डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उमरावाच्या मनात एक कल्पना आली. ‘‘अरे, हे वास्तविक त्याचं शिकायचं वय आहे. आपण असं करूया, तू तुझ्या मुलाला माझ्याबरोबर पाठव. मी त्याच्या साऱ्या शिक्षणाचा खर्च करीन. माझा मुलगा ज्या चांगल्या शाळा-कॉलेजात जाईल, त्याच शाळा-कॉलेजात मी तुझ्या मुलालाही घालीन. तो चांगला निघाला तर तुझ्या कुळाचं नाव काढेल. मलाही माझ्या मुलाचा जीव वाचविणाऱ्यासाठी मी काहीतरी केलं याचं समाधान मिळेल.’’

मागे एका स्पेशालिस्ट डॉटरांकडे गेलो होतो. ॲपॉइंटमेंट घेतलेली होती, पण त्या दिवशी डॉक्टरांकडे पेशंट्‌सची बरीच गर्दी होती. त्यामुळे वेळ लागणार होता. अशा ठिकाणी मी बरेच वेळा वाचायला काही ना काही तरी घेऊन जातो. त्या दिवशी नेमकं विसरलो होतो. हरकत नाही,कित्येक वेळा तर मी माणसं न्याहाळण्यातही बराच वेळ घालवू शकतो. (तरुणपणच्या सवयी तशा सहजासहजी जात नाही म्हणतात!) पण रस्त्यावरचे, बागेतले चेहरे पाहणं निराळं आणि पेशंटांना पाहणं निराळं. कारण सर्वच पेशंटच्या चेहऱ्यावर एक वैतागल्याचा, त्रासल्याचा भाव असतो आणि तो फारसा पाहण्यासारखा नसतो. सगळ्या डॉटरांच्या दवाखान्यात असतात तशी तिथेही जुनीपानी, फाटकी, धूळ बसलेली मासिकं कोपऱ्यात ठेवलेली होती. पण मी आधीच छातीच्या रोगाच्या प्रादुर्भावानं आजारी होतो, त्यामुळे त्या ढिगात हात घालण्याचा धीर झाला नाही.

मी रूमच्या भिंतीवर नजर फिरविली. एका भिंतीवर डॉक्ट रांनी एका बोधवाक्याचा स्टिकर लावलेला होता. ‘तुझ्याशी मी सभ्यपणाने वागतो याचं कारण तू सभ्य आहेस हे नाही, तर मी सभ्य आहे हे आहे. मी सभ्य असल्यामुळे मला सभ्यपणाशिवाय निराळे वागताच येणार नाही.’

मनात विचार आला, अशा प्रकारच्या बोधवाक्यांवर विश्वास ठेवायचंही एक वय असतं. त्यावेळी मनाच्या श्लोकातल्या, ‘बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला। बहु मानिती लोक येणे तुम्हाला।।’ अशा वचनांवर विश्वास ठेवायला घरच्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं असतं. आणि आपण तसा भाबडा विश्वास ठेवलेलाही असतो. पण जसजसं वय मोठं होतं, जगाचे व्यवहार कसे चालतात याची ओळख होते, तसतसे आपल्या सरळ वागण्याची लोक आपल्या तोंडावर स्तुती करीत असले तरी पाठीमागे आपल्याला बावळट समजतात असं आपल्याला जाणवू लागतं आणि अशा उपदेशावरचा विश्वास उघड्या डिशमध्ये ठेवलेल्या स्पिरिटप्रमाणे पटकन उडून जातो. आपण या विश्वास उडण्याला ‘व्यवहार ज्ञान’ हे गोंडस नाव देतो. नीतितत्त्व म्हणून ठीक आहे हो, पण जगात वावरायचं म्हणजे थोडं इकडेतिकडे करावंच लागतं, असं आपण स्वत:ला आणि प्रसंगी इतरांनाही पटवून देऊ लागलो. आणि मग ‘इकडे तिकडे’ करण्यामुळे मनाला लागलेली बोच कमी होते.

आजकाल तर सच्चारित्र्यावरचा विश्वास पार उडावा असा काळ आला आहे. रोज इतके आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येताहेत की आता या बातम्यांनी आपलं मन विचलितही होत नाही आणि आर्थिक घोटाळ्यांची रक्कमही आजकाल अगदी गगनाला भिडू पहात आहे. एकेकाळी काही लाखाच्या गैरव्यवहाराची बातमी डोळे विस्फारून आणि श्वास रोखून वाचली जायची. आजकाल काही लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्यांकडे आपण क्षमाशील नजरेनं पाहतो आणि तसे व्यवहार करणारी माणसं तर त्याला अगदी बच्चा समजतात. शिवाय एकेकाळी अशा गुन्ह्यांना शिक्षाही व्हायची म्हणे. आजकाल त्या गैरव्यवहारातली काही रक्कम खाऊन त्या केसेसमधून अपराध्याला सोडविण्यासाठी हुषार वकिलांची फौज तयार असते. पूर्वी सरकारची इन्कम टॅक्स, कस्टम्स यांसारखी काही ऑफिसेसच फक्त भ्रष्टाचाराविषयी बदनाम होती. आता न्यायालयांपासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सगळ्या खात्यांमध्ये भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. शाळा-कॉलेजेस काढण्यामागे पुढल्या पिढीला चांगलं शिक्षण मिळवून देणं हा जुना बुरसटलेला उद्देश कुठेच नसतो. तो लोकमानन्यांच्या काळातला! आता शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा उद्देशच मुळी भरमसाठ कॅपिटेशन फी गोळा करणं हा असतो. आमचे एक पोलीस खात्यातले मित्र म्हणतात,सरकारनं पोलिसांच्या गणवेशाचा रंग काय निवडलाय? तो रंगच जणू त्यांना शिकवण देतो, ‘खा की’ आणि यंदाच्या निवडणुकीनंतर तर काय, जास्तीत जास्त भ्रष्टाचाराचं खातं आपल्याला मिळावं यासाठी मंत्र्यांमध्ये खुल्लमखुल्ला झालेल्या निर्लज्ज हाणामाऱ्या आपण पाहिल्या आहेत. शासनाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या या लोकप्रतिनिधींची ही पातळी आहे, तर आता समाज रसातळाला जायला कितीसा उशीर लागणार? जन्माला येणाऱ्या  नव्या पिढीला कोणत्या तोंडानं मनाचे श्लोक आणि भर्तृहरीची नीतिशतकं आपण शिकविणार आहोत?... की ही पुस्तकं आता निरुपयोगी म्हणून रद्दीत टाकून द्यायची?

अशा काहीशा नकारात्मक विचारांचं ओझं मनावर घेऊनच त्या दिवशी घरी आलो. रात्री झोपण्यापूर्वी नेहमीसारखा कॉम्प्युटर लावला, इंटरनेट लावलं. दिवसभरात मला एकही मल आलेली नसली तरी मी नाराज होतो. सहसा असं होत नाही, दोनचार तरी मेल आलेल्या असतातच. कधी मुंबईतल्या मित्रांकडून, कधी मुंबईबाहेरच्या, तर कधी अगदी देश-विदेशांतूनही या मेल्स येत असतात. इतक्या लोकांनी आज आठवण काढली, इतक्या लोकांना आपल्याशी बोलावंसं वाटलं असं जाणवून समाधान वाटतं. त्या दिवशीही माझी निराशा झाली नाही. एकच पण चांगली लांबलचक मेल होती. एका मैत्रिणीची मेल होती. ही माझी मैत्रीण मला नेहमी चांगल्या मेल पाठवते. आजच्या मेलमध्ये तिनं इतिहासात घडलेल्या एका प्रसंगाचं वर्णन केलं होतं. मेल अशी होती....

‘असंही घडतं, विश्वास ठेवा...

ही फ्लेमिंग या नावाच्या एका गरीब स्कॉटिश शेतकऱ्याच्या जीवनात घडलेली सत्य घटना आहे. एकदा तो आपल्या शेतात राबत होता. शेत लहानसंच होतं आणि शेताच्या एका बांधापलीकडे खूप चिखल, दलदल होती. काम करता करता त्याला त्या दलदलीतून कोणाच्या तरी कण्हण्याचा आवाज आला. आवाज क्षीण आणि अस्पष्टसा होता. उघडच होतं, दलदलीत अडकलेली व्यक्ती बराच काळ त्या दलदलीत, चिखलात रुतलेली होती. तो आवाजाच्या दिशेने धावला. दलदलीत जवळजवळ गळ्यापर्यंत रुतलेला एक तरुण मुलगा मदतीची याचना करीत होता. तो चिखलातून जितका जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता, तितका तितका अधिकच आत रुतत होता. त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती अगदी स्पष्ट दिसत होती. फ्लेमिंगने त्या मुलाला धीर दिला आणि स्वत: चिखलात शिरून काळजीपूर्वक बाहेर काढलं. आणखी काही वेळ तो मुलगा तसाच धडपडत राहिला असता तर स्वत:च्या हातानं त्यानं आपलं मरण ओढवून घेतलं असतं. फ्लेमिंगनं त्या मुलाला घरी नेलं. न्हाऊ घातलं, आपल्या मुलाचे जुने कपडे त्याला दिले. मुलगा आता खूपच सावरला होता, त्यानं फ्लेमिंगचे आभार मानले आणि तो एकटाच आपल्या घरी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता उरकून फ्लेमिंग शेतावर जायला निघत होता, एवढ्यात त्याच्या घरापाशी एका श्रीमंत उमरावाचा टांगा आला. टांग्यातून एक रुबाबदार, झकपक कपडे केलेली व्यक्ती उतरली आणि फ्लेमिंगला कुर्निसात करीत म्हणाली, ‘‘काल तुम्ही ज्या मुलाचं जीवन वाचवलंत त्या मुलाचा मी बाप. आपण केलेल्या सत्कृत्याबद्दल मी आपला ऋणी आहे. मला आपल्याला काहीतरी बक्षीस द्यायची इच्छा आहे. किती रक्कम देऊ, तुम्हीच सांगा.’’

‘‘मला काहीही नको, बक्षिसाच्या आशेनं मी तुमच्या मुलाचे जीव वाचवला नाही. तो अडचणीत होता, त्याला वाचविणं माझं कर्तव्यच होतं. देवानंच तशी बुद्धी मला दिली.’’ फ्लेमिंगने नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याच वेळी नेमका त्याचा मुलगा बाहेर काय चाललंय हे पहायला झोपडीबाहेर डोकावला. त्याच्याकडे बघून उमराव म्हणाला,

‘‘हा कोण?’’

‘‘माझा मुलगा.’’

‘‘काम करतो तो?’’

‘‘मला शेतीच्या कामात मदत करतो.’’

‘‘शिकत नाही?’’ उमरावानं विचारलं. फ्लेमिंगनं मान खाली घातली. उमरावाच्या मनात एक कल्पना आली. ‘‘अरे, हे वास्तविक त्याचं शिकायचं वय आहे. आपण असं करू या, तू तुझ्या मुलाला माझ्याबरोबर पाठव. मी त्याच्या साऱ्या शिक्षणाचा खर्च करीन. माझा मुलगा ज्या चांगल्या शाळा-कॉलेजात जाईल, त्याच शाळा-कॉलेजात मी तुझ्या मुलालाही घालीन. तो चांगला निघाला तर तुझ्या कुळाचं नाव काढेल. मलाही माझ्या मुलाचा जीव वाचविणाऱ्यांसाठी मी काहीतरी केलं याचं समाधान मिळेल.’’

फ्लेमिंगनं आपल्या मुलाकडे पाहिलं. तो आनंदला होता. फ्लेमिंगनं उमरावाच्या प्रस्तावाला संमती दिली. उमराव फ्लेमिंगच्या मुलाला घेऊन गेला. त्यानं आपला शब्द पाळला. त्यानं आपल्या मुलासारखंच फ्लेमिंगच्या मुलालाही उत्कृष्ट शिक्षण दिलं. फ्लेमिंगचा मुलगाही सुदैवाने हुषार निघाला. कालांतरानं त्यानं लंडनच्या सुप्रसिद्ध सेंट मेरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूलमधून वैद्यकीय पदवी घेतली. पुढे तो संशोधनात मग्न झाला आणि आज त्याला सारं जग पेनिसिलिनचा संशोधक सर अँलेक्झांडर फ्लेमिंग या नावानं ओळखतं. उमरावाच्या ज्या मुलाला फ्लेमिंगनं वाचवलं होतं, तो मोठेपणी एकदा न्यूमोनियानं आजारी पडला. त्या काळी अत्यंत दुर्धर मानल्या गेलेल्या त्या रोगातून त्याला कोणत्या औषधानं वाचवलं असेल?...पेनिसिलिननं.

त्या उमरावाचं नाव होतं... लॉर्ड रँडॉल्फ चर्चिल. आणि त्याच्या मुलाचं नाव होतं, सर विन्स्टन चर्चिल! ज्यानं इंग्लंडला आणि पर्यायानं साऱ्या जगाला दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या विरुद्ध विजय मिळवून दिला.

मैत्रिणीनं पाठविलेली मेल वाचली आणि मी थरारून गेलो. मनात आलं, सद्‌विचारांवरचा, सत्प्रवृत्तींवरचा मानवतेचा विश्वास उडून चालणार नाही. जेव्हा आजूबाजूला सद्‌विचारांची, सत्प्रवृत्तींची पडझड होताना दिसत असते, तीच नेमकी वेळ त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवायची असते.

Tags: विश्वास माणुसकी लक्ष्मण लोंढे humanity Faith Bodhkatha Bodhkatha Believe in Humanity Laxman Londhe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मण लोंढे
laxmanlondhe13@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके