डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एका नोकरशहाचे अर्कचित्र आणि आजच्या काळातील वास्तवता

भारतीय ब्युरोक्रसीने भारतातील लोकशाही जिवंत ठेवली आहे, हे आज सारे जग मान्य करीत आहे. कारण निवडणूक आयोगाचे आयुक्त हे वरिष्ठ अनुभवी प्रशासकीय अधिकारीचअसतात. निष्पक्ष व काटेकोर निवडणुका घेऊन जनतेचे खरेखुरे मानस प्रतिबिंबित होणारे निकाल येणे व सत्तापरिवर्तन होणे, हे भारतात अलीकडे वारंवार घडत आहे.

मार्क्स व बेवरच्या नजरेतून आपण मागील अध्यायात नोकरशाहीच्या जन्माची कहाणी सिद्धांत रूपाने पाहिली. त्यानंतर या संदर्भात बरेच काम एफ.एम.मार्स, मायकेल क्रोझिअर व अनेक अमेरिकन शास्त्रज्ञांनी केले आहे, ते आपण संक्षेपाने पाहणार आहोत. त्यानंतर या तात्त्विक विवेचनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रशासनाचा नोकरशाहीच्या अंगाने इतिहास अभ्यासणार आहोत. तो इतिहास वैदिक काळ ते ब्रिटिश काळापर्यंतचा असून, त्यात कौटिलीय  अर्थशास्त्राने केलेले नोकरशाहीचे विवेचन, मुघल काळातील प्रशासन व्यवस्था (खास करून महसूल व्यवस्था) यांचेही धावते व संक्षेपाने विवेचन करणार आहोत.

पण आज या अध्यायात मला एका नमुनेदार ब्युरोक्रॅटचे अर्कचित्र प्रस्तुत करायचे आहे.कारण वेबरच्या मते ब्युरोक्रॅसी ही कितीही विवेकनिष्ठ व कायद्यावर आधारित संघटना- खास करून शासनाचा कारभार चालवणारी आदर्श व्यवस्था- असली तरी ती अनेक अवगुण, दोष व खास करून भ्रष्टाचारामुळे व जनतेशी नाळ तोडलेली असल्यामुळे बदनाम झाली आहे. ती हस्तिदंती मनोऱ्यात कशी वावरत असते व आत्मकेंद्रित कारभार करीत असते याचे (कॅनडाचे प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी ह्युग किनलेसाईड यांनी)एक सुरेख पण काहीशा अतिशयोक्तीपूर्ण व्यंगशैलीत अर्कचित्र काढलेले आहे. हे अर्कचित्र मी त्याचा भावानुवाद करून व त्यात माझी काही भर घालून पेश करणार आहे आणि त्यानंतर आजच्या काळातली बदलती वास्तवता दाखवणार आहे.

नोकरशहाचे अर्कचित्र

‘‘हा नीटनेटका फॉर्मल पोषाख केलेला अधिकारी आपल्या कार्यालयात सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत येतो. त्याची वेळ ही कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या नंतरची व वरिष्ठांच्या आधीची अशी बारकाईने निरीक्षण करून निवडलेली असते. ती वेळ त्याच्या अधिकारश्रेणी व पगाराच्या निकषावरून त्याने विचारपूर्वक ठरवलेली असते.

तो दिवसभर टपाल व फाईली पाहतो आणि असंख्य पत्रे लिहितो. पण त्याचा उद्देश प्रामुख्याने निर्णय देण्यापेक्षा माहिती मागविणे, आलेल्या माहितीतील त्रुटी काढणे, कायद्याचा कीस पाडणे व निर्णय इतरांवर ढकलण्यासाठी असतो. ही असंख्य पत्रे व नोट्‌स लिहूनही काहीच निर्णय न घेण्याची कला त्याने वर्षानुवर्षे अभ्यास करून आत्मसात केलेली असते; तिला कलेचे व त्याहीपेक्षा जादा शास्त्राचे रूप दिलेले असते. तो दररोज मिटींग्ज घेतो, त्याचे इतिवृत्त करण्यात बराच वेळही खर्च करतो, पण अंतिम निष्कर्ष काही काढला जात नाही. तो प्रत्येक निर्णय पुढे पुढे ढकलतो व परिस्थिती बदलण्याची या आशेवर वाट पाहतो की, त्याला तो निर्णय घ्यावाच लागू नये.

(जाता जाता : माजी पंतप्रधान नरसिंहरावांची येथे आठवण येते. त्यांच्या संदर्भात ‘Not to take decision is also a decision ‘ ही काहीशी कठोर टीका आठवते. तूर्तास एवढेच पुरे.)

तो दिवसभर ऑफिसात काम करताना वरिष्ठांशी नम्र आणि कनिष्ठांबाबत कठोर व असहिष्णू असतो.(महसूल खात्यात अशा अधिकाऱ्यांना ‘मुकादम' अधिकारी असे उपहासाने म्हटले जाते. वरिष्ठांना ‘मुका' (kiss) व कनिष्ठांना ‘दम' म्हणजे मुकादम.)

तो इतर अधिकाऱ्यांकडे सदैव धोकादायक शत्रू वा प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी तो ऐकून घेतो, त्याच्या मते ती त्याची उदारशीलता व सौजन्य असते. सामान्य जनांच्या तक्रारी व प्रसंगी अधिकाऱ्यास जाब विचारणे ही प्रवृत्ती म्हणजे अतिलोकशाहीचा दुर्दैवी परिणाम आहे, असे त्याला वाटते. त्यांची कामे करणे आवश्यक असले तरी त्यामध्ये सतत लक्ष देणे व उत्साह दाखवणे हे खऱ्या नोकरशहाला शोभत नाही, असे त्यांचे मनोमन ठाम मत असते. फक्त लोकशाही व्यवस्थेत त्याला ते व्यक्त करता येत नाही एवढेच!

तो मग कारमधून सायरन वाजवत दुपारच्या भोजनाला घरी जातो. भोजनाचा अवधी अर्धा तास असतो, पण हा नियम कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी. तो स्वत: सर्वसाधारणपणे तास-दोन तास लंचसाठी घेतो.

त्याच्या जेवणानंतरच्या दुपारी व संध्याकाळी कर्मचारी पावणेसहाच्या आधी घरी जाऊ नयेत यासाठी तो त्यांना विविध कामात (नोटस्‌ बनवणे, स्टेटमेंट तयार करणे, त्याने केलेल्या दौऱ्याची डायरी लिहून काढणे अशा) गुंतवतो. पण तो वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे व त्याने वरीलप्रमाणे दिवसभर मेंदूचा भुगा करणारे अतिप्रचंड बौद्धिक काम केल्यामुळे त्याचा मेंदू शिणलेला असतो. क्वचित प्रसंगी त्याचे डोकेही दुखत असते, म्हणून तो त्याला वाट्टेल तेव्हा, प्रसंगी पावणेसहाच्या आधीही कार्यालय सोडतो. ती त्याच्या अधिकारकक्षेतील बाब आहे व त्याबाबत त्याला कुणीही जाब विचारू शकत नाही अशी त्याची समजूत असते. वाटेत थांबून डोकेदुखी वा अन्य नोकरशहाला शोभणाऱ्या रक्तदाब, वाढते वजन, हृदयविकार, मानसिक ताणतणाव आदींची औषधे घेऊन तो हाशहुश करीत घरी परततो.

दिवसभरात आपण किती काम केले व कनिष्ठ कर्मचारी कसे कामचुकार, अप्रामाणिक व सुमार बुद्धीचे आहेत हे रसपूर्णतेने घरी बायका-मुलांना सांगत तो रात्रीचे भोजन घेतो. आपण आहोत म्हणून ऑफिस जागेवर आहे, हे अभिमानाने सांगताना आपले समकक्ष अधिकारी कसे वशिल्याचे तट्टू म्हणून लागले आहेत व कसे सुमार दर्जाचे आहेत हे सांगायला तो कधीच विसरत नाही. शासनास आपल्यासारख्या गुणी व परिश्रमी अधिकाऱ्यांची पर्वा नाही, असे विषादपूर्णतेनं सांगत उदास नि:श्वास टाकत भोजन संपवतो व झोपी जातो.'

**

मला खात्री आहे हे अर्कचित्र वाचताना अनेक जाणकार वाचकांना त्यांच्या माहितीतील नोकरशहा आठवतील व ते खुदकन्‌ हसतील. हे ‘अर्कचित्र' आहे म्हणून त्यात अतिशयोक्ती जरूर आहे, पण त्याला वास्तवाचा आधार नाही असे ठामपणे कुणी नोकरशहा म्हणू शकेल? सामान्य नागरिकांनाही हे अर्कचित्र वास्तव वाटेल. कारण त्याला आमच्यातले अनेक नोकरशहा जबाबदार आहेत. पण गंमत अशी आहे की, नोकरशहाचं हे अर्कचित्रातलं वर्णन अनेक कनिष्ठ कर्मचारी व बरेच नागरिकही कौतुकानं करत म्हणतात, ‘काय राजा माणूस (रॉयल) आहे.' त्यामागे आदिम काळापासून रूजलेला व ब्रिटिश काळात विशेषत्वानं दृढमूल झालेला ‘मायबाप सरकारचा' सिद्धांत आहे.नोकरशहा- भारतीय संदर्भात कलेटर, तहसिलदार, फौजदार- हे सरकारचे प्रतीक आहेत आणि ’ Government can not do any wrong' या उक्तीवर आजही अज्ञानी जनता विश्वास ठेवते. म्हणून तो नोकरशहाचं हे अर्कचित्रही कौतुकानं घेईल.

माझ्या सुरुवातीच्या प्रशासकीय जीवनातला एक अनुभव सांगतो. तेव्हा मी भूम (जि.उस्मानाबाद) येथे प्रांताधिकारी होतो. आमच्या भागातील काही माणसांना सूरजकुंड (हरियाना)येथे दगडांच्या खाणीत वेठबिगाराचे जिणे जगावे लागत होते. त्यांनी मला त्याबाबत पत्र लिहून कळवले म्हणून मी तिथे गेलो. दगडांच्या दहा-बारा खाणीत फिरून उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे पाऊणशे वेठबिगार कुटुंबे शोधली व त्यांची सुटका केली. परतीच्या दिवशी दुपारी तीन वाजता तेथील कलेक्टरला भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या पी.ए. व शिपायाने सांगितले. ‘डी.एम.साब लंच के बाद ऑफिस नही आते. बंगलेसेही काम करते हैं.' हे सांगताना त्यांच्या स्वरात ‘हमारे डी.एम.साब कितने रॉयल है' असाच सूर होता. तेव्हा तो मला मनस्वी फारच खटकला होता. पण नंतर असे अनेक अनुभव येत गेले. एक कलेक्टर कार्यालयात फक्त मीटिंग घ्यायला किंवा मंत्री आले तर यायचे. इतर वेळी अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांच्या फाईली घेऊन त्यांच्या घरी जाऊन सह्या आणाव्यात, असा त्यांचा अलिखित नियम होता. अर्थात त्यावेळी महाराष्ट्र हा एक अप्रगत व सरंजामी युगात वावरणारा भाग असल्याने त्यांनी आपली कारकीर्द लोकांचा रोष न होता पूर्ण केली.

पण आज चित्र खूप बदलले आहे. जनता जागृत व आक्रमक झाली आहे. ‘नॉन परफॉर्मिंग ब्युरोक्रॅट' वर ती टीका करते, मोर्चे काढते व त्यांना सळो की पळो करून सोडते. हे माझ्या मते आशादायक चित्र आहे. कारण आम्ही नोकरशहा जनतेचे सेवक आहोत. त्यांनी दिलेल्या करातून पगार घेतो, म्हणून त्यांची कामे त्यांच्या आकांक्षांनुरूप करणे हे आमचे आद्य व परमकर्तव्य आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात ही जाण नोकरशाहीला मोठ्या प्रमाणात झाली आहे. आज यु.पी.एस.सी.च्या जवळपास निर्दोष परीक्षेमुळे तळागाळातले लोक आम.ए.एस. व आम.पी.एस. होत आहेत.

मागे ‘द विक'मध्ये 'The changing face of bureauc-racy' नावाची सुरेख कव्हरस्टोरी (एका वर्षात उत्तीर्ण होणाऱ्या आम.ए.एस. अधिकाऱ्यांच्या परिस्थितीचा मागोवा घेत बदलत्या प्रशासनाचे रूप दर्शविणारी)प्रसिद्ध झाली होती. त्यात ग्रामीण भागातून आलेले, मातृभाषेत शिकलेले व गरीब कुटुंबातून आलेले बहुसंख्य अधिकारी होते. त्यांची समाजाशी व गावांशी नाळ शाबूत आहे. त्यामुळे ते बरेचसे ‘रिस्पॉन्सिव्ह' व ‘जबाबदेही 'झाले आहेत. अशा अधिकाऱ्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या आहेत. अनेकांनी नगर प्रशासन, शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रांत कामाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील सर्व गावे या एका वर्षात पूर्णत: हागणदारीमुक्त व 100% शौचालयमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामागे असंख्य कमिटेड अधिकारी आहेत. मी स्वत: ‘जनतेशी बांधील असणारी नोकरशाही असते' या तत्त्वावर विश्वास ठेवून अकोल्यामध्ये भारतातील पहिली बीओटी(बससेवा) तीही नफ्यातली सुरू केली. बालमजुरांसाठी शांता सिंन्हा यांनी वाखाणलेला ‘नवजीवन प्रकल्प' सुरू केला. (त्यावर काही वर्षांपूर्वी ‘साधना'मध्ये श्रीनिवास कुलकर्णी यांनी लेखही लिहिला होता.) सुरेश खोपडे यांचे ‘भिवंडी दंगल' हे पुस्तक त्यांच्या चाकोरीबाहेरच्या कामाचे दर्शन घडवते. ‘एक गाव, एक गणपती' ही संकल्पना अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हलका केला आहे.

भारतीय ब्युरोक्रसीने भारतातील लोकशाही जिवंत ठेवली आहे, हे आज सारे जग मान्य करते. कारण निवडणूक आयोगाचे आयुक्त हे वरिष्ठ अनुभवी प्रशासकीय अधिकारीच असतात. निष्पक्ष व काटेकोर निवडणुका घेऊन जनतेचे खरेखुरे मानस प्रतिबिंबित होणारे निकाल येणे व सत्ता परिवर्तन होणे, हे भारतात अलीकडे वारंवार घडत आहे. या निवडणुका घेणारे निवडणूक निर्णय अधिकारी हे जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी मास्तरावरचे असतात. नुकतीच काश्मीरमध्ये निवडणूक झाली व  60 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी मतदान करून आपला कौल दिला. तो कौल फुटीरवादी हुरियत नेत्यांना दिलेली सणसणीत चपराक होती, आणि निवडणूक प्रक्रियेवरचा प्रकट झालेला विश्वासही होता. तो विश्वास नोकरशाहीने निष्पक्ष वागून व आदर्श निवडणूक आचारसंहितेची बऱ्याच अंशी अंमलबजावणी करून मिळवलेला होता. हे कोणी निवडणूक विश्लेषकाने लिहिले नाहीही खेदाची बाब आहे, पण ती वस्तुस्थिती आहे व निवडणूक प्रसंगी हे प्रत्ययास येते हे खरे.

हीच बाब महापूर व इतर आपत्ती व्यवस्थापनाची आहे. अतिवृष्टी व धरणाचे पाणी सोडणे यामुळे अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत महापूर आले होते. त्याप्रसंगी तातडीने लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे जीव वाचवणे, त्यांना मदतवाटप युद्धपातळीवर करणे, त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी व औषधे पुरवणे व जलदगतीने त्यांचे पुनर्वसन करणे ही कामे जिल्हा व महसूल प्रशासनाने करून जनतेचा दुवा मिळवला आहे. मी सांगलीत जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना वाळवा तालुक्यात माझ्या हाताखाली काम करणारा दीपक चव्हाण हा गटविकास अधिकारी एका पुराने वेढलेल्या गावात रात्री मुक्कामाला थांबून लोकांना धीर देत होता व ‘काही होणार नाही, प्रसंगी तुमच्याबरोबर मीही मरेन' असा दिलासा देत होता. केवढी ही बांधिलकी व जनतेशी समरस होण्याची वृत्ती! किल्लारी-उमरगा भूकंपाच्यावेळी तेथील जिल्हा प्रशासनाने जे काम केले त्याला तोड नाही. माझा अनुभव सांगावयाचा झाला तर नांदेडला आलेल्या 1983 च्या महापुराच्यावेळी, प्रशासनाने एका रात्रीतून सुमारे 20 टन अन्नपदार्थ शिजवून, त्यांची दहा हजार पाकिटे तयार करून दुसऱ्या दिवशी सकाळी (केंद्रीय मंत्र्यांच्या हवाई पाहणीच्या वेळी) पुराने वेढलेल्या व संपर्क तुटलेल्या गावात टाकली होती. त्यावर एका नेत्याने मिश्किल टिप्पणी केली. ‘देशमुख साहेबांनी तलाठी ते तहसिलदार या  सर्वांना एका रात्रीपुरते आचारी बनवून त्यांनाही पोळ्या लाटायला लावलं; हे दृश्य अद्‌भुत होतं!'

या अध्यायाचा समारोप करताना मला हेच नमूद करायचे आहे की, ब्युरोक्रॅटचे वर रेखाटलेले अर्कचित्र आता बऱ्यापैकी अप्रस्तुत होत चालले आहे व पुन्हा एकदा आमची वाटचाल गॅस वेबरच्या ‘आयडियल ब्युरोक्रसी'कडे काही प्रमाणात का होईना सुरू झाली आहे पण शंभर टक्के आदर्श ब्युरोक्रसी कधीच अस्तित्वात येणार नाही, कारण मानवी दुर्बलता व विकार कधी संपत नाहीत. तरीही अलीकडे मोठ्या प्रमाणात चाकोरी बाहेरचे काम करण्याची तयारी असलेले व त्यासाठी धडपड करणारे अधिकारी पाहिले की वाटते, ‘अजूनही पेला रिकामा झालेला नाहीये, उलट तो थोडा अधिक भरलेला आहे.'

(गेली 25 वर्षे प्रशासकीय सेवेत असलेले लेखक,सध्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आहेत.)

Tags: नोकरशाही ब्युरोक्रसी बखर : भारतीय प्रशासनाची प्रशासन लक्ष्मीकांत देशुमख bakhar: bharatiy prashasanachi berucracy laxmikant deshmukh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके