डिजिटल अर्काईव्ह

स्पृश्यास्पृश्यांची दास्ये

अस्पृश्यांच्यातील परिवर्तनाशी सुसंगत असे परिवर्तन स्पृश्यांच्यामध्येही जर होऊ लागले तरच एकंदर समाजात एकात्मता निर्माण होऊन राष्ट्रविकासाला गती येऊ शकेल. वरवर पाहता अस्पृश्यता नाहीशी होत आहे असे जे दिसते ते फसवणारे असे आहे. पूर्वीच्या मानाने अस्पृश्यतापालनामध्ये काही बदल निश्चितपणे झाला आहे. पण अस्पृश्यता अद्यापही शिल्लक आहे हे विसरून चालणार नाही. अस्पृश्यतेची भावना मनातून नाहीशी करणे ही व्यक्तिविकासाची विवेकनिष्ठतेची, सुसंस्कृततेची, आणि पर्यायाने राष्ट्रविकासाची कसोटी आहे.

स्वातंत्र्याच्या वातावरणातच व्यक्तित्वाचा खरा विकास होऊ शकतो. पण स्वातंत्र्याची आस मनात मुळातच असली पाहिजे. वास्यत्व असेल तर व्यक्तिमत्त्व खुजे होते, आणि त्यात विकृती निर्माण होते.

नवे जीवन- नव्या आशा

अस्पृश्यांनी परकीय किंवा स्वकीयांचे दास्य मनातून झिडकारून टाकले आहे. मनाने आता ते मुक्त झाले आहेत. स्वातंत्र्याच्या या वातावरणात त्यांच्या मनात नव्या आशा फुलत आहेत. नव्या जीवनाची, नव्या संस्कृतीची स्वप्ने उमलत आहेत. एखादा पडीक जमिनीतून पाऊस पडल्यावर जसे नवे पीक तरारून येते त्याप्रमाणे हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजातून नवनिर्माणाची प्रचंड शक्ती नव्या उन्मेषाने उफाळून येत आहे. नव्या जीवनाचे, संस्कृतीचे उगमस्थान आणि श्रद्धास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. अस्पृश्यांच्यातील या परिवर्तनामध्ये काही उणीवा असतील, काही नवी दास्ये त्यांनी स्वीकारली असतील, परंतु त्यांच्यातील या परिवर्तनाला एक गती आली आहे, हे मान्य करावे लागेल.

अस्पृश्यांच्यातील परिवर्तनाशी सुसंगत असे परिवर्तन स्पृश्यांच्यामध्येही जर होऊ लागले तरच एकंदर समाजात एकात्मता निर्माण होऊन राष्ट्रविकासाला गती येऊ शकेल. वरवर पाहता अस्पृश्यता नाहीशी होत आहे असे जे दिसते ते फसवणारे असे आहे. पूर्वीच्या मानाने अस्पृश्यतापालनामध्ये काही बदल निश्चितपणे झाला आहे. पण अस्पृश्यता अद्यापही शिल्लक आहे हे विसरून चालणार नाही. अस्पृश्यतेची भावना मनातून नाहीशी करणे ही व्यक्तिविकासाची विवेकनिष्ठतेची, सुसंस्कृततेची, आणि पर्यायाने राष्ट्रविकासाची कसोटी आहे. या दृष्टीने स्पृश्यांच्या मनातून अस्पृश्यतेच्या भावनेचे समूळ निर्मूलन होणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे. स्वतंत्रतेच्या वातावरणात वावरणाऱ्या अस्पृश्यांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत आणि ते साहजिकच आहे. मानसा मानसात कोणताही अन्तर्बाह्य भेदभाव न करणारी वागणूक त्यांना हवी आहे. व्यक्तिविकासाच्या स्वाभाविक अपरिहार्यतेतून सामाजिक समतेची तीव्रतर जाणीव आणि ओढ त्यांच्यात निर्माण झाली आहे. समरस होण्याच्या या त्यांच्यातील भावनेला जर प्रतिसाद मिळाला नाही तर अस्पृश्यांच्या अन्तःकरणाला अपार वेदना सहन कराव्या लागतात; त्यांच्यातील ही संवेदनशक्ती आता जागृत झाली आहे.

स्पृश्यांची अस्पृश्यवृत्ती

पूर्वपरंपरेनुसार अस्पृश्यांच्यावर होत असलेले अन्याय आजही पाहायला मिळतात. अस्पृश्यतेचे उघडपणे समर्थन करणारे चातुर्वर्ण्यवादी महाभाग आजही समाजात शिल्लक आहेत. त्यांच्यातील विचार शक्ती दुर्दैवाने अद्यापही कुंठितच झालो आहे. सनातन प्रकृतीचे हे लोक पुराणकाळातच वावरत आहेत. स्पृश्यांच्या सर्व जातींमध्ये हे लोक आहेत. दैनंदिन व्यवहारात तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सर्व स्पृश्य समाज जातिभेद मानत असलेला दिसतो. स्पृश्य-सुशिक्षित विद्वत्तेच्या अनेक पदव्या भूषवीत असले तरीही त्यांना स्वतःच्या मनाच्या अस्पृश्यतेच्या भावनेवर विजय मिळविता येत नाही.

"अस्पृश्यतेची भावना मनातून जायला अद्याप काही काळ जावला पाहिजे.", "हजारो वर्षांची अस्पृश्यता एकदम कशी बरे जाईल?" "आमच्या मनाची तयारी करावला वेळ लागेल.", "अस्पृश्य किती घाणेरडे राहतात, ते स्वच्छतेने राहिले की आम्ही त्यांना घरात बोलावृच.", "आमच्या 'कुटुंबा'च्या 'म्हातारी' माणसाच्या मनात केवळ शिवाशिवीची भावना आहे. त्यांच्यासाठी आम्हांला काही बंधने पाळावी लागतात.",  छे, छे; तसे काही नाही. आम्हांला तुमचा चहा चालतो हो. पण मी आता नुकताच चहा घेऊन आलो आहे.", "अस्पृश्यांना काय येतंय? त्यांच्यावर पुरेसे संस्कार झालेले नाहीत.". .. अशा प्रकारच्या अनेक सबबी संभावित असे स्पृश्य सुशिक्षित लोक शोधत असताना दिसतात. एखादा अस्पृश्य जेव्हा एखादा स्पृश्याजळ जातो त्यावेळी त्या स्पृश्यामध्ये वेगळेपणाची जाणीव आपोआप निर्माण झालेली आढळते. एखादा स्पृश्य जेव्हा अस्पृश्याच्या घरी येतो त्या वेळी 'आपण मोठा उपकार करत आहोत' ही भावना त्याने उराशी बाळगलेली असते. एखादा अस्पृश्य जेव्हा स्पृश्याच्या घरी जातो त्या वेळी तेथील 'वेगळेपणा'च्या वातावरणामुळे गुदमरल्यासारखे होते. अश्यांना भाड्याने घरे मिळत नाहीत. स्पृश्य वस्तीत एखादा अस्पृश्य राहिला तर सतत त्याला 'वेगळेपणा'ची वागणूक मिळते. नोकरी मिळवण्याच्या बाबतीतही 'जात' आड येते. सहानुभूतिपूर्वक त्यांना कोणते मार्गदर्शन मिळत नाही. उलट जेथे तेथे त्यांच्या वाट्याला तुच्छता, उपेक्षाच येते. यापेक्षाही "अस्पृश्य आता फार माजले आहेत. त्यांना त्यांच्या जागेवरच ठेवले पाहिजे" अशा प्रकारची सूडाची भावना निर्माण झालेली दिसून येते.

साहित्यातील प्रतिबिंब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धिमत्ता, त्यांचे निष्कलंक चारित्र्य आणि कार्य यांचे महत्त्व अद्यापही स्पृश्यांना कळलेले दिसत नाही. त्यांचा फोटोही घरात लावण्याइतकी त्यांच्या मनाची तयारी अद्याप झालेली नाही. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासही कोणी स्पृश्य पुढाकार घेत नाही. नियतकालिकात, साहित्यात, गाव तेथे महारवाडा', 'चांभारचौकशी', 'चांभाराच्या देवाला खेटराची पूजा' यांसारखे वाक्प्रचार अद्यापही आढळतात. अस्पृश्य पात्रांचे चित्रण कमीपणाच्या भावनेने केलेले आढळते. स्पृश्य अस्पृश्यआ पाशी 'अरे-तुरे' या अरेरावीच्या भावनेने बोलत असतात. अस्पृश्य लेखकांच्या कलाकृतीचे मूल्यमापन कलात्मक पातळीवरून न करता जातीयवादी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहतात. सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात अस्पृश्यांना समानतेने वागवले जात नाही. पुरोगामी असल्याचे केवळ दाखवण्यासाठी अस्पृश्यांना नावापुरते प्रतिनिधित्व दिले जाते. अस्पृश्य कार्यकर्त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व, त्याची बुद्धिमत्ता किंवा त्याची सचोटी पाहिली जात नाही. आपली प्रतिमा उजळ ठेवण्यातले केवळ एक हत्यार म्हणून अस्पृश्यांना जवळ केले जाते. सत्ता, संपत्ती किंवा स्वार्थ हेच ज्यांचे उद्दिष्ट असते अशांच्या आचार-विचारांत तर कधीच एकमेळ नसतो. अशा प्रकारच्या दुटप्पी, अप्रामाणिक प्रवृत्तीची आज भरमसाट वाढ झाली आहे. राजकारणातले केवळ एक साधन म्हणून जातीयवादाचा अगदी पद्धतशीरपणे वापर केला जातो. अशा ठिकाणी अस्पृश्यांना केवळ वरवरची सहानुभूती मिळते. पण यामुळे त्याचे व्यक्तित्व आणि अस्मिता उजळण्यास मदत होत नाही.

हा एक महारोग

अस्पृश्यता नाहीशी करण्याच्या काही शक्ती आणि व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत; ही नव्या युगाची नांदी आहे. परंतु हे प्रयत्न एकंदर समाजमनाला जाग आणण्याइतके समर्थ नाहीत; किंवा अशा प्रयत्नाचा आदर राखण्याइतकी आजची समाजपरिस्थिती निरोगी नाही. शरीराला जडलेला महारोग आज बरा होत आहे; त्याप्रमाणे स्पृश्यांच्या मनाला जडलेला अस्पृश्यतेचा महारोग केव्हा बरा होणार आहे?

Tags: नियतकालिक साधना दास्यमुक्ती विशेषांक 1970 डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य ल. बा. रायमाने Magazine Sadhana Emancipation Special Issue 1970 Dr. Babasaheb Ambedkar Untouchable L. B. Raimane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके