डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एक पोटतिडिकीचे मिस्कील पत्र

हे विघ्नहर्त्या, सिद्धिविनायका, गजानना! भक्त-भाविकांच्या वादावादीत तुझा कायापालट करण्याचा संकल्प तुर्तास तहकूब करावा लागला, हे वाजून मला फार दुःख झाले. खुद्द भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत ‘वासांसि जीर्णानि यथा बिहाय । नवानि गुण्हन्ति नरोऽपराणि ।' असे म्हटलेले आहे. त्यानुसार तूही नवा देह धारण करण्याचा बेत आखला होतास, असे दिसते. हा तुझा बेत तूर्तास तहकूब झाला, म्हणून मला तुझ्याविषयी फार सहानुभूती वाटते.

इंग्रजांचे राज्य येथे आल्यापासून कज्जे दलालीला प्रारंभ झाला. माणूस मुळात भांडखोर प्रवृत्तीचा! त्यातच इंग्रजी राज्यात नव्याने वकीलवर्ग निर्माण झाला. मग काय, भांडणांना ऊतच ऊत आला भावा-भावांत भांडणे, जाती-जातींत भांडणे, प्रादेशिक भांडणे, धार्मिक भांडणे, साहित्यिकांची भांडणे, इत्यादी असंख्य स्वरूपाची भांडणेच भांडणे !

इंग्रज गेले, भारत स्वतंत्र्य झाला, गणराज्य स्थापन झाल्याला 37-38 वर्षे झाली. तू गणधिपती असल्यामुळे गणराज्यविषयी तुला अधिक जिव्हाळा, आपुलकी, चिंता वाटत असेल. असे मी गृहीत धरतो. परंतु देवाधि- देवा, गणराया, झाले आहे प्रत्यक्षात उलटेच. लक्षावधी खटले भारताच्या निरनिराळया न्यायालयात पडून आहेत, असे मी ऐकतो. न्यायालयात खटल्यांचा, भांडणांचा निर्णय लवकर लागत नाही म्हणून म्हणा, किंवा अन्य कोणत्याही कारणाने म्हणा, जनता आपली भांडणे रस्त्यावरच येऊन सोडवू लागली आहे. यामुळे लाठीमार, गोळीबार, छडीमार, दगडफेक, जाळपोळ, विध्वंस, लुटालूट, संपत्तीचा नाश, चोर्या, दरोडे, खून आणि मग या सर्वांची चौकशी करणारी कमिशने आणि त्यांचे रद्दीत पडून राहणारे अहवाल, या सर्व गोष्टींना गणाधिपती, गणपती या न्यायाने तूच जबाबदार नाहीस का? परंतु जेथे तुझ्या देहावर तुक्षी सत्ता चालत नाही, तेथे तू अन्यांच्या मदतीला कसा काय धावून जाणार, हा प्रश्न मला पडतो.

देवा गजानना; ‘लॉक’ नामक एका इंग्रज ग्रंथकाराने सुमारे तीनशे वर्षापूर्वी ‘माझा देह ही माझी खाजगी संपत्ती आहे’ असा सिद्धान्त मांडून मानवाच्या मूलभूत हक्कांचे समर्थन केले होते. याच इंग्रजाने लोकशाहीचा पुरस्कार केला होता. 'मिल’ नामक दुसऱ्या एका इंग्रजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा उदो-उदो केला. भारतवासीयांनी या इंग्रजांचे अनुकरण करून भारतीयांना राज्यघटनेद्वारे मूलभूत हक्क समर्पित केले. सर्वसामान्य भारतीय नागरिक राज्यघटनेत असलेले मूलभूत हक्क आणि राज्यघटनेत नसलेलेही अनेकविध हक्क खुल्या स्वरूपात उपभोगीत असता, तुला मात्र कायापालटाचा हक्क मिळू नये, तुला त्याबाबत स्वतः निर्णय घेता येऊ नये ही वस्तुस्थिती फार कलेशदायक आहे. तुझे एक नाव विघ्नहर्ता असे आहे. परंतु तुला तुझे विघ्न दूर करता आले नाही, याचे मला फार वाईट वाटते. सामान्य माणसाला जे स्वातंत्र्य आहे. ते तुला नाही; त्यामुळे मला तुझ्याविषयी फार सहानुभूती वाटते. म्हणून मी आज हे पत्र तुला लिहिले आहे.

देवाधिदेवा गजानना, ‘तुमसे बढ़कर कौन ?’ असा प्रश्न आपली फिल्मी आरती करणारे भाविक विचारतात. मलाही एके- काळी वाटत असे की, गणपती, महागणपती यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार? पण आता खात्री झाली की, देवापेक्षा त्यांचे भक्त- भाविकच ‘बढकर’ असतात! ते देवाचे काही एक चालू देत नाहीत. आपले सगेसोयरे, नातेवाईक, पक्षाचे लहान-मोठे कार्यकर्ते, शिवाय लाळघोटे, बूटचाटे, थुंकीझेले यांच्यापुढे आपल्या लोकनिमवत मंत्र्याचा जसा ना लाज होतो, तसाच नाईलाज, देवाधि देवा, तुझा झाला असावा. कारण सोंड फिरवून वा परशू दाखवून तू यासंबंधीची आपली नापसंती व्यक्त केल्याचे माझ्या तरी ऐकिवात आलेले नाही. खुशाल एखाचा कैद्याप्रमाणे तू त्यांचे ऐकतच राहिलास. देवाधिदेवा, हे बरे नव्हे बरे! ‘सत्राणे उड्डाणे’ करणारा मारूती बंदिवान बनुन  ‘बंदिवान मारूती’ झाल्याचे मी ऐकले आहे, परंतु ‘बंदिवान विघ्नहर्ता गजानन’ मात्र मला आढळलेला नाही. नाही म्हणायला तुझी थोडीशी बदनामी करणारा एक ‘गुंडाचा गणपती’ मात्र आहे. परंतु त्याचे मला फारसे आश्चर्य वाटले नाही. जसे लोक तशी त्यांची लोकशाही, या न्यायाने ‘जसे भक्त तसा गणपती’ असे असेल. तुझ्या दूरदृष्टीचे मला मात्र फारच कौतुक वाटते. भारत स्वतंत्र होणार, तेथे लोकसत्ताक गणराज्य स्थापन होणार, नंतर निवडणुका होणार, सभा भरणार सभा मोडणार इत्यादी कामांसाठी गुंड-पुंड माणसे लागणारच की! यासाठीच तू ‘गुंडाचा’ हे एक विशेषण धारण केले असावेत. न जाणो, आणखी काही वर्षांनी एखादा महा गुंड, भारतीय गणराज्याचा अधिपती झाला तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. शिवाय आमच्या सनातन्यांना त्यामुळे फार आनंद वाटेल, आपले पूर्वज किती द्रष्टे होते, हे त्यांना अभिमानाने सांगता येईल.

सिद्धविनायका! मी तुझा भक्तही नाही. किंवा तुझा शत्रूही नाही. तुझ्या बाबतीत मी भारताच्या परराष्ट्रीय धोरणाप्रमाणे ‘तटस्थ’ आहे. तटस्थता म्हणजे निष्क्रियता असे काही लोक म्हणतात, पण तूर्त आपण तो भाग सोडून देऊ. परंतु मला तुझा राग येतो तो माझ्या तटस्थपणाचा नसून तुझ्या तटस्थपणाचा! वर्षातून अनेकवार होणारी तुझी दयनीय अवस्था पाहिली की मला तुझी अनुकंपा वाटते. एका पारड्यात राग व  दुसर्या पारडयात अनुकंपा हे समान वजनाचे झाले की तराजू जसा स्थिर वा तटस्थ राहतो, त्या वर्षाने तुझ्याबाबत मी तटस्थ आहे. देवा गजानना! मी आजतागायत कसलेच मागणे तुझ्यापुढे मांडले नाही किंवा तू आपणहोऊन मजवर नाही कृपाप्रसाद केलास, असे झालेले नाही, हे माझ्या सद्धस्थितीवरून सहज स्पष्ट होईल, तुझी थोडीशी जरी कृपा असती तरी मी एखादया गणराज्याचा किमान मंत्री तरी नसतो का झालो? तुझ्या कृपादृष्टीचा एखादा कवडसाही माझ्या वाट्याला आलेला दिसत नाही. कारण तसे असते तर निदान महानगरपालिकेच्या अभ्यास दौऱ्याचा (?) मी सदस्य झालो नसतो का? अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने माझी महिना-पंधरा दिवस चंगळ झाली नसती का? खाणे, पिणे आदी देहाधिष्ठित मजा चाखण्याचा आनंद माझ्या वाट्याला आला नसता का? सिद्धिविनायका! तुझी कृपा माझ्यावर अजिबात नाही याचा मला यत्किंचितही राग नाही, हे मी प्रामाणिकपणाने सांगतो. मला तुझा जो राग येतो. त्याची कारणे वेगळी आहेत. 

देवा गजानना! ऋग्वेदकालापासून तुझा उल्लेख आढळतो. भारतात प्राचीन काळी जी गणराज्ये स्थापन झाली, ती त्या नावावरुन, तुझ्या प्रेरणेने साध्य झाली, हे स्पष्टच आहे. तेव्हा त्यांची आवश्यक तो काळजी घण्याची जबाबदारी तुझी नव्हती का? त्यांचा ऱ्हास झाला, अवनती झाली तरी तू आपला गप्पच ! गौतमबुद्धाने या गणराज्यांना आपापसात भांडण्याचा उपदेश केला. अंतर्गत कलहाने, अराजक निर्माण झाल्याने ही गणराज्ये नष्ट झाली, नंतर भारतावर अनेक आक्रमणे आली तरी तू येथल्या जनतेला सद्बुद्धी दिली नाहीस. मग मला तुमा राग का येऊ नये? प्राचीन काळाचे आपण सोडून देऊ. परंतु पेशव्यांच्या दरबारी तर तुला मोठा मान होता ना? तुझ्या कृपेने पहिल्या बाजीरावाचा धाक परकीयांना केव्हढा वाटत असे! तुझ्या महाली एके काळी मस्तानीच्या नृत्य- नायनाचा कार्यक्रम होत असे. त्याच महलात तुझ्या साक्षीने भाऊबंदकी सुरू झाली, दिवसाढवळ्या खून पडू लागले पुढे पुढे तर फारच अघ:पात झाला. दांडपट्टा आणि तलवारीचे खेळ होण्याऐवजी घटकंचुकीचे खेळ होऊ लागले, तरी तू आपला गप्पच ! आत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी छोटीशी शिस्तबद्ध सेना मोठमोठया सैन्याचा पराभव करते हा अनुभव पहिल्या पानिपताच्या युद्धापासून ते तिसऱ्या पानिपताच्या युद्धापासून अखेरीपर्यंत आला, तरी आपले राज्यकर्ते काही बोध घेईनात! सातासमुद्रांपलीकडून एक व्यापारी कंपनी येते व भारतात ठाण मांडून बसते, येथला प्रदेश जिंकते तरी तू येथल्या लोकांची कानउघाडणी केली नाहीस, याला काय महणावे ? या अवनतीची स्तुतिस्तोत्र आजही काही 'स्वामी’ निष्ठ सेवक, चाकरदार-इनाम दार, सामंत-सावंत-शाहीर गातात व पुन्हा जनतेला अज्ञानात ठेवतात. तरी तू गप्पच ! पेशावे कालाचे जाऊ द्या. भारत स्वतंत्र होऊन गणराज्याची स्थापना झाल्यानंतर त्याच्या हिताची, संरक्षणाची काळजी तू घ्यायला हवीस ना? गणनायकाचा राज्यात निर्नायकी अवस्था होणे हे कितपत श्रयस्कर? आता तरी तुला माझ्या रागाचे कारण समजले ना?

सारसबागेच्या सिद्धिविनायका! तळ्यातील गणपती या नावाने जेव्हा तू ओळखला जात होतास तेव्हा तुझे दर्शन घ्यायला येणे अवघड असे. काट्याकुट्यांतून, पालापाचोळा तुडवीत यावे लागे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तुझी स्थिती सुधारली. हजारो लोक तुझ्या दर्शनाला येऊ लागले. परंतु त्यांतले खरे भाविक किती, याची मला जबरदस्त शंका आहे. पुण्यात आता गर्दी भयानक झाल्याने फिरण्याच्या निमित्ताने अनेक जोडपी येतात, जोडपी होण्याच्या इच्छेने तरूण-तरुणी येतात, काहीतरी बरे पाहायला मिळावे म्हणून कित्येक आंबटशौकीन येतात, कोणी भेळ खायला घेतात, लहान मुले पेशवे पार्कमधले प्राणी पाहायला येतात, शाळेच्या ट्रिपा येतात. या विवादाच्या गोंगाटाच्या जोडीला मोटारी, स्कूटरी, रिक्षा आदी वाहनांच्या कर्कश आवाजाने, शिवाय लाऊडस्पीकर्स इत्यादी आधुनिक वाद्यांच्या आवाजाने जो कलकलाट व कोलाहल  निर्माण होतो तो सारा तुला निमूटपणे सहन करावा लागतो. गणेशोत्सवात तर तुझ्या हालाला सीमाच नसते. तुझ्या उत्सवाच्या नावाखाली दहा दिवस नुसता धांगडधिंगा चालतो. गलिच्छ प्रकारची नृत्य, कर्कश आवाजातली गाणी इत्यादी प्रकार तुझ्या साक्षीने होतात. या दहा दिवसांत तुझे होणारे हाल मला बघवत नाहीत. मला तुझी फार कीव येते. देवा गजानना! सहनशीलता हा गुण बरा, परंतु तो अति झाला तर व्यक्तीला वा समाजाला हानिकारक ठरतो, हे मी तुला सांगायला हवे का?

गणाधिपती, गणराया ! पत्र खूपच लांबले. येथेच थांबणार होतो; परंतु आणखी एक दोन प्रसंग तुझ्या संदर्भातले आठवले म्हणून ते लिहीत आहे. मी तुझा भक्तही नाही वा शत्रूही नाही, हे वर सांगितलेच आहे. देवाधिदेवा, एकदा मी सहज तुझ्या महाला वरून जात होतो. ‘मागणे’ मागण्यासाठीच लोक तुझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यापैकीच एक असावा, या कल्पनेने द्वारपालाने, आपण दौर्यावर गेल्याचे मला सांगितले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. फार दौरे काढणे इष्ट नन्हे बरे. भारताचे एक माजी परराष्ट्र मंत्री इतके दौरे काढीत की. ‘विविध परराष्ट्रांत राहणारे परराष्ट्रमंत्री' असा त्यांचा लौकिक झाला. महाराष्ट्राचे मंत्री य बाबात मागे नाहीत. एक मंत्री तर 'उद्घाटन मंत्री' म्हणूनच प्रख्यात आहेत. बारसे असो वा बारावे असो, मंत्राग्नी असो वा भडाग्नी अगो, साहित्य संमेलन असो वा दिल्लीसारखे मूर्खांचे संमेलन असो (या दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, असे काही मत्सरी लोक म्हणतात), जीर्ण कवींचे संमेलन असो वा नवकवींचे संमेलन असो, हे मंत्री जनतेच्या खर्चाने आपली हजेरी लावत असतात. सरकारी उधळपट्टीपायी, दौऱ्यांसाठी होणाऱ्या खर्चापायी खजिना रिता होऊन शिल्लक शून्यावर आली आहे. त्यामुळे शून्याचे समर्थन करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला आहे. हे मंत्री शून्यवादी तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासकः असावेत या अंदाजाने मी माझ्या मित्र परीवारांत एकदा त्यांची स्तुती केली. तेव्हा माझे मित्र मजवर भलतेच उखडले. ते म्हणाले, 'महामूर्खा, कोणत्याही तत्त्वज्ञानाचा आणि मंत्र्याचा काय संबंध ! सत्तेचे तत्त्वज्ञान हे फार वेगळच असते ! ते तुला या जन्मी समजायचे नाही!' मित्रांच्या या वाक्ताडनाने मला फार दुःख झाले. पण सतत खर्च करीत राहून राज्याची शिल्लक नेहमीच शून्य कशी राहील,याचे सुबोध आणि सोदाहरण विवेचन करनारे एक नवेच अर्थशास्त्र मला ज्ञात झाले, हा माझा फायदा झाला. देवा गजानना तात्पर्य असे की, दौरे फार काढू नयेत. गणाधिपते ! आपण दौर्यावर गेलात असे व्दारपालाने मला खोटे सांगितले असावे. आपल्या देहाकडे पाहता दौरे आपापल्या झेपतील असे वाटत नाही. ‘तुंदिल तन् परि चपल साजिरी’ असे जरी आपले वर्णन करण्यात येत असले तरी आपल्या चपळबद्दल मी जरा साशंक आहे. आपण चपळ असता तर या गणराज्याच्या अनेक समस्यांचा बीमोड कधीच झाला नसता का? तुला मोदकांचा नैवेद्य दाखविण्यामध्ये तुला सुस्ती यावी, हाच भक्तगणांचा हेतू असतो. कारण मग हवे ते करायला त्यांना रान मोकळे मिळते. आणि देवा गजानना ! तुला चार हात ,हत्तीचे कान आणि सोंड दिली, यात महादेवाची दूरदूष्टी दिसते. चारी हात काही मोदक खाण्यासाठी दिलेले नाहीत. त्याला एक हात पुरे ! प्रजेची गाऱ्हाणे स्पष्ट ऐकता यावीत यासाठी तुला मोठे कान दिले आहेत. सद्वर्तनी प्रजाजनांना अभय देण्यासाठी एक हात आहे.एका हातात परशू आहे.भ्रष्टाचारी दुर्वर्तनी, कायदे मोडणार्या लोकांना फटकारता यावे यासाठी सोंड दिलेली आहे. तेवढ्याने भागले नाही तर परशूचा उपयोग करायच्या. ‘दण्ड:शास्ति प्रजा सर्वे|’ या तत्वाच्या जोडीला ‘यथार्ह दण्ड:पूज्य:|’ हे वचन लक्षात ठेवावे लागते. हे गणाधिपते! भारतीय गणराज्याचे भवितव्य आता तुझ्याच हाती आहे. इतिहासाची अनुभवावरून तू आता जागृत राहून, इतिहासाची पुनरावृत्ती धडू देणार नाहीस, असे मला वाटते. मला पत्रोत्तर न पाठविता आपण काही कृती करावी ही विनंती. आमच्या संदर्भात एकेरी भाषेचा मी अवलंब केला, परंतु त्याचा अर्थ आपल्याविषयी माझ्या मनात अनादराची भावना आहे, असे नाही ! कळावे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके