डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'हिमालयातील कुसुमशती' : एक दृष्टिसुभग अनुभव

श्री आश्विन मेहता हे जागतिक कीर्तीचे छायाचित्रकारच नव्हेत तर उत्तम कलाकार म्हणून मान्यता पायलेले आहेत. त्यांच्या व्हॉइसेस ऑफ सायलेन्स आणि एन्काउंटर्स विथ इटर्निटी या छायाचित्रसंग्रहांचा परिचय साधनेच्या वाचकासाठी करून दिलेला आहेच. पुढील लेखात त्यांच्या ‘हंड्रेड हिमालयन फ्लॉबर्स' या चित्रसंग्रहांचा परिचय डॉ. लीला अर्जुनवाडकर यांनी करून दिला आहे.

अभिजात संस्कृत वाङ्मय वाचायला लागल्यापासून गेली कित्येक वर्षे एक रुखरूख माझ्या मनात सतत घर करून राहिली आहे. हिमालयात, अगदी थोडेसेच का होईना, हिंडून आल्यावर तर ही रुखरूख आणखीच वाढली आहे. संस्कृत का्व्यवाङ्मयात निसर्गवर्णन पुष्कळच येते. किंबहुना डोंगर, नद्या, समुद्र, सूर्योदय, सूर्यास्त, बने, उद्याने, सहा ऋतू यांची वर्णने हे महाकाव्याचे एक लक्षण आहे. पण असे असूनही संस्कृत काव्यात उदंड फुलणाऱ्या कमळांचा आणि एखाद्या हाल सातवाहनाने उल्लेख केलेल्या इवल्याशा बकुळफुलाचा, किंवा अरण्याला वणवा लागल्याचा भास उत्पन्न करणाऱ्या पळसफुलांचा अपवाद वगळला तर फुलांची वर्णने अशी सहसा आढळत नाहीत. रानफुलांची, तृणपुष्पांची तर नाहीतच नाहीत. 

तपशिलाची वर्णने नसली तरी उल्लेख येतात ते मुख्यतः चंपक, शिरीष, अशोक, कुंद, जाती, मालती, यूथिका, शेफालिका, माधवी, मंदार, कुरबक, चूतमंजरी, नवमल्लिका, लोध अशा बहुतांशी उद्यानात पुष्पांचे. क्वचित कुठे तरी एखादा रानावनाताला कर्णिकार, कुटज, नीप किंवा कदंब भेटतो, इतकेच. रानावनांत, डोंगरदऱ्यांत गालिचे अंथरल्याचा भ्रम उत्पन्न करणारी रानफुले, त्यांच्यावर भिरभिरणारी असंख्य रंगीत फुलपाखरे याच्याकडे संस्कृत कवींनी एवढे दुर्लक्ष करावे?

बाकीच्यांचे राहो. कालिदासाने सुध्दा? त्याची सौंदर्य टिपण्याची वृत्ती इतकी तरल आहे की कमळाच्या उमलू घातलेल्या टपोऱ्या कळ्यातली भुंग्यांची मुग्ध हालचालही त्याच्या नजरेतून सुटत नाही. रंग, गंध, स्पर्श, आकार, गती, उंची या साऱ्यांच्या जाणिवा विलक्षण तल्लखपणे टिपून घेणाऱ्या या प्रतिभावंतानेदेखील वनातल्या या सौदर्याची दखल घेऊ नये? बरे, असेही नाही की तो फक्त राकट, कणखर, दगडांच्या अशा एखाद्याच प्रांताला चिकटून राहिला होता. आणि Ten Thousand Saw I at a glance हे वर्णन लागू पडेल अशी हिमालयातली पुष्पसमृध्दी त्याने पाहिलीच नसेल. भारतवर्षाचा कोपरा न् कोपरा त्याने पायाखाली घातला होता. हिमालयावर तर त्याचे केवढे प्रेम आणि भक्ती! आपल्या वाङ्मयात किती ठिकाणी त्याने अतिशय आत्मीयतेने या देवातामा, पृथ्वीचा मानदंड असलेल्या हिमालयाची देखणी वर्णने केली आहेत।    

असे म्हणता येईल की कुमारसंभवाच्या पहिल्या सर्गात त्याला हिमालयाची फक्त भव्यता, प्रचंडता, उत्तुंगता, प्राचीनता, अनंतरत्मप्रभवत्व, त्याची देवभूमी यांचेच वर्णन करायचे होते. म्हणून त्याने अगदी छोट्या छोट्या फुलांसारख्या गोष्टी वगळल्या असतील. अलकेमधल्या डोळे दिपणाऱ्या वैभवातही त्याला सुवर्णकमळे, कुरबक, शिरीष, कुंद, लोध्र, नीप एवढीच फुले दिसली. पण त्याच्या दिलीपला तरी एखादेदुसरे सुंदर रानफूल क बरे दिसले नाही? तो नंदिनीसाठी कोवळ्या लुसलुशीत गवताचा कवळ गोळा करीत होता ना? एकदा का होईना, आद्रिशोभा पाहण्यात त्याची दृष्टी गुंतली होती ना ? 'कार्या सैकतलीनहंसमिथुना स्रोतोवहा मालिनी' असे म्हणून एक हळुवार, नाजूक चित्र पुरे करू इच्छिणाऱ्या दुष्यंताला हिमालयाच्या पावन उत्तारावर एकही सुकुमार तृणपुष्प दिसू नये का? कुश समिधा आणण्यासाठी दूरवर जाणाऱ्या वैखानसांची वृती इतकी का शुष्क, कोळपलेली अशी झाली होती की समिथांच्या शेजारीच काट्यावर फुललेले एखादे इवलेसे मोहक रानफूल त्यांना पाहावेसे वाटू नये?

कालिदासाने हिमालयाला हत्तीची उपमा दिली आहे. हिमालयाच्या परिसरात फुललेली हजारो रंगीबेरंगी/चित्रविचित्र फुले पाहताना हत्तीच्या पाठीवर घालतात ती रंगीत झूल-संस्कृतात तिला 'कुथ' म्हणतात- त्याला कधीच आठवली नाही? कालिदास काही हिमालयात भ्रमंती करतानाही ब्राह्म, भोक्ष, माया यांचीच रूक्ष चर्चा करीत बसणाऱ्या विषयव्यावृत्तकौतूहल अशा साधुसंन्याशांच्या वर्गातला नव्हता, त्याने या सौदर्याला विन्मुख का असावे? ही शेवटी त्याने Full many a flower is born to blush unseen and waste its sweetness on desert air असे शोकगीत आळवणाऱ्या टॉमस ग्रेच्या विचारासारखाच विचार केला? काय असेल ते असो. हिमालयातल्या इवल्या इवल्या अल्पजीवी रानफुलांनी तिथली केवळ मातीच निरंतर गंधित केली असे नव्हे तर सारा परिसर निरंतर रंगीतही केला आहे इकडे कालिदासानेही दुर्लक्ष करावे याची खंत मनातून जात नाही हे खरे.

हे सारे आता आठवण्याचे कारण आश्विन मेहतांचे ‘100 Himalayam Flowers’ हे देखणे सुरंगी पुस्तक सूत्ररूपाने सांगायचे तर कालिदासाने जे शब्दांत पकडायला हवे होते ते हिमालयीन पुष्पवैभव आश्विन मेहतांनी आपल्या या पुस्तकात पकडून अगदी जिवंत रूपात आपल्यापुढे ठेवले आहे. जे पाहिल्यावर ‘मन धाले आनंदाने’ अशीच पाहणाऱ्याची स्थिती होऊन जाते, टपोरे मोठमोठे डोळे असणाऱ्यांना डोळ्याचे ‘प्रकामविस्तारफल’ मिळावे अशी ही अदभुत, अनोखी लावण्याची खाण आहे.

शंभर प्रकारच्या फुलांची लहानमोठी अशी दीडशे छायाचित्रे या पुस्तकांत आपल्याला पाहायला मिळतात. यातली बरीच फुले- पॉपी, लार्कस्पर, साल्व्हिया, जिरेनियम, बाल्सम, गुलाब, स्वीट पी, जर्बेरा, सूर्यफूल, व्हर्बिना, मॅक्सहूड, ऑर्किड, अ‍ॅस्टर क्रिर्झेधमम या नावांनी आपण ओळखतो. आणि निगराणी करून वाढवलेल्या स्वरूपात आपल्याला ती शहरातही पाहायला मिळतात. आश्विन मेहतांनी त्याचे गिरिकंदरातले रूप आपल्यापुढे ठेवले आहे. उद्यानात जोपासना करून संस्कारित केलेली फुले म्हणजे घुनउगम राग, तर ही रानावनांतली फुले म्हणजे लोकसंगीतातल्या धुनी. लोकसंगीतातल्या वेगवेगळ्या धुनी शोधणाऱ्या कुमार गंधर्वांचेच काम एका अर्थाने अश्विन मेहतांनी या पुस्तकात केले आहे.

माझ्या लहानपणी आर्थर मीने संपादित केलेल्या बुक ऑफ नॉलेजमध्ये इंग्लंडमधील नानाविध फुलांची छायाचित्रे, प्रकार (पाणथळ जागेतली, दलदलीतली, कुरणातली, गवताळ माळरानातली इत्यादी) पाहून मी अगदी वेडावून जात असे. तोच अनुभव आश्विन मेहतांच्या या पुस्तकाने अधिक उत्कट रीतीने, किती तरी पटींनी अधिक देखण्या रूपात मला दिला.

फुले कोणत्याही रूपात सुंदरच दिसत असली तरी त्यांची छायाचित्रे घेणे सोपे नसते. विशेषतः रानावनातल्या फुलांची. फुलांची छायाचित्रे ही जवळूनच घ्यावी लागतात. पर्स्पेक्टिव्ह रचनेचा तोलदारपणा (Composition) हे कलात्मक छायाचित्रणाचे महत्त्वाचे अंग असते. कितीही कसलेला छायाचित्रकार असला तरी रानावनांतल्या, डोंगर-दऱ्यांतल्या फुलांची छायाचित्रे घेताना हे नेहमी जमतेच असे नाही. (आपल्या उपन्यासात स्वतः आश्विन मेहतांनीही अनेक अडचणींचा उल्लेख केला आहे.) त्यामुळे हे पुस्तक पाहताना मुरब्बी छायाचित्रकारांचा असा आक्षेप येणे शक्य आहे की या छायाचित्रांना आश्विन मेहताच कशाला हवेत? 

हे काही अंशी खरे आहे. म्हणजे असे की Encounters with Eternity मध्ये आश्विन मेहतांना रचनेचा तोलदारपणा, पर्स्पेक्टिव्ह सांभाळायला जितका वाव आहे तितका येथे नाही. त्या चित्रांमधून आश्विन मेहता हा 'कलावंत' आपल्याला जसा सापडतो तसा या छायाचित्रांत सर्वत्र सापडेलच असे नाही. पण तरीही 7, 3०, 35, 51, 6०, 61, 64, 64ए, 66, 82ए अशा काही चित्रांमध्ये विलक्षण तोलदार रचनाबंध पाहायला मिळतो. 61, 84 अशी छायाचित्रे काळजीकाट्याने केलेल्या जपानी पुष्परचनाच वाटतात.

त्या चित्रांमध्ये भव्य विश्व (navicosm) भेटते, तर या फुलांच्या चित्रात त्याचे लहानसे रूप हे आपल्याला दिसते. दोन्हींमधल्या सौंदर्याची जातकुळी वेगळी. पण पुष्पसृष्टी पाहणे म्हणजेही शाश्वताचीच उराउरी भेट(Encounter with Eternity) आहे.

शिवाय वर उल्लेखिलेला आक्षेप अंशतः खरा मानला तरी त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व किंवा सौदर्य कमी होते असे मुळीच नाही. या पुस्तकाचे मोल फार मोठे व अनेकांगी आहे. हे पुस्तक हा हिमालयीन पुष्पसृष्टीचा एक देखणा संदर्भग्रंथ आहे. त्याची रंगीत छपाई (सिंगापूरमधली) अतिशय सुंदर आहे. त्याला आश्विन मेहतांचा छोटेखानी पण अर्थगर्भ असा उपन्यास आहे. फुलांची शास्त्रीय माहिती लिहिणाऱ्या श्री. बोले यांची एक व्यासंगपूर्ण प्रस्तावना आहे. 

फुलांची अनेकांगी माहिती छायाचित्रित केलेल्या फुलांच्या प्लेटसची यादी आहे. ही पुष्पसमृद्धी प्रत्यक्ष पाहू इच्छिणाऱ्यांसाठी काश्मीर ते नेपाळ या मार्गातले काही महत्त्वाचे भटकंतीचे मार्ग उपयुक्त टीपांसह निर्दिष्ट केलेले आहेत. फुलांची वर्णने, माहितीचे तपशील देताना वापरलेल्या पारिभाषिक संज्ञांचा अर्थ देणारा कोश आहे. वापरलेल्या महत्त्वाच्या संदर्भग्रंथांची यादी आहे, आणि शेवटी फुलांच्या नावांची सूची आहे.

हे पुस्तक संपूर्ण पाहताना आपण जणू अफगाणिस्तानापासून पार अरुणाचल मेघालय- ब्रह्मदेशापर्यंतचा हिमालय दृष्टीखाली घालतो. केवळ एवढेच नव्हे तर आल्पस, अँडीज, आर्क्टिक प्रदेश याही भागांतली फुले आपल्या परिचयाची होतात. आपल्या प्रस्तावनेत आश्विन मेहतांनी त्यांच्या परस्परसंबंधांविषयी अतिशय हळुवार व उद्बोधक विधाने केली आहेत. हाणामारी, रक्तपात, फुटीरपणा, स्वतःचा वेगळेपणा जपण्याचा, मिरवण्याचा अहंकार यांची बजबजपुरी माजलेल्या मानवी जगाला ही फुले जणू एकत्र आणतात. धड एका दिवसाचेही आयुष्य नसणारी पण हजारो वर्षे सर्वत्र रंगांचा, गंधांचा, सौदर्याचा सडा शिंपणारी, आनंदाची उधळण करणारी ही फुले माणसा- माणसातली एकता आणि पर्यावरणसंरक्षणाची निकड यांविषयी फार काही सुचवून जातात.

या फुलांची जी माहिती दिलेली आहे ती मुख्यतः वनस्पतिशास्त्रीय असली तरी तीत क्वचित एखाद्या फुलाविषयीचे स्थानिक संकेत, त्याचे तिथल्या लोकमानसातले स्थान, त्याचे औषधी उपयोग यांचाही अंतर्भाव आहे. मधूनच एखाद्या फुलाशी संबद्ध गोष्टी, म्हणी, वाङ्मयीन संदर्भ हेही दिलेले आहेत. त्यांत ग्रीक दैवतशास्त्रातल्या काही गोष्टी आहेत. शेक्सपीयरचे संदर्भ तर अनेक आहेत. स्थानिक कथा व नावेच त्या मानाने खूप कमी आहेत. ब्रह्मकमळ, हिमकमळ, निर्मिष, गावजवान, रतनजोत, सलामपंजा ही नावे आपल्याला कशी जिवंत रसरशीत वाटतात. 

त्याऐवजी लॅटिन नावे वाचायची म्हणजे आपल्या परिचयाच्या हाडामांसाच्या व्यक्तीला निर्जीवपणे होमो सेपियन्स ' म्हटल्यासारखे वाटते. लॅटिन शास्त्रीय नावांच्या जोडीला इंग्रजीमधली रूढ नावे सर्वत्र दिली आहेत. हेन्बेन, अ‍ॅनिमोन, व्हायोलेट अशी काही नावे शेक्सपीयरमुळे आपल्या ओळखीची झालेली असली तरी यापलीकडे ती आपल्याशी बोलत नाहीत. म्हणून स्थानिक किंवा भारतीय भाषांतील नावे अधिक प्रमाणात यायला हवी होती, असे वाटते.

पण या मगजमारीला तसा काहीच अर्थ नाही. शेक्सपीयरनेच म्हणून ठेवले आहे - That which we call rose, would. By any other name smell as sweet!' हे पुस्तक, नामाच्या प्रपंचात न अडकता फक्त रूपाद्वारा आस्वादापचे आहे. तसे ते आस्वादताना आपण हळूच कालिदासाची परवानगी न घेताच म्हणायला लागू-

'अस्त्युत्तरस्यं दिशि देवतात्मा पुष्पालयो नाम नगाधिराजः।

100 हिमालयन फ्लॉवर्स 
अश्विन मेहता 
मॅपियन पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड
पृ - 144
अहमदाबाद.

Tags: अनंतरत्मप्रभवत्व प्राचीनता निसर्गवर्णन जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार एक दृष्टिसुभग अनुभव 'हिमालयातील कुसुमशती' आश्विन मेहता infinity antiquity landscape a world-renowned photographer a visual experience 'Kusumashati in the Himalayas' Ashwin Mehta Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके