डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खाणींविरोधातला लढा थांबणार नाही...

कार्यकर्ता पुरस्कार : प्रबोधन- रमेश गावस

रमेश गावस. आज गोव्याला त्यांची ओळख खाणींच्या प्रश्नांवर लढणारे पर्यावरणवादी म्हणून आहे. पण ते स्वतःला पर्यावरणवादी नाही, तर जीवनवादी सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणं पसंत करतात. खाणव्यवसाय हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. पण खाणमालकांचा हव्यास वाढला आणि खाणींनी इथल्या निसर्गावर राक्षसी हल्ला केला. बेकायदा खाणींमुळे जंगल, डोंगर, नद्याही उद्‌ध्वस्त होऊ लागल्या. अनियंत्रित उत्खननाच्या वाहतुकीमुळे रोज अपघात होत होते. त्यामुळे फक्त पर्यावरणच धोक्यात आलं नाही, तर समाजजीवनाचीही शकलं उडू लागली. त्याविरोधात गोव्यातले पर्यावरणवादी कोर्टात आणि वर्तमानपत्रांत धडका मारत होते. अशा वेळेस गोव्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न घेऊन प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणारे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते होते रमेश गावस.

प्रश्न : महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार तुम्हाला घोषित झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?

 - हा पुरस्कार खूपच मोठा आहे. मी केलेलं काम त्यासमोर काहीच नाही. त्यामुळे तो मी नम्रपणे स्वीकारतो आहे. हे सांगणारा फोन मला आला, तेव्हा मी स्वयंपाक बनवत होतो. माझी पत्नी आजारपणामुळे गेली दोन वर्षं अंथरुणावरच आहे. त्यामुळे मुलांसाठीचा डबा आणि जेवण मी करतो. त्यात मी समाधान शोधतो. ही बातमी आली, तेव्हा मी त्यात गुंतलो होतो. आनंद आणि दुःख समत्वबुद्धीने स्वीकारण्याचा मी प्रयत्न करतो. या पुरस्काराच्या आनंदाकडेही स्थितप्रज्ञतेने पाहण्याचा प्रयत्न मी करतो आहे.

प्रश्न : असा इतरांपेक्षा वेगळा विचार तुम्ही नेहमीच करत आला आहात का?

- आम्हा गोव्यातल्या लोकांना परिघामध्येच रहायला आवडतं. जगणं, आवडी-निवडी त्या परिघाच्या आतच. या परिघप्रियतेमुळे स्थितिशीलता येते. त्यापलीकडे जायला कुणालाच आवडत नाही. सगळे आपापल्या परिघांमध्ये अडकून बसतात. आपल्याला पुढे जायचं असेल तर परिघाच्या बाहेर यायला हवं. त्यासाठी मी माझ्यापरीने धडपड करतो. तो माझा पिंडच असावा. मी आठवी-नववीत असेन, तेव्हाचा एक प्रसंग आठवतोय मला. आजूबाजूच्या पन्नास-साठ घरांपेक्षा आमची परिस्थिती थोडी बरी होती. चतुर्थी आली की, आम्हाला नवे कपडे यायचे. पण शेजारच्या घरांमध्ये त्याच त्या जुन्या फाटक्या कपड्यांमध्ये गणपतीचं भक्तिभावानं स्वागत व्हायचं.

घरातल्या गणपतीचं स्वागत करण्यासाठी आमच्या दारासमोर भीक मागण्यासाठी उभ्या असलेल्या एका दलित बाईला मी पाहिलं आणि मला प्रश्न पडला- हा जर विघ्नहर्ता असेल, तर मग तो आपल्या भक्तांची विघ्नं का नाही दूर करत? आम्हाला जे सहज मिळतं, ते तो त्यांना का नाही देत? अशा प्रश्नांचा मी विचार करत राहायचो. आपल्यापरीने उत्तरं शोधायचो. त्या महत्त्वाच्या टप्प्यावर मला राष्ट्र सेवादल भेटलं.

प्रश्न : घरात काही सामाजिक कार्यांची किंवा पुरोगामी विचारांची परंपरा होती का?

 - विचारांमुळे मी राष्ट्र सेवादलाकडे ओढला गेलो आणि राष्ट्र सेवादलामुळे माझ्या विचार करण्याला दिशा मिळाली. याला पूरक म्हणावी अशी कोणतीही पार्श्वभूमी माझ्या घरात नव्हती. वयाच्या आठव्या वर्षी वडील वारले. मोठे भाऊ सरकारी नोकर होते, त्यामुळे चिंता नव्हती. लहानपणापासून वाचनाची आवड होती. घरात मिळाले नाहीत ते संस्कार माझ्यावर पुस्तकांनी केले. राष्ट्र सेवादलाच्या वाचनालयामुळे माझ्या वाचनाला खतपाणी घातलं गेलं. खाऊसाठीचे पैसे साठवून पुस्तकं विकत घ्यायची सवय जडली. मी वैचारिक वाचनाकडे सहज वळलो. ती पुस्तकं मला हवी तेव्हा मिळायची, कारण ती वाचायला कुणीच नसायचं. पुराण, इतिहासापासून रसेल, टॉलस्टॉयपर्यंत वेगळं वाटेल ते वाचून काढलं.

प्रश्न : तेव्हाचा म्हणजे 1968-69 चा डिचोलीतला काळ लक्षात घेतला, तर तुमच्यासोबतची मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होती. अशा वेळेस तुम्ही राष्ट्र सेवादलात कसे आलात?

 - राष्ट्र सेवादल म्हणजे बिनभिंतींची शाळा. मी याच शाळेचा विद्यार्थी आधीपासूनच होतो. त्यामुळे इथे येताच मी रमलो. शांतादुर्गा हायस्कूलमध्ये शिकताना अभ्यासात, खेळात, सांस्कृतिक कार्यक्रमांत मी चमकत  होतो. मी गोव्याबाहेर जाऊन माऊंटेनिअरिंगचं रीतसर प्रशिक्षणही घेतलं होतं. त्यामुळे मित्रांनी मला राष्ट्र सेवादलात ओढून नेलं. मला राष्ट्र सेवादलातलं मोकळ्या विचारांचं वातावरण आवडलं होतं. माझ्या शाळेत शिकवणारे शिक्षक तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखाही घ्यायचे. तुम्ही शाळेत मुला-मुलींना एकत्र शिकवता, म्हणजे एकत्र शिक्षणाचं तत्त्व मान्य करता. दुसरीकडे संघात मात्र मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या शाखा असतात. असं करणं तत्त्वनिष्ठेच्या विरोधात आहे, असं मला तेव्हा वाटलं. राष्ट्र सेवादलाच्या शिबिरांमध्ये माझं घडणं सुरू झालं. 

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या पाच-सहाशे मुलांमध्ये एकत्र राहिल्यामुळे दृष्टिकोन बदलत होता. जग कळत होतं. जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे जाऊन माणूस बघणं सुरू झालं.

प्रश्न : राष्ट्र सेवादलातला पुढचा प्रवास कसा झाला?

 - माझं शिक्षण संपल्यावर एका खाणकंपनीत नोकरी मिळाली. तिथे मी पर्मनंटही झालो होतो. तेवढ्यातच समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सरवणला शाळा उभारण्याची तयारी सुरू केली. मी तिथे शिक्षक बनायचं ठरवलं. त्या वेळची 790 रुपयांची नोकरी सोडून 250 रुपयांची नोकरी करणं, हा इतरांच्या लेखी मूर्खपणाच होता. पण भिंतींच्या शाळेत बिनभिंतींची शाळा भरवायची स्वप्नं बघणाऱ्यासाठी त्यासारखा आनंद नव्हता. त्यासाठी शिकवता-शिकवता मी डी.एड. झालो. सामाजिक कामात झोकून दिलं होतं, पण त्यासाठी शिकवण्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. दीर्घ काळाची शिबिरं किंवा राज्याबाहेरचे कार्यक्रम वगळता कधीच सुट्याही घेतल्या नाहीत.

सेवादलाचं काम सुरू होतंच. पुन:पुन्हा शाखा उभाराव्या लागत होत्या. शिबिरं आयोजित करत होतो. श्याम मानव आणि नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा परिचय होण्याच्या आधी आम्ही तशा प्रकारचं काम करत होतो. देवाला प्रसादपाकळी लावणं, ही आमच्या गोव्याची खास रीत. कोणतेही काम करण्याआधी फुलांची पाकळी मूर्तीला चिटकवून कौल घेण्याची पद्धत आजही इथे सुशिक्षितांमध्येही रूढ आहे. गमने आम्ही पाकळी चिकटवतो. पाकळी ईश्वराच्या इच्छेने पडते, तर मग गम श्रेष्ठ की ईश्वर- असं आव्हान आम्ही द्यायचो. आमच्याकडे काही गावांत विशिष्ट दिवसांत गावाच्या हद्दीत जेवण बनवणं निषिद्ध होतं. जेवण बनवलं की त्यात कीड पडते, असं सांगितलं जायचं. आम्ही मुद्दाम गावच्या हद्दीत जेवण बनवलं. आम्ही सांगायचो, भूत नाही, चमत्कार नाही. लोक कोयते घेऊन उभे राहायचे, पण आम्ही बधलो नाही. पुढे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची ओळख झाल्यानंतर आम्ही सात-आठ बाबांचा भांडाफोड केला.

प्रश्न : त्यानंतरचा टप्पा भारत जोडो आंदोलनाचा होता का?

 - ‘भारत जोडो’ आंदोलनाच्या आधी समता आंदोलन सुरू होतं. आम्ही तरुणांना एकत्र करून शिबिरं, व्याख्यानं चार वर्षं आयोजित केली. त्यात चंद्रशेखर धर्माधिकारी, कुमार सप्तर्षी, आ. ह. साळुंखे असे वक्ते बोलावले होते. इ.स. 1984 मध्ये गांधी पीस फाउंडेशनतर्फे मी पंजाबात गेलो होतो. तिथे दहशतवादामुळे हिंदू आणि शीख यांच्यात द्वेषाची परिसीमा गाठली गेली होती. एकोप्याविषयी सांगायला गेलं की, लोक खेकसत अंगावर यायचे. आमचा ग्रुप पंजाबात असतानाच इंदिरा गांधींची हत्या झाली. दिल्लीत दंगली पेटल्या. फाउंडेशनने मागे परतण्याचा आग्रह केला, पण ठरलेला कार्यक्रम पूर्ण करूनच आम्ही परतलो.

मी बाबा आमटेंच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालो होतो. यात्रेला इंदिरा गांधींच्या हत्येचीच पार्श्वभूमी होती. धर्मांधतेमुळे कर्तव्यबुद्धी कशी संपते, हे देशाने अनुभवले होते. ही यात्रा गोव्यात आली नव्हती, म्हणून आम्ही गोव्यात वेगळा कार्यक्रम केला. बाबा आमटे गोव्यात आले. त्यासाठी सायकल यात्रा केली. नंतर सलग 11 वर्षं 11 तालुक्यांत कार्यक्रम केले. 91 मध्ये गुजरातमधल्या डांगमध्ये आदिवासी आणि ख्रिश्चनांमध्ये हिंसा उफाळली. तेव्हा तिथेही मी गेलो होतो. गाडीवर दगडफेक झाली. हल्ले जीवावर बेतले होते. पण कुठेही मागे हटावंसं वाटलं नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर आम्ही ‘एकता यात्रा’ काढली. तिचा समारोप स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला केला होता. साने गुरुजी जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणात साजरी केली. तसंच वेडिंग फॉर नॅशनल इंटिग्रिटीचा प्रयोग केला...

 प्रश्न : हे काही तरी वेगळे आहे. याबद्दल जरा सविस्तर सांगा...

 - आम्ही आंतरजातीय लग्नांचा पुरस्कार करत होतो. त्यातून पुरोहितशाहीच्या विरोधातला हा प्रयोग निर्माण झाला. त्याचा एक वेगळा विधीही मी तयार केला आहे. होमकुंडाऐवजी भारताच्या नकाशाच्या साक्षीने हे लग्न होतं. समता, व्यक्तिस्वातंत्र्य अशा एकेक तत्त्वाची शपथ घेऊन नवरा-नवरीने नकाशाच्या भोवती एक फेरा घ्यायचा, अशी ती पद्धत आहे. मी स्वतः पुरोहित बनून अशी दहा लग्नं लावली आहेत. ‘पुरोहित नको,’ या आग्रहामुळे मी माझ्या स्वतःच्या मुलाचे लग्न लागत असताना मांडवाबाहेर पाहुण्यांचं स्वागत करत होतो.

प्रश्न : गोव्यात सामाजिक आंदोलनं उभी राहिल्याचं चित्र कधीच दिसलं नाही. असं का घडलं असावं?

- गोव्यात सामाजिक आंदोलनं उभी राहिलेली नाहीत, कारण इथे समाजच नाही; इथे समूह आहेत, गट आहेत. कारण कृतिशीलता हे समाजाचं प्रमुख लक्षण आहे. एखादा प्रश्न कायमचा सुटेपर्यंत लोक शांत बसायला नकोत. पण असं इथे कधीही झालेलं नाही. थोड्या-थोड्या काळासाठी चळवळी झाल्या आणि संपल्या. पुढच्या काळावर प्रभाव टाकतं ते आंदोलन. मुक्तिलढ्यामागेही पोर्तुगीजांना हाकलवणं एवढाच हेतू होता. कोणतीही एक विचारधारा त्यात नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यावर गोव्याच्या बांधणीचा विचार रुजलेला नव्हता. त्यामुळे मुक्ती मिळाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक गावागावांत पाय रोवून विधायक कामांत उभे राहिल्याचं चित्र दिसलं नाही.

गांधीजींच्या विचारांची खूप चांगली माणसं मडगाव परिसरात काम करत होती, पण त्यांना पूरक परिस्थिती मिळाली नाही. शिवाय त्यांनी आपला गांधीवाद आणि पुरोगामित्व एका भाषेच्या आग्रहासाठी खर्ची घातलं; ज्यातून काहीच सकारात्मक उभं राहिलं नाही. गोवा समजून घेणं खूप कठीण आहे.

सलग साडेचारशे वर्षं पोर्तुगीजांच्या सत्तेमुळे धार्मिक अत्याचार भोगलेले फक्त चार तालुके म्हणजे बार्देश, तिसवाडी, सासष्टी, मुरगाव हे गोव्यात आहेत. अन्य आठ तालुके पोर्तुगीजांच्या ताब्यात जवळपास दोनशे वर्षं उशिरा गेले. त्यांच्यावर धार्मिक अत्याचार झालेले नाहीत. त्यामुळे पोर्तुगीजसंस्कृतीचा प्रभावही तुलनेने खूप कमी आहे. पेडणे, सत्तरी, डिचोली आणि फोंडा हे तालुके आजही महाराष्ट्राशी सांस्कृतिक-सामाजिक दृष्ट्या जवळून जोडलेले आहेत. या दहोंचाही प्रभाव नसलेले सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा हे आदिवासीबहुल तालुके आहेत. हे तिन्ही प्रदेश केवळ सांस्कृतिक वैविध्यामुळे वेगळे नाहीत; तर त्यांना जोडणारा पोर्तुगीजांचा राजकीय अंमल आणि आताची गोवा राज्याची ओळख याशिवाय कोणताही सांधा नाही. त्यामुळे गोव्यात एकसंध समाजाचं चित्र नाही. हे कोणी तरी बोलायलाच हवं; म्हणून मी उघड बोलायचं ठरवलं आहे. अनेक वर्षं माणसांत राहून मी आपली मतं बनवली आहेत. त्यामुळे मी त्यावर ठाम आहे. माझ्यापेक्षाही अनेक जाणकार मंडळी गोव्यात आहेत. पण ती आपापल्या सोयीनेच बोलतात.

प्रश्न : असं असताना आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव गोव्यातल्या सत्तेपासून सांस्कृतिक जीवनापर्यंत स्पष्टपणे जाणवतो. त्या तुलनेत पुरोगामी चळवळी कमी दिसतात.

- पुरोगामी चळवळी कमी दिसतात असं म्हणण्यापेक्षा ‘दिसतच नाहीत’ असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. माणसाच्या इन्स्टिंक्टना फुंकर घालून द्वेष जागवणं सोपं असतं. आम्ही समता, आपुलकी, जिव्हाळा, समत्व सांगत असतो. ते रूजवणं कठीणच आहे. पुरोगामी विचारांच्या बाबतीत इथे फक्त विचारांची उचलेगिरी झाली. विचार स्वतःत रूजवण्यासाठी प्रयत्न झालेले कधी दिसले नाहीत. तिथे पुरोगामी चळवळ मागे पडली. विचारांना नव्या काळात, वेगळ्या संदर्भात मांडण्याची ताकद गोव्यातल्या पुरोगामी विचारवंतांमध्ये कधी दिसली नाही.

शिवाय, फक्त विचार असून चालत नाहीत. संघटनेचे एक तंत्र असते. त्या आंदोलनांना पाठिंब्याची गरज असते. संघटनेत सर्वोच्च स्थानी असणाऱ्या नेत्यांनी सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी आपली ताकद लावावी लागते. त्यांनी कार्यकर्त्याला मोठे करावे लागते. सर्व प्रकारची रसद त्याच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यायला हवी असते. असं समाजवादी चळवळीत काहीच झालं नाही. राजकारणाच्या पलीकडेदेखील सामाजिक चळवळ आणि संघटना बांधली गेली पाहिजे होती, याचं भान नव्हतं. त्यामुळे आंदोलन या रिले शर्यतीत काठी हातात घेण्यासाठी पुढे कार्यकर्तेच उरले नाहीत.  

प्रश्न : या परिस्थितीत निराश होणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही निराश झालेले कधी दिसला कसे नाहीत?

- मी जर परिवर्तनवादी आहे तर मग मी निराश कसा असू शकेन? दुर्दम्य आशावाद हे पुरोगामीत्वाचं लक्षण आहे. अगदी परवाच शाळेतल्या एका शिबिरात मी मुलांना प्रश्न विचारला, तुम्ही दलितांच्या घरी जेवाल का? बहुसंख्य मुलांनी त्याचं उत्तर ‘नाही’ असं दिलं. अशा परिस्थितीने निराश व्हायचं की पुन्हा नव्याने कामाला लागायचं, हे आपण ठरवायला हवं.

मी राष्ट्र सेवादलाच्या मुशीतून घडलोय. माझ्यावर गांधीजींचे, साने गुरुजींचे संस्कार आहेत. एस.एम.जोशी हे माझ्यासाठी सर्वात मोठा आदर्श आहेत. नरहर कुरुंदकरांच्या विचारांनी मला घडवलंय. पण मी टिपिकल समाजवादी नाही. कारण टिपिकल असणं हे निसर्गाच्या विरोधात आहे. प्रत्येकजण वेगळा असतो. निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन आपण आपली ओळख टिकवायला हवी, असं मला वाटतं. गांधीजींच्या पायाखालची जमीन वेगळी होती. एसेमच्या पायाखालची जमीन वेगळी होती. माझ्या पायाखालची जमीन वेगळी आहे. माझा टेक ऑफ पार्इंट वेगळा आहे. त्यांचे विचार पचवून, माझ्यात जिरवून मला माझे विचार घडवावे लागतील. झापडं लावून क्रांती तर होत नाहीच. साधं चांगलं जगताही येत नाही. स्वतःच्या विचारांवर स्वतः जगत गेलं की कोणतंच नैराश्य येत नाही.

विनोबा म्हणायचे, ‘मला अमावस्येची रात्र आवडते. कारण त्यात माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य पणतीला प्रकाश देण्याची संधी मिळते. मी नेता कधीच नव्हतो. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार कारण सर्वसामान्य माणूस पुन:पुन्हा उसळी मारून पुढे येऊ शकतो. चेन्नई एक्स्प्रेसमधल्या शाहरूख खान सांगतो तसं मी नेहमी सांगतो ‘डोण्ट अंडरएस्टिमेट पॉवर ऑफ अ कॉमन मॅन’.

प्रश्न : आज गोव्यात तुमची ओळख ही प्रामुख्याने खाणींच्या प्रश्नावर लढणारे पर्यावरणवादी म्हणून आहे. त्या लढाईविषयी सांगा.

- आधी एक गोष्ट सांगतो, मी पर्यावरणवादी नाही. मी जीवनवादी सामाजिक कार्यकर्ता आहे. आमच्या डिचोलीतली एक नदी खाणीमुळे नष्ट होणार होती. ते कळल्यावर मी खोलात शिरलो. कोर्टात जाऊन मी ती नदी वाचवली. त्या लढ्यात मला कळलं की, खाणीचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही. तो मुळात सामाजिक प्रश्न आहे. ते समजून घेण्यासाठी इतिहासात जायला हवं. पोर्तुगीजांनी खाणींच्या 765 कन्सेशन्स म्हणजे वारसाहक्काने चालणाऱ्या लीज दिल्या. त्यापैकी फक्त 157 ख्रिश्चनांना दिल्या. उरलेल्यांपैकी चार दोन अपवाद वगळता सर्व एकाच उच्च जातीतल्या व्यक्तींकडे होत्या. अडीचशे वर्षं धार्मिक अत्याचार करणाऱ्यांची मानसिकता इकडेच ढिली का पडली, याचा विचार नको का करायला?

इ.स.1955-56 साली पंडित नेहरूंनी पोर्तुगीजांवर आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळे खचलेले पोर्तुगीज गोवा सोडून जाण्याच्या तयारीत होते. पण फक्त खाणवाल्यांच्या आर्थिक मदतीमुळे त्यांनी सैनिकी कारवाईपर्यंत तग धरला. तेव्हापासून खाणव्यवसाय गोव्याचा कणा आहे, असं म्हणायची पद्धत रूढ झालीय. खाणप्रश्नाचा विचार करताना हे विसरून कसं चालेल? वारसाहक्काच्या लीज केंद्र सरकारच्या कायद्याखाली आणण्यासाठी विरोध का केला गेला?

त्यामुळे वर्ग आणि वर्ण यांच्या एकत्र मुजोरीतून खाणवाल्यांची वर्चस्ववादी मानसिकता निर्माण झाली आहे. त्यांनी आजवर बेदरकारपणे गोव्याची लूट केली आहे. सरकार कोणाचेही येवो, त्यांनी त्यावर आपला अंकुश ठेवण्यास मागेपुढे पाहिलेलं नाही. खाणव्यवसायिकांनी लोकांच्या मूलभूत गरजांवर गदा आणली आहे. त्यांनी इथले पाण्याचे स्रोत संपवले आहेत, हवा प्रदूषित केली आहे, शेतीसारख्या परंपरागत व्यवसायांना संपवलं आहे. या सगळ्याचा विचार खाणप्रश्नाच्या संदर्भात करायला हवा. म्हणून ‘पाणी की खाणी’ हा माझा मूळ प्रश्न आहे. उद्या पाणीच नसेल तर खाणीचा पैसा काय कामाचा? त्यामुळे माझ्या गोव्याचं पाणी संपवणाऱ्या खाणींविरोधातला माझा लढा थांबणार नाही.

मुलाखत: सचिन परब

Tags: मुलाखत पर्यावरणवादी पर्यावरण खाणी की पाणी सचिन परब रमेश गावस कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधन interview mulakhat paryavaranvadi paryavaran khani ki pani sachi parab ramesh gaavas karyakarta purskar prabodhan Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रमेश गावस

पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ता


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके