कुठे तरी सर्वज्ञ व म्हणून अतिमानुष असे लोक आहेत. इतर सर्वांनी त्यांचे अनुयायित्व पत्करावे, त्यांच्या आदेशाप्रमाणे वागावे, ह्याच्यातच त्यांचे कल्याण आहे, ही एक अगदी प्राचीन व अगदी आधुनिक अशी विचारसरणी आहे. ह्या सर्वांचा इतिहासात आलेला अनुभव फारसा प्रसन्न, प्रोत्साहक नाही. आपण असे सर्वज्ञ आहो असा प्लेटोला काही काळ तरी भ्रम झाला होता.
मी ज्या कॉलेजात शिकवतो तिथून जवळच एक गणपतीचे मंदिर आहे. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी जेव्हा हे कॉलेज नुकतेच निघाले होते. तेव्हा आपल्या देवळांची जी सर्वसामान्य स्थिती असते तशीच पा देवळाचीही होती. म्हणजे पुजारी देवाची पूजाअर्चा वैगर व्यवस्थित करीत असे. (किंवा तो करीत नसे असे समजायला काही कारण नव्हते; तो आपले काम नीट करतो की नाही इकडे लक्ष देण्याची जबाबदारी कोणाची आहे हेही बहुधा कुणाला माहीत नसावे.) काही मूठभर भाविक लोक नेमाने आपापल्या ठरलेल्या वेळी देवाच्या दर्शनाला येत. एरव्ही देऊळ ओस असे. कुणी त्याची शांतता चाळवत नसे. गजबजलेल्या रस्त्यावर ह्या एवढ्याच भागात माणसांची वर्दळ एकदम कमी दिसते, ह्यवरूनच बहुधा इथे एक देऊळ असावे असा तर्क मुंबईत वावरलेल्या कुणाही माणसाने त्यावेळी केला असता, व म्हणून रस्त्याने घाईने जाताजाता त्या दिशेकडे पाहात सबयीने हात अर्धवट जोडल्यासारखे केले असते.
गणपतीची भरभराट
आज हा देवळाची स्थिती एकदम पालटली आहे; एकदम भरभराटली आहे. आज भक्त प्रचंड संख्येने देवळाच्या आवारात गोळा होत राहतात. संकष्टी, मंगळवार इ. गणपतीच्या उपासनेला वाहिलेल्या दिवशी तर भल्या पहाटेपासून किंवा आदल्या रात्रीपासून दर्शनेच्छू भक्तांची भली थोरली रांग तीष्ठत असते. शिस्तीने हळूहळू पुढे सरकत असते. साखर, केरोसीन, जिगरी दोस्त, किंवा हमजोली ह्याच्यासाठी दुकानांपुढे, थिएटरपुढे लागणाऱ्या रांगा काहीच नव्हत. एका वर्दळीच्या हमरस्त्यावर वाहने, पादचारी, हातगाड्या, दुकानांत शिरू पाहणारी गिन्हाइके, मुंबईच्या रस्त्यांवर सर्वत्र आढळणारी गुरे-ढोरे इत्यादी अनेक अडथळ्यातू मार्ग काढत भाविकांची रांग शब्दशः अनेक फर्लांगपर्यंत पसरलेली असते. खरे म्हटले तर दोन रांगा असतात: एक पुरुषांची व दुसरी स्त्रियांची किंवा तांत्रिक परिभाषेत बोलायचे तर भगिनीची. गणपतीच्या पूजेसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित बांधलेले सर्व खिशांना परवडतील असे लहानमोठ्या आकाराचे पुढे बांधण्याचा लघु-उद्योग या परिसरात जोरात सुरू आहे. क्रमाप्रमाणे आपली पाळी येण्याची वाट पाहण्याची पाश्चात्य लोकशाही शिस्त आणि पौर्वात्य भोळा भक्तिभाव यांचा हृदयंगम संगम ह्या रांगेत दिसून येतो. गणपतीची देवळे अनेक आहेत. ठिकठिकाणी विखुरली आहेत. ती ओस असताना ह्य देवळातील देवाचे दर्शन घ्यायला एवढी रीघ का लागते? हा लोकांना काय पाहिजे असते? उदाहरणार्थ, टिटवाळा येथे असलेल्या गणपतीचे दर्शन घ्यायला मुंबईकरांना पारमार्थिक कारणाबरोबरच एक सबळ ऐहिक कारण असे.
परतताना मुंबईत दुर्मिळ असलेला चांगला तांदूळ कायद्याचा भंग न करता, किंवा विशेष भंग न करता आणता येत असे. ह्या देवळाच्या बाबतीत तशी काहीच परिस्थिती नाही. ही केवळ भाविकतेने जमलेली गर्दी असते असेच म्हटले पाहिजे. सर्व वयांची लहानथोर मंडळी ह्या गर्दीत आढळते; संग तुमानी घातलेल्या गालफडावरील आकार दिलेले कल्ले भरघोस कधी होतील ह्याची वाट पाहात बसलेल्या तरण्या पोरांपासून तो धोतराच्या सोग्याने स्वच्छदाने वाढलेल्या आपल्या पाडुरक्या मिशा पुसणाऱ्या वृद्धांपर्यंत सर्व प्रकारचे लोक ह्या रागांतून हळूहळू सरकताना दिसतात. आवश्यक ते फेरफार करून भगिनीच्या रांगेचे वर्णन असेच करता येईल. एकदा तर मी एका चकचकीत मोटरीतून तितक्याच चकचकीत बाया ह्या देवळाजवळ उतरलेल्या पाहिल्या. त्यानी चेहरे मोठ्या कौशल्याने रंगवले होते, विचित्र पण सुबक केशरचना केली होती, त्यांची वस्त्रे झुळझुळीत पारदर्शक होती. त्यांनी कमीत कमी अवयव झाकले होते, पण या अवयवांचा डौल कुणाला जाणवून घ्यायचा असेल तर त्याच्या तर्कावर ताण पडणार नाही अशी खबरदारी घेतली होती. त्या परस्परांत इंग्रजीत बोलत होत्या. म्हणजे त्या अतिशय आधुनिक होत्या. पण त्या मूर्तीसमोर उभ्या राहिल्या, त्यांनी डोळे झाकले आणि स्वतःच्या गालफडांवर नाजूक परंतु प्रामाणिक थपडा अनेकवार मारल्या. त्यांच्या ह्या करणीत कुठेही अभिनय किंवा ढोंग नव्हते हे उघड होते. त्या खऱ्या भावाने आल्या होत्या यात शंका नाही. पण ह्या भावाचे स्वरूप काय आहे?
गणपती- एक कौटुंबिक देव
गणपती हा मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय हिंदूंचा आवडता लाडका देव आहे. त्याची मूर्ती इतरांना बेडौल दिसो, आम्हाला ती अत्यंत प्रिय आहे. आमच्या कल्पनेतल्या गणपतीचे वय काय असते ह्याचे निश्चित उत्तर आम्ही देऊ शकणार नाही. पण आमचा गणपती प्रौढ असतो; आणि तरीही त्याच्या ठिकाणी बालभाव असतो. गोड मोदकांवर तो निःसंकोचपणे ताव मारतो, आणि आपले पोट सुटलेले असले तरी त्याची त्याला संत नसते. समृद्धीचे तो प्रतीक आहे अशी काहीशी आमची अस्पष्ट कल्पना असते. दर वर्षी नेमाने येणारा, सर्वांना हवा हवासा वाटणारा असा तो आमचा पाहुणा आहे. तो येतो दोन दिवस, पाच दिवस आनंदाचा, उत्सवाचा कल्लोळ उठतो, आणि तो जातो तेव्हा घर सुने वाटते. पण तो पुढल्या वर्षी येणार असतो. गणपतीच्या ह्या उपासनेला एखादा कर्मठ, आक्रमक नास्तिक सोडला तर कुणाला विरोध असायचे कारण नाही. देव आहे किंवा बहुधा असावा, नसेल असे नाही; असे जे आपल्याला अस्पष्टपणे वाटत असते ते ह्या उत्सवातून काहीसे व्यक्त होत असतेच. पण मुख्यतः हा एक कौटुंबिक उत्सव आहे. उद्या धार्मिक श्रद्धा अतिशय क्षीण झाली किंवा समूळ नाहीशी झाली तरी गणेशचतुर्थी साजरी होत राहील; पण गणेश कोण आणि चतुर्थी का हे व्युत्पत्तिशास्त्रज्ञाला लोकांना समजावून सांगावे लागेल. सांटा क्लॉस आणि क्रिसमसचे उदाहरण घ्या. किंवा प्रखर, उग्र धार्मिक श्रद्धेचा एखादा माणूस आपण ज्या तऱ्हेने आज गणेशचतुर्थी साजरी करतो तिला एखाद्या समाजसुधारक 'नास्तिका प्रमाणे निषेध करील. हा एक लौकिक, ऐहिक उत्सव झाला आहे; त्याच्यातील बद्धेचे अधिष्ठानच नष्ट झाले आहे असे तो म्हणेल; आणि ही गोष्ट खरीही आहे. श्रद्धा असली तर एवढ्यापुरतीच असते की, दरवर्षीसारखा हा उत्सव आपण केला नाही तर आपले काही तरी वाईट होईल अशी एक अस्पष्ट, प्रसंगी अतिशय स्पष्ट, भीती लोकांच्या मनात असते. नसती पंचाईत कशाला घ्या ही भावनाही ह्या उत्सवाच्या मागे असते.
किंवा ज्ञानाचा देव
दुसराही एक गणपती आहे; उदा. ज्ञानेश्वरांचा. हा विद्येचे, ज्ञानाचे प्रतीक आहे. गणपतीची उपासना म्हणजे ज्ञानाची उपासना अमूर्ताशी संबंध जोडायचा तर तो मूर्तामार्फत जोडावा लागतो असा माणसाचा स्वभावधर्म आहे; किंवा असणे शक्य आहे. किंवा मानवी प्रकृतीतले हे एक खोल असे दुबळेपण आहे. ईश्वराच्या शुद्ध, अमूर्त स्वरूपाची उपासनाही शुद्ध स्वरूपात झाली पाहिजे असा आग्रह मुसलमान किय प्रॉटेस्टंट पंथी धरतात, व म्हणून ईश्वर आणि माणूस ह्यांच्यामध्ये मूर्तीची अडगळ आणणे हे पाप आहे, मोह आहे असे ते मानतात. कदाचित मानवी प्रकृतीला असह्य ठरेल असे ओझे ते तिच्यावर लावत असतील. ते काहीही असो. ज्ञानाचे प्रतीक म्हणून जर कुणी गणपतीची उपासना करत असेल तर ज्ञानाची उपासना करताना तो गणपतीची उपासना करीत असेल, आणि गणपतीची उपासना करताना तो ज्ञानाची उपासना करत असेल. ज्याने गणपतीचे नावही कधी ऐकले नाही असा ज्ञानाच्या उपासनेत गडून गेलेला माणूस त्याच्या दृष्टीने न कळत गणपतीचा मोठा भक्त असेल. उदा-आर्किमिडिस. आपल्या स्वतःपुरते जरी गणपती हेच ज्ञानाचे प्रतीक असले तरी इतरांची प्रतीके वेगळी असतील. उदा. घुबड, हीही गोष्ट तो मान्य करील, आणि काही काळानंतर आपल्याही समाजात ज्यांना प्रतीकांची आवश्यकता असते असे लोक ज्ञानाचे प्रतीक म्हणून गणपतीएवजी दुसरेच काही तरी अधिक स्वाभाविकपणे स्वीकारतील हेही तो मान्य करील. याने त्याला कदाचित वाईट वाटेल. पार्थिवतेचा लळा चिवट असतो. पण मुख्य गोष्ट म्हणजे उपासना. ज्ञानाच्या पायावर गणपतीचे पावित्र्य अवलंबून आहे. गणपतीच्या पावित्र्यावर ज्ञानाचे पावित्र्य नव्हे.
पण अशा कोणत्या तरी भावनेने आपल्या गणपतीच्या देवळापुढे गर्दी जमत नसते. तसे असते तर हे लोक गणपतीच्या जवळपासच्या, सोयीच्या देवळात गेले असते किंवा देवळात जायचेही त्यांना कारण पडले नसते. ते अनेक कष्ट सोसून, गैरसोयी सहन करून, ह्याच देवळात येतात. मंगळवार चुकता कामा नये. कारण हे जागृत देवत आहे. मग गणपतीच्या इतर मूर्ती तुलनेने असमर्थ आहेत का? हे बोलण्याचे, असे मनात आणण्याचेसुद्धा पाप कुणी करावे? ते गणपती कमी समर्थ नाहीत, पण हा गणपती अधिक समर्थ आहे. समर्थ म्हणजे काय? तर नवसाला पावणारा. ह्या गर्दीतील प्रत्येक माणूस काही विवक्षित नवस मनात धरून येतो असे नसेल; तो आपल्या कल्याणाचा सर्वसाधारण विमा उतरवत असेल. म्हणजे आपले बरे व्हावे, आपल्या मुलाबाळांचे बरे व्हावे, एवढेच तो मनातल्या मनात मानत असेल. पण दर संकष्टीला, मंगळवारी हा मूर्तीचे दर्शन घेतले, कदाचित स्तोत्रे वगैरे पुटपुटली तर ही मूर्ती आपले बरे करील (आणि नाही तर आपले वाईट करील) अशी त्याची श्रद्धा असते. हे सामर्थ्य ह्या मूर्तीतच का? इतर मूर्तीत का नाही? आहे खरे. अनेकांना पडताळा आलेला असतो. हे एक अद्भुत, अनाकलनीय, अतीन्द्रिय असे सामर्थ्य आहे; आणि आपल्या जवळपास असा देव असावा ही भाग्याची गोष्ट आहे. दूर कुठे तरी, समजा त्रिचनापल्लीला असता तर पंचाईत झाली असती. उलट शिर्डी दादरमध्ये असती तर बहार झाली असती. पण एवढे कोठले आपले भाग्य? थोडक्यात म्हणजे ही अद्भुत शक्ती हा एक जादूटोण्याचा प्रकार आहे.
'अधिकारी' पुरुष
आपल्या आध्यात्मिकतेची अजून जादूटोण्यापासून सुटका झालेली नाही. देवाची भक्ती केली की देव आपले बरे करतो असे भक्ति वादही सांगतो. पण देवावर आपली मनापासून भक्ती जडणे म्हणजेच आपले बरे होणे, ह्यांच्या पलीकडचे कल्याणच नाही, असेच भक्तिवाद सांगतो. देवाच्या भक्तीतून दुसरे काहीच साधायचे नसते; भक्तीच साधायची असते. आणि तुम्ही दुसरे काही साधू गेला तर तुमची खरी भक्तीच नाही, व म्हणून जे साधायचे ते तुम्ही साधलेच नाही. पण हे सांगणारे आणि तसे जगणारे ज्ञानेश्वर श्रेष्ठ का? त्यांच्या अथांग भक्तिभावामुळे नव्हे तर त्यांनी भिंत चालवली म्हणून, ज्ञानेश्वराचा संदेश परत देणारे गुरुदेव रानडे ह्यांची अलीकडील काळातील एक अधिकारी आध्यात्मिक पुरुष म्हणून बरीच प्रसिद्धी आहे. त्यांची भक्ती किती गाढ होती ह्यावर ही ख्याती आधारलेली नाही. कारण भक्तीचे असे मोजमाप कुठे आहे? शिवाय त्यांनी कुठे भिंत चालवल्याचेही ऐकिवात नाही. परंतु अनेक वर्षे कोणत्याही धन पदार्थाने त्यांनी अन्न म्हणून सेवन केले नाही, केवळ चहा किंवा तत्सम पेय पिऊन ते जगले, असे मला एकाने विश्वसनीयरीत्या सांगितले. हा अर्थात् कुणालाही पटेल असा आध्यात्मिकतेचा पुरावा आहे. राजांना गुरुदेव का म्हणतात, आणि डॉ. राधाकृष्णन् ह्याना गुरुदेव का म्हणत नाहीत याचाही विचार करायला हवा. राधाकृष्णन् यांची तत्त्वज्ञानातील कामगिरी रानड्यांच्या कामगिरीच्या तुलनेने किती तरी श्रेष्ठ आहे. पण राधाकृष्णन चार-चौघांसारखे वागले; कधी कधी अगदीच चारचौघांसारखे वागले.
जादूटोण्याच्या कल्पनांनी भरून गेलेल्या आपल्या अध्यात्माचे केवळ जागृत मूर्ती, पीर ह्याच्यावर समाधान होत नाही. त्याला अधिक जिवंत असे वाहक लागतात. सामान्य नियमाला अनुसरून ही मागणीही आपला पुरवठा निर्माण करते. ह्या अध्यात्माचे जिवंत वाहक म्हणजे आपले गुरू उदा. साईबाबा, नित्यानंद व शिवाय ही आध्यात्मिकता आता पूर्वीसारखी अडाणी, अंधश्रद्धाळू राहिलेली नाही. वैज्ञानिक शिक्षण घेतलेले, आधुनिक शासनयंत्रणेत भाग घेणारे सुविद्य लोक हा अध्यात्मात रमलेले असतात, त्याचा उपयोग करून घेतात आणि वैचारिक युक्तिवादांनी तिथे समर्थन करतात. अशी ही प्रौढ, प्रगल्भ आध्यात्मिकता आहे. साधारणपणे हा युक्तिवाद असा. आम्ही गुरूवर श्रद्धा ठेवतो, कारण त्याचा अध्यात्मात अधिकार असतो. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद फारच थोड्यांना कळतो; पण म्हणून त्याचे सत्य नाकारणे मूर्खपणाचे ठरेल. आपल्याला तो समजत नाही कारण आपला तो अधिकार नाही. पण पदार्थविज्ञानात अधिकारी व्यक्तींनी स्वीकारलेल्या ह्या सिद्धांतावर श्रद्धा ठेवणे समंजस आहे. गुरूवरील श्रद्धा अशीच असते. लहान मुलांना स्वतःचे कल्याण कशात आहे हे समजत नाही. म्हणून त्यांनी मोठ्या माणसांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वागावे. त्याच्यातच त्यांचे कल्याण असते. त्याचप्रमाणे सामान्य माणसांना आपले कल्याण कशात असते हे कळत नसते. अधिकारी गुरूच्या आदेशाची त्यांना जरुरी असते व त्याप्रमाणे वागण्यात त्यांचे कल्याण असते.
गुरु-शिष्य नाते
हा युक्तिवाद तपासून पाहिला पाहिजे. अधिकारभेदावर आधारलेली आणि म्हणून श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाच्या स्वरूपाची नाती मानवी व्यवहारात सर्वत्र असतात. उदा. पालक आणि मुळे, शिक्षक आणि विद्यार्थी, अधिकारी व सेवक, पुढारी आणि अनुयायी, तज्ज्ञ आणि सामान्य लोक इत्यादी पण गुरु आणि त्याचा उपदेश ग्रहण करणारा भक्त ह्यांच्यातील नात्याहून ही नाती मूलतःच भिन्न आहेत. लहान मुले अजाण असतात, व म्हणून प्रौढ पालकांनी सांगितलेले त्यांनी ऐकावे; ते तसे का सांगतात ह्याची कारणे विचारण्याचा, चिकित्सा करण्याचा त्यांना अधिकार' नसतो. कारण ती समजतील अशी त्यांची बौद्धिक कुवतच नसते. ह्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. परंतु महानपण ही एक अवस्था आहे. पालकांनी मुले वाढवायची असतात. ती सर्वानी वाढत आहेत ह्याचे एक गमक असे की, 'तुम्ही असे का सांगता?' असा प्रश्न ती विचारू लागतात; किंवा तेवढे धाडस नसेल तर हा प्रश्न त्यांच्या मनात येतो; आणि ती पुरती वाढली ह्याचा अर्थ असा की, त्यानंतर आपल्या एके काळच्या पालकांशी ती फारतर सल्लामसलत करतात पण त्यांच्याकडून आदेशाची अपेक्षा करत नाहीत, ती स्वतःचे निर्णय घेतात. एखादा मुलगा वयाने कितीही वाढला तरी जर पालकांनी सांगितल्याशिवाय काहीच करू शकत नसेल, स्वतःचे निर्णयच घेऊ शकत नसेल, तर त्याच्या पालकांनी त्याला नीट वाढवला नाही असा त्याचा अर्थ होईल. शिवाय प्रौढ झालेला एकेकाळचा मुलगा आपल्याला पालकांनी जे जे सांगितले त्याच्यातले चूक काय होते आणि बरोबर काय होते हे स्वतःशी ठरवू शकतो. शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच नातेही असेच आहे. बालवर्गात पृथ्वी गोल आहे असे शिक्षक सांगतात, आणि विद्यार्थी चकित होऊन ऐकतात आणि लक्षात ठेवतात; आणि लक्षात राहिले आणि तसेच उत्तर दिले तर त्यांना मार्क्स मिळतात, नाही तर नाही. पण नंतर पृथ्वी गोल आहे असे का मानतात ह्याची शिक्षक कारणे देतात आणि ती कारणे विद्यार्थ्यांना समजावून घ्यावी लागतात; आणि पृथ्वी गोल आहे असे का मानावे ह्याची कारणे विद्यार्थ्यांना द्यावी लागतात, नाही तर त्यांना मार्क्स मिळत नाहीत (किंवा मिळू नयेत). शिक्षक शिकवतात म्हणजे स्वतःला कोणत्या तरी अतुक्य रीतीने लाभलेली माहिती कृपाळूपणे मुलांना देतात असे नसते. परिस्थिती अशी आहे असे सुरवातीला मुलांना वाटत असेल; वाटणे नैसगिक आहे. कृपाळूपणाविषयी अर्थात मतभेद होतील. पण परिस्थिती बरोबर अशी नाही हे त्यांना हळूहळू उमजते; आणि हा उमज येणे म्हणजे त्यांची बौद्धिक वाढ होणे. शिक्षण देणे म्हणजे बऱ्याचचशा निश्चितपणे खरी ठरलेली माहिती देणे; त्याप्रमाणे तर्कशुद्ध विचार करायचे 'ट्रेनिंग' देणे; इतरांच्या व स्वतःच्याही विचारांचे चिकित्सक परीक्षण करणे, चुका शोधून काढणे आणि त्या दुरुस्त करायचा प्रयत्न करणे हा ह्या ट्रेनिगचा भाग असतो. म्हणून सुरवातीला सर्वज्ञ भासणारा शिक्षक अखेरीस अधिक प्रौढ असा सहाध्यायी होतो; असे धाडण्यात शिक्षकांचे आणि शिक्षणाचे साफल्य आहे. म्हणजे शिक्षकांच्या वैय्यक्तिक ज्ञानाच्या मर्यादा उघड होतात असे नव्हे, तर शिक्षक जे ज्ञान आपल्याला देत होता ते माणसांनी विचाराने, तर्काने कमावलेले ज्ञान आहे ते अपुरे तर आहेच; पण अनेक ठिकाणी सदोषही आहे; त्यात भर घालणे, त्यातील दोष काढणे ही आपली व इतर माणसांची जबाबदारी आहे येथे ज्ञानाचा एखादा गूढ उगम नाही किंवा कुणी सर्वज्ञही नाही ही जाणीव होते. म्हणजे पालक आणि पाल्य ह्यांच्यातील श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या नात्याचे दोन समानशील अशा व्यक्तीतील नात्यात ज्याप्रमाणे रूपांतर होते त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्यानेही होते दोन कमी-अधिक बुद्धिमान पण बरोबरीच्या स्वतः विचार करू शकणाऱ्या, निर्णय घेऊ शकणाऱ्या, इतरांच्या विचारांचे परीक्षण करू शकणाऱ्या, स्वतःच्या व एकमेकांच्या चुका दुरुस्त करू शकणाऱ्या व्यक्तीमधील नाते असे ह्या नात्याचे स्वरूप आहे. दोन माणसांतील नाते असेच असले पाहिजे; ही माणसाची प्रकृती आहे. उलट एखाद्याने आदेश द्यावा आणि दुसऱ्याने तो स्वीकारावा एवढेच नाते दोघांत असेल, एक दुसऱ्यावर सर्वस्वी कायमचा अवलबून असेल तर ती विकृती आहे. फार तर वाढण्याच्या अवस्थेत असताना मुलाचे प्रौढाशी असे तात्पुरते नाते असू शकेल; पण तो प्रौढ झाला की हे नाते बरोबरीच्या नात्यात विलीन होईल. किंवा एखादा माणूस कोणत्या तरी आघाताने, शोकाने कोलमडून पडलेला असेल. अशा स्थितीत तो विचार करू शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही. अशा वेळी इतरांनी त्याला आधार द्यायचा असतो, सावरून धरायचे असते. पण अखेरीस त्याने स्वतःच स्वतःला सावरायचे असते. हे त्याला जमलेच नाही तर तो लुळा राहील, पुरता माणूस म्हणून परत जगू शकणार नाही.
पण ह्यावर एक आक्षेप असा येतो की, हे सगळे ठीक असले, आपण स्वतः विचार केला पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत, वगैरे पण आपण आहोत ते असे आहो. आपल्याला साऱ्या गोष्टी कशा कळणार? आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादासंबंधी स्वतः विचार करा, तो पारखून घ्या व पटला तर स्वीकारा; पण म्हणजे काय करा? तेव्हा आपली कुवत ओळखावी आणि ज्ञानी, अधिकारी माणसे सांगतील ते स्वीकारावे, तसे वागावे. हे म्हणणे सुद्धा एका अर्थाने खरे आहे, पण नेमके कोणत्या अर्थात हे समजून घेतले पाहिजे.
आइन्स्टाइन व गुरु- फरक
कित्येक गणिते आपल्याला सुटू शकतात, ती अर्थात सोपी असतात; पण कित्येक आपल्याला सुटू शकत नाहीत, ती अवघड असतात. ती ज्यांना सुटतात ते आपल्यापेक्षा हुषार असतात यात काही शंका नाही. पण मुद्दा हा नाही. मुद्दा असा की, हे दुपार लोक आपण सोडवलेली गणिते आपल्याला दाखवतात, आपण ती कधी सोडविली हे आपल्याला समजावून देतात, आणि त्यांनी ती बरोबर सोडवली आहेत की नाही हे आपण ठरवू शकतो. आता आइन्स्टाइन ज्या प्रकारची गणिते सोडवीत असे ती आपण सोडवू शकत असलेल्या गणितासारखी आणि जी गणिते आपण सोडवू शकत नाही पण ज्यांची इतरांनी काढलेली उत्तरे आपण समजून घेऊ शकतो त्या गणितांसारखीच असत; फक्त ती किती तरी अधिक गुंतागुंतीची असत. ती गणिते आइन्स्टाइनने बरोबर सोडवली आहेत की नाहीत हे ठरवायचे निकष सुद्धा आपण लावू शकत नाही. पण असे निकष लावून आइन्स्टाइनने गणिते बरोबर सोडवली आहेत हे ठरवण्यात येते. आणि हे निकष आपली सोपी गणिते बरोबर सोडवण्यात आली आहेत की नाहीत हे ठरवायला जे निकष लावण्यात येतात त्यांच्यासारखेच असतात; फक्त अधिक गुंतागुंतीचे असतात. म्हणून आइन्स्टाइन जे करत होता आणि आपण जे करतो त्या दोन्ही गोष्टींना गणित म्हणतात, दोन्ही गोष्टी गणितात मोडतात. आइन्स्टाइनचा अधिकार मोठा आहे. तेव्हा त्याने सांगितलेली उत्तरे श्रद्धेने, आदराने स्वीकारा असे कुणी म्हणत नाही. ती तपासून बरोबर आहेत हे ठरवले जाते, आणि म्हणून त्याचा अधिकार मान्य होतो. आइन्स्टाइनला एकदम स्फुरण येते, अमक्या गणितांची उत्तरे अमूक आहेत असे तो सांगतो आणि मग लोक ती उत्तरे स्वीकारतात असे नसते. भारतीय गणितज्ञ रामानुजनला असे स्फुरण येत असे. पण आपण असे म्हणत नाही की, 'हा! रामानुजनला आता स्फुरण आलेले दिसते. तेव्हा ह्या अवस्थेत तो जी जी समीकरणं वगैरे सांगेल ती खरी असली पाहिजेत. उलट ती समीकरणे बरोबर आहेत हे आपण तपासून ठरवतो, आणि इतकी किचकट, गुंतागुंतीची समीकरणे विनासायास एखादी गोष्ट सहजपणे कुणाला सुचावी तशा रीतीने रामानुजन मांडतो त्या अर्थी त्याच्या मनाची अवस्था स्फुरणा सारखी असली पाहिजे असा तर्क आपण करतो.
सर्वच क्षेत्रांतील तज्ज्ञांची, 'अधिकारी' माणसांची गोष्ट अशी आहे. आज ज्ञानाचे विशेषीकरण इतके झाले आहे की, अनेक बाबतीत त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञांवर विसंबून राहणे, ते सांगतील तसे निमूटपणे वागणे समंजस ठरेल; पण ही विशेषज्ञांवरची श्रद्धा नव्हे, त्यांचे ज्ञानप्रमाण आहे. त्यांचा सल्ला योग्य आहे हे पराक्रमाचे निकष आहेत फक्त दर वेळेस पारखीत बसणे सोयीचे नसते. आणि आपले व्यावहारिक ज्ञान पारखण्याचे आपले व्यावहारिक निर्णय योग्य आहेत की नाहीत हे पारखण्याचे निकष आहेत त्यांच्यापासूनच हेही निकष निष्पन्न झालेले असतात, फक्त ते अधिक गुंतागुंतीचे असतात.
गुरू हा परब्रह्म
पण गुरुची गोष्ट अशी नसते. गुरूवर श्रद्धा ठेवायची असते. गुरुच्या ज्ञानाच्या प्रामाण्याची पारख जर आपण करू लागलो तर त्याचा अर्थच असा होतो की, आपल्याला छिद्र पडले आहे. मग गुरु, हा गुरु राहात नाही, आपण त्याचे भक्त राहात नाही. गुरुच्या प्रामाण्यावरील आपला विश्वास पुराव्यावर आधारलेला असूच शकत नाही, कारण 'पुरावा' ही कल्पनाच ह्या नात्याच्या चौकटीत बसू शकत नाही. फक्त गुरूच्या सामर्थ्याची चुणूक आपल्याला दिसलेली दिसते. ही खूण पटून आपण त्याच्यावर असीम श्रद्धा ठेवायची असते. त्याने सांगितलेले काही आपल्याला वेडगळपणाचे वाटले तरी त्याच्याविषयी शंका घेता नये. गुरू आपल्या श्रद्धेची कसोटी घेत असेल; किंवा ह्या वरवर वेडगळ भासणाऱ्या म्हणण्यात खोल आध्यात्मिक आशय भरलेला असेल. भक्ताने आपल्या सर्व शक्ती गुरूच्या चरणी वाहायच्या असतात. म्हणजे भक्त माणूस उरत नाही. व ह्याचा अर्थ असा की, गुरूही केवळ माणूस नसतो. तो माणसापेक्षा अधिक काही तरी, खरे म्हटले तर परब्रम्ह असतो.
'सर्वज्ञा'वर अवलंबून राहणे चूक
कुठे तरी सर्वज्ञ व म्हणून अतिमानुष असे लोक आहेत. इतर सर्वांनी त्यांचे अनुयायित्व पत्करावे, त्यांच्या आदेशाप्रमाणे वागावे, ह्याच्यातच त्यांचे कल्याण आहे, ही एक अगदी प्राचीन व अगदी आधुनिक अशी विचारसरणी आहे. ह्या सर्वांचा इतिहासात आलेला अनुभव फारसा प्रसन्न, प्रोत्साहक नाही. आपण असे सर्वज्ञ आहो असा प्लेटोला काही काळ तरी भ्रम झाला होता. पण लोकांचे कल्याण साधायचा त्याचा प्रयत्न स्वाभाविकपणे फसला, आणि मग प्लेटो निमूटपणे तत्त्वज्ञान शिकवू लागला आणि आपले व इतरांचे कल्याण त्याने साधले. सर्वज्ञावर विसंबून राहण्यात अर्थ नाही कारण सर्वज्ञ पुरेशा संख्येने उपलब्ध होणे कठीण दिसते. माणसाला हरघडिला प्रश्न पडत असतात. आणि दर वेळेला आदेशासाठी सर्वज्ञाकडे जाणे शक्य होणार नाही. जवळपास एखादा जे. पी. असावा तसा सर्व असेलच असे नाही. तेव्हा माणसाला स्वतः वरच विसंबून राहावे लागणार. पण सर्वज्ञावर विसंबून रहाण्यातली खरी अडचण हा व्यावहारिक अडचणीहून वेगळीच आहे. स्वतः विचार करून स्वतःचे निर्णय घ्यावे, असे जगावे हे माणसाचे लक्षण आहे, ही त्याची प्रकृती आहे. ती हरवून बसलो तर आपण माणसा सारखे जगत नाही असे होईल. हा माणसाचा अहंकार नाही; हा त्याचा धर्म आहे. माणसाला प्रश्न पडतात ह्याचाच अर्थ त्यांची उत्तरे शोधण्याची शक्ती, विचार करण्याची शक्ती त्याच्यात आहे; म्हणून ही उत्तरे शोधण्याची त्याची जबाबदारीही आहे. पशूंत ही शक्ती नसते, म्हणून त्यांच्यापुढे प्रश्नही नसतात. उत्तरे शोधताना इतरांची मदत आपण घेऊ शकतो, घेतो, घ्यावी. पण आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच द्यावी लागतात. इतर आपले प्रश्न ते सोडवून देऊ शकत नाहीत; ते आपल्यालाच सोडवावे लागतात. एखादा सर्व गुरू आपले सर्व प्रश्न सोडवून देईल हे एक स्वप्न आहे.
गुरूचा आधार
पण हे स्वप्न माणसाला पडते. लहानपणी आपले वडील, आपके शिक्षक सर्वज्ञ असतात, आणि आपल्यावर काही जबाबदारी नसते. पण मोठेपणी तीही आपल्यासारखी धडपडणारी, अपुरी, सदोष माणसे आहेत हे उमजते, आणि आपल्याला कुठलाही आसरा राहात नाही. आपल्या मर्यादित कर्तृत्वावर विसंबून जगण्याचा ताण असह्य होतो व आपण गुरु शोधतो. भौतिक सृष्टीत जे काही घडते ते निसर्गनियमानुसार घडते. आपल्या इच्छांच्या तृप्तीवर ह्यामुळे पडणाऱ्या नियंत्रणाचा जाच आपल्याला असह्य होतो. आपल्या इच्छा जादूने तृप्त होऊ शकतील असेही स्वप्न मग आपल्याला पडते. सृष्टीच्या नियमांना सामाजिक व्यवहाराला डावलून आपल्या इच्छा पुऱ्या करण्याचा मार्ग उपलब्ध आहे, आपल्याला एक परिपूर्ण असा आधार लाभला आहे, ही आपली स्वप्ने मग एखाद्या मूर्तीच्या ठिकाणी एखाद्या सजीव मूर्तीच्या, गुरुच्या ठिकाणी केंद्रित होतात. आपल्याला आधार लाभतो. आपल्याला आधार लागतो; कारण आपण आपल्या कर्तत्वाच्या मर्यादा, आपले दुबळेपण ओळखतो. जग बेभरवशाचे आहे. आपल्या वर आपल्या आवडत्या माणसांवर, मुलाबाळांवर कधीही आघात होऊ शकतो. पण आपण फक्त एकमेकांचा आधार घेऊ शकतो, आणि एकमेकांना आधार देऊ शकतो. हा आधारही दुबळा आहे. पण दुसरा आधार नाही, मग जे होईल ते सहन करण्याशिवाय मार्ग नाही. माणुसकीच्या मर्यादित प्रामाणिकपणे धैर्याने जगण्यात माणसाची प्रतिष्ठा आहे.
प्रकृती व विकृती
ह्या पलीकडचा आधार लाभला आहे अशी बतावणी करत जगणे ही विकृती आहे. संख्याशास्त्रज्ञ सांगतील की अमूक एका विकृतीची माणसे समाजात शेकडा अमूक इतकी असतात. उदा. विरुद्ध बाजूचा कितीही पुरावा पुढे केला तरी पृथ्वी सपाट आहे ह्या मताला चिकटून राहणारे लोक समाजात अमूक इतके असतातच. पण देवाला नवस करणे, गाऱ्हाणे घालणे, गुरुची दीक्षा घेणे या गोष्टी ज्या समाजात रूढ, शिष्टमान्य प्रथा आहेत, केवळ कित्येक अंध तऱ्हेवाईक लोक करत असलेली कृत्ये नव्हत. ज्या समाजाचे वैचारिक क्षेत्राचे नेतृत्व करणारे सुशिक्षित विवेकानंद, गांधीजी, विनोबा यांची आध्यात्मिकता आणि साईबाबा, नित्यानंद त्यांची आध्यात्मिकता ह्यातील भेद ओळखू शकत नाहीत त्या समाजाची प्रकृती कोणती आणि विकृती कोणती हे कसे सांगणार? विरुट परिस्थितीशी न डगमगता मुकाबला करणारा, शक्य काय आहे- संभाव्य काय आहे ह्याचा विचार करून आपले व्यावहारिक प्रश्न योजकतेने सोडवू पाहणारा, अपयशापासून धडे घेऊन आपली कार्यपद्धती सुधारणारा, अशा कर्तृत्ववान समाजाचे हे चित्र नाही. तर अगतिक, असहाय, परिस्थितीला शरण गेलेल्या समाजाचे हे चित्र दिसते. मग त्याने कितीही मोठी धरणे बांधलेली बांधून घेतलेली असो, किंवा कितीही यंत्रसामग्री उभारून घेतलेली असो.
एके काळी विज्ञान आणि जादूटोणा एकच गोष्ट होती. आज त्यांच्यात फारकत झाली आहे. पण अध्यात्म आणि जादूटोणा अजून हिंदू मनाच्या दृष्टीने एकच आहेत. त्यांची फारकत करायला वैचारिक धैर्य आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहेत.
Tags: दास्यमुक्ती विशेषांक 1970 गुरू प्लेटो आइन्स्टाईन संत ज्ञानेश्वर महाराष्ट्र विज्ञान साईबाबा हिंदू मुंबई मे. पु. रेगे गणपती Dasyamukti Special Issue 1970 Guru Plato Einstein Sant Dnyaneshwar Maharashtra Science Saibaba Hindu Mumbai M. P. Reggae Ganapati Idol weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या