डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'वंदे मातरम् आणि भारत माताकी जय' या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. इतक्यात एकदम मुसळधार पाऊस चालू झाला. वादळी वारे सुटले. त्यावर तिरंगा फडफडत होता. माझे मन भरून आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या असंख्य ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची मला आठवण झाली आणि डोळयांतून अश्रूंची धार लागली.

मी अनुभवलेला पहिला स्वातंत्र्यदिन…

भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन मी शालेय वयात अनुभवला. बारामतीला मी त्यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये मॅट्रिकच्या वर्गात होते. आधी 3/4 वर्षे सेवादलात- राष्ट्रीय संस्कारांत चालवली होती. त्या आधी काहीच महिने साताऱ्याला झालेल्या सेवादल मेळाव्यामध्ये सेवादल समाजवाद्यांच्या हातात जाते आहे काय, याबद्दल शंकरराव देवांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केल्यानंतर सेवादलामध्ये हळूहळू फूट पडायला सुरुवात झाली होती. बारामतीचे सेवादल काँग्रेसवाल्यांनी ताब्यात घेतले होते आणि माझ्यासारख्या समाजवाद्यांच्या प्रेमात असलेल्या सैनिकांनी सेवादलात शाखेवर पाऊल टाकू नये असा सज्जड दम एका मोठ्या स्थानिक पुढाऱ्याकरवी मिळाल्यामुळे सेवादल शाखेची वाट आम्हाला बंद झाली होती. मग आमच्या उत्साहाला वाव देण्यासाठी आम्ही बारामती विद्यार्थी संघाचे काम चालू केले आणि त्या संघटनेमध्ये राष्ट्रीय विचारांची वाढ व्हावी या दृष्टीने अनेक कार्यक्रम आम्ही योजले होते. 

भारताला मिळणारे स्वातंत्र्य खंडित आहे. महात्माजी देशातल्या वातावरणामुळे फार दुःखी आहेत, समाजवादी मंडळींचा फाळणीला विरोध आहे, देशात दंग्यांनी थैमान घातले आहे इत्यादी गोष्टी आम्ही वर्तमानपत्रांत वाचत होतो. गुलामअली नावाचे एक समाजवादी कार्यकर्ते आजूबाजूच्या गावात फिरून समाजवादी मंडळींचा दृष्टिकोन लोकांना सांगत होते. आम्ही विद्यार्थी मंडळी त्यांच्याशी सतत चर्चा करीत असू. समाजवाद्यांचे मुखपत्र 'उषा' त्यावेळी चालू होते. नानासाहेब गोरे त्याचे संपादक होते. त्याचेही वाचन आम्ही करीत असू. बारामती विद्यार्थी संघाच्या निवडणुका जवळ आल्या होत्या. आमच्याबरोबर काही काँग्रेसची आणि काही कुठलीच विचारसरणी न मानणारी अशी मुले होती तर विरोधात बरेचसे संघीय होते. प्रभाकर सिद्ध, अब्दुल गनी अत्तार, वत्सला पापाणी, राम देशपांडे इत्यादी कार्यकर्ते या निवडणुकीसाठी प्रचार करत होते. 

स्वातंत्र्याच्या उत्साहापेक्षा या निवडणुकीचीच नशा आम्हांला अधिक चढली होती. चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री कलेक्टर कचेरीसमोर झेंडावंदनाचा कार्यक्रम ठरला होता. सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या आखणीप्रमाणे आणि योजनेप्रमाणे चालले होते. तिथे आमच्यासारख्या पोरांना विचारतो कोण? म्हणून आम्ही ऐन झेंडावंदनाच्या वेळी तिथे जायचे ठरवले. त्याआधी निवडणुकीची 'स्ट्रैटेजी' ठरवण्यासाठी आमची गुप्त बैठक ठरली होती. ही बैठक कुठे घ्यायची? आमचे एक कार्यकर्ते अब्दुलगनी अत्तार यांच्या घरी त्यांच्या पोटमाळ्यावर आम्ही जमलो. निवडणुकांबाबत खूप खल झाला. आमचा वादविवाद ऐन रंगात आला असताना जवळजवळ बारा वाजत आले होते. इतक्यात खाली थोडीशी गडबड चालल्याचे जाणवले. गनी उठून खाली जाणार तोच जिन्यावरून कोणीतरी वर आले. आणि गनीसाहेबांना पुत्ररत्न झाल्याची बातमी त्यांनी दिली. 

मी तर एकदम अवाकच होऊन गेले. कारण गनी आम्हा सर्वापेक्षा मोठे आहेत हे मला माहीत होते पण ते विवाहित आहेत याची मला कल्पनाच नव्हती. आम्ही सर्वांनी अब्दुल गनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मी त्यांना म्हटले, गनी, बाळ चांगल्या मुहूर्तावर जन्माला आले आहे. त्याचे नाव 'आझाद' ठेवा. (त्यांनी ते ठेवले की नाही मला आता आठवत नाही). पेढा खाऊन आम्ही तेथून लगेच निघालो आणि कलेक्टर. कचेरीवर पोहोचलो. झेंडावंदनाची तयारी झाली होती. ध्वज वर जायला काही मिनिटेच बाकी होती. हवा कुंद झाली होती. पावसाने बरेच दिवस ओढ दिल्यामुळे दुष्काळसदृश वातावरण तयार झाले होते. लोक आशेने पावसाची वाट पहात होते. बारा वाजले. बिगुल आणि ढोल यांच्या नादात युनियन जॅक खाली आले आणि स्वतंत्र भारताचा तिरंगा वर गेला. 

'वंदे मातरम् आणि भारत माताकी जय' या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. इतक्यात एकदम मुसळधार पाऊस चालू झाला. वादळी वारे सुटले. त्यावर तिरंगा फडफडत होता. माझे मन भरून आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या असंख्य ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची मला आठवण झाली आणि डोळयांतून अश्रूंची धार लागली. खळाळणाऱ्या पावसाच्या धारेत ते अश्रू मिसळून गेले. चौदा ऑगस्टला मध्यरात्री भारतात जन्माला आलेल्या मुलांना सलमान रश्दी या लेखकाने ‘मिडनाइट चिल्ड्रन' असे म्हटले आहे. पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण येते तेव्हा अशा एका 'मिडनाईट चाइल्ड’ च्या जन्मसोहळ्याचे आपण साक्षी होतो हे मनात येऊन मजा वाटते.

Tags: अब्दुल गनी अत्तार  प्रभाकर सिद्ध सलमान रश्दी नानासाहेब गोरे कॉंग्रेस कुमुद करकरे Abdul Gani Attar Salaman Rashdi Nansaheb Gore Congress Kumud Karakare weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके