते स्वीकारायला वयाची तिशी यावी आणि त्याच्यासाठी साता समुद्रापलीकडे जावे लागावे; ही खरं तर गंमत नाही, ही शोकांतिका आहे. अमेरिकेत मला माझा आत्मसन्मान मिळाला. आत्मविश्वास आला, नवी दृष्टी आली.

प्रश्न : तुमच्या ‘मानवी लैंगिकता’, ‘पार्टनर’, ‘मनाचिये गुंती’, ‘सप्तरंग’, ‘अंतरंग’ आदी पुस्तकांतून तुम्ही समलिंगींच्या मनात दडलेल्या व्यथा-वेदनांना एक प्रकारे व्यासपीठ मिळवून दिले आहे. व्यक्तिश: यातल्या कुठल्या घटनेने वा घटनांनी तुमच्या मतावर खोलवर परिणाम घडवला? ही पुस्तकं तुमच्या संस्थेच्या वतीनेच प्रकाशित झाली आहेत. मुख्य प्रवाहातल्या प्रकाशकांचा या संदर्भात प्रतिसाद कसा होता?

 - मी पहिल्यांदा ‘पार्टनर’ घेऊन एका नामवंत प्रकाशकाकडे गेलो होतो. ते वाईट आहे, त्याला साहित्य म्हणता येणार नाही- असे सांगून त्यांनी ते रिजेक्ट केले. काही वर्षांनंतर एकाच्या ओळखीने त्याच प्रकाशकाला ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’चा ड्राफ्ट दिला. ते पुस्तक प्रसिद्ध करण्याची त्यांनी तयारी दाखवली, पण काही चित्रं (संभोगाच्या अवस्था) वगळायची अट घातली. मी ती मंजूर केली. ड्राफ्ट फायनल झाला. ‘प्रोप्रायटरी फॉण्ट’मध्ये पुस्तक टाइप झाले. प्रूफरीडिंग झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले व छापण्याच्या दोन आठवडे अगोदर मला सांगितले गेले की- मी ‘सेक्स टॉइज’ हा चॅप्टर पूर्णपणे वगळावा. वेश्याव्यवसायावरच्या चॅप्टरचे इंट्रोडक्शन बदलावे. मी चिडलो. नकार दिला. या सर्वांत माझं एक वर्ष वाया गेलं. मग त्यांनी मला पत्र पाठवले की, मी त्यांच्या ‘प्रोप्रायटरी फॉन्ट’मध्ये माझे पुस्तक छापू शकणार नाही. मला परत टायपिंगपासून सर्व सोपस्कार करावे लागले. या अनुभवातून मी ठरवले की, अव्यावसायिक लोकांबरोबर बहुमूल्य वेळ घालवण्यापेक्षा शक्यतो आपणच पुस्तकं छापायची.

प्रश्न : भारतात कायद्याने समलिंगी संबंधांना मान्यता नाही. या पार्श्वभूमीवर, ‘समपथिक ट्रस्ट’ स्थापनेनंतरचे तुमचे अनुभव कसे होते? आठवणीत राहिलेला एखादा प्रसंग? आव्हानांना तोंड देता-देता गवसलेल्या वाटा काय सुचवत होत्या?

 - या प्रवासात काही खूप चांगल्या व्यक्ती भेटल्या, काही वाईट अनुभवही आले. सरकारी ऑफिसेसमध्ये कंडोम वितरणासाठी गेल्यावर ‘तुम्हाला तर मिशा आहेत, मग तुम्ही ‘तसे’ कसे काय?’... ‘तुम्ही लोक सेक्स कसा करता?’ अशा तऱ्हेच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागायचे. शिवाय पोलिसांबरोबर कसे काम करायचे,  हीसुद्धा माझ्यासाठी मोठी चिंतेची बाब होती. पण भानुप्रताप बर्गे यांसारखे प्रगल्भ विचारांचे पोलीस अधिकारी भेटले. त्यांच्या सहकार्याने कार्यशाळा घेता आल्या. इतरही सहृदयी पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचता आले.

पण त्यादरम्यानचा एक प्रसंग कायमचा लक्षात राहिला. माझ्या एका क्लायंटने आत्महत्या केली होती. काऊन्सेलर म्हणून आपण कुठे कमी पडलो, काय चुकले, का नाही त्याने आपल्याकडे धाव घेतली- या प्रश्नांनी माझी झोप उडवली. परंतु सुनीता वाहींनी (काउन्सेलर) मला आधार दिला. याच प्रवासात अशोक रावकवी यांच्या ओळखीने डॉ.रमण गंगाखेडकर (क्लिनिक डायरेक्टर, नॅशनल एड्‌स रिसर्च इन्स्टिट्यूट) भेटले. त्यांनी मला एचआयव्ही प्री आणि पोस्ट टेस्ट कौन्सिलिंग शिकवलं. सेक्स एज्युकेशनबाबतचे धडे डॉ.अनंत साठे आणि डॉ.शांता साठे (संस्थापक, एफपीएआय) यांच्याकडून घेतले. सेक्शुॲलिटी हा विषय मी डॉ.भूषण शुक्ल यांच्याकडून शिकलो. हेल्पलाइन कशी चालवायची, हे मी डॉ.विजय ठाकूर यांच्याकडून शिकलो. आता टिनेश चोपडे हा माझा मानलेला मुलगा- जो ‘गे’ आहे, माझ्या संस्थेचा विश्वस्त आहे आणि संस्था चालविण्यासाठी मला मोलाची मदत करतोय.

प्रश्न : तुम्ही ‘समपथिक ट्रस्ट’च्या माध्यमातून समलिंगी व्यक्तींसाठी जे कार्य हाती घेतलं आहे, त्यातून ढोबळमानाने तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या म्हणजे, समाजाने नाकारलेल्या वा एकटं पाडलेल्या समलिंगींना आत्मविश्वास देणं, समाजाचं प्रबोधन करणं आणि समलिंगींच्या स्वीकाराचं समाजाला बळ देणं. यांतल्या प्रत्येक पायरीवर संघर्षाच्या असंख्य जागा आहेत. तुम्हाला स्वत:ला यांतल्या कोणत्या पायरीवर सर्वाधिक संघर्ष अनुभवास आला?

- मला वाटते की, दोन पायऱ्या सर्वांत अवघड होत्या. त्यातली एक म्हणजे- मी कोण आहे, हे माहीत होतं; पण मी कसा आहे, हे प्रतिबिंबात दिसत नव्हतं. जे दिसत होतं, ती इतरांच्या नजरेतील माझी ओळख होती आणि ती भयावह होती. दुसरी पायरी अधिक त्रासाची होती. ती म्हणजे- आपण कोण आहोत, हे आई- वडिलांना सांगण्याची. ते करताना मनात अपराधी भाव होते. पण इलाज नव्हता, ते करणे भाग होते; नाही तर पुढचे सर्व आयुष्य कृत्रिम, वरवरचे, उथळ आणि ढोंगी बनून गेले असते.

प्रश्न : 2009 पासून समलिंगी संबंधांना कायद्याने गुन्हा ठरवणाऱ्या कलम-377 च्या निमित्ताने समलिंगींचे प्रश्न नव्याने चर्चेला आले. तुमच्यासह या क्षेत्रातल्या जाणकार संस्था, व्यक्तींनी या कायद्याला विरोध केला आहे. या विरोधामागची तुमची भूमिका नव्याने स्पष्ट कराल का?

 - यासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट आहे. जर प्रौढांमध्ये खासगीत आणि परस्परसंमतीने कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध प्रस्थापित होणार असतील, तर त्याची दखल घ्यायचा अधिकार इतरांना असता कामा नये. इतर सगळ्यांची लैंगिक इच्छा/गरज/आवड-निवड आपल्यासारखीच असावी किंवा आपल्या धर्माने सांगितल्यासारखीच असावी, या म्हणण्याला काय अर्थ आहे? ‘इट्‌स अ व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल ह्यूमन राइट’. म्हणूनच 377 कलम बदलले पाहिजे. हा बदल होत नाही, तोवर लीगल पार्टनरशिप म्हणजेच समलिंगी विवाह किंवा पार्टनर बेनेफिट्‌स (इन्शुरन्स, इनहेरिटन्स) हे असे बदल कसे होणार?

प्रश्न : कलम 377 संबंधांतला दिल्ली हायकोर्टाचा अनुकूल निर्णय 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने नाकारला. नकार देताना कोर्टाने संसदेतल्या विधी मंडळाकडे बोट दाखवले. याचा अर्थ, विधिमंडळ जोवर कायद्यात सुधारणा घडवून आणत नाही. तोवर 377 संदर्भात कोर्ट अनुकूल निर्णय देत नाही. याचा दुसरा अर्थ, जनतेबरोबरच किंबहुना जनतेआधी लोकप्रतिनिधींचे प्रबोधन अत्यावश्यक आहे. या संदर्भात व्यापक स्तरावर कोणती पावलं उचलली जात आहेत?

- सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर निवडणुकीअगोदर मी विविध पक्षांना लिहिले होते की, त्यांनी 377 बद्दलची त्यांची भूमिका मांडावी. एकाही पक्षाने उत्तर दिले नाही. मात्र सीपीआय, काँग्रेस आणि ‘आप’ या पक्षांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. आजच्या घडीला यांतला एकही पक्ष सत्तेत नाही. इतक्यात येतील असे वाटत नाही आणि आले तरी मेजॉरिटी नसेल, तर ती सबब दाखवून हा विषय टाळला जाईल. जोपर्यंत सुप्रीम कोर्टमध्ये आमच्या क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मला नाही  वाटत, राजकीय दृष्ट्या याबाबतीत काही पावले उचलली जातील. एकीकडे वर्ष होऊन गेले तरीही सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी घेतलेली नाही. मी स्वत: मुख्य न्यायाधीश आर.एम.लोढा आणि आता एच.एल.दत्तू यांना यासंदर्भात पत्र लिहून याचिका विचारात घ्यावी, अशी विनंती केली आहे.

प्रश्न : जनतेत समलिंगींचे हक्क आणि अधिकारांबद्दल जागृती घडवून आणण्यासाठी जगभरातच ‘प्राइड परेड’ हे महत्त्वाचे साधन ठरू पाहत आहे. तुम्ही स्वत: पुण्यात ‘प्राइड परेड’चे आयोजन करत आला आहात. परंतु या उपक्रमातून जनतेत योग्य संदेश पोहोचतोय, याबाबत तुम्ही निश्चिंत आहात का?

 - मी सॅन फ्रान्सिस्को, सॅन होजे, मुंबई आणि पुणे अशा चार ठिकाणच्या ‘प्राइड वॉक’मध्ये भाग घेतला आहे. त्यातली सॅन फ्रान्सिस्कोची परेड भडक, काही बाबतींत अश्लील पद्धतीने केली जाते. अशा प्रकारच्या प्रदर्शनाने मी खूप अस्वस्थ होतो. हे सगळं बघून तरुण समलिंगी मुले घाबरतात. ‘क्लोझेट’मध्ये असतील, तर ‘आऊट’ होण्यास कचरतात. पण सॅन होजेची परेड अधिक शिस्तबद्ध असते. लोकांना जवळ आणणारी असते. पुण्याची प्राइड परेड सॅन होजेसारखी असते. मी शिस्त ठेवतो. अश्लील वर्तणुकीला अजिबात थारा देत नाही. म्हणून गेल्या चार वर्षांत शनिवार पेठेतून ना सदाशिव पेठेतून, एकही तक्रार आलेली नाही. आपण हे मानासाठी करतोय, प्रसिद्धीसाठी नाही- ही जाणीव सहभागी होणाऱ्या प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे, हा माझा आग्रह असतो.

प्रश्न : समलिंगींबद्दल एक निरीक्षण नेहमी नोंदवलं जातं, ते म्हणजे, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया इतरांच्या तुलनेत खूप भडक असतात. त्यांची देहबोली प्रसंगी आक्रमक असते. एक तर हे निरीक्षण सरसकट योग्य असते का? अशा प्रकारच्या वर्तनामागचं मानसशास्त्र काय सांगतं?

- काही जण ‘भडक’ जीवनशैली जगतात, हे खरे आहे. पण त्याची विविध कारणे असतात. उदा. काहींसाठी तो एक ‘अटेन्शन सीकिंग/बेहेविअर’चा भाग असतो, तर काहींना मुळातच भडक गेटअप आवडतो. उदा. काही स्त्रिया सौम्य रंग वापरतात; तर काही अगदी भडक साड्या, मेकअप करतात. तसेच काही पुरुष बायकांपेक्षा जास्त दागिने अंगावर घालतात. प्रॉब्लेम असा असतो की, स्त्रीने भडक साडी आणि मेकअप केला की, आपण आपापसात कुजबुजतो. तिच्या लैंगिकतेशी तो भडकपणा जोडत नाही. पण एखादा नाजूक मुलगा किंवा तृतीयपंथीयाने असा मेकअप केला, तर तो लगेच त्याच्या लैंगिकतेशी जोडला जातो. माझे वैयक्तिक उदाहरण द्यायचे झाले, तर मी अत्यंत सौम्य कपडे घालतो. पण ते माझ्या लैंगिकतेशी कधी जोडले जात नाही. पण जेव्हा माझी ओळख समोरच्याला होते, तेव्हा ‘तुम्ही गे आहात, असं बघून वाटलं नाही’ असाही शेरा येतो. आता काय करायचे, तुम्हीच सांगा.

प्रश्न : सर्वसामान्य समलिंगींच्या लैंगिकतेबरोबरच त्यांच्यात असलेल्या व्यावसायिक कार्यकर्तृत्वाची प्रकर्षाने चर्चा झाली; तर समाजात स्वीकार्हराताही निर्माण होईल, हा प्रश्नकर्ता म्हणून माझा विचार आहे. परंतु ही बाजू तितक्या समर्थपणे लोकांपुढे येत नाही. ती नाही आली तर, समाजाकडून स्वीकाराची अपेक्षा ठेवणे योग्य ठरते का? त्या दृष्टीनेही सामान्यांपर्यंत पोहोचण्यावर चळवळींचा विश्वास आहे का?

 - या संदर्भात माझा उलट प्रश्न आहे. समलिंगींचे कलागुण विकसित करण्यास पोषक वातावरण आपल्याकडे आहे का? उदा. माझ्याकडे एक गे तरुण कामाला आहे. तो शाळेत-कॉलेजमध्ये असताना, जरा बायकी आहे, दिसायला नाजूक आहे, गोरा आहे म्हणून मुलं त्याला ‘बायल्या’, ‘छक्का’ म्हणून चिडवायची. त्याचे शिक्षकसुद्धा सगळ्यांसमोर त्याची थट्टा करायचे. अशा वातावरणात तो मन लावून कसा शिकणार? आज तो माझ्या संस्थेत कामाला आहे. एका प्रोजेक्टचा मॅनेजर आहे आणि त्याला नाचायची आवड आहे. तो कथ्थक शिकतो आहे. त्याच्या घरच्यांना माहीत नाही की, तो नाच शिकतोय. घरचे त्याला नाच शिकू देतील का? की तो आपला मुलगा कथ्थक शिकतो, हे अभिमानाने सांगतील? त्याला त्याची कला जोपासायची व रोजगाराची संधी बाहेर मिळेल का? असेच बरेच जण आहेत, ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही.

दुसरं उदाहरण माझ्याकडे काम करणाऱ्या एका तृतीयपंथीचं. तिचं दहावीपर्यंतचं शिक्षण आहे. तिने एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नाव घातलं आहे. ‘समपथिक ट्रस्ट’च्या लेटरहेडवर आम्ही पुणे आयुक्तांना पत्र दिले की, पुणे  म.न.पा.त जागा निघाल्या आहेत. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंमध्ये नोंदणी असलेल्या तृतीयपंथीय लोकांनाही त्यांच्या शिक्षणानुसार, कुवतीनुसार नोकरीसाठी इंटरव्ह्यूला बोलवा. बघू आता याला काय प्रतिसाद मिळतोय ते. एका बाजूला आम्ही कॉर्पोरेट हाऊसेसना विचारतो, एचआर पॉलिसीमध्ये एलजीबीटींचा समावेश आहे का? ते उत्तर देत नाहीत. ही अशी दृष्टी आहे.

तुम्ही म्हणता, तुमचं कर्तृत्व काय? अमेरिकेत आता अलीकडे ‘ॲपल’चा सीइओ टिम कुक याने आपण गे असल्याचं जाहीर केलं. परवापर्यंत त्याने त्याची लैंगिकता सांगितली नाही. काय कारण असावं बरं? त्याला माहीत आहे की, अमेरिकेतसुद्धा अजून बराच ‘होमोफोबिया’ आहे.

प्रश्न : समपथिक ट्रस्टच्या माध्यमातून नेमकी कोणती उद्दिष्टे आजवर साध्य झाली? कोणती तत्त्वं सामान्यांच्या मनावर बिंबवता आली आहेत?

- एकूण समाजाचा विचार करता, आम्ही अनेक गोष्टी पुण्यात पहिल्यांदा करू शकलो. ॲडव्होकसी करताना पोलीस, पत्रकार, समुपदेशक यांच्याबरोबर आम्ही यशस्वीपणे संवाद साधत आहोत. समलिंगी असणं आजार नाही, हे आमच्या आग्रहामुळे इंडियन सायकिॲट्रिस्ट असोसिएशनला सांगावं लागलं. पुण्यात एलजीबीटी मंडळींची अभिमान पदयात्रा दर वर्षी काढून आमच्या अस्तित्वाची व अभिमानाची जाणीव निर्माण करू लागलो आहोत. या पदयात्रेत तरुण-वर्ग मोठ्या प्रमाणात सामील होऊ लागला आहे. समाजातील मुख्य प्रवाहांना या विषयाची ओळख व्हावी, म्हणून आम्ही 2014 पासून अद्वैत नाट्य व चित्रपट महोत्सव सुरू केला आहे. एचआयव्ही-गुप्तरोगाचा प्रसार कमी व्हावा, म्हणून आम्ही ‘महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्था’, ‘अलायन्स’चे प्रकल्प राबवतो आहोत.

दुसरा भाग आहे तो असा की, तरुण ‘गे’ मुलांना आम्ही एक सुदृढ वातावरण देऊ शकतो. ही मुलं ‘इमोशनली व्हलनरेबल’ असतात. त्यांचा आत्मविश्वास खूप कमी असतो. त्यांचे लैंगिक, आर्थिक व भावनिक शोषण होऊ शकते. अशांना आम्ही एक सुरक्षित वातावरण देत आहोत.

प्रश्न : केंद्रात/राज्यात यापूर्वी सरकार कुणाचेही असो; समलिंगींच्या प्रश्नावर उघड भूमिका न घेण्याकडेच राजकारण्यांचा कल राहिला आहे. आता केंद्रात ‘विकासवादी’ मोदींचे सरकार आले आहे. त्यांची वैचारिक सोबत करणाऱ्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी स्वत:चे उपद्रवमूल्य दाखवून देण्यास प्रारंभ केला आहे. अशा वेळी हिंदू/मुस्लिम धार्मिक नेत्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?

 - मी धार्मिक नेत्यांशी संवाद साधण्याच्या भानगडीत सहसा पडलो नाही. धर्मांध शक्तींना ‘मानवी हक्कांचा’ अर्थ समजावण्यापेक्षा जे धर्माच्या आहारी गेलेले नाहीत, अशांबरोबर काम करणे मी अधिक पसंत करतो. मला वाटते की, सगळे धर्म कालबाह्य झाले आहेत. धर्म फक्त मानवी हक्काचा असला पाहिजे. एरवी, धर्मातून स्त्री-पुरुष असमानता, जात-पात, अल्पसंख्याकांवर लैंगिक अत्याचार याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मान्यता मिळाली आहे. प्रोत्साहन मिळाले आहे. स्पष्टच सांगायचे तर, धर्म आणि मानसोपचार वैद्यकीय शाखा या दोन शाखांबद्दल माझ्या मनात नकारात्मक भावना आहेत. या दोन्ही शाखांत समाजात बदल घडवण्याची खूप मोठी ताकद असताना त्यांनी लोकांचे फक्त नुकसानच केले आहे.

प्रश्न : ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ पुरस्काराने तुमच्या मनात या क्षणी कोणत्या भावना जागवल्या आहेत?

- मी ज्या विषयात काम करत आहे, तो खूप दुर्लक्षित आहे. या विषयावर काम करणं खूप अवघड आहे आणि या कामाला साथ देणारे, मदत करणारे खूप कमी आहेत. तरीही मला आवर्जून सांगितलं पाहिजे की, पुण्यात मला अनेक जणांची खूप मोलाची साथ मिळाली आहे. बहुतेक लोकांमध्ये आजही या विषयांबद्दल अज्ञान आहे. नकारात्मक दृष्टिकोन आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेल्या पुरस्कारामुळे मला मनापासून आनंद झाला आहे. या पुरस्कारामुळे समाजामध्ये हा संदेश पोचण्यास मदत होईल की- तुम्ही गे, लेस्बियन, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स यांपैकी कोणत्याही लैंगिकतेचे असा; आम्ही तुम्हाला स्वीकारतो. नुसतंच स्वीकारत नाही, तर हक्क आणि अधिकारांसाठी आरंभलेल्या चळवळीत आम्ही तुमच्यासोबत आहोत. महाराष्ट्र फाउंडेशन आणि निवड समिती सदस्यांचे मनापासून आभार.  

मुलाखत: शेखर देशमुख

Tags: मुलाखत समपथिक ट्रस्ट अंतरंग सप्तरंग पार्टनर मानवी लैंगिकता मनाचिये गुंती शेखर देशमुख बिंदुमाधव खिरे कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक प्रश्न interview mulakhat samapathik trust antrang saptrang partner manavi laingikata manachiye gunti shekhar deshmukh bindumadhav khire karyakarta purskar samajik prashn Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बिंदुमाधव खिरे
khirebindu@hotmail.com

सामाजिक कार्यकर्ता, लेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके