डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘नाही रे’ वर्गाशी स्वतःची नाळ जुळवून घेत समाजातील प्रश्नांचा वेध घेणारा मी लेखक आहे.

लेखन व प्रशासन माझ्या जीवनात हातात हात घालून सतत चालत आले आहेत. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे न करता येणारे ते दोन पैलू आहेत. प्रशासनात जेवढी प्रगती करता येत होती, तेवढी गाठली. उपजिल्हाधिकारी ते सचिव ही करिअर मी प्रत्येक ठिकाणी चाकोरीबाहेरची कामं करत माझ्या परीनं पुरेपूर न्याय दिला. प्रामाणिक व भ्रष्टाचार विरहित प्रशासन दिलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. याला समांतर माझी लेखन कारकीर्द घडली. ‘नाही रे’ वर्गाशी स्वतःची नाळ जुळवून घेत समाजातील प्रश्नांचा वेध घेणारा मी लेखक आहे. ते माझं वेगळेपण आहे. बालमजुरी, स्त्री-भ्रूण हत्या व पाणी टंचाई- दुष्काळावर अनुक्रमे ‘हरवलेले बालपण’,‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’, व ‘पाणी! पाणी!!’ ही पुस्तकं लिहिली. ती वाचकांना खूप आवडली होती. ‘अंधेरनगरी’ व ‘ऑक्टोपस’ या माझ्या नगरपालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा वेध घेणाऱ्या व ‘इनसायडर व्ह्यू’ देणाऱ्या राजकीय कादंबऱ्या आहेत.

प्रश्न - सर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारीपद अन्‌ तिथली तुमची कारकीर्द सर्वदूर परिचित आहे. कोल्हापूर तुम्ही गाजवलेलं आहे; त्याबाबत काय सांगाल?

 - 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर विलासराव देशमुख यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यांच्या जागेवर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यामुळं आपसूक सत्तेत बदल झाला की खाली बदल होतात; त्यावेळी माझी पण बदली अपेक्षित होती. मलाही आता क्रीडा विभागातून बाहेर पडायचं होते. 2009 च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तेव्हा कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी स्थानिक असल्यामुळं त्यांची बदली होणं क्रमप्राप्त होतं. तिथं मला मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती दिली आणि मी रुजू झालो. मी कोल्हापूरला साडेतीन वर्षे जिल्हाधिकारी होतो. माझ्या कारकिर्दीचा हा सुवर्णकाळ होता. मी मनाशी ठरवलं होतं की, ज्यासाठी आपण 1983 ते 2009 पर्यंत करीअर घडवीत गुणवत्तेने जिज्हाधिकारीपद मिळालं, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि मग राज्यशासनानं सुरू केलेल्या उत्कृष्ट जिल्हाधिकारीपदाचा पहिला मानकरी मी ठरलो.

तिथं मी दोन महत्त्वाची कामं केली होती. पहिलं काम म्हणजे स्त्री-भ्रूण हत्या रोखत लिंग दर वाढविण्यासाठी ‘सेव्ह द बेबी गर्ल’ ही आय. टी. तंत्रज्ञानाच्या आधारे यशस्वी केलेली मोहीम! खरं तर माझ्या जागी एखादा थेट आय.ए.एस. अधिकारी असता, तर त्याला या कामासाठी मॅगसेसे पुरस्कार मिळाला असता; पण माझ्या या कामाआड राज्य शासनामध्ये आरोग्य अधिकारी व मंत्री झारीतले शुक्राचार्य झाले. ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करत ‘सायलेंट ऑब्झर्व्हर’ ही कॉम्प्युटर चीप मी तंत्रज्ञ गिरीश लाड यांच्या मदतीनं बनवली व जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांवर सक्तीनं बसवली. एखादी गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी यायची तेव्हा ती टेस्ट पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड त्या ‘सायलेंट ऑब्झर्वर’मध्ये व्हायची आणि त्यावरून डॉक्टरांनी लिंग निदान केले का, केवळ मुलीचा गर्भ आहे म्हणून बेकायदा गर्भपात केला का, हे समजून यायचं. हा बेकायदेशीर डॉक्टरांसाठी रोधक-डिटरंट होता, तर चांगल्या डॉक्टरांसाठी संरक्षण!

मी व माझ्या सहकाऱ्यांनी दोन वर्षे झपाटून जात हे तंत्रज्ञान जवळपास पूर्ण निर्दोष विकसित केलं आणि अनेक दोषी डॉक्टर्सवर केसेस केल्या. त्यांना कोर्टात शिक्षाही झाल्या. ऑनलाईन सोनोग्राफी तपासणी फॉर्म दररोज भरणं व ‘सायलेंट ऑब्झर्व्हर’ या दुहेरी उपायानं कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री-भू्रण हत्येस चांगलाच आळा बसला. दोन वर्षात जिल्ह्याचा सेक्स रेशो - लिंग दर 830 वरून 921 पर्यंत वाढला, तो राष्ट्रीय व राज्याच्या सरासरीपेक्षा 2011-12 सालीही बराच वर होता. या कामाचं माध्यमांनी खूप स्वागत केलं आणि मला ‘नॅसकॉम’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘मंथन’ व ‘ई- इंडिया’ हे चार मानाचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. टाईम्सचे पारितोषिक तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते मिळालं, त्यावेळी उपस्थित सीताराम येचुरी, सुषमा स्वराज, नवीन जिंदाल, डॉली ठाकूर आणि फरहान अख्तर यांनी मला भेटून कौतुकही केलं होतं.

पण डॉक्टर्सच्या काही संघटना विरोधात होत्या, हे सांगितलच पाहिजे. विशेषत्वानं रेडिओलॉजिस्टची संघटना. तिच्या सचिवांनी मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केली. पण आम्ही ही केस जिंकलो. निकालपत्रात माझ्या कामाची प्रशंसा करत पूर्ण राज्यात तो लागू करावा, असंही नमूद केलं होतं. राज्यशासनानं ते मान्य केलं आणि विधानसभा - विधानपरिषदेत तशी घोषणाही झाली. पण तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या विरोधामुळं ती महाराष्ट्रात लागू झाली नाही. मंत्र्यांना या तंत्रज्ञानाधारित ‘सायलेंट ऑब्झर्वर’ची परिणामकारकता पटवून देण्याचा मी बराच प्रयत्न केला. पण डॉक्टरांच्या प्रभावशाली लॉबीचा दबाव असेल किंवा अन्य काही कारणे असतील, त्यांनी माझा प्रॉजेक्ट जवळपास मारून टाकला. आज तो राजस्थानमध्ये व भारताच्या इतर काही जिल्ह्यांत चालू आहे; पण केंद्र सरकारची उदासीनता व सल्लागार समिती सदस्यांचा आंधळा विरोध यामुळं तो केंद्र स्वीकारेल, असं मला वाटत नाही. खरंतर मी 2011 मध्ये म्हणत होतो, जर माझं तंत्रज्ञान केंद्रानं स्वीकारून देशात लागू केलं तर 2021 चा जनगणनेत सेक्स रेशो नॉर्मल होईल, जो आज 883 पर्यंत घसरला आहे. या मुलाखतीच्या वेळी वृत्तपत्रात अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

कोल्हापूरला माझ्याकडून यशस्वी झालेलं दुसरे मोठं काम म्हणजे ‘ई-चावडी’. प्रत्येक तलाठ्याला लॅपटॉप व प्रिंटर दिला होता. लॅपटॉपमध्ये सातबारा फीड करून शेतकऱ्यांनी मागता क्षणी प्रिंटरच्या साहाय्याने सातबाराची सुबक प्रिंट झालेली प्रत देणं, हे या उपक्रमाचं स्वरूप होतं. 1 जानेवारी 2010 ला तलाठ्यांची कार्यशाळा घेऊन योजनेचं स्वरूप विषद करत ‘ई- चावडी’ची घोषणा केली आणि दीड वर्षे कल्पकतेनं व जिद्दीनं काम करून ती यशस्वी केली. माझे सर्व तलाठी हायटेक बनले होते. त्याचं सादरीकरण मी तत्कालीन महसूल सचिव व मंत्र्यांपुढं केलं. त्यांना ते बेहद्द आवडलं आणि 2012 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘सुवर्णजयंती राजस्व अभियान’ नावाचा शासननिर्णय जारी करून पूर्ण महाराष्ट्रासाठी कोल्हापूर पॅटर्नचा ‘ई-चावडी’ उपक्रम लागू केला. मला हेही काम मनस्वी समाधान देऊन गेलं. पण त्यासाठी कमी कष्ट पडले नाहीत की कमी त्रास व विरोध झाला नाही. माझ्या ध्यासपर्वामध्ये हा उपक्रम होता व तो मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशस्वी केला.

पुरवठा विभागात एस.एम.एस. सेवेचा वापर असाच कल्पकतेनं धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी केला व तोही कमालीचा यशस्वी झाला. त्याचं स्वरूप असं होतं- जेव्हा रेशन दुकानदार गोडावूनला धान्य घेण्यासाठी यायचे. तेव्हा आमचा पुरवठा कर्मचारी लॅपटॉप व मोबाईलद्वारे त्या गावातील शंभर नागरिकांना एस.एम.एस. पाठवून किती धान्य दिलं हे कळवायचे. त्यामुळं तेवढं धान्य गावात पोचलं की नाही, हे जागरूक नागरिक आम्हाला मोबाईल मेसेज पाठवून कळवायचे. त्यामुळं गावात धान्य न नेणे किंवा निम्मे शिम्मे नेणे व उरलेले शहरात काळ्या बाजारात विकणे या अनिष्ट प्रथेला परिणामकारकरित्या आळा बसला. मुख्य म्हणजे धान्याची बचत तर झालीच, पण गोरगरिबांना पूर्ण धान्य रास्त दरानं मिळू लागलं. याचे दाखले जेव्हा जेव्हा मी गावांत कामानिमित्त जायचो तेव्हा लोकांकडून उत्स्फूर्तपणे मिळायचे. त्यामुळं म. गांधी प्रणित ‘अंत्योदय’ योजना साकार करत शेवटच्या माणसाचा अश्रू पुसायचा सार्थ प्रयत्न केला. हे माझ्या हातून घडलं, याचं समाधान मला शब्दात- लेखक असूनही सांगता येणार नाही.

हीच बाब आहे केरोसीनचा काळाबाजार रोखण्याची. त्यासाठी सर्व केरोसीन टँकर्सवर ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ म्हणजेच ‘व्ही.टी.एस.’ यंत्रणा बसवली. त्यामुळं टँकर कुठं, केव्हा गेला हे कळायचं. त्याची आगाऊ सूचना गावकऱ्यांना दिली जायची. टँकर गावी आला नाही की त्याची खबर तेच द्यायचे. त्यामुळं टँकरवाल्यांवर वचक निर्माण झाला होता. त्यात आणखी सुधारणा करून ‘व्हेईकल ट्रॅकिंग ॲण्ड स्टॉपिंग सिस्टिम’ बसवली, ज्यामुळं टँकर  नियोजित गावी गेला नाही की, आमचे पुरवठा अधिकारी मोबाईलवर कोड नंबर फिरवायचे व त्यामुळं टँकर थांबला की जाम व्हायचा. पुन्हा कोड नंबर फिरवल्याविना तो सुरू व्हायचा नाही. त्यामुळं जॅम झालेला टँकर जप्त करणं शक्य व्हायचं. ही अफलातून अशी ‘आउट ऑफ बॉक्स’ योजना मी व माझे तंत्रज्ञ गिरीश लाड यांची होती. तिचं प्रात्याक्षिक पुरवठा मंत्र्यांना दाखवलं होतं. ते त्यावर बेहद्द खूश होते. पूर्ण राज्यात ही योजना लागू करू, अशी त्यांनी घोषणा केली होती. अर्थातच अपेक्षेप्रमाणं काही झाले नाही.

पण मी माझ्या परीनं जिल्ह्यात प्रामाणिकपणे व चाकोरीबाहेरचं काम करून नागरिकांना समाधान देता येतं व काळाबाजार रोखता येतो, हे दाखवून दिलं; पण- पुन्हा हाच पण आडवा येतो. हे राज्यभर लागू होणं शक्य नव्हतं. कारण प्रभावी पुरवठा लॉबी. पुन्हा असं काही आमच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना तरी कुठं आवडणार होतं? असो. मी कोल्हापूरला अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यात प्रामुख्यानं कलेक्टर ज्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्या बालसंकुलनामक रिमांड होमसाठी लोकसहभागातून दोन कोटी रुपये जमवून तीन मजली दोन इमारती बांधल्या. त्याच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढं आल्या. क्रेडाईनं बांधकामाचा जिम्मा घेतला. माझी बदली होण्यापूर्वी एक इमारत पूर्ण झाली तर दुसरीची पायाभरणी. पण त्यासाठी लागणारा निधी पूर्ण जमा झाला होता. आज ही इमारत पाहतो, तेव्हा मनस्वी समाधान वाटतं.

बालसंकुलची एक चांगली परंपरा होती व आहे, ती म्हणजे मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला स्वतःच्या पायावर उभं करणं किंवा तिचा विवाह जुळवणं. त्यासाठी आम्ही दाते व मानस वधुपिता शोधायचो. त्यांनी मुलीचं सालंकृत कन्यादान पूर्ण विवाह खर्च करून करायचं. हेतू हाच की, इथल्या अनाथ मुलीच्या जीवनातला लग्नाचा दिवस कायम चिरस्मरणीय व्हावा. मी पण एका मुलीचं- विद्याचं कन्यादान केलं. जिल्हाधिकारी बंगल्यावर पोलीस बँडसह तिचं धुमधडाक्यात लग्न लावलं. हे लग्न फार गाजलं. ‘रेडिओ मिर्ची’नं त्याचा इव्हेंट केला व दिवसभर अनेक सिनेतारका- विद्या बालन, दिव्या दत्त आदी- विद्याला व आम्हा उभयतांना शुभेच्छा देत होते. या प्रसंगानंतर बालसंकुलाकडे मदतीचा ओघ वाढला, हे सांगितलं पाहिजे. अनाथ मुलांसाठी मला काही काम करता आलं, हे माझं भाग्य म्हटलं पाहिजे. असो.

मी कोल्हापूरला अपंगांचे आनंद मेळे, बेरोजगार मेळे एका संस्थेच्या मदतीनं दोन वर्ष घेतले. बॉक्साईट वाहतूक करताना ट्रॅक्टरखाली येऊन मृत झालेल्या काही व्यक्तींच्या कुटुंबीयांना कंपनीकडून पाच पाच लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून माझा नैतिक प्रभाव वापरून मिळवून दिले व त्या कुटुंबांना दिलासा दिला. पर्यटन विकासासाठी तीन वर्षे चार-चार दिवसांचा भरगच्च असा ‘कोल्हापूर महोत्सव’ घेतला. तो आजही कोल्हापूरकरांच्या स्मरणात आहे. ‘बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी’च्या मदतीनं 2010 पासून ‘कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ चंद्रकांत जोशी व दिलीप बापटांच्या मदतीनं सुरू केला, तो आजही चालू आहे. ‘साप्ताहिक साधना’च्या वतीनं तिथं ‘कथा’ या विषयावर साहित्य संमेलन भरवलं. त्या मागची प्रेरणा दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकरांची होती. अत्यंत देखण्या व कॉर्पोरेट लुकच्या शाहूवाडी व कागलच्या प्रशासकीय इमारती पूर्ण झाल्या. त्यासाठी मी जातीनं लक्ष घालत होतो.

शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षात लोकवर्गणीतून दसरा चौकात शाहू स्मारक भवन उभारले होते, त्याचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. मी रुजू झालो, तेव्हा बऱ्याच वाईट अवस्थेत होतं. त्यामुळं विश्वस्त बाबुराव धारवाडे व माजी कुलगुरू कणबरकर सरांना विश्वासात घेऊन त्याचे दीड वर्षात पुनरुज्जीवन व नूतनीकरण केले. त्यात मुख्य सभागृहाची आसन क्षमता वाढवणं, एअरकुल यंत्रणा बसवणं, एक नवं कलादालन, तीन मजली ग्रंथालय, 150 आसन क्षमतेचं नवं सभागृह आणि शाहू महाराजांच्या जीवनातील निवडक प्रसंगांवर आधारित देखणं व कलात्मक म्युरल यांचा समावेश होता. आज हे स्मारक कोल्हापूरचं सांस्कृतिक केंद्र झालं आहे. तसंच शाहू जन्म स्थळ विकासाचा प्रश्न प्रलंबित होता, त्यालाही चालना दिली. या सर्व कामामुळं माझ्यासाठी प्रशासकीय कारकिर्दीचा सुवर्णकळस ठरावा, अशी जिल्हाधिकारीपदाची ही कोल्हापूरमधली साडेतीन वर्षं होती, असं मी मानतो. त्यामुळं पदोन्नतीवर बदली झाल्यावर माझा भावपूर्ण असा फार मोठा निरोप समारंभ झाला. त्यावेळी सध्याच्या शाहू छत्रपतींनी ‘शाहू महाराजांच्याप्रमाणं काम केलं’ अशा शब्दात माझा गौरव केला, त्याचं मला विशेष अप्रूप आहे.

हे कदाचित प्रशासनातील व राजकारणातील माणसांना खरं वाटणार नाही, पण माझ्या कोल्हापूर इथल्या कामाचा  बेंचमार्क मंत्री, आमदार वा सचिव नव्हते. माझ्यासाठी तिथले तीन महान नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, एन.डी.पाटील आणि सा. रे.पाटील हे बेंचमार्क होते. त्यांना जर माझं काम समाधानकारक वाटलं तर मी खरा चांगला अधिकारी असं त्यावेळी अनेकांना म्हणालो होतो. पानसरेंनी मला बदलीनंतर त्यांच्या घरी आवर्जून बोलावलं होतं, तर आप्पासाहेब सा. रे. पाटील माझ्यासाठी फादर फिगर होते. मला प्रांजळपणे वाटतं की, त्यांच्या उच्च नैतिक कसोटीवर बऱ्याच अंशी नक्कीच उतरलो असणार.

प्रश्न - कोल्हापूरहून पदोन्नतीनं तुम्ही मुंबईला फिल्मसिटीचे एम.डी. म्हणून गेलात, ती तुमची शेवटची पोस्टिंग होती. तो अनुभव कसा होता?

 - माझी पदोन्नतीनंतर औरंगाबादला विभागीय आयुक्त म्हणून जाण्याची संधी राजकारणामुळं हुकली. त्यावेळी (म्हणजे 2012-14 मध्ये) मराठवाडा दुष्काळात होरपळत होता. तिथं मला करिअरच्या शेवटी सर्वोत्तम स्वरूपाचं काम करून दाखवायची, म्हणजे दुष्काळाशी यशस्वी सामना करण्याची संधी मिळाली असती. पण ती हुकली. त्यामुळं सुरुवातीला मुंबईला फिल्मसिटीत एम.डी. म्हणून जायला काहीसा निरुत्साही होतो. पण तिथं मी सेवानिवृत्तीपूर्वीची अडीच वर्षे अत्यंत छानपैकी घालवली. कारण शासन सेवेत कुठंही जा, तिथं वेगळे काही काम करून दाखवण्याची संधी असते. इथंही मला माझ्या कामाचा अजेंडा अल्पावधीतच सापडला आणि तो राबवता आला.

इथं मी चित्रपट उद्योगासाठी काही उपक्रम राबवू शकलो. फिल्मसिटीची स्थापना हिंदी (बॉलीवूड) व मराठी चित्रपटांना मुंबईत एका छताखाली शूटिंगच्या सर्व सुविधा मिळाव्यात या उद्देशानं शासनानं व्ही. शांताराम, बी.आर. चोप्रा व दिलीपकुमार आदींच्या मार्गदर्शनाखाली केली होती. शूटिंगसाठी लागणारे पंचवीस लोकेशन्स- ठिकाणं आणि अद्ययावत असे वीस स्टुडिओज उभारले गेले होते. इथं मी स्टुडिओमधील सुविधा नव्यानं दर्जेदार केल्या, तिथे सुखदायी वातानुकुलित यंत्रणा केल्या, नवे लोकेशन्स विकसित केले आणि दोन वर्षात फिल्मसिटीचा फायदा पाच कोटींवरून पंचवीस कोटींपर्यंत नेला.

दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला उत्तेजन मिळावं म्हणून शासन अनुदान देतं. त्याचे माझ्या काळात नव्यानं नियम बनवण्यात आले आणि चित्रपटाचं अनुदानही वाढवलं. फिल्मसिटीला अत्याधुनिक करावे व ते एक पर्यटन केंद्र बनावं म्हणून विकासाचा बृहद आराखडा बनवण्याचं अत्यंत आव्हानदायी काम करण्याची संधी मिळाली. सल्लागारांच्या मदतीनं अक्षरशः दर आठवड्यास बैठक घेत फिल्मसिटीच्या आधुनिकीकरणाचा मास्टर प्लॅन बनवला. त्यात शंभर एकर जागेचा विकास अभिप्रेत होता.

त्यात हॉलीवूडच्या तोडीच्या प्रगत तंत्रज्ञांनी युक्त असे तीस स्टुडिओज, चित्रपटांना लागणारे विमानतळ, रेल्वे, शाळा, मॉल्स, चाळ, खेडेगाव-शहराचे विविध लोकेशन्स- जे थोड्याशा आर्टवर्कने प्रत्येक निर्मात्यास बदलता येणे शक्य होतं- प्री व पोस्ट प्रॉडक्शनच्या सुविधा, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी बॉलीवूड म्युझियम, मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे म्युझियम, फिल्म ॲवॉर्ड व उद्योग जगतासाठी पाच हजार क्षमतेचं कन्व्हेन्शन सेंटर, फिल्मी राइड्‌स असणारी मनोरंजन नगरी, चित्रपट कलावंतांच्या निवासासाठी पंचतारांकित हॉटेल व डॉर्मेटरीज असे विविध घटक मास्टर प्लॅनमध्ये होते. सुमारे अडीच हजार कोटींचा प्लॅन होता, तो बांधा-वापराहस्तांतरित करा (बी.ओ.टी.) तत्त्वावर उभारायचा होता. तो दोन टप्प्यात पूर्ण करायचा होता. त्यामुळं फिल्मसिटीचे उत्पन्न वर्षाला पाचशे कोटीपर्यंत पोचण्याची शक्यता होती. हा आराखडा तयार झाला, तो शासनानं माझ्या काळात तत्त्वतः मंजूर केला; पण सर्व परवानग्या व इतर कायदेशीर प्रक्रिया होऊन 2017 मध्ये आताच्या सरकारनं त्यास अंतिम मंजुरी दिली आहे.

तो लवकर सुरू व्हावा व पुढील याच वर्षात पूर्ण झालेला पहायला मिळावा म्हणजे मला सार्थकता मिळेल; पण ती दोन वर्षे चाललेलं काम माझ्या प्रतिभेला एक आनंदी आव्हान होतं, असं मी म्हणेन. या काळात अनेक कलावंतांना जवळून पाहिलं. विशेषतः मराठी कलावंतांना; पण हिंदी कलावंतांचा अनुभव फारसा सुखद नाही. पोलंडचे सांस्कृतिक मंत्री आले असता त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर अमिताभ बच्चननं पूर्वसूचना दिलेली असूनही अर्धा तास ताटकळत ठेवलं, हे मला खटकलं होतं. संजय लीला भन्साळीच्या ‘रामलीला’ चित्रपटाचं त्यावेळी शूटिंग चालू होतं, ते तर भेटायला सेटवर पण आले नाहीत, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. असाच प्रकार हमीद करझाई या राष्ट्राध्यक्षांबाबत घडला होता. त्यांना सलमान खानला फोर्टमध्ये उतरलेल्या ताज हॉटेलमध्ये भेटायचं होतं. आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केला; पण उद्‌धट सलमान खाननं त्यांनाच मेहबूब स्टुडिओत यावं असं कळवलं. हा राजनैतिक शिष्टाचाराचा भंग होता; पण सुमार बुद्धीचा अभिनय करणाऱ्या सलमान खानला त्याचं काय? तसंच संजय लीला भन्साळीचा माजोरीपणा सेटवर आलेल्या एका परदेशाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना न भेटण्याच्या कृतीतून दिसून आला होता.

हे हिंदी कलावंत आपल्याच धुंदीत कसे असतात, हेच यावरून दिसून आलं. त्यामुळं मी कुणाही कलावंतांना भेटायला कधी सेटवर गेलो नाही. याला अपवाद ठरले, ते श्याम बेनेगल! दादासाहेब फाळके विजेते व सत्यजित रे यांच्यानंतरचे सर्वांत मोठे कलात्मक समांतर सिनेमांचे दिग्दर्शक श्याम बेनेगल अत्यंत साधे, डाउन टू अर्थ आणि माणूस म्हणून आभाळभर उंचीचे मला जाणवले. त्यांना फिल्मसिटीत राज्यसभा टीव्हीसाठी ‘संविधान’ सिरीयल शूट करायची होती. त्यांना शूटिंगसाठीच्या फीमध्ये सूट हवी होती. भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, त्याची दहा तासांची दहा भागांची मालिका होती. अशा राष्ट्रीय मूल्यांचा चित्रपट-मालिकांना पन्नास टक्के सूट देता येत होती. मी तसा प्रस्ताव माझ्या सांस्कृतिक मंत्र्यांपुढं ठेवला, पण सात-आठ मीटिंगा होऊनही त्यांनी त्याला मंजुरी दिली नाही. बेनेगल यासाठी मला का भेटत नाहीत,  हा त्यांचा प्रश्न होता, तेव्हा मी अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला.

बेनेगलांचा मला त्या सहा महिन्यात जो सहवास लाभला, ज्या बौद्धिक चर्चा झाल्या त्या मला समृद्ध करून गेल्या. त्यांच्यामुळं गोविंद निहलानी, संविधान सिरीअलचे लेखक शमा झैदी व अतुल तिवारी तिच्यात काम करणारे सचिन खेडेकर, टॉम अल्टर, दिलीप ताहेल आदी कलावंतांशी परिचय झाला. या साऱ्यांशी बऱ्याच चर्चा झाल्या आणि माझ्या नजरेसमोर ‘संविधान’ त्या काळात कसं निर्माण झालं, हे साक्षात उलगडत गेलं. ‘संविधान’ची संहिता मी वाचली. ती इंग्रजी व हिंदी- उर्दूत होती. कारण संविधानसभेत याच भाषेत चर्चा व्हायच्या. संहिता वाचून मला वाटलं की त्याचा मराठीत अनुवाद करावा. त्याला श्याम बेनेगलनी परवानगी दिली व 2016 मध्ये ती पटकथा ‘साप्ताहिक साधना’मध्ये क्रमशः तीस आठवडे छापली गेली. वाचकांचा त्याला अपेक्षेप्रमाणे उत्तम प्रतिसाद लाभला.

प्रश्न - सेवानिवृत्तीनंतरचं तुमचं आजवरचं जीवन वाचकांना जाणून घ्यायला आवडेल.

- मी ऑक्टोबर 2014 मध्ये फिल्मसिटीमधूनच निवृत्त झालो व पुण्यास स्थायिक झालो. मागील तीन वर्षे तशी शांत-संथ गेली. पण या काळात भरीव लेखन झालं. याच काळात मला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या विद्‌वत सभेचा- ॲकॅडेमिक काउन्सिलचा सदस्य म्हणून व शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तिथं मी कौशल्य अभ्यासक्रमासाठी काम केलं; पण यू.जी.सी.च्या नियमांमुळं फारसं काही करता आलं नाही, हे कबूल केलं पाहिजे. गेल्या वर्षभरापासून आळंदीच्या संत ज्ञानेश्वर संस्थानाचा विश्वस्त म्हणून काम पहात आहे. संस्थानाच्या कामाला सामाजिक वळण देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात पसायदान विचार साहित्य संमेलन, आळंदी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणे व देहू ते आळंदी हा इंद्रायणी नदीचा परिसर दोन्ही तीराकडून स्वच्छ व हरित करणे व ठेवणे यासाठी काम सुरू केले आहे, ते पुढील काळात तडीस नेण्याचा प्रयत्न आहे.

मी 2015 मध्ये नांदेडच्या 36 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, तेव्हाचं माझं अध्यक्षीय भाषण बऱ्याच प्रमाणात मराठी जगताला आवडलं होतं. पण 2018 च्या सुरुवातीला मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईन, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि त्याहून अधिक म्हणजे माझं अध्यक्षीय भाषण एवढं गाजेल व त्याचं एवढं व्यापक स्वागत होईल, असंही वाटलं नव्हतं. ‘एका लेखकाचं धारिष्ट्य’ नावाचा महाराष्ट्र टाइम्सनं अग्रलेख लिहून माझा गौरव केला. लोकमत, लोकसत्ता, तरुण भारत व एकूणच सर्व वृत्तपत्रांनी माझ्या अध्यक्षीय भाषणाची सविस्तर दखल घेतली, हे महत्त्वाचं! आता मला या वर्षात मराठी भाषा व साहित्यासाठी एक कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून काही ठोस कामे करायची आहेत. मी अखंड कार्यरत राहणार आहे. त्यातच मला आनंद आहे.

प्रश्न - धन्यवाद. तुम्ही तुमची प्रशासकीय कारकीर्द उलगडून दाखवली. मुलाखतीत आम्ही जाणीवपूर्वकच लेखनावर फोकस ठेवला नाही, कारण गेली तीन महिने सर्व वृत्तपत्रांत यावर खूप येऊन गेलंय.. तुम्ही मुलाखतीचा समारोप करताना काय सांगाल?

- हेच की, लेखन व प्रशासन माझ्या जीवनात हातात हात घालून सतत चालत आले आहेत. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे न करता येणारे ते दोन पैलू आहेत. प्रशासनात जेवढी प्रगती करता येत होती, तेवढी गाठली. उपजिल्हाधिकारी ते सचिव ही करिअर मी प्रत्येक ठिकाणी चाकोरीबाहेरची कामं करत माझ्या परीनं पुरेपूर न्याय दिला. प्रामाणिक व भ्रष्टाचार विरहित प्रशासन दिलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. मुख्य म्हणजे प्रशासनाला मानवी चेहरा देत शक्य तितक्या माणसांचे प्रश्न आस्थेनं सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पदी विकास कामेही विपुल प्रमाणात मला करता आली, हे का कमी आहे? याला समांतर माझी लेखन कारकीर्द घडली. ‘नाही रे’ वर्गाशी स्वतःची नाळ जुळवून घेत समाजातील प्रश्नांचा वेध घेणारा मी लेखक आहे. ते माझं वेगळेपण आहे.

बालमजुरी, स्त्री-भ्रूण हत्या व पाणी टंचाई- दुष्काळावर अनुक्रमे ‘हरवलेले बालपण’,‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’, व ‘पाणी! पाणी!!’ ही पुस्तकं लिहिली. ती वाचकांना खूप आवडली होती. ‘अंधेरनगरी’ व ‘ऑक्टोपस’ या माझ्या नगरपालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा वेध घेणाऱ्या व ‘इनसायडर व्ह्यू’ देणाऱ्या राजकीय कादंबऱ्या आहेत. पैकी ‘अंधेरनगरी’ ही कादंबरी विजय तेंडुलकरांना बेहद  आवडली होती. हे खुद्द दत्तप्रसाद दाभोळकरांनीच मला अलीकडेच कोल्हापूरला माझ्या (संमेलनाध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीनंतर झालेल्या) नागरी सत्कार समारंभात जाहीरपणे सांगितलं. ‘बखर भारतीय प्रशासनाची’ ही नोकरशाहीचा इतिहास व वर्तमानाची तसंच तिच्या सामर्थ्य व कमतरतेबाबत सखोल चर्चा करणारी लेख मालिका ‘साप्ताहिक साधना’मधून दोन वर्षे प्रसिद्ध होत होती. तिचं पुस्तकही वाखाणलं गेलं. याखेरीज कथा व ललितेतर साहित्य विपुल लिहिलं. बडोदा संमेलनात एकाच वेळी माझी चार पुस्तकं प्रकाशित झाली. ‘यंग इंडियाचा ग्रुप सेल्फी’, ‘गाव विकणे आहे’, ‘आकाश जिंकेन मी’ व ‘स्त्री सुक्त’.

पुढील काळात एक कादंबरी व एक लेखमाला पुस्तकरूपानं येणार आहे. ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ ही माझी सर्वात महत्त्वाची कलाकृती. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक चित्रण करणारी. धर्म अधिक हिंसा यातून निर्माण होणारा दहशतवाद किती विनाशकारी आहे, हे मी अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवर कादंबरीरूपानं मांडलं आहे. मराठीत तरी अशी दुसरी कादंबरी नाही. मला प्रशासनात जे अनुभव आले, जे विश्व अनुभवलं आणि ज्या भारताच्या विविध समस्यांचा मला सामना करावा लागला, त्या जीवन व आशय द्रव्याचा लेखनासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला. म्हणून माझं लेखन माझ्या जगण्याहून फार काही वेगळं नाही. निदान वैचारिक स्तरावर तरी, हे मला आवर्जून सांगावेसं वाटतं!

मी सकारात्मक विचाराचा व आशावादी दृष्टिकोनाचा माणूस व कलावंत आहे. मला माणसांमध्ये राहायला आणि त्यांच्यासाठी काम करायला आवडतं. त्यामुळं प्रशासन क्षेत्रात यशस्वी झालो. मी कमालीचा संवेदनक्षम आहे, त्यामुळं प्रशासनात कायम सामान्यांचे अश्रू पुसण्याचं काम केलेलं आहे. मी सरळमार्गी जगणारा व जगताना मध्यमवर्गीय मूल्ये जपणारा माणूस आहे. मला पैशाचा व उपभोगाचा कधी मोह झाला नाही. आजवर स्वच्छपणे जगत आलो आहे. माणसं कमावली, गोतावळा जमा केला आणि कवी शैलेंद्र म्हणतो त्याप्रमाणे

‘किसी की मुस्कराहटो पे हो निसार,

किसी का दर्द ले सके तो ले उधार,

किसी के वास्ते हो तेरे दिलमे प्यार,

जीना इसिका नाम है’

याप्रमाणे जगत आलोय. तर साहिरच्या

‘तोरा मनदर्पण कहलाये,

भले बुरे सारे कर्मो को

देखे और दिखाये’

असा अंतर्बाह्य पारदर्शी मी बऱ्याच प्रमाणात आहे.

‘नकोत इमले, नकोत माड्या

दे माथ्यावर छाया,

चोचीपुरता दाणा देवो

जतन कराया काया’

या गदिमांच्या गीताप्रमाणं अगदी कमी नाही; पण मर्यादित गरजांचे जीवन आजवर जगत आलो आहे. मला कोणतंही व्यसन नाही, असेल तर ते केवळ माणसांचं व पुस्तकांचं. ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘आणि ग्रंथोपजीविए’ सारखा जगणारा मी सीधा साधा, लोकांनी भला म्हणावा, असा एक जीव आहे, एवढंच!

प्रश्न - आता काही वैयक्तिक जीवनाबाबतचे प्रश्न

एक : तुमच्यावर सर्वात अधिक प्रभाव कुणा एका व्यक्तीचा आहे?

 - अर्थातच आईचा. तिच्यामुळं लेखक-वाचक झालो. पण पत्नी अंजलीची साथ व सहजीवन तेवढंच महत्त्वाचं. ‘गुड वाईफ हेवनली लाइफ’ अशी जी म्हण आहे, ती माझ्यासाठी शंभर टक्के खरी आहे. तिच्या बद्दलची माझी भावना या शब्दात सांगतो,

‘इस दुनिया मे कौन था ऐसा

जैसा मैने सोचा था?

हां तुम बिलकुल वैसी हो,

जैसा मैने सोचा था!’’

दोन : तुम्हाला जीवनात कोणती गोष्ट नेटानं करता आली नाही?  

- व्यायाम. माझी प्रकृती स्थूलत्वाकडे झुकणारी होती व आहे. व्यायाम आवडतो; पण नेटानं नियमितपणे करता आला नाही. चार दिवस भरपूर व्यायाम तर आठ दिवस दांडी, हा सिलसिला कायम चालत आला आहे. पण आजवर कोणता मोठा आजार झाला नाही, हे माझं सुदैव म्हणलं पाहिजे. पण वाढत्या वयात फीटनेस राखायचा प्रयत्न करणार आहे. पाहू किती जमतं ते.

तीन : कोणती गोष्ट तुम्हाला जमली नाही?

- शास्त्रीय संगीत कळणं. खरंतर एकेकाळी मी परभणीला उस्ताद गुलाम रसुलांकडे तीन महिने तबला शिकायचा प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. आज पुण्यात दरवर्षी सवाई गंधर्व महोत्सवाच्या वेळी रसिक शास्त्रीय संगीतावर ज्या रसपूर्ण चर्चा करतात, त्या ऐकल्या की आपणास कानसेन का होता आले नाही, याची खंत वाटते. पण साहित्य-नाटक व जागतिक सिनेमाचा चोखंदळपणे आस्वाद घेता आला, हे काय कमी आहे?

चार : तुम्हाला लेखक म्हणून पुरस्कारापलीकडे मिळालेली दाद कोणती?

- एक म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील एका दुर्गम वाचनालयात तिथं भाऊ नोकरीला असताना भेट दिली, तेव्हा तिथल्या ग्रंथपालांनी, तुमची ‘सलोनी’ वाचकांना खूप आवडली व एकुलती एक प्रत वाचून जीर्ण झाली म्हणून ग्रंथपालांनी स्वतःच्या सुवाच्च अक्षरात ती कादंबरी आख्खी लिहून वाचकांना उपलब्ध करून दिली होती. हे सांगितले, तेव्हा माझ्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू आले.

एक आख्खं कुटुंब माझ्या ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’च्या प्रेमात असू शकतं, याचा सुखद अनुभव गुंजोटी, ता.उमरगा, जिल्हा उस्मानाबादच्या रेणके कुटुंबानं दिला. ही कादंबरी वाचून तिचा हिंदी अनुवाद करण्यासाठी सुनिता रेणके- चावलांनी मला फोन केला व त्यांना भेटलो. त्या, त्यांचे पती कॉ. अरुण रेणके व त्यांच्या तिन्ही मुलींनी माझी कादंबरी वाचली होती. पूर्ण कुटुंब एका पुस्तकाच्या प्रेमात आहे, हा लेखकाचा केवढा मोठा सन्मान आहे?

पाच : तुमच्या जीवनाला दिशा देणारा गुरू कोण?

- अनेक आहेत, पण चार प्रमुख. एक म्हणजे माझ्या माध्यमिक शाळेत मला मराठी विषय शिकवणारे सुधाकर दंडवते गुरुजी, ज्यामुळं वाङ्‌मयाचा जाणकारीनं आस्वाद घेण्याचा मंत्र सापडला व मी पुढं लेखक झालो. दुसरे प्रशासकीय गुरू म्हणजे माझ्या प्रोबेशन कालावधीत भेटलेले साताऱ्याचे कलेक्टर व्ही. पी. राजा. त्यांनी अक्षरशः माझ्यातल्या पुढील काळातल्या प्रशासकाची पायाभरणी केली. एवढा आदर्श प्रशासक मी दुसरा अनुभवला नाही. तिसरे गुरू शंकर सारडा. त्यांच्या प्रोत्साहनामुळं मी ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ लिहू शकलो. चवथे अर्थातच डॉ. नरेंद्र दाभोलकर. त्यांना मी ‘फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड’ असं म्हणेन! वैचारिक गुरू म्हणजे नरहर कुरुंदकर. नांदेडमधल्या या मुक्त चालत्या बोलत्या विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे! 

मुलाखत व शब्दांकन : किशोर रक्ताटे

(बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी जवळपास 32 वर्षे प्रशासकीय सेवेत घालवली. प्रशासनात काम करताना केलेला अभ्यास, घेतलेले अनुभव आणि त्यातून आकाराला आलेले आकलन यामध्ये, त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांची बीजं सापडतात. म्हणून ‘प्रशासकाच्या आड दडलेला लेखक’ ही दीर्घ मुलाखत आठ भागात क्रमश: प्रसिद्ध केली. लवकरच ही संपूर्ण मुलाखत साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने येत आहे.- संपादक)  

Tags: संविधान मालिका संविधान संमेलन अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन साहित्य संमेलन sanvidhan malika sammelan adhyaksh marathi sahitya sammelan sahitya sammelan sanvidhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके