डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वत:ला चौकटीबाहेरचा विचार करायची सवय लावली

साहित्य : जीवनगौरव पुरस्कार । कुमार केतकर

वृत्तपत्रमालकांचे आणि मालकशाहीचे विविध प्रकार, पत्रकारितेतील झपाटा आणि उथळपणा, राजकारणाचे भान आणि इतिहासाचे ज्ञान, डेडलाइन डोळ्यांसमोर ठेवून लेखनात आणावी लागलेली शिस्त या व्यवसायातील सतत वाहणारा जिवंतपणा (आणि तरीही एक प्रकारच्या बोथट होत जाणाऱ्या संवेदना), टीव्ही चॅनेल्सवरील पॅनेल चर्चांमधून येणारी सनसनाटी आणि सवंग मांडणी- आणि तरीही त्यातून अनुभवाला येणारी उत्कट प्रासंगिकता, वर्तमानकाळाच्या हिंदोळ्यावर सतत राहून मनाला येणारी झिंग आणि प्रत्येक अनुभवातून नवे शिकायला मिळणारी संधी... यामुळे पत्रकारितेतील चार दशके कशी निघून गेली, ते कळलेही नाही.

स्वत:बद्दल लिहिणे किती कठीण असते! म्हणजे प्रवासवर्णन, एखादा अनुभव, नात्यासंबंध यावर काहीसे लिहिणे वेगळे आणि आत्मशोध घेणे वेगळे. मला आत्मचरित्र-चरित्रे वाचायला आवडतात; पण छोटेखानी आत्मनिवेदन करणेही जिकिरीचे वाटते. ‘साधना’ने महाराष्ट्र फौउंडेशनच्या वतीने मला काही आत्मचिंतन करायला सांगितल्यापासून माझ्या मनावर चांगलाच ताण आला होता. परंतु साधनाच्या संपादकांनी माझी अस्वस्थता पाहून म्हटले की- काहीही लिहा; प्रेरणांपासून राजकारणापर्यंत! त्यामुळे काहीसे हायसे वाटले खरे, पण तो ताण काही फारसा कमी झाला नाही. शिवाय, मला दिलेला पुरस्कार ‘साहित्य जीवनगौरव’ असा आहे.

मी खूप लिहिले आहे, हे खरे; पण ज्याला आपण साहित्यप्रकार म्हणतो, त्यांपैकी मी कोणताच प्रकार हाताळलेला नाही. मी (अजून तरी!) एकही कादंबरी लिहिलेली नाही, नाटक लिहिलेले नाही, कविता केलेली नाही, लघुकथा व दीर्घकथाही लिहिलेली नाही. त्यामुळे ‘साहित्य जीवनगौरव’ हा पुरस्कार स्वीकारणे तसे संकोचाचेच. पत्रकार या नात्याने मी इंग्रजीत व मराठीत खूप लेखन केले आहे. द इलस्ट्रेटेड वीकली, इम्प्रिन्टपासून ते अगदी इंडिया टुडे, आऊटलूक या नियतकालिकांपर्यंत अनेक ठिकाणी आणि द इकॉनॉमिक टाइम्स, द ऑब्झर्व्हर, द टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकांमध्ये. त्याचप्रमाणे महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता आणि दिव्य मराठी या दैनिकांमध्ये संपादक या नात्याने लिहिलेल्या अग्रलेख-लेखांची संख्या पाच-सात हजारही असेल.

अर्थातच, त्या लेखनापैकी ‘साहित्य’ या सदरात मोडणारे काहीच नाही. कदाचित पत्रकारिता हाही एक साहित्यप्रकार मानून महाराष्ट्र फाउंडेशनने हा पुरस्कार दिला असावा. (नाही तरी हल्ली पत्रकारिता आणि कल्पनाविलास वा फिक्शन यात फारसे अंतर राहिलेले नाही!) खरे म्हणजे, मी पत्रकारिता हे क्षेत्र निवडले ते ‘करिअर’ म्हणून नव्हे. शालांत परीक्षेनंतर रेडिओ सर्व्हिसिंग/इंजिनिअरिंगचा एक कोर्स केल्यानंतर मला आयआयटी पवईसारख्या प्रतिष्ठाप्राप्त संस्थेमध्ये प्रथम इलेक्ट्रॉनिक्स आणि नंतर कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळाली होती. आयआयटीतच राहिलो असतो, तर आठ-दहा वर्षांपूर्वी कुठच्या तरी सिनिअर टेक्निकल पोस्टवरून निवृत्त झालो असतो. परंतु आयआयटीत असतानाच मॉर्निंग कॉलेज करून पदवी आणि नंतर पदव्युत्तर प्रबंधासाठी ‘मास मीडिया इन इंडिया/थर्ड वर्ल्ड’ असा विषय मी निवडला होता.

साधारणपणे 1968-69 च्या सुमाराला माझे शिक्षक भाऊ फाटक (लाल निशाण पक्षाचे; एसटी कामगारनेते नव्हेत.) मला काही निमित्ताने आचार्य अत्रे यांच्याकडे घेऊन गेले होते. अत्रे यांना भेटणे हाच एक अप्रूपता असलेला अनुभव होता. त्यांचा दबदबा, दरारा आणि हल्लीच्या भाषेत त्यांची ‘दबंग’गिरी यांच्या प्रभावाने कुणीही हतप्रभ झाले असते. भाऊंनी माझी एक विद्यार्थी (खरे म्हणजे, मी तेव्हा आयआयटीत नोकरी करीत होतो- पण विद्यार्थीही होतोच!) म्हणून ओळख करून दिली. अत्रे यांनी लगेचच माझ्याशी बोलायला सुरुवात केली. ‘काही लिहिता की नाही?’ मला उद्देशून केलेला हा ‘अहो’ असा उल्लेखच अंगावर काटे आणणारा होता. त्यांनी लगेचच मला ‘मराठा’च्या रविवार आवृत्तीसाठी लिहायला सांगितले. माझा मराठी पत्रकारितेशी संबंध आला तो असा थेट अत्र्यांमुळे!

वाचनाची आवड आणि सवय लागण्याचे एक कारण माझी आई. ती काही पदवीधर वगैरे नव्हती. विद्यापीठीय शिक्षण तर फारच दूर. पण तिचे वाचन विलक्षण होते. केवळ कथा-कादंबऱ्या नव्हे; तर प्रवासवर्णने, लेख, चरित्र-आत्मचरित्रे. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यापासून वि. स. खांडेकर ते अगदी गंगाधर गाडगीळ यांच्यापर्यंत. पुस्तकातले आवडलेले भाग ती स्वत:च्या वहीत लिहून काढत असे. कोणत्या पुस्तकातले काय विशेष आहे, याची नोंदही ती ठेवत असे. वाचलेल्या गोष्टीची/लेखाची ती उत्तम समीक्षाही करीत असे- प्राध्यापकी शैलीतली नव्हे, तर सुजाण वाचकाच्या दृष्टिकोनातून.

आमच्या चेंबूर हायस्कूलचे मैदान व काही इमारतीचा भागही विद्यार्थी-शिक्षकांच्या श्रमदानातून झाला होता आणि ग्रंथालयाची मांडणी-नियोजनही आम्हीच काही जण करीत असू. या सर्व उपक्रमांचे मुख्य सूत्रसंचालक भाऊ फाटक असत. ग्रंथालयातील पुस्तकांची मांडणी करता-करता भाऊंची गप्पात्मक बौद्धिकेही होत असत. त्या गप्पांमध्ये गांधीजी, पंडित नेहरू, स्वातंत्र्य चळवळ ते कामगार चळवळ असे सर्व विषय असत. लोकमान्य टिळक ते कॉम्रेड डांगे आणि महात्मा फुले ते डॉ. आंबेडकर यांच्या चरित्राची व विचारांची ओळखही भाऊंच्या अशा अनौपचारिक बौद्धिकांमधूनच झाली. वाचनाला वळण लागले ते त्याच काळात. पण पुढे वाचनाच्या कक्षा रुंदावल्या त्या आयआयटीत गेल्यावर. बर्ट्रांड रसेल ते आइन्स्टाईन, मार्क्स ते फ्रॉईड, लेनिन, स्टालिन ते हिटलर असे तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र विषय डोक्यात भिनू लागले.

या सर्व वाचनाचा हेतू काय होता? तर आपले जग, माणसे, त्यांचे स्वभाव, राजकारण, साहित्य-कला, इतिहास असे सर्व काही आपल्याला समजायला हवे. आयआयटीमध्ये असल्यामुळे आणि रसेल व पंडित नेहरूंच्या प्रभावामुळे त्या कुतूहलाला विज्ञानाची जोड मिळाली. तरीही एक मूलभूत प्रश्न सतावत होताच. आपल्या बाजूला इतकी माणसं- जगभर कोट्यवधी माणसं- त्यांचे इतके स्वभाव, इतके कलह, इतकी नाती आणि इतक्या संस्कृती... या सर्वांमागच्या प्रेरणा काय आहेत? इतके फरक का आहेत? इतके तत्त्वज्ञ, इतके संत, इतके धर्म, वेदांपासून पाश्चिमात्य तत्त्वज्ञानापर्यंत इतके चिंतन; मग माणसांचे असंख्य प्रश्न अजून अनुत्तरित का? केवळ मार्क्स, फक्त फ्रॉईड, फक्त समाजशास्त्र वा अर्थशास्त्र यांत उत्तरे सापडतीलच असे नाही.

त्या कुतूहलापोटी आणि अस्वस्थतेपोटी जेव्हा कुणी तरी सुचवले की, जे. कृष्णमूर्तींची व्याख्याने ऐकायला हवीत; तेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्ट्‌सच्या आवारात कृष्णमूर्तींचे व्याख्यान ऐकायला 1967 मध्ये प्रथम मी गेलो. कोणत्याच थिअरीत वा अध्यात्मात- पोथीबद्ध उत्तरे मिळणार नाहीत आणि कोणत्याही वैचारिक चौकटीबाहेर जाऊन विचार करायला हवा- या ढोबळ स्वरूपात सांगता येईल, अशा त्यांच्या सूत्राच्या आधारे मी स्वत:ला चौकटीबाहेरचा विचार करायची सवय लावली. परंतु तरीही कार्ल मार्क्स आणि सिग्मंड फ्रॉईड यांचा माझ्यावर खूपच खोल प्रभाव झाला; जसा पुढे डार्विन आणि मार्शल मॅक्लुहानचा होत गेला. अशा प्रभावाखाली वा अशा चौकटीत विचार करणे कृष्णमूर्तींच्या विचारशैलीत बसत नव्हते; पण मला त्या परस्परविरोधी विचारसरणींचा जाच कधीही जाणवला नाही. किंबहुना, त्यामुळे माझा वैचारिक प्रवास आणि वाचनप्रवास अधिक मुक्त होत गेला.

त्या प्रवासाबरोबर सुरू झाला प्रत्यक्ष प्रवास. आयआयटी सोडून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन व प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दिल्लीस्थित संस्थांमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून नोकरी सुरू केली आणि ‘मीडिया’ नावाच्या सळसळत्या, सतत खळाळणाऱ्या (उथळ पाण्याला खळखळाट फार, हेही पुढे लक्षात येऊ लागले!) क्षेत्रात येऊन थडकलो.

पत्रकारितेला सुरुवात करण्याचे एक कारण- मला जगाविषयी, माणसांविषयी, राजकारणाविषयी, घटनांविषयी वाटत असलेले कुतूहल. परंतु तितकेच महत्त्वाचे दुसरे कारण होते- मला जाणवत गेलेले व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व. महत्त्वाचे काय- व्यक्ती की समाज? व्यक्ती कोण घडवतो? त्याचे जेनेटिक स्ट्रक्चर, डीएनए की समष्टी, सामाजिक परिस्थिती? उपजत काय असते आणि ‘बाहेरून’ काय घेत जातो? मानसशास्त्रात या मुद्द्यावर गेल्या शतकात प्रचंड वाद झाले आहेत. मला असे वाटले की वृत्तपत्र हे एक माध्यम कुतूहलाबरोबरच त्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कारही करण्याची संधी देऊ शकेल. माझी लोकशाहीवरची ‘श्रद्धा’ ही त्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेतून आली आहे.

स्वातंत्र्य आणि स्वैराचार, बंड आणि क्रांती, आक्रोश आणि आक्रंदन, आंदोलन आणि अराजक या संकल्पनांमधल्या सीमारेषा अनेकदा पुसट असतात. उस्फूर्त आंदोलन अराजकाच्या वळणावर केव्हा जाऊन थडकते, हे त्या आंदोलनाच्या नेत्यांना वा अनुयायांनाही अनेकदा कळत नाही. तीच गोष्ट स्वातंत्र्य आणि स्वैराचाराबद्दल. या पुसट सीमारेषा दूर करून त्यात स्पष्टता आणणे, हे फक्त तात्त्विक आव्हान नाही तर ती व्यावहारिक गरज आहे. आज आपण इतक्या विलक्षण अनिश्चिततेच्या वातावरणात आणि इतक्या कमालीच्या वेगाने झपाटलेल्या जगात राहात आहोत की, हे शतक माणसाला अधिक उज्ज्वल आणि उन्नत करील की हे सिव्हिलायझेशनच उद्‌ध्वस्त करील, हेही सांगता येणार नाही. म्हणूनच ते अधिक सुंदर आणि समृद्ध करण्याचा आपला प्रयत्न असावा. तो करतानाच संघर्ष करावा लागतो आणि तेच मोठे आव्हान आहे.

आता हां-हां म्हणता पत्रकारितेत 43 वर्षे होऊन गेली आहेत. सुरुवात जरी ‘मराठा’तल्या लेखाने झाली असली, तरी पुढे जवळजवळ 25 वर्षे इंग्रजी पत्रकारितेत व्यतीत केली आहेत आणि 1993 पासून महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता आणि आता दिव्य मराठी या मराठी दैनिकांत संपादक म्हणून! वृत्तपत्रमालकांचे आणि मालकशाहीचे विविध प्रकार, पत्रकारितेतील झपाटा आणि उथळपणा, राजकारणाचे भान आणि इतिहासाचे ज्ञान, डेडलाइन डोळ्यांसमोर ठेवून लेखनात आणावी लागलेली शिस्त या व्यवसायातील सतत वाहणारा जिवंतपणा (आणि तरीही एक प्रकारच्या बोथट होत जाणाऱ्या संवेदना), टीव्ही चॅनेल्सवरील पॅनेल चर्चांमधून येणारी सनसनाटी आणि सवंग मांडणी- आणि तरीही त्यातून अनुभवाला येणारी उत्कट प्रासंगिकता, वर्तमानकाळाच्या हिंदोळ्यावर सतत राहून मनाला येणारी झिंग आणि प्रत्येक अनुभवातून नवे शिकायला मिळणारी संधी... यामुळे पत्रकारितेतील चार दशके कशी निघून गेली, ते कळलेही नाही.

माझी आई पत्रकार नव्हती, तिच्या काळात तर ती शक्यताही नव्हती. पण तिच्या वाचनसंस्कृतीचा आणि वाचनशिस्तीचा संस्कार झाला नसता, तर कदाचित मी पत्रकार ऊर्फ ‘लेखक’ झालोही नसतो. माझ्या दोन्ही बहिणीसुद्धा आईच्या त्याच मुशीत वाढल्या आणि उत्तम वाचक व लेखकही झाल्या. लौकिक अर्थाने त्या प्रसिद्ध किंवा ‘ज्ञात’ नसतीलही; पण त्यांच्यातील कमालीची नि:स्पृहता, उत्कटता, नितळ शैली हीसुद्धा आईच्याच ‘जीन्स’मधून आली असणार!

त्याचप्रमाणे शारदा जर माझ्या या प्रवासात भेटली नसती, तर मी कुठेही भरकटत जाऊ शकलो असतो. ‘मैं तो चला जिधर चले रस्ता’ म्हणत आणि आत्मगुंजनात अडकून गेलो असतो. खरे म्हणजे, मग मी आयआयटीत असतो वा पत्रकार असतो, तरी त्या ‘असण्याला’ अर्थ वा आशयच मिळाला नसता. शारदाने तर कधीच ‘करिअर’ वा नोकरीची, पैसे मिळवण्याची वा ऐहिक जीवनशैलीची आस धरलेली नाही. माझ्या लेखनावर वा पत्रकारितेवरच नव्हे, तर जगण्यावरच तिचे अदृश्य वलय आहे. किंबहुना, त्यामुळेच हा जीवनगौरव पुरस्कार आईलाही आहे आणि शारदालाही!

Tags: जवाहरलाल नेहरू शारदा साठे कॉंग्रेस इंदिरा गांधी भाऊ फाटक श्रीपाद अमृत डांगे महाराष्ट्र फाउंडेशन कुमार केतकर Jawaharlal Nehru Sharada Sathe Congress Indira Gandhi Bhau Fatak Shripad Amrut Dange Maharashtra Foundation Kumar Ketkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कुमार केतकर
ketkarkumar@gmail.com

माजी संपादक- महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, दिव्य मराठी 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके