डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुंबईतील साहित्य संमेलनं

पांढरपेशीय खुरट्या जाणिवांमुळे मराठीत टॉलस्टॉय, चेकॉव्ह, प्रेमचंद, महाश्वेता देवी निर्माण होऊ शकले नाहीत.

मुंबईत येत्या पंधरवड्यात तीन साहित्य संमेलने भरणार आहेत. साहित्यप्रेमी लोकांसाठी हे चैनीचेच दिवस मानायला हवेत. पहिलं सरकारमान्य प्रस्थापित साहित्य संमेलन, दुसर विद्रोही साहित्य संमेलन आणि तिसरं सकल साहित्य संमेलन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साक्षात (माजी) मुख्यमंत्र्यांच्या मोहल्ल्यात दादरला भरत आहे. कविवर्य वसंत बापट अध्यक्षपदावर आहेत. मनोहर जोशी यांनी वर्तमानपत्रांत संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. ‘मी एक साहित्यप्रेमी’, अशा खास विनयपूर्वक भूमिकेत, आपल्या नेहमीच्या धूर्त कावेबाजपणे पत्रकार परिषदेत पत्रकारांना उत्तरे दिलीत. संमेलन सरकारी इतमामाने होणार असल्याने, थाट काही औरच आहे.

खुरट्या जाणिवा :

हे साहित्य संमेलन अर्थातच मध्यमवर्गीय साहित्यजाणिवा केन्द्रस्थानी असलेल्या पांढरपेशीय जाणिवांच्या साहित्यिकांचं आहे आणि गेली साठ-सत्तर वर्षं यांचा तोच फॉर्म, तोच सेटअप, तीच मानसिकता! म्हणून तर एखादा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचा साहित्यकार निर्माण होऊ शकत नाहीय मराठीत. ना टॉलस्टॉय, ना चेकॉव्ह, ना प्रेमचंद, ना महाश्वेता देवी आपल्या मराठीत निर्माण होऊ शकली! मध्यमवर्गीय जाणिवांचं जग ही इथल्या साहित्यिकांची मर्यादा आहे. त्यामुळे त्याचे सर्व साहित्यिक रोटीबेटी व्यवहार, या समाजव्यवस्थेच्या नियमानुसार जातीतल्या जातीतच पार पाडले जातात. मग समष्टीला कवेत घेणारं.

मानवतेचा विशाल कॅनव्हास लाभलेलं अभिजात साहित्य निर्माण करण्यासाठी आवश्यक ती कुवत येणार तरी कुठून? मध्यमवर्गीय साहित्यप्रेमीला विचारलं, तुमचा आवडता लेखक कोण तर क्षणाचाही विचार न करता तो सांगतो आणि तो लेखक पु. ल. देशपांडेपासून व. पु. काळेपर्यंतचा असतो. त्यात त्याचा तरी काय दोष? 

सकल साहित्य संमेलनाची भूमिका आहे, प्रस्थापित साहित्य संमेलनाच्या जे जे खिलाफ आहेत ते सर्व सकलच्या कवेत येतात! पण हा विरोध नेमका कशासाठी, कुणाला- हे मात्र स्पष्ट होत नाही. त्यामुळे प्रस्थापित साहित्य संमेलनात निमंत्रित असलेसे सकलमध्येही आहेत, असे गमतीदार चित्र निर्माण झालेय. शिवाय प्रस्थापित साहित्य संमेलनाचे आमंत्रण आले नाही त्यामुळे कवीचा अहंकार दुखावून सकलमध्ये दाखल झालेले साहित्यिकही आहेत. तसेच आधी सकलमध्ये असलेले आणि प्रस्थापित साहित्य संमेलनाचे निमंत्रण आल्यावर सकलच्या मोर्चातून बाहेर पडून प्रस्थापितांच्या दिंडीत मध्येच घुसणारेही आहेत. भोंगळ भूमिका असल्यावर असं मजेदार घडलं नाही तरच नवल.

नागवा दहशतवाद :

विद्रोही साहित्य संमेलनवाल्यांनी मात्र संमेलन घेण्यामागची भूमिका ठोस आणि टोकदार राखलीय, त्यांचा प्रस्थापित साहित्य संमेलनाला नुसता विरोधच नाही तर बहिष्कारही आहेच. पाच टक्क्यावाल्यांचे प्रस्थापित ब्राह्मणी, मध्यमवर्गीय साहित्य हा मुख्य प्रवाह आणि नव्वद टक्केवाल्या बहुजन समाजाचं साहित्य हे दुय्यम किरकोळ साहित्य, हेच मुळात विद्रोहींना मान्य नाही. नव्वद टक्केवाल्यांचं साहित्य हाच मुख्य प्रवाह (मेन स्ट्रीम) आहेच अशी त्याची ठाम भूमिका आहे. त्यांचं म्हणणं आहे की गुलाम अलींची मैफल उधळणं, हुसेनची चित्र फाडणं, नथूरामला हिरो करणं. फायरवर बंदी आणणं आणि क्रिकेट मैदान खणणं हा नागवा दहशतवाद आहे. फॅसिस्ट टेररिझम आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणं आहे आणि ही दुष्कृत्यं करणाऱ्या फॅसिस्ट विचारांच्या पक्षाच्या सरकारच्या मदतीनं आणि मर्जीनं साहित्य संमेलन भरवणं, या सगळ्यांच गोष्टींचा विद्रोही निषेध करतात आणि नुसता निषेधच करत नाहीत तर फॅसिझम विरुद्धच्या लढ्‌यातलं विद्रोही साहित्य संमेलन हे पहिलं पाऊल मानतात आणि त्याच वेळेस विद्रोही हेही बजावतात की ही नुसती प्रतिक्रिया नसून विचार आहे.

मात्र मुंबईतल्या सर्वसाधारण जनतेची या साहित्य संगेलनाबाबत आस्था अथवा सहभाग कधीच फारसा दिसला नाही. लाज आणणारी गोष्ट म्हणजे सत्तर-ऐंशी वर्षं साहित्य संमेलनं भरवूनही! या बाबत विद्रोहीवाल्यांचं म्हणणं पटणारं आहे. प्रस्थापित साहित्य संमेलनं ही सामान्य जनतेला आपल्या साहित्याचे संमेलन असं कधीच फारसं वाटलं नाही. काही जण यावर विखे पाटलाचं वगैरे उदाहरण देतील, पण विखे पाटील यासारख्यांनी आपल्या हुकमतीने उपकृत लोकांना संमेलनाच्या कामाला लावलं असेल, त्याबद्दल त्याची पाठ थोपटणारे भाट काही म्हणत असले तरी ते सामान्य लोकांच्या जीवनाचं प्रतिबिंब पडणाऱ्या साहित्याचं संमेलन नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण प्रतिभेची दैवी देणगी लाभलेल्या साहित्यिकांना सामान्य माणसांच्या सुखदुःखाशी, वेदनेशी आपला, आपल्या साहित्याचा थेट संबंध आहे, असावा असे वाटत नाही आणि म्हणून सामान्य माणसांनाही साहित्य वगैरे आपली गोष्ट वाटत नाही. या महान साहित्यिकांच्या साहित्यिक प्रेरणाच जनतेच्या आशाआकांक्षांशी, न्यायअन्यायाशी, वेदनेशी नातं जोडणाऱ्या नसल्यावर ते तरी काय करणार बिचारे! काय लिहिणार बापडे ! त्यांच्या दृष्टीनं सरकारी फायदे, घर, बक्षिसं, पदं वगैरे साहित्यिक होऊन मिळणं यातच साहित्यिक ग्रेटपणा. अशा एकूण त्यांच्या साहित्यिक प्रेरणाच स्वान्तः सुखाय असल्यावर त्यांना जनतेची गरज भासायची गरज काय?

जेव्हा जेव्हा धर्मांध फॅसिस्ट शक्ती वाढतात, जनतेवरचे त्यांचे सर्व प्रकारचे हल्लेही वाढतात, सामान्य माणसाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो तेव्हा सामान्य माणसाचा प्रतिकारही कडवा बनू लागतो. मुंबईतील प्रस्थापित साहित्य संमेलनाच्या खिलाफ दोन-दोन साहित्य संमेलनं उभी राहतात. विशेषतः पंधरा-सोळा पुरोगामी डाव्या सांस्कृतिक संघटनांतील विद्रोही समान प्रश्नावर एकत्र येऊन विद्रोही साहित्य संमेलन उभं करून दहशतवाद आणि प्रस्थापित मूठभरांचं साहित्य यांविरुद्ध ठोस भूमिका घेतात ही गोष्ट खासच. शेवटी सकल काय किंवा विद्रोही काय, परिस्थितीनं काळाने भरवलेली साहित्य संमेलनं आहेत असंच म्हणावं लागेल.

Tags: मध्यमवर्गीय साहित्य विद्रोही पांढरपेशी समाज साहित्य संमेलन middle class literature insurgent white colered literary convention weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके