डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1930 मध्ये शिरोड्यातील सत्याग्रहात आचार्य आघाडीवर होते. तिथे अटक करून त्यांना रत्नागिरीच्या तुरुंगात बंदिस्त केले. त्याच वेळी त्यांची विमला ही एकुलती एक मुलगी मॅनिंजायटिस होऊन वारली. तेव्हा त्यांना पॅरोलवर सोडलं गेलं. चार दिवसांत ते परत जेलमध्ये गेले. स्वत:च्या मुलीचं दु:ख त्यांनी सोसलं आणि राष्ट्रकार्यासाठी पुन्हा उभे राहिले. यावरून भाऊंनी म्हणजे माझे पती प्रभाकर जावडेकर यांनी सांगितलेला एक प्रसंग आठवला. आचार्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा आचार्य पुण्याला होते. पुण्याला डॉक्टर भडकमकरांचं औषध वडिलांना चालू होतं. रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा आचार्य वडिलांजवळ थोडा वेळ बसले. नंतर त्यांनी शेजारच्या खोलीत जाऊन लोकशक्तीसाठी अग्रलेख लिहिला आणि मग अंत्ययात्रेच्या तयारीस लागले... लोकमान्य टिळकांच्या नंतर आचार्यांकडे महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व स्वाभाविकपणे चालत आलं. ‘महाराष्ट्राचे रूसो’ म्हणून त्यांचा गौरव होत असे, पण ते कुटुंबाच्या बाबतीतही तेवढेच सजग होते.

मी एकोणीस वर्षांची होते. त्याच वेळी माझ्या वडिलांची बदली अहमदाबादला झाली. तिथे शेजारी राहणाऱ्या चांदोरकरांशी नानांची ओळख झाली. चांदोरकर माझी नणंद सरोज फळणीकरांची मैत्रीण होती. सरोज फळणीकरांनी चांदोरकरांना सांगितलं, ‘‘माझा भाऊ म्हणजे आचार्य जावडेकरांचा मुलगा लग्नाचा आहे. तो बी.ए. झालेला आहे. शिक्षक आहे. आई मॅट्रिक आहे. घरी राष्ट्रभक्तीचं वातावरण आहे. कुळकर्णीही मुलीसाठी स्थळ बघत आहेत. मुलगी खेड्यात जायला तयार असेल तर कुळकर्णींना माझ्या भावाबद्दल विचारा.’’

माझ्या वडिलांनी- नानांनी- मला, ‘चालेल का?’ म्हणून विचारले. मी हो म्हटल्यावर नाना इस्लामपूरला जाऊन घर पाहून आले आणि त्यांनी मुलगा पसंत केला. आता नानांना बघण्याचा कार्यक्रम असा करायचा नव्हता.

त्याच वर्षी बेळगावला मराठी साहित्य संमेलन होते म्हणून मी आणि नाना बेळगावला गेलो होतो. परत येताना आम्ही पुण्याला उतरलो. पुण्यात जावडेकरांचे नातलग सप्रे यांच्या घरी मुंज होती. तिथेच प्रथम मला, माझ्या सासूबार्इंनी पाहिले आणि होकार कळवला आणि आमचे लग्न ठरले.

आता खेड्यात जायचं म्हणून मग खेड्याचा अनुभव घ्यायला हवा आणि लग्नालाही अजून चार-पाच महिने अवकाश होता. म्हणून मी मुद्दामच कशेळीला गेले. तिथे मी शेणात प्रथमच हात घातला आणि जेवलेल्या उष्ट्या पानाखाली शेण लावायला शिकले. कशेळीला मला सडा घालायला मिळाला नाही. कारण कशेळीला घराच्यापुढे आणि मागे खळे, मांडव घातलेले होते. जमीन चोपणे देऊन गुळगुळीत केलेली होती.

गुळगुळीत जमिनीवरून एक गंमत सांगते. कुळकर्ण्यांचं खाणं तसं खूप कमी. परंतु पावलं मोठी आणि रुंद म्हणून आमची आजी गमतीने म्हणायची, ‘जमीन चोपणे घेऊन गुळगुळीत कशाला करायची, जमिनीवर सगळे कुळकर्णी नुसते नाचले तरी चोपण्याचं काम होईल.’

एकंदरीत मी लग्नाच्या आधी खेड्यातला अनुभव घेतला. 4 डिसेंबर 1946 या दिवशी जावडेकरांची सून म्हणून मी गृहप्रवेश केला. त्या वेळी मनात खूप संमिश्र भावना होत्या. एका बाजूला आनंद होता, दुसऱ्या बाजूला भीती आणि दडपण.

लग्नापूर्वीच मला जावडेकर कुटुंबाच्या वेगळेपणाबद्दल कळलं होतं. राष्ट्रकार्याला वाहून घेतलेलं हे घर. आचार्य जावडेकरांसारखे थोर गांधीवादी विद्वान लेखक, लोकशक्ती, नवशक्ती यांसारख्या वृत्तपत्रांचे संपादक माझे सासरे. तर आचार्यांचे ज्येष्ठ चिरंजीव, ज्यांनी देशासाठी काही काळ तुरुंगवास भोगलेला होता ते प्रभाकर जावडेकर माझे पती. मोरारजी देसाई, साने गुरुजी, काकासाहेब गाडगीळ, दादासाहेब मावळंकर, अप्पासाहेब पंत, जयप्रकाश नारायण, तेव्हाचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे वगैरे थोर विचारवंत नेते घरात येऊन गेलेले.

अशा ध्येयवादी, नामांकित घरात आपलं कसं काय जमणार, म्हणून धास्तावलेली मी. माहेरी मुंबईसारख्या शहरात, सरकारी नोकरी करणारी मी इकडे इस्लामपूरला आले तर इथे वीज नाही, पाण्याचा दुष्काळ, साधंसुधं पांढऱ्या मातीचं घर, दारात बांधलेली एक म्हैस. खूप गांगरून गेले होते मी.  

नाही तरी मुलीला दोन आयुष्यं असतात. आई-वडील, बहिणी-भावंडं यांच्यात पहिलं आयुष्य, ज्यामध्ये तिची जडणघडण होते, विचारांची बैठक तयार होते आणि दुसरं आयुष्य सासरचं.

माहेरी आध्यात्मिक विचारांचा पगडा असेल आणि सासरी नेमकी उलट परिस्थिती असेल तर जुळवून घ्यायला लागतं ते मुलीला. सासरी गेल्यावर जेवणातील आवडनिवड, जेवण करण्याची पद्धत, त्याला लागणारं इंधन सर्व काही बदलतं. मी इस्लामपूरला गेल्यावर तर सर्वच बदल स्वीकारले.

पहिली गोष्ट म्हणजे इस्लामपूरला वीज नव्हती. काचेचा कंदील, स्टँड, चिमणी असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते. आमचं घर माडीचं, पाच-सहा खोल्याचं. दोन जिने होते. त्यामुळे संध्याकाळ झाली की काचा पुसून वाती कापून सर्व तयारी झाली म्हणजे प्रत्येक खोलीत चिमणी लटकवायची. नुकतंच दुसरं महायुद्ध संपलेलं होतं. त्यामुळे रॉकेलही भरपूर मिळत नसे. आजच्या काळात एक दिवस वीज बंद असेल तर आपण केवढा आवाज उठवतो. आजही कित्येक घरात वीज नाही, याचं वाईटही वाटतं. असो...

मला आठवतं, लग्न झालेल्या पहिल्या दिवशी जावडेकरांच्या घरात स्वयंपाकघरात मी उभी होते. तेवढ्यात माडीवरून काही भांडणाचा आवाज आला. मी हळूच वन्संना त्याबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, ‘अगं, तो आपल्या शंकरमामांचा आवाज आहे. चर्चा रंगात आली असेल. चल, आपण त्यांना चहा घेऊन माडीवर जाऊ.’

घरी सगळेच आचार्यांना मामा म्हणत. आम्ही माडीवर गेलो. माडीवर मध्यभागी आचार्य बसलेले. आम्ही वर येताच सगळ्या चर्चा, वाद एकदम थांबले. अजूनही मामांची ती मूर्ती मला स्पष्ट आठवते. मामा पायांची मांडी घालून बसले होते. मांडीवर उशी. उशीवर दोन्ही कोपरं ठेवलेलं. लुकलुकणारे पण तेजस्वी डोळे. ओठांवर मोठ्या मिशा आणि त्यांच्या आजूबाजूला चार-पाच लोक बसलेले.

मला आचार्य म्हणाले, ‘बस लीला.’ आणि सर्वांना माझी ओळख करून दिली. ‘ही आमच्या प्रभाकरची पत्नी. मुंबईच्या प्रो.वि.ह.कुळकर्णींची पुतणी, मॅट्रिक आहे. थोडंफार शास्त्रीय संगीत शिकलेली आहे. आज रात्री तिचं गाणं आहे. तुम्ही सर्वजण तिचं गाणं ऐकायला या.’ मग रात्री गाण्याची मैफिल झाली. मी ‘पूरिया’ राग गायले होते. सर्वांनी कौतुक केलं.

आचार्यांच्या कौतुकपर शब्दांनी माझ्या मनातील भीती एकदम नाहीशी झाली. वरून जरा उग्र वाटणारे आचार्य किती आपलेपणाने माझ्याशी बोलले. पुढच्या आयुष्यात वरून कडक पण आतून मऊ असे अनुभव आचार्यांबाबत मला बऱ्याच वेळा आला.

माझ्या लग्नाच्या वेळची आणखी एक आठवण म्हणजे आमच्या लग्नाचं जेवण. त्या वेळी साखर मिळत नव्हती. ते रेशनचे दिवस होते. त्यामुळे वीस-पंचवीस पानांच्यावर जेवण घालायला बंदी होती आणि आचार्य काटेकोरपणे कायदा पाळणारे होते. मग दोन रविवारी अगदी घरोब्याची माणसं जेवायला बोलावली. जेवायला पक्वान्न होतं गुळाचे बुंदीचे लाडू. भाताऐवजी ज्वारीच्या कण्या. पण असं जेवण देणाऱ्या आणि घेणाऱ्यालाही काही वेगळं वाटलं नाही. उलट कायदा मोडत नाही याचा अभिमानच होता.

आचार्य जावडेकर हे व्यापक आणि गंभीर आशय सार्थ करणारं, एक संपन्न आणि सौम्य असं स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्त्व होतं. संसारासाठी लागणारी मुख्य गोष्ट म्हणजे पैसा. या बाबतीत आचार्य अगदीच अलिप्त होते. घरात सोनं-नाणं आचार्यांच्या वडिलांमुळे आलं होतं. आचार्यांचे वडील रावसाहेब जावडेकर हे मलकापूर संस्थानच्या महाराजांचे खाजगी चिटणीस होते. ते पदवीधर होते. त्यांना जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली होती. नामदार गोखले, लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षणाचे प्रवर्तक प्रो.अण्णासाहेब विजापूरकर यांच्याशी रावसाहेबांचा निकटचा संबंध होता.

रावसाहेबांना संस्थानिक राजकारण मानवलं नाही. त्यामुळे ते मलकापूर सोडून इस्लामपूरला येऊन राहिले. त्यांचा रुईला सात एकरांचा मळा होता. रुईच्या शेतातून वर्षाला 800 रुपये फाळा आणि गुळाच्या दोन ढेपा येत असत.

आचार्यांच्या आई लवकर वारल्या. आई नसल्यामुळे आचार्यांच्या आजीने त्यांना सांभाळलं. आचार्यांच्या वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न खूप शेतीवाडी असलेल्या विनायकराव कशाळकर यांच्याशी केलं, पण त्या लवकर वारल्या. तेव्हा त्यांची मुलं खूपच लहान होती. सरोज, मुलगा आनंद आणि कमल. बापूराव कशाळकरांनी दुसरं लग्न केलं नाही. मग या छोट्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी मामींनी म्हणजे माझ्या सासूबार्इंनी घेतली. नणंदेची, विनाआईची लेकरं म्हणून स्वत:च्या मुलांपेक्षाही त्यांचे जास्त लाड केले. ती मुलं आचार्यांना मामा म्हणत, म्हणून मग आचार्य सगळ्यांचेच मामा झाले.

लग्न झालेल्या मुलीचा त्या काळी सुरुवातीला सासूशीच जास्त संबंध येई. सासूबाई म्हणजे मामी, त्या वेळच्या मॅट्रिक पास होत्या. दिसायला सुंदर होत्या. नाजूक बांधा, मोठा अंबाडा घालायच्या. त्यांचं नऊवारी साडी नेसणंही सुटसुटीत असे. त्यांची खादीची साडी आताच्या पलंगपोसापेक्षाही थोडी जाडच होती. ती साडी धुऊन पिळणं, बापरे खरंच त्यांची कमाल होती. मला प्रश्न पडे, हे त्यांना पेलवतं कसं? जमतं कसं? आपल्याला जमेल का? पुढे पुढे खादीच्या नऊवारी साड्या मिळणं कठीण झालं. त्या वर्ध्याहून मागवाव्या लागत. घरातल्या चादरी, पलंगपोस, मुलांचे कपडे, भाऊंचं जाकीट पायजमा वगैरे सर्वच खादीचं होतं. मी लग्नाच्या वेळी खादीच्या तीन साड्या घेतल्या होत्या. तेव्हा टाकलेल्या पहिल्या पावलाचं मला खूप मोठं समाधान होतं.

आचार्य काँग्रेसचे होते. त्यांचा बराचसा काळ तुरुंगात गेल्यामुळे संसाराची, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यत्वे मामींच्यावर होती. 1942 साली ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी धरपकड होईल अशी शक्यता वाटू लागली. त्या वेळी मामींनी चाळीस रुपये तोळ्याने पंचवीस तोळं सोनं आणि अकरा आणे तोळाप्रमाणे चांदी विकून आलेले सोन्याचे 1000 रुपये आणि चांदीचे 1000 रुपये बँकेत ठेवले. आचार्यांना पकडलं आणि दंड भरावा लागला तर, म्हणून मामींनी आधीच दूरदर्शीपणाने तरतूद करून ठेवली होती. मामा-मामी दोघेही स्थितप्रज्ञ होते.

1930 मध्ये शिरोड्यातील सत्याग्रहात मामा आघाडीवर होते. तिथे अटक करून त्यांना रत्नागिरीच्या तुरुंगात बंदिस्त केलं. त्याच वेळी त्यांची विमला ही एकुलती एक मुलगी मॅनिंजायटिस होऊन वारली. आचार्यांना पॅरोलवर सोडलं गेलं. चार दिवसांत ते परत जेलमध्ये गेले. स्वत:च्या मुलीचं दु:ख त्यांनी सोसलं आणि राष्ट्रकार्यासाठी ते पुन्हा उभे राहिले. यावरून भाऊंनी म्हणजे माझे पती प्रभाकर जावडेकर यांनी सांगितलेला एक प्रसंग आठवला.

आचार्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा आचार्य पुण्याला होते. पुण्याला डॉक्टर भडकमकरांचं औषध वडिलांना चालू होतं. रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा आचार्य वडिलांजवळ थोडा वेळ बसले. नंतर त्यांनी शेजारच्या खोलीत जाऊन लोकशक्तीसाठी अग्रलेख लिहिला आणि मग अंत्ययात्रेच्या तयारीस लागले.

लोकमान्य टिळकांच्या नंतर आचार्यांकडे महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व स्वाभाविकपणे चालत आलं. ‘महाराष्ट्राचे रूसो’ म्हणून त्यांचा गौरव होत असे, पण ते कुटुंबाच्या बाबतीतही तेवढेच सजग होते.

आचार्यांचा बराचसा काळ तुरुंगात गेला. त्यांचे वडील हयात असेपर्यंत संसाराची जबाबदारी आचार्यांवर मुळीच नव्हती. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी मामा पुण्याहून एका तुकडीबरोबर सत्याग्रहाला गेले आणि कुटुंब इस्लामपूरला मामांच्या बहिणीच्या घरी कशाळकरांकडे आलं. आचार्य तुरुंगातून नियमित घरी पत्रं लिहीत. तुरुंगात असल्यामुळे कुटुंबाविषयीची, मुलांविषयीची कर्तव्यं आपण स्वत:  पार पाडू शकत नाही, याबद्दलची त्यांची खंत पत्रांतून जाणवते. तेवढीच काळजीही जाणवते.

स्वत:ची मुलं आणि बहिणीची मुलं यांना कोणत्याही प्राथमिक शाळेत न घालता, राष्ट्रीय शिक्षण दिलं जावं असं मामांना वाटत होतं. म्हणून मामांनी पुण्याच्या टिळक विद्यापीठातील श्री.रामभाऊ गोडबोले या विद्यार्थ्याला इस्लामपूरला बोलावून घेतलं.

रामभाऊ गोडबोले हे मूळचे रत्नागिरीचे. गोडबोले गुरुजी तीन वर्षं इस्लामपूरला आमच्याकडे राहिले. त्यांनी मुलांचा आठवीपर्यंतचा अभ्यास करून घेतला. मुलांना पोहायला शिकवलं. मुलांच्यावर राष्ट्रप्रेमाचे उत्तम संस्कार केले. हेच गोडबोले गुरुजी पुढे स्वामी स्वरूपानंद म्हणून प्रख्यात झाले.

आचार्यांची मुलांच्या शालेय शिक्षणावर बारकाईने नजर असायची. मॅट्रिकच्या वर्षात तर आचार्यांनी जवळजवळ सर्वच विषय मुलांना शिकवले. इंग्रजी, गणित शिकवतच, त्याशिवाय इतिहास, भूगोल, संस्कृत, मराठी हेही ते शिकवत. शाळेतून घरी आल्यावर मुलांना अभ्यासाचा सगळा वृत्तांत मामांना सांगावा लागे. मामांची त्यावर करडी नजर असे. त्याबद्दल माझ्या पतींनी- भाऊंनी- सांगितलेला एक प्रसंग आठवतो.

एकदा मराठीच्या एका धड्याचा थोडा विपर्यस्त अर्थ शिक्षकाने सांगितला. तो अर्थ मुलाने घरी येऊन सांगितला. आचार्यांनी स्पष्टपणे शिक्षकांनी सांगितलेला तो अर्थ कसा चुकीचा आहे ते सांगून मुलांना बरोबर अर्थ सांगितला.

दुसऱ्या दिवशी मुलांनी सर्व गोष्ट शिक्षकांना सांगितली. मग ते शिक्षक घरी येऊन प्रत्यक्ष आचार्यांना भेटले. सर्व गोष्टी नीट समजून घेतल्या आणि मग आचार्यांना विनंती करून शाळेत घेऊन गेले. आचार्यांनी स्वत: संपूर्ण धडा मुलांना नीट समजावून सांगितला.

जावडेकरांच्या घरी मुलं लहान असताना आठवड्यातून एकदा ‘सद्‌बुद्धी दिन’ पाळला जायचा. म्हणजे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर मौन पाळायचं. कुणी कुणाशी बोलायचं नाही. काही सांगायचं असल्यास पाटीवर लिहून सांगायचं. आचार्यांचं म्हणणं असं की यामुळे आपल्या चुका समजून येतात. त्याच्यावर आपला स्वत:चा विचार होतो.

मामा दिसायला साधे, राहणीमानसुद्धा एकदम साधं. कायम त्यांनी एकच कोट वापरला. व्याख्यानाला जायचं असलं की, आदल्या रात्री मामी तो कोट धुऊन वाळत टाकत. आचार्यांच्या मुलांनाही त्यांच्या आचार-विचाराने वागायला कधीच कमीपणा वाटत नसे. त्यामुळेच इतर विद्यार्थी फुल पँट, मॅनिला अशा पोशाखात कॉलेजात येत, परंतु आचार्यांची मुलं खादीची हाफ पँट आणि हाफ शर्ट वापरत असत.

दोन्ही मुलं शिकली, भाऊ-प्रभाकर जावडेकर एम.एड. झाले आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत झाले. दुसरे चिरंजीव बाळासाहेब एम.बी.बी.एस., एम.एस. झाले.

बाळासाहेबांना दम्याचा त्रास होता. फळणीकर यांनी मॅट्रिकनंतर लगेच त्यांना अहमदाबादला नेलं. त्यांच्या शिक्षणाचाही काही भार त्यांनी उचलला. बाळासाहेब हे जात्याच हुशार आणि दिसायला देखणे होते. ते जामनगरला स्थायिक झाले. पुढे बाळासाहेबांनी वडिलांवर ‘आचार्य जावडेकर माय फादर’ हे पुस्तक लिहिलं. त्यांची दोन्ही मुलं एम.एडी., एम.एस. झाली आहेत.

माझ्या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी मला मामांनी माडीवर बोलावून घेतलं आणि विचारलं, ‘लीला तुला पुढे शिकायचं आहे काय?

मी पटकन उत्तर दिलं, ‘अवश्य, पदवीधर व्हायचं आहे, पण इथे कॉलेज कुठे आहे?’ ते म्हणाले, ‘त्याची काळजी कशाला? अण्णासाहेब कर्व्यांनी सोय केली आहे तुमची. बाहेरून बी.ए.ला बसता येईल.’

झालं! दुसऱ्याच दिवशी कॉलेजचा अभ्यासक्रम, फॉर्म वगैरे मागवून घेण्याबद्दल लेखनिकाला सांगितलं. केवढा त्यांचा उत्साह, शिकण्याची केवढी हौस.

मला पुढच्या शिक्षणासाठी आचार्यांनी विचारलंच, परंतु पंधरा-वीस दिवसांनी गोरेगावला राष्ट्र सेवादलाचं शाखाप्रमुखां- साठी दहा दिवसांचं शिबिर होतं तिथे जाण्याबद्दलही विचारलं. काहीतरी वेगळं करायला मिळेल म्हणून मी लगेच होकार दिला.  राष्ट्र सेवादलाच्या त्या शिबिरानं मला एक वेगळंच जीवन दिलं. अनुताई लिमये, मृणाल गोरे, भाऊसाहेब रानडे, केशव गोरे यांच्या सान्निध्यात राहून माझी इस्लामपूरला शाखा घ्यायची तयारी झाली. पुढे दोन वर्षं मी इस्लामपूरला शाखा घेत होते. कधीतरी आचार्य माझ्या शाखेवर येऊन मी शाखा कशी घेते ते पाहून जात.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्या दिवशी रात्री 12 वाजता तिरंगा फडकणार होता. हा ध्वज कोणी फडकवायचा यासाठी इस्लामपूरच्या सेवादलाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. इस्लामपूरच्या आसपासच्या खेड्यांत सेवादलातले सैनिक पाठवायचे. कारण ध्वजाची विशिष्ट घडी घालणं, दोरी लावणं, सहज वर चढवणं आणि तो ध्वज फडकवणं याचं शिक्षण आणि सराव सेवादलाच्या सैनिकांना होता.

मी आणि दुसरा एक सैनिक बबन जाधव आमची निवड रेठरे धरण इथं झाली. मी, बबन जाधव आणखी इस्लामपूर गावातील काही लोक रेठरे इथं पोहोचलो. सगळीकडे अंधार होता. चावडीवर गावातील खूप लोक हजर होते. कंदिलाच्या प्रकाशातच आम्ही बरोबर रात्री 12 वाजता झेंडा फडकविला. कुणाला टाळी वाजवण्याचंही लक्षात आलं नाही. नि:शब्द होते. परंतु सगळ्यांची मनं मात्र स्वातंत्र्याच्या कल्पनेनं आनंदानं उल्हसित झाली होती. मी तर रोमांचित झाले होते.

बबन जाधव याने पुढे गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतला. पोर्तुगीज पोलिसांचा छळ सहन करून धैर्याने लढा दिला.

दोन-तीन महिन्यांनी कर्वे विद्यापीठाचा अभ्यासक्रम आला. माझी शिकण्याची तयारी सुरू झाली. आचार्य म्हणाले, ‘हा अभ्यासक्रम नीट वाच आणि कुठल्या विषयात बी.ए. करायचं ते ठरव.’

मला काय उत्तर द्यावं कळेना, इंग्रजी कोण शिकवणार? मराठी घेतलं तर माहेरहून मदत होईल म्हणून मी म्हटलं, ‘मी मराठी घेईन.’ 

पण त्यावर मामा म्हणाले, ‘तू इतिहास घे. आपल्या घरात इतिहासाची खूप पुस्तकं आहेत. शिवाय मी स्वत: तो विषय शिकवेन.’

मी मनात म्हटलं, इतिहासात काय शिकवण्यासारखं असतं? सर्व तर आपणच वाचायला हवं ना?

तेवढ्यात मामा म्हणाले, ‘तुला भारताचा सांस्कृतिक इतिहास समजून घ्यावा लागेल आणि त्याच वेळी आपल्या देशाच्या पार्श्वभूमीवर निरनिराळ्या देशांत काय चाललं आहे हेही माहीत करून घ्यायला हवं.’

भारताचा इतिहास अभ्यासताना ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका या सर्वच देशांचा समकालीन इतिहासाचा तौलनिक अभ्यास करायचा असतो हे तेव्हा मला कळलं. मी मग बी.ए.ला इतिहास आणि अर्थशास्त्र घेतलं. दररोज सकाळी अकरा वाजता मामा मला माडीवर शिकण्यासाठी बोलवत. इतिहास आणि राज्यशास्त्र हे आचार्यांचे विषय, पण त्यांनी मराठीही मला शिकवलं.

खरं म्हणजे, मामा मला अभ्यासासाठी वर बोलावत तेव्हा घरात स्वयंपाकाची गडबड असे. मग मला वाटे मी जबाबदारी टाकून माडीवर कशी जाऊ? तेव्हा मामी म्हणत, ‘ते म्हणतील तेव्हा आपण गेलं पाहिजे. अगं, मलासुद्धा ते असं बोलावत. नणंदेवर सगळी कामं टाकून मी कशी जाऊ शिकायला? असा प्रश्न पडायचा. पण मग हे म्हणत, ‘मला जेव्हा बरं असेल, दम्याचा त्रास नसेल तेव्हाच तुम्ही यायला पाहिजे. घरकामासाठी एखादी बाई ठेवा. घरकामापेक्षा शिक्षण महत्त्वाचं आहे.’ सासूबार्इंच्या या बोलण्यामुळे मग मी मामा बोलावतील तेव्हा जाऊ लागले. मामींचे सोळाव्या वर्षी लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्या मांडवातून परीक्षेला गेल्या. लग्नानंतर त्या मॅट्रिक झाल्या.

दुसऱ्या वर्षी मला सुबोधच्या जन्माची चाहूल लागली. मग खूप झटपट अभ्यास केला, पण वर्ष वाया जाऊ दिलं नाही. सुबोधच्या जन्मानंतर लहान सुबोधला मामी सांभाळत. कधीकधी सुबोधला सांभाळत सांभाळत मामा मला शिकवायचे. या कष्टाचं फळ मला मिळालं आणि मी बी.ए. झाले. एस.एन.डी.टी. विद्यापीठामध्ये जी.ए. पदवीऐवजी बी.ए. पदवी माझ्या वेळेपासून सुरू झाली. मी परीक्षेच्या आधी महिनाभर माहेरी मुंबईला जात असे. मीरा भाटवडेकरकडून नोटस्‌ घेत असे. इंग्लिशचा अभ्यास आम्ही दोघी एकत्र करत असू. मी. बी.ए.ला इतिहास विषयात पहिली आले. मला नारायण बापू जोशी पारितोषिक मिळालं. पदवीदान समारंभ मोठा नव्हता, पण मी स्टेजवर बसले होते आणि राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक मिळालं याचा खूप आनंद झाला. त्या वेळी मला 35 रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते. मी त्या पैशातून मामांसाठी कातडी बॅग आणली. ती बॅग त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वापरली. सासूबार्इंना पेन आणलं. विनायक कशाळकरांना स्वेटर आणला होता.

(शब्दांकन : वृषाली आफळे)

Tags: वृषाली आफळे राष्ट्र सेवादल प्रभाकर जावडेकर लीला जावडेकर आचार्य जावडेकर Vrushali Aphale Rashtra Seva Dal Javadekar Leela Javadekar Prabhakar Acharya Javadekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके