त्या सायंकाळी आमच्यातले अनेक साहित्यिक व दिंडीतले वारकरी राहुल गांधींच्या पदयात्रेत सामील झाले. सर्वत्र एक उत्सवी व आशावादाने काही तरी परिवर्तन घडेल या विश्वासाचा माहौल होता. राहुलसोबत मुली, तरुणी, स्त्रिया, तरुण चालत होते व संवाद साधत होते. आंबेडकरांचा फोटो काढून घेऊन चालणाऱ्या एका मुलीचा फोटो काल संदेश भंडारेंनी व्हायरल केला होता. तो पाहून आज राहुलनी त्या मुलीला अफाट गर्दी असताना नेमके हुडकून जवळ बोलावलं व तिचा हात हातात घेऊन काही काळ चालले, गप्पागोष्टी केल्या. ते मला फार लोभस आणि हवंहवंस दृश्य वाटत होतं. सामान्यातील सामान्याशी रस्त्यावर उतरून कनेक्ट होणारा नेताच त्यांचे प्रश्न व समस्या नीटपणे समजू शकतो आणि त्यालाच त्यावरचा समाधानकारक तोडगा सापडू शकतो, असंही मला वाटलं.
‘भारतात जो नेता पदयात्रा काढतो, त्याच्यामागे लोक जातात आणि अंतिमत: तो किंवा त्याचा विचार किंवा दोन्ही यशस्वी होतात... हा इतिहास आहे.’
डॉ. हनुमंत कुरकुटे यांच्या ‘गांधी विचारांची प्रासंगिकता - संदर्भ : हिंद स्वराज्य’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने कार्यक्रमापूर्वी बोलत असताना नुकताच (7 सप्टेंबरला) राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा शुभारंभ झाला होता, त्या संदर्भात डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. त्यांनी 1983 च्या चंद्रशेखर यांच्या पदयात्रेचा- ज्यात ते सहभागी होते- दाखला दिला. तसेच विनोबांची भूदान यात्रा आणि तत्पूर्वीची महात्मा गांधींची दांडी यात्रा यावरही त्यांनी आपल्या चिकित्सक शैलीत भाष्य केलं होतं. मी ते त्या वेळी फारसं मनावर घेतलं नव्हतं.
पण कन्याकुमारीवरून निघालेली राहुल गांधींची पदयात्रा दररोज सरासरी पंचवीस किलोमीटर पुढे जात होती आणि त्याला एकप्रकारे जनचळवळीचे स्वरूप प्राप्त होत होते, तसा मी या पदयात्रेकडे गंभीरपणे पाहू लागलो. मी 1982 मध्ये बाबा आमटेंनी काढलेल्या ‘भारत जोडो’ या तरुणांच्या सायकल यात्रेत एक दिवस सहभागी होतो, तर चंद्रशेखर यांची पदयात्रा भाई वैद्य यांच्या रसाळ सांगण्यातून अनुभवली होती. त्यामुळे माझे कुतूहल वाढत गेले आणि त्याला एक निश्चित दिशा मिळाली, ती गणेश देवींनी ‘दक्षिणायन’मार्फत पुण्याला सप्टेंबर अखेर घेतलेल्या बैठकीमुळे- ज्यात मी अकस्मातपणे सामील झालो होतो. त्यांचे स्पष्ट आकलन होते की, ‘‘देशाची बधिर झालेली विवेकबुद्धी जागी करण्यासाठी आणि राजकारणातली हरवलेली किंवा सर्वांनी मिळून हद्दपार केलेली नैतिकता पुनर्स्थापित करण्यासाठी राहुल गांधींची ही ‘नफरत छोडो, भारत जोडो’ आणि ‘मिले कदम, जुडे वतन’ अशी (मनाने व विचाराने दुभंगलेले समाजमन व देश एकत्र करण्याची) यात्रा आहे. ते स्वत:, योगेंद्र यादव, प्रतिभा शिंदे यांच्यासारख्या देशभरातील असंख्य नागरी संस्थांच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे ती केवळ काँग्रेसची यात्रा नाही, तर लोकयात्रा आहे,.’’
मी लेखक-कलावंतांचा प्रतिनिधी या नात्यानं समाज वाचणारा आणि ते साहित्यातून मांडणारा लेखक म्हणून या बैठकीनंतर ‘भारत जोडो’ पदयात्रेकडे अधिक सजगपणे पाहू लागलो. काही दिवस सातत्याने यात्रेचे व्हिडिओज आणि छायाचित्रे पाहून एक जाणवलं की, काही तरी नवं - आक्रित घडतं आहे आणि लाखो लोक भारत जोडोशी जोडले जात आहेत. त्यांना त्यांच्या समस्या, संघर्ष आणि वेदना- प्रकट करण्याचं एक माध्यम मिळालं आहे. मुख्य म्हणजे व्यक्त होणं, असहमती दर्शवणं गुन्हा ठरावा आणि भयभीत होण्याच्या (मूक होण्याच्या) काळात लोक निर्भय होत राहुल गांधींच्या सोबत चालत आहेत. ‘गोदी मीडिया’मुळे प्रसारमाध्यमांनी बुद्ध्याच ज्यांना बेदखल ठरवून टाकलं आहे, त्यांना आवाज फुटतोय. तर अशा जन आंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालेल्या भारत जोडो यात्रेपासून मला अलिप्त राहता येणार नाही, याची जाणीव मला बऱ्याच विचारांती झाली.
महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ यात्रा 7 नोव्हेंबरला माझ्या नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार होती, त्या चार-पाच दिवसांत त्यात सामील व्हावं असं वाटलं. पण तारुण्यात आणि विचार फुटल्यापासून (मागील चाळीस वर्षांत) समाजवादी विचारांवर वैचारिक पोषण झालं असताना आणि डाव्या विचारांचा डोळस सहप्रवासी अलीकडच्या काळात झालो असताना, काँग्रेसप्रणित यात्रेत (तिचं महत्त्व लक्षात घेऊनही) कसं सामील व्हायचं हा माझ्यापुढे प्रश्न होता. तो दोन कारणांमुळे सुटला. एक राहुल गांधींनी टि्वट्स आणि विविध ठिकाणी भाषणांतून केलेली देशापुढील राजकीय व वैचारिक लढ्याची मांडणी. ‘हा संघर्ष आहे गांधी विरुद्ध सावरकर आणि काँग्रेस विरुद्ध आरएसएसच्या विचारधारेचा’ ही त्यांच्या भाषणाची थीम तशी नवी नाही, पण ती ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने लोकांना अधिक पटू लागली होती. ती माझ्यासाठी संघ परिवारप्रणित हिंदू राष्ट्र स्थापनेचा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ विरुद्ध भारतीय संविधानप्रणित ‘नागरी राष्ट्रवादाची’ वैचारिक लढाई होती.
2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा संविधानाला बासनात गुंडाळून ठेवत व स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि (खास करून सामाजिक व आर्थिक) न्यायाच्या संविधानिक अभिवचनाकडे दुर्लक्ष करीत ‘हिंदू प्रथम’ व ‘महत्त्वाचा’ मानत, त्यासाठी मुस्लिम व ख्रिश्चनांना दुय्यम लेखत व बहुसंख्य हिंदू समाजाला ‘व्हिक्टिमहूड’चा न्यूनगंड देत धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे अहंगंड देण्याचा प्रयत्न- अधिक नेटाने व पद्धतशीरपणे सुरू झाला. त्यातला देशाप्रतीचा धोका राहुल गांधींनी चांगलाच ओळखला आहे. म्हणून त्यांची मांडणी जरी सुलभ व ‘वनलाईनर’ स्वरूपाची असली तरी ती रास्त आहे, असे माझे मत आहे. कारण ‘हिंदुत्व नव्हे भारतीयत्व’ आणि महात्मा गांधींचा सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता व अहिंसा हा भारत देशाचा मध्यवर्ती विचार आहे, अशी मांडणी करणारे लेखन व जाहीर वक्तव्ये मी सातत्याने करीत आलो आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या विचारांशी मी बऱ्याच अंशी सहमत झालो.
‘भारत जोडो’ यात्रा सुरू करताना राहुल गांधींनी केलेली दोन टि्वट्स माझ्यातला कलावंताच्या मनाला मनस्वी भावले. ते दोन टि्वट असे होते, ‘द्वेष आणि समाज विभाजित करणाऱ्या राजकारणामुळे मी माझ्या आजीला व वडिलांना गमावून बसलो, पण कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या प्रिय देशाला त्या घातक राजकारणाला बळी पडू देणार नाही.’ आणि दुसरे ‘प्रेमाचा द्वेषावर विजय होईल. भीतीवर आशेचा विजय होईल. आपण सर्व जण मिळून हा विजय मिळवू.’ राहुल यांच्या बोलण्यात सच्चाई होती. कारण त्यांनी व प्रियांकांनी राजीव गांधींच्या खुन्यांनाही मन मोठं करत माफ केलं होतं.
मग भारत जोडो पदयात्रेत स्वत:ला कसं जोडून घ्यायचं, याचं उत्तर मला मिळालं- नांदेडच्या माझ्या तीन साहित्यिक मित्रांमुळे. दत्ता भगत, श्रीकांत देशमुख आणि जगदीश कदम यांनी ‘भारत जोडो साहित्य दिंडी’ची कल्पना मांडली. बुद्धी आणि भावनेला आवाहन करणारं निवेदन तयार करून त्यांनी अनेक साहित्यिकांना पाठवलं, तसंच मलाही पाठवलं. ते वाचून मी त्यांना सांगितलं, ‘मी नांदेडला तुमच्यासोबत या दिंडीत सामील होत आहे.’
मी मूळचा नांदेडकर आणि ‘भारत जोडो साहित्य दिंडी’चे आयोजक माझे लेखक मित्र. मग मी तीन दिवस (10 ते 12 नोव्हेंबर 2022) नांदेड व कळमनुरीत सुमारे दीडशे कलावंतांचा सहभाग असलेल्या साहित्य दिंडीचा वारकरी म्हणून त्यांच्यासोबत राहिलो.
दि.11 नोव्हेंबरला नांदेडला ट्रेनने पोहोचलो व श्रीकांत देशमुखांच्या कारने दुपारी तीन वाजता कळमनुरीला पोहोचलो. तिथे दीडशे साहित्यिक व छात्र भारतीचे विद्यार्थी यांची निवास व भोजन व्यवस्था करण्याची जबाबदारी केंब्रिज इंग्रजी शाळेचे अध्यक्ष डॉ. संतोष कल्याणकर यांनी आनंदाने स्वीकारली होती. आदली रात्र व दिवसभर प्रवास करून गणेश देवी सपत्निक आमच्या आधी दहा मिनिटे कळमनुरीला पोचले होते.
आणि ‘भारत जोडो’ साहित्य दिंडीचे रिंगण एक साहित्य संमेलन सुरू झाले. त्याबाबत कवी व संयोजक श्रीकांत देशमुख यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत भूमिका मांडली. साहित्य दिंडीच्या प्राथमिक निवेदनातील मुद्द्यांना पुढे नेत ते म्हणाले, ‘कलावंत हा समाजाप्रती तटस्थ कदापि राहू शकत नाही, तर तो समाजासोबत राहत असतो, निरीक्षण व अन्वेषण करून साहित्य निर्मिती करत असतो. सत्याचा शोध, प्रेम-मानवता-बंधुता या मूल्यांची मांडणी करणे आणि समाजमन घडविणे हे त्याचे काम असते. तो नेहमीच परिवर्तनशील व बंडखोर असतो. महाराष्ट्राची बंडखोर क्रांतदर्शत्वाची परंपरा वारकरी संत, चक्रधर स्वामी, शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर या थोर समाज सुधारकांनी संपन्न केली आहे. या साऱ्यांनी प्रेम, सहिष्णुता आणि धार्मिक समता-सलोख्याचा पुरस्कार केला आहे. आज देशात जी सहिष्णू सांस्कृतिक परंपरा व मूल्यांची मोडतोड चालू आहे, त्यातला खोटेपणा उघडा करून समाजाला खरा मानवताधर्म आणि सहिष्णू-समतावादी विचारांचे भान आणून देणे हे कलावंतांचे काम आहे.’ त्यांच्या या विचारांनी पहिल्या साहित्य रिंगणाची सुुरुवात झकास झाली व संमेलनाला वैचारिक दिशा दिली.
गणेश देवींनी या साहित्य दिंडीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या ‘छात्र भारती’च्या विद्यार्थ्यांना ‘भारत जोडो’ यात्रेचे महत्त्व आणि त्यामागचा विचार सांगून, ‘तरुणांनी पुरोगामी व समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी चंदनाप्रमाणे आयुष्य झिजवणाऱ्या महापुरुषांचे पुस्तकरूपी धन लुटावे व आपली वैचारिक भूमिका बनवावी,’ असे आवाहन केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर दर वर्षी शंभर विद्यार्थ्यांचे दोन दिवसांचे संमेलन घेऊन निवडक पन्नास पुस्तकांवर मान्यवर लेखकांनी प्रत्येकी वीस मिनिटांत त्या पुस्तकांचा परिचय करून द्यावा, अशी अभिनव कल्पना मांडली. ती साऱ्यांनी मान्य केली व पहिले संमेलन नांदेडला घेण्याची तयारी प्रा. श्रीराम गव्हाणे यांनी दाखवली. त्यानंतर धारवाड व पुणे येथे अशी संमेलने घेण्याचे ठरले.
या रिंगणात पत्रकार व खासदार कुमार केतकर व शारदा साठे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. केतकर हे या यात्रेत पहिल्या दिवसापासून सहभागी होते. त्यांनी ‘ही यात्रा भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणामुळे विविध धर्मिय समुदायाच्या दुभंगलेल्या मनास जोडण्यासाठी आणि विषमता व बेरोजगारी वाढविणाऱ्या आर्थिक नीतीमुळे त्रस्त झालेल्या गरीब वर्गात आशेचा दीप पेटवण्यासाठी आहे’, असे सांगून त्यांचे यात्रेदरम्यानचे अनुभव विषद केले. पूर्ण महाराष्ट्राच्या पट्ट्यात ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेले फोटो जर्नालिस्ट व लेखक संदेश भंडारे आपले अनुभव सांगताना म्हणाले, ‘राहुल गांधींकडे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आकृष्ट होत आहे व स्त्री वर्गास (अगदी शाळकरी मुलीपासून ते तरुणी, गृहिणी व आजीपर्यंत सर्वांना) राहुल आपले घरचे वाटतात, एवढे की, त्यांच्या हातात हात घालून चालताना त्यांना संकोचही वाटत नाही.’ मला भंडारेंचे हे निरीक्षण विशेष पटले. कारण आज राजकीय नेत्यांच्या भोवती स्त्रिया अभावानेच असतात. राहुल गांधींमध्ये जी निरागसता व निर्मळता आहे, त्यामुळे स्त्रियांना त्यांच्यासोबत चालताना व संवाद करताना संकोच वाटत नाही.
रात्री भाकरी पिठलं व वांग्यांचे भरीत असं साधं पण सुग्रास जेवण होतं. यावेळी माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडे भेटले. त्यांची मी गणेश देवींना ओळख करून दिली. त्या दोघांचा भारतातील हिंसा व दंग्यांबाबतचा संवाद अर्थपूर्ण झाला, त्याने मी बराच अनुभवश्रीमंत झालो.
दुसऱ्या दिवशीचं साहित्य दिंडी रिंगण दोन संमेलन माझ्या अध्यक्षतेखाली झालं. दत्ता भगतांनी यावेळी भारताला गांधी व आंबेडकरांचे विचारच तारक ठरणारे व प्रगतीपथावर नेणारे आहेत, हे आवर्जून सांगितले. धनाजी गुरवांनी महाराष्ट्राची समता प्रस्थापित करणाऱ्या विद्रोही चळवळीची परंपरा प्रभावीपणे मांडली. राष्ट्र सेवादलाच्या वतीने ‘सलोखा’ चळवळ करणाऱ्या प्रमोद मुजुमदारांनी सुफी व वारकऱ्यांच्या विचारांचा संगम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कसा पाहायला मिळतो हे समजावून सांगितलं. ‘कळमनुरीचं ग्रामदैवत तिथला सुफी दर्गा असून तिथे आई-बाप नवजात बालकांना आवर्जून आणतात आणि नवविवाहित जोडपी न चुकता दर्शनाला येतात’, हे कळल्यावर भारताच्या गंगा-जमनी तहजिबवरचा माझा विश्वास अधिक दृढ झाला. मी अध्यक्ष या नात्याने माझी भूमिका मांडताना ‘साहित्यानं मानवतावाद, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा आणि आंतरराष्ट्रीयता या मूल्यांच्या आधारे आधुनिक माणून घडविण्याचं काम करावं,’ असं प्रतिपादन केलं.
मग आम्हाला राहुल गांधींना भेटायला कळमनुरीच्या आधी आठ किलोमीटर अंतरावरील दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी (गणेश देवींच्या नेतृत्वाखाली) जायचं असल्यामुळे, मी तयार केलेल्या निवेदनाचे मुद्दे सर्वांना सविस्तर सांगितले. त्यात सहमतीने उपस्थित आणि फोन-संदेशानं पाठिंबा देणाऱ्या निवडक साहित्यिकांची नावे सामील केली. त्यात वसंत आबाजी डहाके, नागनाथ कोत्तापल्ले, कौतिकराव ठाले-पाटील, राजन गवस, गणेश मोहिते, कवी अजय कांडर, नागरोव कुंभार आदी पन्नासेक मान्यवर होते. हे निवेदन ‘भारत जोडो साहित्य दिंडी नांदेड’च्या लेटरहेडवर टाइप करण्यात आले होते!
नांदेड ते कळमनुरी महामार्ग माणसांच्या व वाहनांच्या गर्दीनं ओसंडून वाहत होता. राहुल गांधींच्या विसाव्याच्या ठिकाणी एक छोटे गाव वसवण्यात आले होते. आमच्या पंचवीस जणांच्या शिष्टमंडळाचे स्वागत काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व पुण्याचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केलं. अर्थात आमच्यासोबत कुमार केतकर व शारदा साठे हे दांपत्य होतंच!
दुपारी सव्वादोनला राहुल गांधी सुहास्य मुद्रेनं नमस्कार करत भेटीच्या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत गणेश देवी, बाळासाहेब थोरात, मोहन जोशी व कुमार केतकर आसनस्थ झाले, त्यांच्यासमोर आम्ही पंचवीस साहित्यिक बसलो होतो. राहुल गांधींना मी प्रथमच प्रत्यक्ष तेही दोन फुटांवरून पाहत होतो. अंगात तीच यात्रेची बेज कलरची पँट व पांढरा टीशर्ट होता. दाढी बरीच वाढलेली होती, पण रापलेल्या चेहऱ्यावर प्रसन्न बॉईश चार्म असणारं स्मित आणि समोरच्याकडे स्नेहार्द नजरेनं पाहणारे डोळे. त्या क्षणी स्त्रियांना त्यांच्या सहवासात एवढा विश्वास का वाटतो, ते लक्षात आलं. एक घरचा भाऊ, मुलगा, मित्र व सखा वाटणारे राहुल गांधी... पंधराशे किलोमीटर अंतर चाललेले- आज सकाळी पंधरा किलोमीटर... तरीही चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. मनात ध्येय व विचार पक्का असल्याशिवाय एवढी दीर्घ यात्रा संभवत नाही.
गणेश देवींनी प्रास्ताविक केल्यावर साहित्यिकांच्या वतीने मी जे इंग्रजी निवेदन केले होते, त्या आधारे राहुल गांधींना पुढीलप्रमाणे सांगितलं.
‘आम्ही मराठीचे प्रगतीशील व पुरोगामी लेखक देशातील धार्मिक विद्वेष, अधिकाधिक पसरत जाणारं जातीय जहर, भूक, बेरोजगारी, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि असहमतीचा हिरावून घेतलेला अधिकार यामुळे व्यथित आहोत. तुमच्या पुढे ते व्यक्त करताना अपेक्षा हीच आहे की, त्याचा आपण विचार करावा आणि आपल्या भाषणात, चर्चेत ते मुद्दे पुढील यात्रेत घ्यावेत. कारण ते केवळ आमचे नाहीत, तर आम भारतीयांचे आहेत.’
आमच्या सर्वांच्या वतीनं तयार केलेल्या निवेदनात पाच मुद्दे होते. ‘भाजपच्या विखारी हिंदुत्वाला सॉफ्ट हिंदुत्वाने उत्तर न देता प्रखर सेक्युलॅरिझमने उत्तर द्यावं. ‘क्रोनी कॅपिटॅलिझम’ला आळा घालत रोजगार निर्मिती व दारिद्र्य निवारण्याकडे विशेष लक्ष द्यावं. सर्वांना परवडणाऱ्या दरात उच्च शिक्षण मिळावं. शेतकऱ्यांना एमएसपी हक्काने मिळावी व कामगारांना कामावरून काढून टाकण्याची मुभा देणारे कामगार कायदे बदलावेत. आणि कलावंतांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे’.
धनाजी गुरव आणि प्रमोद मुजुमदारांनी शोषण मुक्ती आणि हिंदू-मुस्लिम मिलाफाच्या गंगा-जमनी तहजिबवर भर देत आपले विचार मांडले.
राहुल गांधी शांतपणे पण लक्षपूर्वक आमचे म्हणणे ऐकत होते. आणि मुद्दे नोंदवून घेत होते. आम्ही तिघांनी व गणेश देवींनी ‘भारत जोडो’ यात्रेला एक वैचारिक भूमी देण्याचा प्रयत्न निवेदन व चर्चेतून केला होता, तो त्यांच्या नीट लक्षात आला होता.
मग त्यांनी ‘मलाही काही विचारायचे आहे’ असे म्हणत चर्चेला प्रारंभ केला. त्यांनी मला ‘सॉफ्ट हिंदुत्व’ म्हणजे काय? हे विचारलं, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, ‘‘निवडणुकीच्या वेळी काँग्रेस व इतर विरोधी पक्ष भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रचारामुळे आपली हिंदू मते कमी होऊ नयेत म्हणून मुस्लिम हे नावही घेत नाहीत, उलट अहमहमिकेने मंदिर दर्शन करीत ‘आम्ही पण हिंदुत्वाच्या बाजूने आहोत’, असे दर्शवण्याचा प्रयत्न करतात. हे ‘सॉफ्ट हिंदुत्व’ महात्मा गांधींच्या व काँग्रेसच्या विचारांविरुद्ध आहे. कारण बापुजींनी ‘भारत हा देश कधीही हिंदू राष्ट्र होणार नाही’ असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे हिंदुत्वाचे उत्तर सेक्युलॅरिझम आहे आणि हा देश हिंदूंसोबत मुस्लिम, ख्रिश्चनांसह घडविण्याची व विकसित करण्याची आमची विचारधारा आहे, असे तुम्ही सांगितले पाहिजे.’’ राहुल गांधींनी माझं हे थोडंसं ‘ब्लंट’ बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. ते त्यांना पटलं असावं, असं वाटलं. मी हा लेख लिहिताना (15 नोव्हेंबरला) वाशिम येथे राहुल गांधीनी आपल्या भाषणामध्ये ‘सर्वधर्म समभावाच्या देशात भाजप व संघाने द्वेष पसरवून देश तोडण्याचे काम सुरू केले आहे, त्याला उत्तर देण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे.’ असे म्हटल्याची बातमी आली आहे.
मग धनाजी गुरव यांनी विद्रोही भूमिका मांडली, त्या अनुषंगाने राहुल गांधीनी ‘शुद्र समजला जाणारा वर्ग हा उत्पादक वर्ग आहे, तर उच्च वर्णिय हा बुद्धिजीवी व सेवा क्षेत्रात काम करणारा आहे, हे विभाजन का व कसे झाले असावे?’ असा प्रश्न उपस्थित केला आणि मग बरीच मुक्त चर्चा झाली. मी त्यांना म्हणालो, ‘हाताने काम करून उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही, कारण तो गरीब आहे. त्याच्या उत्पादनाला वाजवी भाव मिळत नाही. बापूंनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकानं हात आणि मेंदू दोन्हीचा वापर करून काम केले पाहिजे, तरच सर्वांना समान प्रतिष्ठा मिळेल.’
राहुल गांधीनी आम्हाला भेटीसाठी अर्धा तास दिला होता, पण चर्चा सुमारे पंचावन्न मिनिटे रंगली होती. त्यांचे सहकारी त्यांना चर्चा संपवण्याच्या खुणा (घड्याळ दाखवत) करत होते, पण ते त्याकडे दुर्लक्ष करत होते. मग गणेश देवींनीच चर्चा आटोपती घेतली. त्यानंतर फोटोसेशन झाले. फोटोसेशनच्या वेळी माझ्या बाजूच्या खुर्चीत बसलेले राहुल गांधी ‘‘मी माझ्या मनाचा आवाज ऐकला आणि ‘भारत जोडो-नफरत छोडो’ यात्रा सुरू केली’’ असं म्हणाले. तेव्हा मी त्यांना महात्मा गांधी पण ‘आतल्या आवाजा’वर विश्वास ठेवून निर्णय घ्यायचे, याची आठवण करून दिली. तसे ते दिलखुलास हसले.
गणेश देवींनी आधी आमच्याशी बोलून राहुल गांधींना सांगितलं की, ‘महाराष्ट्रातील लेखक देशापुढील कळीच्या मुद्द्यांवर लेख लिहून त्याचा एक वैचारिक ग्रंथ सिद्ध करतील. त्याचा इंग्रजी अनुवाद मी तुम्हाला यात्रेच्या समारोपाच्या वेळी श्रीनगरला देईन...’ सदर ग्रंथ संपादनाची जबाबदारी त्यांनी श्रीकांत देशमुख व माझ्यावर सोपवली आहे.
त्या सायंकाळी आमच्यातले अनेक साहित्यिक व दिंडीतले वारकरी राहुल गांधींच्या पदयात्रेत सामील झाले. सर्वत्र एक उत्सवी व आशावादाने काही तरी परिवर्तन घडेल या विश्वासाचा माहौल होता. राहुलसोबत मुली, तरुणी, स्त्रिया, तरुण चालत होते व संवाद साधत होते. आंबेडकरांचा फोटो काढून घेऊन चालणाऱ्या एका मुलीचा फोटो काल संदेश भंडारेंनी व्हायरल केला होता. तो पाहून आज राहुलनी त्या मुलीला अफाट गर्दी असताना नेमके हुडकून जवळ बोलावलं व तिचा हात हातात घेऊन काही काळ चालले, गप्पागोष्टी केल्या. ते मला फार लोभस आणि हवंहवंस दृश्य वाटत होतं. सामान्यातील सामान्याशी रस्त्यावर उतरून कनेक्ट होणारा नेताच त्यांचे प्रश्न व समस्या नीटपणे समजू शकतो आणि त्यालाच त्यावरचा समाधानकारक तोडगा सापडू शकतो, असंही मला वाटलं.
‘भारत जोडो’ यात्रे संदर्भात मला इथे दोन प्रश्न उपस्थित करायचे आहेत. पहिला कळीचा सार्वजनिक प्रश्न आहे तो म्हणजे - या पदयात्रेनं राहुल गांधी पुढील काळात नरेंद्र मोदींना पर्याय ठरू शकतील का व काँग्रेस पक्ष उभारी घेऊ शकेल काय? आणि दुसरा प्रश्न- आजच्या धार्मिक ध्रुवीकरण, क्रोनी कॅपिटॅलिझम आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद (अर्थात शर्करागुंठीत हिंदू राष्ट्रवाद) विरुद्ध संविधानिक मूल्ये जोपासणारा नागरी राष्ट्रवाद या लढाईत अंतीमत: कोण विजयी होणार?
‘भारत जोडो’ यात्रेला मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त आणि प्रचंड असला तरी त्यातून जे वातावरण निर्माण झालं आहे व होत आहे, त्याद्वारे काँग्रेस पुढील सार्वत्रिक निवडणूक जिंकू शकेल का? याचं उत्तर देणं आज अवघड आहे. पण नेटानं व काँग्रेसच्या मूळ गाभ्याच्या ध्येय धोरणाशी फारकत न घेता मूल्याधिष्ठीत आणि संविधानिक नैतिकतेचं राजकारण केलं तर भारतीय मतदारांना ते समजेल, भाजपच्या राजकारणाचे धोकादायक परिणाम उमगतील आणि परिवर्तन होऊ शकेल. ते अशक्य नाही, पण सोपेही नाही. ही ऐतिहासिक परिवर्तनाची संधी राहुल गांधी साधू शकतील का? त्यांच्या यात्रेत सामील होणाऱ्या सामान्य नागरिकांना त्याबाबत वाटणारा विश्वास त्यांनी विफल केला, तर ती त्यांची शोकांतिका असेल व देशाचं दुर्दैव... कॅन ही रोज टू द ऑकेजन? दॅट इज द मिलियन डॉलर्स क्वेश्चन!
आता दुसरा प्रश्न माझ्यासारख्या सर्वच साहित्यिक - कलावंतांचा आहे. कलावंतांची कलाकृती, त्यांचं बोलणं, प्रकट होणं, हे केवळ कलेचं नसतं. ते तेवढंच राजकीय असतं. कारण कलावंत हा समाजाचा प्रॉडक्ट असतो, तो समाज जीवनाचा आरसा असतो. समाज इष्ट दिशेने कसा बदलावा, त्याच्यातली कुरुपता घालवणं आणि मानवी प्रकृतीला विकृतीकडून संस्कृतीकडे नेण्याचं सूचन करणं हे कलावंतांचं काम असलं पाहिजे. शक्य झालं तर आज समाज, माणसं व त्यांच्या प्रवृत्ती कशा आहेत, हे सांगत त्यातलं अनिष्ट कसं संपवावं व मानवी हिताचं कसं बनवावं याची ब्ल्यूप्रिंटही कला व साहित्यातून द्यायला हवी. पण त्यात प्रचारकीपणा व उपदेश नको. ते कथानक व चरित्र चित्रणातून यायला हवं, तरच ते माणसांच्या भावनांना स्पर्श करेल!
आज सर्वत्र भय आहे आणि ते प्रामुख्याने राज्यसंस्थेमुळे आहे. अशा वेळी निराश - हताश न होता मूर्तीमंत निर्भय साधक असणारा महात्मा गांधींचा ‘कर ते देखो’ हा संदेश आठवावा, बराक ओबामाचा ‘येस वुई कॅन’ हा आशावाद जिवंत ठेवावा आणि ‘वो सुबह कभी तो आयेगी’ म्हणत ती नवी उज्ज्वल प्रभात साकार करण्याची जबाबदारी इतरांवर सोपवण्याऐवजी ‘वो सुबह हमीसे आयेगी’ असं साहिरसारखं निर्धाराने म्हणत जमेल तेवढी बंडखोरी करायची असते. हेच कलावंताचं भागधेय असतं. आमचे बहुसंख्य कलावंत त्याकडे पाठ फिरवतात, हे खरं असलं तरी निदान ‘अंकुर’ व ‘फँड्री’ सिनेमात शेवटी जसा एक दगड व्यवस्थेवर भिरकावला जातो, तसा एक दगड तरी मला मारता यावा; एवढं तरी धैर्य माझ्यात, तुमच्यात - सर्व कलावंतात असावं!
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या