डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुक्तीचा तेवढाच एक मार्ग आहे...

ललित ग्रंथ पुरस्कार : राखीव सावल्यांचा खेळ (कथासंग्रह) - किरण गुरव

किरणच्या कथेची शैली ही समूहसंस्कृतीचा सजीव भाषिक अवकाश, लोकपरंपरेने रचलेली सांस्कृतिक रूपतत्त्वे घेऊन व सकस अशा अभिजात वाङ्‌मयीन कृतीच्या वाचन-व्यासंगातून घडविलेली आहे. या गद्यशैलीत घडीव असे संपृक्तपण आहे. एकाच वेळी अभिजात व देशी रचनाबंधाचे एकात्म फ्यूजन किरणच्या कथेत आहे. कथेच्या प्रभावी अशा जाणीवविश्वाबरोबरच कलात्मक रूपाला स्वायत्त असे स्थान देणारे हे कथारूप आहे. जुन्या गोष्टीतील अटिंग्या वनाच्या सफरीची नवी कथा किरण लिहितो आहे.   

प्रश्न : समकालीन मराठी कथा नवे रूप धारण करतेय. जयंत पवार, समर खडस व आसाराम लोमटे असे महत्त्वाचे कथाआवाज आपल्या भोवती आहेत. अशा काळात तुमच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या साऱ्याकडे कसे पाहता?

- जयंत पवार, आसाराम लोमटे, समर खडस यांच्यासारख्या मराठीतल्या सर्वार्थाने मोठ्या आणि मान्य कथाकारांबद्दल माझ्यासारख्या खूप कमी लिहिलेल्या माणसानं बोलणं हे धारिष्ट्याचं ठरेल. महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार माझ्या पहिल्याच कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. मराठी साहित्यजगतातला हा उल्लेखनीय पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळं मला थोडं सुख झालं; परंतु कथा या साहित्यप्रकाराचा या सन्मानासाठी विचार होणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. समकालीन मराठी कथा नवं रूप धारण करतेय असं जर आपलं निरीक्षण असेल, तर त्याच्याशी मी सहमत आहे. विशेषतः वर उल्लेख केलेले दोन-तीन कथाकार आणि इतरही काही कथाकार या काळात गांभीर्यानं कथासृजन करत आहेत. हे चित्र फार आशादायक आहे.

गेल्या काही दशकांतल्या कालखंडामध्ये कथा किंवा लघुकथा हा अगदी निकृष्ट दर्जाचा साहित्यप्रकार आहे, अशी हाकाटी मराठीत मोठ्या प्रमाणावर होती. लघुकथांचं त्या-त्या काळात फुटलेलं वारेमाप पेव किंवा काही रचनामधन्य मासिकांनी अमुक एका प्रकारानं लिहिलेली, अमुक एका अभिरुचीची कथा म्हणजेच कथा- असे दंडक तयार केले. कथेचे स्थितिबद्ध असे वातावरण करून सुवासिक उदबत्तीसारखे किंवा अगरबत्तीसारखे लघुकथांचे काही लघुब्रँड तयार करून टाकले. मराठी कथाविश्व कोंदटण्याला त्यामुळे सुरुवात झाली. त्याची परिणती पुढे एकूण मराठी कथा हिणकस ठरविण्यात झाली असावी.

आता यातला एक अंतर्विरोध नमूद करणं आवश्यक आहे. ज्या लोकांनी कथेला हिणकस ठरवून तिला कोपऱ्यात ढकलून दिली, त्याच लोकांनी परत साहित्यभाषेतील प्रमाणभाषेचे चौक्यापहारे उठवून एक प्रकारचा भाषिक मोकळेपणा साहित्यप्रांतात आणला; ज्याचा खरं तर कथा लिहिणाऱ्यांनाही उपयोगच झाला, दलित आणि ग्रामीण समूह त्यांच्या-त्यांच्या बोलीभाषेतून मोकळेपणाने लिहू शकतात याचा एका बाजूने त्या भाषिक मोकळेपणाशी संबंध आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण म्हणता तसे मराठी कथेचं रूप पालटण्याशी आहे. अर्थात, कूस पालटणारं समाजजीवन, मराठी साहित्यविश्वाची उदारमनस्कता आणि काहीएक भाषा विचार करून मराठी समीक्षेनं बोलीभाषेला दिलेला पाठिंबा यांचा या मोकळेपणाशी संबंध आहे. समकालीन मराठी कथेचं बदलेलं रूप दखल घेण्याएवढं महत्त्वाचं आहे असं जर मराठी समीक्षेला वाटत असेल, तर त्यापाठीची सूत्रबद्धता मांडण्याचा प्रयत्न समीक्षेनं करावा.

प्रश्न : भूमी परिसराची एक अनाम ओढ तुमच्या कथांमध्ये आहे. राधानगरी, कपलोबा, भैरीचा डोंगर या परिसराची सजीव चित्रणे तुमच्या कथासाहित्यात आहेत. राखीव सावल्यांचा खेळ हा संग्रह तुम्ही तुमच्या आजीला व कपलेश्वर गावाला अर्पण केला आहे. तुमच्या घडणीवर या परिसराचा कोणता परिणाम झाला आहे?

 - फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी लहान असताना माझे वडील त्यांच्या वडिलांशी भांडण करून घरातून बाहेर पडले होते आणि स्वतःच्याच गावात वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याचं घर करून राहण्याचा   प्रयोग करत होते. त्यामुळे अस्थिरतेचा अनुभव मला लहानपणापासून नकळत येत असावा आणि स्थिरतेकडे माझा जास्त ओढा असावा, असं (विनोदानं) म्हणता येईल. बालपणीचा माझा बराचसा काळ कपिलेश्वर या छोट्याशा गावात (आजोळी) गेला. आम्ही गुरव असल्यानं साहजिकच देवळं, देवपूजा, कौल लावणं, तथाकथित शिवकळा अंगात येणं, बकऱ्याकोंबड्याच्या जत्रा-खेत्रा, सोप्यात ढीगभर पडलेल्या पळसाच्या हिरव्यागार मखमली पानांतून डावी-उजवी पानं हेरून ईर्षेईर्षेनं इस्ताऱ्या किंवा पत्रावळी करणं, द्रोण लावणं इ. भानगडीत माझा तो काळ प्रामुख्याने गेला. त्यात आजोबांच्या हाताखाली देवस्थान जमिनीतली छोटीशी सीझनल शेतीही आलीच.

पुढं शिक्षणासाठी कोल्हापूर, मग नोकरीला पुणे, गारगोटी- परत कोल्हापूर- अशी छोटीशी गरगर माझ्या आजपर्यंतच्या काळात आहे. आता तुम्ही म्हणता तशी भूमी परिसरांची अनाम ओढ असेल, तर ती आपल्या स्वग्रामाचं नेणिवेतील स्थलमाहात्म्य म्हणूनही पाहता येईल. जुगाड या माझ्या आगामी कादंबरीमध्ये असे काही अनुभव मी मांडले आहेत. आपल्या प्रश्नाकडे परत यायचं झालं तर ज्या मातीत साप राहतो, त्या मातीचा रंग त्याला निसर्गाने चढवलेला असतो, असं म्हणतात. माझ्यावर चढलेला मूळ रंग माझ्या राधानगरी या गावचा आणि दऱ्या-खोऱ्यांच्या आजूबाजूच्या परिसराचा आहे. इथली माणसं, त्यांचे स्वभाव, अल्पसंतुष्टता, शहरबुजरेपणा आणि बेसावध असताना ओरबडणाऱ्या करवंदाच्या काटेरी डहाळीसारखी त्यांची भाषा- (जी नंतर एखादं काळंशार रसरशीत करवंदासारखं शब्दफळ पुढं करते) यांचा माझ्यावर मूळ संस्कार आहे. बाकी नित्याचं आणि नैमित्तिक जगणं तर कार्यालयीन परिवेशासारखं असतंच; पण लेखक म्हणून जेव्हा मी पांढऱ्यावर निळं करत असतो, त्या वेळी माझ्याजवळ हा मूळ संस्कार जास्त उपलब्ध असतो.

लहान असताना सलग काही वर्षे आजोळी राहिल्यानं तिथल्या आजी-आजोबांचा, वातावरणाचा, परिसराचाही माझ्यावर सखोल ठसा उमटलेला आहे. माझे आजी-आजोबा खूप प्रामाणिक, कष्टाळू आणि नेकदिल माणसं होती. आजी अजूनही आहे, तिला आम्ही तानूआईच म्हणतो. मला मामा नसल्यानं हे आजोळंच साम्राज्य आता लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. असो. तर या पार्श्वभूमीमुळे व प्रभावामुळे राखीव सावल्यांचा खेळ हा कथासंग्रह मी माझ्या आजीस व कपिलेश्वर- खरं तर कपलेसर असाच लोकोच्चार या गावाचा माझ्या भागात आहे- यांना अर्पण केला आहे.    

प्रश्न : मराठी ग्रामीण कथाकारांकडून आणि पूर्वसुरींतील लेखनपरंपरेतून कोणते प्रभावस्रोत तुमच्यापर्यंत आले आहेत?

 - मराठी ग्रामीण कथेकडून किंवा एकंदरीत साहित्याकडून (लिहिण्यासाठी आणि जगण्यासाठी) मला भरपूर काही मिळाले आहे. व्यंकटेश माडगूळकरांसारखा लेखक कथा-कांदबरी लिहिताना ‘आपण का लिहितो,’ याचाही शोध घेणारे ललित लेखन करत असतो आपण हे सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाचक म्हणून नेहमी वाटत आलं आहे. चारुता सागर, सखा कलाल या कथाकारांचं बोट धरून त्यांच्या कथासृष्टीत प्रवेश केला, अचंबित आणि समृद्ध करणारं पुष्कळ काही या कथाकारांच्या नजरेनं पाहू शकलो. तेव्हा आपणही असं लिहावं- निदान प्रयत्न करावा, असा विचार मनात येणं हाच लिहिण्याचा आरंभबिंदू असावा. चार भिंतींआड कोंडून लेखक लिहू लागला की त्याचा शब्दही कोंडतो, असं बजावणाऱ्या चारुता सागरांच्या म्हणण्याचा इत्यर्थ कळतो. त्यांच्या कथेत गावशिवेची मर्यादा ओलांडून बेरड-फिरस्त्यांचं, पशूपक्ष्यांचं, सरीसृपांचं जीवन का येतं त्याचा उगम कळतो. स्त्रीजन्माच्या सनातन वेदनेला हा लेखक कसा काय कथात्म उच्चार देऊ शकतो, त्याचा अंदाज बांधता येतो.

लिहिणं ही तांत्रिक अर्थाने एका जागी बसून थोडी एकाग्र चित्ताने करायची गोष्ट असली, तरी जीवनाचा किती तरी मोठा पट त्यापाठीमागे उभा असतो याचं भान नकळत का असेना, असावं लागतं. मला वाटतं- माडगूळकर, सखा कलाल, चारुता सागर या पूर्वसूरींच्या कथाकारांनी माझ्यात हे भान निर्माण केलं आहे. याशिवाय भाऊ पाध्ये, मेघना पेठे यांच्या नागर कथेनंही महानगरीय जीवनातले ताणे-बाणे, पेच, प्रासंगिकता, भर गर्दीतला एकटेपणा यांच्याशी मला परिचित केलं आहे. ग्रामीण व नागर समाजरचनेच्या सीमेवर अर्धनागरीकरणानं गेल्या एक-दोन दशकांत जोर पकडलेला आहे. शिक्षण, दळणवळणाची साधनं, प्रसारमाध्यमं यांच्यामुळे नागरसंस्कृतीची ओळख होऊन ‘ग्रामीण अर्धनागर’ अशा संमिश्र जीवनव्यवस्थेचा उगम झाला आणि तो आता ठळक होऊ लागला आहे. यातलं बरं-वाईट शोधणं समाजशास्त्रीय अर्थानं सोपं नाही. पण ढव्ह आणि लख्ख ऊन, रिवणावायली मुंगी, तिच्या वळणाची गोष्ट इत्यादी राजन गवस यांच्या कथा या अर्धनागर समूहांच्या घडणीचा कथारूप उद्‌गार आहे, असं मला वाटतं.

समकालाचं भान आणि आपल्या आजूबाजूच्या जीवनव्यवस्थेकडं बघण्याची एक नवी दृष्टी या कथांनी मला दिली आहे. एकंदरीत, पूर्वसूरींच्या कथाकारांनी कथा काय असते, हे मला सांगितलं आणि कथा लिहायची असेल तर हे सगळे प्रभावस्रोत पचवून स्वतःची नवी वाट शोधली पाहिजे, याचं भान कळत-नकळत आणून दिलं.

प्रश्न : अर्धनागर तालुकावजा गावाचा नव्या काळातला नकाशा तुमच्या कथेत आहे. तुमच्या दोनही कथासंग्रहांतील कथांमधून तो प्रभावीरीत्या प्रकट झाला आहे. भौतिक व मानसिक दृष्ट्या पालटलेल्या जगाची, गावसंस्कृतीची संवेदना त्या कथांमध्ये आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित अफाट वेगात घडणारे बदल तुम्ही फार संवेदनशीलतेने टिपलेले आहेत. याकडे तुम्ही कसे पाहता?

 - स्वातंत्र्योत्तर काळात गावगाड्यात अपरिहार्यपणे बदल होत गेला आहे. माझ्या लहानपणाच्या आठवणीतल्या खेड्यात साधारणतः गावाचा म्हणून जो काही एकसंधपणा असतो तो टिकून होता. कदाचित आपलं अवधान त्या वयात एकाग्र असतं म्हणूनही तसं वाटत असेल. पण रस्ते, वीज, शिक्षणाची आणि दळणवळणाची साधनं यांद्वारे गावात बाह्य बदल होत असताना, गावाचा पारंपरिक ढाचाही बदलत गेला आहे. म्हणून अमुक गल्ली, तमुक गल्ली, हा अमुक जातीचा वाडा- तो तमूक जातीचा वाडा हे बरंचसं आजही टिकून असलं तरी आर्थिक दृष्टीने सक्षम झालेल्या लोकांनी त्याबाहेर पडून गावात घरं बांधली आहेत, दुकानं थाटली आहेत. हा बदल सकारात्मक आहे.

थोडं पुढं जाऊन ज्या अर्धनागरीकरणाबाबत आपण आत्ता बोललो, त्याची गावातील प्रत्यक्ष आणि दृश्य उपस्थिती आपणाला बघायची असेल; तर थोड्याशा मोठ्या गावात बघावी लागेल. श्रीलिपी या कथासंग्रहातल्या शीर्षककथेतले सर हे गावात नव्यानं झालेल्या साईनगरात (त्यांच्या शेतकरी ज्येष्ठ बंधूंच्या भाषेत) बंगल्या बांधून राहत आहेत. परिस्थितीनं गांजलेल्या या गरीब कर्जबाजारी मोठ्या भावाबरोबर सरांनी आपल्या बाजूनं संवाद जाणीवपूर्वक आटवलेला आहे. तरीही मूळ गावठाणातल्या जुन्या घरासमोरून काही निमित्ताने ते ये-जा करतात; तेव्हा अडगळीत पडलेल्या फुटक्या कंदिलासारखा आपल्या आयुष्याचा पूर्वकाळ या घरात अडकून पडलेला आहे, याची जाणीव सरांना अस्वस्थ करते. हीच अस्वस्थता घेऊन एका बाजूनं त्यांचा कथाभर वावर आहे. दुसऱ्या बाजूनं त्यांचा मुलगा प्रवीण आणि संगणकयुगात प्रवेश करण्याकरता शासनानं बंधनकारक केलेली MS-CIT ची परीक्षा यांच्या रूपानं अतिआधुनिक तंत्रयुगाची वाटही त्यांच्या आयुष्यात थोडी किलकिली झाली आहे.

कथेची शंभरेक पानं, सर आपल्या आजूबाजूला वेगानं बदलत जाणाऱ्या वास्तवाशी आणि MS-CIT परीक्षेशी झटापट करतात. शेवटी पोराच्या अप्रत्यक्ष आधारानं कसेबसे पास होतात.  घरी आल्यानंतर अल्पशा ॲलर्जीनं किंचित आजारी पडतात आणि टीव्हीवर देश-विदेशातल्या बहुढंगी खबरी बघता बघता झोपी जातात. त्यांच्या स्वप्नात एक अवकाशयान येतं आणि त्यात बसून सर उड्डाण करतात. गतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर आपली खालची-वरची दिशा हरवल्यानं विश्वाच्या या अनंत पोकळीत आपण कःपदार्थ होऊन निव्वळ तरंगत आहोत, असा भयाण भासही सरांना होतो. आणि मग अंगांवरचं पांघरूण फेकत सर जागे होताना आपलं वर्गातलं नेहमीचं यशस्वी निबंधलेखनातील पालुपद मोठ्यानं उच्चारत जागे होतात. माझी व्यथा, माझे शल्य, माझे दुःख, माझा त्रास... तंत्रज्ञान हे मुळात विज्ञान आहे. आणि विज्ञान हा मानवाचा सृष्टिशोध. विज्ञान काही मर्यादेपर्यंत मानवी आयुष्य सुकर, सुरक्षित, स्वस्थ करतं ही गोष्ट खरी आहे आणि तिथपर्यंत त्यांचं महत्त्वही मान्य केलं पाहिजे. पण यंत्र भेदून नाद पाहण्याचा जो अतिरेकी प्रयत्न होतो आहे, त्याला थोडी विवेकाची मर्यादा असणं आवश्यक आहे.

अगदी आता सगळीकडं गाजणारा विकासाचा मुद्दाही त्यादृष्टीने पाहता येईल. कोणाचा विकास? कशाचा विकास? कशा पद्धतीनं विकास? या मूलभूत गोष्टींवरचं सगळ्यांचं लक्ष हटवून निव्वळ विकासाचा डांगोरा पिटणं सुरू आहे. गरीब-अर्धपोटी लोकांना या भूलथापांवर खोटा-खोटा का होईना, पण विश्वास ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण दुसरं कोणी एवढं खोटं बोलण्याचेही श्रम घ्यायला तयार नाही.

प्रश्न : स्त्रीचित्रणाला तुमच्या कथेत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण परिसरातील बायकांच्या जगातील अनेक पदर तुमच्या कथेत आहेत. त्यांच्या जगण्यातले सूक्ष्म भाव चित्रित झाले आहेत. बऱ्याच वेळेला ते कायांतरणाच्या पातळीवरचे आहे. एकाच वेळी शिवारातील व माजघरातील जग तुमच्या कथेत प्रभावीपणे आलेले आहे.

- शहर आणि खेड्यातल्या भेदांबाबत पुष्कळदा बोललं जातं, पण खेड्यातल्या अंतर्विरोधाबाबत फारसं बोललं जात नाही. जाती-पातींमध्ये विभागलेली विषम, अन्यायी समाजरचना अजूनही खेड्यात आपली मूळची दमनकारी यंत्रणा टिकवून आहे. पण त्याचबरोबरीनं- किंबहुना, काकणभर सरस पद्धतीनं स्त्री-पुरुष विषमता खेड्या-पाड्यांमध्ये आपला प्रभाव टिकवून आहे. दलितांना त्यांच्या दलितत्वाची जाणीव झाल्यावर जशी त्यातून दलितोद्धारक चळवळ उभी राहिली, काहीएक साहित्यविचार त्यातून प्रकट झाला; तसं काही तरी या खेड्यापाड्यांतील गरीब, कष्टाळू स्त्रियांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. खरं तर स्त्रीवादी चळवळी या बऱ्याचशा शहरकेंद्रित आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ग्रासरूट लेव्हलपर्यंत, लहानातल्या लहान गावापर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या खेड्यातल्या स्त्रियांना थोडं आत्मभान येणं गरजेचं आहे.

गावातली शेती जशी पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असते तसा या स्त्रियांचा संसार त्यांच्या दादल्यांच्या लहरीपणावर अवलंबून असतो. नवरा या दमनकारी सत्ताधीशाची दाट छाया या स्त्रियांच्या तना-मनावर पडलेली असते. वास्तविक, पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना, फारच सरस असं मी म्हणेन- कष्ट करूनही कुटुंब-व्यवस्थेतल्या निर्णयप्रक्रियेत स्त्रियांचं स्थान शून्य असतं. अजूनही मूल न होणे, झालं तर मुलगीच होणे या गोष्टीसाठी तिलाच दोषी धरलं जातं. स्त्रियांच्या शिक्षणाचा हक्क, राजकीय व्यवस्थेमध्ये कायद्याद्वारे त्यांना देण्यात आलेलं स्थान, नोकऱ्यांमधलं आरक्षण यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपण पाहू लागलो तर फार विदारक दृश्य दिसतं.

गवर, नभ उतरू आलं, राखीव सावल्यांचा खेळ यांसारख्या कथा कष्टकरी स्त्रियांच्या आत्मभानाबद्दल कदाचित काहीएक विधान करू पाहतात. पण इथं एक प्रश्न सहज विचारता येईल की- ‘‘किरण गुरव, तुमच्या या कथा तुम्ही म्हणता त्या शेता-शिवारातल्या स्त्रिया वाचतात का?’’ तर, माझं त्याला उत्तर असं आहे की, ‘‘एक पुरुष लेखक म्हणून माझ्याजवळ मुक्तीचा तेवढाच एक मार्ग आहे.’’  

मुलाखत : रणधीर शिंदे

Tags: मुलाखत रणधीर शिंदे किरण गुरव राखीव सावल्यांचा खेळ ललित ग्रंथ पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 interview mulakhat ranadhir shinde kiran gurav rakhiv savalyancha khel lalit granth purskar Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

किरण गुरव
kirangurav2010@gmail.com

लेखक, कथाकार 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके