डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कादंबरीमय वारकरी संतांचे दर्शन

वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीची ऐतिहासिकता ही चरित्र-इतिहास-चरित्रात्मक कादंबरी, चमत्कारांचे उदात्तीकरण, चमत्काराविषयी वेगळी भूमिका, चिकित्सेचा अभाव या अनुषंगाने अभ्यासण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला दिसतो. या कादंबरीलेखनात काही मर्यादाही आढळतात. त्याविषयी मत मांडताना डॉ.राजेंद्र थोरात म्हणतात, ‘वारकरी संतविषयक कादंबरीकारांनी सांप्रदायिक चरित्रांचा आधार घेऊन कादंबरीलेखन केलेले आहे. पारंपरिक चरित्रातील विविध चमत्कार कादंबरीकारांनी काव्यात्मकतेने व नाट्यात्मकतेने रेखाटून चमत्कारांतून संतांचा गौरव केला आहे. वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी ऐतिहासिकतेचा वेध घेण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरलेली आहे. तत्कालीन विविध संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा, श्री विठ्ठल व पंढरीची वारी, इत्यादी चित्रण कादंबऱ्यांतून येत असले तरी त्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या चिकित्सेऐवजी भावनाशीलताच आढळते.                                                 

महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा लाभलेला संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहिले जाते. ही परंपरा अजूनही टिकून आहे. संतांचे विचार टिकून आहेत. हे विचार टिकून राहण्यामागे काहीएक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे, वारकरी संतांनी आपल्या विचारांना कृतीची जोड दिली आहे. सामान्यांना समजेल अशा सरळ-साध्या भाषेत आपले विचार मांडलेले आहेत. ज्यांना लिहिला-वाचता येत नाही त्यांनाही ज्ञानेशांची ओवी, तुकोबांचे अभंग तोंडपाठ आहेत. वारकरी संतांच्या साहित्याचा व कार्याचा प्रभाव कीर्तन, कविता, चरित्र, नाटक, नभोनाट्य, सिनेमा इत्यादी माध्यमांतून जाणवतो. कादंबरी या लोकप्रिय साहित्य- प्रकारातून वारकरी संतांचे जीवनचरित्र अनेक लेखकांनी रेखाटले आहे.

त्यातील काही कादंबऱ्यांचा आस्वादक दृष्टिकोनातून घेतलेला वेध म्हणजे ‘वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी’ हे पुस्तक होय. वारकरी संतांवर मराठी साहित्यातून मोठ्या प्रमाणावर लेखन झालेले आहे. सदर पुस्तक त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंग चरणी विनम्रतेने अर्पण केले आहे. ‘वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी’ या पुस्तकाची विभागणी लेखकाने पाच प्रकरणांमध्ये केलेली आहे.

1. संत चरित्रात्मक कादंबरीच्या प्रेरणा,

2. वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीचे स्वरूप,

3. वारकरी संतदर्शन,

4. वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीतील समाजचित्रण,

 5. वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीची ऐतिहासिकता.

या पाच प्रकरणांतून डॉ.राजेंद्र थोरात यांनी वारकरी संतविषयक कादंबऱ्यांवर ओघवत्या शैलीत लेखन केले आहे. वारकरी संतांचे जीवनचरित्र व त्यांच्या जीवनावरील कादंबऱ्या अभ्यासण्याच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

कादंबरी या लोकप्रिय साहित्यप्रकारामध्ये संतांना उशिरा न्याय मिळाला आहे. स.कृ. जोशी यांची ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ ही कादंबरी 1958 मध्ये प्रसिद्ध झाली. नंतरच्या काळात ‘मुंगी उडाली आकाशी’, ‘मोगरा फुलला’, ‘आनंदओवरी’, ‘घास घेई पांडुरंगा’, ‘महाभागवत’, ‘मुक्ताई’, ‘शांतिब्रह्म’, ‘महाद्वार’ इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या दिसतात. प्रस्तुत पुस्तकामध्ये या कादंबऱ्यांच्या अनुषंगाने विचार केलेला आहे. त्याचबरोबर चरित्र या प्रकाराची मीमांसा केलेली आहे. चरित्र आणि कादंबरीमधील साम्य-भेद याविषयी विवेचन केले आहे.

वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी लेखनामागील प्रेरणांबद्दल विचार मांडताना डॉ.राजेंद्र थोरात म्हणतात, ‘‘संतविषयक आदरातून व श्रद्धेतून कादंबरीलेखन झालेले आहे. प्राचीन काळापासून समृद्धपणे बहरत असलेल्या संतविषयक ‘चरित्रा’तून कादंबरीकारांना प्रेरणा मिळाली आहे, तसा निर्देशही कादंबरीकारांनी कादंबरीमध्ये केलेला आहे. ‘माणूस धर्माची’ शिकवण कादंबरीमधून देणे या प्रेरणेतूनही संतविषयक चरित्रात्मक कादंबरीचे लेखन झालेले आहे. कादंबरी या प्रकारामध्ये कल्पनेला वाव असतो, त्यामुळे या वाङ्‌मयप्रकाराची निवड कादंबरीलेखकांनी केलेली दिसते. त्याचबरोबर चरित्रनायकाविषयीचा आदर व श्रद्धाभाव, संतविषयक समृद्ध चरित्र वाङ्‌मय, चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे, संस्कृतीचा अभिमान व माणूस धर्माची शिकवण अशा विविध प्रेरणांमधून चरित्रात्मक कादंबरीचे लेखन झालेले दिसते. वारकरी संतांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे या प्रेरणेमधून-देखील कादंबरीलेखन झाले आहे. ‘कादंबरीकार चरित्रनायक यांच्या जीवनातील दुवे जोडण्याचा यशस्वी प्रयत्न करतो.’ याविषयीचे सोदाहरण विवेचन लेखकाने केले आहे.

वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीचे स्वरूप स्पष्ट करताना सर्वच संतांच्या जीवनावरील कादंबरीलेखनाचा विचार केलेला आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, त्याचबरोबर मुक्ताई, चोखोबा,  जनाबाई, सेनामहाराज, निळोबा आदी संतांच्या जीवनावरील कादंबरी-लेखनाच्या स्वरूपाचा विचार केलेला दिसतो. या सर्व कादंबऱ्यांचा विचार केल्यास असे लक्षात येते की, संतांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावलेले कादंबरीकार संतांच्या जीवनाचा वेध सात्त्विकतेने व लालित्यपूर्ण भाषेमध्ये घेतात. विविध घटना-प्रसंग कार्यकारणभावाने जोडलेले दिसतात. ‘पुढे काय’, अशी उत्सुकता वाचकांमध्ये निर्माण होते. कथानकाला एकात्म संस्कार कसा लाभेल, याचा विचार कादंबरीकारांनी केलेला दिसतो. इतर पात्रांच्या तुलनेत चरित्रनायकाचा गौरव कसा होईल, या दृष्टीने कलात्मक लेखन लेखकांनी केलेले दिसते. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतलेला दिसतो. माणूस म्हणून संतांना करावा लागलेला संघर्ष, त्यांनी केलेले समाजप्रबोधन इत्यादी दृष्टिकोनांतून बऱ्याच कादंबरीकारांनी कादंबरीलेखन केलेले दिसते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पदरही त्यामधून उलगडलेले दिसतात.

‘वारकरी संतदर्शन’ या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये कवी, तत्त्वज्ञ, संघटक, प्रचारक, लोकशिक्षक असणाऱ्या वारकरी संतांचे जीवनचरित्र अतीव आदर व श्रद्धेतून कादंबरीकारांनी सुलभतेने चित्रित केले आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्यावर अधिक संख्येने कादंबरीलेखन झाले आहे. वारकरी संत चरित्रात्मक कादंबऱ्यांमध्ये मध्ययुगीन समाजजीवनाचे चित्रण आढळते. संतांनी दिलेली नीतिमूल्यांची शिकवण, उत्तरेकडील भयावह स्थिती, यवनी आक्रमण, संतांनी केलेले चमत्कार, तत्कालीन कुटुंबपद्धती, विवाहपद्धती, कर्मठ रूढी-परंपरा, धार्मिक अवडंबर, शूद्र देवांची पूजा, आर्थिक व्यवस्था, सामाजिक जीवनाचे चित्रण, संतांची लोकशिक्षकाची भूमिका इत्यादी परिप्रेक्ष्यातून संतविषयक कादंबरीची सामाजिकता अभ्यासणे महत्त्वाचे आहे

एकंदरीत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व्यवस्था अभ्यासण्याचा प्रयत्न यामधून केलेला दिसतो. तत्कालीन यादवकाळ, मध्ययुगीन काळ आणि शिवकाळाची सामाजिकता अभ्यासण्याच्या दृष्टिकोनातून हे कादंबरीलेखन अतिशय महत्त्वाचे आहे. विविध आक्रमणांच्या काळात मराठी समाजाची अस्मिता जागृत ठेवण्याचे कार्य संतांनी केलेले दिसते. वारकरी संत चरित्रात्मक कादंबरीची ऐतिहासिकता ही चरित्र- इतिहास-चरित्रात्मक कादंबरी, चमत्कारांचे उदात्तीकरण, चमत्काराविषयी वेगळी भूमिका, चिकित्सेचा अभाव या अनुषंगाने अभ्यासण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला दिसतो.

या कादंबरीलेखनात काही मर्यादाही आढळतात. त्याविषयी मत मांडताना डॉ.राजेंद्र थोरात म्हणतात, ‘वारकरी संतविषयक कादंबरीकारांनी सांप्रदायिक चरित्रांचा आधार घेऊन कादंबरीलेखन केलेले आहे. पारंपरिक चरित्रातील विविध चमत्कार कादंबरीकारांनी काव्यात्मकतेने व नाट्यात्मकतेने रेखाटून चमत्कारांतून संतांचा गौरव केला आहे. वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी ऐतिहासिकतेचा वेध घेण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरलेली आहे. तत्कालीन विविध संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा, श्री विठ्ठल व पंढरीची वारी, इत्यादी चित्रण कादंबऱ्यांतून येत असले तरी त्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या चिकित्सेऐवजी भावनाशीलताच आढळते. ‘कादंबरीकारांनी पारंपरिक चरित्रांचा आधार घेतलेला असल्यामुळे दंतकथा व चमत्कार मोठ्या प्रमाणावर आढळतात,’ अशा प्रकारच्या मर्यादांचा उल्लेखही या पुस्तकात आलेला आहे. वारकरी संत, महाराष्ट्र संस्कृती अभ्यासण्याच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे.

वारकरी संत व वारकरी संप्रदाय यावर यापुढील काळात डॉ.राजेंद्र थोरात यांच्याकडून लेखन होईल, अशी अपेक्षा या पुस्तकातून निर्माण होते. वारकरी संप्रदायाच्या अभ्यासकांना, संशोधकांना व वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल, असे वाटते.

वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी
प्रा.डॉ. राजेंद्र थोरात 
संस्कृती प्रकाशन, पुणे 
पृष्ठे - 210 / किंमत - 250 रुपये      
मो: 020-24497343

Tags: वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी प्रा.डॉ. राजेंद्र थोरात  किरण गाढवे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके