डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लो.टिळक, आगरकर, कार्ल-मार्क्स आणि महात्मा गांधी अशा चार गुरूंचा उल्लेख आचार्यांनी केला आहे. गांधीवाद आत्मवादी तर मार्क्सवाद भौतिकवादी, गांधीवाद वैयक्तिक मूल्यं मानतो तर मार्क्सवाद वर्गीय मूल्यं कल्पितो, प्रेम हे गांधीवादाचं साधन तर मार्क्सवाद विरोधाच्या शस्त्राने लढतो. गांधीवाद आणि मार्क्सवाद हे दोन टोकाचे- दोन ध्रुव, पण दोघांतही अखेरीस शोषणरहित समाज अभिप्रेत आहे आणि दोनही विचारसरणी मूलत: मानवतेच्या प्रेमाने स्फुरलेल्या आहेत. एवढं साम्य आचार्यांना पुरेसं झाले. आणि त्या साम्यावर त्यांनी ‘सत्याग्रही समाजवाद’ ही एक स्वतंत्र आणि समग्र विचारप्रणाली उभी केली. 1938 मध्ये प्रसिद्ध झालेला ‘आधुनिक भारत’ हा ग्रंथ म्हणजे इंग्रजोत्तर राजकारण आणि समाजकारण यांची तात्त्विक चिकित्सा करणारा एकमेवाद्वितीय ग्रंथ आहे, असे जाणकार म्हणतात. या ग्रंथाची हिंदी आणि गुजराती भाषांतरं झाली आहेत. सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि तत्त्चज्ञ कै.वामन मल्हार जोशी यांनी या ग्रंथाचा गौरव ‘गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ’ असा केला आहे.

आचार्यांची दिनचर्या अगदी नियमित असे. सकाळी लवकर उठून चहा पिऊन फिरायला जात. त्यांना दमा होता. त्याचा त्रास त्यांना फक्त रात्री होत असे. मामांचा दमा मी पाहिला म्हणण्यापेक्षा ऐकला आहे. चालताना सारखं अंऽऽ अंऽऽऽ असं म्हटल्याशिवाय त्यांचं पाऊल पुढे पडत नसे. आम्ही बी.टी.साठी पुण्याला गेलो तेव्हा माझा मुलगा सुबोध सहा वर्षांचा होता. मामा-मामींनी त्याला इस्लामपूरलाच ठेवून घेतले आणि त्याचा अत्यंत आनंदाने आणि ममतेने सांभाळ केला. घरातील कुठलंही काम करायला आचार्यांना कधी कमीपणा वाटला नाही. भाजी निवडून देण्यापासून सगळी कामं ते करत. ‘बोले तैसा चाले’ असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. अर्थात ते घरगुती स्वरूपात फारच थोडे होते. सार्वजनिक स्वरूपात ते सदैव वावरत.

‘हे विश्वचि माझे घर’ हा विचार त्यांनी आपल्या आचरणातून लोकांपुढे ठेवला. आचार्यांचा जन्म 1894 ला मलकापूरला झाला. 1912 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले. 1917 मध्ये तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए.झाले. एम.ए.साठी त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण या विषयांचा अभ्यास केला. परंतु 1921 मध्ये असहकाराच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे ते या परीक्षेस बसू शकले नाहीत. नंतर त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं. 

त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. मामांनी 1930 साली रत्नागिरीच्या तुरुंगात सहा महिने, 1932-33 साली नाशिक तुरुंगात पावणेदोन वर्षं आणि 1942 ते 44 या सालात सुमारे तितकाच काळ येरवडा तुरुंगात काढला. शिक्षणासाठी पुणे येथे असताना त्यांच्यावर लोकमान्य टिळक आणि गांधींचा प्रभाव पडला आणि त्यांनी राष्ट्रसेवेला वाहून घेतलं, ते अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत. 

मामांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडल्यावर सुरुवातीला ते ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’त प्राध्यापक होते. तिथेच त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी प्राप्त झाली.  मामा नेहमीच तत्त्वांसाठी ठाम असायचे. कारागृहातसुद्धा त्यावरून खूप वाद- विवाद, चर्चा व्हायच्या. कधी कधी तर आवाज इतका वाढायचा की, जेलर काय झालं म्हणून पाहायला यायचा. त्यांच्याकडे तर्कशुद्ध पद्धतीने वादविवाद करण्याची शक्ती आणि तसा अभ्यासही होता, पण या वाद-विवादामुळे कधी कटुता निर्माण झाली नाही. कधी नाती दुरावली नाहीत. उलट सगळ्या विचारवंतांना मामांच्याबद्दल आदरच वाटायचा. याचं कारण मला वाटतं त्यांचा स्वभाव. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ होता. ते कधी कुणाचा द्वेष करत नसत. वादविवादानंतर त्यांचं मन, वळवाच्या पावसानंतर आकाश जसं स्वच्छ होतं ना, तसं स्वच्छ होऊन जात असे. आचार्यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे बाहेरगावी जाता येत नसे, म्हणून 

कुणाकडे न जाणारी मंडळी आचार्यांना मात्र भेटायला येत. येणाऱ्या मंडळींना स्वत:ची गाडी दूर उभी करून, शे-दीडशे पावलं चालत घराकडे यावं लागे. तरी सर्व येत, पण आचार्यांना त्याचा कधी गर्व झाला नाही. 
त्यांना भेटायला येणाऱ्यांत त्यांच्या बरोबरीचे आचार्य भागवत, श्री.खाडे, श्री.आठल्ये ही मंडळी जशी असत, तशीच त्या काळात नव्याने उदयाला येत असलेली एस.एम.जोशी, अंबिके, ग.प्र.प्रधान, नानासाहेब गोरे अशी तरुण मंडळीही होती. याखेरीज प्रसंगपरत्वे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, जयप्रकाश नारायण, प्रभावतीदेवी, मोरारजी देसाई, काकासाहेब गाडगीळ, दादासाहेब मावळंकर, बॅ.अप्पासाहेब पंत, प्रेमाबाई कंटक या मंडळींचंही येणं-जाणं असे. 

एका बाजूला त्यांचं लेखनही चालू असे. त्यांचं लेखन पुष्कळच आहे. आणि ते उच्च दर्जाचं आहे. टिळक- आगरकरांच्या नंतर महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या इतिहासात नवविचारांचा झुंझार राष्ट्रवादी पत्रकार म्हणून सार्थपणे त्यांचा उल्लेख करावा लागेल. ‘पत्रकारिता हा केवळ पोट भरण्याचा एक व्यवसाय नसून त्यामागे ध्येयवादी प्रेरणा आहे. स्वार्थत्यागपूर्वक देशाची आणि समाजाची सेवा करण्याचं ते असिधाराव्रत आहे’ असं टिळक-आगरकरांप्रमाणे आचार्यसुद्धा मानीत असत. स्वराज्य, लोकशिक्षण, नवशक्ती, चित्रमय जगत, नवभारत, लोकशक्ती आणि साधना अशा विविध नियतकालिकांतून ते सातत्याने आपली खंबीर मतं मांडत राहिले.

आचार्यांचा वैचारिक वारसा त्यांच्या सुमारे दीड डझन ग्रंथांच्या, शेकडो टिपणांचा आणि व्याख्यानांच्या रूपाने आजही आपल्याकडे आहे. ‘राजनीतिशास्त्र परिचय’, ‘राज्यशास्त्र मीमांसा’, ‘हिंदी राजकारणाचे स्वरूप’ ही त्यांनी ऐन तारुण्यात लिहिलेली पुस्तकं आहेत. तरीही त्यात आचार्यांची गंभीर अध्ययनशीलता प्रत्ययाला येते. ‘समाजवाद आणि गांधीवाद’ या पुस्तकात त्यांनी गांधींच्याविषयी नितांत आदर असूनही गांधीवादातील त्यांना अयोग्य वाटणाऱ्या बाबींची मोकळेपणाने चर्चा केली आहे.

लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय विकासाचा पुढचा टप्पा म्हणजे म.गांधी होत. हे त्यांचं ‘लो.टिळक आणि गांधी’ या ग्रंथातील प्रतिपादन रूढ समजुतीला धक्का देणारं होतं. हे मत मांडून त्यांनी महाराष्ट्रात एका वेगळ्या विचाराला चालना दिली.  महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलाला म्हणजे प्रभाकर जावडेकरांना (भाऊ) समजावून देताना ‘Unto this last ’  ह्या जॉन रस्किनच्या ग्रंथाचा अनुवाद ‘अर्थशास्त्र की अनर्थशास्त्र’ ह्या नावाने केला. मूळ इंग्रजी शीर्षकापेक्षाही मराठी शीर्षक अन्वर्थक असल्याचं जाणत्यांचं मत आहे.

लो.टिळक, आगरकर, कार्ल-मार्क्स आणि महात्मा गांधी अशा चार गुरूंचा उल्लेख आचार्यांनी केला आहे. गांधीवाद आत्मवादी तर मार्क्सवाद भौतिकवादी, गांधीवाद वैयक्तिक मूल्यं मानतो तर मार्क्सवाद वर्गीय मूल्यं कल्पितो, प्रेम हे गांधीवादाचं साधन तर मार्क्सवाद विरोधाच्या शस्त्राने लढतो. गांधीवाद आणि मार्क्सवाद हे दोन टोकाचे- दोन ध्रुव, पण दोघांतही अखेरीस शोषणरहित समाज अभिप्रेत आहे आणि दोनही विचारसरणी मूलत: मानवतेच्या प्रेमाने स्फुरलेल्या आहेत एवढं साम्य आचार्यांना पुरेसं झालं, आणि त्या साम्यावर त्यांनी ‘सत्याग्रही समाजवाद’ ही एक स्वतंत्र आणि समग्र विचारप्रणाली उभी केली. 

1938 मध्ये प्रसिद्ध झालेला. ‘आधुनिक भारत’ हा ग्रंथ म्हणजे इंग्रजोत्तर राजकारण आणि समाजकारण याची तात्त्विक चिकित्सा करणारा एकमेवाद्वितीय ग्रंथ आहे, असे जाणकार म्हणतात. या ग्रंथाची हिंदी आणि गुजराती भाषांतरं झाली आहेत. सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि तत्त्चज्ञ कै.वामन मल्हार जोशी यांनी या ग्रंथाचा गौरव ‘गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ’ असा केला आहे. 

प्रा.डॉ.तारा भवाळकर म्हणतात, ‘आचार्यांचे विचारधन हे स्वातंत्र्यपूर्व काळात जेवढे आवश्यक, उपयुक्त आणि मार्गदर्शक होते, तेवढेच किंबहुना अधिकच ते आजही आवश्यक आहे.’  वसंत बापटांनी आचार्यांचा गौरव करताना म्हटलं आहे, ‘आचार्य जावडेकरांचे वाङ्‌मय आणि पत्रकारिता पांडित्यपूर्ण प्रखरतेने भरलेल्या आहेत.’ यदुनाथ थत्ते म्हणायचे, ‘‘आचार्य जावडेकर आणि साने गुरुजी यांच्यात विलक्षण असे वैचारिक तादात्म्य होते. आचार्य विचारांच्या पातळीवर जे सांगत तेच साने गुरुजी भावनेच्या पातळीवर समजावीत. आचार्य प्रौढांसाठी लेखनप्रपंच करीत तर साने गुरुजी मुलांना वात्सल्याने घास भरवीत.’’ 

1941 मध्ये कल्याणला झालेल्या मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होतं. 1949 मध्ये पुण्यात भरलेल्या बत्तिसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना प्राप्त झाला होता. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मांडलेल्या ‘क्रांतिरस’ कल्पनेची चर्चाही त्या काळात गाजली होती. ‘पुरोगामी साहित्य’ या पुस्तकातून पुढे त्यांची साहित्यविषयक भूमिका विस्ताराने प्रसिद्ध झाली. प्राचार्य पी.बी.पाटील आणि राष्ट्र सेवादलातील काही विद्यार्थी इस्लामपुरात गरीब मुलांचं वसतिगृह चालवत होते. वसतिगृहात ऐंशी मुलं होती.

त्यांचा खर्च कलापथकाचे कार्यक्रम सादर करून त्यातून मिळणाऱ्या पैशावर भागविला जायचा. लोकरंजनातून लोकशिक्षण देणारं त्यांचं कलापथक सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत गाजलं होतं. ते कलापथक पाहायला एकदा स्वत: आचार्य गेले होते. थंडीचे दिवस होते. खरं तर आचार्यांना दमा होता, तरीदेखील ते रात्री दोन वाजेपर्यंत- कार्यक्रम संपेपर्यंत- मैदानात थांबले आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.

प्रा.डॉ.तारा भवाळकर नेहमी म्हणायच्या, ‘‘विचार, उच्चार आणि आचार यांचा सुंदर समन्वय म्हणजे आचार्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.’’ खरंच त्यांनी जे विचार आपल्या लेखांतून मांडले त्याच विचारांप्रमाणे त्यांचं आचरण असायचं. एकदा आचार्य पेठेला गेले होते. तेव्हा पाच-सहा मुलं म्हशी चरायला सोडून विट्टी-दांडूचा खेळ खेळण्यात मग्न होती. मामा त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी मुलांना विचारलं, ‘मुलांनो, तुम्ही शाळेत का जात नाही?’

त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, ‘शाळेत जाऊन आम्हांला काय फायदा होणार?’

दुसरा म्हणाला, ‘आमचे आई-वडील मोलमजुरीला जातात. घरातील म्हशी, शेळ्या आम्हांला सांभाळाव्या लागतात.’

काहीजण म्हणाले, ‘आम्हाला शाळेच्या बाहेर बसवतात.’

मुलांच्या व्यथा ऐकून मामा अत्यंत दु:खी झाले. ते म्हणाले, ‘तुमच्या हरिजन वाड्यातच जर शाळा सुरू केली तर तुम्ही शाळेत याल का?’ 

ती मुलं आनंदाने ‘हो’ म्हणाली. आणि पेठेला हरिजन वाड्यात शाळा सुरू झाली. वसतिगृहही सुरू झालं. वसतिगृहाचं नाव ‘वाल्मीकी आश्रम’ असं ठेवलं होतं. 

ही सगळी माहिती त्या शाळेत शिकलेले सीताराम पवार मास्तर सांगायचे. दररोज इस्लामपूरहून दाट झाडीतून पेठेला चालत जाऊन आचार्य शाळा घेत. त्या शाळेला लोक शंकरमामांची शाळा म्हणूनही ओळखत. 

मामांना तुरुंगातही दम्याचा खूप त्रास व्हायचा. परंतु कधीही त्यांनी त्या त्रासाचा उल्लेख पत्रात केला नाही. ‘‘माझी प्रकृती चांगली आहे’’ असंच नेहमी ते लिहीत. एकदा त्यांना मलेरिया झाला होता. ते हॉस्पिटलमध्ये होते, पण त्यांनी घरी कळवलं नाही. बरं झाल्यानंतर ‘मी बरा झालो’ असं लिहिल्यामुळे आणि मच्छरदाणीची मागणी केल्यामुळे त्यांना मलेरिया झाल्याचं समजलं. मामांचा स्वभाव किरकिरा नव्हता. सर्व काही छान आहे असंच ते भासवत. त्यांनी पाठवलेल्या पत्रांतून त्यांचा रसिकपणाही दिसे. ते नेहमी लिहीत, ‘तुरुंगात मला हॉस्टेलमध्ये असल्यासारखं वाटतं.’ 

मामा तुरुंगात असताना बौद्धिकं घेत. त्यांनी घेतलेली बौद्धिकं साने गुरुजींनी लिहून घेतली. नंतर ती ‘वाल्मीकी आश्रमातील प्रवचने’ या नावाने प्रसिद्ध झाली.  मला आठवतं, लोकमान्य टिळकांच्या शताब्दिवर्षानिमित्त  त्यांचं चरित्र लिहायचं होतं. तेही वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणून प्रा.ग.प्र.प्रधान आणि प्रा.अ.के.भागवत हे दोघेजण मामांच्याकडे पंधरा दिवसांतून एकदा मार्गदर्शनासाठी यायचे. सर्वजण माडीवर मामांच्या खोलीत बसत.

एकदा त्यांना खाण्यासाठी मामींनी खास खरवस पाठवून दिला. पण मामा टिळकांच्याबद्दल बोलण्यात इतके मग्न होते की ते प्रधान सरांना आणि भागवत सरांना ‘खा’ म्हणालेच नाहीत. त्यामुळे खरवस तसाच खाली आला. मग प्रधान सर खाली आल्यावर गंमतीने मामींना म्हणाले, ‘मामी, आचार्यांनी आम्हांला खरवस खाऊच दिला नाही.’ यावरून आणखी एक गंमत आठवली. साने गुरुजी आमच्याकडे आले होते. माडीवर आचार्यांच्या खोलीत सगळे गप्पा मारत बसले होते. मला नक्की आठवत नाही, पण बहुतेक जयप्रकाश नारायणही त्या वेळी आले होते. मी चारपाच प्रकारच्या फळांच्या फोडी ताटात घालून वर नेऊन दिल्या. त्यात मोसंबीच्या पण फोडी होत्या. त्यांना कुणीच हात लावला नाही. मग साने गुरुजी म्हणाले, ‘बिचाऱ्या मोसंबीला कुणीच हात लावत नाही, म्हणून मीच मोसंबी खातो’ आणि त्यांनी मोसंबीची फोड खाल्ली. असं ‘उपेक्षित’ फळांवरही प्रेम करणारे साने गुरुजी होते.

एकदा साने गुरुजी कुठला तरी दौरा करून आमच्याकडे आले होते. त्या दौऱ्यात त्यांना आंघोळ करता आली नव्हती. आमच्याकडे आल्यावर आम्ही विचारलं, ‘गुरुजी, आंघोळ करणार?’

ते इतक्या संकोचाने म्हणाले, ‘नको नको’. कारण त्यांना वाटलं इथे दुष्काळ आहे, मग कशाला करा?

शेवटी आम्हीच त्यांना पाणी उपसून दिलं. ‘जेवायला तासभर उशीर झाला तरी हरकत नाही’ असं सांगितल्यावर कुठे त्यांनी आंघोळ केली. आपला लोकांना त्रास होऊ नये म्हणून किती जपायचे ते. अशी सगळ्यांची मनं जपणारे साने गुरुजी अन्यायाविरुद्ध बोलायला लागल्यावर मात्र त्यांच्या बोलण्याला तलवारीची धार चढायची. इस्लामपूरला गांधी चौकात त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध केलेलं भाषण मी ऐकलं आहे. त्यांचं ते प्रखर भाषण ऐकून हेच का ते मवाळ, संकोची गुरुजी असा संभ्रम निर्माण झाला. 

साने गुरुजींची आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. त्यांनी आणि मधु लिमये यांनी खानदेशात काम करायचं ठरवलं. बहुतेक खानदेशामधील सामाजिक सुधारणेच्या संदर्भात असावं. खानदेशवासीयांनी तेरा हजार रुपये दिले. गुरुजींनी या रकमेचा हिशोब देताना ‘‘11 हजार रुपये कामासाठी खर्च आणि शिल्लक 2000 रुपये मी साधनेला दिले.’ असा स्पष्ट हिशोब दिला. आता घडणारी भ्रष्टाचाराची प्रकरणं पाहिली की गुरुजींच्या त्या वागण्याचं मोल कळतं. 

आचार्य जावडेकरांशी विचारविनिमय करण्यासाठी, प्रसिद्ध लेखक प्रभाकर पाध्ये आणि त्यांच्या पत्नी कमल पाध्ये इस्लामपूरला दोन महिने राहिले होते. त्यांनी खोलीच भाड्याने घेतली होती. घरात फारसे न राहिलेले आणि सतत व्याख्यानांच्या निमित्ताने घराबाहेर असणारे आचार्य घरात खूप वेगळे असत. आहार अगदी साधा. स्वयंपाकाला नावं ठेवणं नाही. ते रात्रीचं जेवण घेत नसत, फक्त ताक पीत. पण स्वयंपाकघरात आम्ही जेवत असताना मुद्दाम गप्पा मारायला येऊन बसत. शेंगा फोडायला, भाजी निवडायलाही मदत करीत. लग्न झालं तेव्हा मामींना भाकरी येत नव्हत्या. मग सुरुवातीला दोन्ही वेळा मामा स्वत:च स्टोव्हवर भाकरी करत. त्या पाहून पाहून नंतर मामी भाकरी करायला शिकल्या.

या बाबतीत भाऊही एक आठवण नेहमी सांगायचे. जेव्हा भाऊ पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते, त्या वेळी शंकरराव देवांच्या खोलीवरच त्यांचा मुक्काम होता. जेव्हा मामा काही कामानिमित्ताने पुण्यात आले तेव्हा स्वयंपाकाचा प्रश्न आला. कारण तेव्हा मामी नव्हत्या. भाऊंनी भात, भाजी, आमटी केली. पण भाकरीचं काय? तेव्हा मामांनी भाकरी केल्या आणि जेवणाची छान पंगत बसली.  एकदा मुंबईला माझ्या माहेरी माझ्याबरोबर मामा आठ दिवस राहिले होते. तिथेही त्यांना भेटायला थोर मंडळी आली होती. त्यांत साने गुरुजी, जयप्रकाश नारायण यांचा समावेश होता. आपल्या घराला जयप्रकाश, साने गुरुजींचे पाय लागले याचा केवढा आनंद माझ्या माहेरच्यांना झाला होता.

मी पुण्याला बी.टी.साठी, एस.एन.डी.टी.च्या आवारात लहान खोलीत राहत होते. तेव्हा मामा तिथे एवढ्याशा जागेतही दोन दिवस आमच्याबरोबर राहिले होते. त्यांचा स्वभावच असेल त्या परिस्थितीत विनातक्रार रहायचा होता. मामांना साठ वर्षं झाल्यावर हडपसरला राष्ट्र सेवादलातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इस्लामपूरला परतल्यावर ते खोकला, न्यूमोनियाने आजारी पडले. 

‘सर्वसामान्य माणसास जेवढे वैद्यकीय उपचार मिळतात तेवढे मला मिळाले पाहिजेत. आता माझ्यावर अधिक उपचार नको’ म्हणून आचार्यांनी पुण्यास जाण्यास नकार दिला. मग पुण्याहून स्वत: एस.एम.जोशी रुग्णवाहिका घेऊन आले आणि आचार्यांना पुण्याला पुढील उपचारांसाठी घेऊन गेले. परंतु पाच-सहा दिवसांतच आचार्यांनी या जगाचा निरोप घेतला.

(शब्दांकन : वृषाली आफळे) 

Tags: ग. प्र. प्रधान. एस. एम. जोशी राष्ट्र सेवादल जयप्रकाश नारायण साने गुरुजी G. P. Pradhan S. M. Joshi Rashtra Sevadal Jayaprakash Narayan Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके