डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तुमच्यावर हल्ला करून ही चळवळ संपवता येणार नाही, असा इशारा मारेकऱ्यांना व त्यांच्या सूत्रधारांना आम्ही दिलाय डॉक्टर. कायद्याचा प्रभाव कमी झाल्याची आवई काही जणांनी उठवली तेव्हा लोकशाहीत प्राणपणाने लढून मिळवलेल्या एवढ्या प्रभावी गोष्टीचे मोलदेखील येथील तथाकथित बुद्धिवाद्यांना कळत नाही, याचे वैषम्य वाटले. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीदेखील ह्याच निर्धाराने आम्ही पाय रोवून उभे राहू याची तुम्हाला नक्कीच खात्री असेल.

प्रिय डॉक्टर,

विधान परिषदेचे अध्यक्ष एक-एक वाक्य शांतपणे वाचत होते...

‘‘सन 2013 चे विधेयक क्रमांक 34- महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे विधेयक ज्यांना मंजूर असेल त्यांनी होय म्हणावे, मंजूर नसेल त्यांनी नाही म्हणावे... होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे बहुमत!’’

तुमची अठरा वर्षांची लढाई फळाला आली डॉक्टर. दि.19 डिसेंबरला रात्री 9 वाजून 43 मिनिटांनी विधान परिषदेत जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर झाले. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये सकाळपासून अस्वस्थेत बसलेले मुक्ता, अविनाश, माधव बावगेसर आणि मी- सगळ्यांना फक्त तुमचीच आठवण येत होती. अभिनंदनाचे फोन व मीडियाचा गराडा... तुमच्याशिवाय हे सगळे खूप अधुरे होते डॉक्टर. मनातले वादळ आतच लपवत आम्ही माध्यमांना सामोरे गेलो. अश्रूंना लपवणे फारच अवघड होते, पण तुमचा भावनांना संयमाने हाताळायचा वसा आम्ही कसोशीने पाळला डॉक्टर.

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये कायद्याची लढाई अगदी अंतिम टप्प्यात आल्याचे तुमच्या दूरदर्शी नेतृत्वाला दिसत होते. त्यामुळे प्रत्येक अधिवेशनात कायदा मंजूर झाल्याचा तुमचा फोन येईल अशा आशेवर असलेले आम्ही- आज तुम्हालाच अशा पत्राद्वारे हे कळवताना मनात काय काय होत आहे, ते शब्दांत सांगता येत नाही.

1989 मध्ये पु.ल.देशपांडे यांनी पहिली सही करून या कायद्यासाठीचा जो लढा सुरू झाला, त्याला पुढच्या वर्षी पंचवीस वर्षे होतील- असे तुम्हीच जुलै महिन्यात म्हणाला होतात. तेव्हा तुमच्या बलिदानानंतर अशा परिस्थितीत हा कायदा संमत होईल, हे कुणाच्या स्वप्नात तरी आले असते का?

कायद्याच्या मंजुरीसाठी काय करायचं बाकी ठेवलं होतं तुम्ही डॉक्टर? धरणे, निवेदने, शिष्टमंडळांच्या भेटी, पत्रव्यवहार ह्या नेहमीच्या गोष्टी तर झाल्याच... पण स्वत:च्या थोबाडीत मारून घेणे, रक्ताने सह्या केलेली निवेदने, कायद्याची काळी पत्रिका, लातूरला केलेले दहा दिवसांचे उपोषण...

अशा वेगवेगळ्या आंदोलनांची तुम्ही ह्या लढाईत आयुधे केलीत. सनदशीर मार्गाने विवेकाचे संघटन होऊ शकते व ते समाजाच्या रास्त मागणीसाठी शासनाला कृतिशील व्हायला भाग पाडू शकते, हा विश्वास तुम्ही आम्हाला दिलात; पण प्रत्यक्षात हा विजयाचा क्षण आला, तेव्हाच तुम्ही आमच्यात नाहीत. नरेंद्रमहाराजांपासून शेकडो बाबा-बुवांना निधड्या छातीने सामोरा जाणारा आपला संजय बनसोडे तुमच्या  आठवणीने लहान मुलासारखा रडला डॉक्टर. मला म्हणाला, ‘आज डॉक्टर हवे होते हमीद...’ कुणी कुणाचं सांत्वन करायचं हेच कळेनासं झालंय.

एका गोष्टीचा मात्र नक्कीच अभिमान आहे डॉक्टर... तुमच्या हत्येमुळे तुमचा विचार संपेल असे ज्यांना वाटत होते, त्यांना आम्ही सणसणीत उत्तर दिलंय. अविनाशच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पाय रोवून उभे आहोत. अविनाशचं तुम्हाला पूर्वीपासूनच कौतुक! आपलं बॅटन तुम्ही आधीच त्याच्या हातात दिलं होतंत. तुम्ही गेल्यापासूनच्या चार महिन्यांत चार दिवससुद्धा तो घरी गेला नसेल. डॉक्टर, तुमच्याइतकं पायांना चाकं लावून आम्ही कुणीच फिरू शकत नाही, पण गेल्या चार महिन्यांत उभा-आडवा महाराष्ट्र आम्ही सगळ्यांनी मिळून दोनदा पिंजून काढला.

मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात कायदा करण्याचं जाहीर आश्वासन देऊनसुद्धा आम्ही गप्प बसलो नाही. गेल्या अठरा वर्षांचा आपला अनुभव कुणावर विश्वास ठेवावा असा नाहीच ना डॉक्टर! ‘मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला अंनिस उभारणार सामाजिक शक्तीची जोड’ अशी एक व्यवस्थित लाईन अविनाशने आम्हाला आखून दिली आणि मग तुमच्याच धडाक्यात उभ्या महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये आम्ही निर्धार परिषदा घेतल्या. मुंबईत  2 डिसेंबरला काढलेल्या मोर्चाने तर तुमच्याही डोळ्यांत पाणी आणलं असतं डॉक्टर. सुशीला मुंडे, नंदू तळाशीलकर आणि मुंबईच्या सगळ्या टीमने अहोरात्र परिश्रम करून 8 ते 10 हजार लोकांचा मोर्चा यशस्वी केला.

तुमच्यासारखंच काटेकोर नियोजन. महत्त्वाची बाब म्हणजे- राष्ट्र सेवादल, कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, घर बचाव-घर बनाव आणि वारकऱ्यांचे प्रतिनिधीसुद्धा मोर्चात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम व्यापक समाजपरिवर्तनाच्या कामाचा एक भाग आहे, अशी भूमिका मांडून तुम्ही समविचारी लोकांची केलेली जोडणी भविष्याचा किती वेध घेणारी होती ह्याची आम्हाला आता परोपरी जाणीव होते आहे.

एन.डी.पाटीलसर, बाबा आढाव, मेधाताई, पन्नालाल- भाऊ, नानासाहेब ठाकरे, गजानन खातूभाई, पुष्पाताई, गोविंदराव पानसरेसर, दत्ता इस्वलकर, अशोक ढवळे... किती म्हणून नाव सांगू... सगळे जण अंनिसच्या पाठीशी  खंबीरपणाने उभे राहिले. सर्व माध्यमांनीदेखील हा विचार पुढे जावा म्हणून कंबर कसली. निखिल वागळे, राजीव खांडेकर, उदय निरगुडकर, सुरेश द्वादशीवार, उत्तम कांबळेसर- हे सगळे जण जणू आपलीच लढाई असल्यासारखे मैदानात उतरले.

वारकऱ्यांच्या नावाने कायद्याला विरोध, हे दु:खद वास्तव तुम्ही गेली दहा वर्षे झेलत आलात; पण तुमच्या बलिदानाने हे चित्र बऱ्याच अंशी बदलले. डॉ. सदानंद मोरे व विठ्ठल पाटील यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांच्या विरोधाचे समर्थनात रूपांतर करण्यात आपण बऱ्याच अंशी यशस्वी झालो. ‘वारीला समता-संगराचे रूप यावे’ ह्या तुमच्या इच्छापूर्तीच्या दिशेने एक पाऊल पडले; पण त्यासाठी तुमचे बलिदान द्यावे लागले, ही खंत मनातून जात नाही डॉक्टर.

महाराष्ट्र अंनिसने इंटरनेटच्या माध्यमाचा जास्तीत जास्त फायदा चळवळीच्या प्रसारासाठी करावा, अशी तुमची कायमच इच्छा होती. अतिश व अविनाश (दाभोलकर)ने पॅरिस व कॅलिफोर्नियात बसून दिवस-रात्र झगडून आणि सुगतच्या मदतीने कायदामंजुरीसाठी ‘ॲक्ट नाऊ’ नावाची ‘वेब कॅम्पेन’ चालवली. अतिशने तर पुढाकार घेऊन भारत व भारताबाहेरच्या सहाशेच्यावर शास्त्रज्ञांच्या सह्या कायद्याच्या पाठिंब्यासाठी जमवल्या. नितीन वैद्यांच्या मदतीने आपण एक टोल फ्री क्रमांकच मिळवला- कायद्याला पाठिंबा द्यायला आणि पंधरा-वीस दिवसांमध्ये चाळीस हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाठिंबा नोंदवला कायद्याला. तुम्हाला ऐकून खूप आनंद होईल डॉक्टर, अतिश पॅरिसहून स्वत:ची सगळी कामं सोडून कायद्याच्या मंजुरीच्या मोहिमेत भाग घ्यायला भारतात तीन आठवडे आला आणि सुगत चेन्नईहून दोन आठवड्यांची सुट्टी टाकून आला.

कार्यकर्त्यांमधील तर कुणाकुणाची नावं घ्यायची... मिलिंद, कृष्णा, शहाजी, विनायक, राहुल, प्रशांत, गवांदे मॅडम... एकही आपला कार्यकर्ता असा नाही जो गेल्या चार महिन्यांत स्वस्थचित्ताने झोपला असेल. मिलिंद जोशीने तर कायद्याची एक सचित्र पुस्तिकाच काढली. कायद्याच्या प्रसारासाठी पस्तीस हजार पुस्तिका आपण छापून वाटल्या. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मंत्र्यांना-आमदारांना आपण भेटलो. ‘जादूटोणाविरोधी कायदा : आक्षेप व वस्तुस्थिती’ ही तुम्ही लिहिलेली पुस्तिका प्रत्येक आमदारापर्यंत पोहोचवली.

नुसते एवढेच नाही, तर वटहुकूम आल्यानंतर 23 केसेस दाखल झाल्या महाराष्ट्रात. आपल्या धर्मराजने पुढाकार घेऊन नांदेडमध्ये पहिली केस दाखल केली, तीदेखील मुस्लिम बाबाच्या विरोधात. हा कायदा हिंदू धर्माच्या विरोधात आहे, असे म्हणणाऱ्यांना सणसणीत उत्तर मिळाले.  

एवढ्यावर आम्ही थांबलो नाही डॉक्टर... नऊ डिसेंबरला अधिवेशन चालू होते, तर सात तारखेपासूनच नागपुरात ठाण मांडून बसलो. दोन टीम केल्या. एक विधिमंडळात जाऊन  कायद्याचा पाठपुरावा करणारी आणि दुसरी पटवर्धन ग्राऊंडवर धरणे धरून बसलेली. विधिमंडळात आतमध्ये घालवलेला एक-एक दिवस ह्या देशातल्या ‘फंक्शनल अनार्की’वरती आमचं फार मोठं शिक्षण करून गेला. त्यामुळे सलग अठरा वर्षे तुम्ही काय ऊर्मीने इथे भिडत राहिलात, हे आम्हाला कोडेच वाटत राहील डॉक्टर.

कुठलीच गोष्ट नियोजनाप्रमाणे न होणे, तोंडावर एक व पाठीमागे एक बोलणारे असंख्य जण, राष्ट्र सेवादलाचा वारसा सांगून शिवसेनेमधून कायद्याला विरोध करणारे तुमचेच जुने सहकारी, असंख्य वेळा तहकूब होणारे सभागृह, कायद्याचे श्रेय लाटण्यासाठी टपून बसलेले तुमचेच पूर्वाश्रमीचे सहकारी- अशा एक ना अनेक गोष्टी...

शिवसेना व भाजपकडून ह्या वेळी तरी परिपक्व वर्तनाची आमची अपेक्षा होती डॉक्टर; पण त्यांनी वैचारिक प्रतिवाद करण्यापेक्षा वेळकाढूपणा करणे व तुमच्यावर धादांत खोटे आरोप करण्याचा पवित्रा घेतला. अर्थात, सदनामध्येच त्यांचा मुखभंग झाला आणि आपले आरोप मागे घ्यावे लागले त्यांना. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्यांचे हे रूप म्हणजे आम्हाला महाराष्ट्रासाठी फारच धोक्याचा इशारा वाटला डॉक्टर.

पण मुख्यमंत्री आपल्या शब्दाला जागले. अजितदादा पवार, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने  दुसऱ्या आठवड्यात का होईना, कायदा मंजूर झाला. तुमच्यावर हल्ला करून ही चळवळ संपवता येणार नाही, असा इशारा मारेकऱ्यांना व त्यांच्या सूत्रधारांना आम्ही दिलाय डॉक्टर.

कायद्याचा प्रभाव कमी झाल्याची आवई काही जणांनी उठवली तेव्हा लोकशाहीत प्राणपणाने लढून मिळवलेल्या एवढ्या प्रभावी गोष्टीचे मोलदेखील येथील तथाकथित बुद्धिवाद्यांना कळत नाही, याचे वैषम्य वाटले. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीदेखील ह्याच निर्धाराने आम्ही पाय रोवून उभे राहू याची तुम्हाला नक्कीच खात्री असेल. तुम्ही असताना आई, मुक्ता-अनिश, मी-मुग्धा... सगळेच तुमचे न बोलणारे कार्यकर्ते होतो; आता अधिक कृतिशील होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. जसे तुमचे कार्यकर्ते तुम्हाला डॉक्टर म्हणतात, तसाच मीदेखील तुम्हाला डॉक्टर म्हणतोय बाबा. तुमच्यातला बाप आणि कार्यकर्ता कधीच वेगळा नव्हता; तर माझ्यातला मुलगा व कार्यकर्ता कसा वेगळा होईल बाबा?

तुमचा,

हमीद

Tags: आंदोलन मोर्चा पत्र सभा जादूटोना विरोधी कायदा हमीद दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलन समिती Mans Jadutona Virodhi Kayada Sabha Patr Dr. Narendr Dabholkar Hamid Dabholkar Anti-Jadu Tona Bill Rallies Letter weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हमीद दाभोलकर,  सातारा
hamid.dabholkar@gmail.com

मनोविकारतज्ज्ञ असलेले हमीद दाभोलकर हे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व साधना साप्ताहिक यांच्याशी निगडित आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके