डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

किशनसारख्या लहान मुलाला इतके सारे जमेल का, असा प्रश्न होता. सिनेमासाठी लागणारे पैसे कुठून उभे करायचे आणि आठ वर्षांच्या दिग्दर्शकावर कोण पैसे गुंतवणार, हाही प्रश्न होताच. तसेच जरी आठ वर्षांचा मुलगा सिनेमा बनवणार असला, तरी तो उत्तम बनायला हवा होता. त्यासाठी लाईट्‌स, कॅमेरा, संगीत यांची माहिती असणारे चांगले तंत्रज्ञ हवे होते, चांगले अभिनेते हवे होते. आणि हे सर्व त्याला कितपत जमेल, जर त्याला जमले नाही व तो आजारी पडला तर काय? सिनेमात गुंतवलेले लाखो रुपये वाया जातील? सिनेमा अयशस्वी झाला तर काय? असे असंख्य प्रश्न त्या वेळी त्याच्या आई-वडिलांच्या मनात आले. मात्र त्यांनी किशनला आवश्यक ती सर्व मदत उभी केली.

लहान मुलांच्या पराक्रमाच्या गोष्टी आपण कायमच ऐकत आलेलो असतो. सचिन तेंडुलकर कसा केवळ वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला, हे आपल्याला माहीत असते. किंवा, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यातील ‘पसायदान’ आपण म्हणत असतो. आपल्याला त्यांचे कौतुकही असते आणि आश्चर्यसुद्धा वाटत असते की- इतक्या लहान वयात इतक्या मोठ्या गोष्टी हे कसे करू शकले? त्यांच्या पराक्रमाची माहिती करून घेतल्याने आपल्यालासुद्धा असे वाटते की, आपणसुद्धा त्यांच्यासारखे काही तरी करावे.

आज आपण अशाच एका मुलाच्या लहान वयातील पराक्रमाची ओळख करून घेणार आहोत. किशन श्रीकांत नावाच्या एका मुलाने वयाच्या केवळ नवव्या वर्षी पूर्ण लांबीचा एक चित्रपट दिग्दर्शित केला. तोच त्या सिनेमाचा नायकसुद्धा होता आणि चित्रपटाची मूळ कथासुद्धा त्यानेच लिहिली होती. काय, धक्का बसला ना? पण हे खरेच घडले आहे. चित्रपट कन्नड भाषेत तयार केलेला असून, किशनला या कामाबद्दल जगभरातून अनेक बक्षिसेसुद्धा मिळालेली आहेत. आज किशन एकवीस वर्षांचा असून महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेल्या कर्नाटक राज्यातील बंगळुरु नावाच्या शहरात तो राहतो. 

किशनचा जन्म १९९६ मधील. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तो लहान मुलांसाठीच्या जाहिरातीत जी मुले घेतली जातात, तसे काम करू लागला होता. म्हणजे बालवाडी शाळेत जाण्याआधीच तो कॅमेऱ्यासमोर उभा राहून शूटिंग करत असे. वयाच्या चौथ्या वर्षी तो सिनेमात काम करू लागला. पाचव्या वर्षी तो सिनेमासाठी गायलासुद्धा लागला होता. कन्नड सिनेमासृष्टीत इतक्या लहान वयात उत्तम काम करणारा हा मुलगा तेव्हा सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला होता. परंतु, इतर लहान मुले जशी एखाद-दोन सिनेमांत काम करतात आणि मग ते सोडून देतात, तसे त्याने केले नाही. सिनेमांत व नंतर टीव्हीवरील मालिकांमध्ये तो काम करत राहिला. त्यामुळे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापर्यंत म्हणजे आपण तिसरीच्या वर्गात जातो, तेव्हा त्याने २४ सिनेमे आणि टीव्हीवरील मालिकांचे ३०० भाग इतके काम केलेले होते.
 
सिनेमात आणि टीव्ही मालिकांसाठी तो काम करत असे, तेव्हा शांत राहणे त्याच्या स्वभावात नव्हते. तो सतत प्रश्न विचारायचा. त्याला नव्या गोष्टी माहिती करून घ्यायला सतत आवडत असे. त्यामुळे सिनेमाचे शूटिंग करताना आवश्यक असा कॅमेरा व त्याचे वेगवेगळे प्रकार, जिथे शूटिंग होते त्या सेटवरील लाईट्‌स, सिनेमाचे संगीत तसेच या सर्वांना एकत्र आणणारे सिनेमाचे दिग्दर्शन आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न त्याला पडायचे. त्याच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी किशनच्या प्रश्नांना कधी टाळले नाही. त्याला त्यांनी फक्त उत्तरेच दिली असे नाही, तर जेव्हा जेव्हा शक्य होते तेव्हा कॅमेरा आणि इतर उपकरणे त्याला वापरू दिली. त्याबाबत तो भाग्यवान होता. आपल्याला आपल्या शाळेच्या प्रयोग-शाळेतील एखाद्या गोष्टीत खूप रस असतो आणि विविध कारणांमुळे आपल्याला त्या वस्तूंना हातसुद्धा लावता येत नाही; त्यांचा वापर करणे तर बाजूलाच राहिले. किशनचे असे नसल्याने, त्याला पडणारे प्रश्न आणि त्याचबरोबरीने प्रत्यक्ष वापर यामुळे त्याची सिनेमाविषयक जाणीव झपाट्याने वाढत गेली. 

किशनच्या आई-वडिलांना आपल्या हुशार मुलाचे कौतुक होते. त्यांनी त्याला कधीही थांबवले नाही, उलट त्याची सतत वाढ होत राहील याचीच त्यांनी काळजी घेतली. लहान मुलांच्या वाढीच्या काळात (म्हणजे वयाच्या पाच-सहा-सात वर्षे या काळात) आई-वडील खूप महत्त्वाचे असतात. किशनच्या आई-वडिलांनी त्याला जे प्रश्न पडत होते, त्यासाठी कधीही अडवले नाही. उलट शक्य होते त्या प्रकारे त्याला प्रोत्साहन दिले. आज किशन जो काही आहे, त्यामध्ये त्याच्या आई-वडिलांचा वाटा खूप मोठा आहे.

अशा या किशनला साडेसात वर्षांचा असताना एकदा रस्त्यावरील सिग्नलला उभी असलेली काही मुले दिसली. तो वडिलांबरोबर कारमध्ये बसलेला होता. आपल्यासारखीच दिसणारी ही मुले शाळेत न जाता अशी रस्त्यावर का उभी आहेत, असा प्रश्न त्याला पडला. त्याने तो प्रश्न त्याच्या वडिलांना विचारला. वडिलांनी त्याला सांगितले की, त्या मुलांना घरच्या परिस्थितीमुळे शाळेत शिकता येत नाही. त्या मुलांचे ते जगणे पाहून किशन अस्वस्थ झाला. घरी आल्यावर त्याने अशा मुलांवर एक छोटीशी कथा लिहिली. 

त्याआधीची चार वर्षे सिनेमात काम करत असल्याने किशनला सिनेमामाध्यमाशी संबंधित लेखन, छायाचित्रण, संगीत यांची व्यवस्थित माहिती झालेली होती. त्यामुळे जरी वय साडेसात वर्षांचेच असले, तरी त्याची समज खूपच जास्त होती. त्यामुळे लिहिलेली कथा त्याने आपल्या आई-वडिलांना दाखवली. त्यांना ती आवडली. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान असतोच. इथे तर किशनसारखा हुशार आणि समजदार मुलगा होता. आई-वडिलांनी ती कथा त्यांच्या मित्रांना, मैत्रिणींना दाखवली. सर्वांनाच किशनचे कौतुक वाटले. सर्वांना हे माहीत होते की, किशन सिनेमात काम करतो आणि त्याला सिनेमाच्या इतर तांत्रिक बाजूसुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहेत. त्यामुळेच मग या कथेवर आधारित एक सिनेमा बनवण्याचे ठरले. सिनेमा स्वतः किशनच दिग्दर्शित करणार, असेही ठरले. 

परंतु, सिनेमा बनवणे हे काही सोपे काम नाही. ती अनेक महिने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये अनेक माणसे, त्यांचा वेळ आणि खूप सारे पैसे गुंतवावे लागतात. असा सिनेमा तयार झाल्यानंतर इतक्या साऱ्या वेळेचे, पैशांचे आणि माणसांचे प्रेक्षकांकडून मोल केले जाते. अंतिमतः सिनेमा बनवला जातो तो प्रेक्षकांसाठी आणि त्यांना आवडावा यासाठी. प्रेक्षकांना आवडला, तर सिनेमा यशस्वी होतो. नाही आवडला, तर इतके सारे श्रम आणि पैसे वाया जातात. 

मात्र आपण हे लक्षात घ्यायला हवे की, सिनेमाचे दिग्दर्शन करणे ही खूप कठीण गोष्ट आहे. एकाच वेळी दिग्दर्शकाला कॅमेरा, लाईट्‌स, संगीत, संवाद, मेकअप, सिनेमाचे अभिनेते-अभिनेत्री आणि इतर तंत्रज्ञ, हाताशी असणारे पैसे, सिनेमाचे वितरण अशा असंख्य घटकांचा विचार करावा लागतो. आपल्या प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करून कथा आणि मग पटकथा (ज्यानुसार सिनेमाचे शूटिंग केले जाते) लिहावी लागते. कथा लिहितानाचा कथाकाराचा विचार काही वेगळा असतो. मात्र त्याच कथेचा सिनेमा बनवताना त्यात काही बदल करावे लागतात. कथा ही वाचायची असते, तर सिनेमा हा पाहायचा-ऐकायचा असतो. त्यामुळे मूळ कथेत बदल करून सिनेमाची पटकथा लिहिली जाते. सिनेमाच्या कथानकाला अनुरूप अशा भूमिका करण्यासाठी माणसे निवडले जातात. सिनेमाचे शूटिंग होते त्या जागा, हाताशी असलेले पैसे, अभिनय करणारांचा वेळ आणि स्टुडिओतील बुकिंग यांचे गणित जुळवून आणावे लागते. या साऱ्यांचा
दिग्दर्शकाला विचार करावा लागतो.

किशनसारख्या लहान मुलाला इतके सारे जमेल का, असा प्रश्न होता. सिनेमासाठी लागणारे पैसे कुठून उभे करायचे आणि आठ वर्षांच्या दिग्दर्शकावर कोण पैसे गुंतवणार, हाही प्रश्न होताच. तसेच जरी आठ वर्षांचा मुलगा सिनेमा बनवणार असला, तरी तो उत्तम बनायला हवा होता. त्यासाठी लाईट्‌स, कॅमेरा, संगीत यांची माहिती असणारे चांगले तंत्रज्ञ हवे होते, चांगले अभिनेते हवे होते. आणि हे सर्व त्याला कितपत जमेल, जर त्याला जमले नाही व तो आजारी पडला तर काय? सिनेमात गुंतवलेले लाखो रुपये वाया जातील? सिनेमा अयशस्वी झाला तर काय? असे असंख्य प्रश्न त्या वेळी त्याच्या आई-वडिलांच्या मनात आले. मात्र त्यांनी किशनला आवश्यक ती सर्व मदत उभी केली.

सिनेमा कन्नड भाषेत बनवायचा असे ठरले होते आणि शूटिंग मुंबईत होणार होते. मुंबई हे भारतातील प्रमुख सिनेमानिर्मिती केंद्र असून, गेली शंभर वर्षे तिथे सिनेमे बनवले जातात. किशनला सिनेमा बनवायचा होता कन्नड प्रेक्षकांसाठी. कर्नाटक राज्यात लोकांना सिनेमाचे प्रेम आहे. त्यामुळे सिनेमा पाहायला जाणे, हा त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. अशा या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन सिनेमा बनवायचा होता. तसेच तो सिनेमागृहांत चालेल आणि लहान- मोठे सर्वांनाच पाहायला आवडेल अशा रीतीने बनवायचा होता. त्यामुळे पटकथा लिहिताना आणि सिनेमाचे शूटिंग करताना हे सर्व लक्षात ठेवावे लागणार होते. हे सर्व सांभाळून किशनला सिनेमात मुख्य नायकाचे कामसुद्धा करायचे होते. किती कठीण प्रकरण होते हे सर्व! 

किशनने लिहिलेल्या त्या सिग्नलवरील मुलांच्या आयुष्याला केंद्रस्थानी ठेवून सिनेमा तयार होणार होता. सिनेमाचे नाव ठरले ‘केअर ऑफ फुटपाथ’. अशी मुले ज्यांच्या घराचा पत्ताच फुटपाथ आहे. शाळेत न जाणाऱ्या आणि दिवसभर रस्त्यावरचा कचरा गोळा करीत आपले आयुष्य जगणाऱ्या एका मुलाची ज्याचे नाव आहे स्लम (झोपडपट्टी), ही गोष्ट असणार होती. त्या मुलाला शाळेत जायची आणि शिकायची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला कसा संघर्ष करावा लागतो, अपमान सहन करावा लागतो आणि येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून तो जिद्दीने शाळेत जाऊन कसे शिक्षण घेतो- अशी ही गोष्ट होती. 

सिनेमात स्वतः किशनच मुख्य भूमिकेत होता. त्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सौरभ शुक्ला हेही सिनेमात काम करायला तयार झाले. जॅकी श्रॉफ आज साठ वर्षांचे आहेत. गेली चाळीस वर्षे ते सिनेमात काम करतात. सिनेमा बनवला गेला दहा वर्षांपूर्वी. तेव्हा त्यांचे वय होते पन्नास वर्षे आणि त्यांना सिनेमातील सूचना देत होता आठ वर्षांचा एक दिग्दर्शक. जॅकी श्रॉफ यांचा मोठेपणा असा की, त्यांनी स्वतःचे घोडे पुढे न करता, आपल्याहून वयाने बेचाळीस वर्षांनी लहान असलेल्या दिग्दर्शकाला काय हवे आहे त्यानुसार काम केले.

सिनेमाची गंमत अशी आहे की- सिनेमा जरी कन्नड भाषेतील असला, तरी तो बघताना भाषेची कोणतीही अडचण येत नाही. कन्नड भाषा न येतासुद्धा प्रेक्षक दोन तास पंधरा मिनिटे सिनेमा पाहू शकतात आणि नेमके काय चालले आहे, हे समजते. (सिनेमा 'Youtube' या इंग्रजी वेबसाईटवर पाहता येतो.) चांगल्या सिनेमाचे हे लक्षण असते. तसेच सिनेमातील छोटे-छोटे प्रसंगसुद्धा ज्या ताकदीने फुलवले आहेत, ते पाहता असे वाटतच नाही की, हा सिनेमा आठ-नऊ वर्षांच्या मुलाने बनवला आहे. एखादा चांगला व्यावसायिक सिनेमा असतो, तसा हा सिनेमा बनवलेला आहे. त्यात शाळा, शाळेतील विद्यार्थी- शिक्षक-पालक यांचे वागणे अगदी नेमकेपणे पकडलेले आहे. शहरातील गरीब-श्रीमंत अशी दरी बटबटीत न करता मांडलेली आहे. सिनेमात थोडेफार राजकारण (मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते आणि पत्रकार) येऊन जाते. 

या साऱ्याचा अर्थ असा की, या आठ-नऊ वर्षांच्या मुलाला केवळ सिनेमाचे माध्यम समजत होते असे नाही, तर त्याला आपल्या आजूबाजूचा समाजसुद्धा समजत होता. त्यातील गुंतागुंत, लोकांचे वर्तन आणि त्यापलीकडे असलेले राजकारण प्रशासन यांची ओळख नक्की आहे. या सिनेमात गाणी आहेत, विनोदी संवाद आणि प्रसंग आहेत. सर्व सिनेमा एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आणणारा असा आहे. एका सिनेमाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे किशनने आपले लक्ष वळवले आहे. हा सिनेमा त्याने जगभरातील लहान मुलांना अर्पण केला आहे. 

२००६ मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला. नंतर तो इंग्रजी, उडिया, हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या पाच भाषांत भाषांतरितसुद्धा झाला. सिनेमाचे सर्वत्र चांगले स्वागत झाले. सिनेमात गुंतवलेले श्रम, वेळ आणि पैसे अजिबात वाया गेले नाहीत. किशनला सिनेमामुळे जगभरात विविध ठिकाणी बक्षिसे मिळाली. परदेशांतील अनेक सिनेमा महोत्सवांत हा सिनेमा दाखवला गेला. तशा महोत्सवांत किशनचा सिनेमा फक्त निवडला गेला असे नाही, तर परीक्षकांनी त्याला विशेष पारितोषिके दिली. वयाच्या नवव्या वर्षी सिनेमा बनवलेला किशन हा जगातला सर्वांत लहान वयातील दिग्दर्शक ठरला. त्याच्या आधी एका तेरा वर्षांच्या मुलाने सिनेमा दिग्दर्शित करण्याचा विक्रम केला होता, तो किशनने मोडीत काढला. किशनचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स’मध्ये नोंदवले गेले. आपल्या देशात चित्रपटांसाठी सर्वोच्च समजले जाणारे केंद्र सरकारचे ‘सुवर्णकमळ’ पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते किशनला मिळाले. अनेक ठिकाणी त्याच्या मुलाखती घेतल्या गेल्या. या निमित्ताने त्याला खूप प्रवास करता आला. 

या सिनेमानंतरसुद्धा किशन कन्नड चित्रपटसृष्टीत कार्यरत राहिला आहे. त्याने शाळा आणि अभ्यास सांभाळून चित्रपटांत काम करणे चालू ठेवले आहे. सिनेमाच्या कामामुळे फार दिवस शाळेत न जातासुद्धा, दहावीत त्याला ९२ टक्के मार्क्स मिळाले होते. दहावीनंतर बारावी करणे आणि पदवी मिळवणे यामध्ये पाच वर्षे न घालवता थेट पदव्युत्तर पदवीला प्रवेश घ्यायचा, अशी त्याची इच्छा होती. किशनला आपल्या या मागणीसाठी कर्नाटक सरकारचा वर्षभर पाठपुरावा करावा लागला. अखेर त्याची परीक्षा घेतली गेली आणि त्याचे त्या विषयातील तांत्रिक ज्ञान लक्षात घेऊन, त्याला थेट पदव्युत्तर पदवीला प्रवेश दिला गेला. किशन आज एकवीस वर्षांचा आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सिनेमासाठी ऑस्कर पारितोषिके सर्वोच्च मानली जातात. ‘केअर ऑफ फुटपाथ’साठी किशनला लहान मुलांचे ऑस्कर म्हणतात, ते मिळाले होते. त्याला आता खरोखरचे, मोठ्यांना मिळते ते ऑस्कर पारितोषिक मिळवायचे आहे. त्या दृष्टीने तो तयारी करत आहे. आतापर्यंत एकाही भारतीय सिनेमाला ऑस्कर मिळालेले नाही. त्यामुळेच किशनला ऑस्कर मिळावे आणि आपल्या देशाचा जागतिक पातळीवर सन्मान व्हावा, यासाठी माझ्याबरोबर तुम्हीही त्याला शुभेच्छा द्याल काय?

(लेखन : संकल्प गुर्जर)
 

Tags: बालकुमार दिवाळी अंक संकल्प गुर्जर केअर ऑफ फुटपाथ प्रेरणादायी गिनीज वर्ल्ड बुक दिग्दर्शक बालकलाकार चित्रपट फिल्म मुव्ही सिनेमा मास्टर किशन balkumar Diwali ank Master kishan Inspirational story Teenage Kishan Shrikant Care of Footpath Movie child actor Director Film Cinema weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके