डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जे.एल.रानडे आणि बाबूराव जोशी यांचं एक वेगळं नातं या मौनी विद्यापीठाशी जडलेलं होतं. ते म्हणजे चित्राबाई रानडे सरांच्या मानसकन्या आणि नाईकसाहेब हे बाबूराव जोश्यांचे मानसपुत्र.

नाईकसाहेबांच्या लग्नात रानडे सरांनी चित्राबार्इंच्या वडिलांची आणि बाबूराव जोशींनी नाईकसाहेबांच्या वडिलांची भूमिका वठवली होती.

तात्यांच्या बोलण्यात विनोद पेरलेला असायचा. त्यांनी सांगलीला बंगला बांधला होता. इस्लामपूरहून आम्ही त्यांना भेटण्यासाठी सांगलीला जात असू. सांगलीला त्यांच्या घरासमोरील बंगल्याचं नाव ‘निवांत’ होतं. यावरून एकदा ते मला म्हणाले, ‘लीलाताई, आम्ही आमच्या घराला ‘ललकारी’ नाव दिलं आणि त्यांच्या ‘निवांत’ला आमची ‘ललकारी’ ठोकली.’

कुलगुरू

आचार्य भागवत नेहमी म्हणत, ‘मी जरी या विद्यापीठाचा कुलगुरू असलो तरी तुमच्या वसतिगृहाचे आणि शिक्षणाचे खरे कुलगुरू जे.पी.नाईक हेच आहेत.’ मौनी विद्यापीठाचा कणा, आत्मा म्हणजे जे.पी.नाईक. साधं व्यक्तिमत्त्व, खादीची हाफ पँट, खादीचा हाफ शर्ट अशा साध्या वेषात ते नेहमी विद्यापीठाच्या आवारात काम करताना दिसत.

नाईकसाहेब अत्यंत विद्वान होते. ते स्वत: एफ.वाय.ला असताना इंटरच्या मुलांना शिकवत. त्यांची पुस्तकं एम.ए.च्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होती. ते सगळ्यांशीच आपुलकीने बोलत. खांद्यावर हात ठेवून सहज विचारत, ‘‘काय प्रभाकर, कसं वाटतं?’ ‘काय लीला, आवडलं की नाही गारगोटी?’ या त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळेच विद्यापीठ म्हणजे एक कुटुंब वाटे.

कायदेभंगाच्या चळवळीत धारवाड जिल्ह्यात बल्लारी येथे नाईकसाहेब दोन वर्षं कारावासात होते. तेथे म.गांधींना शिक्षणतज्ज्ञ म्हणून ते भेटले आणि गांधीजींच्या निकटवर्तीयांपैकी एक झाले. त्यांचा गांधीजींबद्दलचा आदर मौनी विद्यापीठात प्रतिबिंबित होत असे.

मला एक प्रसंग आठवतो, नाईकसाहेब आणि विद्यापीठाचे एक डायरेक्टर सावे सर सुरुवातीच्या काळात एकत्र राहत होते. एकदा नाईकसाहेब विद्यापीठाच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांना परतायला खूप रात्र झाली. एक वाजून गेला असेल. एवढ्या रात्री सावे सरांना त्रास नको म्हणून नाईकसाहेब फुले सदनात एका गोणपाटावर रात्रभर झोपले. इतका ते इतरांचा विचार करत.

मौनी विद्यापीठाच्या परिसराची, खेड्यातील ग्रामपंचायतीप्रमाणे सर्व देखभाल करण्यासाठी निवासी कर्मचारी, वसतिगृहातील विद्यार्थी आणि अधीक्षक होते. त्यांच्या मदतीनं त्यांनी बालवाडी ते पदव्युत्तर उच्च शिक्षण आणि विविध प्रशिक्षण संस्था विद्यापीठात स्थापन केल्या.

‘विद्यार्थी वसतिगृहं ही झोपण्यासाठी नसून ती अभ्यासाची शैक्षणिक संकुलातील निवासी पाठशालाच आहे’ असं ते मानत. सर्व जाती, धर्म, जमाती, भाषांचे विद्यार्थी आपलुकीने एकत्र राहत. कोणीही झाडूवाला, भंगी किंवा शिपाई वसतिगृहात आढळला नाही. सर्व कामं विद्यार्थीच करत. विद्यार्थ्यांना कोणतंही काम सांगावं आणि त्यांनी ते करावं, अशीच प्रेमळ शिस्त होती.

सुरुवातीला इमारत बांधण्याचं काम चालू होतं. त्यासाठी कोल्हापूरहून विटा आणि कौलं आणावी लागत. त्या वेळी त्याचे ट्रक कधीकधी उशीरा येत. तेव्हा नाईकसाहेब स्वत: उभं राहून विद्यार्थ्यांची फौज घेऊन विटा, कौलं उतरवून घेत. स्वत: ते काम करत असल्यामुळे विद्यार्थीही मदत करीत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर त्यांचं बारीक लक्ष असे. नाईकसाहेबांनी बांधकामातून उरलेल्या लाकडी फळ्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना कॉटस्‌ म्हणून केला. त्यांची लांबी-रुंदीही अगदी मुलांसाठी योग्य आणि प्रशस्त अशीच होती. आजारी विद्यार्थ्यांचीसुद्धा ते स्वत: जातीने काळजी घेत. एकदा विद्यार्थीगृहातल्या एकाला खूप ताप भरला.

त्या वेळी चित्रातार्इंची अमेरिकेतील मैत्रीण श्रीमती हेलन मूस या आल्या होत्या. त्या समाजकार्य, वैद्यकीय सेवेसाठी भारतात राहत होत्या. त्यांनी त्या विद्यार्थ्याला तपासून औषधं दिली. रात्री नाईकसाहेब त्याच्या खोलीत गेले. तिथे एक शिक्षक बसून होते. त्यांना नाईकसाहेबांनी घरी जायला सांगितलं आणि स्वत: रात्रभर त्याची देखभाल केली. ती करताना त्या मुलाकडून कागद घेऊन लिखाण केलं. मुख्य म्हणजे दुसऱ्या दिवशी जेवढे कागद घेतले तेवढे परत केले, एवढा चोख व्यवहार.

1954 साली नाईकसाहेबांचा आणि चित्रातार्इंचा विवाह झाला. विवाहानंतर नाईकसाहेबांना कळलं की, चित्रातार्इंनी दर महिन्याच्या पगारातून बचतखात्यात 8000/- रुपये जमवले आहेत. मोह टाळण्यासाठी त्यांनी ती रक्कम लगेचच विद्यापीठातील बांधकामासाठी वापरली. नंतरसुद्धा काटकसरीत राहून उरलेली पगाराची रक्कम ते विद्यापीठाला देणगी म्हणून देत. एकूण जवळजवळ 86000 रुपये त्यांनी विद्यापीठाला दिले. स्वीकारलेल्या कार्यात तन, मन, धनाने झोकून काम करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्याबद्दलचा आदर वाढवणारी होती.

त्यांनी परुळेकर ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक विषयांच्या पुस्तकांचं भव्य भांडार उघडलं होतं. शिक्षकांनी आपल्या विषयाव्यतिरिक्त अन्यही वाचलं पाहिजे. आपल्या विषयाची तयारीही भरपूर केली पाहिजे आणि त्यासाठी ग्रंथालय समृद्ध असावं याकडे नाईकसाहेबांचं लक्ष असे. मौनी विद्यापीठाच्या व क्रीडांगणाच्या पश्चिमेकडील बाजूस मोठं सभागृह बांधलं होतं. महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्या सभागृहाचं नाव ‘महात्मा फुले सदन’ असं ठेवलं होतं.

सभागृहाच्या समोरच मौनी महाराजांची मौन धारण केलेली, ध्यानस्थ बसलेली मूर्ती होती. त्या मूर्तीजवळ रात्रंदिवस नंदादीप प्रज्वलित ठेवण्यात येई. अगरबत्ती, धूप यांच्या सुगंधामुळे सगळं वातावरण प्रसन्न असे. मौनी विद्यापीठाचं बोधचिन्ह छापलेला भगवा ध्वज सभागृहासमोर फडकत असे. सूर्योदयाला ध्वज फडकवणं आणि सूर्यास्ताला उतरवणं ही जबाबदारी वसतिगृहातील विद्यार्थी पार पाडत. त्या वेळी बिगुल वाजवत.

या सगळ्याचंच आठवड्याचं नियोजन असे. दर सोमवारी संध्याकाळी प्रार्थनेसाठी सर्व विद्यार्थी, सगळा सेवकवर्ग, सगळी कुटुंबं एकत्र येत. एरवी आम्हांला कोणालाही वेळ मिळत नसे. त्यामुळे सोमवारचा दिवस आमचा हक्काचा, गप्पा मारण्याचा, एकमेकांची चौकशी करण्याचा असायचा. या सायंप्रार्थनेची सगळे आतुरतेने वाट बघत असत.

सायंप्रार्थनेच्या वेळी सर्वप्रथम आचार्य भागवत, मौनी महाराजांच्या प्रतिमेला आणि नंतर उपस्थितांना नमस्कार करून बसत. त्यानंतर नाईकसाहेब, चित्राताई आणि इतर सगळे मागोमाग नमस्कार करून बसत. ते आदरयुक्त वागणं, प्रेम आणि नम्रता पाहून मन भारावून जायचं. सर्व मिळून प्रार्थना म्हणत. कधी एखादं गाणं, भजन व्हायचं. विभावरी गोखले आणि मी गाणं, अभंग म्हणत असू. आचार्य भागवत सायंप्रार्थना आणि मानवी जीवन यांचा संबंध याचं संपूर्ण सार सांगत. जीवनातील फार मोठ्या क्लेशामध्येसुद्धा मनाला शांत कसं ठेवता येईल, सहनशक्ती आपोआप कशी निर्माण होईल हे सांगत.

ते म्हणत, ‘ही संस्कारमय सायंप्रार्थना आध्यात्मिक जीवनातून प्रवास करणारी एक अद्‌भुत शक्ती आहे.’

या वेळी समाजशिक्षण, लोकशिक्षण आणि ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी झटणारे कार्यकर्ते, समाजसेवक यांच्यासाठी चर्चासत्रंही चालत. नाईकसाहेबांनी संस्कारशिबिरासाठी व्यासपीठ निर्माण केलं होतं. या सायंप्रार्थनेने फक्त शैक्षणिक कार्य केलं असं नाही तर विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, शेतकऱ्यांना शिस्तीचे धडे दिले. समाजाला एक वेगळी दृष्टी दिली.

आणखी एक महत्त्वाचा समारंभ सोमवारी होत असे. तो म्हणजे कोणातरी मोठ्या व्यक्तीला नाईकसाहेब बोलवत असत. त्यांचे विचार आम्हांला ऐकायला मिळत. एकदा भारताचे अर्थमंत्री आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष सी.डी.देशमुख, त्यांच्या पत्नी आणि नवी दिल्लीच्या केंद्रीय समाजकल्याण बोर्डाच्या अध्यक्षा दुर्गाबाई देशमुख असे दोघेजण भेट द्यायला आले होते. सगळा कार्यक्रम संपल्यावर श्री. आणि सौ. देशमुख अचानक वसतिगृहाला भेट द्यायला गेले.

देशाच्या एवढ्या मोठ्या व्यक्ती अचानक आल्यामुळे कुणीही गडबडून, गांगरून गेले नाहीत. कारण सगळ्यांच्यातील एकोपा, परस्परांच्या विचारांची मोकळेपणाने झालेली देवाण-घेवाण, सर्वांचंच सहकार्य आणि कामातील पारदर्शकता. उलट या सर्व गोष्टींमुळे सगळे प्रचंड उत्साहात होते. आम्ही घरात फक्त चहापाणी करायचो, आमचा सगळा वेळ शिकवण्यात जावा म्हणून शिक्षकांनाही जेवणासाठी मेस होती. देशमुखसाहेबांनी सगळ्यांनाच एकत्र जेवताना पाहिले. सौ.देशमुख सरळ स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी जेवण करणाऱ्यांना विचारलं, ‘तुम्हीपण इथेच जेवता का?’

त्या बायकांनी दिलेलं उत्तर ऐकून दोघे भारावून गेले. बायका म्हणाल्या, ‘हो, आम्ही इथेच जेवतो. रात्री घरच्यांना पुरेल असा डबा आम्ही इथून घेऊन जातो. आमच्या मुलांना शाळेत घालायची सोय केली आहे. आम्ही घरात नसतो म्हणून मुलांना आणायची आणि पोहोचवण्याची सोय संस्थेनं केली आहे.’

हे ऐकलं आणि देशमुख पती-पत्नी दोघेही मुलांच्याबरोबर जेवायला बसले. एवढी मोठी व्यक्ती आपल्याबरोबर पंगतीत बसल्यामुळे झालेला आनंद शब्दांपलीकडचा होता. आज या मेसमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलांची मुलं इंजिनिअर झालीत. मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं बी.डी.ओ, विस्तार अधिकारी बनली आहेत. स्टँडवर हमाली करणाऱ्यांची मुलंही उच्चशिक्षित झालीत. अशा पद्धतीने नाईकसाहेबांनी शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची अंधारी घरं ‘प्रकाशमय’ करून टाकली.

नाईकसाहेब सहकाऱ्यांचीसुद्धा तेवढीच काळजी घेत. श्री.आठवले आणि त्यांच्या पत्नी प्रभावती आठवले, जेव्हा गारगोटीत आले तेव्हा त्याच्या आधी ते कऱ्हाटी या छोट्याशा गावात चार वर्षं फुकट शिकवत होते. त्यामुळे जवळ पैसा नव्हता. त्यातच मौनी विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे पहिला पगार नाही. संभ्रमात टाकणारी परिस्थिती होती. अशा वेळी नाईकसाहेबांनी स्वत:च्या खिशातून 500 रुपये काढून आठवलेंना दिले.

विद्यापीठात अनेक उपक्रम चालत. त्यात आमचाही खारीचा वाटा असायचा. भाऊ बी.पी.एड. झाले होते. त्यामुळे शिकवण्याबरोबर ते खेळ, एन.सी.सी., पी.टी.घेत. आम्ही मौनी विद्यापीठात नुकतेच गेलो होतो, तेव्हाची एक आठवण आहे. रात्रीचा समारंभ होता. नाईकसाहेबांनी भाऊंना ‘काहीतरी वेगळा कार्यक्रम करा’ असं सांगितलं. रात्रीची वेळ, काय करायचं? असा प्रश्न उभा राहिला. भाऊपण असेच वेगळे प्रयोग करणारे. मग त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात मशाल देऊन संचलन बसवलं. कवायतीपण बसवल्या. रात्रीच्या अंधारातील त्या प्रकाशमय कवायती सगळ्यांच्याच मनात कायमच्या कोरल्या गेल्या.

खरंच 1957 ते 61 हा मौनी विद्यापीठातील आमचा काळ, तेथील बौद्धिक वातावरण, कॉमन किचनचं असलेलं आकर्षण, नाईकसाहेब, चित्रातार्इंचा हवाहवासा वाटणारा सहवास अशा कित्येक अविस्मरणीय घटनांनी जीवन समृद्ध करून गेला.

जे. एल. रानडे

मौनी विद्यापीठातील ज्यांच्यामुळे आमचं आयुष्य समृद्ध झालं, त्यामध्ये जे.एल.रानडे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यायला हवं. माझ्याशी त्यांची ओळख अचानक झाली. एकदा ते आमच्या घरासमोरून जात होते. त्यांनी आमच्या घराच्या खिडकीचे पडदे पाहिले. खालीवर दोन्ही बाजूला स्प्रिंगमध्ये घालून पडदे एकदम ताठ, छान बसले होते. झोळ पडलेला नव्हता. तेव्हा एवढे व्यवस्थित पडदे लावलेलं घर कुणाचं, हे बघायला म्हणून रानडे आमच्या घरात आले. चौकशी केली, नाव विचारलं.

रानडे या कँपस्‌मध्ये आले आहेत, असं ऐकलं होतं म्हणून मी त्यांना विचारलं, ‘आपणच जे.एल.रानडे का?’ कारण त्यांची नवीन ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.तर्फे निघाली की लगेच माझे वडील नाना ती आणत. त्यांच्या जवळजवळ चाळीस रेकॉर्डस्‌ मुंबईला आमच्याकडे होत्या. त्यांचं ‘गोड गोड ललकारी’ हे गाणं तर आम्हा सर्वांनाच खूप आवडायचं. हे सर्व मी त्यांना सांगितलं. अशी आमची पहिली ओळख झाली.

मी पूर्वी वसंतराव राजोपाध्यांकडे गाणं शिकत होते, हे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही या माझ्याकडे गाणं शिकायला.’ मी लगेच त्यांच्याकडे माझा तंबोरा घेऊन गेले. त्यांनी माझ्याकडून यमन राग गाऊन घेतला. त्यांना माझ्या गाण्यातील जाण, प्रगती चांगली वाटली असावी. त्यांनी ‘यापुढे येत जा’ म्हणून सांगितलं. माझं पुढचं शास्त्रीय संगीतातलं शिक्षण असं सुरू झालं आणि आमची मैत्रीही घट्ट होत गेली.

गाण्याचा क्लास झाल्यावर त्यांच्या पत्नी मालतीबाई आणि मी गप्पा मारत असू. त्या दिसायला अत्यंत सुंदर, सोज्वळ होत्या. त्यांची मुलगी ज्योत्स्ना माझ्याकडेच नववीत शिकायला होती. या सगळ्या घराशीच माझा घरोबा निर्माण झाला.

एकदा मी त्यांना म्हटलं, ‘आज माझा आवाज बसलाय म्हणून मी काही येत नाही.’

रानडे घरी आले. म्हणाले, ‘लीलाताई जरा बाहेर या बघू. तुमचा बसलेला आवाज बघू दे.’

मी ‘आले’ म्हणून बाहेर आले.

तर म्हणाले, ‘कुठे बसला आहे आवाज? काही नाही. चला शिकायला.’

आणि मला गाणं शिकवायला घेऊन गेले. असं हे गुरु-शिष्याचं नातं.

त्या वेळी आकाशवाणीवर संगीताचे कार्यक्रम होत. मी मग रानडे सरांना सांगे. ‘आज अमूक-तमूकचं गाणं आहे’ आणि म्हणे, ‘मी माझ्या घरी ऐकते.’

रानडे सर म्हणत, ‘गाणं हे दोघा-तिघांनी एकत्र ऐकायचं असतं. विशेषत: गुरूच्या सान्निध्यात ऐकल्यानं, त्या गाण्यातील सौंदर्यस्थळं, खाचा-खोचा समजतात.’

आणि मग आम्ही एकत्र गाणं ऐकत असू. त्यामुळे हल्ली जेव्हा मी एकटी गाणं ऐकते तेव्हा मला तात्यांची म्हणजेच रानडे सरांची आठवण होते.

आम्ही तिघे-चौघे शिष्य होतो. मी, श्रीपाद जोशी आणि भावे बाई. कधीकधी ते अचानक आमची परीक्षा घेणार म्हणून सांगत. आता आमच्या तिघा-चौघांची ते काय परीक्षा घेणार? असा आम्ही विचार करायचो, पण ती गंमत असायची.

असा आमचा वेळ कसा जायचा, ते कळत नसे. ते दर शनिवारी कोल्हापूरला जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे शिकायला जायचे. ‘श्यामकल्याण’, ‘स्वानंदी’सारखे राग बुवांच्या शिकवण्याप्रमाणे पेश करायचे.

बाबूराव जोशी म्हणून कोल्हापूरचे वकील रानडे यांचे मित्र होते. तेही गाण्यातील तज्ज्ञ होते. ते अधूनमधून मौनी विद्यापीठात येत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तालमी घेण्यासाठी मदत करीत. एकदा रानडे सरांनी कोल्हापूरला शुगर मिलमध्ये बडे गुलाम अली खाँचं गाणं ऐकायला नेलं होतं. त्यांच्यामुळे मला कधी न ऐकायला मिळणारे गायक ऐकायला मिळाले आणि असे रानडे सर मला मिळाले मौनी विद्यापीठामुळे.

जे.एल.रानडे आणि बाबूराव जोशी यांचं एक वेगळं नातं या मौनी विद्यापीठाशी जडलेलं होतं. ते म्हणजे चित्राबाई, रानडे सरांच्या मानसकन्या आणि नाईकसाहेब हे बाबूराव जोश्यांचे मानसपुत्र. नाईकसाहेबांच्या लग्नात रानडे सरांनी चित्राबार्इंच्या वडिलांची आणि बाबूराव जोशींनी नाईकसाहेबांच्या वडिलांची भूमिका वठवली होती.

तात्यांच्या बोलण्यात विनोद पेरलेला असायचा. त्यांनी सांगलीला बंगला बांधला होता. इस्लामपूरहून आम्ही त्यांना भेटण्यासाठी सांगलीला जात असू. सांगलीला त्यांच्या घरासमोरील बंगल्याचं नाव ‘निवांत’ होतं. यावरून एकदा ते मला म्हणाले, ‘लीलाताई, आम्ही आमच्या घराला ‘ललकारी’ नाव दिलं आणि त्यांच्या ‘निवांत’ला आमची ‘ललकारी’ ठोकली.’

आमचा विद्यापीठात निर्माण झालेला स्नेह अखेरपर्यंत आम्ही जोपासला. त्यांच्या सहवासामुळे माझं जीवन जास्त सुरीलं झालं.

आचार्य भागवत आणि मी...

आचार्य भागवत आणि आचार्य जावडेकर दोघे एकमेकांचे स्नेही होते. त्यामुळे आचार्य भागवतांचं आमच्या घरी इस्लामपूरला येणं जाणं असायचं. वाढलेली दाढी, लुंगीवर कुडता असा वेश, करारी व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांच्याशी बोलायला जरा भीतीच वाटायची.

आचार्य भागवत मौनी विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांची टापटीप पाहण्याजोगी असे. कपड्यांच्या घड्या ते फार सुंदर घालत. घडी घातल्यावर कपडे हाताने थोपटून उशाशी गादीखाली ठेवत. वर्तमानपत्राची तारीख-वारानुसार घडी घालून सुंदर रास घालत. स्वत:चे कपडे स्वत: धुऊन सुंदर वाळत घालत.

आचार्य भागवतांनी लेखन फार कमी केलं असं मला वाटतं. परंतु त्यांचं वक्तृत्व इतकं सुंदर होतं की श्रोते एकदम भारावून जात. मौनी विद्यापीठात सर्व विद्यार्थी दर सोमवारी प्रार्थनेस जमत. त्या वेळी आचार्य बौद्धिक घेत असत. त्यांचं प्रवचन लहानथोर सर्वांना आवडे.

त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन घ्यायला खूप विद्वान मंडळी सतत येत. आचार्य त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेत आणि त्या माणसाचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्याच्याशी बोलत. त्या वेळी अंबुजा सोनटक्के नावाच्या प्राध्यापिका, लीला पाटील वगैरे येत.

मौनी विद्यापीठात गेल्यावर मी त्यांच्या अधिक जवळ गेले. मग त्यांची भीती वाटेनाशी झाली तेव्हा मी त्यांना विचारलं, ‘ही माणसं तुमच्याकडं का येतात?’

ते म्हणाले, ‘लीला, पुष्कळ माणसांना काही ना काही प्रश्न असतात. कधी खाजगी प्रॉब्लेम असतात. सर्वजण सर्व मनात ठेवतात. पण कधीतरी ते कुणी तरी ऐकावं, कुणाला तरी सांगावं, मन मोकळं करावं असं वाटतं. मग त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला की ती व्यक्ती सुखावते. त्यांचं मन हलकं होतं. म्हणून ते येतात.’

एका मुलीची आई वारली तेव्हा तिचं सांत्वन करणारं एक पत्र त्यांनी लिहिलं होतं. त्यातील मृत्यूसंबंधी त्यांचं लेखन फारच उत्कट आहे.

ते म्हणतात, ‘व्यक्तिगत पातळीवर दु:खाचं औषध केवळ काळ हेच आहे, पण तात्त्विक, वैश्विक आणि बौद्धिक पातळीवर मृत्यूचं उत्तर निराळं मिळतं. त्यामुळे माणसाची शुद्धी होते. सायन्स, आर्ट, मोरल्स, मिस्टिरिझम इत्यादी मार्गांनी व्यक्तिगत जीवनातून माणूस वैश्विक जीवनात प्रवेश करू शकतो. म्हणून मृत्यू अथवा दु:ख हे माणसाला व्यापक बनविण्यासाठी विधात्याने योजलेले अपूर्व दाहक रसायन आहे. ते पचविलेच पाहिजे.’

ते त्या पत्रात पुढं म्हणतात, ‘आईचं सतत स्मरण होणं साहजिकच आहे, योग्यही आहे. एकेलपणाची, रितेपणाची नम्र जाणीव अशा वेळी होणारच. तरीदेखील आईचं स्मरण बुद्धीनं करावं. प्रेमभावनेनं पाहत राहावं. पराभूत न होता, विजय मिळविण्याचाच तो एक मार्ग आहे. दु:खाच्या तीव्र आघाताच्या वेळीदेखील आपली बुद्धी जागृत ठेवण्याचा प्रयत्न करावा. हाच खरा स्थितप्रज्ञ होण्याचा मार्ग आहे. ईश्वराचं नामस्मरण करता आलं तर ते उपयोगी पडेल असं वाटतं, तर तेही करत जावं.’

हे आचार्याचे विचार वाचले आणि लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी का येत याचं कोडं उलगडलं. आचार्यांना बंगाली भाषा फार छान येत असे. काहीजण त्यांच्याकडे बंगाली शिकत, पण इतकी वर्षं त्यांच्याजवळ राहून मी काहीच शिकले नाही याची मला खंत वाटते.

माझे वडील नाना तसे बोलके नव्हते. उलट आचार्य भागवत सर्व घरच्यांशी जवळीक साधून घरगुती गप्पा मारत. ते व्यवहारी होते. सुबोधच्या जन्मानंतर मला जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, तेव्हा कसे काय माहीत नाही, पण नानांच्याबरोबर आचार्य भागवतसुद्धा मला घरी न्यायला आले होते. त्या वेळी त्यांनी सुबोधच्या हातात दहा रुपये ठेवले होते. म्हणजे सुबोधला पहिल्यापासून त्यांचा आशीर्वाद मिळाला असं मला पुढे नेहमी वाटत राहिलं.

एकदा ओळख झाली की आचार्य त्या घरातील सर्व माणसांची ओळख ठेवून खुशाली विचारत. अगदी स्वयंपाकघरात जाऊन ‘भाजी मला जास्त लागते हं’ किंवा ‘भाजी आमटी छान झाली आहे’ असं मनमोकळेपणानं सांगत. गोष्टी तर सुंदर हावभाव करून सांगत. त्यामुळे मुलं एकदम खूष असायची. गोष्ट सांगता सांगता, मुलांना संस्कृत सुभाषितंही शिकवत. सुबोध चार-पाच वर्षांचा असताना त्याला ‘जंबू फलांनी...’ शिकवलं होतं.

त्यांना टी.बी.झाला होता. त्याची लागण दुसऱ्यांना होऊ नये म्हणून झाकण असलेल्या डब्यातच ते थुंकायचे. त्यांना कधी तो वापरण्याची किंवा लोकांना तो डबा दिसेल म्हणून लाज वाटली नाही. त्या काळातही ते हे पाळत याचं नवल वाटतं.

ज्या वेळी आम्ही गारगोटी सोडण्याचा निर्णय घेतला आणि प्राचार्य पी.बी.पाटील यांनी सुरू केलेल्या चिकुडर्याच्या शाळेत जायचा निर्णय घेतला, तेव्हा त्याला आचार्यांचा विरोध होता, ते म्हणाले, ‘तुम्ही तिथे का जाता?’ खेड्यातील वातावरणाशी तुम्ही एकरूप व्हाल का? छक्केपंजे तुम्हांला जमणार नाहीत.’

पण आम्ही त्यांना सांगितलं, ‘मुलांना शिकवणं एवढंच आमचं महत्त्वाचं काम आहे. आणि खेड्यात शिक्षक मिळत नाहीत म्हणून आम्ही जात आहोत.’

आचार्य भागवतांचा आणि आमचा ऋणानुबंध शेवटपर्यंत राहिला.

(शब्दांकन : वृषाली आफळे)

Tags: जे.एल.रानडे आचार्य भागवत आचार्य जावडेकर प्राचार्य पी.बी.पाटील गारगोटी J. L. Ranade Acharya Bhagwat Acharya Javadekar Principal P. B. Patil Gargoti weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके