डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझे शिक्षण आणि माझ्या मैत्रिणी

गाडी सुटता सुटता बायकांच्या डब्यात काही टारगट तरुण शिरत. आणि टोमणे मारणे सुरू करत. एक दिवस आम्ही दोघींनी ठरवलं, साखळी ओढायची. दुसरे दिवशी आम्ही साखळी ओढली. गाडी थांबली.  शेजारच्या डब्यातून गार्ड आला. ‘काय झालं? काय झालं?’ म्हणून दंगा झाला. मग गार्डनी त्या तरुणांना खाली उतरवलं. पुन्हा गाडी सुरू झाली. असा प्रयोग आम्ही दोन-तीन वेळा केला. नंतर तरुणांचा दंगा कमी झाला. कमीत कमी आम्ही दोघी असताना तरी ते घाबरत असावेत, कारण त्या वेळी ‘फिअरलेस नादिया दिसतात’ (लीला चौबळ व लीला जावडेकर) असे शेरे आम्ही ऐकले होते. ‘फिअरलेस नादिया’ ही त्या वेळची स्टंट चित्रपटातील प्रसिद्ध नायिका होती.

कुळकर्णी कुटुंब मोठं झालं. तशी जागा लहान पडायला लागली म्हणून वेगळी बिऱ्हाडं झाली. माझे वडील नाना आणि अप्पाकाका यांच्या बदल्या झाल्या. नाना लाहोरला आणि आप्पा मद्रासला काही काळापुरते होते. नंतर नानांची बदली गुजरातला अहमदाबादला झाली. अहमदाबादला गुजरातीमध्ये शिक्षण म्हणून नानांनी बडोद्याला बिऱ्हाड केलं होतं. ‘चिमणाबाई हायस्कूल’मध्ये मराठी भाषा विषय शिकवला जायचा म्हणून उषाने आणि प्रभाने तिथे प्रवेश घेतला.

माझी मात्र दुसरी भाषा फ्रेंच होती. म्हणून मी फ्रेंच असलेल्या ‘न्यू एरा हायस्कूल’मध्ये प्रवेश घेतला. ती शाळा मुलांची होती. शाळेत मी एकटीच मुलगी होते. तेव्हा मी खूप धीट होते. याच शाळेतून मी 1946 मध्ये मॅट्रिक झाले. माझं गणित इतकं कच्चं होतं की, क्लास लावला होता म्हणून मी गणितात कशीबशी पास झाले.

नानांची बदली परत मुंबईला झाली आणि आम्ही पुन्हा ‘कमला सदन’ म्हणजे आजच्या ‘भागीरथी प्रसाद’मध्ये राहायला आलो. मुंबईला आल्यावर मी शॉर्टहँड आणि टायपिंग शिकले. माझ्या वडिलांनी मला ‘इंडियन स्टोअर डिपार्टमेंट’मध्ये नोकरीला लावलं. मी दीड वर्ष नोकरी केली. त्या वेळी मिळणाऱ्या पगारातून मी माझं अर्धवट राहिलेलं संगीताचं शिक्षण पुन्हा सुरू केलं. शाळेत शिकत असताना मी व्यासांकडे शास्त्रीय संगीत शिकत होते. तेव्हा संगीताच्या दोन परीक्षाही दिल्या होत्या.

नोकरी लागल्यानंतर मी नारायणराव व्यासांचे मेहुणे वसंतराव राजोपाध्ये यांच्याकडे संगीत शिकायला लागले. पस्तीस रुपये फी होती. वसंतराव राजोपाध्ये यांनी माझी ‘विशारद’पर्यंत तयारी करून घेतली. पण मी विशारदची परीक्षा दिली नाही. अर्धा- पाऊण तास मी ख्याल म्हणू शकत असे. गाण्यामुळे मला हळूहळू पेटीही वाजवायला यायला लागली.

आमच्या शाळेच्या ईशस्तवनाच्या आणि स्वागतगीताच्या वेळी मी तबला वाजवत असे. त्या वेळी मुलींनी तबला वाजवणं दुर्मिळ होतं. त्यामुळे मला ‘तबलावाली मुलगी’ म्हणून ओळखत. पुढे लग्न झालं. पण मी संगीताशी फारकत घेतली नाही.

या संगीताचा उपयोग कवितांना चाली लावण्यासाठी केला. संगीत स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना तयार करून पाठवत होते. अनेक बक्षिसं शाळेला मिळवून दिली. एकाच वेळेला शंभर-सव्वाशे मुलं तालासुरात गाणं म्हणायला लागली की कान आणि मन तृप्त होऊ जायचं.

गारगोटीला मौनी विद्यापीठात जे.एल.रानडे होते. त्यांच्यामुळे मी तंबोऱ्याच्या तारा पुन्हा छेडल्या. त्यांच्याकडे मी तीन वर्षं शिकले. आता वयोमानानुसार रियाज नाही, आवाज चढत नाही. पण साधारण पेटी वाजवता येते. त्याचमुळे शुभांगी शेणॉय या मुलीची संगीताच्या परीक्षेची तयारी करून घेतली.

जीवनाच्या मावळतीला असं वाटतं की, संगीत शिक्षणाचा उपयोग मी खूप केला. संगीत शिक्षणामुळे मी चांगली कानसेन झाले. निरनिराळ्या गायक-गायिकांच्या बैठकीचा आनंद लुटू शकले. आजही मनाजोगतं संगीत ऐकायला मिळालं की त्या वातावरणात बुडून जायला होतं. काळ तिथेच थांबतो. संगीत समाधीच लागते. संगीतामुळे माझं जीवन अधिक समृद्ध झालं आहे.

माझं शालेय शिक्षण जनरल एज्युकेशन सोसायटीच्या छबिलदास शाळेत झालं. शाळा सुरुवातीला खांडके बिल्डिंगमध्ये होती. तेव्हा मधल्या सुट्टीत शिपाई ग्रामोफोनवर रेकॉर्ड लावायचा. त्या वेळच्या प्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे यांची ‘क्षण आला भाग्याचा’, ‘बोला अमृत बोला’ ही गाणी ऐकून ऐकून आमची तोंडपाठ झाली होती.

काही वर्षांनंतर आमची शाळा स्वत:च्या मालकीच्या इमारतीत तुळशीपाईप रोडला गेली. ती तीनमजली लांबलचक इमारत होती. शाळेच्या इमारतीला समांतर अशी रेल्वेलाईन होती. लोकल्सचा आवाज यायचा. वर्गात मोठमोठ्या फोटो फ्रेम्स होत्या, त्यांत चालत्या गाड्यांचं प्रतिबिंब पडे. मग आम्ही काही मुली मालगाडीचे डबे मोजत असू. इकडे शिक्षक शिकवत असत. पण आमचं लक्ष तिकडे नसे. आम्ही एकमेकींना खुणा करून किती डबे होते ते विचारत असू आणि दहा मिनिटांच्या सुट्टीत त्यावर चर्चा चाले. ते दिवस शांत होते. लोकलला गर्दी नसे.

आमच्या शाळेच्या त्या वेळच्या मुख्याध्यापिका ताराबाई खेर होत्या. आणि शाळेचे अधीक्षक आर.जी.अक्षीकर होते. त्यांनी मुलींना अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाची सवय लावली. ते स्वत:ही काही छान पुस्तकं वाचून अर्थ वगैरे सांगत. त्या वेळी लक्षात राहिलेलं पुस्तक म्हणजे चार्ल्स डिकन्सचं ‘डेव्हिड कॉपरफील्ड’. डेव्हिड याचा जो छळ झाला ते ऐकून आम्हांला फार दु:ख होई आणि रडूही येई. इतकं त्यांचं वाचन प्रभावी होतं.

माझ्या वडिलांच्यामुळेही माझं वाचन व्हायचं. वामन मल्हार जोशी यांची ‘सुशिलेचा देव’, ‘इंदू काळे, सरला भोळे’ ही पत्ररूप कादंबरी ही पुस्तकं मी वाचली होती. त्यामुळे वामन मल्हार जोशी आमच्या शाळेत आले होते, तेव्हा मी त्यांना आणायला गेले होते. त्यांना व्हिक्टोरियामधून घेऊन आले तेव्हा मला खूप अभिमान वाटला.

एकदा आमच्या वर्गाची सहल वज्रेश्वरीला गेली होती. तिथल्या गरम पाण्याच्या कुंडात आम्ही मुली उतरलो. पण आम्ही पुरेसे कपडे नेले नव्हते. त्यामुळे आयत्या वेळी आमच्या चौधरीबार्इंची नऊवारी साडी एकाचवेळी दोघींनी गुंडाळून घेतली. तो प्रसंग अजूनही आठवतो.

विशेष म्हणजे ट्रीपसाठी आम्ही जी रक्कम नेली होती त्यातील पैसे उरले. ते परत कसे करणार? मग बार्इंनी उरलेल्या पैशाचं दूध घेऊन, त्याचं श्रीखंड केलं. त्याच्याबरोबर दोन दोन पुऱ्या आणून शाळा सुटल्यावर आम्हांला खायला दिल्या. आजच्या जमान्यात ही गोष्ट खोटी वाटेल, पण अशी होती शिक्षकांची नीतिमत्ता! चौधरीबार्इंची अजूनही आठवण येते.

आमची तुकडी अ होती. आम्ही बऱ्याच मैत्रिणी सहा वर्षं एकत्र होतो. इंग्रजी पहिली ते मॅट्रिक. लग्न होऊन सगळ्या मैत्रिणी विखुरल्या. मी मुंबईला येई, तेव्हा त्यांच्या आयांना भेटत असे. माझ्या बऱ्याच मैत्रिणी हुशार होत्या. मला आठवतं शांता भागवत, लग्नानंतरची शांता वैद्य, मॅट्रिकला संस्कृतमध्ये मुलींत पहिली आली होती. तिला यमुनाबाई दळवी स्कॉलरशिप मिळाली होती. त्याचा उपयोग तिला कॉलेजचे पैसे भरायला झाला.

शांता वैद्य मॅट्रिकनंतर फ्रेंच भाषा शिकली होती. तिचे पती धारवाडच्या कॉलेजमध्ये फ्रेंचचे रीडर होते, त्यामुळे तिथे ती फ्रेंच शिकली. पुढे शांताने फ्रेंच नाटकांचे अनुवाद केले. ‘ओझ्याविना प्रवासी’ हे 'A Traveller without luggage’ या फ्रेंच नाटकाचं तिने केलेलं मराठी रूपांतर दूरदर्शनवर खूप गाजलं. त्यात नायिकेची भूमिका भक्ती बर्वेने केली होती. खरं म्हणजे शांताला एका कानाने कमी ऐकायला यायचं, पण तिनं त्यावर मात करीत आपलं करिअर केलं. हुषार पण तितकीच साधी मुलगी म्हणून आम्हांला तिचा अभिमान होता. शांताची सून पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका वीणा सहस्रबुद्धे यांची मुलगी आहे.

जयश्री कर्वे हिचं लग्न ‘स्वस्तिक’ रबर कंपनीच्या मालकांशी झालं. आणि ती जयश्री वैद्य झाली. माझ्या बहिणी लहान होत्या तेव्हा जयश्री माझ्या बहिणींना फुगे आणायची. जयश्री हरहुन्नरी होती. शाळेत असताना नाटकात कामं करायची. जयश्रीने ‘उसना नवरा’ नाटकात काम केलेलं मला आठवतंय.

एकदा आमची महाबळेश्वरला ट्रीप गेली होती. तेव्हा जयश्रीने घोड्यावरून बेधडक रपेट मारली. ते पाहून आम्ही मैत्रिणी थक्क झालो. ती पुण्याला असताना उत्तम बाग तयार करायची. दर वर्षी तिच्या बागेला प्रथम क्रमांक मिळायचा.

आमच्याबरोबर शिकलेली शांता लेले ही नंतर रात्रीच्या मुलींच्या शाळेची मुख्याध्यापिका झाली. विमल पेठे ही अशीच धडपडणारी मैत्रीण. विमल ही त्या वेळच्या तात्या सुळे यांच्या ‘लोकसेना’ या संघटनेची सभासद होती. ती आजची प्रसिद्ध लेखिका मेघना पेठे हिची चुलतबहीण. हुतूतूमध्ये सर्वांची तंगडी ओढून, विजय खेचून आणणारी सुशीला जोगळेकर. प्रमिला संघवी ही लादीवाले जोशी यांची मुलगी. प्रख्यात व्याकरणकार प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांची कन्या इंदू कुलकर्णी आणि शांता वैद्य या दोघी हुशार आणि स्कॉलर होत्या. विमल महंत अत्यंत श्रीमंत मुलगी होती. ती दिसायलाही सुंदर होती. आम्ही सगळ्याजणी अखंड गळ्यात गळे घालून फिरायचो.

आमची शाळा खांडके बिल्डिंगमध्ये होती तेव्हा माझी खास मैत्रीण विमल चौबळ आणि मी शाळेतून फिरत फिरत घरी जात असू. त्यावेळी 10 पैशाला 10-12 शंकरपाळे मिळत होते. ते कागदात बांधून आम्ही दोघी खात असू. त्यावेळी आम्हांला दिवस कमी वाटायचा म्हणून की काय आम्ही एकमेकींना पत्र लिहीत असू. ती मला ‘निर्मला’ आणि मी तिला ‘मंगला’ असं उद्देशून पत्र लिहीत होतो.

आमची एक मैत्रीण उषा चितळे, तिचे वडील मुलांच्या छबिलदास हायस्कूलचे हेडमास्तर होते. ते जुन्या वळणाचे होते. उषाने पावसात भिजू नये म्हणून ते पुरुषी मोठ्ठी छत्री तिला घ्यायला लावायचे. मोठा पाऊस पडला की, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मुली कितपत भिजल्या ते पाहायला येत. बऱ्याच मुली भिजल्या असतील तर शाळेला सुट्टी मिळायची.

मग आम्ही ज्या मुली भिजल्या नसतील त्यांना ओढत नळावर न्यायचो आणि मुद्दाम पाणी उडवून भिजवायचो. मग सुट्टी मिळाली की रस्त्याने एकमेकींच्या अंगावर अधिकाधिक पाणी उडवण्याचा खेळ खेळत एकमेकींना भिजवत घरी जायचो. कधीकधी एखादी छोटी ठिकरी पायाने उडवत उडवत घरापर्यंत जायचो. आता आहे का टाप रस्त्यावर असे खेळत खेळत घरी जाण्याची? गेले ते दिवस.

मी नोकरीला लागले, तेव्हा शेजारच्याच इमारतीत टेलिफोन ऑपरेटर म्हणून माझ्याच वर्गातील लीला चौबळ नावाची मुलगी नोकरीला लागली. ती आमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये नव्हती, पण नोकरीच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आणि तिथून आमच्या खऱ्या मैत्रीला सुरुवात झाली. अजूनही आमची मैत्री टिकून आहे.

त्या काळी आम्ही दोघी एकत्र दादरमधील शंकराच्या देवळावरच्या पुलावरून स्टेशनवर जात असू. गाडी ज्या प्लॉटफॉर्मवर लागायची त्या प्लॉटफॉर्मवर पुलावरून भरभर उतरून पुलाजवळच येणाऱ्या बायकांच्या डब्यात कसेबसे शिरत असू. गाडी सुटता सुटता बायकांच्या डब्यात काही टारगट तरुण शिरत. आणि टोमणे मारणं सुरू करत. एक दिवस आम्ही दोघींनी ठरवलं, साखळी ओढायची.

दुसरे दिवशी आम्ही साखळी ओढली. गाडी थांबली. शेजारच्या डब्यातून गार्ड आला. ‘काय झालं? काय झालं?’ म्हणून दंगा झाला. मग गार्डने त्या तरुणांना खाली उतरवलं. पुन्हा गाडी सुरू झाली. असा प्रयोग आम्ही दोन-तीन वेळा केला. नंतर तरुणांचा दंगा कमी झाला. कमीत कमी आम्ही दोघी असताना तरी ते घाबरत असावेत, कारण त्या वेळी ‘फिअरलेस नादिया दिसतात’ (लीला चौबळ व लीला जावडेकर) असे शेरे आम्ही ऐकले होते. ‘फिअरलेस नादिया’ ही त्या वेळची स्टंट चित्रपटातील प्रसिद्ध नायिका होती.

लीलाच्या लग्नाला मी हजर नव्हते, पण माझ्या लग्नाला ती इस्लामपूरला आली होती. कारण तिची सख्खी बहीण त्यावेळी इस्लामपूरला राहत होती. लीला चौबळ लग्नानंतर सुहासिनी प्रभाकर कुळकर्णी झाली. गंमत अशी की मी माहेरची लीला कुळकर्णी लग्नानंतर लीला प्रभाकर जावडेकर झाले. तिच्या- माझ्या नवऱ्याचं नाव प्रभाकर. लीलाने तिच्या नणंदेच्या  सांगण्यावरून मुलाचं नाव सुबोध ठेवलं. त्यामुळे आमच्या मुलांचं नावही एकच आहे- सुबोध.

अजूनही आम्ही एकमेकींना रोज फोन करतो. लीला चौबळला तीन सुंदर मुली आहेत. संध्या कर्णिक, ज्योती सामंत, चंदा आठल्ये. संध्या कर्णिक कवयित्री आणि लेखिका आहे. संध्या ही गोल्ड मेडॅलिस्ट आहे. सरोजिनी वैद्य यांची ती आवडती शिष्या होती. तिची ‘दिवा कुणाचा तेवत राही’ आणि ‘कुणास्तव कुणीतरी’ ही दोन पुस्तकं प्रसिद्ध आहेत. दुसरी मुलगी ज्योती सामंत हिची स्वत:ची लॅब आहे. तिचा नवरा सतीश हा एरॉनॉटिकल इंजिनियर आहे. तो माझा मुलगा सुबोधचा गारगोटीचा मित्र आहे.

लीलाची तिसरी मुलगी चंदा आठल्ये हिने नर्सिंगचा कोर्स केला आहे. ती नियमाने वर्षातून एकदा ‘आनंदवन’, ‘हेमलकसा’ इथे आमटे कुटुंबात राहून महिनाभर कुष्ठरोग्यांची सेवा करते आणि प्रकाश आमटे यांना रुग्णसेवेत नर्सिंगची मदत करते. अमेरिकन लोकांच्या देणग्या आणि लागणारी मेडिकल आयुधं घेऊन आमटे यांच्याकडे जाते. तिचं ‘आनंदवनी’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. 

चंदा आठल्येच्या पतीने फिजिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. चंदाचा मुलगा डॉक्टर झाला आहे. प्रॅक्टिस करण्यापूर्वी इंटर्नशिप करावी लागते. चंदाच्या मुलाने आनंदवन, हेलकसा आणि अभय बंग यांच्याकडे इंटर्नशीप केली आहे. लीलाच्या तिन्ही मुली कर्तबगार असूनही दिलदार आणि सोशलही आहेत. म्हणूनच न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी या तिन्ही मुलींची आई कोण आहे हे बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. लीलाचा मुलगा सुबोध हा कॉम्प्युटर इंजिनिअर असून त्याचा कॉम्प्युटर विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. त्याला त्याची पत्नी संगीताची साथ आहे.

लीला चौबळ आणि मी दोघी गांधीजींच्या व्याख्यानांना जायचो. दर शनिवार, रविवारी हिंदीच्या क्लासला जाऊन आम्ही हिंदीच्या दोन परीक्षा दिल्या. लीला 25-30 वर्षं मधुमेहाशी टक्कर देऊन ताठ मानेनं उभी आहे.

मैत्रिणींच्याही बाबतीत मी भाग्यवानच आहे. या सर्व मैत्रिणींच्यामुळे माझं आयुष्य सुखकर आणि आनंदमयी झालं. ही मैत्री माझ्या जीवनातील आनंदाचा मोठा ठेवा आहे.  

(शब्दांकन : वृषाली आफळे)  

Tags: वृषाली आफळे लीला जावडेकर वामन मल्हार जोशी डेव्हिड कॉपरफील्ड  चार्ल्स डिकन्स vrushali afale Vrushali Aphale Leela Javadekar Waman Malhar Joshi David Copperfield Charles Dickens weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके