डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

माझ्या करिअरच्या अतिशय योग्य टप्प्यावर संवेदनशील अन्‌ व्यासंगी प्रशासक व्ही.पी.राजा यांच्या रूपाने भेटला यासाठी स्वत:ला मी नेहमीच भाग्यशाली मानत राहिलो. एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्याकडे आलेल्या नवशिक्यावर किती नेमकं लक्ष देतो, याचं हे दुर्मिळ उदाहरण. या महान माणसासोबत मी माझं प्रोबेशन पूर्ण केलं. व्ही. पी. राजा हे मूळचे तमिळनाडूचे, पण दिल्लीत वाढलेले होते. त्यांच्या तशा अतिशय कमी काळातील पण खूप मोलाच्या आठवणी (शिकवणी) आजही माझ्या मनात तितक्याच जिवंत आहेत. हे गृहस्थ अत्यंत साधं राहणं पसंत करायचे. मी त्यांचं ‘प्रशासनातील गांधी’ असंच वर्णन नेहमी करतो. ध्येयवादी प्रशासक ही त्यांची ओळख. रोज संध्याकाळी काम संपवताना ते मला म्हणायचे, ‘आज आपण पगाराला पूर्ण न्याय दिला.’ कधी कधी जर मुख्य जबाबदारी सोडून अन्य काही काम आलं, तर रात्री कितीही वेळ लागू दे ते सगळ्या फाईली संपवून घरी जायचे. घरी जाताना आपल्याकडे पगाराला पूर्ण न्याय दिल्याचं समाधान पाहिजे, असा त्यांचा स्वतःशी आग्रह असायचा

प्रश्न - इतक्या विविध विद्याशाखांतून तुम्ही शिक्षण घेत राहिलात, तर त्या काळात तुमचे वाचन कोणत्या प्रकारचे होते? आणि त्याचा तुमच्या लेखनांवर काय परिणाम झाला?

 - माझ्या वाचनाला विषयाच्या मर्यादा कधीच नव्हत्या. सायन्स शाखेत शिकल्यानं ते विषय जवळचे झाले. इतिहास व मराठी साहित्य आवड म्हणून वाचत होतो. प्रशासनानं अनेक दालनं उघडून दिली. बँकेच्या नोकरीनं अर्थकारण तर प्रशासकीय नोकरीनं व्यवस्थापन कौशल्यापासून अनेक विषयाशी जोडला गेलो. माझ्या वाचनाला ‘आय.आय.एम.’मधील प्रवासानं समाज विज्ञानाची दृष्टी दिली. तिथल्या भव्य ग्रंथालयाचा मी प्रचंड लाभ घेतला. त्या वर्षातला प्रत्येक रविवार ग्रंथालयात घालवायचो. अनेक महत्त्वाच्या दुर्मिळ अंकांमधील शेकडो लेख झेरॉक्स करून घेतले. बंगलोरहून परत येत असताना जवळपास 25 हजार पानांचा दस्तावेज झेरॉक्स करून आणला होता. आमच्या कोर्समधील सर्वाधिक पानांच्या झेरॉक्स मी आणल्यानं तिथला झेरॉक्सवालादेखील माझ्यावर प्रचंड खूश असायचा. कालांतरानं पुन्हा एका कार्यशाळेसाठी तिथं गेलो तेव्हा त्यानं मला ओळखलं अन्‌ जवळ येऊन म्हणाला, ‘साहब, आप जैसा काम फिर किसीने नही दिया.’ एकूणच माझं अखंड विद्यार्थी असणं सतत सुरू आहे. 

माझ्या वाचनाला भाषेच्या मर्यादा नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी अन्‌ अगदी उर्दूसुद्धा (देवनागरीतून) वाचत राहतो. जे वाचतो त्याचे इतरही संदर्भ शोधत राहतो. लेखन-वाचनासाठी जो मानसिक चाळा करायला हवा, तो सतत चाललेला आहे. अगदी काल-परवाची गोष्ट सांगतो. साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं हैदराबादला जात होतो, रस्त्यात दुर्गाबाई देशमुख नावाचं कॉलेज लागलं. पुढच्या बैठकीसाठी वेळ होता म्हणून थांबलो. त्या कॉलेजात गेलो. तिथं वसतिगृह कसं आहे इथपासून अनेक गोष्टी समजून घेत असताना दुर्गाबाई  च्या ‘चिंतामण अँड आय’ या पुस्तकाचा संदर्भ कळला. लगेच ते पुस्तक इंटरनेटवर डाऊनलोड करून मिळवलं. ते वाचत गेलो, त्यातून अनेक संदर्भ उलगडत गेले. त्यामध्ये गोविंदाग्रजांनी सी.डी. देशमुख यांच्यावर लिहिलेल्या कवितेचा संदर्भ लागला. फार भारी वाटत राहिलं. सी.डी. देशमुख आय.सी.एस. परीक्षेत देशात पहिले आले होते, त्या निमित्तानं गोविंदाग्रजांनी ती कविता लिहिली होती.

सांगायचा मुद्दा असा की, वाचायचं म्हणून वाचत नाही, त्याच्या खोलात जात राहतो. त्यातून नवे विषय समजून घ्यायची प्रवृत्ती सतत विकसित होते अन्‌ वाढत राहते. त्यातच मला आनंद मिळत असतो. अगदी अलीकडची गोष्ट सांगतो. जर्मनीच्या दोन मुली भारतात आल्या होत्या. त्या बॅडमिंटन खेळातील पहिल्या लेस्बियन कपल आहेत. त्यांची कथा कळली, तेव्हा ती समजून घ्यावी वाटली. त्या म्हणाल्या की, ‘आम्ही दोघी एकमेकींना पूरक आहोत, खेळताना आम्ही पार्टनर आहोत, तशाच आयुष्यातदेखील पार्टनर आहोत’. त्यांच्याविषयी माहिती घेतली तेव्हा कळलं की, त्यांच्यातील एकीची ख्याती कलात्मक फटके मारण्यासाठी आहे, तर दुसरी घणाघाती आक्रमक फटके मारण्यावर भर देते. आता गंमत बघा- त्या दोघी लेस्बियन असल्या तरी त्यांच्यातील भिन्नता हा त्यांच्या परास्परांविषयी वाटणाऱ्या लैंगिक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ही अतिशय वेगळी ह्यूमन रिलेशनची कथा मला त्यातून स्फुरली. एकीच्या खेळाच्या पद्धतीत पुरुषी वृत्ती दिसते, तर दुसरीच्या खेळात स्त्री प्रवृत्ती डोकावते. हा उलगडा होत असताना आपल्या अवती-भोवतीच्या मानवी नात्यापेक्षा हे किती तरी वेगळेपण तेवढेच नैसर्गिक आहे.

मी सिरॅक्युस विद्यापीठ न्यूयॉर्क अमेरिकेत एका कोर्ससाठी असताना आमच्या प्रोफेसरांनी ‘मी गे आहे’, असं सांगितलं होतं आणि आम्ही भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्महाऊसवर गे पार्टनरसह पार्टी दिली होती. हे सारं चक्रावणारं होतं. अशा वेगळ्या लेस्बियन विषयावर मी तीन कथा लिहिलेल्या आहेत. त्यासाठी त्या विषयाच्या खोलात जाऊन अभ्यास केला. मला आठवतं, विक्रम सेठ यांनी, कलम 371 अंतर्गत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर एक कविता लिहिली होती. त्या कवितेत न्यायालयाच्या निकालातील बदल टिपला होता. त्याचा आशय असा आहे. जेव्हा दिल्ली हायकोर्टानं लेस्बियनच्या बाजूनं अगोदर निकाल दिला तेव्हा ते म्हणतात, ‘मी गुन्हेगाराचा माणूस झालो होतो... त्याच निकालाला सुप्रीम कोर्टानं विरुद्ध निकाल दिला तेव्हा त्या निकालानंतर पुन्हा माणसाचा गुन्हेगार झालो!’ म्हणजे बघा- आपल्याकडे अशा विरोधाभासी निकालामुळं पण एका अर्थानं वंचित असणाऱ्यांच्या दुःखाकडे कसं पाहिलं गेलं. यावर आई व तिच्या गे मुलाच्या लग्नाची कथा मी लिहिली आहे.

मला नेहमी असं वाटतं की, माझी मुख्य प्रवृत्ती वंचित पीडिताची बाजू घेणारा लेखक अशीच आहे. फैज अहमद फैज यांनी ‘रायटर्स व्हेअर डू यू स्टँड’ नामक लेखात लेखकानं ‘नाही रे’ वर्गाची बाजू घेतली पाहिजे, असं म्हटलं आहे, तोच माझ्या लेखनाचा प्रमुख स्वर राहिलेला आहे. या निमित्तानं आणखी एक बाब सांगितली पाहिजे. ती अशी की, या प्रौढ वयातदेखील मी कोणत्याही नव्या विषयांनी भारावून जातो. यावरून काही जवळचे हितचिंतक मला वेड्यात काढतात, पण त्यात मला काहीच वावगं वाटत नाही. कारण जिथं जाईन तिथला होण्याची माझी सवय आहे. आता याक्षणी मी साधनात आहे तर पूर्णतः इथला आहे, नंतर मी समजा इथून डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याकडे गेलो तर त्यांचा होऊन जाईन. मी नेहमीच्या चांगल्या व्यक्ती, समूह, संस्था अन्‌ विषयात समरस होत आलो आहे. अध्यात्म सोडलं तर सगळ्या विषयांत मी रमलो आहे.

आत्ता मी आळंदी देवस्थानाचा विश्वस्त आहे. त्या निमित्तानं ती उणीव जाणवते. ज्ञानेश्वरीसारखा मोलाचा ग्रंथ वाचायचा राहून गेला आहे. तुकारामाचे मोजकेच अभंग मला माहीत आहेत, ते आवडतात देखील. मनाचे श्लोकही आवडतात. माझ्या प्रवासाला व्यापक मानवी चेहरा कसा देता येईल, याचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न माझ्याकडून झालेला आहे. माझ्या साहित्यिक प्रवासाबाबतची भूमिका मी अध्यक्षीय भाषणात सविस्तर मांडली आहे, इतरत्रही मांडली आहे. मुख्यतः माझी लेखक असण्याची जातकुळी गरिबांचा आवाज बनण्याची राहिली आहे. कारण माझ्या साहित्यिक आयुष्यात दोन मुख्य गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट- प्रगतशील लेखकांची चळवळ अन्‌ दुसरी- प्रेमचंद यांचे लेखन.

खरंतर माझ्या शाळकरी वयात हिंदीच्या बी.ए. समकक्ष स्वरूपाच्या राष्ट्रभाषा प्रसार समिती वर्ध्याच्या तीन परीक्षा मी उत्तीर्ण झालो होतो. हिंदी व देवनागरी लिपीत छापलेली उर्दू शायरी व त्यातील साहित्यही विपुल वाचलं. त्यामुळं वाचन-लेखनाला भारतीय आयाम मिळाला, असं म्हणायला वाव आहे. वाचक म्हणून सर्व प्रकार वाचत आलो असलो तरी मनाला भावले ते माणसांच्या जीवनातील वास्तव. त्यामुळं आपसूकच माझ्या लेखनाचा जवळपास 80 टक्के गाभादेखील वास्तव लेखनाचा राहिला आहे. मला मध्यमवर्गीय मनाचं रंजन करणारं साहित्य फारसं कधी आवडलं नाही; तसं मी लिहिलंही नाही. अभिजन  वर्गाच्या मनाला सुखद-संवेद्य कुरवाळणारे व केवळ ‘रस’ व ‘सौंदर्य’ पूर्ण लिहिणाऱ्या लेखकांना प्रेमचंदांनी ‘बौद्धिक भांडवलदार’ म्हटले होते, ते विचार मला फार महत्त्वाचे वाटतात. म्हणून प्रेमचंद ज्या चळवळीशी निगडित होते, त्या प्रगतशील लेखन चळवळीचा माझ्यावर खोल प्रभाव आहे, त्या प्रभावानं व्यापक अर्थानं मी ‘नाही रे’ वर्गासाठी लिहिणारा लेखक झालो आहे.

माझ्या स्वाभाविक प्रेरणा या दलित-मुस्लिम-स्त्री या वंचित घटकांच्या भल्याकडे झुकलेल्या आहेत. या वर्गाचं दुःख मांडण्यासाठी आपलं कलापण पणाला लावण्याचं काम करत आहे, करत राहील. मी शोषितांची बाजू मांडतो आहे, कारण आपली एकूण व्यवस्था श्रीमंतांची भलावण करणारी आहे. त्यासाठी या व्यवस्थेच्या स्वरूपात बदल व्हावा, तिनं गरिबांचा आवाज ऐकावा- ही माझ्यातील लेखक-कलाकाराची भावना अन्‌ भूमिका आहे. जे लिहितो आहे, ते माझे व्यापक पक्षीय राजकारणाच्या पलीकडचे राजकीय भाष्य असते. माझं माध्यम लेखन आहे, पण माझं ध्येय व्यवस्था-परिवर्तनाचं आहे. गरिबांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्यात माझे समाधान आहे. मला दबलेल्या अन्‌ दाबलेल्या समूहांच्या दुःखाचा वाहक व्हायचं आहे. तोच माझ्या साहित्याचा गाभा आहे. मानवी जीवनाच्या वेदनांचा व्यापक हुंकार शोधण्याच्या प्रकियेत समरस होणं, हा माझ्या साहित्याचा धर्म आहे, ते माझ्या लेखणीचे इमान आहे.

प्रश्न - सर, तुमची प्रशासकीय कारकीर्द कुठून सुरू झाली? त्याविषयी जरा सविस्तर सांगा.

- माझी प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली पश्चिम महाराष्ट्रात, सातारा इथून. मुळात मला लोकांमध्ये राहायला आवडते आणि ती संधी बँकेत नव्हती, म्हणून मी प्रशासकीय सेवेकडे वळलो. या सेवेत येण्याचं मुख्य कारण स्वभावतः जे आवडते ते केले पाहिजे, ही माझी जगण्याची रीत. माझं वाचन आणि जनरल नॉलेज चांगलं होतं, त्यामुळं परीक्षा पास होणं अवघड गेलं नाही. याच चौफेर वाचनानं मला भोवतालचा समाज व त्याचं दुःख इतरांच्या तुलनेत जरा जास्तच परिचित होत गेलं, असं आता मागे वळून पाहताना मी म्हणू शकतो. माझ्या प्रशासकीय सेवेचा पहिला टप्पा 1980-82 या कालखंडातील साताऱ्यातील तहसीलदारपदाचा. तो साधारण दीड ते पावणेदोन वर्षांचा. तिथंच माझ्यातील प्रशासक घडत गेला. याचं कारण, माझे प्रशासकीय गुरू आणि ज्यांना आजही मी आदर्श मानतो ते व्ही. पी. राजा.

ते साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी होते. (व्ही. पी. राजा यांना माझे ‘प्रशासननामा’ हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. ते साधारण आठ वर्षांपूर्वी राज्याच्या प्रधान सचिवपदावरून निवृत्त झालेले आहेत. सध्या मुंबईत असतात.) ज्याप्रमाणं नांदेडला कुरुंदकरांच्या प्रभावानं माझी वैचारिक जडण-घडण झाली, त्याचप्रमाणं माझी प्रशासकीय जडणघडण, कामाची पद्धत आणि त्यामागची भूमिका व्ही. पी. राजा यांच्यामुळं घडलेली आहे. आपण काम का करायचं आणि कोणासाठी करायचं, हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिलं. ते स्वतः न्यूक्लिअर सायंटिस्ट होते. परदेशी शिकत असताना आपण देशासाठी काही तरी करावं म्हणून ते ती नोकरी सोडून भारतात आले, प्रशासकीय अधिकारी झाले. ते नेहमी सांगायचे की, ‘उत्तम प्रशासन करणं ही देशसेवाच आहे. जे निर्णय राज्यकर्त्यांकडून घेतले जातात त्यांचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हायला हवा, ही बाब लोकशाहीसाठी महत्त्वाची असते; म्हणून प्रशासनातील अधिकारी संवेदनशील असला पाहिजे अन्‌ कार्यक्षमही... अधिकारी जेवढा संवेदनशील, समाजाभिमुख व शिस्तप्रिय असेल तेवढं काम यशस्वी होतं.’ त्यांच्या या भूमिकेचा अन्‌ मार्गदर्शनाचा मला फार लाभ झाला.

खरंतर या माणसाला प्रशासनात यायची काहीच गरज नव्हती. कारण परदेशातील नोकरीमुळं जी पेन्शन त्यांना मिळायची, ती इथल्या त्यांच्या पगारापेक्षा जास्त होती. ते मला नेहमी सांगायचे, ‘कुठलंही काम समोर आलं की, विचार करा की, तो प्रश्न एकट्या माणसाचा आहे का सार्वत्रिक आहे. प्रश्नाचं व्यापक स्वरूप समजून घेतल्याशिवाय त्याचा यथायोग्य मार्ग सापडत नाही. एखाद्या माणसानं जर सांगितले की, ‘अमुक एक तलाठी माझं काम पैसे घेतल्याशिवाय करत नाही.’ तर त्या माणसाचा तो प्रश्न सोडवताना एकूणच तलाठ्यांच्या व महसूल खात्यातील भ्रष्टाचारावर कसा अंकुश ठेवावा, याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अधिकारी म्हणून ढिले पडलो की, खालचे लोक पैसे खायला लागतात. त्यासाठी त्यांच्या कामावर सततचं नियंत्रण अन्‌ वचक कसा ठेवता येईल, याचं प्रशासकीय कौशल्य विकसित करा.’ हा त्यांनी शिकवलेला पहिला मंत्र होता.

‘प्रोबेशन पिरियड हा कालखंड अधिकाऱ्यांच्या पायाभरणीचा असतो. त्यामुळं या काळात अधिक काम केलं पाहिजे. पायाभरणीत कामाची सवय लागली तर ती कायम तुमच्या स्वभावाचा भाग होते.’ असा त्यांचा दुसरा मोलाचा मंत्र होता. त्यांनी मला अगदी सुरुवातीला एक डायरी भेट दिली आणि सांगितलं की, ‘या डायरीत तू रोज काय काम केलंस, काय पाहिलंस आणि काय शिकलास, हे लिहीत जा.’ माझी लिहिलेली डायरी ते पाहायचे आणि त्यावर कॉमेंट्‌स द्यायचे. ‘आज तुम्ही हे केलं नाहीत, ते करा. हे पुस्तक वाचा, तिकडं जा.’ अशा त्यांच्या माझ्या डायरीतील मुद्देसूद कॉमेंट्‌स माझ्या त्या वेळच्या कामाच्या प्रेरणा होत्या. माझ्यावर असलेले त्यांचे लक्ष अन्‌ नेमक्या सूचनांमुळं मी अनेक गोष्टी शिकत गेलो. या पद्धतीनं त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याला काय अभ्यास करावा लागतो, तो फारच योग्य पद्धतीनं माझ्याकडून करून घेतला. त्यांच्यामध्ये विचार-भूमिका अन्‌ प्रत्यक्ष कृती यांचा समुच्चय असल्यानं मी अधिक जागरूक बनत गेलो.

त्यांच्या सूचनांनी जेवढा घडलो, तेवढाच त्यांच्या प्रत्यक्ष कामातूनही बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. अधिकारी म्हणून उत्तम काम कशाला म्हणायचे, हे त्यांनी पदोपदी दाखवून दिलं, पटवून दिलं. माझे ते खऱ्या अर्थानं प्रशासकीय गुरू होते! कार्यालयीन कामाच्या अनुभवानंतर अधिकाऱ्यांना फिल्डवर पाठवतात. आपण तहसीलदार असलो तरी ती व्यवस्था कसं काम करते, हे मुळातून कळावं म्हणून  खालच्या स्तरावरून प्रत्यक्ष काम करणं सुरू होतं. त्याचाच एक भाग म्हणून सुरुवातीचे दोन महिने सर्कल ऑफिसर म्हणून काम करावं लागतं. त्यामध्ये मला (प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या) पुसेसावळी या गावात सर्कल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पहिल्या तीन दिवसांत सर्कलच्या जबाबदारीचा पूर्णपणे अभ्यास केला व कामाचं स्वरूप समजून घेतलं. आणि माझ्या कामाचं टार्गेट मीच ठरवलं. त्यात पहिलं होतं- सर्व गावांतील 100 टक्के फेरफार नोंदी खुला दरबार भरवून मंजूर करायच्या. दुसरं होतं, पडीक जमिनीचं वाटप आणि तिसरं होतं, संजय गांधी योजनेतून लोकांना घरं बांधून देणं.

पुसेसावळी सर्कलमधील विविध गावांत जवळपास 800 नोंदी पेंडिंग होत्या. त्या निकाली काढण्यासाठी मी तारखा लावल्या व त्या जाहीर केल्या. लोकांना बोलावून घेऊन नोंदीबद्दल कुणाचा आक्षेप असेल तर त्यांची सुनावणी करून निकाल देऊन नोंद मंजूर करायचो. आक्षेप नसेल तर ऑन द स्पॉट नोंद मंजूर करायचो. फेरफार नोंदी पेंडिंग का राहतात, हे मला इथं नीट कळलं. महसुली कामात गैरसमज जास्त असतात, पण ते दूर करून त्यातून मार्ग निघतात, हे अनुभवातून लक्षात आलं होतं. या सर्व प्रक्रियेत पैसे द्यायचे नाहीत, हे लोकांना पटवून दिलं. केवळ लोकांना पटवून दिलं असं नाही, तर आमच्या तलाठ्यांना पण दम भरला. पैसे घेतले तर कलेक्टरसाहेबांना कळवून तुम्हाला सस्पेंड केलं जाईल, असं सांगितल्यावर तलाठ्यांनी उत्तम सहकार्य केलं. त्याचा परिणाम लोकांचा सहभाग वाढण्यात झाला. या पद्धतीनं सगळ्या नोंदी मंजूर झाल्या.

इतरही टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही पैसे न देता आपली कामं होतात, याचा सर्वसामान्य माणसाला होणारा आनंद मला तिथं अनुभवता आला. पुढच्या टप्प्यावर महसूल विभागाच्या खंड चारमध्ये जी कामं तलाठ्यांची असतात, ती कामं समजून घेतली. त्यांचाही अभ्यास केला. एका रविवारी मी व्ही. पी. सरांना भेटायला गेलो आणि केलेलं काम सांगितलं. ‘खूप छान काम केलं’ असं म्हणत त्यांनी माझी पाठ थोपटली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर असं म्हणाले की, ‘पुढील रविवारी सर्व तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊ. तू केलेलं काम आणि आलेले अनुभव त्यांना सांग.’ त्याप्रमाणं मी दिवसभर त्या बैठकीत केलेलं काम सांगितलं. त्यांनी सदर मीटिंगला मी जे बोलतो ते लिहून घ्यायला तीन स्टेनो बसवले होते. मला ते माहीतच नव्हतं. नंतर काही दिवसांतच त्यांनी मी जे बोललो ते टाईप केलेलं माझ्यासमोर ठेवलं आणि सांगितलं की, ‘हे तू वाचून घे व आवश्यक त्या दुरुस्त्या कर.’ माझं ते टिपण दुरुस्त करून झाल्यावर त्यांनी सदर टिपणाची छोटी मार्गदर्शिका असते, तशी पुस्तिका काढायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी स्वतः इंग्रजीमध्ये प्रस्तावना लिहिली. त्याचाही मी अनुवाद केला. त्यातून सर्कल, तलाठ्यांसमोरील मूलभूत जबाबदाऱ्या अन्‌ कार्यपद्धतीचं एक पुस्तक जन्माला आलं.

माझ्यासाठी हे सगळंच स्वप्नवत होतं. ते पुस्तक सर्कल, तलाठी यांच्या बेसिक कामासाठी बराच काळ उपयुक्त ठरलं. एखाद्याचं कौतुक करत त्याच्या कौशल्याचा नेमका उपयोग कसा करून घेता येतो, याचा तो सुरेख वस्तुपाठ होता. माझ्या प्रशासकीय कार्याची पायाभरणी किती नेमक्या पद्धतीनं झालेली आहे, हे यावरून लक्षात येईल. माझ्या करिअरच्या अतिशय योग्य टप्प्यावर संवेदनशील अन्‌ व्यासंगी प्रशासक व्ही.पी.राजा यांच्या रूपाने भेटला यासाठी स्वत:ला मी नेहमीच भाग्यशाली मानत राहिलो. एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्याकडे आलेल्या नवशिक्यावर किती नेमकं लक्ष देतो, याचं हे दुर्मिळ उदाहरण. या महान माणसासोबत मी माझं प्रोबेशन पूर्ण केलं.

व्ही. पी. राजा हे मूळचे तमिळनाडूचे, पण दिल्लीत वाढलेले होते. त्यांच्या तशा अतिशय कमी काळातील पण खूप मोलाच्या आठवणी (शिकवणी) आजही माझ्या मनात तितक्याच जिवंत आहेत. हे गृहस्थ अत्यंत साधं राहणं पसंत करायचे. मी त्यांचं ‘प्रशासनातील गांधी’ असंच वर्णन नेहमी करतो. ध्येयवादी प्रशासक ही त्यांची ओळख. रोज संध्याकाळी काम संपवताना ते मला म्हणायचे, ‘आज आपण पगाराला पूर्ण न्याय दिला.’ कधी कधी जर मुख्य जबाबदारी सोडून अन्य काही काम आलं, तर रात्री कितीही वेळ लागू दे ते सगळ्या फाईली संपवून घरी जायचे. घरी जाताना आपल्याकडे पगाराला पूर्ण न्याय दिल्याचं समाधान पाहिजे, असा त्यांचा स्वतःशी आग्रह असायचा.

सकाळी त्यांच्याबरोबर ऑफिसला आल्यावर प्रत्येक टपाल, फाईल ते मला अनेकदा दाखवून त्यावर आपली भूमिका मांडायचे. मला त्यातून शिकता यावं म्हणून माझ्याशी चर्चा करायचे. निर्णय काय द्यायचा, हेसुद्धा  अनेकदा विचारायचे. जेव्हा त्यांना व्हिजिटर्स भेटायला यायचे व त्यासाठी चिठ्ठी पाठवायचे, ती पाहून ते मला सांगायचे की, ‘हा आपला आमदार आहे, किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे. अमुक पक्षाचा आहे, तो असा आहे. मी त्यांच्याशी बोलतो. तू निरीक्षण कर आणि मला सांग की, हा माणूस कसा आहे. त्या माणसाच्या बोलण्यातून तो किती खरे बोलतो, किती खोटे बोलतो याबाबत तुझे आकलन सांग.’ तो माणूस गेल्यावर माझ्याशी चर्चा करायचे. त्यातून माणूस समजून घेण्याचे तंत्र मला कळत गेले.

सर कधीही दैनंदिन काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचे नाहीत. ते काम तासांत मोजत नव्हते. काम पूर्ण होण्याला महत्त्व ते द्यायचे. हेच त्यांचे माझ्यावर प्रत्यक्ष झालेले संस्कार. एकदा आमच्याकडे तीन दिवस गव्हर्नर आले होते. त्यांच्यासमवेत आमचा पूर्ण वेळ गेला. शेवटच्या दिवशी ते रात्री अकरा वाजता पुण्याला निघून गेले आणि सर म्हणाले, ‘चला देशमुख ऑफिसला.’ मी म्हणालो, ‘सर, तीन दिवस धावपळ झाली, आता घरी जाऊन तुम्ही आराम करा.’ तर ते म्हणाले, ‘आपण तीन दिवस झाले टपाल आणि फाईल पाहिल्या नाहीत, आता पाहूयात.’ आम्ही दोघं आणि एक शिपाई ऑफिसात गेलो. माझ्याशी चर्चा करीत सरांनी सगळ्या फायली आणि टपाल तीनसाडेतीन तासांत निकाली काढल्या. मगच ते मध्यरात्री नव्हे उत्तररात्री केव्हा तरी घरी गेले. एखादा प्रशासकीय अधिकारी सलग तीन दिवस गव्हर्नरचा दौरा करतो, त्यांच्यासोबत पूर्ण जिल्हा फिरतो आणि तिसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता त्यांना सोडल्यानंतर ऑफिसला येऊन पहाटे तीन-साडेतीनपर्यंत काम करत बसतो- ही माझ्यासाठी अप्रत्यक्षपणे दक्ष कामाची शिकवणच होती. आपण काय आणि किती काम करावं, किती कर्तव्यबुद्धी असावी हे मला त्यानिमित्तानं कळलं.

ते नेहमी म्हणायचे की, ‘पगारापेक्षा आपण 10 पट जास्त काम केलं पाहिजे.’ आज मला असं वाटतं की, त्यांच्या या निकषावर मी 50 टक्के जरी यशस्वी झालो असलो तरी समाधानी आहे. त्यांच्यासोबतच्या कार्यालयीन शिक्षणानंतर मी दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माणला तहसीलदार म्हणून रुजू झालो. दुष्काळी भाग असल्यानं रोजगार हमीची प्रचंड मागणी लोकांकडून होती. लोकांना काम मिळावं म्हणून (चेतना सिन्हा यांचे पती) विजय सिन्हा हे त्या भागात मोर्चे, आंदोलनं करायचे. तसा तो खूप चळवळ्या माणूस. त्यांच्यावर सरकारी कार्यालयावर काढलेल्या आंदोलनांमुळं अनेक केसेस दाखल होत्या. त्या भागातील लोकांची कामाची गरज लक्षात आल्यावर मी ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करत मार्ग काढत गेलो. आणि लोकांना पुरेसं कामं उपलब्ध करून दिलं. लोकांना जगण्याची भ्रांत मिटवायची होती. पण केवळ काम मिळवून द्यायचं हे आपलं काम नाही, तर त्या कामातून काहीतरी फलदायी सामाजिक कामही झालं पाहिजे, ही भावना ठेवली. त्यामुळं त्याचा त्या परिसराला फायदा झाला.

दरम्यानच्या काळात व्ही.पी. राजा यांची बदली झाली. नवे अधिकारी आले. पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्याचं काम सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली. मला एका सकाळी सातला फोन आला जिल्हाधिकाऱ्यांचा. मी म्हणालो, ‘गुड मॉर्निंग सर!’ ते म्हणाले, ‘व्हॉट? गुड मॉर्निंग काय म्हणता? तुमच्या तालुक्यात एक भूकबळी झाला आहे. पेपरला बातमी आहे. बघा.’ मी खाड्‌कन्‌ जागा झालो. मी म्हणालो, ‘सर, इथं पेपर उशिरा येतो.’ ते म्हणाले, ‘ताबडतोब माहिती घ्या अन्‌ मला कळवा.’ मी लगेच ऑफिसला आलो. बातमी खरी होतीच. मला कळलं की, एक बाई भूकबळीनं मृत्युमुखी पडलेली आहे. या प्रसंगानं माझ्या लक्षात आलं की, आपण करत आहोत ते काम पुरेसं नाही. आणखी तत्पर रहात दक्षतेनं प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या परिसरात सर्वदूर कसं पोहोचता येईल, हे पाहिलं पाहिजे.

याच काळात मी जे काम पाण्यासाठी अन्‌ रोजगार हमीसंदर्भात केलं आहे, त्यातून पुढे ‘पाणी! पाणी!!’ या कथा संग्रहातील कथा प्रसिद्ध झाल्या. त्यामध्ये ‘भूकबळी’ हीदेखील कथा आहे. ज्या व्यक्तीला अन्नावाचून जीव गमवावा लागला, त्याचा मी पुरेपूर शोध घेतला. त्याचं झालं असं की, रोजगार हमीचं काम केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात लोकांना त्या काळी धान्याचं कूपन दिलं जायचं. ते कूपन रेशन दुकानात दिलं की, तिथून धान्य मिळायचं. पण ज्या गावात भूकबळी झाला, त्या गावचं दुकान नेमकं सस्पेंड झालं असल्यानं दुसऱ्या गावाला रेशन दुकान जोडलं होतं. तिथला दुकानदार मुलीचं लग्न ठरवून आठ दिवस बालाजी दर्शनाला गेला होता. त्यामुळं भूकबळी पडलेल्या व्यक्तीला धान्य मिळालं नाही, असं काही तरी झालं  असावं. म्हणजे उपासमार झाली असेल किंवा खूप दिवस अशक्त असल्यानं ती व्यक्ती दगावली असेल. पण त्या बाईचा जीव गेल्यानं मी आतून हादरलो होतो. मला प्रचंड वाईट वाटत होतं. त्या प्रकरणानं जबाबदारीचं वेगळं भान दिलं. आपण किती लक्ष द्यायला हवं, याची जाणीव झाली. आपलं काम किती मोठं, किती व्यापक आहे आणि आपण करू तितकं ते कमीच आहे, याचीही जाणीव मला झाली.

लोकांना खऱ्या अर्थानं समाधानी करायचं असेल, तर आपल्याला जास्तीत जास्त शक्तीनं अन्‌ युक्तीनं काम करावं लागेल. आत्ता आहे त्यापेक्षा आपली कामाची क्षमता 10 ते 20 टक्के कशी वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं मला तीव्रतेने वाटू लागलं आणि मग झपाटून कामाला लागलो.

प्रश्न - माणसारख्या दुष्काळी पट्ट्यात काही विशेष प्रयोग केले का? त्याविषयी सांगा.

- माणच्या दुष्काळी पट्ट्यात मी काही अनोखे प्रयोग केले. याच भागातील समाजजीवनानं माझ्या कल्पकतेला चालना दिली. ग्रामीण व त्यात पूर्णतः दुष्काळी भागात अधिकारी म्हणून कधी काय आव्हान येईल, हे सांगता येत नाही. मी माणला असताना दहिवडी गावात पिठाच्या गिरणीवाल्यांनी दळणाचे भाव अचानक वाढवले होते. तेव्हा गावात पिठाच्या आठ गिरण्या होत्या. अगोदर 5 पैसे किलोनं धान्य दळून मिळत असे, परंतु त्याचे भाव अचानक 25 पैसे केले गेले. तब्बल पाचपट भाव वाढल्यानं लोक संतापले. खूप निवेदनं आली. असे भाव वाढणं हा लोकांना अन्याय वाटत होता, ते स्वाभाविक होतं. त्यासंदर्भात पेपरला बातम्या आल्या. अर्थात, गावातल्या पिठाच्या गिरणीशी महसूल विभागाचा तसा काहीच संबंध नसतो. पण मला वाटलं, आपण लक्ष घालावं.

मग मी गिरणीमालकांना बोलावून घेतलं आणि विचारलं की, ‘तुम्ही अचानक भाव का वाढवले?’ तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘वीजबिल वाढलं आहे, त्यामुळं आम्हाला परवडत नाही.’ त्यांची अडचण समजून घेत त्यांना सांगितलं की, ‘हे पाहा, वीजबिल वाढलं असलं तरी तुम्हाला असे दर एकदम पाचपट करता येणार नाहीत. मला हे पटत नाही.’ त्यांनी सगळ्यांनी ही बाब समजून घेतली आणि दळणाचे भाव 10 पैसे करा, असं मी सुचवलं. त्यांनी ते मान्य केलं. लगेच दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली की, तहसीलदारांनी दळणाचे दर कमी केले. जिल्हाधिकारीसाहेबांनी बोलावलं व समाधानानं म्हणाले, ‘देशमुख यू हॅव डन अ ग्रेट जॉब!’ त्यांना त्या साध्या पण महत्त्वाच्या बाबीवर तोडगा काढल्याची गोष्ट आवडली. खरंतर तो आमचा (प्रशसनाचा) अधिकार नाही. पण जबाबदार व्यक्तीनं योग्य पद्धतीनं पुढाकार घेतला तर मार्ग निघतात, हे त्या प्रसंगानं समोर आलं. कारण मुद्दा 10 पैसे किंवा 25 पैशांचा नव्हता; मोठ्या समूहाला जे पटत नव्हतं, त्यावर मार्ग काढण्याचा होता. ती बाब लोकांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणारी होती.

जिल्हाधिकारीसाहेबांनी विचारलं की, ‘हे तू कसं केलंस?’ त्यांना मी सांगितलं की- ‘सर, पिठाच्या गिरणीच्या दराविषयी आपला तसा काही संबंध नव्हता. पण आपण जिल्ह्यातील कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष देऊ शकतो, ही लोकांची भावना लक्षात घेऊन त्यात उतरलो. तहसीलदार हे काम करू शकतात, असं लोकांना वाटतं हीच आपली खरी ताकद असते.’ तेव्हा ते म्हणाले, ‘राइट. माझा हाच विचार आहे. महसूल वसुली अन्‌ इतर ठरवून दिलेली कामं तर आपणच करतोच; पण अशी कामं त्यासोबत करावीत, जी लोकांच्या जीवनाशी निगडित आहेत.’ एका मीटिंगमध्ये ते म्हणाले, ‘देशमुख, हे सर्व तुम्ही इतर अधिकाऱ्यांना समजावून सांगा. गिरणीमालकांशी तुम्ही चर्चा कशी केलीत, दर कसे काढलेत. कसे कमी केले इत्यादी.’ या घटनेनं पहिल्या झटक्यात जिल्ह्यात मी प्रसिद्ध झालो. गोष्ट तशी खूप छोटी होती; पण प्रभाव पाडणारी नक्कीच होती.

असाच एक दुसरा प्रसंग आहे. संजय गांधी निराधार योजनेतून गरिबांना घरं बांधून द्यायची होती. एका गावासाठी 100 घरं मंजूर झाली होती. ती घरं बांधताना स्वतः लक्ष घातलं. प्रत्येक घराला एक न्हाणीघर दिलं आणि प्रत्येक पाच घरांसाठी एक शौचालय बांधलं. (साधारण 1980-81 मध्ये) ती एक छान कॉलनी तयार झाली. तिचं नाव संजयनगर. त्यानंतर लोकांना स्वच्छ कसं राहावं, न्हाणीघर कसं वापरावं, शोषखड्‌ड्यात पाणी कसं गेलं पाहिजे, पाणी रस्त्यावर येता कामा नये. याचंही प्रशिक्षण दिलं.

पहिल्या सहा महिन्यांतच 100 घरं बांधता आली, या कामाचा आनंद फार मोठा होता. कारण सरकारी कामात एक जण योजना आखतो, दुसरा त्याचं बजेट मंजूर करून आणतो, तिसरा ते पूर्ण करतो अन्‌ चौथा उद्‌घाटन करतो. माझ्या कारकिर्दीत पूर्ण व्हायला हवी होती, तशी अन्‌ लोकांच्या अपेक्षांच्या पलीकडची घरं तयार झाली. नंतर त्या भागातून जाता येता ती कॉलनी  पाहिली की खूप बरं वाटत राहिलं.

माणला असताना शिखर शिंगणापूरच्या यात्रे- निमित्तानं घडलेला एक प्रसंग सांगतो. त्या यात्रेच्या काही परंपरा होत्या. मुंगी घाटातून तिथं लोक येतात आणि रात्री बारा वाजण्यापूर्वी महादेवाच्या पिंडीवर कावडीतील पाणी पडायला पाहिजे, नाही पडलं तर यात्रा असफल. त्या वेळी तिथं दोन-तीन लाखांची गर्दी असायची. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासोबत स्थानिकांची बाचाबाची झाली. ते अधिकारी काही तरी बोलून गेले, त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. मग आरडाओरडा झाला. लाठ्याही चालवल्या गेल्या. लोकं चिडले होते. पोलिसांवर नारळ फेकत होते. मला ही घटना कळली. मी तत्काळ घटनास्थळाकडे निघालो. घाटातून येणाऱ्या लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. अतिशय अवघड घाट पार करून लोक भक्तिभावानं येत होतं. अशातच एका घोळक्यातून मोठा आवाज आला.

मी तिथं येऊन विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की, लोक खूप चिडलेत. तो संबधित अधिकारी अचानक बोलून गेला की ‘मी तहसीलदार साहेबांकडे फायरिंगची परमिशन मागणार आहे.’ त्याचं बोलणं तिथल्या चार-सहा लोकांनी ऐकल्यानं ते लोक उत्तेजित तर झालेच, शिवाय भयभीतही. मी त्या पोलिस अधिकाऱ्याला जोरात ‘स्टॉपऽऽ’ असं म्हणालो. त्याला हे पण लोकांसमोर सांगितलं की, ‘हे भक्त आहेत, ते काही वावगं करणार नाहीत. तुमच्या बंदोबस्ताशिवाय मी परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. तुमचा बंदोबस्त नसला तरी चालेल, पण या भक्तांवर फायरिंग केलेली मला चालणार नाही.’ हे सगळं मी लाऊडस्पीकरवर भक्तांना कळावं म्हणून मुद्दामच बोललो. लोकांच्या जवळपास तीन किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या. पुजाऱ्यानं भीतीनं मंदिराचं दार बंद केलं होतं. लोक चुळबूळ करीत होते.

तेव्हा मी दरवाज्यात जाऊन उभा राहिलो. आजपर्यंत वाचलेले संत, देव, धर्म यांविषयी कीर्तनवजा एक ते दीड तास बोललो. काय बोललो, आता सांगणं अवघड आहे. ‘पोलीस अधिकारी जे बोलले, ते बेतालपण आहे. तुम्ही काळजी करू नका. मी सगळी शस्त्रं ताब्यात घेतली आहेत. कुणालाही काहीही होणार नाही. फायरिंग होणार नाही. मी इथं आहे; सर्वांनी शांतपणे दर्शन करा. सर्व काही व्यवस्थित होईल. यात्रा सुखरूप संपन्न करण्याची जबाबदारी माझी.’ असं काहीसं मी सांगितलं आणि लोक शांत झाले. यात्रा कोणतंही गालबोट न लागता पार पडली, एव्हाना साताऱ्याला सर्व काही कळलं होतं. आमच्या कलेक्टरांनी निवासी उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाठवलं होतं. मात्र तोपर्यंत सर्व काही शांत झालं होतं. मग सगळा रिपोर्ट गेला. दुसऱ्या दिवशी कलेक्टर मुंबईहून गडबडीनं आले. मला म्हणाले, ‘तुम्ही उत्तम जबाबदारी पार पाडलीत. मोठा रक्तपात टळला.’ शिखर शिंगणापूर म्हणजे शिवाजी-महाराजांचं वैयक्तिक देवस्थान. तिथं त्यानंतर राजमाता आल्या. त्यांनीही माझं कौतुक केलं.

माणमध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून पाच गावं छान विकसित करावीत, अशी कल्पना मला सुचली. योग्य नियोजन करून ते काम यशस्वी केलं. या पाच गावांतल्या लोकांची माहिती सर्वांगीण घेतली. ज्यांना रेशनकार्ड नाही, त्यांना द्यायचं. ज्यांना जमीन नाही, ते जमीनवाटपाच्या नियमात बसतात का, हे पाहण्याचं काम केलं. जिथं विजेची सोय नसेल तिथं ती करून दिली. एखाद्या गावात एस.टी. जात नसेल तर ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. अशा लहान-लहान गोष्टी करत गेलो. मी सर्व गावांचे सगळे महसुली रेकॉर्ड म्हणजेच एक ते एकवीस फॉर्म अद्ययावत करून घेतले. अशी अनेक छोटी-मोठी कामं करत गेलो. लोकोपयोगी कामं छोटी की मोठी यापेक्षा ती गरीब समूहांना फायद्याची आहेत, हे लक्षात घेऊन करत राहिलो, अशा कामाचे परिणाम मोजता येत नाहीत, पण निश्चितच परिवर्तनाला बळ देणारे असतात. या अन्‌ अशाच कामातून लोकांचे प्रश्न सोडवणारा तहसीलदार म्हणून माझी ख्याती झाली. त्यामुळं माझे ते आठ महिने खूप छान गेले. (क्रमश:)

संवादक : किशोर रक्ताटे

Tags: मुलाखत किशोर रक्ताटे mulakhat kishor raktate interview weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


Comments

  1. Sonal- 14 Jan 2020

    Nice Article.....

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके