डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चिकुडर्याची आणखी एक आठवण म्हणजे एक अमेरिकन महिला या दलित वस्तीत राहत होत्या. केवळ धर्माचा प्रसार करायचा त्यांचा हा हेतू होता असं मला वाटत नव्हतं. त्यांना अमेरिकेहून पुस्तकं येत. वाचन हा त्यांचा मुख्य उद्देश असावा.असे ऐकण्यात येई की, शंकर कांबळे यांनी त्या बार्इंना विचारलं की, ‘माझ्याशी लग्न कराल का?’ त्यांनी होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं. तेव्हापासून ताई कांबळे व शंकर कांबळे या दोघांनी दलित समाजाच्या कामासाठी वेळ दिला, पण मला अजूनही कोडं आहे त्या परदेशी बाई तिथे कशा काय रमल्या?

आम्हांला जात-पात करायची सवय नव्हती, आमच्या घरात सुना आल्या पण कुठल्या जातीच्या हा विचारही मनात आला नाही. एक मुसलमान मुलगाही आमच्या घरी राहायला होता. सर्वच जातींच्या मुलांना जवळ करून आम्ही शेवटपर्यंत जगलो.पण तरीही आम्हाला ‘बामण’ ही शिवी चिकटली ती आम्ही दोघं निवृत्त होईपर्यंत.नाईकसाहेब संस्थेतील काही लोकांच्या कारवाईमुळे वैतागले आणि त्यांनी मौनी विद्यापीठ सोडण्याचं ठरवलं.

त्याच वेळी आम्ही गारगोटी सोडली. आम्हांला खेड्यात काम करण्याची संधी मिळाली. खेड्यात काम करण्याचा अनुभव मिळावा म्हणून आम्ही गारगोटीसारखं सुंदर विद्यापीठ सोडलं. आमची चूक झाली असं आता वाटतं, परंतु आम्ही शिकवण्यातला आनंद मात्र लुटला.

चिकुडर्याला आम्ही चार वर्षं होतो. चिकुडर्याच्या शाळेचं नाव भारतमाता विद्यालय होतं. आठवी ते अकरावीसाठी बसायला टू सीटर बेंचेस होते. शाळा तीन ठिकाणी तीन निरनिराळ्या खाजगी मालकीच्या घरांत भरत होती. शाळेसाठी नवीन जागेत मोठी इमारत बांधणं चालू होतं. आम्ही मात्र जुन्या माड्यात वर्ग घेत होतो. एस.एस.सी.चा निकाल सुधारायचा हेच आमचं ध्येय होतं. त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. घरात सोपा होता. तेथे जाजम घालून आम्ही बसत असू. चिकुडर्याला तेव्हा वीज आलेली नव्हती. मुलं कंदील घेऊन येत. मग मुलांना आम्ही जादा मार्गदर्शन करायचो.

सोप्यातच एक भला मोठा चौफळा होता. त्यावरच बसून कुलकर्णी आणि सुबोधने अभ्यास केला. दोघेही केंद्राच्या मेरिट लिस्टमध्ये आले. पहिल्या वर्षी बाळ कुलकर्णी आणि दुसऱ्या वर्षी सुबोध. चिकुडर्याला आम्ही एक प्रयोग केला. स्पर्धा ही नेहमी आठवी विरुद्ध नववी, दहावी विरुद्ध अकरावी अशी होत असे. भाऊंच्या मनात आलं- वर्गाप्रमाणे मुलं ‘इव्हन’ होत नाहीत. दहावीच्या मुलाचं वय आणि अकरावीच्या मुलाचं वय समान कसं असणार?

म्हणून भाऊंनी कुलपद्धती सुरू केली. म्हणजे शाळेतील सर्व मुलांची वाटणी चार कुलांत करायची. चार कुलांचा एकेक मुख्य आणि इतर वर्गांतील मुलं वाटून घ्यायची. म्हणजे मागून घ्यायची. प्रत्येक कुलप्रमुखाने सर्व वर्गांतील मुलं हातावर हात घालून पत्त्याप्रमाणे मागायची. आपल्या कुलात गाणारा मुलगा हवा. हे त्या कुलातील इतर मुलांच्या लक्षात आलं की, ती मुलं आपल्या कुलप्रमुखाला अमूक एका मुलाला घे म्हणून सुचवत.

याप्रकारे त्या कुलात गायन, वाचन, कथाकथन, खेळ यांत प्रावीण्य असणारी मुलं समाविष्ट होत. मग त्या कुलात स्पर्धा होई, तेव्हा स्पर्धा समसमान मुलांच्यात होई, ही कुलपद्धती सर्वांना खूप आवडली. त्यानंतर शाळेचा कारभार मुलांच्या हाती सोपवला. कॅबिनेट आणि त्यातील मंत्री म्हणजे खेळमंत्री, सांस्कृतिकमंत्री वगैरे केव्हा काय करायचं ते ठरवत. समारंभ, सुट्‌ट्या, स्पर्धा, सण कसे साजरे करायचे, स्नेहसंमेलन केव्हा करायचं, पाहुणे कोण बोलवायचे हे सर्व मुलं ठरवत.

त्या वेळी प्रत्येक महिन्याला बाहेरचा पाहुणा आणून त्याचं व्याख्यान ठेवत असू. त्या वेळी व्याख्याते मानधन वगैरे घेत नसत. पाहुण्याला फक्त आणणं आणि पोहोचवणं एवढंच करावं लागे. त्या वेळी पाहुण्यांची ओळख, आभार वगैरे सर्व मुलं करत. आणि हे सगळं चिकुडर्यासारख्या खेड्यात होतं हे पाहून पालक खूष होत. चिकुडर्याला संस्थेची जागा होती. आठवड्यातून एकदा मुलं तिथे परेड करत. बरोबर शिक्षकही असत. भाऊंनी माळावर दोन-तीन मुलांमध्ये एक झाड अशी झाडं लावली होती. खरं म्हणजे नंतर ती झाडं वाढली असती, तर आज ते एक रम्य ठिकाण झालं असतं, त्यामागे भाऊंची दूरदृष्टी होती. परंतु आमच्या दुर्दैवाने झाडांना वाळवी लागली आणि सर्व झाडं मरून गेली.

परंतु ‘झाडे लावा’ हे ग.प्र.प्रधानांचं सांगणं आम्ही 1961-62 सालीच पाळलं होतं. चिकुडर्याला भाऊंना मित्र नव्हते आणि मला मैत्रिणी. त्यामुळे चैन करता आली नाही. पण याचं दु:ख आम्हा दोघांनाही नव्हतं, पण बिचारा सुबोध, त्यालाही त्या वयात फारसे मित्र नव्हते. जे चार-पाच मिळाले ते आजही अधूनमधून भेटतात. अर्जुन, सुभाष पाटील, विश्वास पाटील. सर्वजण, चांगले शिकल्यामुळे डॉक्टर, इंजिनिअर वगैरे झाले आहेत.

आमच्या आधीचे मुख्याध्यापक विश्वासराव कुलकर्णी यांच्या माडीवर सुरुवातीला आम्ही राहत होतो. पहिल्या वर्षी हालच झाले, उंदरांचा सुळसुळाट होता. तुळयांवरून उंदरांची माळच जायची. दुसऱ्या वर्षी राहायला बऱ्यापैकी घर मिळालं. तिथं संडास वगैरे आम्ही बांधून घेतला. माजघर मोठं होतं, तिथे सुबोध आणि माझ्या सासूबाई- मामी झोपत. दिवसा तिथे अंधारच असायचा. रात्री मात्र मिणमिणत्या दिव्यात केळी वगैरे टांगलेली दिसायची. मग सुबोध रात्री केळं खायचा.

चिकुडर्याची आणखी एक आठवण म्हणजे एक अमेरिकन महिला या दलित वस्तीत राहत होत्या. केवळ धर्माचा प्रसार करायचा हा हेतू होता असं मला वाटत नव्हतं. त्यांना अमेरिकेहून पुस्तकं येत. वाचन हा त्यांचा मुख्य उद्देश असावा. असे ऐकण्यात येई की, शंकर कांबळे यांनी त्या बार्इंना विचारलं की, ‘माझ्याशी लग्न कराल का?’ त्यांनी होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं. तेव्हापासून ताई कांबळे व शंकर कांबळे या दोघांनी दलित समाजाच्या कामासाठी वेळ दिला, पण मला अजूनही कोडं आहे त्या परदेशी बाई तिथे कशा काय रमल्या?

आम्हांला जात-पात करायची सवय नव्हती, आमच्या घरात सुना आल्या पण कुठल्या जातीच्या हा विचारही मनात आला नाही. एक मुसलमान मुलगाही आमच्या घरी राहायला होता. सर्वच जातींच्या मुलांना जवळ करून आम्ही शेवटपर्यंत जगलो. पण तरीही आम्हाला ‘बामण’ ही शिवी चिकटली ती आम्ही दोघं निवृत्त होईपर्यंत.

चिकुडर्याला आम्ही किती हालात दिवस काढले ते आमचं आम्हांला माहीत. परवा मी म्हणाले, ‘आपले चिकुडर्याचे दिवस उंदीर, पिसवा, भुंगे यांच्यासमवेत गेले. मोरी धड नाही, गॅलरीत छोट्याशा मोरीत कशीबशी आंघोळ करायची. संडासला जायचं म्हणजे घरमालकाच्या अंगावरून झोपलेल्या अंथरुणावरून.’  तेव्हा सुबोध मला म्हणाला, ‘समिधा’, ‘प्रकाशवाटा’ ही पुस्तकं वाचलीस ना? तुला त्यांच्यासारखे वाघ, सिंह, विंचू, साप तर नाही ना दिसले? तेव्हा साधनाताई आणि मंदा यांचं काय झालं असेल?’

तो बोलला ते अगदी खरं. एकदा एखादं व्रत स्वीकारलं आणि त्यात कितीही अडचणी आल्या तर कुरकूर कशासाठी? चिकुडर्याला काही ध्येय घेऊन, स्वप्न घेऊन गेलो होतो ना, मग अडचणींचा स्वीकार करायलाच हवा होता. किरकोळ अडचणींचा विचारही करायचा नाही. कारण तिथल्या कामाचं समाधान होतं. स्वप्नपूर्तीचा आनंद होता.

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील

माझं लग्न 1946 साली झालं. त्या वेळी आमच्याकडे एक तरुण मुलगा वळकटी घेऊन मामांना म्हणजे आचार्य जावडेकरांना भेटायला आला आणि त्यांना म्हणाला, ‘मी चाललो, भूदान चळवळीच्या कार्याला.’ आचार्यांनी काय सल्ला दिला माहीत नाही- पण वर्षभर तो विनोबांच्यासमवेत होता. तो तरुण म्हणजे-  प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील.

पी.बी.पाटील इस्लामपूर हायस्कूलचे विद्यार्थी होते. तेव्हा भाऊंनी एकदा शाळेच्या मुलांची सहल जरंडा किल्ल्यावर काढली होती. त्या सहलीला माझी बहीण प्रभा हिला भाऊंनी नेलं होतं. त्या वेळी पी.बीं.च्या व्यक्तिमत्त्वाने ती इतकी प्रभावित झाली की त्यांच्याबद्दल किती सांगू आणि किती नको असं तिला झालं. पी.बीं.नी गाणी म्हटली, त्यांनी मुलांना कसं खेळवलं, त्यांचं वक्तृत्व किती प्रभावी आहे. एक ना अनेक. ती ट्रीप प्रभाच्या अद्याप लक्षात आहे.

त्यानंतर काही दिवसांनी आपल्या वक्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयं गाजवली. इस्लामपूरला एक जुनी इमारत घेऊन, त्यांनी गरीब मुलांसाठी वसतिगृह उभारलं. पी.बीं.चं. मित्रमंडळ फार मोठं होतं. ते सगळे एकत्र येऊन वसतिगृहासाठी धान्य गोळा करायचे. मुलांना भाजी- भाकरी करून घालण्यासाठी स्वयंपाकीणबाई होती.

निरनिराळ्या वर्गांत आणि शाळेत ही मुलं होती. मुलांना काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर भाऊ संध्याकाळी तिथे जात आणि मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवत. कधीकधी मीदेखील त्या मुलांना मार्गदर्शन करत असे.

पी.बी. त्या वेळी कोल्हापूरला कॉलेजमध्ये शिकायला होते. आचार्यांच्या निधनानंतर मामी परगावी होत्या आणि भाऊ शिक्षणासाठी पुण्यात होते. अशा स्थितीत मी घरात एकटीच होते. त्या वेळी पी.बी.पाटील शिबिरासाठी इस्लामपूरमध्ये आले होते. ते मला म्हणाले, ‘लीलाताई घाबरू नका, मी आहे.’ त्यांच्या या शब्दांनी मला खूप आधार वाटला. पुढं काही वर्षांनी आमचा आणि पी.बीं.चा संबंध मौनी विद्यापीठात आला. नाईकसाहेबांनी काही निवडक आणि कर्तबगार व्यक्तींना मुद्दाम विद्यापीठात बोलावून घेतलं होतं. पी.बी.सारखा हुशार मुलगा त्यांच्या नजरेतून कसा सुटणार? नाईकसाहेबांनी पी.बीं.ना सिलोनला (म्हणजे आताच्या श्रीलंकेला) आणि इंग्लंडला ट्रेनिंगसाठी पाठवलं. मौनी विद्यापीठात अनेक प्रकल्प राबवले जात. त्यासाठी विद्यापीठात ट्रेनिंग दिलं जाई.

खेड्यातील कारभार सरपंचाच्या  हातात असतो. म्हणून पंचायत प्रशिक्षण विद्यापीठात सुरू केलं. पी.बी.पाटील यांना प्रशिक्षणाचं प्रमुख केलं होतं. पी.बी., नाईकसाहेबांकडून बरंच काही शिकले. पी.बीं.च्या कल्पनाही चांगल्या असत. ‘शांतिनिकेतन’चा जन्म पी.बीं.च्या कल्पनेतून झाला. त्यांनी शांतिनिकेतनचा परिसर झाडाझुडपांनी हिरवागार केला. सर्व शिक्षकांना घरं दिली. फर्निचर दिलं. शाळेतील मुलांसाठी चार मुलांना बसता येईल अशी बाकं करून घेतली. त्यामुळे रात्रीच्या वेळी खेडेगावातून आलेल्या मुलांची वर्गातच झोपण्याची सोय त्या बाकांवर झाली.

नाईकसाहेब आणि चित्राताई मौनी विद्यापीठ सोडून गेले. तेव्हा पी.बीं.नी आम्हांला चिकुडर्याला शिक्षक म्हणून बोलावलं आणि खेड्यात काम करण्याची संधी दिली. शांतिनिकेतनमध्ये पी.बीं.नी विविध विषयांत पारंगत आणि कलाप्रेमी माणसांचा संच बनवला. अगदी प्राथमिक शाळेपासून ते कॉलेजपर्यंत. पी.बी.पाटील कलावंतच. त्यांनी पु.लं.चं ‘पुढारी पाहिजे’ हे लोकनाट्य बसवलं होतं. या नाटकात मी लीला लिमयेची भूमिका केली होती. इतरही काही प्रबोधन करणारे कार्यक्रम बसवले होते. खेड्यात सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम होत. त्यातून जनजागृती करत असत. या कार्यक्रमांतून धान्य जमा होई.

त्यांनी शिक्षणाच्या बाबतीतही अनेक प्रयोग केले. शिक्षकांना अधिक शिक्षित करण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या चांगल्या योजना आखल्या, राबवल्या. सुट्टीच्या काळात त्यांनी शिक्षकांसाठी अनेक शिबिरं घेतली आणि शिक्षकांचं प्रबोधन केलं. नवभारत शिक्षण मंडळात वर्षातून एकदा सर्व शाखांचं संमेलन होई. त्यात आपापल्या शाखेचा अहवाल वाचला जाई. त्या वेळी मुख्याध्यापक शाखेच्या अडचणी, प्रगती सांगत. प्रत्येक शाखेचा सेवकवर्ग त्या वेळी हजर असे. 100-125 शिक्षकांसमोर बोलायची सवय त्यामुळे लागली. सभा, शिबिरांत बोलण्याची संधी मिळाली.

त्याच काळात साने गुरुजींच्या आंतरभारतीतर्फे गुजरात आणि दक्षिण भारतातील शाळा बघण्याची संधी मला पी.बीं.मुळे मिळाली. तिथल्या शाळांमध्ये जे नावीन्यपूर्ण प्रयोग मुलांसाठी केले जात, तसे प्रयोग आपल्या शाळेत करता येतील का? या उद्देशाने ही सहल आयोजित केली होती. म्हैसूर, त्रिचूर, रामकृष्ण मिशनची शाळा, नंदीग्राम, कोन्नूर वगैरे ठिकाणच्या शाळा पाहिल्या. म्हैसूरच्या शाळेत दुधाची भुकटी कशी करायची हे शिकवत होते. चंद्रकांत शहा यांनी अत्यंत सुंदर नियोजन केलं होतं. बस मधेच थांबवून तेथील स्त्री-पुरुषांना बसमध्ये घेतलं जायचं. त्यामुळे बसमध्येच संवाद व्हायचा. रामकृष्ण मिशनच्या शाळेतील एका शिक्षकाने आमचं खूप चांगलं स्वागत केलं. कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या प्रांतातून आलो होतो.

ते म्हणाले, ‘साधू, संत अनेक होतील, परंतु शिवाजी महाराज एखादेच. त्यांच्यामुळे आम्ही मुघलांपासून वाचलो.’ हे ऐकून आमचाही ऊर अभिमानाने भरून आला.

आम्ही थुंबा सेंटरमध्येही गेलो होतो. त्या वेळी वसंत गोवारीकर प्रमुख होते. तेव्हा अग्निबाण सोडणार होते. मग आम्ही समुद्रकिनारी बसून अग्निबाणाचं उड्डाण याचि देही याचि डोळा पाहिलं. तो खूप थरारक अनुभव होता. या सहलीच्या निमित्ताने मधुमती सगरोळीकर ही नांदेडची मैत्रीण मला मिळाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी पी.बीं.च्या बहुश्रुतपणाची, त्यांच्यातील कलावंताची ओळख जाणून त्यांना हाताशी धरून खूप कामं उभी केली. 1972 मध्ये पी.बी. निर्विवाद बहुमताने काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्र विधानसभेचे क्रियाशील आमदार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. आपल्या वक्तृत्वाने विधानसभा गाजवली. पंचायत राज्य मूल्यमापन समितीचे ते अध्यक्ष होते.

खरं तर इतक्या पदांवर त्यांनी कामं केली आहेत की ते सगळं सांगण्याला माझी स्मृती कमी पडते की काय असं वाटतं. पण पी.बीं.ना आपल्या ज्ञानाचा गर्व नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा एक आदर्श नेता, प्राचार्य, समाजसेवक. त्यांच्याबद्दल माझ्यासारखी एक साधी शिक्षिका काय लिहिणार? खरं तर खूप लिहावंसं वाटतं, पण त्यांना सलाम करून इथेच थांबते.

(शब्दांकन : वृषाली आफळे)

Tags: वृषाली आफळ समाजसेवक. प्राचार्य नेता पंचायत राज्य विधानसभा social worker.. principal leader panchayat state assembly vrushali aphale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके