डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

परदेशी मित्रमैत्रिणींची व्यक्तिचित्रे

काही व्यक्तीच्या जीवनप्रवाहाच्या वळणावर एक एक अनुभव उभा असतो. अकल्पित आणि स्तिमित करणाऱ्या घटनांनी त्यांचे आयुष्य भरलेले असते. जीवनाचे प्रगल्भ दर्शन त्यांना होत असते. 'प्रवाहातील पक्षी' या पुस्तकाची लेखिका निरंजना ऊर्फ निलू गवाणकर हिने आपल्या समृद्ध आयुष्यात जे अनुभव घेतले, ज्या व्यक्ती तिला भेटल्या त्यांच्याबद्दल भरभरून या पुस्तकात ती निवेदन करते आहे. 

जगावेगळे आयुष्य जगणारी निलू धीटपणे आणि सरळ मनाने प्रत्येक अनुभवाला सामोरी गेली आहे. राष्ट्रसेवादलासारख्या संस्थेतून धर्मनिरपेक्षतेचे संस्कार घेऊन निलू वाढली. जातिभेदातील निरर्थकता तिच्या लक्षात आली आणि घरच्या मोकळ्या आणि अभ्यासू वातावरणात तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. इंजिनीअरिंगची पदवी घेऊन वयाच्या एकवीस-बावीसाव्या वर्षी निलू अमेरिकेला गेली. एका अमेरिकन कुटुंबात वास्तव्य करताना तेथील रीतिरिवाजांशी, जीवनाशी एकरूप होण्याचा तिने प्रयत्न केला. नोकरी मिळाल्यावर स्वतंत्रपणे राहून मैत्रीचे अनेक संबंध जोडले. 

एका आवडलेल्या मित्राबरोबर विवाहही केला पण 'नवरा' इाल्यावर त्याच्या अपेक्षा बदलल्या, मैत्रीची भावना मावळली. निलूवर बंधने घालण्याचा प्रयत्न तो करू लागला, सोबत 'पिणे' होतेच. तेही दिवसेंदिवस वाढू लागले, मतभेद वाढतच गेले. अखेर हे विवाहबंधन तोडणेच बरे असे दोघांनाही वाटू लागले, आणि मग निलू त्या घरातून बाहेर पडली. या घटनेबद्दल निलू अगदी त्रयस्थपणे लिहिते, 'घर भाड्याचं होतं घरातील वस्तूंमध्ये मला स्वतःला गम्य नव्हतं. मूलबाळ नसल्यामुळे तो प्रश्नच नव्हता. माझ्या हातात चांगली नोकरी व शिक्षण. त्यामुळे माझ्या हातात फक्त दोनशे डॉलर्स असूनही नुसते कपडे व कार घेऊन जाताना मला भीतीही वाटली नाही.' 

वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे आणि नवऱ्याच्या बदललेल्या प्रवृत्तीमुळे स्वतःचे जीवन कोमेजू न देण्याच्या निलूच्या निर्णयाला तिच्या आईवडिलांचा मनःपूर्वक पाठिंबा मिळाला. पण लवकरच निलूला एका भयाण अनुभवाला सामोरे जावे लागले. सॅनफ्रान्सिस्कोमध्ये राहात असताना एका भयानक रात्री घरात घुसलेल्या चोरांनी तिला झोपेतच असताना मारहाण सुरू केली. तिच्या डोक्यावर घणाचे घाव घातले.

तिने डोक्यावर उशी घेऊन कसाबसा वचावाचा प्रयत्न केला. त्यात तिच्या डाव्या हाताचा चुराडा झाला. या सर्व प्रसंगात निलूला किती आणि काय सोसावे लागले आणि त्यातून ती आत्मबलावर कशी उभी राहिली हे सर्व मुळातूनच वाचले पाहिजे. त्या जखमी, विकल अवस्थेत निलूच्या डोळ्यांसमोर आले ते आनंदवनात भेटलेले महारोगी. त्यांच्या वैराण जीवनातील धडपडीने तिला आंतरिक शक्ती दिली. पाच-सात वर्षांच्या मेहनतीनंतर ती या आजारातून पूर्णपणे बरी झाली तरीही काही व्यंगे राहिलीच.
 
पण अशा प्रकारे तिचे जीवन उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या चोरांमुळे नव्याने मनात शिरणाऱ्या वर्णभेदाला तिने थारा दिला नाही. जगातील चांगल्या लोकांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवून स्वत:च्या नोकरीत अधिक लक्ष घालून कष्ट करीत तिने बढत्यांवर बढत्या मिळविल्या आणि प्रोजेक्ट कंट्रोल्स मॅनेजर या कंपनीतल्या अगदी महत्त्वाच्या हुद्यापर्यंत ती पोहोचली. 

निलूच्या नोकरीमुळे अमेरिकेत अनेक ठिकाणी तिच्या बदल्या झाल्या. त्या त्या ठिकाणी भेटलेली माणसे आणि अनुभव यांचे तर वर्णन तिने या पुस्तकात केले आहेच. शिवाय लहानपणापासून प्रवासाची आवड, निर्भय वृत्ती आणि कमी गरजा यांमुळे मिळेल ती संधी पकडून, पैसे साठले की खांद्यावर फक्त एक झोळी टाकून ती जगभर भटकली. न्यूझीलंपासून इजिप्तपर्यंत भटकंतीत प्रत्येक ठिकाणी तिने नवीन माणसे जोडली. सँनफ्रान्सिस्कोजवळील मिलिपट्स गावात भेटलेल्या व्हिएतनामी निर्वासित बायकांच्या दर्दभरी कहाण्या ऐकून तिला वाटते की जगातील सर्व लोकांची दुःखे इथून तिथून सारखीच. 1947 साली भारताच्या फाळणीत आपल्याही लोकांचे असेच हाल झाले असतील या विचाराने तिने मन एकदम हेलावून जाते.

न्यूझीलंडमधील बसड्रायव्हर डोरीन मलोनी आणि इंडोनेशियामधली आरवियानी यांच्या कष्टाळूपणाचे आणि व्यवहारी दृष्टीचे तिला कौतुक वाटते. तिच्या साधेपणामुळे आणि सरळ स्वभावामुळे त्या प्रभावित होतात आणि तिच्या मैत्रिणी बनतात. एका मैत्रिणीच्या घरी भेटलेला सहा वर्षांचा अँण्डयू. नंतरची वीस वर्षे तरी सतत त्या मैत्रीचा पाठपुरावा करतो.

सॅनफ्रान्सिस्कोच्या पाचव्या रस्त्यावर एका कुत्र्यासह जुन्या गाडीच्या डबड्यात राहणारा पॉल त्याच्या सौंदर्यदृष्टीमुळे आणि सर्वांना मदत करण्याच्या स्वभावामुळे निलू आणि तिच्या मैत्रिणीच्या परिवारातलाच एक होऊन बसतो. त्या दोघींच्या मैत्रीमुळे त्याच्या आयुष्याला स्थिरता लाभते. इजिप्त देश पाहण्याच्या उत्कट ओढीपोटी निल कैरोला जाते. तिला तिथे जे अनुभव येतात जो स्नेह मिळतो त्यामुळे इजिप्तमधील लोकांबद्दल पाश्चात्त्यांनी पसरवलेले गैरसमज कसे बिनबुडाचे आहेत याची तिला जाण येते.

तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आणि कैरोमध्ये घर असणाऱ्या मोनाच्या आईवडिलांचा धर्म कॉप्टिक ख्रिश्चन, ज्यांनी तिला इजिप्तमध्ये फिरवले ते मुराद-तारेक मुसलमान, निलू हिंदू, पण प्रत्यक्ष वावरताना कोणाचाही धर्म आड येत नाही. सारे जणु विश्वनागरिक बनलेले, माणुसकी या एकाच धर्माने बांधलेले. निलूची ही इजिप्तची सफर आपल्याला माणसाच्या मनातील गाठ स्नेहभावनेचे दर्शन घडविणारी आहे. धर्मभावनेच्या पलीकडे जाऊन माणसांच्या मनाच्या तारा किती उत्कटतेने जुळतात याचा प्रत्यय देणारी आहे. 

अनेक प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे निलूच्या आयुष्यात एक देवमासाही आलेला आहे. तिची एक मैत्रीण दानपा ही मेक्सिकोमधील एका अम्यूजमेंट पार्कमध्ये डॉल्फिन्स आणि केको या देवमाशाला एकेकाळी ट्रेनिंग देत असे. ती निलूला त्या पार्कमध्ये घेऊन जाते. निलूचा आणि त्या देवमाशाचा झालेला 'संवाद' मुळातूनच वाचला पाहिजे. या अनुभवाबद्दल निलू लिहिते , "मी केकोबरोबर अशी अर्धा पाऊण तास बोलत बसले. तोही त्याचं डोके झुलवत जणू काही मला जवाब देत होता. जशी त्याची व माझी जन्मोजन्मीची ओळख. माझ्या उभ्या आयुष्यात असा अनुभव कधीच आला नव्हता...मी केकोच्या डोळ्यांतील भावनांच्या ओघात वाहत गेले. अक्षरशः प्रेमात पडले मी. केकोची त्या पार्कमधील हौदात होणारी कुचंबणा पाहून निलूच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात.

या पुस्तकात इतरही अनेक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला भेटतात. निलूच्या सरळ साधेपणाने आणि भेदभावरहित वागण्यामुळे प्रभावित झालेल्या. त्यांत विलक्षण सौंदर्यदृष्टी असलेला, संगीतप्रेमी मेल्विन आहे. तो 'गे' आहे ही वस्तुस्थिती त्यांच्या मैत्रीच्या आड येत नाही. सुनेच्या पोटी गर्भ टिकत नाही म्हणून ते बीज स्वतःच्या पोटात वाढवून आणि त्याला जन्म देऊन आई आणि आजी हो दोनही नाती जोपासणारी मेरी आहे. जीवनामधल्या कटू अनुभवांनी खडूस बनलेली निलूच्या प्रांजळ स्वभावाची ओळख पटल्यानंतर तिला आपल्या आयुष्याची मार्गदर्शक मानणारी लिसा, शॅनले हाऊस सीनिअर सिटिझन सेंटरमधली वृद्ध युवा रुथ अशा अनेक व्यक्तींची लेखिका आपल्याला ओळख करून देते. या सर्व व्यक्तींचे निलूशी चांगलेच भावबंध जुळलेले आहेत. या सर्वांच्या सहवासात निलू विश्वनागरिकत्व अनुभवते आहे.

काही ठिकाणी थोडीफार अतिशयोक्ती जाणवत असली तरी हा व्यक्तिचित्रसंग्रह अतिशय मनोरंजक आणि वाचनीय झाला आहे. आणि केवळ वाचनीयच नाही तर एकूणच जीवनाबद्दल व्यापक विचार करायला लावणारा आहे.

प्रवाहातील पक्षी
लेखिका- निलू 'निरंजना' गव्हाणकर
मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
किमत ७५ रुपये

Tags: पुस्तक परिचय पुस्तक कुमुद करकरे मेहता पब्लिशिंग हाउस निलू 'निरंजना' गव्हाणकर प्रवाहातील पक्षी review book kumud Karkare nilu gavhankar pravahatil pakshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके