डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘नोमॅडलँड’ : और कारवाँ बनता गया...

संपूर्ण चित्रपटभर कॅमेराही मनसोक्त भटकंती करतो. विस्तीर्ण प्रदेशात, क्षितिजापर्यंत लांबच्या लांब पसरलेल्या रस्त्यांवर भटक्या मंडळींबरोबर हाही या कधी न संपणाऱ्या प्रवासाची तीव्रता आपल्या हालचालीतून मांडतो. ध्वनिसंयोजनाचे विशेष कौतुक यासाठी, की यातील अनेक दृश्ये अशी आहेत की ज्यात आवाजाला, ध्वनिसंकेताला प्रमुख भूमिका आहे. फर्नची आवडती बशी एकाकडून फुटते, तिचा खळ्ळ आवाज, कॅम्प फायर सुरू असताना उसळणाऱ्या ज्वालांची धग जाणवून देणारा फर्र आवाज ही  यातली काही उदाहरणे. उत्तम ध्वनिप्रयोग कथानकाची विश्वासार्हता वाढवतात, हे आपण या चित्रपटात अनुभवतो. 

‘नोमॅडलँड’ हा अतिशय तरल अनुभव देणारा चित्रपट यंदाच्या ऑस्करमध्ये अनेक विभागांत बाजी मारून गेला. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनेत्री, असे तीन महत्त्वपूर्ण सन्मान या ‘भटक्या’ चित्रपटाने मिळवले. निर्माती-दिग्दर्शक, संकलक क्लोई झाओ (मूळ चिनी वंशाची), अभिनेत्री फ्रान्सिस मॅक डोर्मंड या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. जेसिका ब्रुडर या पत्रकार तरुणीने विस्थापितांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. ‘महिला राज’ हा या सिनेमाच्या बाबतीत घडलेला सुंदर असा योगायोग आहे.

कथानकाची पार्श्वभूमी म्हणून 'The Grapes of Wrath' या 80 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाची आठवण आली. अर्थात याचा प्रवास वेगळा आहे. प्राप्त परिस्थितीकडे विस्थापित म्हणून न पाहता, सकारात्मकतेने पाहणारा हा कारवाँ, सुमारे दोन तास आपल्यालाही सहप्रवासी करून घेत भटकंती नावाच्या अनुभवाची गळाभेट घडवून आणतो. हे लेखन सत्य घटनांवर आधारित अशा वृत्तमालिकेवर बेतलेले आहे. 2008 मध्ये अमेरिकेत आलेली मंदी पुढे अनेक वर्षे पाय पसरून होती. त्याचाच परिणाम म्हणून 2011 मध्ये नेवाडा प्रांतात अनेक व्यवसाय, कारखाने बंद पडले. त्यातील एक गाव एम्पायर. गावाची इतकी वाताहत झाली की तिथला पोस्टल कोडही रद्द झाला. त्या गावात काम करणारी या चित्रपटाची नायिका फर्न, तिचे काम गेले, त्यात नवराही गेला. अशा कठीण परीस्थितीत एकच मार्ग उरला. गाव सोडून जाणे. कुठे तरी उदरनिर्वाहाचे साधन शोधणे. मग एक सर्व सोयी असलेली एक व्हॅन ती तयार करून घेते आणि प्रवासाला निघते. अमेझॉन या ऑनलाइन वस्तू पुरवठा करणाऱ्या कंपनीत ती नोकरीला लागते. पुढेही ती अनेक ठिकाणी फिरते. प्रसाधनगृह साफ करण्यापासून ते कौशल्याची आणि तांत्रिक कामेही करते. इथे अशाच परिस्थितीला तोंड देत जगणारी मंडळी तिला भेटतात.

या चित्रपटाच्या निर्मितीत मूळ लेखिकाही सहभागी झाल्यामुळे तिच्या कादंबरीत आलेली आणि प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली अनेक पात्रे या चित्रपटाचा भाग झाली. व्यावसायिक कलाकार आणि त्या जीवनाचा अनुभव घेतलेल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तींच्या मिश्रणाने हा चित्रपट समृद्ध झाला आहे. असे मिश्रण करणे हा  दिग्दर्शिकेचा एका अर्थाने धाडसी निर्णय; पण तो सोपा करून टाकला, यातील भटक्या माणसांनी. लिंडा मे या प्रत्यक्षात विस्थापित झालेल्या व्यक्तिरेखेचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कॅमेऱ्यासमोर ती बुजते की काय, अशी भीती दिग्दर्शक छोले झाओ हिला नक्की वाटली असेल. पण या आजीबाईंनी केलेली अदाकारी पाहिली की एवढ्या सगळ्या यंत्रसामग्रीसमोर ही किती सहज वावरली आहे, हे आपल्या लक्षात येते. यात दिसणारी माणसे ही काही पिकनिकसाठी एकत्र आलेली नव्हेत. पण अपरिहार्यपणे एकत्र येऊन ते त्यांची पिकनिक करून दाखवतात. सख्खे शेजारी काय वागतील असे यांच्यातील सौदार्ह आहे; हे या चित्रपटाचे वेगळेपण. या चित्रपटात त्या अर्थाने कुणी नायक नाही ना खलनायक. परिस्थितीच वेळ-काळ बघून या दोन्ही भूमिका निभावताना दिसते.

या सिनेमातील अविस्मरणीय भूमिका आहे ती फर्न हिची. ती अदा केली आहे फ्रान्सिस मॅक डोर्मंड हिने. ही आपले घर, गाव सोडून निघाली आहे, मनाविरुद्ध. पण एकदा का वास्तव स्वीकारायचे ठरवल्यानंतर मात्र तिने धारण केलेली स्वभावशैली कमालीची बोलकी आहे. कधी आपल्याला ती निर्विकार भासते, कधी तटस्थ. ती इतरांमध्ये फारशी समरसही होत नाही. पण तिच्या वृत्तीचा ओलावाही लपून राहत नाही. अनेक पावसाळे पाहिलेल्या, टक्केटोणपे खाल्लेल्या या शहाण्या बाईने या सिनेमाची कविताच करून दाखवली आहे.

अनेक भटकी मंडळी तिला भेटतात. त्यांच्याशी तिचा दोस्तानाही होतो. एका अशाच स्नेही झालेल्या डेव्हिड या  मित्राच्या निमंत्रणावरून ती त्याच्याकडे राहूनही येते. एका दिवसात त्याच्या कुटुंबीयांशी तिची नाळ जुळते. हा मित्रही आधी तिच्यासारखा भटकाच असतो. पण एकदा आजारी पडल्यानंतर मुलगा बळजबरीने त्याला घरी घेऊन आलेला असतो. ती जायला  निघते तेव्हा  मित्राची सून म्हणते, ‘‘तुम्ही इथेच राहा की! माझे सासरेबुवा तुमची आठवण काढत असतात.’’ हिलाही त्याची आठवण येत असते. हे भावबंध या चित्रपटातील पटकथेत अप्रतिमपणे गुंफले आहेत. एक सामान्य बाई अशा कसोटीच्या क्षणांना तोंड देताना कधीच कोलमडून पडली असती, भावनाविवश झाली असती. सर्व अडचणींना, अंगमेहनतीच्या कामांना, पार्किंग समस्यांना, गाडीतल्या संसाराला ज्या हिमतीने ती भिडली आहे, ते पाहिले की माणूस नावाच्या प्राण्यात संकटाना तोंड देण्याचे जन्मजात असलेले सामर्थ्य अधोरेखित होते. हिने तर या संकटांचा चक्क उत्सव करून दाखवला आहे. हिच्या प्रत्येक हालचालीत कार्यमग्नता आहे. ज्या तन्मयतेने ती प्रसाधनगृह साफ करते, त्याच  तन्मयतेने नव्याने ओळखी झालेल्या सहप्रवाशाची काळजी घेत, विचारपूस करते.

त्यात कोणी कॅन्सररुग्ण असते, तर कोणी अकाली मृत्यू पावलेल्या तरुण मुलाचा ढासळलेला बाप. कोणताही गट तिच्यासाठी नवखा राहत नाही; इतकी ती चटकन  मिसळते. मंदी, दारिद्र्य, अस्थिर जीवनशैली यांमुळे पाठीवर बिऱ्हाड घेऊन गावोगावी भटकायला लागलेल्या या भटक्यांची एक आश्वासक प्रतिनिधी म्हणून ती आपल्याला भिडते. चित्रपटात शेवटी आपल्या जुन्या घरी ती एकदा जाते, उरलेले सामान विकून टाकते. भकास झालेल्या घरात एक चक्कर टाकते आणि पुन्हा निघते, न संपणाऱ्या प्रवासाला.

संपूर्ण चित्रपटभर कॅमेराही मनसोक्त भटकंती करतो. विस्तीर्ण प्रदेशात, क्षितिजापर्यंत लांबच्या लांब पसरलेल्या रस्त्यांवर भटक्या मंडळींबरोबर हाही या कधी न संपणाऱ्या प्रवासाची तीव्रता आपल्या हालचालीतून मांडतो. ध्वनिसंयोजनाचे विशेष कौतुक यासाठी, की यातील अनेक दृश्ये अशी आहेत की ज्यात आवाजाला, ध्वनिसंकेताला प्रमुख भूमिका आहे. फर्नची आवडती बशी एकाकडून फुटते, तिचा खळ्ळ आवाज, कॅम्प फायर सुरू असताना उसळणाऱ्या ज्वालांची धग जाणवून देणारा फर्र आवाज ही  यातली काही उदाहरणे. उत्तम ध्वनिप्रयोग कथानकाची विश्वासार्हता वाढवतात, हे आपण या चित्रपटात अनुभवतो.

या चित्रपटात एक हृद्य प्रसंग आहे. बॉब आपल्या अकाली निधन पावलेल्या मुलाबद्दल फर्नला सांगत असतो. अनेक वर्षे भटकंती केल्यामुळे मिळालेले अनुभवाचे संचित त्याच्यापाशी आहे. तो सांगतो- ‘‘या भटकंतीत मी एक बघितलंय, माणसे पुन:पुन्हा भेटतात, नंतर आपापल्या मार्गाला लागतात, पण भेटतात नक्की. कदाचित या प्रवासात माझा गेलेला मुलगाही मला कधी तरी भेटेल; या आशेवर फिरतोय.’’ ‘नोमॅडलँड’ हा चित्रपट अशाच आशाआकांक्षाची पेरणी करत, नवे अनुभव घ्यायला उद्युक्त करत एका वळणावर संपतो. लेखिका जेसिका ही या चित्रपटाच्या यशानंतर या भटक्या जगाचा आढावा घेताना सांगते की, मला पुस्तक लिहीत असताना अमेरिकेत अशा भटक्या मंडळींची चारच ठिकाणे दिसली, आता त्यांची संख्या 24 आहे. आणि 30 लाख नागरिक बेघर आहेत; हे वास्तव अस्वस्थ करणारे असले तरी हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ ही भावना बळकट होते. आणि हेच या चित्रपटाचे यश आहे.

(हा चित्रपट हॉट स्टार, हुलू आणि अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मस्वर उपलब्ध आहे.)

Tags: जेसिका ब्रुडर क्लोई झाओ ऑस्कर अभिनय केशव साठ्ये चित्रपट परीक्षण सिनेमा The Grapes of Wrath लिंडा मे फ्रान्सिस मॅक डोर्मंड फिल्म आंतरराष्ट्रीय चित्रपट nomadland weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

केशव साठ्ये
keshavsathaye@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके