डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘लघुनिबंध ते कॅलिडोस्कोप’ हा लेख ‘प्रजापत्र’च्या दिवाळी अंकात (२०१४) प्रसिद्ध झाला आहे. पण नीरज हातेकर व राजन पडवळ यांचा ‘बदलते राजकारण व अर्थकारण’ हा शोधनिबंध साधनाकडे आल्यावर लक्षात आले की, ‘प्रजापत्र’मधील त्या लेखातील विवेचन या शोधनिबंधाला समांतर जाणारे व पूरक ठरणारे आहे, म्हणून तो लेख पुनर्मुद्रित करीत आहोत. – संपादक

काणेकरांचा आरसा

दि. २ डिसेंबर २००६ रोजी प्रख्यात मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांची १०१ वी जयंती आहे. कथा, काव्य, नाटक आणि प्रवासवर्णने असे काही साहित्यप्रकार काणेकरांनी हाताळले असले, तरी मुख्यत: त्यांची ओळख ‘लघु- निबंधकार’ अशीच करून दिली जाते. इ.स.१९३० नंतरची दोन दशके हा काणेकरांच्या लघुनिबंधाचा बहराचा काळ होता; पण त्यानंतरही दोन दशके त्यांच्या लघुनिबंधांची मोहिनी मराठीतील फार मोठ्या वाचकवर्गावर होती. लघुनिबंध या लेखनप्रकाराची सुरुवात ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांनी केली; पण या लेखनप्रकाराचा खरा उत्कर्ष काणेकरांनीच केला, असे मानले जाते. छोटी-छोटी वाक्ये, दैनंदिन जीवनातील उदाहरणे यांच्या साह्याने जीवनातील एखाद्या गंभीर तत्त्वाची ललितरम्य मांडणी अगदी हसत-खेळत करून तो विचार वाचकांच्या गळी उतरविण्यात काणेकरांचा हातखंडा होता. 

‘मलाही असंच वाटलं होतं, पण नेमकेपणाने सांगता येत नव्हतं.’ किंवा ‘अरेच्चा! खरंच की, हे आपल्या लक्षातच आलं नाही’ ही आणि अशा आशयाची वाक्ये काणेकरांचे निबंध वाचून अनेक वाचकांच्या तोंडून बाहेर पडत असत. ‘काणेकरांचे निबंध आवडतात’ असे म्हणणारे वाचक सर्व वयोगटातील होते, पण सर्व स्तरांतील नव्हते. ज्यांचा जीवनसंघर्ष कडवा नाही, ज्यांचा उपजीविकेचा प्रश्न राहिलेला नाही असा सुशिक्षित मध्यमवर्ग हा काणेकरांच्या लघुनिबंधांचा चाहता होता. या किंवा त्या टोकाची भूमिका घेणारा हा वर्ग नव्हता. हा वाचक आदर्शवादी होता, पण स्वप्नाळू नव्हता. 

‘जगा आणि जगू द्या’ हे ब्रीद असणारा, उदात्त ध्येयवादाचे आकर्षण असणारा आणि जीवनातील मांगल्य, माधुर्य यांचा शोध घेणारा असा हा वाचक होता. त्यामुळेच कदाचित, जीवनातील कुरूपतेचे दर्शन घडवण्याच्या बाबतीत काणेकरांचे लघुनिबंध कंजूषपणा करतात. ‘गणूकाका’ हा काणेकरांचा वाङ्‌मयीन मानसपुत्र होता. जीवनातील अनेक गहन सत्ये काणेकरांनी गणूकाकांच्या मुखातून वाचकांना ऐकवली. हा गणूकाका सामान्य माणसांतील विवेकी प्रवृत्तीचा प्रतिनिधी होता. आर.के.लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनशी त्याचे जवळचे नाते होते. तो त्यागी प्रवृत्तीचा होता, हळव्या मनाचा होता; पण भाबडा नव्हता. 

जगाचा रहाटगाडा त्याला तुलनेने जास्तच कळत होता. पण तरीही इतरांना सांभाळून घेणे, समन्वय साधणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे, अशी त्याची दृढ समजून होती. महाराष्ट्रातील तत्कालीन मध्यमवर्गाला आपल्या इच्छा, आकांक्षा व स्वप्नं यांचे प्रतिबिंब काणेकरांच्या लघुनिबंधात दिसत होते. अप्रिय ते लपवून, प्रिय ते दाखवणारा आरसा म्हणजे काणेकरांचा लघुनिबंध होता. पण त्याला काही अपवाद असणारे काणेकरांचे लघुनिबंधही या वाचकाला भावले. 

‘दोन मेणबत्त्या’ या लघुनिबंधातील ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास’ असा केवळ ध्येयवेड्यांनाच रुचेल-पचेल असा विचार येथील मध्यमवर्गाने डोक्यावर घेतला. कारण उदात्त ध्येयवादाचे न झेपणारे, पण सुप्त मनात असलेले आकर्षण हे तत्कालीन सत्‌प्रवृत्त मध्यमवर्गाचे व्यवच्छेदक लक्षण होते. ‘मोठं शून्य’ या लघुनिबंधात ‘छोटं सुख वजा छोटं दु:ख बरोबर शून्य’ आणि ‘मोठं सुख वजा मोठं दु:ख बरोबर मोठं शून्य’ हा जीवनातील निरर्थकता सुचवणारा विचार होता. पण मध्यमवर्गाने हाही निबंध डोक्यावर घेतला. त्या वेळी काही लोकांकडून या लघुनिबंधावर कठोर टीकाही झाली, पण हे आणि असे अनेक लघुनिबंध काणेकरांच्या वाचकांनी हृदयाशी कवटाळले. 

अलीकडच्या दोन दशकांत मात्र काणेकरांचे लघुनिबंध फारसे वाचले जात नाहीत, त्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्याही निघत नाहीत; याचे कारण काय असावे? खरे तर गेल्या दीड दशकांत म्हणजे १९९१ मध्ये देशाने स्वीकारलेल्या उदार आर्थिक धोरणांमुळे मध्यमवर्ग तिपटीने वाढला, पण वेगाने वाढलेल्या या मध्यमवर्गाचे स्वरूपही वेगळे आहे. विज्ञान व माहिती तंत्रज्ञानातील बदलांमुळे आजच्या मध्यमवर्गाकडे भौतिक सुखसोई वाढल्या, पण पूर्वीच्या मध्यमवर्गाची जीवनमूल्ये मात्र या नव्या मध्यमवर्गाला जवळची वाटली नाहीत; किंबहुना ती अडचणींचीच वाटली. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या नव्या मध्यमवर्गाला उच्च-मध्यमवर्गात प्रवेश करण्याचे वेध लागले. त्या नादात तो या उच्च-मध्यमवर्गाच्या जीवनशैलीचेही झपाट्याने अनुकरण करू लागला; आणि हे वर्गांतर कमी काळात करता येणेही शक्य झाले. थोडक्यात काय, तर काणेकरांच्या काळातील मध्यमवर्ग आणि आजचा मध्यमवर्ग यांत महदंतर आहे. त्यामुळे आजच्या मध्यमवर्गाला काणेकरांच्या लघुनिबंधात आपल्या इच्छा, आकांक्षा व स्वप्नं यांची प्रतिबिंबं दिसत नाहीत. 

आजचा मध्यमवर्ग अधिक व्यवहारी व अधिक आत्मकेंद्री झाला आहे. त्यामुळे अनेक समस्या व ताण-तणावांना सामोरा जात आहे. त्या समस्यांची उत्तरे व ताण-तणावांवरील उतारे काणेकरांच्या लघुनिबंधांत (आरशात) सापडणार नाहीत. पण त्या समस्या का निर्माण झाल्या, याची कारणे मात्र त्या लघुनिबंधांत निश्चित सापडतील. काणेकरांच्या आरशाचा आजच्या काळात संदर्भ उरला असेल, तर तो हाच!


‘बदलता मध्यमवर्ग’ हा शब्दप्रयोग करताना ‘प्रजापत्र’च्या संपादकांना, कोणत्या काळातील बदलांविषयी मी लिहिणे अपेक्षित आहे, हे मला माहीत नाही. आणि त्यांनी तसे सांगितलेले नाही, याचा अर्थ मी माझ्या काळातील किंवा मला दिसलेल्या मध्यमवर्गाविषयी व त्यात झालेल्या/होत असलेल्या बदलांविषयी लिहायला हवे, असे गृहीत धरून चाललो आहे. म्हणून मग पहिल्यांदा हे स्पष्ट केले पाहिजे की, मागील दोन दशके हा माझ्या आकलनाचा व उमेदीचा काळ आहे. 

वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी आपल्याला ‘स्व’च्या बाहेरचे कळायला लागते आणि सभोवतालच्या परिस्थितीविषयी प्रश्न पडायला लागतात असे मानले, तर माझ्यासाठी १९९१-९२ हे पंख फुटण्याचे वर्ष होते. म्हणजे त्यानंतरची वीस-बावीस वर्षे हा माझा काळ आहे. सामाजिक बदल टिपण्याच्या संदर्भात हा काळ फार मोठा आहे असे म्हणता येत नाही; पण या काळात झालेली स्थित्यंतरे व उलथा-पालथी लक्षात घेतल्या, तर हा काळ तितकाही लहान नाही. 

१९९१-९२ नंतरच्या काळातील मध्यमवर्गाविषयी व त्यात झालेल्या/होत असलेल्या बदलांविषयी मी ‘माझा काळ’ म्हणून लिहिणार असलो, तरी हाच काळ भारताच्या दृष्टीने कूस पालटणारा, नवे वळण घेणारा वा नवे पर्व अवतरलेला असा मानला जातो. त्यामुळे आज मला असे नेमकेपणाने सांगता येते की, या देशाच्या उदारीकरण पर्वातील पहिली दोन दशके हा ‘माझा काळ’ आहे. म्हणजे उदारीकरण पर्वातील मध्यमवर्गाविषयीची काही निरीक्षणे, थोडेसे विश्लेषण आणि शक्य असेल तर किंचितसे अनुमान एवढेच या लेखातून मांडण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे.

 - एक –
तर ‘मध्यमवर्ग’ हा शब्दप्रयोग मी अगदी सुरुवातीला ऐकला आणि थोडासा अभ्यास व अनुभव घेतल्यानंतर, मध्यमवर्ग या संकल्पनेविषयी माझ्या मनात जे चित्र पहिल्यांदा निर्माण झाले, ते साधारणत: वीस वर्षांपूर्वी. कसे होते ते चित्र? त्या चित्राचा गाभाघटक किंवा मुख्य भाग म्हणजे आर्थिक परिस्थिती! मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती कशावर आधारलेली होती, तर मुख्यत: सरकारी नोकरीवर! ‘कोणत्या ना कोणत्या सरकारी नोकरीत पर्मनंट असणारे ते मध्यमवर्गीय’ अशी एक ढोबळ कल्पना तेव्हा माझ्या मनात आकाराला आली होती. शिवाय, ग्रामीण भागात ‘मध्यमवर्ग’ नसतो आणि मध्यमवर्गावर ब्राह्मणी संस्कृतीचा चांगल्या अर्थाने पगडा असतो अशा स्वरूपाचे चित्र मला दिसत होते. शिक्षण, आरोग्य, रेल्वे, बँका, पोस्ट, महसूल, सार्वजनिक बांधकाम, विद्युत मंडळ, पाटबंधारे इत्यादी खात्यांमधील नोकरदारवर्ग म्हणजे मध्यमवर्ग. या खात्यांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी व अतिवरिष्ठ अधिकारी यांचा समावेश मात्र मध्यमवर्ग या संज्ञेत होत नव्हता. 

डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते इत्यादी पेशांतील लोक मात्र थोडे वरचढ असले तरी मध्यमवर्गातच गणले जात होते. आणि बऱ्यापैकी खात्रीचे उत्पन्न काढणारे शेतकरी व छोटे किंवा मध्यम व्यापारी/उद्योगधंदे करणारे यांना मात्र ‘मध्यमवर्ग’ ही संज्ञा वापरली जात नव्हती, जरी त्यांची आर्थिक मिळकत मध्यमवर्गीय कुटुंबाइतकीच असली तरी! याचाच अर्थ असा निघत होता की, सुखी-समाधानी  आयुष्य घालवण्यासाठी नियमित आर्थिक उत्पन्न आणि पेन्शन गॅरंटी हा मध्यमवर्गाचा गाभाघटक असला तरी, मध्यमवर्गीय कुटुंबाचे चित्र उभे राहण्यासाठी तेवढे पुरेसे नव्हते. 

शिक्षण हा त्या मध्यमवर्गाचा दुसरा मोठा व अत्यंत महत्त्वाचा घटक होता. मध्यमवर्गीय असणे व मध्यमवर्गीय होता/राहता येणे यासाठी ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ अशीच स्थिती होती. अधिक चांगली व सोईची (किंवा कमी त्रासाची) आणि थोड्या अधिक पगाराची नोकरी मिळणे, असा अंतर्गत फरक गृहीत धरला जात होता आणि पुढच्या पिढीला जरी वरचा हुद्दा मिळणार असेल तरी आर्थिक स्थितीमध्ये फार मोठा व पटकन बदल होत नसल्याने, प्रतिष्ठेच्या बाबतीत काय तो थोडाबहुत बदल होत असेल. म्हणजे आर्थिक स्थिती व शिक्षण याबाबतीतील सारखेपणा किंवा कमी चढ-उतार हे १९९० पूर्वीच्या मध्यमवर्गाचे व्यवच्छेदक लक्षण होते, आणि या दोन प्रमुख घटकांच्या संयोगातून इथल्या मध्यमवर्गाची जीवनशैली किंवा मध्यमवर्गीय संस्कृती आकाराला आली होती, असे अनुमान काढता येईल. 

काय वैशिष्ट्ये होती त्या जीवनशैलीची किंवा संस्कृतीची? वानगीदाखल काही सांगता येतील... 
१. मिळणाऱ्या मासिक वेतनात घर/कुटुंब चालवावे, काटकसर व बचत करून भविष्यासाठी थोडी बेगमी करण्याचा प्रयत्न करावा. मुला-मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, ते स्वत:च्या पायावर उभे राहतील इतपत तयारी करून द्यावी; त्यांची लग्न-कार्ये होत असताना किंवा झाल्यानंतर स्वत:च्या मालकीचे घर/फ्लॅट घेता आल्यास पाहावे किंवा निवृत्तीनंतर थोड्याशा शिलकीसह आपल्या मूळ गावी परत जावे. त्या पिढीतील कुटुंबात साधारणत: तीन-चार मुले/मुली असल्याने एवढे करता आले तरी आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान त्या कुटुंबाला पुरेपूर मिळत असावे. 

२. त्या मध्यमवर्गीय कुटुंबांतील पती-पत्नी आपले आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्याशी चांगल्या प्रकारे बांधलेले राहू शकत होते, त्यामुळे नातवंडे (मुलाची वा मुलीची मुले) त्यांच्याजवळ आनंदाने राहू शकत असत. पण याचबरोबर त्या वेळचे वेगळेपण हे होते की, अशा मध्यमवर्गीय घरात जवळच्या नातलगाचे एखादे तरी मूल शिक्षणासाठी असायचेच. घर लहान आहे, स्वत:ची तीन-चार मुले आहेत, आर्थिक स्थितीही बेताची आहे आणि तरीही भाचे/पुतणे मंडळी शिक्षणासाठी आहेतअसे चित्र सर्रास दिसत होते. एक मार्गी लागला किंवा पुढे सरकवला तर दुसरा शिक्षणासाठी आणायचा, हे सहजतेने घडू शकत होते. त्यात रुसवे-फुगवे होते, हेवेदावे होते; तरीही असे घडत होते हे मात्र खरे. 

३. पण त्याचबरोबर आपण बरे आणि आपले काम बरे, अंथरूण पाहून पाय पसरावे, जरी भले कुणाचे शक्य नसेल तरी वाईट कुणाचे करू नये, अति तिथे माती, या विचारांचा बराच पगडा असल्याने मध्यमवर्गात पापभीरूपणा बऱ्यापैकी भिनलेला असे. थोरामोठ्यांचा मान ठेवावा, बुजुर्गांचे अनुभवाचे बोल ऐकावेत, समंजसपणा असावा अशी सर्वसाधारण धारणा होती. नोकरी-व्यवसायात चिकटून किंवा टिकून राहण्याला बरेच जास्त महत्त्व दिले जात होते आणि आकर्षकपणापेक्षा टिकाऊ वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात असे. सण-समारंभ साजरे करणे आणि नाटक-सिनेमा वगैरे प्रकारची करमणूक यांत उरलेला वेळ घालवणे होत असे. 

४. देव-धर्म, रूढी-परंपरा आणि कर्मकांडे यांच्या आहारी न जाणे; पण त्यांच्यापासून पूर्णत: सुटका करून न घेणे हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य त्या काळातील मध्यमवर्गाचे होते. ‘पूर्वजांनी केला असेल विचार काही तरी’ असे मानून किंवा ‘प्रथा-परंपरा पाळल्याने नुकसान तर काही होत नाही ना’ अशी समजूत घालून (किंवा करून घेऊन) साधारणत: निरुपद्रवी भासतील अशा मागील प्रथा पुढे चालवल्या जाणे अगदीच साहजिक पद्धतीने घडत होते. त्यामुळे देवा-धर्माच्या किंवा रूढीपरंपरांच्या विरोधातील बंडखोरीकडे आधी हेटाळणीच्या सुरात, नंतर विस्मयकारकतेने आणि अखेरीस थोड्याशा आपुलकीने पाहिले जात होते. 

५. समाजहितासाठी काम करणाऱ्या मंडळींविषयी त्या मध्यमवर्गाच्या मनात बराचसा आदर असे. आध्यात्मिक क्षेत्रातील लोक असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा राजकीय चळवळीत भाग घेणारे लोक यांच्याविषयी एक प्रकारचे ममत्व त्या मध्यमवर्गाला वाटत असे. अर्थात तशा प्रकारचे जगणे (म्हणजे अस्थैर्य किंवा अनिश्चितता असलेले) आपल्या मुला-मुलींनी पत्करायची भाषा केली, तर मात्र त्यांना विरोध केला जात असे आणि त्यात आपण दुटप्पी व्यवहार करतो आहोत, असेही त्यांना वाटत नसे. हे अगदीच स्वाभाविक होते, कारण रोजच्या  ओढाताण करावी लागत असेल आणि तसे वाऱ्यावरचे जगणे आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये असे त्यांना वाटत असेल, तर त्याला ‘चूक’ तरी कसे म्हणणार? असो. 

तर मला कळायला लागण्यापूर्वीचा व काही अंशी मला दिसलेल्या मध्यमवर्गाचा गाभा हा असा होता. या मध्यमवर्गाबाबत ‘पांढरपेशा’ हा शब्द थोड्याशा तुच्छतेने वापरला जातो आणि मार्क्सच्या अनुयायांकडून याच मध्यमवर्गाचा उल्लेख ‘बूर्झ्वा’ असा केला जातो, हे मला त्याचदरम्यान कळले होते. पण या मध्यमवर्गाविषयी मला आपुलकी वाटत होती आणि त्यातील काही गोष्टी खटकत असल्या तरी परिस्थितीमुळे पडलेल्या मर्यादा समजून घेता येत होत्या. त्यामुळे माझ्या मनातील मध्यमवर्गाविषयीच्या चित्राचे प्रतिबिंब आठ वर्षांपूर्वी मी साधनातील ‘काणेकरांचा आरसा’ या छोट्या संपादकीय लेखात दाखवले होते. तो छोटा लेख इथे जसाच्या तसा देतो, म्हणजे मग मला पुढील बदलांचे चित्र रेखाटणे सोपे जाईल.  

- दोन –
वरील संपादकीय टिपण या लेखात उद्‌धृत करताना मी तितकासा खूष नाही. पण तरीही ते केले आहे, याचे कारण मराठी साहित्य-समीक्षक रा.ग.जाधव यांनी ‘काणेकरांचा आरसा’ प्रसिद्ध झाला तेव्हा आणि नंतरही दोन-तीन वेळा त्यातील विवेचन-विश्लेषणाचा उल्लेख विशेषत्वाने केला होता. म्हणजे पूर्वीच्या मध्यमवर्गाविषयीची त्यातील निरीक्षणे व निष्कर्ष महत्त्वाची आहेत, हे त्यांनी सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर, माझ्या काळातील म्हणजे गेल्या दोन दशकांतील बदलत्या मध्यमवर्गाविषयी विचार करता, काही तुकडेच तेवढेच मी सांगू शकणार आहे. 

१. पूर्वीच्या मध्यमवर्गाचा गाभा हा होता की, सर्वांची आर्थिक परिस्थिती साधारणत: सारखी होती. गेल्या दोन दशकांत होत गेलेले बदल पाहता, आर्थिक स्थितीत बरीच जास्त तफावत असलेले लोक मध्यमवर्गात गणले जातात. म्हणजे वार्षिक तीन-चार लाख रुपये मिळकत असलेले मध्यमवर्गीय आणि वार्षिक वीस-पंचवीस लाख रुपये उत्पन्न असलेलेही मध्यमवर्गीयच! पूर्वीच्या आणि आताच्या मध्यमवर्गातला दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे पूर्वी ‘सरकारी नोकरी करणारे ते मध्यमवर्गीय’, असे सर्वसाधारण चित्र होते; आता तसे नाही. किंबहुना, एकूण मध्यमवर्गामध्ये सरकारी नोकरी करणाऱ्यांपेक्षा खासगी नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण कदाचित जास्त असावे आणि उद्योग-व्यापार करणारे लोकही आता मध्यमवर्गात गणले जातात, मोठमोठ्या पदांवरील सरकारी अधिकारीही मध्यमवर्गातच येतात. 

तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे, पूर्वी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दोन पिढ्यांतील आर्थिक स्थितीत थोडे बदल होत होते. आता एकाच पिढीत व दोन-पाच वर्षांच्या अंतरानेही मोठे बदल होत असल्याचे सर्रास पाहायला मिळते. परिणामी, मध्यमवर्गात बरेच स्तरीकरण झाले आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी कनिष्ठ मध्यम, मध्यम मध्यम व उच्च मध्यम ही वर्गवारी होत होती; हल्ली तीपण फारशी ऐकायला मिळत नाही. कारण कनिष्ठ गटातील मध्यमवर्गीयाला उच्च गटातील मध्यमवर्गीय होण्यासाठी फार अवधी लागतोच असे नाही. 

२. मध्यमवर्गीय लोकांना जोडणारा ‘शिक्षण’ हा प्रमुख घटक पूर्वी होता; आताही तो आहे, पण तो काच आवळणारा राहिलेला नाही. म्हणजे खूप मोठे शिक्षण घेतलेला माणूस मोठ्या नोकरी-धंद्यात असेलच असे नाही आणि तुलनेने कमी शिक्षण असलेला माणूसही खूप मोठ्या पदावर किंवा व्यवसायात असणे, सर्रास पाहायला मिळते. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले आणि खासगी नोकऱ्यांची धर-सोड करण्याचे प्रमाणही बरेच जास्त असले, तरी चांगले शिक्षण असेल वा कौशल्य असेल तर ‘आर्थिक असुरक्षितता’ हा मुद्दा पूर्वीइतका तीव्र राहिलेला नाही; पण शिक्षणातील व त्यामुळे मिळणाऱ्या नोकरी-व्यवसायातील संधीचा  परिणाम म्हणून निर्माण होणारे स्तरीकरण बरेच जास्त आहे. 

कनिष्ठ मध्यम वर्गातील उदाहरण पाहू. खेडेगावातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक असलेले पती-पत्नी. त्यांच्या घरात ५० हजारांपेक्षा अधिक मासिक उत्पन्न येते आणि ते तालुक्याच्या ठिकाणी राहतात, त्यांचे एक कल्चर तयार झालेले आहे. त्याचबरोबर शहरात राहून पती-पत्नी खासगी/सरकारी नोकरी करून ५० हजारांपेक्षा अधिक मासिक रक्कम मिळवतात, तेव्हा त्यांचेही एक कल्चर तयार झालेले आहे. पण या दोन प्रकारच्या कुटुंबांमध्ये सांस्कृतिक पातळीवर बरीच तफावत दिसते. 

मध्यम-मध्यम वर्गाबाबत उदाहरण घेतले तर... महिना लाखभर रुपये मिळवणारा व्यावसायिक व तेवढीच मिळकत असणारा नोकरदार यांच्यातील सांस्कृतिक पर्यावरणही खूपच वेगळे असते. उच्च-मध्यमवर्गाबाबत तर असे अंतर्गत स्तरीकरण व सांस्कृतिक पर्यावरणातील भिन्नता इतकी जास्त असते की, त्यांचे काही गटांत विभाजन करताच येत नाही. 

३. या तीनही प्रकारच्या मध्यमवर्गातील एक समान धागा हा आहे की, सर्वांना आपल्या मुला-मुलींना इंग्रजी माध्यमांतून शिकवायचे आहे. इंग्रजी माध्यम हीच यशाची गुरुकिल्ली आहे, याबाबत त्यांच्या मनात शंका राहिलेली नाही. परिणामी, इंग्रजी माध्यमातून तयार झालेली मुले- मुली आपली तथाकथित ‘संस्कृती’ अजिबात स्वीकारत नाहीत हे दिसत असून आणि त्याबाबत काहीशी खंत मनात असूनही, सर्व मध्यमवर्गीय कुटुंबांनी त्याचा स्वीकार केला आहे. नवी पिढी पूर्वजांचा तर सोडाच, आपलाही वारसा सांगण्यास तयार नसेल; किंबहुना तशी ओळखही त्यांना नसेल याची पुरेपूर जाणीव असूनही ‘हेच अपरिहार्य आहे’ याविषयी त्यांच्या पालकांच्या मनात शंका राहिलेली नाही. 

म्हणजे पूर्वी ‘मध्यमवर्गीय संस्कृती’ म्हणून काही मांडणी केली जात होती आणि ढोबळमानाने ती मान्य केली जात होती, पण आता तसे म्हणता येणे अवघड झाले आहे. त्यामुळे ‘आजच्या मध्यमवर्गाची संस्कृती’ असा शब्दप्रयोग कोणी केला, तर निदान माझ्या तरी मन:चक्षूंसमोर कोणतेच चित्र उभे राहत नाही. 

४. आताच्या मध्यमवर्गात एक किंवा दोन मुले/मुली हे चित्र सर्वत्र आहे. ‘एक मूल’ हेसुद्धा आता स्वेच्छेने स्वीकारले जात आहे. कुटुंब विभक्त होण्याची सुरुवात पाव शतकापूर्वीच खेड्यात झाली होती आणि शहरांत तर त्याआधीपासून. त्यामुळे आताच्या मध्यमवर्गीय कुटुंबात घरातील वृद्ध माणसे, आई-वडील/सासू-सासरे यांचे स्थान मध्यवर्ती राहिलेले नाही. एवढेच नाही तर, आपली ही मुले (एक किंवा दोन) आपल्याजवळ राहणार नाहीत, ही पण मानसिक तयारी त्यांची झालेली आहे. (या पार्श्वभूमीवर, आपल्या नातलगांची मुले शिक्षणासाठी आपल्या घरी ठेवणे हा प्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण इतके झाले आहे की, तशी गरजही आता राहिलेली नाही) 

आपल्यावरील माता-पित्याची जबाबदारी कमी करणे आणि आपल्या मुला-मुलींवर आपली जबाबदारी न टाकणे, हे आताच्या मध्यमवर्गाने जवळपास स्वीकारलेले आहे. बाहेरून पाहणाऱ्यांना हा स्वीकार जेवढा त्रासदायक वाटतो तेवढा त्यांना स्वत:लाही वाटत नाही, असेही घडू लागले आहे. 

५. आताचा मध्यमवर्ग तंत्रज्ञानाच्या ‘नेटवर्क’मध्ये अडकला आहे, हे तर आता सर्वांनाच मान्य आहे. या नेटवर्कने जीवन किती सुसह्य केले आहे, प्रगतीच्या शक्यता किती प्रचंड प्रमाणात निर्माण करून वास्तवात आणल्या आहेत, याबाबतही दुमत होण्याचे कारण नाही. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे आणि त्याचे मानसिक व शारीरिक परिणाम होणे हेही ओघानेच आले आहे. तंत्रज्ञानातून स्वस्थता मिळते ही जशी एक बाजू आहे, तशीच अस्वस्थता वाढते ही दुसरी बाजू आहे. एका बाजूला प्रचंड ‘कनेक्टिव्हिटी’तून येणारी सुरक्षितता आहे, पण दुसऱ्या बाजूने जवळ सर्व काही असून वा गर्दीत असूनही एकाकीपणाचा अनुभव वाढीस लागत आहे. वाडासंस्कृती ते फ्लॅटसंस्कृती या बदलांमध्ये व्यक्तिमत्त्वविकासाची वाढ होऊन कुटुंबाच्या भौतिक सुखात वृद्धी झाली आहे, पण त्याचबरोबर शेजारधर्मही हरवल्याने आलेले साचलेपण किंवा हरवलेपण त्यांच्या असमाधानात भर टाकत आहे.

- तीन –
पूर्वीच्या व आताच्या मध्यमवर्गाविषयी प्रत्येकी पाच वैशिष्ट्ये/निरीक्षणे मांडताना मी कुटुंबकेंद्री दृष्टिकोनातून वरील विवेचन केले आहे. कारण आपले कुटुंब हेच केंद्र मानणे आणि जगाच्या व्यवहारसागरात आपली बोट वल्हवीत दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जाणे, हे कोणत्याही काळातील मध्यमवर्गाचे मध्यवर्ती तत्त्व राहिले आहे. अर्थातच, या मध्यमवर्गातील बंडखोरांनीच प्रगतीची बहुतांश बीजे पेरलेली असतात, नव्या साहसी वाटा  धुंडाळलेल्या असतात आणि अनेक शिड्या चढून मोठमोठी शिखरे काबीज केलेली असतात. इथे त्याच्या खोलात जायला नको, कारण मध्यमवर्गातून पुढे आलेल्या बंडखोरांविषयी किंवा ती बंधने झुगारून देणाऱ्यांविषयी हा लेख अपेक्षित नाही. आता आपण समाजकेंद्री दृष्टिकोनातून बदलत्या मध्यमवर्गाकडे पाहिल्यावर काय निरीक्षणे येतात त्याचा थोडा विचार करू. 

१. सर्वप्रथम एक निरीक्षण अचंबित करून जाते आणि अभिमान वाटायला लागतो, तो प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग वाढला याचे. वेगवेगळे अहवाल व सर्व्हे वेगवेगळी आकडेवारी देतात आणि त्यात तफावत व मतभिन्नता असते, हे मान्य केले तरी; पावशतकापूर्वी दहा टक्क्यांच्या आसपास असलेला या देशातील मध्यमवर्ग आता ४० टक्क्यांच्या आसपास आहे, या हिशेबाने मध्यमवर्ग चौपट झाला. पण दुसरा हिशोब अधिक आनंददायक आहे. म्हणजे १९९० मध्ये देशाची लोकसंख्या ९० कोटी असताना, मध्यमवर्गाची संख्या दहा-बारा कोटी होती आणि २०१४ च्या अखेरीस १३५ कोटी लोकसंख्या असताना पन्नास-पंचावन्न कोटी लोक मध्यमवर्गात असतील, तर गेल्या पावशतकात जवळपास ४० कोटी लोकांची भर मध्यमवर्गात पडली आहे. 

याचाच अर्थ, लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणानुसार गरिबी/ बेरोजगारी वाढली असली तरी तळातील किंवा गरीब वर्गातील लोकांना मध्यमवर्गात जाण्याची बरीच मोठी संधी मिळालेली आहे, हे मान्य करावे लागते. आणि मग ‘उदारीकरण पर्वात, गरीब अधिक गरीब होत आहेत तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत’ हे विधान वस्तुस्थितीला धरून नाही, असे म्हटले पाहिजे. 

२. बदलत्या मध्यमवर्गाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले पाहिजे. ते म्हणजे, ज्याच्याकडे कोणत्या तरी प्रकारचे भांडवल आहे त्याला मध्यमवर्गीय होण्याची संधी आता आहे आणि काही कोटी लोकांनी तिचा लाभ घेतला आहे. कोणत्याही प्रकारचे पण उत्तम शिक्षण वा कौशल्य असेल, तर आजच्या काळात त्या व्यक्तीला मध्यमवर्गीय होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जात, धर्म, भाषा, प्रदेश, लिंग ही प्रमुख बंधने गुणवत्ता व कौशल्य असणाऱ्यांच्या आड येत नाहीत, हा या काळाचा सांगावा आहे. बघा ना, आज मध्यमवर्गात आलेली किती मुले/मुली अतिशय गरीब कुटुंबांतून आलेली आहेत. तीसुद्धा स्वत:च्या बळावर आणि अतिशय कमी काळात, सरकारी क्षेत्रात तसेच खासगी क्षेत्रातही! ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ हे आपल्या परंपरेने सांगितले, ‘विद्या हे बळ आहे’ हे आपल्या समाजधुरीणांनी सांगितले; पण ‘ज्ञान व कौशल्य हे भांडवल आहे’ हा विद्यमान काळाचा संदेश आहे. 

पण ज्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे भांडवल नाही, त्यांना मात्र आजच्या या वेगवान व बदलत्या जगातही विशेष संधी नाही. त्यामुळे, तळागाळातील समूहांना शिक्षण व कौशल्ये प्रदान करणे हे या देशासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. आणि म्हणून गरिबांना मध्यमवर्गात पोचविण्यासाठी (प्राथमिक गरजा व पायाभूत सुविधा देऊन) प्रशस्त वाटा तयार करणे, या दिशेनेच सर्व शक्ती पणाला लावण्यासाठी प्राधान्य असले पाहिजे. 

३. पूर्वीचा मध्यमवर्ग अधिक कुटुंबकेंद्री होता आणि कमी समाजकेंद्री होता, हे निरीक्षण जर खरे मानले तर आता परिस्थिती खूपच संमिश्र आहे असे दिसते. कारण आताचा मध्यमवर्ग अधिक व्यक्तिकेंद्री किंवा आत्मकेंद्री होत चालल्याचे दिसते. त्याचबरोबर व्यक्तीच्या विकासाला आता अधिक वाव आहे, जाचक बंधने (विशेषत: कुटुंबातून येणारी) तुटली आहेत, हे स्वागतार्हच आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून नीतिमूल्यांचा आग्रह कमी झालेला असावा किंवा व्यावसायिकता ही नैतिकतेच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसते. खरे तर मध्यमवर्गानेच सर्व समाजघटकांसाठी नीती-अनीतीच्या कल्पना निर्माण केलेल्या होत्या, किमान नैतिकतेचा ठेका (ओझे?) मध्यमवर्गानेच घेतला होता. 

त्यातील काही ओझे उतरवणे योग्य/आवश्यकच होते. उदा.- स्त्रियांना मिळत गेलेले स्वातंत्र्य व अधिकार आणि त्यातून निर्माण झालेले कायदे, हे फार चांगले झाले. पण नैतिकतेचे काही ओझे उतरवणे किंवा चक्क फेकून देणे हे फारच नुकसानकारक आहे. उदा.भ्रष्टाचाराकडे काणाडोळा, छोट्या भ्रष्टाचाराचे काही वाटेनासे होणे, संधी मिळाली तर भ्रष्टाचारात सामील व्हायला तयार असणे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांनाही त्याची लाज न वाटणे... 

४. ‘मध्यमवर्ग’ क्रांतीचा प्रतिरोधक असतो अशी मांडणी मार्क्सवाद्यांची असते आणि ती खरीच आहे, पण लोकशाहीत मात्र मध्यमवर्ग हा चळवळी-आंदोलने यांचा  वाहक असतो, सनदशीर मार्गाने लढणाऱ्यांना बळ देणारा असतो, राज्यकर्त्या वर्गावर दबाव ठेवणारा असतो. मध्यमवर्ग सहनशील असतो, अनेक चुका पोटात घालणारा असतो, काही बाबतीत क्षमाशील असतो हे सर्व खरे असले तरी; कुठे अति होत असेल तर ते नापसंत असल्याचे वेगवेगळ्या प्रकारे सूचित करीत असतो. कारण, स्वत:ची अशी एक सौजन्यशील वृत्ती जोपासून, सामंजस्याने होत असलेल्या बदलांचा तो समर्थक असतो. 

त्यामुळे मध्यम वर्गाकडे एक प्रकारचे आत्मबल व नैतिक बल आलेले असते, पण बदलत्या मध्यमवर्गात ही दोनही सामर्थ्यस्थळं कमी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. मतलबापासून दूर न राहणे, भाऊगर्दीत सामील व्हायला सुरुवात करणे, मोहाला बळी पडणे हे फारच वेगाने घडत असल्याने ‘मध्यमवर्ग’ त्यांच्याविषयी इतरांना वाटत असलेला आदर व सहानुभूती गमावून बसत आहे. मध्यमवर्गाने तत्त्वविचारापासून दूर जाणे, चारित्र्य व नैतिक वर्तनाबाबत आग्रही न राहणे, चळवळी-आंदोलने यांच्यापासून अंतर राखू लागणे असे गेल्या दोन दशकांत घडत आले आहे. याचे एक कारण परिस्थिती बदलत गेली हे आहे, पण दुसरे कारण बदलत गेलेल्या परिस्थितीचे आकलन करून घेण्यात गेल्या दोन दशकांतील समाजधुरीण कमी पडले हे आहे. 

म्हणजे उदारीकरण पर्वाचे आकलन करून घेण्यात व त्याप्रमाणे मध्यमवर्गाला दिशा दाखवण्यात या देशातील सामाजिक व सांस्कृतिक नेतृत्व कमी पडले आहे, आणि म्हणूनच आधुनिक अध्यात्माचा सुळसुळाट झाला आहे आणि मध्यमवर्गाने तिकडे रांगा लावल्या आहेत. 

५. या सर्वांचा एकत्रित परिणाम काय, तर आजच्या मध्यमवर्गाविषयी ठोस भाष्य करता येणे अशक्य झाले आहे, कारण तो एकसंध नाही. आजच्या मध्यमवर्गाचे म्हणून काही तत्त्वज्ञान सांगता येते का, तर तसेही दिसत नाही. आजच्या मध्यमवर्गाचे क्लासिकफिकेशनही करता येत नाही आणि या मध्यमवर्गावर ‘अधोगतीला चाललाय’ असा शिक्काही मारता येत नाही. पण भौतिक प्रगती बरीच होत असली तरी वैचारिक व नैतिक बाबतीत मध्यमवर्गाची स्थिती जेवढी उंचावली जायला हवी तेवढी ती होत नाही. शिवाय, या मध्यमवर्गाचे जीवन चित्रण केले तर त्यांचे आयुष्य बरेच रंगीबेरंगी व भरजरी असल्याचे वरकरणी दिसते, पण आतून अनेक चिंता त्याला सतावत असतात. उदा. तणावग्रस्त दिनक्रमामुळे बिघडलेले आरोग्य, कौटुंबिक ताणतणाव, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या स्पर्धेमुळे येत असलेले दडपण, सभोवताली होत असलेल्या बदलांनी भांबावून जाणे आणि जीवघेण्या स्पर्धेत आपण मागे पडत आहोत की काय ही भीती सतत मानगुटीवर असणे. 

एवढेच नाही तर, मिळवलेल्या संपत्तीचा सुखोपभोग घेण्यासाठी सोय किंवा उसंत नसणे ही समस्या वरवर पाहिली तर लहान, पण प्रत्यक्षात बरीच मोठी आहे. असो, तर पाव शतकापूर्वीच्या मध्यमवर्गाचे प्रतिबिंब काणेकरांच्या लघुनिबंधात म्हणजे आरशात दिसत होते. पण तसा विचार केला तर मला तरी आजच्या मध्यमवर्गाचे प्रतिबिंब कशातच दिसत नाही. आजचा मध्यमवर्ग म्हटले की, मला कॅलिडोस्कोप आठवतो. अनेक तुकडे, रंगीबेरंगी तुकडे, चित्रविचित्र आकार आणि तरीही वस्तुस्थिती स्पष्ट होत नाही असा हा कॅलिडोस्कोप आहे.
 

Tags: मध्यमवर्ग अनंत काणेकर विनोद शिरसाठ लघुनिबंध ते कॅलिडोस्कोप middle class laghu nibandh anant kanekar vinod shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

संपादक, साधना साप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके