डिजिटल अर्काईव्ह

कार्यक्रम आणि उपक्रम (06 फेब्रुवारी 1988)

भारतातील व विदेशातील साडेचार हजारांहून अधिक सर्वोदय प्रतिनिधी मुंबईत प्रथमच भरलेल्या या अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनाला हजर राहिले होते. तीन दिवसांच्या या समेलनाच्या एम्. के. हायस्कूल बोरिवली येथील जागेला आचार्य धर्माधिकारी नगर असे नाव देण्यात आले होते.

निसर्ग गरजा भागवील, हाव खपवून घेणार नाही : सर्वोदय संमेलन

बोरिवली येथे भरलेल्या 28 व्या अखिल भारतीय सर्वोदय समाज समेलनाचा 21 डिसेंबर रोजी समारोप झाला. या प्रसंगी मानवजातीच्या भल्यासाठी आपण गांधीवादी मूल्यांचा अंगीकार करावा असे सुचविण्यात आले. रशिया, अमेरिका या जगातील महासत्तांनी अलीकडेच क्षेपणास्त्रांच्या मर्यादेबाबत जो समझोता केला त्याचे संमेलनाने स्वागत केले आहे. युद्ध, भूक, दारिद्रय आणि प्रदूषण ही सर्व आजच्या भौतिकतावादी संस्कृतीचीच फलिते आहेत आणि त्यावर गांधीवादी उपाययोजनाच उपयोगी ठरेल, असे विचार मांडण्यात आले. 3 दिवसांच्या या संमेलनात आजच्या समाज व्यवस्थेचे आव्हान व त्याचा अहिंसक पर्याय, यावर भाषणे व चर्चा झाली

उत्तर हिंदुस्थानातील चिपको आंदोलनाचे प्रवर्तक सुंदरलाल बहुगुणा यांनी पर्यावरणाचे प्रश्न व त्यांची अहिंसक उकल यावर बोलताना सांगितले की प्रदूषण हा बाजूला काढता येण्याजोगा प्रश्न नाही. युद्ध, भूक यांच्याशी त्याचा संबंध आहे. आपली संस्कृतीच लोभावर आधारलेली आहे. निसर्गाच्या साधनसामुग्रीची अमर्याद लूट केल्यामुळे आपण आज या कडेलोटापाशी आलो आहोत. या समाजव्यवस्थेविरुद्ध चिपकोने बंड पुकारले आहे. चिपको आंदोलनात म. गांधींचे स्वप्न साकार व्हावे असा प्रयत्न आहे. गांधीजी म्हणाले आहेत, निसर्ग प्रत्येकाच्या गरजा भागविण्यास तयार आहे. परंतु लोभाने काही केल्यास त्याला निसर्गाची साथ मिळणार नाही.

'वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे जपानी लेखक मासनीवू फूकुओका या संमेलनात सामील झाले होते. ते म्हणाले बुद्ध, गांधी, गुरुदेव टागोर यांचा समृद्ध, सांस्कृतिक वारसा मिळालेला भारतच शांतता, समृद्धी आणि समाधान यांच्या युगाकडे संकटात सापडलेल्या जगाला घेऊन जाऊ शकेल, ही माझी श्रद्धा या भारतभेटीमुळे दृढ झाली आहे.

म. गांधींचे चिटणीस महादेव देसाई यांचे चिरंजीव नारायण देसाई यांनी सध्या संपूर्ण क्रांति विद्यालयाच्या संचालनाचे बेडछी (गुजरात) येथे काम घेतले आहे. ते म्हणाले, सत्याग्रह ही भारताची किंवा एखाद्या पक्षाची मक्तेदारी नाही. पोलंडचे वालेसा आणि फिलिपाइन्सच्या मार्कोस यांची हुकूमशाही झुगारून देणाऱ्या फिलिपिनी जनतेने गांधीजींच्या मार्गाने लोक अन्यायाचा प्रतिकार करू शकतात व लोकशाही हक्कांचे संरक्षण करू शकतात असे दाखवून दिले आहे. 

प्रा. ठाकूरदास बंग, पंजाब कृती समितीचे निमंत्रक आहेत, ते म्हणाले, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे आपण म्हणतो परंतु ते खरे नाही. आपली लोकशाही ही औपचारिक लोकशाही असल्यामुळे लोकांच्या आशा-आकांक्षांचे तीत प्रतिबिंब उमटत नाही. शांतता व प्रगती यांचा मार्ग जनतेपर्यंत पोहोचविण्यातून जातो.

भारतातील व विदेशातील साडेचार हजारांहून अधिक सर्वोदय प्रतिनिधी मुंबईत प्रथमच भरलेल्या या अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनाला हजर राहिले होते. तीन दिवसांच्या या समेलनाच्या एम्. के. हायस्कूल बोरिवली येथील जागेला आचार्य धर्माधिकारी नगर असे नाव देण्यात आले होते.

पुढील सर्वोदय संमेलन भूदान चळवळीची गंगोत्री असणाऱ्या आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली या गावात भरेल, अशी घोषणा या वेळी करण्यात आली. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी