डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्याच्यावर आपण दगड फेकतोय तोही आपल्यासारखाच दुःखी आहे. ही जाणीव जेव्हा त्या दगड फेकणाऱ्याला होईल तेव्हा या दगडफेकीचा रोख त्याच्या ‘खऱ्याखुऱ्या’ शत्रूविरुद्ध असेल अन् तो दिवस आता फार दूर आहे असे वाटत नाही. हा दगडफेकीचा प्रश्न केवळ कायदा अन् सुव्यवस्थेचा नाही तर एकूणच ‘सामाजिक सुव्यवस्थेचा’ आहे. आणि ही सामाजिक सुव्यवस्था जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत
अशा प्रकारच्या विकृत घटना या महानगरी जीवनात घडतच राहणार.

----------

6 डिसेंबरला येणारा हा गरीब, कष्टकरी, सामान्य माणूस देशातल्या कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर काहीतरी मागायला, नवस बोलायला किंवा नवस फेडायला येत नाही तर आपली अस्मिता जागवणाऱ्या, माणूसपणाच्या संघर्षासाठी उभे करणाऱ्या महामानवाबद्दल ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्यासाठी येत असतो.

दगडफेक

भरधाव वेगात जाणाऱ्या भरगच्च भरलेल्या लोकलच्या दरवाज्यात लोक लटकत उभे असतात. इतक्यात रुळांच्या दुतर्फा लागून असलेल्या झोपडपट्टीतून एखादा दगड भिरभिरत येतो अन् दरवाज्यात लटकलेल्या किंवा खिडकीत वाऱ्याला बसलेल्या एखाद्या प्रवाशाला अनपेक्षितपणे डोक्यावर, डोळयावर खाडकन बसतो. मध्यंतरी श्रीराम लागूंच्या मुलाचा मृत्यू अशाच एका दुर्घटनेत झाला तेव्हा असा प्रसंग अपवादात्मक असे वाटले होते, पण हल्ली वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. दर दोन-तीन दिवसांच्या अंतराने या घटना घडून कुणाचा डोळा गेल्याची किंवा डोक्याला जखम झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत येतात. या अशा घटना का घडत आहेत? कोण ही दगडफेक करत आहे? करणाऱ्याला नक्कीच कळत असेल की या दगडफेकीचा काय परिणाम आहे? तरीही अशा या विकृतीतून कोण कसला आनंद उपभोगतोय? या सर्वांचा जर गंभीरपणे विचार केला तर आजच्या महानगरी जीवनाचे भेसूर चित्र आपल्या नजरेपुढे येते. एका बाजूला वेगाने वाढत असलेल्या झोपडपट्ट्या त्या झोपडपट्टयातील अत्यंत बकाळ, अप्रतिष्ठित जगणे, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत उपभोगवादी चैनबाज जगणं, या भयानक विषमतेतून अशा प्रकारच्या विकृती या महानगरी जीवनात निर्माण होताना दिसत आहेत.

प्रत्येक स्टेशनवर किंवा स्टेशनच्या आजूबाजूला देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली कुटुंब आपला संसार उघड्यावरच थाटून जगत असतात. या कुटुंबांतील पोरं स्टेशन परिसरात भटकत जगत असतात. या पोरांना त्या परिसरातील दुकानदार, येणारे-जाणारे प्रवासी, पोलीस जी घृणास्पद वागणूक देत असतात, अत्यंत हिडीस रीतीने वागवित असतात, त्यातून या पोरांच्या मनात निर्माण होणारा असंतोष मग लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर निपत असावा. स्टेशन परिसरात चरसी, गर्दुल्ले नेहमीच पडून असतात. या व्यसनींची तल्लफ नेहमीच भागत असते असे नाही. मग यातून जी निराशा येते, ‘वैताग’ येतो, तो वैताग अशा प्रकारे लोकल गाड्यांवर दगडफेक करुन काढला जात असावा. लोकलच्या दरवाज्यात उभे राहून अतिशय आगाऊपणा करणारे अनेक ‘ग्रुप्स’ असतात, सिग्नलला गाडी थांबली की अतिशय हिडीस हातवारे करीत जाणाऱ्या येणाऱ्यांवर शेरेबाजी केली जाते. मग त्याची प्रतिक्रिया म्हणून एखादा दगड भिरकावला जातो. तो या अशा विकृत ग्रुपमधील कुणाचे डोके फोडण्याऐवजी एखाद्या खिडकीत बसलेल्या निष्पापाच्याच डोक्यात बसतो. या सगळ्या घटना म्हणजे महानगर जीवनातील वाढत चाललेल्या ताणतणावाचेच प्रतिबिंब आहे. 

दगड फेकणाराही जसा या ताणतणावांचा बळी आहे तसा या दगडफेकीत बळी पडणाराही त्याच तणावांखाली जीवन जगतोय. दगड फेकणाऱ्याला आज कळत नाही की ज्याच्यावर आपण दगड फेकतोय तोही आपल्यासारखाच दुःखी आहे. आपलाच भाऊबंद आहे. ही जाणीव जेव्हा त्या दगड फेकणाऱ्याला होईल तेव्हा या दगडफेकीचा रोख त्याच्या ‘खऱ्याखुऱ्या’ शत्रूविरुद्ध असेल अन् तो दिवस आता फार दूर आहे असे वाटत नाही. त्यामुळेच आता हे लक्षात घेणे गरजेचे आहे की हा दगडफेकीचा प्रश्न केवळ कायदा अन् सुव्यवस्थेचा नाही तर एकूणच ‘सामाजिक सुव्यवस्थेचा’ आहे आणि ही सामाजिक सुव्यवस्था जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या विकृत घटना या महानगरी जीवनात घडतच राहणार.

आंबेडकर ग्रंथमेळा

6 डिसेंबर मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचा दिवस आहे. हिंदुत्ववाद्यांनी जरी जाणीवपूर्वक 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडून कलंकित केले असले तरी सर्व दलित, पुरोगामी जनतेच्या दृष्टीने 6 डिसेंबरचे महत्व अनन्यसाधारणच आहे. देशभरातून लाखोंच्या संख्येने दलित जनता आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जमते. इतके लाखो पाहुणे आपल्या शहरात येतात या बाबत मुंबईकरांची प्रतिक्रिया काय असते? त्यांचे स्वागत करण्याचे सोडाच पण अत्यंत जातीय भावनेनेच या जनतेकडे बघितले जाते. बरोबर याच दिवसांत या मंडळींना शिवाजी पार्कच्या स्वच्छतेची जाणीव होते, याच दिवसांत गर्दीची जाणीव होते, आंबेडकरांना देव बनवून दलित किती अंधश्रद्धाळू बनलेत याची जाणीय होते. पण असा विचार मनात येत नाही की, 6 डिसेंबरला येणारा हा गरीब, कष्टकरी, सामान्य माणूस देशातल्या कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर काहीतरी मागायला, नवस बोलायला किंवा नवस फेडायला येत नाही तर आपली अस्मिता जागवणाऱ्या, माणूसपणाच्या संघर्षासाठी उभे करणाऱ्या महामानवाबद्दल ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्यासाठी येत असतो. 

6 डिसेंबरला शिवाजी पार्कवर सभा भरतात. फुले-आंबेडकरांची पोस्टर्स विकणारे स्टॉल्स असतात. या वर्षी कॅसेट्स विक्रीचे स्टॉल्सही भरपूर होते. या सगळ्याच्या पलीकडे जावून 6 डिसेंबरचे एक अतिशय आगळे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर भरणारा ‘ग्रंथमेळा’, हा ग्रंथमेळाच सांगत असतो आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईला येणाऱ्या लोकांची गर्दीही केवळ तीर्थक्षेत्राला येणारी गर्दी नसते. या ग्रंथमेळ्यात पुस्तके खरेदी करणारे लोक सामान्य कष्टकरी वर्गातील असतात.

लोकवाङमयगृह, सुगावा, आंबेडकर बुक डेपो, नाना पाटील अकादमी, प्रबुद्ध भारत, अभिनव यांसारख्या वैचारिक प्रबोधनात्मक प्रकाशने करणाऱ्या संस्थांबरोबर अनेक लहान मोठे ग्रंथविक्रेते आपले स्टॉल्स मांडून बसलेले असतात. नेहमीच्या ग्रंथमेळ्यात न मिळणारी पुस्तके या ग्रंथमेळ्यात सहज मिळून जातात. अनेक विशेषांक 6 डिसेंबरला प्रकाशित होत असतात. अनेकांचा आक्षेप असतो की या ग्रंथमेळ्यात फक्त आंबेडकरी किंवा दलित साहित्याचीच विक्री होते. हे थोडे साहजिकही आहे. पण अनेक पुस्तकविक्रेत्यांचा असा अनुभव आहे की सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांवर प्रबोधन करणाच्या ग्रंथांचीही विक्री या मेळ्यात चांगली होते. 6 डिसेंबरचे हेच वैशिष्ट्य जास्तीत जास्त ठळक होत जावो व 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर वाढणारी गर्दी या ग्रंथमेळ्याकडे जास्तीत जास्त आकृष्ट होत जावो हीच इच्छा.


पी. डी. हंकारे

बारा वर्षांपूर्वी कोल्हापुरात राजेंद्र गांधी या धनाड्य कारखानदाराने आठ वर्षाच्या कोवळ्या मुलीवर केलेल्या बलात्काराने आख्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. त्या वेळेस कोल्हापुरातील अनेक व्यक्तींनी, संस्थांनी, राजकीय पक्षांनी या विरोधात आवाज उठविल्यामुळे राजेंद्र गांधीला अटक होऊन त्याच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला. पण त्यानंतर हळूहळू सर्वांनी या प्रकरणातून अंग काढून घेतल्याने राजेंद्र गांधी मोकळा सुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु या राजेंद्र गांधीला शिक्षा व्हावी म्हणून एका सामान्य व्यक्तीने गेली अकरा वर्षे अथकपणे न्यायालयीन लढाई लढवली व राजेंद्र गांधीला येरवडा जेलमध्ये बसविला त्या सामान्य व्यक्तीचे नाव आहे पी. डी. हंकारे. या हंकारेच्या मुलाखतीचा कार्यक्रम ‘ग्रंथाली’ आणि ‘बाल लैंगिक शोषणविरोधी मंचाने’ आयोजित केला होता. 

हंकारे यांची मुलाखत घेतली प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी. सुरुवातीला हंकारे यांनी अतिशय तपशीलवारपणे गेल्या अकरा वर्षांतील आलेल्या अनुभवांचे कथन केले. 24 सप्टेंबर 1986 रोजी शिकवणीवरून परतणाऱ्या एका आठ वर्षांच्या मुलीवर भरदिवसा भर रस्त्यावर गाडीच्या काचा बंद करून राजेंद्र गांधीने बलात्कार केला. त्याला वर्तमानपत्रांतून वाचा फुटल्यावर या प्रकरणी कोल्हापुरात जनआंदोलन उभे राहिले, आरोपीला अटक झाली. खटला दाखल झाला अन् मग सर्वांनी त्यातून अंग काढून घेतले. राजेंद्र गांधीच्या हे पथ्यावरच पडले. त्याने पैशाच्या ताकदीचा वापर करून वैद्यकीय अहवाल बदलणे, साक्षीपुरावे बदलणे फिर्यादीवर घाणेरडे आरोप करणे हे प्रकार चालू केले. पण पी. डी. हंकारे मात्र न्यायालयात लढा देतच राहिले. अखेर 6 ऑक्टोबर 1989 ला गांधीला सातारा सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

27 सप्टेंबर 1994 ला मुंबई हायकोर्टाने 40 हजार रुपये दंड भरण्याचा तोंडी आदेश दिला व गांधीला सोडून दिले. मग हंकारे सुप्रीम कोर्टात गेले. त्या वेळेस हंकारेसोबत मुलीचे पालकही नव्हते. तरीही हंकारेंनी जिद्द सोडली नाही. शेवटी सुप्रीम कोर्टने 5 वर्षे सक्तमजुरी व पूर्वीचा दंड अशी शिक्षा ठोठावली. पण शिक्षा ठोठावूनही गांधीला अटक झाली नाही. त्यासाठी हंकारेंना पुन्हा कोर्टात जावे लागले व कोर्टाच्या अवमानाचा अर्ज दाखल करावा लागला. तेव्हा गांधीला अटक होऊन तुरुंगात रवानगी झाली. ही सर्व 11 वर्षाच्या एकाकी लढ्याची कथा सांगत असताना त्यांनी आजची न्याययंत्रणा, आरोपीचे वकील, सरकारी वकील, सरकारी यंत्रणेचे भ्रष्टाचाराचे असंख्य पुरावे, वेळकाढूपणाचे तपशील, माहितीचा हक्क याच्या अनेक घटना त्यांनी सांगितल्या. हे सर्व ऐकल्यानंतर विजय तेंडुलकर म्हणाले, ‘आजच्या व्यवस्थेच्या बंद दारावर डोके आपटून सामान्य माणूस पिचून निघत आहे अशी वस्तुस्थिती असताना न्यायासाठी पी. डी. हंकारेसारखा माणूस 11 वर्षे एकाकी लढा देतो व जिंकतो हा एक अपघातच आहे. पराकोटीच्या दुष्कृत्यांचे परिमार्जन ईश्वरी अवताराकडून होते हा समज हंकारे यांनी दिलेल्या यशस्वी लढ्याने खोटा ठरविला असून दुर्जनांच्या दमनासाठी सामान्य माणसालाच उभे राहावे लागते हे हंकारे यांनी दाखवून दिले आहे.’

बाल लैंगिक शोषण

हा कार्यक्रम ज्या बाल लैंगिक शोषण मंचाने आयोजित केला होता त्या मंचाच्या कार्यकर्त्या विद्या आपटे यांनी बाल लैंगिक शोषणाबद्दलची देशातील परिस्थिती सांगितली. बाल लैंगिक शोषणविषयक देशात आजही स्वतंत्र कायदा अस्तित्वात नाही. तसेच बाल लैंगिक शोषणांच्या घटनांमध्ये त्या मानाने फौजदारी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. बाल लैंगिक शोषणाच्या 80% घटनांमध्ये आरोपी ही परिवारातील व्यक्ती म्हणजेच कुटुंबाची मित्रमंडळी, शेजारी, नोकर, शिक्षक तर अनेक घटनांमध्ये वडील, भाऊ, काका, मामा असतात. बालपणी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांवर जबरदस्त मानसिक आघात होतो. इतका की मोठेपणी मानसोपचार तज्ञांकडे उपायाकरिता येणाऱ्या व्यक्तीमधील 2/3  व्यक्ती या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या असतात. 

आपल्या देशात बाल लैंगिक शोषणाचे प्रमाण एवढे मोठे असूनसुद्धा याची खुलेआम चर्चा होत नाही अगर सरकारी पातळीवरूनसुद्धा हा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला जात नाही, ‘बाल लैंगिक शोषणधिरोधी मंचा’ सारख्या बिनसरकारी संस्थांनाच आता या बाबत पुढाकार घेऊन समाजापुढे हे प्रश्न मांडून समाजाचे प्रबोधन करावे लागेल तरच बालांवर होणाऱ्या अन्यायाची तड लागू शकेल.

Tags: पी.डी. हंकारे मुंबई आंबेडकर महानगरीय जीवन कोलाजकर P.D.Hankare Mumbai Aambedkar Urban Life Kolajkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके