डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्त्रियांबद्दल अत्यंत अवमानकारक आणि  हिणकस अशा भाषेचा वापर एकदा एका  खासगी संभाषणात केला. त्याचे रेकॉर्डिंग  जेव्हा समोर आले तेव्हा मुक्त जगातल्या  सर्वांत ताकदवान व्यक्तीने असं बोललेलं- वागलेलं चालणारच नाही,  असं वाटून  अचंबाही व्यक्त करण्यात आला. मात्र  ‘अरे,  ते तर काय ङेलज्ञशी Locker room talk होतं’ असं म्हणून अचंबित झालेल्यांचे आवाज, प्रतिकार दुबळे करण्यात आले. इथे दोन  मुद्दे उपस्थित होतात. स्त्रियांबद्दल असे  अवमानकारक बोलणाऱ्या व्यक्तीकडे अशा प्रकारे संस्थात्मक सत्ता एकवटू देणे ठीक  वाटणाऱ्या समाजाचा आपण भाग आहोत.  दुसरं म्हणजे- अशा प्रकारे पुरुषांबद्दल,  त्यांच्या शरीरांबद्दल हिणकस, अपमानकारक उद्‌गार सत्तेतल्या एखाद्या स्त्रीने काढल्यास निव्वळ त्याला Locker room talk म्हणून सोडून दिलं जाईल का?      

हा पेंगुळलेला,  अबोल ज्वालामुखीसुध्दा  कधीच उघड करत नाही,  त्याच्या गहिऱ्या पोटात दडलेले  तप्त-ज्वलंत मनसुबे.  त्या ज्वालामुखीकडे बोट दाखवून,  ईश्वरानी चार समजुतीचे बोल  पटवून दिले तिलाही. म्हणाला- अगं,  जर निसर्गाची रचनाच आहे  घुमेपणाची, तर, आश्वासक संयमानं तुझं ऐकणारा  साथी-भागीदार नाहीच मिळाला कधीच,  कुठे  तर, बिघडले कुठे?  तेव्हापासूनती  मूकपणे सनावते आहे  संबंध जगाला,  त्यातल्या प्रत्येक शब्द-अपशब्दाला,  घुमेपणाचं गुपित पांघरून.  तसं म्हणा कोणतंच गुपित,  गुपित राहत नाही- अमरत्वाच्या मूक इच्छेशिवाय. - स्वैर भाषांतर: मूळ - एमिली डिकिन्सन Reticence स्त्रियांची भाषा आणि संस्कृती यांच्यातली गुंतागुंत किती नेमकेपणाने मांडते आहे कवयित्री! 

संस्कृतीच्या  हस्तक्षेपाआधीही स्त्री-पुरुषातील काही फरक जैविक, नैसर्गिक आहेत. मग निसर्गाकडून, त्यातल्या स्वाभाविक  फरकाकडून संस्कृती तर प्रेरणा घेणारच- असं वाटायला  लावणारी ही कविता शेवटाकडे मात्र वेगळेच वळण घेते. ‘ती’ हे फरक सहज स्वीकारू शकणार नाही, तर ईश्वराला ते पटवून द्यावे लागत आहे. आणि अशा नैसर्गिक फरकांचं  अवाजवी ‘मूकपण’ ती सहन करते आहे.  हा मुद्दा अत्यंत प्रभावी आणि नेमकेपणाने कविता मांडून  जाते,  तेव्हा आपल्या परिसरातल्या-भवतालच्या किती तरी  स्त्रियांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा मावश्या,  माम्या, आया- ज्यांनी दुखरं वाटणारं असं दुय्यमत्व  नात्यांमध्ये,  समाजामध्ये सहज आपलंसं केलंच आहे. मात्र  यामध्ये एक महत्त्वाचं अंग या सगळ्या स्त्रियांनी स्वत:च्या  भाषेवर, भाषिक अभिव्यक्तीवर ‘समजूतदार’पणे मर्यादा घालून  घेणे हेही आहे. या समजूतदारपणाला दोन बाजू आहेत. एक  म्हणजे- वर म्हटल्याप्रमाणे,  समाजाला (मुख्यत: कुटुंबातल्या पुरुषांना) रुचेल-पटेल अशाच शब्दांचा,  भाषेचा उपयोग  करणे; तसेच मुळातूनच स्वत:च्या व्यक्त होण्यावर बंधनं घालून  घेणे. दुसरे म्हणजे- आपल्याबद्दल (स्वत:बद्दल किंवा एकूण  सगळ्याच स्त्रियांबद्दल) वापरल्या जाणाऱ्या भाषेत कितीही  हिंसा असली,  अवहेलना असली तरी ‘ही जगाची रीतच आहे’ असे मानून त्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्याचबरोबर पुरुषांच्या  भाषेतून कुठल्याही प्रकारे व्यक्त होण्याला फारसे आव्हान न  देणे.  

वर मांडलेल्या दोन्ही भाषिक प्रयोगांशी थोडक्यात ओळख  करून घेऊ या. स्त्रिया खरोखरच अशी बंधनं मानतात का? खरं  तर स्त्रियांकडे बडबड्या,  बोलताना पुरुषांपेक्षा जास्त उत्साही  असणाऱ्या म्हणून कायम पाहिलं जातं. ते बऱ्याच प्रमाणात  खरंही आहे. असं का होतं,  याला मात्र अनेक कारणं आहेत.  इंग्रजी भाषेचा अभ्यास करणाऱ्या भाषाशास्त्रज्ञांनी याबद्दल  अभ्यास करताना म्हटलं आहे की,  पुरुष आपला विचार  बेधडकपणे मांडतात आणि म्हणून त्यांच्या विधानांमध्ये  ठामपणा (भाषिक) दिसतो. उदा. एखादा सिनेमा आवडल्यास  This is a great movie असं विधान पुरुष करताना दिसतात. तर स्त्रिया ऐकणाऱ्याला आपले म्हणणे पटले आहे की नाही,  हे  पाहण्यासाठी विधानार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नांकित प्रयोग जोडून घेतात. उदा. This is a great movie, isn't it? या प्रश्नांकित वाक्यामागे बोलणाऱ्याची अनिश्चितता, त्याचा भित्रेपणा,  नमते घ्यायची वृत्ती दिसते. जो मुद्दा प्रश्न  विचारतानाचा आहे,  तोच उत्तर द्यायच्या वेळीही दिसून येतो. ‘किती वाजता भेटू या?’  असा प्रश्न जर एखाद्या व्यक्तीने  विचारला,  तर पुरुष उत्तर देताना बहुतेकदा स्वत:च्या सोईची  ठाम वेळ/वार सांगतात- ‘4 वाजता’ किंवा ‘येत्या सोमवारी 5 वाजता’ असं. मात्र आपण सांगतो आहोत ती वेळ  विचारणाऱ्याला सोईची असेल का नाही,  हे विचार मनात येऊन  स्त्रिया बहुतेकदा ‘4 च्या आसपास’ / ‘सोमवारी संध्याकाळी’ असे उत्तर देतात आणि प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची सोय  पाहणेही आपलेच काम आहे असे समजतात. 

पुरुषांना आज्ञार्थी  भाषेत बोलण्याची सवय असते आणि तसे ते एक प्रकारच्या  सहजतेने करत असतात. ‘बाहेर जाताना दार ओढून घ्या’ अशी आज्ञा पुरुष सहज करतात. अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या प्रसंगात- विशेषत: समोरची व्यक्ती पुरुष असेल (हुद्याने, वयाने  कनिष्ठ असेल तरीही) तर आज्ञात्मक बोलणे टाळतात.  बोलायची गरज भासल्यास ‘बाहेर जाताना दार ओढून घ्याल  का?’, ‘बाहेर जाताना दार ओढून घ्याल का प्लीज?’  अशा  प्रकारे विनंतीवजा आणि शिवाय प्रश्नार्थक स्वरूपात व्यक्त  होतात. यामागचे निव्वळ समाजशास्त्रीय संदर्भ बघितले तर- जे  वर्तन,  जी भाषा पुरुषांचे मूल्यमापन करताना ठामपणा, आत्मविश्वास अशा मूल्यांत होते;  त्याचेच स्त्रियांच्या बाबतीत  मूल्यमापन करताना रूप बदलते. तशाच प्रकारचा  आत्मविश्वास,  ज्ञान असणाऱ्या स्त्रीने तशी पुरुषासारखीच  भाषा वापरल्यास तिला ‘फारच वरचष्मा’ दाखवणारी,  इतरांची  दखल न घेणारी असे संबोधले जाते. अशा प्रकारचा फरक  जगभरात विविध स्त्रियांच्या भाषेच्या संबंधात केला जातो.  अर्थात प्रत्यक्ष सत्ता वापरून घेण्याची संधी ज्या स्त्रियांना मिळाली आहे,  त्यांची ही गत आहे. 

परंपरा, कौटुंबिक  जबाबदाऱ्या यामुळे ज्या स्त्रियांचे अनुभवविश्व संकुचित केले  गेले असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक निर्णयामुळे तसे झाले  असेल,  तर स्त्री-पुरुषांच्या भाषेतील दरी अधिक काटेकोरपणे  जपली जाते. हा झाला पहिला भाग- स्त्रियांच्या भाषिक  अभिव्यक्ती वेगळ्या असण्याचा,  ज्याला धरून या लेखमालिकेतल्या इतर काही भागांमध्येही आपण चर्चा करणार  आहोत.  दुसरा मुद्दा- जेव्हा स्त्रियांबद्दल बोललं जातं,  त्या भाषेचा.  बहुतांश वेळी भाषा स्त्रियांप्रति सहिष्णु नसते,  असं दिसून येतं.  याचं अगदी ठळक उदाहरण म्हणजे,  भाषेतील शिव्यांची  वैशिष्ट्ये. स्त्रिया,  स्त्रीचं शरीर यांची विटंबना करणाऱ्या शिव्यांची संख्या मोठी असते. मात्र त्याविषयीचे  समाजशास्त्रीय विश्लेषण पुष्कळ गुंतागुंतीचं आहे. त्याबद्दल  सविस्तर पुन्हा कधी. मात्र स्त्रीच्या वाटेला भाषिक अवहेलना  जास्त मोठ्या प्रमाणात येते, हे निश्चित. जो मुद्दा शिव्यांच्या  बाबतीत फार टोकाचा होतो,  त्याची इतर कमी तीव्र परंतु  अत्यंत हानिकारक रूपं आपल्याला आसपास कायम  पाहायला मिळतात. इंग्रजीमध्ये  Locker room talk  अशा संज्ञेखाली पुरुष असभ्य भाषा वापरणारच,  ही धारणा पुढे  येते. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्त्रियांबद्दल अत्यंत  अवमानकारक आणि हिणकस अशा भाषेचा वापर एकदा  एका खासगी संभाषणात केला. त्याचे रेकॉर्डिंग जेव्हा समोर  आले तेव्हा मुक्त जगातल्या सर्वांत ताकदवान व्यक्तीने असं  बोललेलं-वागलेलं चालणारच नाही, असं वाटून अचंबाही  व्यक्त करण्यात आला. मात्र ‘अरे, ते तर काय ङेलज्ञशी Locker room talk होतं’ असं म्हणून अचंबित झालेल्यांचे आवाज, प्रतिकार दुबळे करण्यात आले. इथे दोन मुद्दे उपस्थित होतात. 

स्त्रियांबद्दल असे अवमानकारक बोलणाऱ्या व्यक्तीकडे अशा  प्रकारे संस्थात्मक सत्ता एकवटू देणे ठीक वाटणाऱ्या  समाजाचा आपण भाग आहोत. दुसरं म्हणजे- अशा प्रकारे  पुरुषांबद्दल, त्यांच्या शरीरांबद्दल हिणकस,  अपमानकारक  उद्‌गार सत्तेतल्या एखाद्या स्त्रीने काढल्यास निव्वळ त्याला  Locker room talk  म्हणून सोडून दिलं जाईल का?  तर, या  प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं आहे. मुळात Locker room talk  या संज्ञेतच ‘केवळ पुरुषांनी वापरायची अधिक  मोकळीढाकळी भाषा’ असा अर्थ अभिप्रेत आहे. पुरुषांना  आपसात व्यक्त होण्यासाठी अशा ‘वेगळ्या भाषेची’ (जिच्यात मुळातच कुठलीतरी भाषिक,  काल्पनिक हिंसा  आहे) गरज भासावी आणि स्त्रियांना अशी भाषिक संधीच  नसावी,  हे दोन्ही दुर्दैवी नाही का? याचेच भारतात घडलेले  एक उदाहरण पाहा. 

ऑगस्ट 2017 मध्ये प्रायव्हसीच्या  विधेयकाची चर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर केली जात होती. चर्चा लांबत गेली आणि  काहीशी कंटाळवाणी झाली. तेव्हा ॲडिशनल सॉलिसिटर  जनरल श्री. तुषार मेहता आपल्या बोलण्याची सुरुवात  करताना म्हणाले, (मूळ इंग्रजीत) ‘‘माझी अवस्था प्रख्यात  हॉलीवुड अभिनेत्री एलिझाबेथ टेलरच्या सातव्या  नवऱ्यासारखी झाली आहे. काय करायचं हे मला ठाऊक  आहे,  मात्र ते अधिक रंजक कसं करावं,  हे मला कळत  नाहीये.’’  यावर जोरदार हशा पिकला. प्रकरण इथेच न  थांबता,  जस्टिस नरिमन यात सामील होत,  ज्या वकिलांची  अजून बोलायची पाळी आली नाही त्यांच्याकडे निर्देश करून  म्हणाले, ‘‘आठव्या आणि नवव्यांचं काय मग?’’  यावरही  उपस्थितांनी हसून ‘दाद’ दिली. या घटनेचा वृत्तांत जेव्हा  वर्तमानपत्रांमध्ये छापून आला,  तेव्हाच्या इंग्रजी  वर्तमानपत्रांमधले मथळे असे होते - 'A Humorous marriage of wit and pertinence'  (इकॉनॉमिक्स टाइम्स, 2 ऑगस्ट 2017) 'At privacy hearing in SC, ASG says he is Like Liz Taylor's 7th husband, judge asks about 8th.'  (द इंडियन एक्स्प्रेस, 2 ऑगस्ट 2017)  या सगळ्याची चर्चा करण्याआधीच कुणाला वाटेल की,  ‘हा तर विनोद आहे’,  ‘वाखाणण्याजोगी चतुराई आहे’, ‘वातावरणातला ताण कमी करायचा प्रयत्न आहे’. यातलं  नेमकं काय बरोबर आहे- सरळ-साधा विनोद की अजून  काही ? तर लिंगभेदाचे अभ्यासक म्हणतील की, gender reversed परिस्थितीत पण हा विनोद ठरेल का, हे तपासून  पाहावे. समजा,  जर एएसजी स्त्री असती (स्वतंत्र भारतात आजवर तीनच बायकांची/स्त्रियांची एएसजी म्हणून नेमणूक  झाली, याचीही नोंद घ्यायला हवी.) आणि असाच समांतर विनोद अशाच परिस्थितीत त्या व्यक्तीने/स्त्रीने केला असता तर? उदा.- ‘मला आता किशोरकुमारच्या चौथ्या  बायकोसारखे वाटते आहे... ते’ या टिंबांमध्ये सामावणारे  कुणी स्त्री भर सभेत विनोद म्हणून का होईना,  बोलू शकेल?  जर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेल,  तर हे Sexism चे उदाहरण ठरते आणि तसं आढळल्यास मूळ पुरुषाच्या  वक्तव्याचेही विश्लेषण करणे अपरिहार्य ठरते. वृत्तपत्रातल्या बातम्याचे वर दिलेले मथळे पाहिले की,  इंग्रजीतल्या Locker room talk चा अर्थ त्यातून लगेच जाणवतो. सुप्रीम  कोर्टामध्ये/देशातल्या सर्वोच्च न्यायालयात,  जिथे मूलभूत हक्कांची चर्चा घडत आहे,  अशा ठिकाणी या वक्तव्यांना जेव्हा  विनोदाचा दर्जा मिळतो आणि मनमोकळा हशा होतो;  तेव्हा  पुरुषांच्या या आक्रमक भाषिक उपयोगांना अधिकाधिक  अधिमान्यता मिळत जाते. 

सर्वांत महत्त्वाच्या,  उच्च  योग्यतेच्या संस्थांमध्ये पुरुषांचे काय बोलणे वा भाष्य ‘ठीक  आहे’ याच्या कक्षा चुकीच्या दिशेने रुंदावतात. शिवाय जेव्हा  सत्तेतले पुरुष अशा भाषिक मर्यादा ओलांडतात,  तेव्हा  तितकी सत्ता नसणाऱ्या- एकूणातच सगळ्याच पुरुषांची भीड  चेपते.  मग वर्तमानपत्रातून या प्रसंगांचं वर्णन Light moments (IE), a chuckle असे केले जाते. अशा पदांबरोबर जो सन्मान-जी प्रतिष्ठा जोडलेली असते,  ती अशा घटनांनंतरही जेव्हा अबाधित राहते; किंबहुना, काकणभर  सरस ठरते,  तेव्हाची गुंतागुंत सहज न सुटणारी होते.  स्त्रियांबद्दलच्या आणि स्त्रियांच्या स्वत:च्या  भाषेविषयीसुध्दा असे अनेक विषय,  मुद्दे आहेत. काही वेळेस  ते गंभीर आणि त्वरीत दखल घ्यावी असे असतात,  तर इतर  काही वेळेस आपल्या मनावर-समाजमनावर रंजक भाष्य  करणारे असतात. या दोन्ही बाजूंना आलटून-पालटून स्पर्श  करत ही लेखमाला पुढे जात राहील. एमिली डिकिन्सन म्हणते  तसं ‘जगातल्या स्त्रियांनी जे अभिव्यक्तीतलं मूकपणे जपलं आहे’ त्याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न!

Tags: शिक्षण समाजशास्त्र अभिव्यक्ती अमेरिका पुरुष स्त्रिया भाषा shikshan samajshasr abhivyakti America purush siryah Bhasha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके