डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जयन्त परमार यांची भाषा जरी हिंदी-गुजराती असली तरी ते उर्दू लिपीतून कविता आविष्कारतात.

और, पेन्सिल और दूसरी नग्मे, मानिन्द, अंतराळ हे चार कवितासंग्रह. ‘इंकपॉट ॲन्ड अदर पोएम्स’ हा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह डॉ.जी.के.वनकर यांनी इंग्रजीत केलेला अनुवाद. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने 2008 मध्ये गौरविण्यात आले.

वली गुजराती या पहिल्या उर्दू कवीची कबर गुजरात नरसंहारामध्ये उद्‌ध्वस्त करण्यात आली. ती पुन्हा बांधण्यात यावी, या मागणीसाठी जयन्त परमारजींनी त्यांना गुजरात सरकारने साहित्यासाठी दिलेला ‘गुजरात गौरव’ पुरस्कार नाकारला.

चातुर्वर्ण्याच्या नावाखाली आपल्या देशात विशिष्ट स्वयंघोषित तथाकथित श्रेष्ठ वगैरे म्हणविणाऱ्यांनी माणसाला माणूस म्हणून नाकारले. त्याचे दु:ख, त्यांच्या वेदना शब्दबद्ध करण्यात जयंत परमारजींची खासियत आहे. म्हणून त्यांच्या कविता मला आवडतात.

नरककुंडाचा वास

नरककुंडाचा वास

माझ्या शाळेपर्यन्त येतसे,

जेव्हा खुल्या पायाने उतरायची आई,

उन्हाच्या छत्रीखाली नरककुंडात.

ढोराच्या चामड्याला

मिठाच्या पाण्यात बुडवून

आपल्या अशक्त पायाने

करायची स्वच्छ.

मोबदल्यात घेऊन यायची

ती मांसाचे तुकडे माझ्यासाठी.

आजही ऑफिसला जाण्यापूर्वी

माझ्या जोड्यांना चेरी पॉलिश करतो

तेव्हा, आईचा चेहरा त्यात चमकतो.

नरककुंडाचा वास माझ्या

ऑफिसपर्यन्त येतो.

--

जोडे

जोडे मला घेऊन जातात

बर्फाच्या शिखरावर

पाईनच्या जंगलात

गावात, खेड्यात नि शहरात.

जोडे मला घेऊन जातात

सातासमुद्रापलीकडील नव्या जमिनीवर

आकाशाच्या दूर नव्या

जगात जोडे मला घेऊन जातात

संसद आणि युनोतही.

जोडे मला घेऊन जातात

गुरुद्वारा, चर्च, मस्जिद

आणि आगियारीच्या प्रार्थनालयात.

मात्र,

जेव्हा जोडे मला घेऊन जातात मंदिरात

तेव्हा मला फेकून देण्यात येते

जोड्यांसकट.

------

कागद

पुरातनकाळी लिहिलं जायचं

पानांवर, भूर्जपत्रांवर, ताडपत्रांवर

झाडांच्या हृदयावर, दगडांवर, तांब्यावर

चार वेदही लिहिले गेले भूर्जपत्रावर

पण, अन्यायाच्या काळ्या ऋचा

लिहिल्या गेल्यात माझ्या शरीरावर

आजही !

--

हजारो हात

एक घरच मागितलं होतं मी

आणि त्यांनी मला जमिनीत गाडून टाकलं

मी मागितला जमिनीचा लहानसा तुकडा

तर त्यांनी मला देशच सोडण्याचा आदेश दिला

मी भाकर मागताच,

त्यांनी जिभेवर जळता निखारा ठेवला.   

मी त्यांना मागितलं एक पुस्तक

नि त्यांनी माझ्या कानात तप्त शिसं

ओतलं.

मान वर करताच,

त्यांनी माझ्या गळ्यात लोखंडी बेड्या

टाकल्या.

जेव्हा मी झेन्डा घेऊन निघालो रस्त्याने

तेव्हा त्या लोकांनी माझे हातच कापून

टाकले.

मात्र,

एक दिवस माझ्या रक्तानं

ही नापीक

ओसाड जमीन सुपीक होईल

आणि हजारो हात उगवतील

माझे हात,

हजारो हात अन्‌ अत्याचाराची शेवटची रात्र.

-

स्वप्न बघणारे हात

स्वप्न बघणारे हात

वाश्याला स्वप्न देतात

सुरेख स्वप्न.

वाश्याचा डोंगा, वाश्याचे फूल

वाश्याचे हत्ती, घोडे, उंट

वाश्याचे सूर्य, चंद्र, तारे

वाश्याचा टेबल, वाश्याची दऊत.

0   

याच वाश्याला तासून

बनवितो भाला

चमकणारा अणकुचीदार भाला.

0

चहाचे उष्टे कप धुणाऱ्या हातात,

थकलेल्या घोड्याची गणती करणाऱ्या

हातात

विष्ठेची बालटी डोक्यावर ठेवणाऱ्या हातात

शूद्र ठरविलेल्यांच्या काळ्या हातात

वाश्याचे चमकतील भाले

त्या तेहतीस कोटी देवदेवतांसाठी...!

----

सकाळची थंड हवा

तू माझ्याजवळ थांबून जा.

ए सकाळच्या शुद्ध हवे.

0

मला हवाय्‌ रक्तिम सूर्य

ज्यावर नको ढगाची सावली

जो कधीही दाट जंगलाच्या क्षितिजावर

अस्त होत नाही

हा सूर्यगोल करंगळीवर घेऊन

फेकेन मी त्यांच्यावर

ज्यांनी माझी जीभ कापून

यज्ञकुंडात ॐ स्वाहा केली.

माझ्या फुलासारख्या मुलीचं डोकं कापून

अग्नीत फेकलं.

बहिणीच्या छातीतून काढली रक्ताची नदी.

वडिलांना गाडलं जिवंत.

दिवसा उजेडी आईला केलं नग्न.

माझी आग आता थंड होणार नाही

मला हवाय्‌ रक्तिम सूर्य.

0

ए सकाळच्या शुद्ध हवे

तू माझ्याजवळ थांबून जा...

----

कैफियत

माझ्या मृत्यूनंतर ते लिहितील माझी

आत्मकथा

तेव्हा अंधारात खळाळणाऱ्या जाड लोखंडी

साखळ्या,

अपमान, तिरस्कार नि टेहळणी,

सततची निर्भर्त्सना

आणि पाठीवरच्या चाबकाचे निळे व्रण

याशिवाय काय मिळेल त्यांना...?

0

माझी जन्म तारीख आईला कुठं माहीत

होती?

या विचित्र जगाचा निरोप घेतला मी जेव्हा

तीच तर नोंद डायरीत होती

0

जन्म आणि मृत्यू या दोहोंच्या मधात

जगलो नि कित्येकदा मेलोही मी

माझी मुळं ज्या जमिनीत आतापर्यंत घुसली

होती

तिच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं,

झोपेच्या झाडावर स्वप्नांची फुलं टांगली

मात्र,

माझ्या हातात वाळलेल्या फांद्याच आल्यात

इतरांसारखं स्वत:ला ओळखण्याचा प्रयत्न

केला नाही कधी

मी तर फक्त घाणीतला किडाच होतो

ज्याला पायाखाली तुडविलं गेलं.

हा माझा इतिहास आहे

0

माझी यातना तुमच्या कवितेत कशी काय

मावू शकेल?

---

 पॅन्थर आणि पोस्टर

 माझ्या ड्राइंगरूमच्या भिंतीवर

अडकवून आहे पॅन्थरचं पोस्टर

आणि टेबलावर ठेवला आहे

ग्रेनाईटचा डॉ.बाबासाहेबांचा पुतळा

जेव्हाही लिहायला बसतो मी,

न्याहाळतो पोस्टर

अणकुचीदार लांब दातांचा भयानक

डोळ्यांचा एक चित्ता.

हळूहळू मी घुसतो चित्त्याच्या कायेत

अन्‌ फिरतो चित्त्याचं चामडं घालून

व्हराड्यांत

मी निषेध करतो,

आपल्या लोकांवर होणाऱ्या

अत्याचारांचा

आणि मूठ आपटतो टेबलावर.

अलीकडे मी अर्ध्या रात्री

चित्त्याचं चामडं ओढून खूपदा फिरत

असतो व्हरांड्यात.

ब्लॅक पोएट्री

जेव्हाही मी

हातात लेखणी घेतो

त्यातून निघतात काळे आक्रोश

लेखणीच्या शाईत

कदाचित, एकजीव झाले असतील

काळ्या लोकांचे जीव.

----------

डिप्रेशन

मनातल्या एका कोपऱ्यात झोपलेला

काळा कुत्रा

अचानकच जागतो

त्याच्या डोळ्यात भुताटकीचा गोंधळ

असतो

विनाकारण भुंकतो तो रिकाम्या खोलीत

त्याचे चकाकणारे डोळे नि नोकदार

दातांमुळे

माझ्यात भीती संचारते.

काळा कुत्रा...

काळा कुत्रा,

माझ्या हातातील ब्रशच्या टोकाला

नि शब्दाच्या चाकूला भितो.

आणि एकाएकी

रिकाम्या घरात उजेड होताना बघून

अंधाऱ्या खिडकीत निमूटपणे गायब

होऊन जातो.

मराठी अनुवाद : लोकनाथ यशवंत

Tags: लोकनाथ यशवंत खिडकी घर चाकू शब्द ब्रश Loknath Yashwant window house knife words brush weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके