डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आईशप्पथ सांगतो, सरांची कापडे रिठ्यांनी धुऊन धुऊन आमचे बावळे खिळखिळे झाले! (रेट वाढवून द्या म्हणून सांगणार होतो, पण जीभ नाही रेटली! आधीच त्यांच्या पाकीटात पैसे कमी!! कुठे आपण मागायला जा! असो!!) थोडक्यात काय, तर उपरिनिर्दिष्ट कापडे मेश्रामसरांची असणे शक्य नाही, नव्हते आणि नसणार.

'साधना'च्या वाचकांना (वाचक कसले, 'साधक' च म्हणायचे!) लॉण्ड्रीवाल्याचा हा पहिला-वहिला नमस्कार. चालू महिन्यापासून आपण दरमहा भेटत जाऊ अशी दाट शंका आहे. शंका अशासाठी म्हटले, की संपादकांनी ते तूर्तास मोघम ठेवले आहे. (बहुदा आधीच्या लॉण्ड्रीवाल्याने झटका दिला असावा! जाव द्या! आपल्याला काय ट्रायलवर तर ट्रायलवर!) तर मंडळी, व्यवसायाने आम्ही लॉण्ड्रीवाले आहोत हे वर सांगितलेच. (आम्ही मराठी असलो तरी...) आमचे आमच्या धंद्यावर विलक्षण प्रेम आहे. चार घरी जाऊन मळखाऊ कापडे उचलावीत, गाठोडे मारून धोबीघाटावर न्यावीत. जरा पाणी फेस (उपलब्धतेनुसार) दाखवून, कडकडीत उन्हात वाळवून इस्त्री फिरवून नेऊन द्यावीत. तुम्हाला सांगतो, या धंद्यात जेवढी 'व्हरायटी' आहे, तितकी क्वचितच कुठल्या धंद्यात असेल! आपली नजर चांगली बसली आहे! नुसता शर्ट किंवा प्यांट बघून आपण माणूस ओळखू शकतो. खोटं वाटतं? ठीकाय, आपण पटवून देऊ!

उदाहरणार्थ, हा शर्ट पहा. कॉलरवर तुलनेने स्वच्छ आहे, पण बाकी कपडा मळखाऊ. याचा अर्थ हे वस्त्र पेहेनणारा इसम कॉलर मध्ये रुमाल ठेवतो, हे कोणीही सांगेल! ही प्यांट. खिशाचा झोळणा आहे, पण प्यांटीचा बॉटम जाम मळलेला. पुन्हा प्यांट हिरव्या रंगाची. आमच्याकडे हा जोड आला, तेव्हा शर्टाच्या खिशात मोजून बारा आणे आणि एक बॉलपेन सापडले. आणि प्यांटीच्या खिशात कसली तरी वाळलेली पाने!

सदरील सदरा आणि पाटलोण आमचे नवे साहित्य संमेलनाध्यक्ष मारुतराव चितमपल्ली यांच्या मालकीची आहे, हे आम्ही क्षणार्धात ओळखले. (सध्या आम्ही सोलापुरात आहोत! मराठी सारस्वताच्या अंगांगांवर खेळणारी वस्त्रे धुलाईसाठी आपल्याकडेच आली आहेत! रेपुटेशन, रेपुटेशन म्हण्टात ते हेच!) आता तुम्ही म्हणाल, कशावरून? बारा आणे आणि बॉलपेन मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. केशव मेश्राम यांचेही असू शकते! अजाण 'साधक' हो, काढून टाका हा गैरसमज डोक्यातून बरे! अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या काळात मेश्रामसरांना भलभलते अनुभव आल्याने ते आजकाल शर्टाच्याच काय प्यांटीच्या खिशातही काही ठेवेनातसे झाले आहेत. 22 जानेवारीच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग'नामे रविवार पुरवणीत घणाघाती लेख लिहून त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. समारंभांना बोलावून लोक जबरदस्तीने भाषणे करून घेतात आणि वर पेने चोरून नेतात; इतकेच नव्हे तर घाईघाईने पाकीट हातात ठेवून रक्कमही कमी देतात. त्यातनं जाण्या-येण्याचा खर्चदेखील सुटत नाही, अशी गंभीर तक्रार त्यांनी केली आहे.

आता मला सांगा, ज्याची पेने कायम चोरीला जातात, तो वरच्या खिशात, शरीराच्या दर्शनी भागात कशाला पेन लावील? बाकी मेश्रामसरांचे एकूण संमेलनाध्यक्षपदाचे अनुभव काळजाला घरे पाडणारे आहेत, यात शंका नाही. वर्षभरात त्यांनी मोजून दोनशे एकोणसाठ कार्यक्रम घेतले. पुस्तक प्रकाशने, उद्घाटने, सत्कार, भाषणे, व्याख्यानमाला, परिसंवाद, परिषदा नि चर्चासत्रे यात दोनशे एकोणसाठ दिवस गेले. उरता उरले एकशे सहा दिवस! आता इतक्या कमी वेळात साहित्याची सेवा कशी होणार? आपल्याला आलेले अनुभव 'गढूळ' आहेत, असे मेश्रामसर म्हणतात. आम्हाला ते पटले आहे. कारण मेश्रामसरांची कापडे आमच्याच लॉण्ड्रीत हमेशा येतात! आईशप्पथ सांगतो, सरांची कापडे रिठ्यांनी धुऊन धुऊन आमचे बावळे खिळखिळे झाले! (रेट वाढवून द्या म्हणून सांगणार होतो, पण जीभ नाही रेटली! आधीच त्यांच्या पाकीटात पैसे कमी!! कुठे आपण मागायला जा! असो!!) थोडक्यात काय, तर उपरिनिर्दिष्ट कापडे मेश्रामसरांची असणे शक्य नाही, नव्हते आणि नसणार. ही कापडे रानावनात हिंडलेल्या माणसाची आहेत, हे कोणीही सांगेल, (खिशात तेंदूची पाने कोण ठेवतो हो!) मराठीतील इतर लेखक मंडळी तशी ब्रव्हंशी बैठ्या प्रकृतीची.

उगीच सुखाचा जीव दुःखात घालत पायाला भिंगरी लावून घेणार नाहीत. बसल्या जागी हात चालवण्यात पटाईत! पण आपल्या मारुतरावांनी आधी पाय चालवले, मग हात चालवायला घेतला! एकूण मनुष्य 'टारझन'सारखा रानावनात लहानाचा मोठा झालेला असल्याने हातीपायी धड आहे. मूळचे सोलापुरी असले तरी (शहरभागात) अधुनमधुन येणारे हे गृहस्थ. गड्ड्याच्या जत्रेचा नेम साधून यायला जमले तर अधिक बरे, असा साधा सरळसोट विचार करून खिशात बारा आणे ठेवून गडी हजर झाला! संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यापासून आमचे चितमपल्लीसाहेब दणादण फिरत सुटले. आपले फिरताहेत फिरताहेत! कुठे माधवराव पाटलाना भेटतील, कुठे नांदेडला जाऊन झटकिनी मुलाखत देऊन येतील! विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ मिळाले; मारुतराव चार मजले चढून बांद्याच्या साहित्य सहवासात हजर! मानला, बुवा!! इतके कमी होते म्हणून की काय, गेल्या आठवड्यात खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना भेटून आले, 'सामना'त पहिल्या पानाला फोटो! (हे मारुतरावांचे टायगर प्रॉजेक्ट) मध्यभागी गॉगल घातलेला ढाण्या वाघ, आणि शेजारी निडर वनसंरक्षकासारखे आपले मारुतराव! (वाघ बघायची हौस काही फिटत नाही, या माणसाची!) असो! अशा या आमच्या चितमपल्ली साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यात समुद्राकाठी हातभर लांबीचा विंचू शोधून काढला. नुसताच 'काठीने' ढोसकून 'शोधून' काढला नाही; त्याचा जालीम अभ्यास करून त्याच्यावर प्रबंध लिहून काढला. मीच त्याचा शोध लावल्यानं त्याला नाव देण्याचे कामही (मलाच!) करावं लागेल, असंही मारुतरावांनी 'सकाळ'मधल्या बातचितीत त्याच रविवारी जाहीर करून टाकले आहे. (विंचू शोधला! विंचू शोधला! विंचू शोधला होऽऽऽ!) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची आठवण सदैव राहो, म्हणून या विचवाचे नाव 'स्कॉर्पियाना सोलापुराना' असे ठेवावे, असे आम्ही या ठिकाणी सुचवून ठेवतो.

पहा, मारुतराव पटते का? मारुतरावांना जंगल 'चढले' आहे. (या विंचवाला ना उतारा!) प्राण्यांची भाषा, याने की निळावंती, त्यांना मुखोद्गत आहेच. पण शिवाय सेकंड लँग्वेज याने की मराठीवरही त्यांचे जबर प्रभुत्व आहे. खिशाला पेन लावून हे जंगलात घुसले की कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखांप्रमाणे बिबटे, चितळ, बारशिंगे नि वाघळे, बदके, हुदाळे बोलू नि वागू लागतात. वर्षातील दोनशे एकोणसाठ दिवस चितमपल्लीसाहेब जंगलात घालवणार, यात शंका ती काय? बिर्‍हाड यांचे पाठीवर, नि बसल्या जागी विचू हातभर लांबीचा होऊन बसतो. (त्या विंचवाला कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम असेल का? मारुतरावांच्या प्रबंधातच उत्तर मिळेल बहुदा!) असो. थोडक्यात काय, तर कापडे संमेलनाध्यक्षांची आली आहेत. धुऊन वाळवून तयार आहेत. पुन्हा पाणी मारून आम्ही त्याचा बोळा करून ठेवला आहे. इस्त्री तापली की फिरवतोच! कसे? माजी संमेलनाध्यक्षांना काही बरे अनुभव आले नाहीत. 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' असे म्हणतात. पण मागच्याच्या पायात ऑलरेडी हंटर बूट आहेतच, की राव!

Tags: नांदेड टारझन सप्तरंग केशव मेश्राम सोलापूर मारूतराव चितमपल्ली Nanded Tarzan Saptarang Keshav Meshram Solapur Marutrao Citampalli weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके