डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सामान्यांच्या हक्कांसाठीच झगडायचे आहे...

कार्यकर्ता पुरस्कार : असंघटित कष्टकरी - मनीषा तोकले

महिला अत्याचाराचे विषय असोत अथवा एखाद्या जगण्याच्या हक्काचा मुद्दा असो; स्वतःची बाजू मांडताना अनेकदा अनेक जण आततायीपणा करतात. मी म्हणतो तेच अंतिम, अशी भावनाही सहज डोकावते. संघटनेत अथवा चळवळीमध्ये दहा-पाच वर्षे गेल्यानंतर तर अनेकांमध्ये हे दिसू शकते. मात्र, आपले म्हणणे समोरच्याला पटेल असे सांगणे सर्वांनाच जमत नाही. त्यासाठी कामावर प्रचंड निष्ठा लागते आणि आपण जे करत आहोत ते सर्वार्थाने योग्य आहे, ते न्यायोचित आहे याची स्वतःच्या मनात खात्री असावी लागते. त्यासाठी तितकेच बळकट वैचारिक अधिष्ठान लागते. हे अधिष्ठान असले की, मग लढा गायरान हक्काचा असो किंवा महिलांवरील अत्याचारानंतर पीडितांना न्याय मिळवून देण्याचा असो, वा रचनात्मक कामासाठी बचतगटांच्या माध्यमातून संघटन वाढवण्याचा असो; या सर्व गोष्टींमध्ये सकारात्मकता सहज दिसते. अशी सकारात्मक कार्यकर्ती म्हणजे मनीषा तोकले.

प्रश्न : मनीषाताई, तुमच्या सुरुवातीच्या काळातील जडण-घडणीविषयी जरा सविस्तर सांगा ना...

- मी आज जी काही आहे किंवा हे जे शिकले, त्याला कारण माझ्यावर झालेले संस्कार. मी ज्या वातावरणात वाढले, माझ्या आसपास जे काही पाहिलं, त्यातूनच मी घडत गेले. माझे वडील जनावरांच्या शासकीय दवाखान्यात डॉक्टर. त्यामुळे आमच्या बदल्या सतत होत राहायच्या. अगदी लहानपणी मी बीड जिल्ह्यातील नेकनूरला होते. त्यानंतरही ज्या-ज्या ठिकाणी वडिलांची बदली झाली, त्या-त्या ठिकाणी मी दवाखान्यात येणारी आणि दवाखान्यात काम करणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहिली. जनावरे घेऊन येणारी, अडली-नडलेली माणसं नेहमी पाहायला मिळायची.

त्याचप्रमाणे दवाखान्यात शिपाई म्हणून, मदतनीस म्हणून काम करणारी माणसं, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचं सामाजिक स्थान जवळून अनुभवायला मिळायचं. ही आपल्यापेक्षा वेगळी आहेत, त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत; त्यांचं जगणं वेगळं, त्यांचे प्रश्न वेगळे हे कळत गेलं. अगदी सुरुवातीला दवाखान्यात शिपाई म्हणून काम करणारा  केरबामामा नावाच्या गृहस्थाचं वागणं, राहणं, खाणं हे सगळं आपल्यापेक्षा वेगळं आहे, असं जाणवायचं. शाळेत असतानाच घिसाडी समाजाची एक मैत्रीण मला मिळाली. तिच्या घरी गेल्यानंतर तिथलं वास्तव वेगळंच असायचं. पेटलेला भाता, त्या भात्यावर काम करणारे घामेजलेले तिचे वडील... तिच्या घरातली परिस्थिती फार वेगळी असायची.

आणि याउलट गावाकडे आजोळी गेल्यानंतर जातीयता काय असते, हे पाहायला मिळायचं. रस्त्यानं जात असताना समोरून एखादी व्यक्ती आली की आजी अचानक म्हणायची- ‘बाजूला हो, त्यांना शिवायचं नसतं.’ कारण विचारलं तर सांगायची, ‘त्यांना कावळ्याने शिवलंय.’ त्या वेळी जात-पात हा प्रकार कळत नव्हता. पण माणसासारख्या माणसामध्येही कुठे तरी वेगळेपण असतं. काहींना जाणीवपूर्वक वेगळं पाडलं जातं, हे कळायचं. वडिलांनी मात्र आमच्यावर कधीच कुठली बंधने घातली नाहीत. मी कुणाच्या घरी जाऊन काय खातेय याबाबत विचारणा केली नाही. पुढे परळीला असताना शेजारी अशोक तांगडेंचे घर होते. अशोक हा बामसेफ, डीएसफोर आदी संघटनांशी जवळीक असलेला कार्यकर्ता. त्याचे चुलते श्याम तांगडे यांचा या संघटनांशी संबंध असायचा. त्यातून मग मोर्चे, चळवळी, त्यांतली भाषणं- हे सारं कळत गेलं. जातीयता, स्त्री-पुरुष समानता हे नवनवे शब्द कळत गेले.

शाळेत असतानापासून पाहिलेल्या सावित्रीबाई, मदर टेरेसा, आंबेडकर या व्यक्ती भाषणांमधून आणि महाविद्यालयीन शिक्षणांमधून अधिकच व्यापकतेने कळत गेल्या. मग आपलं जगणं, आपलं आयुष्य निव्वळ सर्वसामान्यांसारखं नाही तर या विचारांसाठी, ज्यांचे हक्क नाकारले गेले आहेत अशांच्या हक्कांसाठी झगडण्यासाठी आहे, हे मनात पक्कं होत गेलं.

प्रश्न : सामाजिक कामाची आवड कशी निर्माण झाली आणि आंतरजातीय विवाह करण्याच्या निर्णयापर्यंत कसे आलात?

 - घरात लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मी हुंडाबळी, सासरचे अत्याचार या गोष्टी वाचत होते, ऐकत होते. त्यामुळे आपल्याला असं जळून जायचं नाही, कुणाचं गुलाम व्हायचं नाही- हे मनात पक्क होतं. म्हणूनच मग चळवळीशी अधिक जवळीक वाढत गेली. एकदा शांता रेड्डी यांच्यासोबत मी पहिल्यांदा  वेश्यावस्तीत गेले. शांता रेड्डी या वेश्यांसाठी सामाजिक काम करत होत्या. तोपर्यंत मला चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या तवायफ माहीत होत्या, मात्र वेश्यावस्तीतलं वास्तव यापेक्षाही भयानक असतं, हे तिथे पाहायला मिळालं.

एका पुरुषाने एका महिलेला मारहाण सुरू केली होती आणि ती बाई प्राणांतिक वेदनेने ओरडत होती. तिला कोणी सोडवत नव्हते. हे दृश्य अस्वस्थ करणारे होते. महिलांना कोणत्याच व्यवस्थेत कुठलेच हक्क कसे नाहीत, हे दाखवणारे होते. त्यातून आपल्याला अशा क्षेत्रात काम करायचे आहे, याची जाणीव झाली. वडिलांनीही मला कधी ‘तू अशा वस्तीत का जातेस?’ असे विचारले नाही. अशाच प्रसंगांतून घडत गेले. अशोक तांगडे या चळवळीतल्या तरुणासोबत ओळख झाली... त्या ओळखीतून अधिकच व्यापकरीत्या फुले, शाहू, आंबेडकर आणि सामाजिक प्रश्न कळत गेले... विचारांचा विस्तार होत गेला. जाणिवा समृद्ध होऊ लागल्या. वेदना जागवण्यासाठी हव्या असलेल्या संवेदना निर्माण होऊ लागल्या.

14 एप्रिल 1993 ला आमचा विवाह झाला. विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांनी यात मोठी भूमिका निभावली. विशेष म्हणजे बौद्ध, सत्यशोधक, श्रमजीवी संस्कार व आदिवासी अशा चार पद्धतींनी एकाच वेळी आमचा विवाह झाला आणि दुसऱ्याच दिवशी मुंबई येथील मोर्चासाठी आम्ही दोघे गेलो. लग्नानंतरचा दुसरा दिवस पोलीस ठाण्यात गेला. मात्र स्वतःच्या व्यक्तिगत सुख-दुःखापेक्षाही ज्या प्रश्नांसाठी आपण काम करण्याचा निश्चय केला आहे, ते प्रश्न महत्त्वाचे असतात- असे सतत वाटणारी मनोभूमिका तयार झाली होती.

प्रश्न : अशोक आणि तुम्ही एकत्रितपणे काम करायला सुरुवात केल्यावर जो संघर्ष वाट्याला आला, त्यातले काही प्रसंग-अनुभव सांगा...

- माझं काम निव्वळ महिला अत्याचारासाठी ओरडण्याचे नाही किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन भाषणे ठोकण्याचे नाही. वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या कामांमध्ये मी गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षेत्रातील वावर आणि प्रत्येक क्षेत्रातील काम तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याच निष्ठेने झोकून देऊन केले पाहिजे असे मला वाटते. 1993 ला झालेल्या भूकंपानंतर आम्ही तीन वर्षे थेट भूकंपग्रस्त भागात जाऊन मदतीचे काम केले होते. त्यांच्यातच राहत होतो. गरजूंना मदत मिळवून देतानाही जातीच्या उतरंडी कशा आडव्या येतात, हे अनुभवत होतो. दलितांकडे काहीच नव्हते, त्यांना घरंही नव्हती. असेही ते खायला महाग होते; मग आता मदतीची पाकिटं त्यांना कशाला, अशी सरंजामी मानसिकता एवढ्या मोठ्या आपत्तीनंतरही पाहायला मिळत होती. अशा वेळी दलित कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवणाऱ्या सैन्यदलाच्या जवानांना भेटून त्यांच्यापर्यंत अडचणी मांडणं, ही मोठी कसरत होती. मात्र ते काम आम्ही यशस्वीपणे केले.

भूकंपग्रस्तांना नुसत्या मदतीचीच गरज नव्हती; तर त्यांना पुन्हा उभं करायचं होतं. त्यांना मानसिक आधार द्यायचा होता, त्यांचं जगणं सुसह्य करायचं होतं, म्हणून मग आमचे वेगळे काम सुरू झाले. हे काम होते महिलांना एकत्र करण्याचे, त्यांना वेगवेगळ्या योजना सांगण्याचे, बचतगटाच्या माध्यमातून गावात बालवाड्या चालवण्याचे. मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून संघटना काय असते, संघटनशास्त्र काय असते, हे आम्ही दोघेही शिकलो होतो. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी उमरगा, औसा व लातूर जिल्ह्यातल्या गावागावांत केली. यातही अनेक अडचणी आल्या. तुम्ही गावातल्या लोकांना शिकवून शहाणे करताय, ते आता बोलायला लागले आहेत. म्हणून तुमचे बचतगट नको, तुमची मदतही नको, तुमच्या बालवाड्याही नको असे सांगणारे लोक होते. ‘गावात आलात तर तंगडी तोडू’, अशा धमक्या देणारे लोकही भेटले.

पण त्याच वेळी गावात गेल्यानंतर गावकऱ्यांचा विरोध न जुमानता महिलांनी कडं करून सुरक्षितरीत्या गावाबाहेर पाठवल्याचे प्रसंगही आयुष्यात आहेत. बीड जिल्ह्यात स्थायिक झाल्यानंतर मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून गायरान हक्कासाठी आमचा  लढा सुरू झाला. दलित आणि आदिवासी यांना जमीन कसण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे, त्यांनी कसलेलं गायरान त्यांच्या नावे व्हायला हवं- यासाठी मानवी हक्क अभियानाने उभारलेल्या लढ्यात ॲड.एकनाथ आव्हाड यांच्यासोबतच काम उभं केलं. त्या प्रयत्नातून पन्नास हजार कुटुंबं गायरान कसत आहेत. त्यांतील अनेकांची नावे सातबारावर आली आहेत. हे होत असतानाच महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर यायच्या. कुठे बलात्कार झाला, कुठे गावाने एकी करून एखाद्या महिलेला गावाबाहेर काढले, एखादी विधवा शरीरसंबंध ठेवत नाही म्हणून तिच्यावर बाहेरख्यालीपणाचे आरोप करत झालेले हल्ले असतील अथवा अशाच प्रकारचे अनेक अन्याय- अत्याचार असतील; असे अनेक लोक येऊ लागले.

आणि एखादी घटना कळली किंवा कोणी अडचण घेऊन आला की, त्याला आम्ही धीर द्यायचो. त्याच्याकडून संपूर्ण प्रकरण ऐकून घ्यायचे, त्याच वेळी आपल्या स्वतःच्या यंत्रणेमार्फत यात किती खरे किती खोटे याची माहिती घ्यायची आणि बोलणारी व्यक्ती खरे बोलत असेल तर त्याच्यासोबत पोलीस ठाण्यात जाणे, गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांचा हट्ट असतानाही त्यांना समजावून सांगणे, ठाणेदार ऐकत नसेल तर डीवायएसपी-एसपी यांच्याशी बोलणे, प्रसंगी मोर्चे काढणे, गुन्हा दाखल झाल्यानंतरही या प्रकरणाचा पाठपुरावा करणे, पीडिताला त्यानंतर व्यवस्थित जगता यावे यासाठी तिच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे- हे सारं सुरू होतं.

एखादं प्रकरण संपेपर्यंत पुन्हा दुसरं प्रकरण हाती आलेलं असतं. विशेष म्हणजे, हे सर्व करताना कधी पीडित मुलीसाठी आम्ही काय केलं, तिचं पुनर्वसन कसं केलं- हे कुठे माध्यमांसमोर सांगता येत नाही किंवा त्याचे अहवालही तयार करता येत नाहीत. हे काम असतं स्वतःच्या समाधानासाठी. हे सर्व काम करत असताना अनेक बाजूंचा संघर्ष असतो. पोलिसांशी, आरोपीच्या नातेवाईकांशी, अनेकदा अख्ख्या गावाशी, व्यवस्थेशी. प्रत्येक पातळीवर समोरच्याला समजून सांगावं लागतं, कधी कायद्याचा धाक दाखवावा लागतो, कधी संघटनेचं बळ दाखवावं लागतं, कधी मवाळपणा घ्यावा लागतो, तर कधी आक्रमक व्हावं लागतं. अनेकदा जिवावर उदार होऊन कामं करावी लागतात. लोक घरी येऊन धमक्याही देतात, प्रलोभनं दाखवतात, सापळ्यात अडकवण्यासाठी कधी खोट्या केसेसही पाठवतात; पण हे सगळं ओळखून काम करावं लागतं. अर्थात, हे करत असताना अनेकदा चांगले अनुभवही येतात. लोक खंबीरपणे पाठीशी उभे राहतात.

गेवराई तालुक्यातील ढालेगाव या गावात पोळ्याच्या सणाच्या दिवशी वाद झाला होता. दलित समाजाचे बैल मिरवण्याच्या वादातून तक्रारी झाल्या. मारामारी झाली. गुन्हे दाखल झाले. ‘ज्यांनी आमच्यावर खटले भरले त्या पोरांना गावात येऊ देणार नाही’, अशी शपथ साऱ्या गावाने घेतली. त्याच वेळी दलित समाजातील तरुणांनीही ‘आम्ही वेगळा पोळा करू आणि मंदिरप्रवेश करू’ अशी भूमिका घेतली. वातावरणातील तणाव वाढला. गावाला छावणीचे स्वरूप आले. मात्र त्या वेळी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक श्रीकांत पाठक यांनीच ठोस भूमिका घेतली. ‘राज्यघटनेने प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार जगण्याचा हक्क दिला आहे, त्यामुळे तुम्ही यांना मंदिरप्रवेशापासून अडवू शकत नाही आणि तुम्ही असे काही करणार असाल, तर हे सर्व पोलीस यांच्या संरक्षणासाठी आहेत’, असे सांगत स्वतःच्या उपस्थितीत त्यांनी मंदिरप्रवेश घडवला. असे अधिकारीही भेटतात आणि काम करण्याचं बळ वाढत जातं.

प्रश्न : एकंदरच हे काम सामान्यांच्या जगण्याच्या हक्काचं आहे. आर्थिक-सामाजिक,-शारीरिक-बौद्धिक समानता मिळाली पाहिजे यासाठीचं आहे. हे सर्व करताना जो संघर्ष करावा लागतो, त्यासाठी तितक्याच ताकदीच्या प्रेरणा लागतात. तुमच्यासाठी प्रेरणास्रोत कोण आहेत.

- ज्याच्यासोबत मी आंतरजातीय विवाह केला, तो अशोक. माझ्या प्रत्येक कामातला माझा मदतनीस, भागीदार. छोट्या-मोठ्या सगळ्या गोष्टींमध्ये मला अशोकचा सपोर्ट मिळत गेला. तो माझी ताकद म्हणून काम करतो. अनेकदा मी ॲग्रेसिव्ह होते, पण ‘मनीषा, असं केलं पाहिजे’ असं तो शांतपणे सांगत असतो. अशोकचे चुलते शाम तांगडे यांच्याकडून मी कुठल्याही गोष्टीचं मूल्यमापन कसं करायचं आणि चळवळीत काम कसं करायचं याची प्रेरणा घेतली, तर  ॲड.एकनाथ आव्हाडांकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी आणि रणनीती शिकायला मिळाली.

माझे वडील डॉ.वैजिनाथ तोकले हे तर आगळं-वेगळं व्यक्तिमत्त्व. पुरुषी मानसिकतेचा स्पर्शही न झालेल्या या व्यक्तीने प्रेमळ बाप, विश्वास ठेवणारा सहकारी आणि मुलीला तिच्या पातळीवर जाऊन समजावून घेणारा मित्र- अशा अनेक भूमिका निभावल्या. वडिलांकडून उचललेले हेच गुण संघटनात्मक पातळीवर कार्यकर्ते जोडताना मला उपयोगी पडतात. माझे सासरे लक्ष्मण तांगडे यांनी घरातला समन्वय कसा साधायचा, हे मला शिकवलं. या व्यक्तींसोबतच सावित्रीबाई फुले, मदर टेरेसा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहूमहाराज या महापुरुषांची चरित्रं सोबतीला असल्यामुळेच सावित्रीबाई फुले महिला मंडळासारखी संस्था उभी करून अगदी आदिवासींच्या मुलांसाठी ‘जागर’च्या माध्यमातून शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्याचे काम करत आहे.

प्रश्न : आता मागे वळून पाहताना काय दिसते?

- हा प्रवास निव्वळ सुखाचा नसतो. साऱ्याच गोष्टी केवळ आनंददायी असतात, असं नाही. कोणतंही काम म्हटलं की, त्यात अडचणी येणारच आणि ज्या वेळी समाजाला एखादी दिशा देण्याचा विषय असतो, त्या वेळी तर या अडचणी अधिकच मोठ्या असतात. मोठी अडचण असते ती समाजाच्या मानसिकतेची. तुम्ही भलेही मानवी हक्काची भाषा करा; पण ‘हे बायांचं आणि बायांसाठीचं काम आहे’ असंच लोक म्हणतात. ते सर्वसामान्यांसाठी असते, हे त्यांना पटतच नाही. समानतेचा विचार समजून घ्यायला आजही समाजाला अडचण येते. सरकारबरोबरच्या कामातही अडथळे येतात. मुळात सरकारी पातळीवर अनेक गोष्टींबाबत उदासीनता आहे.

कधी कधी सर्व पटत असतानाही हे करायचंच नाही- अशी भूमिका पोलीस, प्रशासन यांनी घेतलेली असते. त्यांना समजावण्यासाठी वेळ द्यावा लागतो. व्यवस्थेमध्ये आपल्या विचाराची स्वीकारार्हता नसते. त्यासाठी झटावं लागतं. मात्र असं असलं, तरी या कामांमध्ये तरुणाईचं मोठं समर्थन मिळत आहे. महिला प्रकर्षाने पुढे येत आहेत. जगण्याची भ्रांत असलेल्या महिला आपल्या मुलांनाच नव्हे, तर मुलींनाही शिकवू लागल्या आहेत आणि मुलींनादेखील हक्कांची जाणीव होत आहे. ‘अठरा वर्षांच्या अगोदर मी लग्न करणार नाही... तर ताईला सांगेन’ असं त्या ठणकावू लागल्या आहेत. आपल्या कामाचं खरं यश या गोष्टीतच आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.

माझ्यासोबत कार्यकर्त्या म्हणून आलेल्या आणि तयार झालेल्या, शाळेचं तोंडही कधी न पाहिलेल्या किंवा चुकून-माकून पहिली-दुसरी शिकलेल्या कांताबाई इचके, राधाबाई सुरवसे, जनाबाई रगडे, माया सोरटे, सुनीता भोसले, बायजाबाई घोडे या आणि यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्या आता हक्कांसाठी भांडतात. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मारतात. गावाला जाब विचारतात. कोणत्याही संघटनेमधून हीच जागृती अपेक्षित असते आणि हेच परिवर्तन घडवायचं असतं, याच विश्वासाच्या बळावर महिलांचे संघटन, आदिवासी प्रवर्गातील समाजाने आतापर्यंत बहिष्कृत केलेल्या, चोर ठरवलेल्या भिल्ल-पारधी या समाजांमध्ये शिक्षणाचा प्रसार करायचा असून सामान्यांच्या हक्कासाठी झगडायचे आहे.

मुलाखत : सुनील क्षीरसागर

Tags: मुलाखत सुनील क्षीरसागर मनीषा तोकले कार्यकर्ता पुरस्कार असंघटित कष्टकरी महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 interview mulakhat sunil kshirsagar manisha tokale karyakarta purskar asanghatit kashtkari Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मनीषा तोकले

सामाजिक कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके