डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मानसशास्त्र असं सांगतं की आपणा सर्वांमध्येच सद्‌गुणाइतकेच क्रौर्य,नीचपणा असे दुर्गुणही जन्मजात असतात. समाजाचं नीट आणि शांततामय पद्धतीनं नियमन व्हायला हवं असलं तर या दुर्गुणांनाही कुठे तरी वाव देणं आवश्यक असतं, त्यांचा निचरा करणं आवश्यक असतं. नाटकात अशा क्रौर्याचा आविष्कार पाहताना प्रत्यक्षात आपण मनाच्या रंगमंचावर आपल्याच भावनांचं विरेचन करीत असतो. आपण असं नाटक पाहून थिएटर बाहेर पडतो तेव्हा आपलं मन त्या समाजघातक दुर्गुणांपासून शुद्ध झालेलं असतं, शुचिर्भूत झालेलं असतं.

काही काही गोष्टींची काही माणसांना खूप ओढ असते, आवड असते. उदाहरणार्थ, बऱ्याच स्त्रियांना दागिन्यांची आवड असते आणि अशा स्त्रिया समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांतल्या असतात. पिढीजात श्रीमंत घराण्यांमधल्या स्त्रियांकडे असे दागिने वारसाहक्काने आपोआप येतात. नवश्रीमंतांमधले हौशी नवरे आजच्या भावानीही सोनं खरेदी करून आपल्या बायकांसाठी अगदी गळा, हात भरून दागिने करू शकतात. पण निम्न आर्थिक स्तरातल्या स्त्रियांना आपली सोन्या-मोत्यांच्या दागिन्यांची आवड भागवता येणं शक्य नसतं. असं असलं तरी आपलंही चांगलं दोन तोळ्याचं मंगळसूत्र, चार तोळ्यांचा ज्योती हार, बांगड्या, पाटल्या असा सारा साज आपल्या अंगावर असावा, असं गरीब स्त्रियांनाही वाटतं. अशा स्त्रियांसाठी एका सोनाराच्या पेढीनं सोन्याचा गिलावा दिलेले दागिने काढलेले आहेत. आठ-दहा ग्रॅम सोन्याच्या किमतीत त्यांना अंगभर दागिने घातल्याचं सौख्य मिळतं. अर्थात, ते दागिने सर्व मिळून आठ-दहा ग्रॅमचेच आहेत, वरून सोन्याचा गिलावा असला तरी आत कोणता तरी हिणकस धातू आहे, हे दुसऱ्याचं लाख स्त्रियांना आणि चोरांना बरोबर समजतं. श्रीमंत स्त्रिया अशा दागिन्यांना बघून नाकं मुरडतात आणि चोर तर त्याच्याकडे पाहतही नाहीत.

जे सोन्याच्या बाबतीत घडतं तेच मोत्यांच्याही बाबतीत घडतं. सागराच्या तळाशी नैसर्गिक पद्धतीनं शिंपल्यात बनणारे मोती अतिशय दुर्मिळ असतात. ते सागरातून काढण्याची पद्धतही अतिशय जोखमीची, म्हणूनच खर्चिक असते. त्यामुळे खऱ्या मोत्यांचे दागिने घालणं श्रीमंतांनाच परवडतं. पण मग गरिबांनी काम मोत्यांचे दागिने घालू नयेत? पण त्यांची सोय सर्वप्रथम हिकमती जपानी उद्योजकांनी केली. त्यांनी प्रयोगशाळेत कल्चर करून ‘कल्चर्ड’ मोती बनविले. असे मोती आपल्याकडेही बनू लागल्यावर काही उत्पादकांनी त्यांची जाहिरात ‘खरे’ कल्चर्ड(!) मोती अशी करायला सुरुवात केली.

असं असलं तरी या एक ग्रॅमवाल्या किंवा कल्चर्ड मोत्यांच्या दागिन्यांनाही भरपूर मागणी का असते? माझ्यासारख्या काही भोट माणसांचा मात्र गैरसमज होऊ शकतो. त्यांना ते खरेच वाटतात. पण माझ्यासारख्या माणसांना फसविण्यासाठी असे दागिने या स्त्रिया घालतात, असं म्हणणं योग्य होणार नाही.

... अश्वत्थामा गरीब होता. त्याला दूध प्यायला हवं होतं आणि त्याच्या आईला तर त्याला दूध देणं परवडत नव्हतं. म्हणून त्याच्या आईनं तांदळाच्या पिठात पाणी कालवून ते दूध म्हणून त्याला पाजलं. द्रवाचा पांढरा रंग पाहून अश्वत्थामा फसला. त्याला बिचाऱ्याला खऱ्या दुधाची चवही माहीत नसल्यामुळे तो ते दूध म्हणून प्यायला, अशी महाभारतात कथा आहे. या कथेत कारुण्य आहे आणि बालपणाच्या अज्ञानाचा इथे दारिद्रयाचा चटका लपविण्यासाठी वापर केला गेलेला आहे. पण या दागिन्यांच्या बाबतीत तर तशीही गोष्ट नसते. खरं तर त्या कोणाचीच फसवणूक करीत नसतात. त्यांची स्वत:ची नाही आणि दुसऱ्यांचीही नाही.

मुंबईसारख्या महानगरात आजकाल आपण कोट्यवधींनी माणसं राहत असलो, तरी मुंबईतील बरीचशी माणसं ‘उपरी’च असतात.  या वाक्यातल्या ‘उपरा’ या शब्दाचा अर्थ शिवसेनेच्या डिक्शनरीत शोधायचा नाही. कारण त्या डिक्शनरीत ‘उपरा’ शब्दाचा अर्थ ‘नॉन महाराष्ट्रीयन’असा असतो. मी मात्र ‘उपरा’ हा शब्द या ठिकाणी ज्याचा जन्म आणि बालपण मुंबईबाहेर एखाद्या खेड्यात गेलेलं आहे, जो केवळ पोटापाण्याच्या सोयीसाठी मुंबईत राहतो, ज्याला मुंबईत राहणं भाग असते, पण जो त्यात असमाधानी असतो, ज्यालावारंवार आपल्या गावच्या शांत जीवनाच्या आठवणी येतात आणि जो त्या आठवणींनी व्याकूळ होतो, जो संधी मिळेल तेव्हा गावी पळायला बघतो, थोडक्यात काम जो शरीरानं मुंबई या विराट महानगरीत राहत असून मनानं आपल्या गावीच असतो, या अर्थी केलेला आहे. मग हे त्याचं गाव राजस्थानातलं असो की महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्यातलं असो.

या माणसाचं मन गावच्या कोणत्या आठवणींनी झुरत असतं? अशी व्यक्ती मध्यमवयीन असते आणि त्याच्या बालपणी त्याच्या गावी वीज पोचलेली नसते. त्यामुळे त्याच्या बालपणच्या संध्याकाळी तो घरी असला तर मिणमिणत्या उजेडात गेलेल्या असतात आणि रस्ते तर त्यानं बहुश: काळोखातच तुडवलेले असतात. तो अगदी छोट्या गावातला असेल तर त्याच्या घराची जमीन सारवलेली असते आणि भिंतींनाही गेरूचा आणि चुन्याचा रंग लावलेला असतो. बालपण फारच गरिबीत गेलेलं असेल तर त्याच्या घराला शेणानं लिंपलेल्या कारवीच्या भिंतीही असण्याची शक्यता असते. अशा आठवणींनी झुरणाऱ्या मुंबईकर उपऱ्यासाठी मुंबईत काही ठिकाणी खेडेगावच्या अशा घरासारखी अंतर्गत सजावट केलेली हॉटेलं निघालेली आहते. तिथे छतावर कृत्रिमपणे मोकळ्या आकाशाचा आभास तयार केलेला असतो, जेवणाच्या हॉलमध्ये विजेचे दिवे नाही, तर रॉकेलचे दिवे असतात. काही ठिकाणी तर पार मेणबत्त्या असतात. अन्नपदार्थ ताटात वाढले जातात, पाण्यासाठी काचेच्या ग्लासऐवजी तांब्या-भांडं असतं. अन्नपदार्थही गावच्या जेवणातल्यासारखे भाकरी, तिच्याबरोबर मटणाचा रस्सा किंवा पिठलं, लसणाची चटणी किंवा मिरचीचा ठेचा आणि कांदा अशा प्रकारचे असतात. भाकऱ्या चुलीवर केलेल्या असतात. टेबलावर मध्यभागी लावलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात बाजूच्या भिंतीवर आपली काळी सावली पडलेली पाहत, पाहत एखाद्या मित्राबरोबर गावच्या गप्पा मारीत केलेल्या जेवणाची गोडी काही औरच लागते.

अशा हॉटेलांनाही मुंबईकर उदार आश्रय देतो आणि आपली दुधाची तहान ताकावर भागवतो. आता या प्रकारांतही कोठे फसवाफसवीचा कारभार नसतो. पण जाणूनबुजून गावी, घरी जेवल्याचा (खोटा) अनुभव घ्यायला माणसं लाईनी लावतात.

...आणि आपण शंभर दोनशे रुपयांचं तिकीट काढून नाटक-सिनेमाला जातो ते तरी काय असतं? नाटका-सिनेमातल्या नायकनायिकेच्या दु:खानं आपण हळहळतो, कधी आपल्या डोळ्यांच्या कडाही ओल्या होतात. खलनायकाचा हलकटपणा पाहून आपल्याला चीड येते. नुकतेच वारलेले गेल्या पिढीतले नट चित्तरंजन कोल्हटकर हे नाटकात नेहमी खलनायकाच्या भूमिका करीत. ते त्या इतक्या समरसून करीत की, एकदा त्यांचा एका नाटकातला अभिनय पाहता पाहता माझी बहीण माझ्या कानात म्हणाली होती... ‘‘हा मेला आता थिएटरच्या बाहेर उभा असलाना, तर मी त्याला चपलेनं मारीन!’’ आपल्यासमोर रंगमंचावर चाललंय ते नाटक आहे, खोटं आहे हे ती त्या क्षणी पूर्णपणे विसरली होती. किंबहुना कोल्हटकरांनी आपल्या समर्थ अभिनामानं ते तिला विसरायला लावलं होतं.

मी कधी कधी विचार करतो की समजून उमजून माणूस हा असत्याचा अनुभव सत्य मानून का घेतो? मानसशास्त्र असं सांगतं की आपणा सर्वांमध्येच सद्‌गुणाइतकेच क्रौर्य, नीचपणा असे दुर्गुणही जन्मजात असतात. समाजाचं नीट आणि शांततामय पद्धतीनं नियमन व्हायला हवं असलं तर या दुर्गुणांनाही कुठे तरी वाव देणं आवश्यक असतं, त्यांचा निचरा करणं आवश्यक असतं. नाटकात अशा क्रौर्याचा आविष्कार पाहताना प्रत्यक्षात आपण मनाच्या रंगमंचावर आपल्याच भावनांचं विरेचन करीत असतो. आपण असं नाटक पाहून थिएटरबाहेर पडतो तेव्हा आपलं मन त्या समाजघातक दुर्गुणांपासून शुद्ध झालेलं असतं, शुचिर्भूत झालेलं असतं.

अर्थात हे अशा वाईट भावनांच्या बाबतीत जितकं खरं असतं,तितकंच चांगल्या भावनांच्याही बाबतीत खरं असतं. गुरुदत्तच्या सिनेमातल्या एका गाण्यात ‘हमने तो जब कलियाँ माँगी, काँटोका हार मिला।’ अशी एक ओळ आहे. तारुण्याची पहाट फुटताना पुरुष किंवा स्त्रीच्या मनात प्रेमभावना जागृत होणं हे अगदी स्वाभाविक आहे. मी कधी तसं प्रेमच कोणावर केलं नाही, मला तसं कोणाहीबद्दल वाटलं नाही असं सांगणारी व्यक्ती खोटं बोलत असते असं खुशाल समजावं. पण सगळ्यांच्याच प्रेमाला प्रतिसाद मिळतो असं नाही. किंबहुना प्रेमाला प्रतिसाद मिळणारे भाग्यवंत थोडे. म्हणूनच या गाण्याच्या पुढल्या ओळीत दु:खद अंत:करणाने शायर म्हणतो, ‘‘जाने वो कैसे, लोग थे जिनके, प्यार को प्यार मिला।’ बऱ्याच जणांची अवस्था ‘हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया। फासला प्यार में दोनोंसे मिटाया न गया।’’ अशी झालेली असते किंवा काहींना ब्लंट नकार मिळालेला असतो. इतकंच काम, आपलं प्रेम नाकारलं गेलं की यशस्वी झालं यापेक्षा, आपल्यावर कोणीतरी प्रेम केलं होतं. ही भावनाही खूप दिलासा देणारी असते. म्हणूनच प्रेमाला पारखा झालेला नायक विव्हळणं ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटात किशोरकुमारनं गायलेल्या गाण्यात म्हणतो, ‘पलभर के लिए कोई मुझे प्यार कर ले, झूठाही सही!’

दागिन्यांची बाब सोडा, पण प्रेमभावनेसारख्या मूलभूत भावनेच्या बाबतीतही आभासालासुद्धा इतकं महत्त्व असेल?...कोणी म्हणेल, हे मात्र जरा अतिच होतंय हं. प्रेमाचं नाटकसुद्धा इतकं परिणामकारक असतं, सुखावणारं असतं असं म्हणणं हे म्हणजे मृगजळाचं पाणी पिऊन एखादा माणूस तृप्त झाला असं म्हणण्यासारखं होईल. पण अलीकडेच डॉ. श्रीकांत चोरघडे यांनी लिहिलेला एक हृद्य प्रसंग वाचनात आला आणि किशोरकुमारनं गायलेल्या गीतातल्या भावना किती सच्च्या आहेत याची साक्ष पटली. डॉक्टरांनी या आठवणीत लिहिलं आहे की, मेंदूला होणाऱ्या इजेचा कधीकधी पक्षाघातासारखा भयानक परिणाम होतो. अशा विकारात विविध ज्ञानेद्रियांच्या क्षमतेवर परिणाम होतो. कोणाची वाचा जाते, कोणाला आंधळेपण येतं. अशा व्यक्ती उपचारानंतरही बऱ्या होतीलच याची शाश्वती वैद्यकशास्त्र देऊ शकत नाही. उपचार चालू असतानाचा हा काळ रुग्णाच्या जवळच्या माणसांची कसोटी पाहणारा असतो. सकारात्मक दृष्टी ठेऊन आपली प्रिय व्यक्ती बरी होईल, अशी आशा ठेवून रुग्णाची सेवाशुश्रूषा करायची असते आणि हा शुश्रूषेचा काळ कधीकधी रुग्णाच्या मृत्यूपर्यंतही लांबतो. डॉक्टरांनी हाताळलेल्या एका खऱ्या केसमध्ये एका दांपत्यामधील स्त्रीला पक्षाघात झाला आणि विचित्र परिणाम झाला.  ‘आपलं लग्न झालेलं आहे’ हे सत्यच ती स्त्री विसरून गेली.  नवरा तिला हॉस्पिटलातून घरी घेऊन आल्यावरही ती स्त्री त्याच्याबरोबर एखाद्या अपरिचिताबरोबर राहावं तसं राहू लागली. आता नवऱ्याचा कसोटीचा काळ होता. त्यानं शेवटी एका मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतला. मानसोपचारतज्ज्ञानं त्यांना सुचविलं, ‘‘तुम्हीही आपलं लग्न झालेलं आहे हे विसरा आणि लग्नाआधी पत्नीचं जसं प्रियाराधन केलं होतं तसं करा. तिला प्रथम प्रेमाचा साक्षात्कार पुन्हा एकदा घडवा. तिच्या आवडीनिवडी सांभाळा, तिच्यावर खोटं खोटं रागवा, रुसा. अबोलाही धरा आणि तिची कळी खुलली की लपवून आणलेला गजरा तिला भेट द्या.’’ कठीण होतं, कारण एवढं करूनही ती सुधारेलच अशी शाश्वती नव्हती. पण नवऱ्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले प्रयत्न चालू ठेवले. आपल्याच पत्नीवर नव्यानं प्रेम केलं आणि हळूहळू परिणाम दिसू लागले. ती त्याच्यावर ‘भाळली’ आणि तिने एके दिवशी त्याला लाजतलाजत विचारलं, ‘आपण लग्न करू या?’ नवऱ्यानं नाटक शेवटापर्यंत नेलं. नव्या उत्साहानं पत्रिका छापून, आपल्या लग्नाचा दुसरा समारंभ घडवून आणला आणि नव्यानं संसार सुरू केला.

आता सांगा, झूठाही सही, हे सही आहे की नाही?

Tags: नाटक आभास प्रेमभाव समाज नियमन गुण दुर्गुण मानवी स्वभाव वास्तव खरे खोटे लक्ष्मण लोंढे Good bad Human Tendency human nature False True Article Laxman Londhe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मण लोंढे
laxmanlondhe13@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके