डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दत्ता सावळे यांना अनावृत्त पत्र...

शिक्षणावरील प्रत्येक भाषणात मी तुमच्या पुस्तकातला झिपरचा प्रसंग सांगतो आणि सभागृहात प्रचंड टाळ्या पडल्या नाहीत असे एकदाही घडले नाही. तेव्हा मी तुमची ताकद अनुभवतो. दामखिंडला शाळा चालवताना पोरं अभ्यासात गती घेत नव्हती. तेव्हा तुम्ही पोरांची सहल जंगलात काढली. शाळेत गप्प राहणारी ती पोरं खुलली. झाडावर चढायला लागली. तुम्हाला वनौषधींची नावं सांगू लागली. पुन्हा प्रश्न विचारायला लागली. तुम्ही मात्र पाय सटकताना सावरत पडत चालत होतात. तुम्हाला मुलांच्या प्रश्नांची उत्तरेही देता येत नव्हती. तुमचा हा गोंधळ बघून झिपर नावाचा मुलगा तुम्हाला म्हणतो, ‘मास्तर आमचंबी असंच होतं वर्गात ग म भ न शिकताना...’ भाऊ, हे उच्चारताच घुणारा हशा आणि टाळ्या पुन्हापुन्हा तुमचं सामर्थ्य अधोरेखित करतात. आदिवासी मुलांना बोलतं करण्यासाठी तुम्ही वापरलेली संवादाची पद्धती तर आदिवासींच्या हृदयाला हात घालते. आदिवासी मुलांना तुम्ही विचारता की जत्रेत तुम्ही काय घेतलं? मुलं वस्तूंची नावं सांगतात. तुम्ही विचारता त्या वस्तूंची किंमत कोणी ठरवली? दुकानदारानं की तुम्ही? मुलं म्हणतात, अर्थात दुकानदारानं. नंतर तुम्ही विचारता, तुमचा बाप भात मारवाड्याला विकतो. त्याची किंमत कोण ठरवतो? मुलं म्हणतात, मारवाडी आणि लख्खपणे बोलताबोलता मुलांच्या लक्षात येतं की आपण विकत घ्यायला गेलं तरी किंमत तेच ठरविणार आणि विकायला गेलो तरी किंमत तेच ठरविणार. भाऊ, यावरचं तुमचं भेदक भाष्य असं की आदिवासींचं शोषण सुताराच्या लाकडासारखं. ‘करवत पुढं जातानाही कापते आणि मागे येतानाही कापते.’ भाऊ शोषणाचं इतकं सोपं विश्लेषण तुम्ही लहान मुलांना शिकवत होता. तुमच्या लोकशाळा प्रयोगात तुम्ही हीच पद्धती आदिवासींबरोबर वापरलीत. बोलताना शोषणाची जाणीव करून दिलीत. 

प्रिय भाऊ

तुमचा मृत्यू झाल्याची बातमी तब्बल 15 दिवसांनी मला कळाली, यातच सारे काही आले... जग जवळ आले, माहितीचा स्फोट वगैरे बकवास पुन्हा एकदा उघड झाले. तुमच्या मृत्यूची बातमी तुमच्या मुलांनी पंढरपूरला दिली असेल, पण तिथल्या आवृत्तीत आली असेल. सर्वच विचारवंतांना वर्तमानपत्रांनी अघोषित जिल्हाबंदी करून टाकली आहे. त्यातही राज्यभर बातमी छापायला तुम्ही ना राजकीय नेते, ना कुणी अभिनेते, चॅनेल्ससाठी तर तुम्ही कोण हे समजावून सांगण्यातच दमछाक व्हायची. ऐश्वर्याच्या मुलीचं दर्शन व्हावं म्हणून पुंडलिकाच्या उमेदीने अमिताभच्या दारात एक युग थांबण्याची तयारी असलेली आमची माध्यमं या पंढरपूरच्या भाऊंची दखल कशाला घेतील... भाऊ, हा सारा कोडगेपणा बघितला की वाटतं या देशात फक्त चारच प्रकारांत जन्माला यावं. एक तर क्रिकेटपटू, चित्रपट तारे, पुढारी किंवा धार्मिक सेलिब्रेटी... बस्स. तरच तुमच्या क्षणाक्षणाचा हिशोब माध्यमांच्या कीर्द-खतावणीत लिहिला जातो अन्यथा तुमच्यासारखं सर्वस्व उधळलेल्या माणसांसाठी या खतावणीच्या समासातही जागा नाही. 

तुमच्या जगण्याइतकं तुमचं मरणही आमच्यासाठी उपेक्षित राहिलं. किमान त्यातही सुसंगतीच राहिली. भाऊ, तुमची-माझी ओळख उणीपुरी सात वर्षांची, पण जेव्हा तुमचा बायोडाटा समजला, तेव्हा हादरून गेलो. एक शिक्षक त्याच्या जगण्याचा किती विस्तार करू शकतो! संपूर्ण भारत हीच कार्यकक्षा बनवून टाकतो. हे करताना स्वतः कोणतीही संस्था स्थापन न करताही ज्या संस्थांसाठी काम करायचे त्या संस्थांना मोठे करण्यासाठी संपूर्ण ऊर्जा तुम्ही लावली. त्या संस्था बहरल्या, फुलल्या. पण या संस्थांना वैचारिक बैठक देणारे भाऊ... फक्त उत्प्रेरकाच्या भूमिकेत राहिले. फक्त रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवत राहिलात आणि कोणत्याही प्रत्यक्ष कामकाजात भाग न घेता शांतपणे पुढील संस्थांकडे तुम्ही सरकत राहिलात. हे संपूर्ण जीवनभर करत राहिलात, देशभर रेल्वेच्या गर्दीतून प्रवास करताना, हाडाची काडं करताना तुम्हाला बघितलं की वाटतं की तुमचं जीवन जणू पुराणातल्या दधीचीसारखं. स्वतःची हाडं समर्पित करून स्वतःला विसर्जित करणारे तुम्ही त्या दधीचीचे वंशज. 

भाऊ, माझी तक्रार तुम्हाला मान्य होणार नाही, पण तुमची झालेली उपेक्षा मला पिळवटून टाकते. पुण्यात तुमच्या 75व्या वाढदिवसाला आम्ही काही मित्रांनी केलेला छोटेखानी कार्यक्रम आणि पंढरपूरचा कुटुंबीयांनी केलेला सत्कार वगळता तुमच्या वाट्याला भाऊ, स्टेज आलचं नाही. वंचितांच्या चळवळींचे राजदूत म्हणून तुम्हाला जो सन्मान महाराष्ट्रानं द्यायला हवा होता तो मिळू शकला नाही. अर्थात तुमची त्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. तुम्ही घडविलेल्या माणसांनीही जाणीवपूर्वक तुमचं काम लेखनातून पुढं आणायला हवं होतं. त्यांनीही लिहिलं नाही. तुमच्या उपेक्षेचा विषय काढला की आम्हालाच समजावून सांगायचे. ती तुमची उंची बघितली की अधिकच गलबलून यायचं भाऊ. इथं एका कामाच्या बीजावर आयुष्यभर पुरस्कारांची पिकं काढणारी दुनिया आणि संस्थांचे संस्थानिक बघितले की तुमच्या उपेक्षेने मनात विखार दाटून येतो. वाटतं भाऊ तुम्ही नोकरी न सोडता पावलो फिअरीवर पीएच.डी. करून विद्यापीठात प्रपाठक व्हायला हवं होतं आणि विद्यापीठाच्या खर्चाने जगभर फिरून परिषदा करायला हव्या होत्या. फेलोशिप, इंग्रजीतली भाषणं या जोडीला एक एनजीओ काढायला हवी होती. फिअरीच्या नावाने एखादं अध्यासन. यातून भाऊ आम्ही तुम्हाला मोठं म्हटलं असतं. आदिवासी पाड्यावर तासन्‌तास त्या मीडिया ज्ञात नसलेल्यांशी बोलण्यापेक्षा नेटवर जगभर आदिवासींवर चॅट करायला हवं होतं भाऊ. मग आम्ही तुम्हाला तज्ज्ञ म्हटलं असतं. 

प्रत्येक प्रश्नावर तुमचे बाईट घेतले असते. हे सारं तिरकस वाटेल, पण दुर्दैवानं आज असंच सारं झालंय. तुमचं समर्पण तुम्हालाच जगाला सांगावं लागतंय. प्रश्न लहान राहण्याचं आणि ते प्रश्न मांडणारेच मोठे होण्याचं आजचं हे युग आहे. लेखन आणि वक्तृत्व आणि लॉबिंग नसेल, हाताशी संस्था नसेल तर तुमचं कामच संदर्भहीन होऊन जातंय. तुम्ही म्हणाल, त्या मान्यतेची गरज नाही. पण काम वेगानं पसरायला समाजाच्या मान्यतेची गरज असतेच. तुमच्यासाठी महाराष्ट्रातल्या मोठ्या पुरस्कारांसाठी लॉबिंग करून बघितलं, तेव्हा लक्षात आलं की तुमचं कामच पोहोचलं नाही. तेव्हा आम्हा मित्रांना खूप हरल्यासारखं वाटलं. दुर्दैवाने बहिर्मुख नसलेल्या माणसांनी जन्मभर समर्पण करूनही साधं त्यांचं कामही पोहोचत नाही. ही कोंडी कशी फुटायची भाऊ? महात्मा गांधी, टिळक, आंबेडकरांनी समाजाच्या याच वृत्तीमुळं स्वतःची नियतकालिकं काढली होती का...? आपले विचार आपणच पोहोचवावे लागतात की काय? हे सारे प्रश्न तुमच्या मृत्यूनंतर समोर उभे ठाकलेत. साधी मोबाईलची रेंज गेली तरी जग आपल्याला विसरेल की काय या भीतीनं प्रत्येक क्षणाचं डॉक्युमेंटेशन करणारी माझी पिढी आणि आख्खं आयुष्य उधळून देणारी तुमची पिढी बघितली भाऊ. 

हे अंतर क्षितिजापार जातं. पाऊलो फिअरी तुम्ही कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने समजावून सांगितला त्यातून शोषणाची प्रणाली ग्रामीण कार्यकर्त्यांना समजली. त्यातून लढ्याच्या नव्या पद्धती शोधल्या गेल्या. भाऊ, हे तुमचे आदिवासी चळवळींसाठींचे हे योगदान अविस्मरणीय आहे. परदेशातील स्कँडिनेव्हियन देशांधील कष्टकरी वर्गासाठी सुरू केलेल्या फोल्क स्कूल्स तुम्ही प्रत्यक्ष बघून आलात. महाराष्ट्रात अशा शाळा सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष आदिवासी शिक्षक कार्यकर्त्यांशी तुम्ही बोलत राहिलात. भाऊ, या शाळांवर तुम्ही पुस्तक लिहा असा खूप हट्ट धरला, पण तुम्ही काही लिहिले नाही. माझ्यासारख्या पोरासोरांनाही आज शिक्षणतज्ज्ञाच्या पदव्या लावतात तिथं भाऊ तुम्हाला शिक्षणाचे काय म्हणू मी. 

तुम्ही मध्यप्रदेश, झारखंड, ओरिसा, राजस्थान, आसाम, उत्तरप्रदेश यांसारख्या राज्यांत फिरलात. तिथल्या संस्थांबरोबर कामं केलीत. महाराष्ट्रात गडचिरोली आणि चिपळूणला तुमच्या कामाला आज बहर आलेला दिसतोय. तुम्ही विकसित केलेले कार्यकर्ते आता बहरलेत पण तुमचं काय? एकीकडं कुटुंबाकडेही दुर्लक्ष केलंत. गावेगावी भटकत राहिलात, पण तुम्हाला आम्ही ना पुरस्कार देऊ शकलो ना तुमच्या मृत्यूची साधी बातमीही. समाज म्हणून आमची कृतघ्नता उद्विग्न करते भाऊ. म्हणूनच का माणसं आत्मकेंद्रिततेच्या बिळात लपून बसत असतील? साधा पुरस्कार नाही की अमृतमहोत्सवी पुरवणी नाही, स्मरणिका नाही. भाऊ, मी सात वर्षांच्या पोराच्या वाढदिवसाचा फ्लेक्स लावलेला बघितलाय. 

पु.लं.नी हरितात्यांवरच्या लेखात शेवटी लिहिलंय की हरितात्या गेल्याची बातमी आली. इतिहासात रमणाऱ्या मित्राचा वर्तनाशी एवढाच संबंध. भाऊ, तुम्ही आदिवासी शिक्षण आणि चळवळीच्या पद्धतींचा इतिहास रचलात पण हरितात्यांचं बातमीचं भाग्यही तुम्हाला लाभलं नाही. 

Tags: दत्ता सावळे शिक्षण चळवळ आदिवासी पु.ल. देशपांडे हेरंब कुलकर्णी Datta Savale Shikshan Chalval Adivasi P.L.Deshpande Heramb Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हेरंब कुलकर्णी
herambrk@gmail.com

सामाजिक कार्यकर्ते. वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके