गुरुजी राजकारणात भाग घेत राहिले याचा अर्थ ते काँग्रेसचा प्रचार करीत होते, सभासद नोंदणी करीत होते; खादी प्रचार करीत होते आणि श्रमिकांचे लढे लढवीत होते. पण कोणत्याही पक्षाच्या चौकटीत त्यांनी आपली बुद्धी बंदिस्त केली नाही हा गुरुजींच्या राजकीय वाटचालीचा विशेष आहे.
1918 मध्ये दोन घटना अशा घडल्या की गुरुजी आपल्या अभ्यासाच्या कोषातून बाहेर पडून सामाजिक वास्तवाला भिडले. पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष त्या वेळी हरी नारायण आपटे होते. त्यांनी साक्षर-निरक्षरांची खानेसुमारी सुरू केली. त्यात स्वंयसेवक म्हणून गुरुजी या कामासाठी घरोघर फिरले तेव्हा जनतेमधील अज्ञान, दारिद्र्य, स्वभाववैचित्र्य यांचा अनुभव त्यांना आला. ‘मोठे झालात की अज्ञानावर तुटून पडा,’ हे हरिभाऊ आपटे यांचे आवाहन त्यांच्या मनाला स्पर्शून गेले. दुसरी घटना म्हणजे त्याच वेळी उद्भवलेल्या एन्फ्ल्यून्झाच्या हाहाकार, त्या साथीमध्ये झालेला मानवसंहार आणि समाजात पसरलेले अपरंपार दुःख, यांमुळे गुरुजींचे भावुक मन व्याकूळ झाले; सामाजिक परिस्थितीचा अधिक विचार करू लागले.
याच सुमारास स्वामी श्रद्धानंदांचा खून झाले. श्रद्धांजली सभेत महात्मा गांधी यांचे भाषण झाले. गुरुजींनी त्या दिवशी गांधीजींना प्रथम पाहिले- ऐकले. त्यांचे मन उचंबळून आले. जणू जिवाशिवाची भेट झाली. प्रथम दर्शनाने जणू त्यांचा जीवनमार्ग निश्चित केला. या प्रसंगाबद्दल गुरुजींनी लिहिले आहे, ‘‘त्या दिवशी मी गांधीजींना पाहिले. प्रथम पाहिले. भारताचा आत्मा पाहिला. भारताची पुंजीभूत पुण्याई पाहिली. भारताचे तप पाहिले, वैराग्य पाहिले-चालती बोलती गीता पाहिली. सत्यप्रेमाचा नवा अवतार पाहिला. माझे डोळे भरून आले होते. मी सद्गदित होतो. एक प्रकारे हृदय उचंबळून आले होते.’’ आईच्या नंतर गुरुजींच्या जीवनावर प्रभाव पाडणारी दुसरी व्यक्ती म्हणजे गांधीजी होते. गांधीजींनी दिलेला देशभक्तीचा हा संस्कार पुढे आणखीच दृढ होत गेला.
1937 कध्ये पुण्यात हिंदुत्वनिष्ठांनी सोन्या मारुती प्रकरण पुन्हा उकरून काढले. ‘सत्याग्रह' सुरू झाला होता. वाद्यबंदीच्या साध्या प्रकरणाला राजकीय स्वरूप देऊन प्रांतिक विधिमंडळ निवडणुकांच्या वेळी प्रचारासाठी त्याचा उपयोग करून घेण्यात आला. गांधीजी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे पुरस्कर्ते होतेच. याच सुमारास खान्देशातील काही कार्यकर्त्यांद्वारा गुरुजींचा कम्युनिस्ट नेत्यांशी संपर्क येऊ लागला होता. या प्रकरणात होणाऱ्या प्रचारामुळे गुरुजी प्रक्षुब्ध झाले आणि त्यांनी या प्रकरणावर 'सोन्या मारुती’ याच नावाची एक कादंबरी लिहून टाकली. गुरुजींच्या या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या पुरस्कारामुळे हिंदुत्वनिष्ठांचा फार जळफळाट होत असे. ‘साने गुरुजी की साने मुल्ला?’ अशा शीर्षकाचे लेख त्यांच्या नियतकालिकातून प्रसिद्ध होत असत. केसरी व त्रिकाळकारांनी तर त्यांच्यावर नाही नाही ते हेत्वारोप करून टीकेची झोड उठविली. गुरुजींनी आणि विशेषतः आपटे गुरुजींनी या टीकेला उपहासात्मक लेख लिहून चोख उत्तर दिले.
या 'सोन्या मारुती’मधील नायक कम्युनिस्ट विचारसरणीचा दाखविल्यामुळे काँग्रेस पुढाऱ्यांमध्ये गुरुजींबद्दल एक प्रकारचे संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या कादंबरीत ‘श्रमिकांचा झेंडा- लाल झेंडा’ असा उल्लेख होता. धुळे जेलमध्ये गुरुजींना मधु लिमये प्रथम भेटले. तेही 9 महिन्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेवर धुळे जेलमध्ये आले होते. वयात अंतर असले तरी गुरुजींच्या अपरंपार स्नेहाचे ते धनी झाले. ‘तरुण कार्यकर्त्यांच्या मागे असलेला जेलरचा जाच गुरुजींच्यामुळे कमी झाला,’ असे मधु लिमये यांनी आपल्या आत्मकथेत आहे. पण मधु लिमये यांची सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी कम्युनिस्टांचे खरे स्वरूप गुरुजींच्या निदर्शनास आणून दिले. त्या काळात किसान-कामगारांचे प्रश्न हाती घेऊन लढे करणारे कम्युनिस्टच होते. काँग्रेस अंतर्गतच त्यांचा गट होता. म्हणून काँग्रेसच्या तत्त्वांचा प्रचार करीत श्रमिक चळवळीच्या आघाडीवर राहणे गुरुजींना अजिबात आक्षेपार्ह वाटले नाही. ते दूधखुळे नव्हते. त्यांची राजकीय जाणीव आणि बुद्धिनिष्ठा प्रखर होती. कम्युनिस्टांना राष्ट्रनिष्ठा नसते आणि मानवी मूल्यांची पायमल्ली करताना प्रसंगी आपल्या सहकाऱ्यांचेही ते मुडदे पाडतात, हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा ते कम्युनिस्टांपासून दूर झाले. धुळे तुरुंगात समाजवादी नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय झाला होता. मधु लिमयेंसारखा जहाल समाजवादी त्यांचा जिवलग स्नेही बनला होता. समाजवादीही श्रमिकांच्या राज्याची स्वप्ने ते पाहत होते आणि या देशाशी इमान राखून होते. कॉ. रणदिवे आणि कॉ. डांगे यांच्यामधील भाऊबंदकी अनुभवून खिन्न झालेले गुरुजी मग मानवी मूल्यांच्या उपासनेला महत्त्व देणाऱ्या आणि काँग्रेस नेत्यांच्या कृतिशून्यतेला दूर ठेवणाऱ्या समाजवादी मित्रांच्या गटात सामील झाले, त्यांचे मित्र बनले यात नवल ते काय?
गांधीजी प्रेरणास्रोत
गुरुजी भावनाप्रधान होते. पण ते निखळ सत्याचे उपासक होते. राजकारणात गांधीजी हा त्यांचा प्रेरणास्रोत होता. विनोबाजी हे अभयस्थान होते. स्वातंत्र्यपूर्वीची काँग्रेस ही जीवननिष्ठा होती. अन्यायाविरुद्ध लढे देता देताच समाजसत्तावादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. श्रमिकांच्या लढ्याची, शेतकरी-कामगारांवरील अन्यायाची हाक ऐकून ते त्यांच्या लढ्यात सामील झाले, पण तोही काँग्रेसचा एक ध्येयवाद म्हणूनच. त्यांना कम्युनिस्टांची साथ मिळाली. आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना कम्युनिस्ट ठरवून सर्व पदांपासून कटाक्षाने दूर ठेवले; पण त्यांनी त्या कधी तक्रार केल नाही, कम्युनिस्टांचे खरे रूप उघड झाल्यावर ते कम्युनिस्टांपासून दूर झाले आणि समाजवादी तत्त्वज्ञानावर अभंग निष्ठा असणारे आणि राष्ट्रीय वृत्तीचे, गांधीजींचे नेतृत्व मानणारे समाजवादी त्यांचे मित्र बनले. गुरुजी राजकारणात भाग घेत राहिले याचा अर्थ ते काँग्रेसचा प्रचार करीत होते, सभासद नोंदणी करीत होते; खादी प्रचार करीत होते आणि श्रमिकांचे लढे लढवीत होते. पण कोणत्याही पक्षाच्या चौकटीत त्यांनी आपली बुद्धी बंदिस्त केली नाही हा गुरुजींच्या राजकीय वाटचालीचा विशेष आहे.
Tags: समाजवादाचा प्रसार कम्युनिस्टाशी फारकत गांधीजी प्रेरणास्रोत राजकीय वाटचाल spread up for socialism साने गुरुजी away from comunist inspired by gandhi political witness sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या