....
दूरस्थ विशाखाकिरणांच्या स्पर्शाने
उद्ध्वस्त किनारा अस्तित्वाचा झाला
अन् सात नभांची क्षितिजे पार कराया
नाविकांस आम्हां जोश अनोखा आला
पालवल्या फिरुनी अनंत अमुच्या आशा
अन् ध्येयासक्ती अनंत पेटुनि उठली
मग दिली बळींनी बलवंता आव्हाने
मृत्युंजय आम्ही अम्हांस भीती कुठली
हे कुसुमाग्रज ! तुम्हि रहिवासी गगनाचे
परि कृतार्थ केली तुम्ही मराठी माती
या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची
जोडलीत साऱ्या नक्षत्रांशी नाती
तुम्हि कुठे कुणाला दिला कधी उपदेश
कधि बोट धरुन नच चालवले कोणाला
प्रवचने चिकित्सा सदैव केली वज्यं
परि कविकुलगुरु ही पदवी फक्त तुम्हांला
हे मुक्त विहंगम, निळ्या नभाच्या पांथा,
तू असाच राही पेरित उज्ज्वल गाणी
गुंफीत रहा तू कृतिशूरांच्या गाथा
अन् पेटव विझल्या डोळ्यांमधले पाणी
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या