ग्रामीण भागातले कोणतेही दुकान पाहावे. या दुकानात नव्वद टक्के वस्तू शहरात बनलेल्या आढळतात. फार फार तर कच्चा माल तेवढा ग्रामीण भागातला तिथे असतो. त्यामुळे शहरांच्या वसाहतींचे स्वरूप यांना आले आहे. स्वदेशीचे नवे आंदोलन सुरू झाले तर ही स्थिती पालटता येईल. किसान संमेलन या दृष्टीने काही करणार आहे काय? की त्यांना 'हनुमान चालिसा'तच पुन्हा गुंतवून ठेवणार आहे?
चौधरी चरणसिंग यांचा वाढदिवस 23 डिसेंबर 1978 रोजी येतो. त्या निमित्ताने दिल्लीला एक कोटी किसानांचे संमेलन भरवण्याच्या घोषणा चालल्या आहेत. महाराष्ट्रातूनच एक लाख किसान त्या संमेलनाला नेण्याचा चंग नारायण नाईक यांनी बांधल्याचे वर्तमानपत्रांतून आले आहे. हा एक नवा कुंभमेळा राजधानी दिल्लीत भरवण्याची तयारी चाललेली आहे की काय, अशी शंका येते. राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी एकदा एका कुंभमेळ्यात जाऊन भूदेवांचे पाय धुतले होते आणि त्यावरून डॉ. लोहियांनी मोठे वादळ माजवले होते! दिल्लीच्या कुंभमेळ्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री प्रभृतींनी हजेरी लावावी अशी खटपट चालल्याच्या वार्ता झळकल्या आहेत. राष्ट्रपती संजीव रेड्डी जर गोंडा जिल्ह्यात श्री नानाजी देशमुख यांनी हाती घेतलेल्या विधायक कार्यप्रकल्पाच्या उद्घाटनास जातात, तर मग राजनारायण प्रभृतींच्या पुढाकाराने भरणाऱ्या या दिल्लीतल्या कुंभमेळ्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री वगैरेंनी हजर राहायला काय हरकत आहे?
फक्त दीड टक्क्यांचा हिशोब
चौधरी चरणसिंगांना या निमित्त एक कोटीची थैली देण्याचाही संकल्प सुटला आहे. एक कोटीच्या मेळ्यात एक कोटी म्हणजे फार म्हणता येणार नाहीत. माणशी फक्त एक रुपया! उसाच्या गाडीच्या टनामागे पै-पैसा घेऊन प्रवरानगरचे लाखो रुपयांचे रुग्णालय उभे राहिलेले साक्षात दिसत असताना एक कोटी फार वाटू नयेत! दिल्लीच्या कुंभमेळ्याला जायचे तर सरासरी पन्नास रुपये तरी माणशी खर्च येणारच. तेव्हा पन्नास कोटींच्या मामल्यात एक कोटी म्हणजे जेमतेम दोन टक्क्यांचा हिशोब झाला. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आषाढी वारीसाठी दिंड्या पुण्याहून पंढरपूरला निघाल्या होत्या. हडपसरला साने गुरुजी रुग्णालयाची बैठक चालली होती. दिंड्या रुग्णालयावरूनच पुढे जाणार होत्या आणि त्या निमित्ताने रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली होती. दोन-अडीच लाखांची यात्रा आषाढीला भरत असली तर पन्नास-एक लाख लोक तरी दिंड्यांशी या नात्याने संबंधित असतात. त्यांच्या कानांवरून नामघोष आणि संत वचनांचा गजर जातो. वाटेत कथाकीर्तनांचा मोठा गदारोळ उठतो. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ', 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले' हे अभंग गगनभेदी आवाजात म्हटले जातात. ‘की गाईची तृषा हरु, व्याघ्र विष होवोनि मारू, ऐसे नेणेचि गा करू तोय जैसे, भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे' अशा ओव्यांवर प्रासादिक भाषेत प्रवचने होतात. बरे, पंढरपूर वारीसाठी वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागत नाही की व्याख्यानांचे दौरे काढून तारखा कळवाव्या लागत नाहीत, सगळे कसे अगदी बिनबोभाट चालते!
जर असे घडले तर
दिंड्या दारावरून चाललेल्या असताना डॉक्टर म्हणाले, ‘‘ही लाख-दोन लाख मंडळी अशी नित्यनेमाने जातात, हे दिसत असताना ती निष्क्रिय आहे, असे कसे म्हणता येईल? ‘ज्ञानोबा-तुकाराम’ एवढ्या चारशे वर्षांच्या ज्ञानाची उजळणी करीत ही मंडळी जातात त्यांना निर्बुद्ध तरी कसे म्हणावे?" पुढे ते म्हणाले, "ही मंडळी मागे काय ठेवून जातात, असा विचार सहज मनात येतो. यांच्या सक्रियतेत आणि सुबुद्धतेत मेळ बसवला तर केवढेतरी कार्य होईल! गावातून दिंड्या पुढे गेल्या की मलमूत्राचा सडा शिंपडून मंडळी गेल्यासारखे वाटते! मलमूत्र विसर्जनाचा एक प्रश्न ह्या दिंडीतल्या माणसांनी हाताळला तरी अवघ्या महाराष्ट्राचा कायापालट झाला असता!"
गाडगे महाराजांचा धडा
गाडगे महाराज पंढरपूरच्या मंदिरात जात नसत. तुकडोजी महाराजही जात नसत. ‘भेदाभेद भ्रम अभंगळ’ असा घोष घुमत असताना चोखा मेळा आणि विठू महार यांच्या वंशजांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नाही म्हणून त्यांचा हा मूक सत्याग्रह असे. गाडगे महाराज झाडू घेऊन सफाई करीत. कुत्र्या- मांजराइतकी तरी स्वच्छता करा, मैल्यावर-मूत्रावर माती तरी टाका. ते उघडे प्रदर्शन ठेवून पुढे जाऊ नका, असे ते विनवीत.
तरी हा खर्च भरून निघेल
किसान संमेलनाचा उगम वीस वर्षांपूर्वी झाल्याची माहिती उजेडात आली आहे. पंढरपूरच्या सारखेच या बाबतीत देशातल्या सुशिक्षितांत अज्ञान असले तर आश्चर्य नाही! एक कोटींच्या या कुंभमेळ्यातून परतणारी ही ग्रामीण माणसे फक्त मलमूत्राची नव्या पद्धतीने व्यवस्था करण्याचा निचय करून परत गेली तर ह्या कुंभमेळ्यावर होणारा खर्च राष्ट्रकारणी लागला असे म्हणता येईल. पाच माणसांचे तरी किसानाचे कुटुंब असणार. पाच कोटी लोकांच्या मलमूत्राची नव्या पद्धतीने व्यवस्था लागली तर किमान 50 कोटींचे सेंद्रिय खत शेतीला उपलब्ध होईल आणि शेतीचे उत्पन्न वाढेल. अन्नासाठी आणि खतांसाठी कोणापुढे हात पसरण्याची मानहानी देशाला पत्करावी लागणार नाही.
तर अशी पाळी येईल
किसानाच्या दोन दशकांच्या आयुष्यात असे काही का घडले नाही, हे विचारण्यात अर्थ नाही. पण आताही हे न घडले तर एक नवा कुंभमेळा होऊन गेला, यमुनेचे पाणी प्रदूषित झाले, मनाची मलीनता गेली का नाही ते सांगता येत नाही, असे म्हणायची पाळी येईल. गावातील पाणवठे सर्वांना समान रीतीने खुले झाले, दलित वस्त्यांत वीज, पाणी, स्वच्छता समान रीतीने पोहोचली, पंचायतीत दलित व स्त्रिया यांना समानतेने वागवण्याचा निर्धार झाला, अमलात आला तरीदेखील हे किसान संमेलन कारणी लागले असे म्हणता येईल.
नवभारत उभा राहील
अशा या विधायक संघटितांचे दर्शन किसान संमेलनातून घडावे. त्यातून नव भारत उभा राहण्याची शक्यता आहे. जनता पक्ष काय आणि इतर पक्ष काय, सर्वांनी लोकांच्या प्रबोधनाचे कार्य खमंग बातम्या पुरवणाऱ्या वृत्तपत्रांवर सोपवले, रचनेचे काम दिरंगाईखोर व भ्रष्ट नोकरशाहीवर सोपवले आणि संघर्षाचे कार्य वाचाळांवर सोपवले असे दिसते. देशात आज एकमेव संघटित शक्ती फक्त नोकरशाही हीच आहे. आजच्या जटिल समस्या पेलण्याची ताकद या नोकरशाहीत नाही, चाकोरीत त्यांची कर्तबगारी दिसते. नव्या आव्हानांना सर्जनशीलतेने ती तोंड देऊ शकत नाही. तिला विकल्प ठरू शकेल अशी कोणतीच शक्ती आज देशात दिसत नाही आणि विशेषतः ग्रामीण भागात तर दिसतच नाही आणि भारत अद्यापही खेड्यांतच वसलेला आहे.
'हनुमान चालिसा'त गुंतवणार काय?
किसान संमेलन संयोजक अधूनमधून तरी असे म्हणू लागले आहेत की हा काही राजकीय कट वगैरे नाही. किसान संमेलनाने नवी मलमूत्र व्यवस्था ग्रामीण भागात रुजवली, सामाजिक समतेला उपकारक नवा व्यवहार सुरू केला तर हा कुंभमेळा ठरण्याऐवजी खरोखरीचे ते किसान संमेलन ठरेल. ग्रामीण भागातले कोणतेही दुकान पाहावे. या दुकानात नव्वद टक्के वस्तू शहरात बनलेल्या आढळतात. फार फार तर कच्चा माल तेवढा ग्रामीण भागातला तिथे असतो. त्यामुळे शहरांच्या वसाहतींचे स्वरूप यांना आले आहे. स्वदेशीचे नवे आंदोलन सुरू झाले तर ही स्थिती पालटता येईल. किसान संमेलन या दृष्टीने काही करणार आहे काय? की त्यांना 'हनुमान चालिसा'तच पुन्हा गुंतवून ठेवणार आहे?
Tags: विधायक कार्य खतात रूपांतर मलमूत्र व्यवस्था एक कोटी किसान दिल्ली किसान संमेलन constructive work conversion to fertilizer excreta system one crore farmers Delhi Kisan Sammelan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या