डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिकन राज्यकर्त्यांसाठी नोकरशाही ही टीकेची आवडती बाब आहे. त्यासाठी ‘Bashing Bureaucracy: Politicians pandering ’ ही अत्यंत समर्पक शब्दयोजना आहे. अमेरिकेच्या बुद्धिजीवी व विचारवंत वर्तुळाचे नोकरशाहीबद्दल काय मत आहे? ती पूर्णत: असंवेदनक्षम व ‘अनरिस्पॉन्सिव्ह’ आहे.  तसेच ती धोकादायक वाटावी इतपत लोकशाहीविरोधी आहे. त्यांच्या मते नोकरशाही ही कायमस्वरूपी व्यवस्था असल्यामुळे मुजोर झाली आहे, ती कुणाची पत्रास बाळगत नाही. ती खूप ताकदवान झाली असून,नियंत्रणाबाहेर गेली आहे.

अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये अमेरिकन ब्युरोक्रसीची काय प्रतिमा आहे? राज्यकर्ते व बुद्धिवंतांची जी मते आहेत, तीच अधिक भडक स्वरूपात प्रसारमाध्यमात प्रतिबिंबित झालेली दिसून येतात.

हे चित्र पहा-

जॉन ए’. केनेडी हे 1960च्या दशकात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तेव्हाचा हा किस्सा- नव्हे खरी कथा आहे. त्यांचे बंधू रॉबर्ट केनेडी, जे अँटर्नी जनरल होते, त्यांनी  तक्रार केली, की सी.आय.ए.च्या हेडक्वार्टरला जाणाऱ्या रस्त्यावर एक दिशादर्शक बोर्ड आहे, तो फेडरल सरकारच्या या एजन्सीच्या गोपनीयतेच्या संकेताला छेद देणारा आहे; त्यामुळे तो हटवावा. राष्ट्राध्यक्ष केनेडींना ते पटले. त्यांनी  आपल्या एका सचिवाला तो बोर्ड हटवायची सूचना दिली. त्या सचिवांनी तो आदेश अंतर्गत गृहविभागास पाठवला; पण काही झाले नाही. काही दिवसांनी केनेडींनी पुन्हा तोच आदेश दिला. पुन्हा जैसे थे. ब्युरोक्रसीच्या या थंडपणाने वैतागलेल्या केनेडींनी ज्या विभागाअंतर्गत वरील दिशादर्शक बोर्ड सी.आय.ए.च्या हेडक्वार्टरच्या रस्त्यावर बसवला होता, त्या अधिकाऱ्यास बोलावून तो तत्काळ काढण्यास सांगितले. ‘हे पहा, मी राष्ट्राध्यक्ष केनेडी सांगतोय.  आज सायंकाळपर्यंत तो बोर्ड काढला गेला पाहिजे. मी तुम्हांला त्याची वैयक्तिक जबाबदारी देतोय!’ तो बोर्ड त्या दिवशी तातडीने काढून टाकण्यात आला. यावरून आपण काय धडा शिकलो, हे सांगताना उपरोधिक हसत केनेडी म्हणाले होते,

‘I now understand that for a President to get something done in this country, he has to say it three times’

आता हे चित्र पहा-

दुसऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा ब्युरोक्रसीचा दुसऱ्या टोकाचा अनुभव. राष्ट्राध्यक्ष होते जिमी कार्टर. त्यांची कन्या अँमी शाळेत होती व ती ‘औद्योगिक क्रांती’ या अभ्यासासाठी शिक्षकांनी दिलेल्या विषयाचा गृहपाठ करीत होती. तिला तो समजेना,म्हणून तिने आपल्या आईला मदत मागितली. फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका मिसेस कार्टरने ‘व्हाईट हाऊस’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकाऱ्याला (अँमीला) मदत करायला सांगितले. त्या अधिकाऱ्याने लेबर डिपार्टमेंटला ही बाब सांगितली. त्या विभागास आपल्याला राष्ट्राध्यक्षाच्या कन्येस अभ्मासात मदत करायची, म्हणून मोठा आनंद झाला. त्यांनी  उत्साहाच्या भरात दुसऱ्या दिवशी औद्योगिक क्रांतीसंबंधीची संगणकावरून डाऊनलोड केलेली एक ट्रकभर माहिती पाठवली. त्याचा खर्च होता अवघा तीन लाख डॉलर्स आणि एवढी माहिती देण्यासाठी ओव्हरटाईम देऊन तज्ज्ञ व्यक्तींची एक टीम ही लेबर डिपार्टमेंटने तैनात केली. त्यांना वाटलं, हा राष्ट्राध्यक्षांचा हुकूम (Presidential Order) आहे, तो निष्ठेने व पूर्णपणे पाळला पाहिजे.

या घटनेचा शेवट काय असावा? काही तर्क?

मीच सांगतो. अँमीला त्या गृहपाठात ‘सी’ ग्रेड मिळाली!

वाचकहो, या दोन कहाण्या जर मी भारतीय पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांची नावे घालून सांगितल्या असत्या, तर आपला त्यावरही नक्कीच विश्वास बसला असता; कारण ब्युरोक्रसीची सिस्टीम ही जगभर सारखीच असते. कारण ती वृत्ती आहे-सर्वकालिक.

भारताप्रमाणे अमेरिकाही फार मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. तिथल्या नोकरशाहीचा- ब्युरोक्रसीचा- विस्तारही मोठा आहे. भारताच्या तुलनेत लोकसंख्येच्या प्रमाणात तो किती तरीपट अधिक आहे. आपण मागील अनेक अध्यायात भारतीय नोकरशाहीच्या मंदगती व अनेक अपप्रवृत्तींवर बोलत आहोत. आज अमेरिकन ब्युरोक्रसीबद्दल काही माहिती घेणार आहोत. कारण ज्याप्रमाणे साहित्यात तौलनिक अभ्यास शाखा आहे, जी विविध भाषा व देशातील-प्रांतांतील साहित्याचा सम्यक अभ्यास करते; त्याचप्रमाणे पुढील काही अध्यायांत आपण तौलनिक अभ्यास म्हणून इतर काही देशांतील ब्युरोक्रसीचा अभ्यास करणार आहोत व त्यावरून तुलनेत भारतीय नोकरशाही कुठे आहे, याचा अंदाज घेता येईल. त्यावरून काही निष्कर्ष काढणे शक्य होईल.

पण आज अमेरिकन ब्युरोक्रसीच्या संदर्भात काही निरीक्षणे नोंदवायची आहेत. मग पुढे इतर काही देशांच्या जोडीने अमेरिकन ब्युरोक्रसीचा उदय, वाढ आणि आजची स्थिती पाहणार आहोत; पण आज अमेरिकन ब्युरोक्रसीचं विहंगमावलोकन करायचं आहे, त्यात अनेक विषयांना स्पर्श करायचा आहे व काही बाबींवर ‘एक्स-रे’प्रमाणे प्रकाशझोत टाकायचा आहे.

निकोलस हेन्री यांचे ‘Public Administration and Public Affairs’ हे अमेरिकन प्रशासन व लोकनीतीच्या संदर्भातले एक महत्त्वाचे पुस्तक आहे. ते जसे सैद्धांतिक आहे, तसेच ते मार्मिक निरीक्षणे आणि बोलक्या अमेरिकन संदर्भाने ओतप्रोत आहे. या पुस्तकाच्या आधारे हा अमेरिकन ब्युरोक्रसीवरचा एक्स-रे पेश करीत आहे.

हेन्री यांनी लोकप्रशासन व लोककार्य ‘‘Public Administration व Public Affairs’ बद्दल नेमक्या शब्दांत वर्णन केले आहे, ते पहाण्याजोगे आहे. ते असे आहे-

‘‘Public Administration  The words conjure nightmares of green eyeshades faceless, pitiless and powerful Bureaucrats; and a misdirected, perhaps misanthropic, governmental juggernaut crashing all who question it.

Public Affairs. The phrase connotes visions of fearless and free debate; ennobling social missions; and the surging sweep of civil life. ’

पण वास्तविकता ही या दोनमध्ये कुठेतरी आहे, असे मत नोंदवत निकोलस हेन्री पुढे म्हणतो, ‘Public administration always has been and always will be the grubbing, tedious execution of public policies. And public policies will be the ultimate and finest expression of democracy, but it also always has been and always will be demeaning chore of cutting sleazy deals and micromanaging corrupt and rapacious special interest. ’

प्रथम अमेरिकन ब्युरोक्रसीची प्रतिमा व वास्तविकता(Image and Reality) काय आहे ते पाहू या.  त्या देशाचे तीन घटक- राज्यकर्ते, बुद्धिजीवी वर्ग आणि प्रसारमाध्यमांना ब्युरोक्रसीबद्दल काय वाटते?

अमेरिकन राज्यकर्त्यांसाठी नोकरशाही ही टीकेची आवडती बाब आहे. त्यासाठी ‘Bashing Bureaucracy: Politicians pandering’ ही अत्यंत समर्पक शब्दयोजना आहे. निवडणुकीच्या काळात (भारताप्रमाणेच) अमेरिकन राज्यकर्तेही नोकरशाहीवर सडकून टीका करतात. पॉल सी. लाईट यांनी ‘The size of Government’ या पुस्तकात म्हटले आहे, ‘The (American) election campaign chant of bureaucratic ‘fraud, waste and abuse’ has been a rhetorical standard of office seekers for more than a generation. ’ थोडक्यात, विकास प्रक्रियेत राज्यकर्त्यांना नोकरशाही अडसर वाटते.

अमेरिकेच्या बुद्धिजीवी व विचारवंत वर्तुळाचे नोकरशाहीबद्दल काय मत आहे? ती पूर्णत: असंवेदनक्षम व ‘अनरिस्पॉन्सिव्ह’ आहे. तसेच ती धोकादायक वाटावी इतपत लोकशाहीविरोधी आहे. त्यांच्या मते नोकरशाही ही कायमस्वरूपी व्यवस्था असल्यामुळे मुजोर झाली आहे, ती कुणाची पत्रास बाळगत नाही. ती खूप ताकदवान झाली असून, नियंत्रणाबाहेर गेली आहे. प्रामुख्याने ती जनता व लोकप्रतिनिधी यांच्याप्रती जबाबदेही(Accountable) नाही.

अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्मे अमेरिकन ब्युरोक्रसीची काय प्रतिमा आहे? तिथल्या चित्रपटातील नोकरदार पात्रे पाहिली तर एका शब्दात सांगता येईल, की ’Federal administrators were ‘the baddest villians’ in Hollywood Films.’ राज्यकर्ते व बुद्धिवंतांची जी मते आहेत, तीच अधिक भडक स्वरूपात प्रसारमाध्यमात प्रतिबिंबित झालेली दिसून येतात.

‘Images of Government In T. V. entertainment’ हा सेंटर फॉर मीडिया अँड पब्लिक अफेअर्स, वॉशिंग्टन डी.सी.या संस्थेने प्रकाशित केलेला अहवाल लक्षवेधक आहे व तो ब्युरोक्रसीची टी.व्ही.वर काय प्रतिमा आहे, याची माहिती देणारा आहे. 1234 मालिका व 2664 नोकरशाहींच्या पात्रांचे अनॅलिसिस करून ब्युरोक्रसीची मीडियातील प्रतिमा काय आहे, हे अहवालात सविस्तरपणे आले आहे. एकूणच नोकरशाही ही मंदगतीची व निकृष्ट कार्यक्षमतेची चित्रित केली असली तरी शिक्षक व कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेचे तुलनेने उजळ व सकारात्मक चित्रण आहे; पण सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या नोकरदाराबाबत अमेरिकन नागरिक नाखूष असतात, हे टी.व्ही. मालिकेतून प्रकर्षाने जाणवते.

वास्तविकता

ब्युरोक्रसीच्या या गडद झालेल्या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती काय आहे? अमेरिकन नागरिकांना काय वाटते, हे पाहणे ही मनोवेधक ठरेल. वस्तुस्थिती अशी आहे, की जवळपास दोनतृतीयांश अमेरिकन नागरिक ब्युरोक्रसीवर संतुष्ट आहेत. त्यांचा ‘ओपिनियन पोल’ घेताना एक साधा प्रश्न विचारला गेला होता- तुम्ही कधी शासकीय वा स्थानिक संस्थेच्या कार्यालयात साध्या रूटीन कामासाठी गेला असता- उदा.ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी- काय अनुभव आला? सुमारे सत्तर टक्के लोकांनी शासकीय अनुभव समाधानकारक व मदतीचा होता असे मत नोंदविले. जवळपास याच टक्केवारीत शासकीय कर्मचारी विशेष सेवा तत्परतेने देतात व त्यांच्याकडून योग्य तऱ्हेची वागणूक मिळते, असे म्हटले आहे.

अमेरिकेत 1940च्या दशकात तीन विस्तृत सर्वेक्षणे झाली व त्यांचे अहवालही प्रसिद्ध झाले आहेत, ते असे आहेत.

1)’Citizen rating of public and private service quality : A comparative perspective’(थोडोर एच. पॉईस्टर व गॅरी टी. हेन्री- 1994)

2) ‘Standard of excellence: U. S. Residents Evalution of Local Government Services’(थॉमसएल. मिलर व मिशेल ए. मिलर- 1991)

3) ‘Source of Citizen’s Bureaucratic contacts: A Multivariate Analysis ’(स्टीफन ए. पीटरसन- 1988)

या सर्व सर्वेक्षणाची गोळाबेरीज हे दर्शविते, की नागरिक शासकीय सेवेबाबत मोठ्या प्रमाणात समाधानी आहेत. मुख्य म्हणजे यातील एक अहवाल हा दोन लाख नागरिकांचा 261 सर्वेक्षणामधल्या अहवालाचा गोषवारा आहे. त्यामुळे निकोलस हेन्री शेवटी निष्कर्ष काढताना म्हणतो,  ‘The American public does not appear as disdainful of bureaucrats as the projected media image would indicate’

आज भारतातले लाखो लोक अमेरिकेत शिक्षण, नोकरी व वव्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. हे सारे भारतात सुट्टी वा कौटुंबिक कार्यक्रम-लग्न इत्यादीसाठी जेव्हा येतात तेव्हा हेच सांगतात, की अमेरिकेची ब्युरोक्रसी- मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल वा राज्य सरकारची- कार्यक्षमतेने, तत्परतेने आणि भ्रष्टाचार न करता सेवा देते. आरोग्य, ड्रायव्हिंग लायसेन्स आदी सेवांचा स्तर समाधानकारक आहे. याच्या विपरीत अनुभव त्यांना भारतात येतो, तेव्हा ते त्यांना जास्त तीव्रतेने खुपते.

इथे पुन्हा मला मॅनेजमेंट तज्ञ गुरुचरण दास यांचा संदर्भ देण्याचा मोह आवरत नाही. ‘आर्थिक विकास; नैतिक ऱ्हास’ या नावाचा त्यांचा एक लेख अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. (दै.सकाळ, 31 डिसेंबर 2009) त्यात त्यांनी  परखडपणे असे म्हटले आहे, की आपल्या भारतीयांची रोजची वर्तणूक नैतिक निकषावर टिकणारी नाही. एक उदाहरण देत ते म्हणतात, ‘मला माझ्या वाहन चालवायच्या परवान्याचे येत्या काही दिवसांत नूतनीकरण करून घ्यायचे आहे; पण हे काम करण्यासाठी मला कोणाला लाच द्यावी लागणार नाही ना, या चिंतेने मी सध्या अस्वस्थ आहे. कदाचित माझी अस्वस्थता किरकोळ असेल; पण दररोज सार्वजनिक सेवांवर अवलंबून असणाऱ्या गरीबांचे काय? त्यांनी त्यांची कामे होण्यासाठी काम करायचे?’

गुरुचरण दास यांनी ब्युरोक्रसीच्या भ्रष्टाचारावर प्रकाशझोत टाकताना म्हटले आहे, की ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने 2005 साली केलेल्या अकरा सार्वजनिक सेवांच्या सर्वेक्षणात,भारतातील पोलिस दल सर्वांत भ्रष्ट असल्याचे आढळून आले. सुमारे ऐंशी टक्के नागरिकांना आपले काम होण्यासाठी पोलिसांना केव्हा ना केव्हा लाच द्यावी लागल्याचे म्हटले आहे. कायदेशीर कामे करून घेण्यासाठीही चाळीस टक्के लोकांना लाच द्यावी लागली होती. सरकारी शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कामे करून घेण्यासाठी दर तीन नागरिकांपैकी एकाला लाच द्यावी लागली होती. हीच बाब तलाठी किंवा पटवाऱ्याची आहे.’ गुरुचरण दास असेही म्हणतात, की मोठ्या हिंसाचारापेक्षाही जर आपण रोजच्या कर्तव्यात कमी पडलो, तर जास्त वाईट परिणाम होतात. उदा. एखादा शिक्षक त्याच्या कामावर गैरहजर राहिला, वा त्याने योग्य शिकवले नाही तर समाजधर्मास बाधा येते.

येथे व्यापक अर्थाने भारतीय ब्युरोक्रसी समाजधर्माचे पालन करीत नाही, हा गुरुचरण दास यांचा आक्षेप कोण सुजाण भारतीय नागरिक अमान्य करेल? ज्या करदात्यांच्या पैशातून नोकरशहाला पगार मिळतो व त्याचा प्रपंच भागतो, त्यांना तत्परतेने सार्वजनिक सेवा चोख देणे हा समाजधर्म आहे. त्याचे पालन भारतात होत नाही; पण अमेरिकन ब्युरोक्रसी बहुतांश वेळा त्याचे पालन करते, हे वरील सर्वेक्षणावरून सिद्ध होते!

अर्थात, अमेरिकेतही सर्व काही आलबेल आहे असे नाही. ‘वॉटरगेट’सारखी प्रकरणे नोकरशाहीच्या सर्वकालिक व सार्वत्रिक अकार्यक्षमतेवरच प्रकाशझोत टाकत नाहीत का? तेथेही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची भ्रष्ट युती आहेच. तेथेही ‘घालीन लोटांगण’ ही वृत्ती आहेच. (लेखाच्या सुरुवातीला दिलेले जिमी कार्टरच्या मुलीच्या गृहपाठास मदत करण्यासाठी लेबर डिपार्टमेंटने काम उपद्‌व्याप केले हे आठवा.) तेथेही रेडटेपिझम आहे. तरीही आम नागरिकांना दैनंदिन शासकीय व सार्वजनिक कामांत ज्याचा अल्प त्रास होतो, त्या स्तरावरचा भ्रष्टाचार जवळपास नाही. भारतात या स्तरावर गरीब नागरिकांना साध्या साध्या कामासाठी त्रास होतो, विलंब होतो, हे खेदजनक आहे. त्यासाठी ब्युरोक्रसीची वृत्ती व निर्लज्जपणा कारणीभूत आहे, असे गुरुचरण दास मानतात.

नोकरशहाच्या शक्तीची कारणे

जगात सर्वत्र ब्युरोक्रसीचे प्रस्थ एकविसाव्या शतकातही वाढताना दिसते. त्यामुळे ब्युरोक्रसीची शक्ती (पॉवर) वाढताना दिसते. अमेरिकेत तर तिची वाढ प्रचंड आहे. तिच्या या वाढत्या शक्तीबद्दल हेन्री निकोलस यांनी मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे.

‘Because powerful political, social, economic and technological forces are underlining bureaucracy, it follows that a bureaucracy has power. But the power of Bureaucracy comes clothed in clouds, curtained in fog and cloaked in mist’

या नोकरशाहीच्या शक्तीची नेमकी कारणे का/ आहेत? ती प्रामुख्याने चार आहेत. एक त्यांची टिकून राहण्याची शक्ती- Staying power. एखादा विभाग किंवा खाते निर्माण झाले की ते कधीच बंद होत नाही. महाराष्ट्रात माधव गोडबोले अर्थसचिव असताना त्यांनी  मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली ‘झिरो बेस बजेटिंग’ संकल्पना राबवली. त्याला कडाडून विरोध झाला व ती मग शासनास सोडून द्यावी लागली. कारण त्यामध्ये अनेक बिनकामाचे विभाग बंद झाले असते. हीच आहे नोकरशाहीची टिकून राहण्याची शक्ती. अमेरिकन ‘इंटरनॅशनल स्क्रूथ्रेड कमिशन’बाबत असे म्हटले जाते, की ‘this commission will never die’ अमेरिकेत 175 यंत्रणांपैकी पन्नास वर्षांत केवळ 21 एजन्सी बंद करण्यात आल्या. भारतात तर अनेक सार्वजनिक उपक्रम (public undertaking) आज बंद अवस्थेत आहेत, पण ते कर्मचाऱ्यांसाठी जिवंत आहेत. ‘पगार चालू पण काम बंद’ अशी त्यांची अवस्था आहे.

अमेरिकन अभ्यासाद्वारे हे पण सिद्ध झाले आहे, की नोकरशाहीच्या महत्त्वाचे दुसरे कारण आहे राजकीय शक्ती. त्याबाबत हेन्री निकोलस म्हणतात, ते त्यांच्या शब्दात टीकेविना नमूद करतो,

‘It is increasingly obvious that bureaucracy is now major policy making arm of government- perhaps the major policy maker. One careful analysis of the American states found that the state’s public ‘Managerial Capapcity’ itself should be placed ‘alongside other more commonly studied state characteristics as an important influences on public policy formulation. In other words, the ability and professionalism of public administrators and bureaucracy rank with such powerful political forces as interest groups and idealogy in the making of states policies. ’’

ब्युरोक्रसीच्या शक्तीचे तिसरे कारण आहे तिची ‘पॉलिसी मेकिंग’ला योगदान देण्याची क्षमता. तिच्या उतम शिक्षण, प्रशिक्षण व प्रत्यक्ष धोरण राबविताना आलेल्या अनुभव समृद्धीमुळे राज्यकर्त्यांना धोरणे आखताना तिची मदत होते. नव्हे, अनेकदा अधिकारीच नवी धोरणे तयार करून राज्यकर्त्यांना पटवून देतात, अशी अनेक उदाहरणे अमेरिकेत आहेत. सार्वजनिक नीती आखण्याचे तिचे सामर्थ्य व क्षमता हे ब्युरोक्रसीच्या शक्तीचे एक कारण आहे.

चौथे कारण सर्वांत महत्त्वाचे आहे, ते म्हणजे कामात खोडा घालण्याची- थांबवण्याची शक्ती.  Stopping power. प्रशासकांना कामे करण्याची जशी शक्ती व अधिकार असतात,तसेच ती थांबवण्याची, लांबवण्याची वा त्यात खोडा घालण्याचीही अमर्याद शक्ती असते. याद्वारे ते आपले महत्त्व तसेच समोरच्याना उपकृत करण्याची आपली उपद्रव क्षमता दाखवून देत असतात.

नोकरशाही व नेतृत्व

संसदीय लोकशाहीत जरी देश, राज्य व स्थानिक सरकारचे नेतृत्व लोकप्रतिनिधी करीत असले तरी धोरणांची अंमलबजावणी करणे तेवढेच महत्त्वाचे असल्यामुळे ब्युरोक्रसीला पण नेतृत्वगुणांची आवश्यकता असते. उत्तम यशस्वी प्रशासक हे उत्तम नेतृत्वगुणांनी संपन्न असतात. अमेरिकन ब्युरोक्रसीच्या नेतृत्वगुणाची चर्चा करताना अभ्यासक त्याचे तीन गमक मानतात- एक दूरदृष्टी (VIsion), संवाद व communication आणि कठोर परिश्रम. या तीन गुणांतूनच नेतृत्व गुण व क्षमता सिद्ध होतात. धोरणांची व निर्णयांची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येत असतात; तसेच जेथे मानवी जीवनाचा संबंध असतो, तेथे मानवी स्पर्श (human touch) द्यावा लागतो. त्यासाठी असाधारण संवाद कौशल्याची गरज असते.

दूरदृष्टी (Vision)

अब्राहम यांनी ‘The leadership Factor’ या ग्रंथात दूरदृष्टीची अशी व्याख्या केली आहे.  ‘Vision is the presentation of an alternative future of the status quo’ ही व्याख्या त्यांनी  प्रशासनाच्या संदर्भात केली आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. अनेक प्रशासकांजवळ अशी व्हिजन असते; पण लोकशाहीमध्ये प्रशासक हे ‘दोन नंबरचे’ असतात, म्हणजेच  ते लोकप्रतिनिधींच्या समोर दुय्यम असतात. याबाबत त्यांनी  तक्रार करू नये. यामुळे त्यांची दूरदृष्टी प्रशासनासाठी उपयोगी पडत नाही, हे मात्र खरे आहे. तरीही अंमलबजावणीच्या क्षेत्रात आणि त्यांना जे अधिकार दिले आहेत त्या चौकटीतही प्रशासकांना खूप दूरदृष्टीने काम करण्याची मुभा असते. जे त्याचा वापर करतात ते एका अर्थाने ‘व्हिजनरी’ ठरतात. (येथे व्ही. पी. राजा व अनिलकुमार लखिना या दोन महाराष्ट्रातील कर्तबगार आय.ए.एस. अधिकाऱ्यांचे उदाहरण देता येईल. शंभर वर्षांपासूनचा पण दुर्लक्षित ‘अँडरसन मॅन्युअल’ त्यांनी  प्रभावीपणे राबवून अभिलेख कक्ष आधुनिक केला व लोकांना हवी ती कागदपत्रे त्वरित मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला.)

संवादकौशल्म

दूरदृष्टी (Vision) सर्वदूर आम माणसापर्यंत पोचवण्यासाठी संवाद हवा. कम्युनिकेशन कौशल्य हवे. येथे प्रशासक बऱ्याच प्रमाणात कमी पडतात. कारण त्यांच्यासाठी तटस्थता (Neutrality) आणि प्रसिद्धीपराङ्‌मुखता (Anonymity)महत्त्वाची असते, असे जुने प्रशासनशास्त्र सांगते. पण प्रभावी कामकाजासाठी वाजवी ‘फेसव्हॅल्यू’ व प्रसिद्धी वाईट नाही. उलट चांगल्या कामामागे त्यामुळे जनशक्ती उभी राहू शकते. जेम्स डोर्इंग यांनी संपादित केलेल्या  ‘Leadership And Innovation: A Biographical perspective on Enterpreneurs in Government’ या पुस्तकात चौदा अमेरिकन प्रशासकांच्या चरित्रांतून हे दाखवून दिले आहे, की या सर्व यशस्वी प्रशासकांकडे प्रभावी संवाद कौशल्य होते व त्याद्वारे आपली व्हिजन व मिशन ते परिणामकारक रीतीने जनतेपर्यंत पोचवत त्यांचा पाठिंबा मिळवू शकले.

कठोर परिश्रम

नेतृत्वाचे तिसरे गमक हे कठोर परिश्रम व अथक काम आहे. प्रशासन हे असे क्षेत्र आहे, की तेथे कठोर परिश्रमास पर्याय नाही. त्यामुळे प्रशासकात हा गुण मोठ्या प्रमाणात आढळून येतो. अमेरिकेचे संरक्षण सचिव एकदा एक महत्त्वाचे काम करताना पूर्ण आठवडा रात्रंदिवस काम करीत होते. त्यांचा हा आठवडा सोमवारी सुरू झाला व रविवारी रात्री साडेदहा वाजता संपला. तेव्हा कर्मचाऱ्मांचा निरोप घेताना ते म्हणाले, ‘हॅव ए नाईस वीकएंड.’ लक्षात ठेवा- त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता नवा आठवडा सुरू होणार होता. त्यांनी  स्वत: व कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा वीकएंड न घेता केवळ झोपेपुरता आठदहा तासांचा वीकएंड घेतला.

अशी ही अमेरिका या ‘बिग डेमोक्रसी’ची ‘बिगब्युरोक्रसी.’ तिच्यातही भारतीय नोकरशाहीचे गुण-अवगुण आहेतच. पण जवाबदेही आणि सुधारणा यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामासाठी त्रास होत नाही, विलंब लागत नाही किंवा तेथे भ्रष्टाचार ‘नाही’च्या स्वरूपात आहे. हे फार महत्त्वाचे आहे. त्यापासून भारतीय नोकरशाहीला बरेच शिकण्यासारखे आहे. खास करून त्यांची काम अडवण्याची शक्ती(stopping power) कमी झाली, तरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अमेरिकेने यात बरेच यश मिळवले आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीत येथील ब्युरोक्रसी भरीव प्रमाणात योगदान देते. भारतालाही ते शक्य आहे. त्यासाठी गरज आहे प्रशासकीय सुधारणेची. त्याबाबत आपण पुढील अध्यायात चर्चा करूया!

(लेखक गेली 25 वर्षे प्रशासकीय सेवेत असून, सध्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आहेत.)

Tags: शिकण्याची गरज. भारतीय लोकशाही उत्तरदायित्व उत्तम प्रशासक मानवी स्पर्श संवादकौशल्य नेतृत्वगुण दूरदृष्टी कठोर परिश्रम नोकरशाही लोकशाही व्हिजनरी अधिकारी अमेरिकन नोकरशाही अमेरिकन लोकशाही लेखक जिल्हाधिकारी Happy citizens लक्ष्मीकांत देशमुख staying capacity stopping power Visionary Bureacrates Human touch Hard work communication Vision Bureacracy Leadership No Bribe BigBureacracy Ameriacan Bigdemocracy Bureaucrecy Laxmikant deshmukh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके