डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

धावत्याला शक्ति येई, आणि रस्ता सापडे!

पूज्य अण्णासाहेब सहस्रबुद्धे स्मृतिदिन मित्र परिवार मेळावा : 'आँखो देखा हाल'

मार्चमधला आदरणीय स्व. अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचा द्वितीय स्मृतिदिन. पनवेल वाकडीच्या 'शांतीवना'त कुष्ठरोग निवारण समितीने एक मित्र परिवार मेळावा आयोजित केला. मुंबईहून भल्या पहाटे आम्ही सुमारे 50 जण तेथे जाण्यास निघालो. श्री. भाऊसाहेब धामणकर, सौ.शांताबाई धामणकर, प्रकाश मोहाडीकर, काका भागवत व सौ.भागवत, भाल मांजरेकर व स्थानिक कार्यकर्ते यांनी आमचे हार्दिक स्वागत केले. हिरवेगार गवत, झाडे झुडपे, निळसर डोंगर उंच माना करून जणू आम्हाला दर्शन देत होते. नदी खळखळ वाहत जणू आनंदाने हसत होती. येथील छोटे व मोठे प्रसन्न चित्ताने आमचे स्वागत करीत होते. त्या विस्तीर्ण व रम्य परिसराला शांतीवन हे नाव कसे यथार्थ भासत होते. 

सर्व कार्यक्रम शिस्तवार झालाच होता. आधी संस्थेच्या परिसराला उपस्थितांची भेट व कार्याची पाहणी झाली. बरे झालेल्या व उपचार घेत असलेल्या आश्रमवासीयांची ओळख, संस्थेतर्फे तेथे राहणाऱ्या लोकांकडून सुतार काम, माती काम, नुकताच केलेला विटांचा कारखाना, त्यांनीच केलेली दुभत्या जनावरांची निगा व देखभाल-सर्व कौतुकाने व प्रेमाने पाहत होती. कदाचित जगाच्या व नातेवाईकांच्या दृष्टीने उपेक्षित असे हे लोक कुठे भीक मागत राहून आपल्या दुर्दैवी नशिबाला दोष देत खितपत पडले असते, पण येथे त्यांना माणूस म्हणून इतरांसारखेच जगण्याचा हक्क प्राप्त झाला होता! मोठ्या समाधानाने व स्वाभिमानाने ते कार्य करीत होते, आपल्या बांधवांना धडा घालून देत होते. हे सर्व पहात सर्वजण विस्तीर्ण मंडपात परतले. 

श्री.हरिश्चंद्र कांबळी यांनी तो मंडप फारच कलात्मक रीतीने सजविला होता. साधनांची कमतरता असतानाही तो पानाफुलांनी शृंगारला होता. नक्षीदार कपडा टाकून एक लहानसं स्टेज तयार केलं होतं. स्व.अण्णासाहेबांचा मोठा फोटो जणू सजीव होऊन पहात होता. 'खरा एकचि तो धर्म, जगाला प्रेम अर्पावे'-'मुले म्हणजे देव, मुले आहेत राष्ट्राची मोलाची ठेव' असे सुंदर अक्षरांचे लिहिलेले फलक स्फूर्ती देत होते. सातरस्ता येथील साने गुरुजी कथामालेचे संस्थापक डॉ.पी.डी.मनोहर व सौ.मीनाताई मनोहर आपल्या संस्थेच्या मुला-मुलींचे कलापथक घेऊन हजर होते. त्या मुलांनी प्रारंभी आपल्या सुरेल आवाजात स्वागत गीत गाऊन सर्व उपस्थितांचे स्वागत केले व वातावरण प्रसन्न करून टाकले. त्यानंतर कुष्ठरोग निवारण समितीचे अध्यक्ष, या संस्थेसाठी सतत अहोरात्र झटणारे भाऊसाहेब धामणकर यांनी सभेची सुरवात केली. अध्यक्ष श्री.रा.वा.कर्णिक स्थानापन्न होताच भाऊसाहेबांनी कुष्ठरोग निवारण समितीची घडण व कार्याची रूपरेषा निवेदन केली. स्व.अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या ते ध्येयवादी कार्यासाठी कसे वणवण फिरत असत, अनेक क्षेत्रात त्यांनी अवगाहन केले, संशोधन केले, व्यवहारी मार्गदर्शन केले, अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपापली कार्यक्षेत्रे उभारली आणि शेवटी अखेरच्या काळात अण्णांनी ज्या कामाची-कुष्ठरोग निवारण-चिंता वाहिली, त्या कामाला गती देण्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. गेल्या 3 वर्षांच्या कामाचा आढावा सांगितला व कै.अण्णांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रकाशमाई मोहाडीकर यांनी अण्णांच्या ध्येयवादी कार्याचा गौरव केला व संस्थेच्या गतकाळाच्या कामाचे, आलेल्या अडचणींचे व जनतेने दिलेल्या मदतीची सविस्तर माहिती सांगितली. पुढील वर्षाचा संकल्प समजावून दिला. 122 एकर वैराण जमिनीपैकी 30 एकर जमीन लागवडीसाठी उपयोगांत आणून तेथे धान्य, भाजीपाला व चारा याचे उत्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण केली. जनावरे, शेती, बागायत यामुळे दूधदुभते, भाजीपाला, फळफळावळ व तांदूळ यांची पैदास झाल्यामुळे आश्रमवासीयांची कशी सोय झाली व त्यांची उपासमारी दिव्यातून कशी सुटका झाली, त्याचे वर्णन केले. तसेच साने गुरुजी कथामालेतील मुले व कार्यकर्ते मुंबई शहरातील अनेक शिक्षण संस्था व त्यांचे विद्यार्थी यांनी शिबिरे भरवून रस्ता करणे, साफसफाई, झाडे लावणे, झोपड्या बांधणे अशी अंगमेहनतीची अवघड कामे कशी हसत खेळत पुरी केली, याचे वर्णन केले. जमलेली मित्रमंडळी उत्साहित व आनंदित झाली. शेवटी सभेचे अध्यक्ष श्री.कर्णिक यांच्या हस्ते विशेष कामगिरी बजावलेल्या कार्यकर्त्या सौ.दमयंती डोंगळ व तिथे पैरा मेडिकल कार्यकर्ते यांचाही श्रीफळ व गरम ब्लँकेट देऊन सत्कार करण्यात आला. नंतर संस्थेचे कार्यवाह श्री.काका भागवत यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाची माहिती दिली. गेल्या वर्षीचे संकल्प बागा, भाजीपाला, लागवड, जनावरांची खरेदी, झाडे लावणे, विटांचा कारखाना, बालवाड्या चालविणे आणि संस्थेसाठी निधी गोळा करणे वगैरे प्रमुख कार्ये कशी पूर्ण केली, त्याची माहिती दिली व त्यासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. श्री गोविंदराव शिंदे, संस्थेचे संयुक्त कार्यवाह नेरली या गावी अण्णासाहेबांचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी तेथे गेले असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांनी केलेल्या बहुमोल सहाय्याबद्दल त्यांचेही आभार मानले. शेवटी कुष्ठरोगातून मुक्त होवून बरे झाल्यावर तेथेच काम करणारे दामोदर गोरे यांनी आपले अनुभव सांगितले. आपण पूर्ण बरे होऊन कसे माणसात आलो, याची साध्या सोप्या पण भावपूर्ण शब्दांत कहाणी सांगितली, तेव्हा तर सर्वांची मने हेलावून गेली.

Tags: मुले. शेती शांतीवन पनवेल अण्णासाहेब सहस्रबुद्धे Children. #लीला अल्वारिस Farming Shantivan Panvel Annasaheb Sahasrabuddhe #Leela Alwaris weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके