डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ही पोलिटिकल विल गांधींसारखी, नेहरूंसारखी निर्भय कधी होणार, हाच मोठा प्रश्न मला वाटतो. खरंच सांगते, पण गांधी आणि नेहरू यांची वैयक्तिक आयुष्यं आणि त्यांच्यातील परस्परांशी असणारं नातं... त्यात मला त्यांचं प्राप्त परिस्थितीला निर्भयतेने सामोरं जाणंच दिसतं नरेंद्र.

गांधींच्या मुलासारखे, त्यांच्या घनिष्ठ सेवकासारखे असणारे नेहरू जेव्हा गांधींच्या मनातील रामराज्याला निग्रहाने नाकारतात आणि नव्या भारतासाठी नवी व अधिक सेक्युलर, लिबरल अशी ‘वेस्टर्न थॉट’शी सुसंगत भूमिका घेतात; तेव्हा मला ते निर्भय वाटतात. आणि हाच निकष गांधींच्या बाबतीत बरोब्बर उलट दिशेने लावता येतो. गांधींना आपली नव्या भारताकडे बघण्याची भूमिका ठामपणे पटवणारे नेहरू जसे निर्भय... तसेच नेहरूंच्या भूमिकेला शांतपणे (मग भले ती त्यांची स्वतःची भूमिका नसेना का!) संमती देणारे गांधीही तेवढेच निर्भय!  

नरेंद्र...

खूप दिवस झाले; मनात एकसारखे विचार येतायत माझ्या. खूप सारे विचार. आत्ता शरीराने तुम्ही नाही आहात आमच्यात, हे मान्य... पण माझ्या दृष्टीने मात्र तुम्ही नेहमी असणारच आहात.

‘माणसाचा मेंदू म्हणजे त्याचं असणं’, असं मी शिकले आहे. मग मेंदूतलं एखाद्याचं अस्तित्व, त्याचं असणं हे कसं पुसून टाकता येईल...? म्हणून माझ्या दृष्टीने तरी तुम्ही आहातच! आणि आताशा ते माझ्यात हळूहळू प्रोसेससुद्धा व्हायला लागलंय. असो. बघता-बघता तीन महिने झाले... आपण काही बोललोच नाही आहोत. केवढं तरी होऊन गेलंय यादरम्यान; माहितीये?... या तीन महिन्यांत जे-जे काही घडलं आणि घडतंय आजूबाजूला; ते मी माझ्याच मनाशी पक्कं करतीये अजून. त्या सगळ्यांविषयी तुम्हाला सांगायला लिहितीये हे पत्र...

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाकडे तुमच्या पश्चात बघताना, एक चळवळ म्हणून तुम्ही सुरू केलेलं काम हे पुढे-पुढे कसं सरकत गेलंय, हे पाहून खूप बरं वाटतंय मला. ‘दाभोलकर गेले... आता त्यांच्या चळवळीचं होणार तरी काय?’ हे असं खूप लोकांना वाटतंय यादरम्यान. पण तुम्हाला सांगत्ये नरेंद्र, तसं खरंच नाही वाटत मला तरी. आजूबाजूचं वातावरण मला आशादायीच वाटतंय. प्रत्येक जण आपापल्या परीने चळवळीसाठी, तुमच्या विचार- कार्यासाठी काही ना काही करू बघतोय.

आपल्या वंदना शिंदेच पाहा ना! जमेल तसं जमेल त्या समुदायाला अंनिसविषयी, अंनिसच्या अपेक्षित कायद्याविषयी दिवस-दिवसभर अथकपणे (प्रसंगी वस्तीत जाऊन) समजावून सांगणारी ही बाई; वाटेल का कुणाला सदुसष्ट वर्षांची वृद्धा आहे म्हणून?... ‘चळवळ ही अशीच पुढे जात असते... कार्यकर्ते असेच तयार होत असतात’, हे आपण वाचलं होतं; आज ते पाहायला मिळालं. आज मला वंदनातार्इंसारख्या अनेक जणांमध्ये, तुमची चळवळ सतत हलती ठेवून तिला पुढे नेण्यासाठीचा एक प्रत्यक्ष प्रयत्न दिसतोय... ते समर्पण त्यांच्यात पाहायला मिळतंय! मी तर म्हणेन की, मला स्वतःलाही एक नवा जोम यामुळे मिळतोय. खरंच... कुठून येत असेल हे सारं, कुणास ठाऊक!   

एक मात्र निश्चित; या सगळ्यातून एक निर्भय असा स्वतःचा चेहरा मात्र या चळवळीला नक्कीच मिळाला आहे. मला आठवतं, तुम्ही नेहमीच ‘निर्भय बनो.. निर्भय बनो...!’ असं म्हणायचात- अगदी गेली जवळपास चाळीस वर्षं! मला ते ‘निर्भय बनणं’ म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याची प्रोसेस काय, हे त्या वेळी कळायचं नाही. तुम्हाला आठवत असेल; मी तुम्हाला त्याविषयी नेहमीच विचारायचीसुद्धा. ...

तुम्ही तर आपल्या जुन्या स्कूटरच्या स्टेपनीवरचं कव्हरसुद्धा ‘निर्भय बनो!’ या अक्षरांनी रंगवल्याचं लक्षात आहे माझ्या! ती एवढीशी जागाही ‘काही तरी म्हणण्यासाठी’ कशी काय वापरावीशी वाटली असेल तुम्हाला? पण हो, आज मला ते सगळं उमगतंय. तुमचं ते तेव्हापासूनचं निर्भयतेने चालत राहणं लक्षात येतंय. नव्याने आणि पुन्हा एकदा.

परवा आम्ही सोनिया गांधींना भेटायला गेलो होतो, तेव्हाची एक आठवण सांगते. त्यांना मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यासाठीची आपली कलमपुस्तिका दाखवली. त्या वेळी त्यांची प्रतिक्रिया काय होती, माहितीये?... याच्यात असं काय आहे की, एखाद्याने विरोध करावा हा कायदा व्हायला?- ही होती सोनियांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया!

अशीच एक अलीकडच्या दिवसांतली अजून एक बोलकी (पण वेगळ्या बाजूची!) प्रतिक्रिया आठवतीये मला आत्ता. ‘‘तसा विरोध वगैरे असण्याचं ठोस कारण काहीही नाहीये खरं तर. पण करणार काय, ‘पोलिटिकल स्ट्रॅटेजी’ म्हणून करायला लागतं आम्हालाही काही वेळा असलं.’’ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याला विरोध असणाऱ्यांपैकी कुणी तरी तोंडावर दिलेली ही प्रतिक्रिया. मला कळलं नाही, हे कसं उत्तर होऊ शकतं त्या प्रश्नाचं?... ही ‘पोलिटिकल स्ट्रॅटेजी’, ‘पोलिटिकल विल’ अशी चुकीच्या पद्धतीनेच जर चालायला लागली, तर सकारात्मक सामाजिक बदल व्हायचे तरी कसे? कधीपर्यंत या बदलांनी अडचणींनाच तोंड द्यायचे?...ही पोलिटिकल विल गांधींसारखी, नेहरूंसारखी निर्भय कधी होणार, हाच मोठा प्रश्न मला वाटतो. खरंच सांगते, पण गांधी आणि नेहरू यांची वैयक्तिक आयुष्यं आणि त्यांच्यातील परस्परांशी असणारं नातं... त्यात मला त्यांचं प्राप्त परिस्थितीला निर्भयतेने सामोरं जाणंच दिसतं नरेंद्र.

गांधींच्या मुलासारखे, त्यांच्या घनिष्ठ सेवकासारखे असणारे नेहरू जेव्हा गांधींच्या मनातील रामराज्याला निग्रहाने नाकारतात आणि नव्या भारतासाठी नवी व अधिक सेक्युलर, लिबरल अशी ‘वेस्टर्न थॉट’शी सुसंगत भूमिका घेतात; तेव्हा मला ते निर्भय वाटतात. आणि हाच निकष गांधींच्या बाबतीत बरोब्बर उलट दिशेने लावता येतो. गांधींना आपली नव्या भारताकडे बघण्याची भूमिका ठामपणे पटवणारे नेहरू जसे निर्भय... तसेच नेहरूंच्या भूमिकेला शांतपणे (मग भले ती त्यांची स्वतःची भूमिका नसेना का!) संमती देणारे गांधीही तेवढेच निर्भय! हा समजूतदारपणा आज का नाही दिसत?...

आपापसातले मतभेद चर्चेला पुढ्यात ठेवण्याचं, ते निगोशिएट करत सोडवण्याचं असं पारदर्शक नातं आहे कुठे आजच्या व्यवस्थेत?... आज, गेला केवढा तरी काळ सनातनी प्रवृत्तीच्या व्यक्ती व संस्था धर्माविषयी, तुमच्याविषयी अगदी नाही-नाही ते लिहितायत; परंतु सरकार ढिम्मच. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कृती याचं महत्त्व तर असतंच नेहमी... परंतु ती कुठल्या मानसातून, कुठल्या विखारातून घडते, यावरही खूप काही अवलंबून असतं.

सरदार पटेलांचं उदाहरण आठवत असेल ना तुम्हाला? पटेल गोळवलकरगुरुजींना काय म्हणाले होते, त्याविषयी बोलतीये मी. ‘‘गुरुजी, तुमचं सगळं म्हणणं बरोबरच आहे, मान्य. गांधींच्या मरणाला तुम्ही सगळे जण खरे साक्षीनी नसालसुद्धा, हेही मान्य. परंतु म्हणून तुम्ही ती सबंध परिस्थिती निर्माणसुद्धा केली नाही, हे म्हणणं मात्र अमान्य! गांधीहत्या घडावी म्हणून त्यासाठीची अनुकूल परिस्थिती तुम्ही निर्माण केलीत... आणि हेच पहिल्या प्रथम राष्ट्रहिताच्या दृष्टीने वाईट होतं. आणि जो अशी परिस्थिती निर्माण करेल, ही ‘कॅन बी स्यूड इन द कोर्ट ऑफ लॉ!’ जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की, तुम्ही ‘ते’ केलेलं नाही; तोपर्यंत आम्ही तुम्हाला त्यासाठी गृहीत धरू शकतो.’’ हे धैर्यपूर्ण वक्तव्य होतं पटेलांचं. आजच्या राजकारण्यांना त्यांच्याकडे ते काही प्रमाणात (मनात) असूनसुद्धा एक्स्प्रेस करता येत नाहीये.

विवेकी विचारांचं नाही का सांगत आपण नेहमीच- ‘विचार करा... ते व्हर्बलाईज करा... त्यावर आपोआप कृती होईल मग’- हे अलीकडे दिसत नाहीये होताना. आज काय होतंय? लोक इतिहास वाचत नाहीत, समजून घेत नाहीत... त्यामुळे मनात विचार येणं कमी होत जातं, व्हर्बलाईज होणं थांबत जातं... कृतीपर्यंत ते येणार कधी? खरं म्हणजे, ही निर्भयतेची वाट इतकी सोपी असूनही त्यांना जमत नाहीये ती धुंडाळायला.

त्यांनी फक्त ही निर्भयतेची आणि सुधारणांची वाट धरायचा अवकाश की, हजारो लोक (जे बरं-वाईटाच्या धूसर सीमेवर, कुंपणावर उभे आहेत) साथीला येऊन उभे  राहतील. लोकांना हवा आहे बदल. का बरं येत नाहीये ही व्हिजन या व्यवस्था हाकणाऱ्यांना?... मला माहितीये, मी हाच प्रश्न तुम्हाला विचारला असता तर, तुम्ही असेच नेहमीसारखे हसला असता आणि म्हटला असता, ‘‘शैला, अजून ती वेळ आलेली नाहीये हे ठाऊक आहे मला. आणि म्हणूनच मी त्या पायऱ्या हजार वेळा चढत राहणं थांबवणार नाही!’’ ...

पुन्हा एकदा सोनिया गांधींविषयी सांगते मी तुम्हाला. या बाईला भेटण्याचा अनुभव खरोखर चांगल्या अर्थाने वेगळा होता. एका वेगळ्या देशातून भारतात आलेली ही बाई. आपल्या मनात असणाऱ्या एका त्या अर्थाने साध्या माणसाशी (राजीव) तिने केलेलं लग्न... पुढे मग एकेका टप्प्यावर आयुष्यात घडणाऱ्या किती तरी डायनॅमिक बदलांशी तिने स्वतःला जुळवून घेणं, स्वतःला नव्याने घडवणं... हे सगळंच वेगळं वाटतं मला. आम्ही त्यांच्या घरी गेलो, तेव्हा त्यांच्या खोलीत त्या एकट्याच शांत बसलेल्या होत्या. तिथल्या वातावरणातल्या स्वतःच्याच एका शांततेसोबतच (ज्याकडे दुर्लक्ष करता येणं केवळ अशक्य होतं) होता गांधीजींचा एक मोठा फोटो. विचारी मुद्रेतला फोटो!

विवेकाची वाटचाल, ह्युमनेटेरियन कार्य या गोष्टी सोनियांच्या मनात घट्ट असल्या पाहिजेत, हे मला त्यांच्या लहान-सहान कृतींतून वाचता येत होतं. इतर अनेक राजकारण्यांपेक्षा हे सगळं जाणवेल इतपत वेगळं होतं. (आत जातानाच मनात येऊन गेलं होतं माझ्या- मी आज एका चांगल्या व्यक्तीला भेटतेय म्हणून.) आपण पुस्तकं वाचतो, अक्षरं वाचतो; परंतु माणसं वाचणं, भिंती वाचणं, आजूबाजूचं वातावरण वाचणं- हाच तर आपला वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, हे मी अनुभवलं!

सुरुवातीला निरीक्षण, मग त्याच्या नोंदी, मग अनुमान आणि शेवटी त्याची प्रचीती घेऊन ती-ती गोष्ट करणं, हे विवेकाच्या वाटचालीचं एक सूत्र जर म्हणायचं झालं तर; गेल्या काही दिवसांत मला व्यक्ती म्हणून ते सोनियांच्यात दिसल्याचं म्हणेन मी....

शेवटी मी एवढंच म्हणेन- वीस वर्षं तुम्ही या चळवळीतून सतत एक विचार देत राहिला होतात. त्याच्यासाठी तुम्हाला अखेरीस बलिदानही द्यावं लागलं. ती चळवळ मात्र इथून पुढेही चालूच राहणार आहे. आज जो कायदा होऊ घातलाय, त्याचे परिणामही लवकरच दिसू लागणार आहेत आणि विवेकाचं बळ सतत वाढत राहणार आहे! या सगळ्या काहीशा चांगल्या चित्राची एक थोडीशी झलक  मला तुम्हाला आज दाखवून द्यायची होती, म्हणून आज हे पत्र लिहायला घेतलं.

उद्या कायदा झाल्यानंतर आपली मूव्हमेंट अनेक अर्थांनी एक नवं रूप घेणार आहे. त्या वेळी मी तुम्हाला जास्ती चांगल्या रीतीने रिपोर्ट करेन. आज जे मी केलं, ते माझ्या स्वतःच्या व्हेंटिलेशनसाठी... मोकळं होण्यासाठी!... तुम्ही नेहमीच कमी बोलायचात, ऐकून घ्यायचात किंवा नुसतंच हसायचात... आणि मला तुमचा प्रतिसाद कळायचा. आत्ताही मला तसंच वाटतंय... वाटतंय की, तुम्ही आत्ताही हसून पाहताय आणि तसाच नेहमीसारखा प्रतिसाद देताय मला. आणि या पत्राला...  

ता.क : नरेंद्र... कायदा झाला!

 ... कायद्याची चळवळ ही एवढी मोठी असेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. किती ना गोष्टी कराव्या लागतात एक कायदा करण्यासाठी!... आज मी ते पाहिलं. माझ्या आयुष्यात मला ते पाहायला मिळालं. त्यामधलं वेगवेगळ्या लोकांचं योगदान, त्यांची मदत, त्यांचे श्रम- हे सगळंच अतिशय महत्त्वाचं आणि मुळीही विसरता न येण्यासारखं. तुम्हाला मी मुंबईच्या रॅलीबद्दल सांगितलं होतं का?... जेव्हा ही रॅली काढायची ठरवली, तेव्हा सगळ्या समविचारी संघटनांनी घेतलेला आपला रोल, त्यांनी केलेली मदत ही सगळ्या लोकांचं लक्ष वेधणारी होती.

 ...हे सगळे जण पूर्ण महाराष्ट्र फिरले. अगदी गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत. सगळे जिल्हे, सगळे तालुके; जसे तुम्ही कव्हर करायचात ना, तसेच यांनीही केले. लोकांपर्यंत जाऊन त्यांना हा कायदा समजावून सांगितला. आणि मग ही मुंबईची रॅली. या रॅलीनंतरच्या सभेबद्दल सांगते- खरंच बघण्यासारखी होती ती सभा. प्रत्येक जण आपापल्या खर्चाने तिथवर आलेला. आपल्या मनाने आलेला... अन्‌ आपल्या पायानेही!... हे सगळं घडत असताना ते बघत एन. डी. पाटील शांतपणे एका बाजूला बसले होते.

 नरेंद्र, मला जाणवत होतं; त्यांनापण त्या वेळी तुमची कुठे तरी आठवण येत असल्याचं. त्यांच्या बाजूलाच बसले असल्यामुळे मला त्यांच्या पापण्यांच्या ओलसर कडा दिसत होत्या... एक केवढा तरी मोठा माणूस हा. एके दिवशी तुमच्यासोबत तुमच्या विचारांची साथ करायचं ठरवतो काय... आणि एका साध्या कार्यकर्त्यासारखं चालणं, जगणं तो करतो काय... याबद्दल मी तरी काय बोलणार? त्यांची एक मोठी जडणघडण मला यामागे दिसत होती.  नागपूरचं सांगते. अधिवेशनाला जाताना सगळ्यांनी आपापली तिकिटं काढली होती, आपापल्या वेळा ठरवल्या होत्या. कुणीच कुणाला सांगत नव्हतं. पण ते एवढ्या शिस्तीने होताना दिसत होतं की, अवचितपणे माझ्या मनात येऊन गेलं- नरेंद्रच हे सगळं सांगतोय की काय!

...दररोज वाटायचं, आज होईल कायदा पास; पण काहीतरी व्ह्यायचं आणि तो अडायचा विधानसभेत. पण झाला एके दिवशी तो विधानसभेत पास. आणि नंतर विधान परिषदेतसुद्धा. मला हा ताजा कलम लिहावासा वाटला; त्याला असणारं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, मला यादरम्यान झालेला कायद्याच्या विरोधकांच्या भूमिकेतला बदल तुम्हाला सांगायचा होता. हा खूप महत्त्वाचा बदल होता. हा कायदा पास होताना जी माणसं बोलली ना- विशेषतः कायद्याच्या विरोधातली, त्यांच्या विचारांतला बदल जाणवण्याइतपत दिसून येत होता. महत्त्वाचं असं की, हा बदल वैयक्तिक होता. ते सारे जणू निरुत्तर झाले होते. त्यांचं मन आतून हललं होतं. त्यांना ते म्हणत असावं, ‘कायदा बरोबर आहे. मी विरोध कसा करू?’...

 ही ती वेळ होती, जेव्हा मला इथे विवेकाची चाहूल लागली, नरेंद्र! मनात आलं- समाजाची ती विवेकाची पोकळी भरून निघण्याची वेळ आत्ता हळूहळू आली आहे. ही अशी वेळ पहिल्यांदाच आल्याचं दिसत होतं की, आपल्याला आता कुणीही विरोधक नसणार आहे आणि आपली चळवळ पुढे जाणार आहे. त्याचं पहिलं बीज या वेळी रोवलं जात असल्याचं मला जाणवत होतं! आता शांतपणे ही वाट चालता येईल अशी थोडी खात्री, थोडा निर्भयपणा आता आपल्यात आल्याचं वाटत होतं.

 शेवटी, हे पत्र संपवताना ‘राज्यसत्ते’विषयीची आपली मागची कधीची तरी एक चर्चा मला आठवली, ती सांगते. तुम्ही म्हणायचात, राज्यसत्ता ही सगळ्यात महत्त्वाची  असते... आणि मी मात्र कायम म्हणायचे की, राज्यसत्तेत आपण कधीही काम करायचं नसतं म्हणून. पण या अधिवेशनानंतर माझ्या लक्षात आलं, राज्यसत्ता किती महत्त्वाची असते ते. राज्यसत्तेने नुसतं ठरवलं तरी ते किती तरी गोष्टी करू शकतात! त्यामुळे लोकचळवळीचा भाग म्हणून, या डेमोक्रसीचा भाग म्हणून हे सगळं बघायला मिळालं, यासाठी मी तुमचं कौतुक करीन तितकं थोडंच आहे... आणि ते जन्मभर करत राहीन!...

Tags: नागपूर अधिवेशन महाराष्ट्र सरकार जादूटोना विरोधी कायदा कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर शैला दाभोलकर पत्र Anti-Jadu Tona Bill Jadutona virodhi Kayada Activist Karykrte Dr. Narendr Dabholkar Mans Patr Shaila Dabholkar Letter weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. शैला दाभोलकर

स्त्रीरोगतज्ञ, पत्नी- डॉ नरेंद्र दाभोलकर 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके