डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वैचारिक प्रवास : भेदाकडून अभेदाकडे जाणारा

विचारवंत म्हणून सानेगुरुजींची प्रतिमा प्रतिष्ठित करणाऱ्या भोळ्यांना सानेगुरुजींच्या जयंतीदिनीच मृत्यू यावा हा केवळ योगायोग असेलही, पण त्यातही भोळ्यांचा ‘वैचारिक अनुबंध’च प्रकट झाला, म्हणून भोळ्यांच्या लवकर जाण्याने चळवळीची, साहित्य व्यवहारांची, माणुसकीची व अशा अनुबंधाची झालेली हानी ही साचेबंद प्रतिक्रिया राहत नाही, तर मनाच्या दुखऱ्या कोपऱ्यांच्या संख्येत भर टाकणारी ठरते. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ जीवाभावाचे संपन्न मैत्र देणाऱ्या या विचारवंत मित्राच्या स्मृतीस हार्दिक अभिवादन.

प्रा. डॉ.भा. ल. भोळे यांच्या निधनाने एका निर्भीड, व्यासंगी, साक्षेपी, अशा भाष्यकाराला आपण सारेच मुकलो आहोत. डॉ.भोळे यांच्या संदर्भात या प्रकारची प्रतिक्रिया साचेबंद म्हणून सोडून देता येणार नाही. वरील निर्भीड, व्यासंगी व साक्षेपी हे तिन्ही शब्द भोळ्यांच्या लेखनात, जीवनव्यवहारात शब्दश: खरे होते. या शब्दांच्या अर्थांची छटा कितीही कमी-जास्त धरली तरी त्यांच्या टीकाकारांना, मित्रांना, वाचकांना हे शब्द वापरण्यास काही पर्यायच उरत नाही. महाराष्ट्राला ज्ञानोपासक भाष्यकारांची एक सकस परंपरा आहे. डॉ. भोळे याच परंपरेतले होते. हे जितके खरे, तितकेच या परंपरे अंतर्गत असणाऱ्या प्रा.गं.बा. सरदार, वसंत पळशीकर यांच्या परंपरेत ते अगदी चपखलपणे बसतात हेही खरेच. परिवर्तनवादी विचार विश्वातील प्रा.सरदार ते प्रा.भोळे या परंपरेचे एक वेगळेपण ठळकपणे दिसते, ते म्हणजे भाष्य करून समाजस्थितीचे भान करून देण्याबरोबर उभयतांनी प्रमाण मानलेल्या विचारवंतांना त्यांच्या अनुयायांसमोर परस्परपूरकतेने उभे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी तत्त्वदर्शन म्हणून व्यापक आहेत. विश्वात्मक असणाऱ्या व होऊ पाहणाऱ्या विचारधारांच्या त्या पाईक आहेत, पण त्यांचा व्यवहार मात्र परस्परवर्जक स्वरूपाचा आहे. अनुयायांच्या डोक्यावरील इतिहासाची ओझी, त्यांच्या अस्मितांच्या रूपात प्रत्यक्षात वावरत असल्याने समता चळवळीला प्रमाणभूत असणाऱ्या मूल्यांचे आविष्कार भिन्न व परस्परविरोधी स्वरूपात घडताना दिसतात. याने सामाजिक चळवळीचे पाऊल पुढे पडायच्या ऐवजी जैसे थेच राहते, त्याचा फायदा प्रस्थापितांनाच होतो. या वास्तवाचे तीव्र भान प्रा.सरदारांप्रमाणेच प्रा.भोळे यांच्या लेखनातही दिसते. परंपरा, धर्म, संस्कृती विचार आदींबाबत तर हे भान त्यांच्या लेखनात जागोजाग दिसते. या भानातून जसा प्रा. सरदारांनी लोकवाङ्‌मयाचा वेगळा (ऐतिहासिक दृष्टिकोनातून) अर्थ लावला, तसाच वेगळा अर्थ प्रा.भोळे यांनी फुले-आंबेडकर-शाहू-गांधी- मार्क्स यांच्याबाबतीत लावला आहे. या साऱ्यांच्या विचारधारांचे मूलगामी, कालोचित असे परिष्करण करून त्यांना अनुयायांच्या ‘बंदिस्त’ पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न व विरोधकांच्या तथाकथित हिंदूकरणातून सोडवण्याचा प्रयत्न एकाचवेळी करण्याचे आव्हान प्रा.भोळे यांनी लीलया पेलले, म्हणूनच प्रा.सरदारानंतरची त्यांची परंपरा चालवणारा ‘प्रबोधन व्रती’ असे त्यांचे वर्णन जास्त वास्तव ठरते. सत्तरीच्या दशकात डॉ.भोळे यांच्या लेखनाला सुरुवात झाली, त्यावेळी साहित्य, राजकारण व समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत प्रस्थापितांना हादरे बसत होते. दलित समूहांच्या शिक्षित फळीने आपले हक्क, व्यवस्थेतील आपला वाटा मागत, व्यवस्थेलाच आव्हान दिले होते. हे आव्हान इतके मूलगामी होते की परिवर्तनाच्या विश्वातही त्याने खळबळ माजली. म.फुल्यांचे नव्याने मूल्यमापन करण्याचाही हाच काळ होता आणि मधल्या जातींच्या उठावामुळे राजकारण स्पर्धाशील होण्याचाही हाच काळ होता. शिक्षित दलितांच्या अनुभवाने बद्ध झालेल्या साहित्यकृतींनी पांढरपेशे समाजस्तरही हादरून जाण्याचा हाच काळ होता. विविध विचारप्रणालींवर आधारलेले संघर्षशील गटही याच काळात टोकदार होताना दिसतात. हा सर्वच काळ घुसळणीचा होता, तसा पुरोगामी चळवळींतर्गत परस्परांपासून अंतर राखणाराही होता. काळाची ही पार्श्वभूमी घेऊन भोळयांमधील अभ्यासक लिहिता झाला. राज्यशास्त्र,समाजशास्त्र, इतिहास, साहित्य अशा विविध क्षेत्रांत डॉ. भोळ्यांना मुळातच रूची असल्याने आपली रूची, तत्कालीन वास्तव व परिवर्तनवादी मानस यांचा(भिन्न न करता येणारा) ‘संयोग’ त्यांच्या लेखनात झाला. भोळ्यांनी ज्या ज्या विषयांवर लिहिले, त्या प्रत्येक विषयांचे त्यांचे आकलन (चोख, कालोचित व ) एकूण परिवर्तनवादी चळवळ पुढच्या टप्प्यावर जाण्यास उपयुक्त ठरेल असेच दिसते. प्रा. सरदारांसारखे डॉ. भोळे मार्क्सवादी दृष्टी बाळगत होते, पण ते कम्युनिस्ट झाले नाहीत, फुले-आंबेडकरी चळवळीची तरफदारी करताना ते मार्क्स वा गांधी विरोधी झाले नाहीत. किंबहुना  चळवळींना ग्रासणारी द्वंद्वे (उदा. मार्क्स विरुद्ध बुद्ध, गांधी विरुद्ध आंबेडकर) कशी दूर होतील याचाच विचार त्यांच्या लेखनात दिसतो. या द्वंद्वात्मकतेमुळे चळवळींचे समांतरत्व वाढत जाते व एकूणात त्यांची परिणाम क्षमता कमी होते. यातूनच परिवर्तनाची सुटी बेटे तयार होतात. त्यातून मग संकुचित अस्मिता, वैचारिक अवरोध यांची मालिका सुरू होते, हीच त्यांची धारणा राहिली. सामाजिक चळवळीतील दैवते मानले गेलेल्या विचारवंतांचे परस्परपूरकत्व पुढे आणणे ही मग त्यांची बांधिलकी झाली. सत्तरीच्या दशकातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी व प्रा.भोळ्यांचे लेखनविषय यांच्या तादात्म्यातून ही बांधिलकी अगदी सघन झाली. मात्र विविध विचारवंतांचे परस्परपूरकत्व पुढे आणण्यासाठी अर्थांची ओढाताण करणे, पुराव्यांची मोडतोड करणे व विसंगतींकडे कानाडोळा वा दुर्लक्षकरणे अशा गोष्टींची त्यांना गरज पडली नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ‘ऐतिहासिक दृष्टिकोना’बद्दलची त्यांची चोख समज व त्याचे उपयोजन करण्यातील निरपेक्षता हे होय. (म्हणूनच ‘निर्भीड आणि व्यासंगी’ हे शब्द भोळ्यांच्या बाबतीत अर्थपूर्णच ठरतात.) या निरपेक्ष उपाययोजनामुळेच पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही छावण्यांतील अस्मितावाद्यांच्या झुंडशाहीवर व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्यांवर, भोळे परखडपणे लिहू शकले.(जिज्ञासूंनी भोळे यांचा भावनादुखीचे राजकारण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हा ‘साहित्य-अवकाश’ या त्यांच्या अलीकडच्या पुस्तकातील लेख अवश्य वाचावा). ‘आंधळ्या विभूतीपूजेत परिवर्तीत होणारे भावनादुखीचे राजकारण व विद्यमान बौद्धिक धुरिणांचे अचिकित्सक अंधानुयामित्व’ या चळवळींमधील दोषांवर प्रा.भोळे मांनी अचूक बोट ठेवून परिवर्तनवाद्यांना सावध करण्याचे अत्यावशयक कार्य केले आहे.

समतेच्या चळवळीत विविध विचारधारांच्या राहुट्या किंवा छावण्या आहेत. या साऱ्यांच्या सर्वच भूमिका भोळ्यांना मान्य नव्हत्या, पण त्यांनी आपल्या विरोधाला वैचारिक मर्यादेतच तारस्वर दिला. मतभिन्नता म्हणजे द्वेषाचा आधार नव्हे, एवढेच सांगून भोळे थांबले नाहीत तर समताविचाराचे समाजात प्रवर्तन करणाऱ्यांसाठी त्यांनी ‘संघर्ष किंवा द्वंद्वाच्या नावाखाली द्वेषाधिष्ठित रणनीतींचा अवलंब करणाऱ्या चळवळी समतेत फारसे योगदान करू शकणार नाहीत.’ असा इशाराही त्यांनी देऊन ठेवला आहे. (विसावे शतक आणि भारतातील समताविचार, पृष्ठ121) विषमता कमी व्हावी किंवा नष्ट व्हावी म्हणूनच्या संघर्षात सबंध समाजालाच (केवळ लाभार्थींना नव्हे) समतेच्या दिशेने नेण्याचे दायित्व समाजधुरिणांनी पार पाडायचे असते (उपरोक्त पृ.122) ही समतेच्या चळवळीची गरजच डॉ.भोळे यांनी अधोरेखित केली व त्यांचे सारे लेखन, सामाजिक  व व्यक्तिगत व्यवहारही यासाठीच्या सामंजस्यांनी परिपूर्ण होते. भेदाकडून अभेदाकडे, विषयतेकडून समतेकडे जाण्यासाठी द्वंद्ववादाचा निरास होण्याच्या प्रक्रियेला अभ्यासक-भाष्यकार म्हणून भोळ्यांचे हे योगदान फारच मोलाचे आहे. समता विचाराच्या चर्चाविश्वात उदारमतवादाच्या मांडणीला जोड देणाऱ्या अमर्त्य सेन प्रभृतींच्या लेखनाची चिकित्सा करून भारतीय संदर्भात त्याच्याही पुढे जाण्याचे आव्हान त्यांनी दाखवून देऊन एकविसाव्या शतकातील ‘समता’ संकल्पने पुढची आव्हाने परिवर्तनवाद्यांनी पेलण्यासाठी काम केले पाहिजे याचेही दिग्दर्शन केले आहे. म.फुले, महर्षी वि.रा.शिंदे, आंबेडकर, गांधी यांच्या समन्वयाचा प्रा.भोळे यांचा प्रयत्न व विद्यमान जागतिक वास्तवाशी जोडून घेऊन व्यापक व्यवस्था परिवर्तनाशी तो जोडण्याचा त्यांचा प्रयत्न जर एकत्रितपणे पाहिला तर आताच्या समतेच्या चळवळी वैश्विक स्तरावर जाण्यासाठी काम करावे लागेल, याचे ते दिग्दर्शनच आहे असे म्हणता येते.

राजकीय-सामाजिक प्रश्नांइतकाच रस भोळ्यांना सांस्कृतिक विश्वातही होता. किंबहुना समाजपरिवर्तनवाद्यांनी सांस्कृतिक प्रश्नांची उपेक्षा करता कामा नये. अशीच त्यांची धारणा होती. सांस्कृतिक विश्वातले अनेक प्रश्न घेऊन त्यांनी लेखन केले. त्यात साहित्यविषयक लेखन फार महत्त्वाचे आहे. समाजातील साहित्य व्यवहार हा अधिकाधिक लोकानुवर्ती कसा होईल, हे पाहणे ही परिवर्तन चळवळींचे कामच आहे असे मानून याही क्षेत्रात भोळ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सामाजिक शास्त्रांच्या व्यासंगाची पार्श्वभूमी असल्याने भोळ्यांचा साहित्य विचार हा स्वाभाविकच समाजसापेक्ष झाला आहे. मराठी लेखकांची संदिग्ध तत्त्ववैचारिकता, राजकारणाचे वरवरचे व वृत्तपत्रीय आकलन, जनजीवनाविषमीची अत्यंत जुजबी जिज्ञासा, लोकलढ्यांकडे बघण्याचा तुच्छतापूर्ण दृष्टिकोन’ याचा मराठी साहित्य व्यवहारांवर झालेल्या परिणामांकडे (साहित्य अवकाश, पृ, 83-84) लक्ष वेधण्याचे काम करून भोळे थांबले नाहीत, तर त्यातून साहित्य व समाज यातील वाढत्या अंतराकडे त्यांनी निर्देश केला आहे. मराठीतील रूढ आस्वादक समीक्षेपेक्षा वेगळी समीक्षा भोळे यांनी लिहिली ती त्यांच्या समाजसापेक्ष साहित्यविषयक दृष्टीमुळेच. मराठी गद्य शैलीला म. फुल्यांनी दिलेल्या योगदानाचे दर्शन मराठी वाचकांना भोळ्यांनी घडवले तेही याच साहित्य दृष्टीमुळे. भोळ्यांच्या समीक्षादृष्टीत त्यांच्या सामाजिक शास्त्राच्या व्यासंगाचेही उत्तम दर्शन घडते. विद्यमान (जागतिक स्तरावरील व त्याचा परिणाम म्हणून भारतातीलही) नवभांडवली बाजारशरण सामाजिक वास्तवाचाही त्यांच्या समीक्षालेखनात संदर्भ दिसतो. (ज्येष्ठ समीक्षक म.सु.पाटील यांच्या ‘साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध’ या पुस्तकावर लिहिताना (साहित्याचाअवकाश, पृष्ठ 130) डॉ.भोळे यांनी आजच्या बाजारपेठेने व माध्यमांनी जीवनावर केलेल्या परिणामांबद्दलचे अतिशय भेदक विवेचन केले आहे.) समाजशास्त्रीय समीक्षा मराठी साहित्य व्यवहारात नवीन नाही, पण तिचा वापर करून लोकजीवन तळापासून वळणाऱ्या घटनांच्या परिणामी निर्माण होणाऱ्या प्रवाहांना कवेत घेऊन साहित्य पुढे जाताना दिसते का, हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न अर्थपूर्ण व वेगळा म्हणावा लागेल. या दृष्टीने अनेक कलाकृतींची त्यांनी लिहिलेली परीक्षणे, साहित्यविषयक प्रश्नांवरची भाष्ये पाहण्यासारखी आहेत.

संस्कृती, कला, प्राचीन वास्तू याकडे पाहण्याचा भोळ्यांचा दृष्टिकोनही त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाने बद्ध आहे व त्यावर डॉ.लोहियांचाही प्रभाव आहे. डॉ.यशवंत मनोहरांच्या ‘स्मरणाची कारंजी’ या पुस्तकावरील (साहित्य अवकाश, पृष्ठ 35) भोळ्यांचा परीक्षण लेख या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. आजच्या काळात आलेले शोषणाचे-विषयतेचे भान व त्यातून घडणारे मानस इतिहासाकडे, प्राचीन कला-वास्तू यांचेकडे जेव्हा पाहते, तेव्हा ऐतिहासिक दृष्टिकोनाचा लोप होण्याची शक्यता असते व त्यातून साहित्य संस्कृतीचा कृतक संबंध व्यक्त होतो, हा भोळे यांचा इशारा त्यांच्या अव्वल समीक्षा दृष्टीची साक्ष देतो. वरवर साहित्य बाह्य वाटणारी ही समीक्षादृष्टी, साहित्य ही समाजबाह्य गोष्ट तर नाहीच, पण ती समाज सापेक्ष असते याचा उच्चार करणारी आहे. भोळे यांनी सततच उत्साहाने समाजसापेक्ष साहित्यकृतींची(उदा. अरुण काळे, संतोष पद्माकर पवार, प्रफुल्ल शिलेदार हे कवी) या दृष्टीतून चिकित्साही केली. समाजसापेक्ष असणे व तिचे कलात्मक असणे यात त्यांना अंतर वाटत नाही. हेही त्यांचे वेगळेपण म्हणावे लागेल. साहित्य व्यवहारातील भाषा या घटकाविषयी भोळे खूपच जागरूक होते. अनेक इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी प्रतिशब्द दिले. याबाबत ते आगरकरांचा कित्ता गिरवतात, तर मराठी भाषेतच लिहिणे हा राजवाड्यांचा बाणा जपून फक्त मराठीतच लिहितात. मराठी साहित्याच्या समृद्धीसाठी इंग्रजी, हिंदी ग्रंथही भाषांतरित करतात व भाषांतराबाबतही संस्कृतीसापेक्षतेचे भान दाखवतात. साहित्य व्यवहाराच्या समृद्धीसाठी निरुपयोगी ठरणाऱ्या साहित्य संमेलनापासून ते फटकून राहिले व त्याऐवजी गंभीर साहित्य चर्चेच्या व्यासपीठांना त्यांनी आपले मानले. याबाबत ना श्रोत्यांच्या मोठ्या संख्येची भुरळ त्यांना कधी पडली ना मोठ्या श्रोतृसंख्येने त्यांना लोकानुरंजनी भूमिका घ्यायला भाग पडले.

संस्कृतीकारणाच्या क्षेत्रातही अत्यंत महत्त्वाची घटना असणाऱ्या पूर्वास्पृश्य समाजगटांच्या धर्मांतराचा त्यांनी साक्षेपी आढावा घेतला. यात विपश्यनेच्या मागे पळणाऱ्या नवबौद्ध बांधवांना या भ्रामक विचारापासून परावृत्त करण्याचा त्यांचा प्रयत्न ठळकपणेदिसतो. दलित चळवळीचा आस्थेवाईक पण परखड भाष्यकार ही त्यांची प्रतिमा म्हणून मनावर ठसते. दलितांच्या राखीव जागांवर लिहितानाही डॉ.भोळे यांनी विवेकी आरक्षणाची भूमिका मांडली असून, आर्थिक पायावरील आरक्षणाला सैद्धांतिक व घटनात्मक अंगाने विरोध व्यक्त केला आहे. (संदर्भ दलित चळवळीचा, पृष्ठ205 ते 212) आरक्षण समर्थकांच्या आजच्या अनुनयाच्या व बचावात्मक पवित्र्यांच्या काळात स्पष्ट, सडेतोड भूमिका घेऊन आरक्षणाचे फायदे व मर्यादा दाखवून देणारे त्यांचे लेखन दलित चळवळीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल.

डॉ.भोळे यांचा सर्वच वैचारिक प्रवास हा त्यांच्या शब्दात ‘भेदाकडून अभेदाकडे’ जाणारा आहे. या प्रवासासाठी लागणारे सामंजस्य, साध्य-साधनविवेक माणसांविषयीची आपुलकी,चळवळींविषयीची आस्था व साक्षेपी दृष्टी यांनी त्यांचे व्यक्तित्वसंपन्न व संपृक्त होते. त्यांच्या स्वभावातील खुमासदार मिश्किलीही माणसे जोडण्याच्या त्यांच्या व्रताला बाधा आणू शकली नाही. आपली भूमिका आणि माणूस याबाबत कायम साक्षेपी भूमिका घेणारा हा सुहृद भाष्यकारही काळाच्या पडद्याआड गेला तो साने गुरुजींच्या जयंती दिनी. भोळ्यांच्या भाषेत सांगायचे तर ज्या साने गुरुजींचे विचारवंतपण महाराष्ट्राच्या नजरेआड होते ते समोर आणण्याचे कार्य भोळ्यांनी कळकळीने केले. (‘विचारवंत साने गुरुजी’ हा भोळे यांचा लेख भालचंद्र नेमाड्यांनी संपादित केलेल्या साने गुरुजी पुनर्मूल्यांकन या साहित्य अकादमीद्वारा प्रकाशित पुस्तकात आहे. तो जिज्ञासूंनी अवश्य वाचावा.) विचारवंत म्हणून साने गुरुजींची प्रतिमा प्रतिष्ठित करणाऱ्या भोळ्यांना साने गुरुजींच्या जयंतीदिनीच मृत्मू यावा हा केवळ योगायोग असेलही, पण त्यातही भोळ्यांचा ‘वैचारिक अनुबंध’च प्रकट झाला, म्हणून भोळ्यांच्या लवकर जाण्याने चळवळीची, साहित्य व्यवहारांची, माणुसकीची व अशा अनुबंधाची झालेली हानी ही साचेबंद प्रतिक्रिया राहत नाही, तर मनाच्या दुखऱ्या कोपऱ्यांच्या संख्येत भर टाकणारी ठरते. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ जीवाभावाचे संपन्न मैत्र देणाऱ्या या विचारवंत मित्राच्या स्मृतीस हार्दिक अभिवादन.

Tags: किशोर बेडकीहाळ आदरांजली भाषांतरकार समीक्षादृष्टी साहित्य अवकाश साहित्यविचार समीक्षा प्रबोधन व्रती ज्ञानोपासक समीक्षक भाष्यकार लेखक डॉ.भा. ल. भोळे scholar Literary thoughts Memoir Kishor Bedkihal Translation criticism Critic Writer Dr. B. L. Bhole weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके