डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

महानगर मुंबईतील सामान्यजनांना विविध अंगांनी भिडणाऱ्या घटनांचे कार्यकत्यांच्या लेखणीतून उतरलेले लिखाण साधनेत प्रसंगानुरूप सातत्याने प्रसिद्ध होईल.
 

नेमेचि येतो...

पहिल्याच जोरदार पावसाने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळविले. नाले सफाई, रेल्वेमार्गांची सफाई वगैरेंच्या घोषणा जोरदार झाल्या होत्या. पण पहिल्याच पावसाने घोषणांतील फोलपणा दाखवून दिला. सगळ्या मुंबईभर पाणी साचले. लोकांचे अतोनात हाल झाले. रात्ररात्रभर लोक लोकलमध्येच, ऑफिसात अडकून पडले. ज्यांना शक्य होते ते कंबरेइतक्या पाण्यातून चालत आपापल्या घरात पोचले. दरवर्षी असा प्रकार घडतोच. पण त्यावर उपाय मात्र काहीच केला जात नाही. 

देशभरातून लोकांचे लोंढेच्या लोंढे मुंबईत येतात. त्यामुळे येथील नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतो, वगैरे गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी प्रशासनही आपले कर्तव्य पार पाडतेच असे नाही. गेली दहा वर्षे हे सातत्याने घडत आहे. पण ना प्रशासनाला त्याची खंत ना जनतेला त्याचा खेद. जनतेला तर या सर्व गोष्टींची इतकी सवय झालीय की एखादे वेळी पाऊस पडूनही जर पाणी तुंबले नाही तर काहीतरी चुकल्यासारखेच वाटेल. पाणी तुंबल्यामुळे होणारे 'हाल' आता मुंबईकर जनतेच्या अंगवळणीच पडले आहेत. 

मुंबईतील किंग्ज सर्कल, सायन वगैरे भागांतील रस्त्यांवरील पाणी तीन-चार दिवस झाले तरी ओसरले नव्हते. त्या रस्त्यावरची सगळी वाहतूक वळविण्यात आली. त्यावरून बराच आरडाओरडा झाला. मग मुंबईच्या महापौरांनी या पाणी तुंबण्याचे खापर फोडले,"बांगलादेशी घुसखोरांवर". हे घुसखोर येथे वस्त्या करून राहतात व प्रचंड कचरा करून नाले तुंबवितात आणि त्यामुळे पाणी साचते. आता जर महापालिकेत, राज्यात, केंद्रात ज्यांची सत्ता आहे, त्या पक्षांच्या महापौरांची ही कारणमीमांसा असेल तर या महानगरीचे....

'एनसीपीए’ तील अभिजनशाही

पाणी साचणे, रेल्वे- बसवाहतूक कोसळणे रेल्वेच्या भाड्यात वाढ होणे, भाज्यांचे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणे वगैरेंच्या पार्श्वभूमीवर एक छोटेसे वादळ महानगरीच्या तथाकथित "सांस्कृतिक मानविंदू" मानल्या गेलेल्या टाटा उद्योगसमूहातर्फे चालविल्या जात असलेल्या एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्) या संस्थेभोवती घोंघावले.

'समांतर' नावाचे नाट्य विषयाला वाहिलेले मासिक नुकतेच सुरु करण्यात आले आहे. या मासिकातर्फे 'एनसीपीए'ची गेल्या 5 वर्षातील कारकीर्द असा विषय ठेवून एक परिसंवाद दादरला धुरू हॉलमध्ये आयोजित केला होता. परिसंवादात मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी रंगभूमीवरील कलावंतांबरोबर, प्रसिद्ध संगीतज्ज्ञ अशोक रानडे, प्रा. पुष्पा भावे, कमलाकर नाडकर्णी होते. या परिसंवादात जवळजवळ सर्वच वक्त्यांनी एनसीपीए व त्याच्या विद्यमान संचालिका प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता यांच्यावर सडकून टीका केली. 

एनसीपीए हे आता सांस्कृतिक केंद्र राहिले नसून एक कार्पोरेट सेक्टर बनले आहे. अशी टीका हिंदी नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत दिनेश ठाकूर यांनी केली तर गुजराथी रंगभूमीवरील कलावंत गिरीश देसाई यांनी संस्था कशी ब्राह्मणी मनोवृत्तीने ग्रासलेली आहे व देशीयतेबद्दल तुच्छतेची भावना संस्थेत कशी मोठ्या प्रमाणात आहे याची जोरकसपणे मांडणी केली. 

सरकारने दिलेल्या सवलतीच्या भूखंडात एक वीस मजली प्रचंड इमारत एनसीपीएच्या आवारात टाटांनी उभारली आहे. त्याचा संदर्भ देत प्रा. भावे यांनी प्रश्न केला की सांस्कृतिक कार्याच्या नावाखाली स्वस्तात भूखंड मिळवून नफेखोरी करणाऱ्या टाटा, भाभा यांचा निषेध का करायचा नाही ? विजया मेहता यांच्या चुकीच्या कारभारावर टीका केलीच पाहिजे. संचालक म्हणून त्यांनी केलेल्या कारभारावर ती टीका आहे. मेहता या व्यक्तीवरील ती टीका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी एनसीपीएच्या विश्वस्त मंडळाने गैरकारभाराची चौकशी करावी व कारभारात सुधारणा घडवून आणावी, असा ठराव संमत करण्यात आला.

परिसंवादातील भाषणे ऐकल्यावर वाटले, एनसीपीए मुंबईच्या एका टोकाला नरीमन पॉईंटसारख्या पॉश ठिकाणी उभे आहे. मुंबईतील सामान्य माणूस तिकडे फिरकत पण नाही. चकचकीत पोशाखातले. पॉश गाडयांतले, इंग्रजाळलेले लोक एनसीपीएत झुलवा, तुंबारा वगैरे नाटके बघायला येतात. तेथील इतरही कार्यक्रम असेच तथाकथित 'अभिजनां'साठीच असतात. सामान्यांचा सहभाग त्यात काडीइतकाही नसतो. अशा या सांस्कृतिक केंद्रात सुधारणा होऊन होऊन त्या काय होणार? त्यासाठी असे परिसंवाद भरवून 'घसाफोड' कशाला करायची? त्यापेक्षा मुंबईभर पसरलेल्या कामगार कल्याण केंद्रांच्या किंवा तत्सम ओस पडलेल्या इमारती सांस्कृतिक केंद्र म्हणून कशा वापरता येतील किंवा आम जनतेपर्यंत पोचून या महानगरातल्या मरगळलेल्या सांस्कृतिक वातावरणात उत्साह कसा आणता येईल याच्यासाठी डोकेफोड करून कृती करायला हवी.

य. दि.फडके यांचा हल्ला

आगरकर स्मृतिदिनादिवशी दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सायंटिफिक टेम्पर प्रमोशन ट्रस्टतर्फे पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र अंनिसतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणारा आगरकर पुरस्कार या वर्षी 'आयुध' मासिक गेली 20 वर्षे निष्ठेने चालविणाऱ्या बुद्धिवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते म. कृ. सामंत यांना देण्यात आला तर सायंटिफिक टेम्पर प्रमोशन ट्रस्टतर्फे देण्यात येणारा 'पुरोगामी सव्यसाची गुणवंत कार्यकर्ता' पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, लेखक श्री नारायण देसाई यांना देण्यात आला. 

तसेच चालनाकार अरविंद राऊत स्मृतिप्रित्यर्थ 'विज्ञानलेखक पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रज्ञ, अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांना देण्यात आला. 'चालना' नावाचे नास्तिकवादाचे पुरस्कार करणारे मासिक अरविंद राऊत यांनी 40 वर्षे चालविले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात आला. हे सर्व पुरस्कार फडके यांच्या हस्ते देण्यात आले. आजारपणानंतरचा य. दि.चा पहिलाच कार्यक्रम होता. नुकतेच अणुस्फोट झाले असल्याने य.दि. काय बोलतात याची उत्सुकता होती. 

अणुस्फोटासंबंधी विविध शास्त्रज्ञांची, राजकारण्यांची कशी मते होती याचे तपशील त्यांच्या आत्मचरित्रांच्या आधाराने देत शास्त्रज्ञांनीही अणुबॉम्बच्या परिणामांची जाणीव कशी दिली होती याचे त्यांनी विवेचन केले. अणुस्फोटांना विरोध करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही समजणे, गांधींनाही अणुबॉम्बच्या समर्थनार्थ वापरणे याचाही परखड समाचार आपल्या भाषणात त्यांनी घेतला.

नेरूरकर गेलेच..

प. श्री. नेरूरकर यांचे कर्करोगाने निधन झाले. लौकिक अर्थाने नेरूरकर सर्वदूर परिचित असतीलच असे नाही. पण मुंबईतील दलित, डाव्या, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मात्र नेरूरकर शिक्षक, वक्ता, साहित्यिक, पाठीवर थाप मारून प्रोत्साहित करणारा, कौतुक करणारा प्रेमळ माणूस म्हणून परिचित होते. पश्रींच्या प्रोत्साहनामुळे, आर्थिक मदतीमुळे अनेक दलित कवी उजेडात आले. समाजवादी तत्वज्ञानावरील त्यांची निष्ठा अढळ होती. 

ब्रेख्खत जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात नेरूरकरांचा ब्रेख्खत जन्मशताब्दी समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तोच बहुधा त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम असावा. निग्रो कवींच्या कवितांचा अनुवाद त्यांनी मराठीत केला होता. आम्ही मित्रमंडळींनी तो अनुवाद लवकरात लवकर छापावा असा त्यांचा आग्रह होता. मी असेपर्यंत या कविता छापून व्हाव्यात अशी त्यांची इच्छा होती. श्रीधर पवार, सुवोध मोरे वगैरेंनी त्याबाबत त्यांच्या घरीच मिटिंग घ्यायचेही ठरविले होते. तेवढ्यात कळले प्रश्रींना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय, तेथून टाटात नेलंय आणि 30 जूनच्या वर्तमानपत्रातल्या बातमीवरून कळलं 'प्रश्री' गेले. 'एक भला माणूस' आपल्यांतून कमी झाला.

Tags: य.दि. फडके प. श्री. नेरूरकर विजया मेहता महानगरपालिका पाणी मुंबई p. s. nerurkar y. d. phadake Vijaya Mehta bmc rain irrigation water Mumbai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके