डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुलांसाठी वाचनीय संग्रह : 'मुलांचे बायबल'

फादरनी 'मुलांचे बायबल' देऊन ख्रिस्ती, अख्रिस्ती मुलांच्या वाचनविश्वात खूप अनोखी, सुंदर भर टाकली आहेच; पण माझ्यासारख्या मोठ्यांसाठीही कुतूहल शमवणारी मेजवानी मांडली आहे. मनुष्य स्वभावाचे अतिशय सनातन शाश्वत अनेक नमुने, मानवी संबंधातील वेगवेगळे भावस्तर 'मुलांचे बायबल' मधील कथांत सुचित्रित, स्पष्ट, दर्शित झाले आणि त्यामुळेच समस्त मनुष्यमात्राच्या ठोस मुळातल्या प्रवृत्ती धर्मकालसापेक्ष नाहीत हे लक्षात येते, पटते. 

साहित्य, वाङ्मय हा मोठाच मौल्यवान सेतू! फादर दिब्रिटोंच्या 'मुलांचे बायबल' ने हे छान सिद्ध केले आहे. अन् अगदी सुयोग्य कालात हे पुस्तक समाजापुढे आले आहे. जगाचा परीघ आक्रसतोय. माणसामाणसांतलं अंतर विरघळतंय. आजच्या मुलांना पुढच्या काळात विभिन्न धर्मसंस्कृतिभेद वजा आगळ्या, एकवटल्या- नव्या वातावरणात जगायचे आहे. म्हणून परस्पर परिचयच नव्हे तर समंजस सहिष्णु संबंध, गाढ स्नेहबंधही अति आवश्यक! त्यासाठी हे पुस्तक मला मजबूत आधार वाटते आहे. 

कारण गेली कित्येक वर्षे मी मुलांसाठी कथाकथन करते. मनोरंजनाबरोबरच मुलांना नवी माहिती मिळावी असा माझा प्रयत्न! अहिंदू मुलांना पुराण-धर्मग्रंथातल्या बोधपर गोष्टी सांगते. त्यांना त्या आवडतात. त्यातल्या तत्त्वांचे आचरण करावेसे वाटते. ह्याच दृष्टिकोनाने बायबलमधल्या गोष्टी अख्रिस्ती मुलांना सांगायचे ठरवले. बायबलचा जुना-नवा करार खुपदा चाळला. पण क्लिष्ट भाषा, अनोळखी संदर्भाची गुंतागुंत, त्यामुळे कथाकथनात मला बायबलमधले कथाभाग आणणे जमेना. दहाएक वर्षांपूर्वी फादर फ्रान्सिस दिब्रिटोंशी ओळख झाली. व म्हटले बायबलमधले काही कथाभाग- प्रसंग सांगा ना, त्यावर कथा वेतीन किंवा तुम्हीच बायबलमधल्या गोष्टी लिहा. इतरांना बायबलचा परिचय पण होईल आणि आता....

फादरनी 'मुलांचे बायबल' देऊन ख्रिस्ती, अख्रिस्ती मुलांच्या वाचनविश्वात खूप अनोखी, सुंदर भर टाकली आहेच; पण माझ्यासारख्या मोठ्यांसाठीही कुतूहल शमवणारी मेजवानी मांडली आहे. मनुष्य स्वभावाचे अतिशय सनातन शाश्वत अनेक नमुने, मानवी संबंधातील वेगवेगळे भावस्तर 'मुलांचे बायबल' मधील कथांत सुचित्रित, स्पष्ट, दर्शित झाले आणि त्यामुळेच समस्त मनुष्यमात्राच्या ठोस मुळातल्या प्रवृत्ती धर्मकालसापेक्ष नाहीत हे लक्षात येते, पटते. 

उदा. भावाभावांतील मत्सर, स्वार्थ साधण्यासाठी केलेले कपट, पण प्रेम आणि क्षमाशीलतासुद्धा. वेगळेपणामुळे माणसांनी माणसांचा छळ करणे, मूठभरांनी शौर्य-निष्ठेने प्रचंड सेनेला, बलाढ्य शत्रूला जिंकणे, पोटच्या पोरांत, आपल्या अपत्यांत, आईनेच केलेला पक्षपात, मित्रप्रेम, विश्वासघात, चातुर्य, शहाणपणा, माणुसकी, पाप करणे, त्याचा पश्चात्ताप होणे, अन्यायाचा बदला घेणे, परमेश्वरश्रद्धा व त्यापोटी स्वतःच्या मुलाचाही बळी देण्याच्या कसोटीला उतरणे, शत्रूपासून आपल्या समाजाचा बचाव करण्याची सामुदायिक वृत्ती, प्रेमासाठी कष्ट उपसणे इत्यादी...

दिब्रिटोंची भाषाशैली तर आजच्या भेसळ मराठीला अपवाद! फादर स्टीफनने कौतुकलेल्या माय मराठीशी नाते जोडणारी, खूप सुबोध, तरीही सुंदर. कमालीच्या कलाकुसरीची, पण पारदर्शक. एखाद्या खळखळ, शुभ्रस्फटिक झऱ्यासारखा वाहता ओघ तिच्यात आहे. 'दाबीद आणि सनातन' यांची जोडगोळी म्हणजे डावे-उजवे डोळेच.. अतिशय अर्थवाही समर्पक उपमा वारंवार वाचनात येतात. 'तुमचे चुडे फुटले, 'माझ्या गोवऱ्या स्मशानात गेल्या,' सारखी वाक्ये आली की, वाटते अरे हे तर तद्दन आमचेच. 

यज्ञ-गारद्यांचे उल्लेख तर सामीप्याची पुढची पायरी गाठतात, 'जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत.' या ओळी 'मुलांचे बायबल'शी आम्हा हिंदूंचा दुरावाच उरू देत नाही. न् खरंच निखळ सुसंवाद साधतात. शिलाजितराळ-डांबर लिपणासाठी वापरल्याची माहिती येते, न् प्राचीन विज्ञानाची ओळख होते. 

'मुलांचे बायबल 'मध्ये फादर फ्रान्सिसने छान सूत्र ठेवले आहे. पण एकदोनदा थोडी उलटापालट झाली आहे. त्यामुळे मुलांच्या व अख्रिस्ती वाचकांच्या मनात गोंधळ उडणार. आशयाच्या दृष्टीने 6 पूर्वी 5 व 11 आधी, 9 नंतर यायला हव्या होत्या. म्हणजे बोसेफाच्या आधी याकोबाची, तसेच मत्सरी राजाच्या आधी दावीद गोलायथची गोष्ट! 

चित्र, मुद्रण, अक्षर आकार या दृष्टींनी पुस्तक देखणे, सुबक, आकर्षक! ह्यास्तव प्रकाशकांचे अभिनंदन. एक फार चांगला उपक्रम फादर दिब्रिटो, नम्रता मुळे ह्या लेखक, प्रकाशकांनी मूर्त करून वाचकांहाती दिला आहे. मला तर हे फारच उदात्त कार्य वाटते आहे. एकात्मतेच्या वाटेवर टाकलेले दमदार पाऊल भासते आहे. मी काही मुलांना, मोठ्या माणसांना 'मुलांचे बायबल' वाचायला दिले. त्यांचीही प्रतिक्रिया काहींशी अशीच होती

मुलांचे बायबल
लेखक : फादर दिब्रिटो 
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, वसई. 
किंमत : 30 रुपये

Tags: साहित्य परिचय साहित्य फादर फ्रान्सिस दिब्रितो मुलांचे बायबल Children's Bible Bible Writings Dibrito Father Fransis Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके