डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्राचार्य दाभोळकर हे पुण्यास प्राचार्य म्हणून आले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अगर राजकीय, सामाजिक निष्ठांमध्ये यत्किंचितही फरक पडला नाही. त्यांची विनोबा, गांधी, जयप्रकाश यांच्यावरची निष्ठा अबाधित राहिली. पुण्यात प्राचार्य म्हणून काम करीत असोत अगर पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करीत असोत, आपल्या आयुष्यभराच्या निष्ठा आणि कसलीही तडजोड न करण्याची धमक व धैर्य त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अबाधित ठेवले. या प्रकारचा बुद्धिमान व तत्त्वनिष्ठ माणूस पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही, प्रा.देवदत्त दाभोळकर हे शब्दश: देवदत्तच होते. त्यांचा सहवास आम्हांला मिळाला यापरते भाग्य कोणते?  

आम्ही 1945 साली मॅट्रिकच्या परीक्षेत बसलो. ही परीक्षा विलिंग्डन महाविद्यालयाच्या एका मोठ्या हॉलमध्ये घेण्यात येत होती. धडधडत्या अंत:करणाने आम्ही वेळेत हॉलवर पोहोचलो. परीक्षेचे प्रमुख नियंत्रक प्राचार्य गोकाक होते. त्या वेळी सर्व प्राध्यापकांनी न्यायाधीशासारखा काळा पायापर्यंतचा गाऊन घालण्याची प्रथा होती. तिसऱ्या घंटेनंतर प्राचार्य गोकाक गाऊन घालून आमच्या वर्गात शिरले. आमच्याकडे करडी नजर टाकून ते म्हणाले, Boys, I have to announce some corrections ‘त्यांची उंची सहा फुटापेक्षा अधिक होती. त्यांनी प्रश्नपत्रिकेतील काही दुरुस्त्या जाहीर केल्या. त्यांचा आवाज घनगंभीर होता. परीक्षेचा प्रारंभ झाला. आमची तयारी चांगली असली तरी ही आमची मोठी परीक्षा होती, आमचा पहिला पेपर संपल्यावर थोडी विश्रांती होती. तरी आम्ही व्हरांड्यातच दुसरा पेपर सुरू होण्यासाठी थांबलो. रीतसर परीक्षा पार पडली. एका कसोटीच्या प्रसंगातून आम्ही पार पडलो. परीक्षेचा निकाल लागला व मी 80 टक्के गुण मिळवून पास झालो.

त्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून बरेच तरुण गुप्तपणे काम करीत होते. त्याची आम्हांला कल्पना होती. एक वृत्तपत्र आमच्या भागात प्रसिद्ध होत असे. त्याचे ‘हुतात्मा’ असे नाव आठवते- आमच्या महाविद्यालयापासून काही अंतरावर ‘रेनबो’ नावाची इमारत होती. तेथे काही स्वातंत्र्यसैनिक रात्रीच्या मुक्कामासाठी येत असल्याची वदंता होती. तेथेच आमचे दोन-तीन प्राध्यापक राहत असत. त्यांत प्रा.देवदत्त दाभोळकर हे होते. दुसरे एक कळघटगी या नावाचे प्राध्यापकही तेथेच राहत असत, सर्व प्राध्यापकांचा मोठा दबदबा असे. त्यांचा एकेरी उल्लेख करण्याची पद्धत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून तयार झाल्यानंतर अलीकडच्या काळात सुरू झाली. प्रा.देवदत्त दाभोळकरांबद्दल सर्वांना आतिव आदरभाव होता. ते बुद्धिमान होते. मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आले होते, ते गांधीवादी विचारांचे होते. ते सारस्वत असल्याने (हा भेदही तेव्हा आम्हांला माहीत नव्हता.) त्यांचे भोजन वेगळे होते. आम्हांला आमच्या वरच्या वर्गाच्या व्हरांड्यातून हे दोघेजण- प्रा.दाभोळकर व प्रा.कळघटगी- कॉलेजकडे चालत येताना दिसत. प्रा.कळघटगी तर्कशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा पोषाख पाश्चात्त्य पद्धतीचा होता. त्यांची उंची सर्वसाधारण होती, तर प्रा.दाभोळकरांची उंची सहा फुटांपेक्षा जास्तच असावी. ते परिपूर्ण खादीचा पोशाख करीत. डोक्यावर गांधी टोपी असे. ही आपली पद्धत ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले तरी त्यांनी सोडली नव्हती. त्यांची तत्त्वनिष्ठा अविचलित राहिली होती. मित्रमंडळींच्या बैठकीत त्यांची सहज विनोदबुद्धी व सर्वस्पर्शी स्मरणशक्ती तात्काळ समजून येत असे. काँग्रेस, त्यांचे सहप्रवासी व समाजवादी विचारांचे मित्र यांच्याशी त्यांचे जवळचे नाते राहिले होते. ते आम्हांला त्या वेळी अनाकलनीय व (आजदेखील फरक न पडलेला) उर्ळींळली । Civics & public administration हे विषय शिकवीत असत, त्यांची चर्या गंभीर असे. हे विषय आम्हांला अपरिचित व अवघड होते.

मला मॅट्रिकच्या परीक्षेत 80 टक्के गुण पडल्याने मी शास्त्र विषय निवडावा असे सुचविले. लवकरच या विषयाची भयंकर अरुची माझ्यात निर्माण झाली आणि माझे डोके एकसारखे दुखू लागले. माझ्या मामांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला व मला शास्त्र  विषय सोडण्याचा सल्ला दिला. तशी परवानगी मला मिळाली आणि मी कला विषयाकडे वळलो. तेव्हा माझा प्रा.दाभोळकर आणि प्रा.कळघटगी यांच्याशी संबंध आला. प्राध्यापक दाभोळकरांचा काँग्रेस व समाजवादी नेते ना.ग.गोरे, प्रा.प्रधान, प्रा.शहा या मंडळींशी परिचय वाढला. प्रा.शहा हे बंडखोर व आपले विचार परखडपणे मांडणारे गृहस्थ होते. प्राचार्य भा.शं.भणगे त्या वेळी आपली अभ्यासू वृत्ती व ग्रंथप्रेम वाढवीत चालले होते. त्यांचे ग्रंथप्रेम व शिस्तप्रियता कडक होती, पुढे ते समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक झाले. प्रा.दाभोळकरांचा संपर्क त्या काळचे काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्याशी वाढत गेला. वसंतदादा, गुलाबराव पाटील, सहकारी क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा स्नेह व सहवास लक्षणीय होता.

पुढे आम्ही काही प्राध्यापक डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या केंद्र संस्थेचे आजीव सदस्य म्हणून स्वीकारले गेलो. या संस्थेच्या स्थानिक आजीव सदस्यांची एक समिती प्रत्येक केंद्रात स्थापन झाली. या समितीचे आम्ही सदस्य झालो. अशी एक समिती विलिंग्डन कॉलेज सांगली येथे कार्यरत झाली. या समितीचे प्रा.दाभोळकर हे प्रमुख होते, मुंबई व पुणे येथेही या प्रकारच्या समित्या स्थापन झाल्या. या काही प्रश्नांवर निर्णय घेत असत. या समित्यांची एक संयुक्त समिती होती. आवश्यकतेनुसार संयुक्त समित्यांची एक बैठक पुणे येथे बोलावली जात असे. तेथे स्थानिक समित्यांनी घेतलेल्या निर्णयांवर व अन्य प्रश्नांवर चर्चा होऊन सोसायटीच्या हितासाठी निर्णय होऊन भवितव्यातील धोरणासंबंधी विचारविनिमय होत असे. प्रत्येक महाविद्यालयाच्या प्राचार्यांची निवडही या समितीत होत असे.

मध्यंतरीच्या काळात एक महत्त्वाची घटना घडली. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे अनेक वर्षांचे पत्रकार व सांगली रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.बापूसाहेब दप्तरदार यांच्या पुढाकाराने सांगलीस व्यापार महाविद्यालय College of Commerce काढावे, ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीने चालवावे व त्याला चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स असे नाव द्यावे व त्यासाठी सांगलीचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी देणगी द्यावी असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे कॉलेज सुरू झाले. या कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून प्रा.दाभोळकर यांची नेमणूक झाली. कॉलेजचे ऑफिस सुरुवातीस विलिंग्डनच्या एका कोपऱ्यातील खोलीत ठेवण्यात आले. नव्या इमारतीचे काम त्वरेने सुरू झाले व विलिंग्डनला तोडीस तोड अशी इमारत उभी राहिली. गोकाकहून तांबूस वर्णाचे ताशीव दगड आणले. त्या दगडांचे देखणे दर्शनी खांब उभे करण्यात आले. खालच्या मजल्यावर प्राचार्याचे ऑफिस, दुसरे ऑफिस, एक मोठा हॉल बांधण्यात आला. ‘वरच्या मजल्यावर वर्गांच्या खोल्या, जवळ जिमखान्याची बैठी इमारत व समोर विस्तीर्ण क्रीडांगण व विशाल मैदान अशी स्थूलमानाने रचना होती.

मैदान इतके विस्तीर्ण होते की तेथे इंदिरा गांधींची भव्य सभा एकदा घेण्यात आली. या इमारतीत चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे काम सुरू झाले. प्राचार्य दाभोळकरांचे ऑफिस, लागून नेहमीचे ऑफिस, जवळच कँटीनची इमारत. एकंदरीत शोभिवंत वास्तूत रीतसर काम सुरू झाले. एकदा महाराजांचे पाहुणे व आध्यात्मिक मार्गदर्शक सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कॉलेजला भेट दिली. कार्यक्रम थाटात संपन्न झाला. येणा-जाणाऱ्यांच्या नजरेत भरेल अशी वास्तू व समोरच पटांगण होते. प्रवेशद्वाराजवळ जिमखाना व कँटीन, पहिले काही दिवस प्रा.वामनराव देवधर, उत्तम गायक व मी उपप्राचार्य म्हणून काम करीत होतो- प्राचार्य दाभोळकरांनी व्यापारी शिक्षणाला उपयुक्त अशी स्थानिक कार्यकर्त्यांची व नेतेमंडळींची व्याख्याने आयोजित केली. सहकारमंत्री मा.गुलाबराव पाटील, त्यांचे सहकारी यांची व्याख्याने आयोजित केली. एकूण त्यांची कारकीर्द उल्लेखनीय झाली. यथावकाश त्यांची पुण्यास फर्गसन कॉलेजमध्ये बदली झाली व पुण्याहून प्रा.बाळ गाडगीळ हे कॉलेजला नवे प्राचार्य लाभले. त्यांच्या साहित्यिक मित्रांच्या भेटी व व्याख्याने होत राहिली.

पुण्यातदेखील त्यांची काँग्रेसनिष्ठा व तत्त्वनिष्ठा उठून दिसू लागली. तेथेही त्यांनी आपले साधे समाजोन्मुख व्रत कायम ठेवले. प्राध्यापकांची अभ्यासमंडळे आणि अभ्यागतांची उत्तम व्याख्याने घडवून आणण्यात त्यांचा हातखंडा होता, त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी प्रा.रेगे यांचे रसेलच्या तत्त्वज्ञानावर एक अप्रतिम व्याख्यान घडवून आणले होते. ते मोठ्या अभिमानाने सांगत की आमच्यातील प्रा.मे.पुं.रेगे हे अत्यंत बुद्धिमान गृहस्थ आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे ते सांगलीत असताना प्रत्येक प्राध्यापकाने स्वत:च्या अभ्यासाबद्दल एक व्याख्यान दिले पाहिजे असा दंडक जारी केला होता व मला त्या काळी प्रसिद्ध झालेल्या नोबोकॉव्ह यांच्या ‘लोलिता’ या प्रक्षोभक मानल्या गेलेल्या कादंबरीवर बोलण्यास सांगितले होते. मोठ्या धैर्याने मी ते व्याख्यान दिले होते. त्या वेळी प्रा.स.शि.भावे विलिंग्डनमध्ये मराठी हा विषय शिकवीत. मराठी विभागाच्या प्रमुख प्रा.मालतीबाई किर्लोस्कर होत्या, भाव्यांची रेखीव, विश्लेषक व्याख्याने विद्यार्थ्यांना अतिशय आवडत. कै.श्री.भागवत भाव्यांच्या बुद्धिमत्तेवर अत्यंत खूष असत. भाव्यांची बुद्धिमत्ता जशी कुशाग्र होती तसेच त्यांनी अन्य क्षेत्रांत चोखाळलेल्या वाटा अनुचित वाटत, पण तो एक वेगळाच विषय आहे.

प्राचार्य दाभोळकर हे पुण्यास प्राचार्य म्हणून आले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अगर राजकीय, सामाजिक निष्ठांमध्ये यत्किंचितही फरक पडला नाही. त्यांची विनोबा, गांधी, जयप्रकाश यांच्यावरची निष्ठा अबाधित राहिली. पुण्यात प्राचार्य म्हणून काम करीत असोत अगर पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करीत असोत, आपल्या आयुष्यभराच्या निष्ठा आणि कसलीही तडजोड न करण्याची धमक व धैर्य त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अबाधित ठेवले. या प्रकारचा बुद्धिमान व तत्त्वनिष्ठ माणूस पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही, प्रा.देवदत्त दाभोळकर हे शब्दश: देवदत्तच होते. त्यांचा सहवास आम्हांला मिळाला यापरते भाग्य कोणते? 

Tags: . प्रा.देवदत्त दाभोळकर म. द. हातकणंगलेकर बुद्धिमान व तत्त्वनिष्ठ माणूस आदरांजली devdatta Dabholkar m d hatkanangalekar budhiman v tattvanistha manus adaranjali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

म. द. हातकणंगलेकर,  ‘निर्वेद’, कूपवाड रस्ता, विश्रामबाग, सांगली

(1927-2015) समीक्षक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके