डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साने गुरुजी जिवंत असते तर 24 डिसेंबर 1998 रोजी त्यांना 99 वर्षे पूर्ण झाली असती. त्याच दिवसापासून साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षाचे कार्यक्रम अनेक संस्थांत सुरू झाले.

साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रूझ

साने गुरुजी आरोग्य मंदिराने ठरविले की, आपण चालवत असलेल्या साने गुरुजी विद्यामंदिरातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी साने गुरुजींची प्रतिमा गेलीच पाहिजे. ही कल्पना साकार करण्याला मदत झाली, राष्ट्र सेवा दलाने प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडरमुळे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शर्टवर साने गुरुजींच्या प्रतिमेचा बॅच लावला पाहिजे. सर्वांनी, अगदी शिक्षकांनीसुद्धा 24 तारखेपासून बॅच लावायला सुरुवात केली.

24 डिसेंबर 1998 पासून सकाळी साडेसात वाजता आठवी ते दहावीचे विद्यार्थी जमले. ह्या इयत्तांचे एकूण तेरा वर्ग. प्रत्येक वर्गाने सांताक्रूझच्या तेरा मोहल्ल्यांत घोषणा देत, साने गुरुजींची गाणी म्हणत, मिरवणुका काढल्या. नंतर साडेनऊ वाजता सभा झाली. प्रथम श्री. लीलाधर हेगडे यांनी कवी वसंत बापट लिखित 'धडपडणाऱ्या मुलांचे साने गुरुजी' आणि श्री. राजा मंगळवेढेकर लिखित 'साने गुरुजींची जीवनगाथा' ह्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे अनावरण केते, कवी वसंत बापट लिखित हे पुस्तक कॅलेंडरप्रमाणे प्रत्येक घरी जाईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर साने गुरुजींच्या जीवनावर त्यांचे भाषण झाले आणि सकाळचा समारंभ संपला. दुपारी पाचवी ते सातवी आणि प्राथमिक शाळेनेही सभा घेऊन गुरुजी जयंती साजरी केली.

योजना मंदिर, बोरिवली

बोरिवलीच्या योजना मंदिरात मुख्याध्यापिका श्रीमती सुहास कुछकर्णी यांच्या नेतृत्वाखाली योजनाबद्ध कार्यक्रम करण्यात आला. शाळेतील ज्या विद्यार्थिनीचा जन्म 24 डिसेंबरला झाला त्या एस.एस.सी.मधील विद्यार्थिनीच्या हस्ते गुरुजींच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले व विद्यार्थ्यांची गुरुजींच्या जीवनावर भाषणे झाली. ह्या शाळेत वसंत बापट लिखित पुस्तकांच्या 500 प्रती आणि मंगळवेढेकरांच्या पुस्तकाच्या 5 प्रती विकण्यात येतील. 20 डिसेंबर रोजी अपना बाजार, अखिल भारतीय साने गुरुजी स्मारक समिती, वाचनालय चळवळ वगैरेंनी जेकब सर्कलपासून अपना बाजारपर्यंत 'साने गुरुजी शोभायात्रा' काढली होती. त्यात सुमारे एक हज़ार स्त्री-पुरुष सामील झाले होते. ट्रक्स सजविण्यात आल्या होत्या. अनेक शाळांतील विद्यार्थी, शिक्षक त्यात सामील झाले होते. त्या यात्रेचा सांगता समारंभ न्या. धर्माधिकारी यांच्या भाषणाने झाला. ह्या शोभायात्रेपासून स्फूर्ती घेऊन दि. 3 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत सांताक्रूझच्या साने गुरुजी आरोग्य मंदिराने आजी-माजी विद्यार्थी, पालक-शिक्षक यांची 'साने गुरुजी शोभा यात्रा' काढली. ह्या यात्रेतही एक हजार व्यक्ती सामील झाल्या होत्या. दोन ट्रॅक्स आणि एक टेंपो सजविण्यात आला होता. हे सर्व माजी विद्यार्थ्यांनी जाग्रणे करून पार पाडले. ह्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत झाले. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अपवि' हे गीत त्या दिवशी संपूर्ण सांताक्रूझ पश्चिममध्ये निनादले.

युसुफ मेहेरअली विद्यालय, ताडदेव

ताडदेव येथे जनता केंद्र आणि युसुफ मेहेरअली विद्यालयातर्फे साने गुरुजी जयंती साजरी झाली. डॉ. बाबा कलगुटकर यांच्या हस्ते वरील दोन पुस्तकांचे अनावरण झाले. विद्यार्थ्यांनी सुरेख गाणी व नाटुकली बसवली होती. साने गुरुजींच्या जीवनावर लीलाधर हेगडे यांचे भाषण झाले. युसुफ मेहेरअली शाळेत वसंत बापट लिखित 100 पुस्तके संपली. मुलुंड येथे त्या दिवशी सायंकाळी ठाकूर विद्यामंदिर येथेही वरील पुस्तकांचा प्रकाशन समारंभ श्री. दत्ता ताम्हणे यांच्या हस्ते पार पडला. श्री. ताम्हणे यांचे गुरुजींच्या जीवनावर भाषण झाले. त्यानंतर श्री. हेगडे यांनी 'स्वातंत्र्य संग्राम दर्शन' हा कार्यक्रम सादर केला. ठाकूर विद्यामंदिरात कवी वसंत बापट लिखित 100 पुस्तके व साने गुरुजींचे 1000 बॅचेस संपले. ठाकूर विद्या मंदिराचे मानद कार्यवाह श्री. म्हात्रे गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कॅलेंडरवरील गुरुजींच्या चित्राच्या फ्रेम्स बनवून मुलुंडमधील बहुतेक शाळांना भेट म्हणून पाठवून दिली.

Tags: कार्यक्रम वृत्तान्त जन्मशताब्दी साने गुरुजी events birth centenary sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके