डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘रंगाभिनय’ करणाऱ्यांनी स्वतःच्या अशिक्षित पटुत्वावर सगळी भिस्त न ठेवता आपला अभिनय चोख होण्यासाठी त्याला विचारपूर्वक आकार देणे जरुरीचे आहे. या अभिनयाचे मध्यवर्ती अंग म्हणजे बोलणे, म्हणजेच वाचिक अभिनय. श्रीराम लागू लिखित 'वाचिक अभिनय' पुस्तकाच्या श्री. अशोक रा. केळकर यांच्या प्रस्तावनेचे हे पहिले वाक्य. जेमतेम 90/95 पानांच्या या पुस्तकामध्ये डॉक्टरांनी मांडलेला विषय व त्याचे महत्त्व नेमकेपणाने सांगणारे हे वाक्य म्हणजे प्रस्तुत विषयाची ‘यथार्थ प्रस्तावना’ आहे यात शंका नाही.

‘रंगाभिनय’ करणाऱ्यांनी स्वतःच्या अशिक्षित पटुत्वावर सगळी भिस्त न ठेवता आपला अभिनय चोख होण्यासाठी त्याला विचारपूर्वक आकार देणे जरुरीचे आहे. या अभिनयाचे मध्यवर्ती अंग म्हणजे बोलणे, म्हणजेच वाचिक अभिनय. श्रीराम लागू लिखित 'वाचिक अभिनय' पुस्तकाच्या श्री. अशोक रा. केळकर यांच्या प्रस्तावनेचे हे पहिले वाक्य. जेमतेम 90/95 पानांच्या या पुस्तकामध्ये डॉक्टरांनी मांडलेला विषय व त्याचे महत्त्व नेमकेपणाने सांगणारे हे वाक्य म्हणजे प्रस्तुत विषयाची ‘यथार्थ प्रस्तावना’ आहे यात शंका नाही.

तर- 'वाचिक अभिनय' : लेखक श्रीराम लागू...खरे तर लेखक : डॉक्टर श्रीराम लागू असे हवे होते, ‘डॉक्टर’ या उपाधीचा अभिनेते श्रीराम यांनी त्याग केलेला असला तरी ‘वाचिक अभिनय’ या विषयावर अधिकारवाणीने (किंवा अधिकार लेखणीने) लिहिणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू आहेत. तेही नाक, कान, घशाचे तज्ज्ञ- ही गोष्ट वाचकांना कळणे जरुरीचे आहे. म्हणजे मग त्यांनी ज्या 'युक्तीच्या गोष्टी चार' सांगितलेल्या आहेत त्यांना जरा जास्तीचे 'वजन' प्राप्त झाले असते असे उगाच वाटून गेले. कारण या युक्तीच्या चार गोष्टी'-'न धरी शस्त्र करी मी' या उक्तीचा उत्तरार्ध नाहीत. अभिनेते श्रीराम यांनी समर्थपणे- आजतागायत... वयाच्या सत्तरीतही हे ‘वाचिक अभिनया’चे शस्त्र जाणीवपूर्वक आणि अत्यंत परिणामकारकरीत्या आणि प्रभावीपणे पेललेले आहे, त्या मागचे रहस्य डॉक्टर श्रीराम लागू तितक्याच प्रभावीपणे आणि परिणामकारकरीत्या, परंतु अत्यंत सोप्या भाषेत सुलभ पद्धतीने, सामान्य वाचकालादेखील रस वाटेल, अशा पद्धतीने उलगडून दाखवीत आहेत. त्यामुळे लेखक डॉक्टर श्रीराम लागू हवे होते असे वाटले इतकेच. वाचिक अभिनय- ज्याची फक्त नटालाच गरज असते असे नाही. शिक्षक, वकील, नेता, विक्रेता- बोलणे हा व्यवसायाचा अविभाज्य भाग असणाऱ्या सर्व संबंधितांचा खरे तर हा जिव्हाळ्याचा विषय. या विषयावरचे हे पुस्तक म्हणूनच खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे. एका डॉक्टरने अभिनेत्याच्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक म्हणूनच केवळ शास्त्रीय परिभाषेतील निरस, वर्णनपर विवेचन न राहता अतिशय माहितीपूर्ण आणि मनोरंजक अशी मार्गदर्शिका होते. तसे अवसान किंवा अभिनिवेश न आणता... हे महत्त्वाचे! डॉक्टरांच्या रंगभूमीवरच्या प्रदीर्घ- हिमालयाएवढ्या समृद्ध आणि उत्तुंग कारकिर्दीची सावली या पुस्तकावर सर्वत्र आहे.

वाचिक अभिनयाचे तंत्र आणि मंत्र... शिवाय सरावासाठी गृहपाठ (काही उतारे) असे या पुस्तकाचे ढोबळ भाग आहेत. खऱ्याखुऱ्या, अनुभवसिद्ध व्यासंगामुळे येणारा नेमकेपणा जागोजागी जाणवतो. त्यामुळेच कदाचित पुस्तकाचा आकार आटोपशीर झालेला आहे. परंतु वाचून संपताक्षणीच...हे एकदा वाचून भागणार नाही. हे नुसते वाचून चालणार नाही असे वाटते. याचे कारण हा विषय मोठा आहे. हे पुस्तक छोटे असले तरी असे वाचकाला वाटणे हेच या लिखाणाचे यश आहे. ‘वाचिक अभिनय!’ रंगमंचावरचा नट प्रेक्षागृहातल्या सर्व प्रेक्षकांना नीट दिसत असतोच असे नाही. पहिल्या रांगेतला प्रेक्षक, पंचविसाव्या रांगेतला प्रेक्षक, बाल्कनीमधला प्रेक्षक नटाला सारख्याच तपशिलामध्ये पाहू शकत नाही. परंतु ऐकू शकतो याचे कारण नटाचा वाचिक अभिनय. या दृकश्राव्य माध्यमामध्ये म्हणूनच नटाच्या हातात असलेले हे एकच खरोखर शस्त्र असते जे त्याच्या असण्याला आकार आणि एक परिमाण देऊ शकते. म्हणून वाणीवर प्रभुत्व असणारे नट रंगभूमीवरचे राजे मानले जातात.

अर्थपूर्ण, आशयसंपन्न बोलणे किती आवश्यक आहे हे चांगल्या नटाला सांगावे लागत नाही. परंतु प्रसंगी अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न बोलायचे म्हणजे नेमके कसे बोलायचे हे सांगावे लागते याचे कारण आपल्याकडे नटांचा व्यासंग कमी पडतो. कधी कधी तो नसतोच. हौशी- प्रायोगिक नटमंडळी तर बोलून-चातून ‘हौशी’च असतात. क्वचित वाचिक अभिनयाच्या क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक काही मेहनत घेताना ही मंडळी दिसतात. अन्यथा जेव्हा दिग्दर्शक 'मला असा असा अर्थ अभिप्रेत आहे.' असे नटाला सांगतो आणि नट 'मी तेच म्हणतोय' असे म्हणतो त्या वेळी ही अर्थाची ओढाताण नाटकांच्या तालमीमध्ये अनेकदा दिसली नसती. असो..... 

व्यावसायिक नटांच्या बाबतीत तर (सन्माननीय अपवाद वगळता-असल्यास) 'बडे मिया सुभानल्ला!' अशीच परिस्थिती दिसते. अभिनय हा आपला व्यवसाय आहे, तर व्यवसायाच्या गरजा कोणत्या,  या व्यवसायात आपली शस्त्रे कोणती, अस्त्रे कोणती, याचे भान त्यांना असते काय? अगदी साधा केशकर्तनाचा व्यवसाय करणारा कारागीर सकाळी लवकर उठेल, दुकान स्वच्छ करेल, आरसा स्वच्छ करेल, हत्यारांना धार लावेल. ग्राहकाचे आसन आरामशीर आहे याची खातरजमा करील. अशी पूर्वतयारी किंवा तयारी व्यावसायिक नट आपल्या व्यवसायाची करतो का? तो आपल्या शरीराची काळजी घेतो का? आपल्या चेहऱ्याची... दिसण्याची फिकीर करतो का? आपल्या वाणीची... बोलण्याधी परिणामकारकता कायम राहावी यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करतो का? का त्याची भिस्त श्री. केळकरांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिल्याप्रमाणे स्वतःच्या या ‘अशिक्षित पटुत्वावर’च आहे? 'वाचिक अभिनय' हे पुस्तक वाचल्यावर या संदर्भात मनात आलेले हे विचार डॉक्टरांनी मात्र अत्यंत हळुवारपणे एखाद्या निष्णात सर्जनच्या कुशलतेने या विषयाची उकल करून दाखविली आहे. वाचिक अभिनयाचे तंत्र समजावून देताना आपला आवाज म्हणजे काय, तो कसा निर्माण होतो, त्याच्या निर्मितीची प्रक्रिया, त्या प्रक्रियेत सामील असणारे अवयव, उदा. स्वरयंत्र, श्वसनसंस्था... यांची संपूर्ण परंतु सोप्या भाषेत माहिती देऊन, आवाजाचा शब्द कसा होतो, त्याची प्रक्रिया अत्यंत विस्ताराने सांगितली आहे . या प्रत्येक टप्प्यावर शरीराच्या यंत्रणेचा विवक्षित भाग उदा. श्वसनसंस्था, स्वरयंत्रणा, ओठ, जीभ, दात, जबडा इत्यादींना कार्यरत करणारे व्यायाम नेमकेपणाने सांगितलेले आहेत. हे व्यायाम सातत्याने आणि दीर्घ काळ करणे जरुरीचे आहे, हेही डॉक्टर आवर्जून सांगतात. हा झाला तंत्राचा भाग.

मुळामध्ये स्वच्छ, चांगले बोलायचे आहे. ... पण कशासाठी? तर जे म्हणायचे आहे तो आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे आशयसंपन्न बोलण्याविषयी पुस्तकात येणारे विवेचनही तितकेच महत्त्वाचे आहे. तंत्राला व्यायामांची जोड दिली की तंत्रावर पकड येईल. परंतु शैलीदार बोलण्याला व्यासंगाची जोड हवी. त्याकरता आशयाचे स्वरूप नीट समजावून घेणे जरुरीचे आहे.. नटाने आपल्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण खोलवर अभ्यास करणे जरुरीचे आहे. कारण त्याने उच्चारलेला शब्द अखेर त्या व्यक्तिरेखेच्याच संदर्भात नव्हे, तर संपूर्ण नाटकाच्या आशयाला जाऊन भिडतो याचे भान नटाला असणे आवश्यक आहे. म्हणून ‘अर्थपूर्ण’ बोलणे खूपच महत्त्वाचे आहे . या संदर्भात  ‘‘शब्द म्हणजे अनेक तोंडे असलेल्या-आशय भरलेल्या अत्तरांच्या कुप्यासारख्या कुप्या असतात. जो आशय व्यक्त करायचा आहे नेमके तेच तोंड उघडून शब्द उच्चारला गेला पाहिजे. तरच हवा तो आशय व्यक्त होईल.

कुपीचे योग्य ते तोंड उघडून हव्या त्या आशयाचा सुगंध पसरवण्याचा प्रयत्न व्हायला हवा.’’ हे डॉक्टरांचे विवेचन म्हणजे नेमकेपणाने केलेले अचूक मार्गदर्शन आहे. आशयाच्या अभिव्यक्तीचेही एक तंत्र आहे. त्याचीही चर्चा डॉक्टरांनी येथे केलेली आहे. 'अर्थपूर्ण' बोलणे साधण्याकरिता वाचन-मनन-चिंतन-निरीक्षण-विश्लेषण इत्यादी गोष्टींबरोबरच बोलताना व्यक्त होणारा विचार अथवा भावना नेमकी कोणत्या शब्दावर वा अक्षरावर जोर देऊन योग्य पद्धतीने पोहोचविता येईल याचा अभ्यास, तसेच बोलताना पूर्णविरामाचा वापर करणे अशा तांत्रिक गोष्टींची सोदाहरण चर्चा केली आहे. ‘वाचिक अभिनया’च्या संदर्भात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे न बोलता किंवा बोलत नसताना ‘ऐकणे’ या गोष्टीचे अनन्यसाधारण महत्त्व डॉक्टर सांगायला विसरत नाहीत, कारण संवादाची सुरुवात ऐकण्यातून होते. त्यामुळे अभिजात संगीताच्या श्रवणाचेही वाचिक अभिनयाच्या साधनेमध्ये खूप मोलाचे स्थान आहे.

वाचिक अभिनयात डॉक्टर शेवटी म्हणतात त्याप्रमाणे 'केवळ पुस्तके वाचून वाचिक अभिनय-साधना हस्तगत होणार नाही. पुस्तके फक्त दिशा दाखवतील... वाट दाखवतील...' हेदेखील काही कमी महत्त्वाचे नाही. किंबहुना अशी सुस्पष्ट व निश्चित दिशा दाखविणारे असे सर्वांगसुंदर पुस्तक उपलब्ध करून दिले याकरता मराठी नटांनी, ‘वाचिक अभिनया’च्या साधकांनी श्रीराम लागूंचे आभार मानावेत, का त्यांना या विषयात लक्ष घालायला प्रवृत्त करून बोलते करणाऱ्या कै. के. नारायण काळे यांचे आभार मानावेत, का हे पुस्तक त्यांच्याकडून हट्टाने लिहून घेणाऱ्या अतुल पेठे यांना धन्यवाद द्यावेत हे समजत नाही. एक गोष्ट निश्चित समजते आहे की 'वाचिक अभिनय' या विषयावरचे हे अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त कदाचित पहिलेच असे पुस्तक आहे व श्रीराम लागू यांची ही मराठी नाट्यकलाकारांना एक अपूर्व अशी भेट आहे यात शंका नाही.

----------

वाचिक अभिनय

लेखक : डॉ. श्रीराम लागू 
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने 96 : किंमत : 60 रुपये

Tags: अभिनेत्यांसाठी अपूर्व भेट श्रीराम लागू ‘वाचिक अभिनय’ पुस्तक परिचय precious gift for actors shriram lagu ‘wachik abhinay’ book review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके