डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोणतेही एक आशय-विषयाचे सूत्र नसलेला तो प्रयोग प्रेक्षणीय होता. प्रयोग संपल्यानंतर स्वत:ला विचारले की, या प्रयोगाचा कोणता ठसा, याक्षणी जाणवतो ? तर उत्तर आले, पीना बौशने ‘फ्रिक आऊट’ होण्याचे जे स्वातंत्र्य घेतले आहे ते! भारतातील संस्कृती व परंपरांचे अतिशय उबग आणणारे उथळ, बटबटीत, कल्पनाशून्य सादरीकरण आपल्याला नेहमीच पाहावे लागते. हा प्रयोग पाहताना असाही प्रश्न पडू शकेल की, हे जे आपण पाहतो आहोत, त्याचा संस्कृती व परंपरेशी कोणता संबंध आहे ? अर्थातच ज्यांना ‘हुबेहुब’ चित्र पहायचे असते, तेच असा प्रश्न करू पाहतात.

राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली, म्हणजे ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ चे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. ते साजरे झाले, ते नाट्य महोत्सवाचे आयोजन करून आणि काही चर्चासत्रे घडवून. नाट्यमहोत्सवात, जर्मनी, पोलंड, स्वित्झर्लंड, अफगाणिस्तान, चीन, नॉर्वे, इंग्लंड या देशांमधून नाट्यप्रयोग आले होते. त्याचबरोबर मल्याळी, बंगाली, आसामी, मणीपुरी व हिंदी भाषेतील प्रयोगही सहभागी झाले होते. दिल्लीप्रमाणे मुंबईतही नाट्य महोत्सव आयोजित केला असल्यामुळे आणि दिग्दर्शक वामन केंद्रे हे संयोजन समितीचे सभासद असल्यामुळे, मुंबईच्या महोत्सवात काही नाट्यप्रयोग पाहता आले.

आधुनिक जागतिक रंगभूमीमध्ये आता, नाट्यसंहितेचे, नाटकाच्या विषय- आशयाचे, पूर्वीइतके महत्त्व राहिलेले नाही. आधुनिकोत्तर रंगभूमीची जी काही वैशिष्ट्ये मानली जातात, त्यामध्ये ‘पाठ्य’- संहिता नसणे, हे एक मानले गेलेले दिसते. आता महत्त्व आलेले आहे ते नाट्यप्रयोगाला, मंचनपद्धतीला. प्रेक्षकांनाही आता, नाटक करणाऱ्या किंवा नाटककाराला काय म्हणायचे आहे, नाटकातून घेण्यासारखे काय आहे असे प्रश्न न विचारलेले बरे. मूल्यात्मकतेचा अभाव, हे जर आधुनिकोत्तर काळाचे एक लक्षण असेल तर ते रंगभूमीमध्येही उतरावे, हे ओघाने आलेच. ज्या नाट्यप्रयोगामध्ये विषय-आशयाचे असे काही सूत्रच प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवत नाही, तो प्रयोग पाहताना गोंधळल्यासारखे होणार हे स्वाभाविक आहे. प्रेक्षकांना असेही वाटू शकते की, आपण फसवले गेलो आहोत. हा ज्या परंपरेचा आपण एक भाग आहोत, त्याचा परिणाम असू शकतो. मग असे प्रयोग समोर येतात, तेव्हा आपण काय करायचे ?

नाट्यप्रयोगामधील दोन पैलूंचा एकत्रितपणे विचार करता येतो, तसा तो स्वतंत्रपणेही करता येऊ शकतो. नाट्यप्रयोगाच्या वेळी जाणवणारे तात्विक मूल्य किंवा संहितेमधील तात्त्विक हा एक पैलू; तर नाट्यप्रयोगामधील सौंदर्यमूल्य हा दुसरा पैलू. खरे तर नाट्यप्रयोगामधील सौंदर्यमूल्याबद्दल मूल्यात्म विधान हे नाट्यसंहितेच्या संदर्भातच करता येण्याजोगे असते. रंगरूप अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत अशा रंग-भाषेमधून जीवनानुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न नाट्यप्रयोगामध्ये केलेला असतो. त्यामुळे नेपथ्य किंवा प्रकाशयोजना स्वतंत्रपणे नेत्रसुखद असण्याचे काही कारण नसते- पण जीवनानुभवाचे केवळ कवडसे घेऊनच कोणी ते रंगभाषेमध्ये व्यक्त करू म्हणत असेल, तर तात्त्विक मूल्यांचा विचार बाजूला ठेवून, त्या प्रयोगातील सौंदर्यमूल्यांचा विचार तेवढा केलेला बरा.

एन.एस.डी.च्या नाट्यमहोत्सवात, ‘बम्बू ब्लूज’ नावाचा प्रयोग सादर झाला. पीना बौश या विदुषीने दिग्दर्शन केलेला तो प्रयोग, जर्मनीमधून आला होता. पीना बौश 1973 मध्ये भारतात, एका नाट्यप्रयोगाचा निमित्ताने आल्या होत्या आणि त्यानंतरही त्या येत राहिल्या. येथील बहुविध संस्कृती आणि परंपरांनी त्या प्रभावीत झाल्या. भारतामध्ये असताना, त्यांच्या मनावर जे विविध ठसे उमटले, ते त्या स्वत: नर्तिका असल्यामुळे, नृत्यात्म प्रयोगामधून त्यांनी आपल्यासमोर या बम्बू ब्लूजमध्ये मांडले आहेत- भारतामध्ये त्यांची भेट झाली प्रसिद्ध नृत्यांगना व गुरु, चंद्रलेखा यांच्याशी- असे सगळे, हा प्रयोग पाहण्यापूर्वी, हाती आलेल्या दिमाखदार पत्रकामधून समजले होते.

नृत्यात्म प्रयोग सुरू झाला तो दोघा -दोघांच्या जोडीच्या प्रवेशाने, रंगमंचाच्या मागील बाजूच्या पडद्याकडून त्या जोड्या, तिरक्या रेषेमध्ये प्रेक्षकांच्या दिशेने आल्या, प्रेक्षागृहात उतरल्या आणि तिथल्या जवळच्या दरवाजाने बाहेर पडल्या. प्रत्येक जोडीतील दोघांनी, लुंगी परिधान केली होती. पांढरी स्वच्छ, सुती लुंगी. गुडघ्यापर्यंत वर ओढलेली. रंगमंचावर आल्यापासून, प्रेक्षागृहात उतरेपर्यंत प्रत्येक जोडीने, अगदी वेगवेगळ्या पद्धतीने लुंगीची डोके धरून कमरेभोवती खोवली. ती विविधता आणि ज्या सहजतेने त्यांनी ते केले, ते लोभसवाणे होते. प्रत्येक जोडी रंगमंचावरून प्रेक्षकांच्या दिशेने येत असता, स्वच्छ प्रकाशाचे वर्तुळ, त्या जोडीबरोबरच चालत असल्यासारखे, पुढेपुढे सरकत होते. ज्या नजाकतीने ते दृश्य सादर झाले, ते पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

एका दृश्यामध्ये एक स्त्री रंगमंचावर पुढच्या बाजूला एका स्टुलावर बसलेली दिसली. तिथून उठून विंगेत जाऊन, तिने पाण्याने भरलेले एक तसराळे आणले. ते मांडीवर घेऊन ती स्टुलावर बसली. हलक्या हाताने तिने तसराळ्यातले पाणी चेहऱ्यावर शिंपडले; मग हातांवर, खांद्यावर, मानेवर आणि क्षणार्धात पाठीवर सोडलेले लांबलचक केस तिने किंचितसा झटका देऊन चेहऱ्यावर आणले. आता तिचा चेहरा काळ्याशार केसांनी झाकलेला. ते केस तिने तसराळ्यातील पाण्यामध्ये सोडले आणि मान वर करून ओल्याचिंब केसांमधून तिने पाणी आता अंगभर निथळू दिले. मुंबईमध्ये काय किंवा कोलकात्यात काय, स्त्रिया पदपथावर बसून आंघोळ करताहेत, हे दृश्य आपल्या अति परिचयाचे झाले आहे. पण त्या दृश्याचे पीना बौशने एक सुंदर, रिच्युअल केले... मग केव्हातरी आली देवीची मिरवणूक... केव्हातरी एक कलाकार रंगमंचावर आला आणि रंगमंचाच्या मध्यभागी त्याने एक तलम, झिरझिरत पांढरा स्वच्छ पडदा, एका विंगेपासून दुसऱ्या विंगेपर्यंत पसरविला.

प्रकाशयोजना बदलली आणि आता त्या झिरझिरीत पडद्यामागे, नारळी-पोफळींची गर्दी असलेल्या गोव्यामधले किंवा कोकणातले दृश्य साकार झाले ! पुढे केव्हातरी, लहान मुले एकमेकांवर पडून, गुंडाळल्यासारखे लोळत जाण्याचा खेळ खेळतात, अगदी तसाच खेळ एका मुलाने व मुलीने केला. त्याच्या वाटेवर येताच, याने तिला ढकलावे, तिने पडावे. तो जाऊ लागताच तिथे त्यालाही पाडावे व त्याने व तिने सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात, एकमेकांवर पडून, गुंडाळी केल्याप्रमाणे लोळत जावे... आणि त्यावेळी प्रकाशवर्तुळानेही नेमके त्यांनाच पकडून, त्यांच्या लोळण्याच्या गतीने त्यांच्याबरोबर पळत राहावे... आणि या दृश्याला सोबत म्हणून टप्पे टप्पे घेत चेंडू पायऱ्यांवरून अनियमितपणे घरंगळावा, तसे ऑर्गनच्या पट्ट्यांमधून ऐकू येतील न येतील असे नाद...

कोणतेही एक आशय-विषयाचे सूत्र नसलेला तो प्रयोग प्रेक्षणीय होता. प्रयोग संपल्यानंतर स्वत:ला विचारले की, या प्रयोगाचा कोणता ठसा, याक्षणी जाणवतो ? तर उत्तर आले, पीना बौशने ‘फ्रिक आऊट’ होण्याचे जे स्वातंत्र्य घेतले आहे ते! भारतातील संस्कृती व परंपरांचे अतिशय उबग आणणारे उथळ, बटबटीत, कल्पनाशून्य सादरीकरण आपल्याला नेहमीच पाहावे लागते. हा प्रयोग पाहताना असाही प्रश्न पडू शकेल की, हे जे आपण पाहतो आहोत, त्याचा संस्कृती व परंपरेशी कोणता संबंध आहे ? अर्थातच ज्यांना ‘हुबेहूब’ चित्र पहायचे असते, तेच असा प्रश्न करू पाहतात.

पीना बौशच्या या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कलाकारांची लवलवती शरीरे, प्रयोगजीवी कलेबद्दल -नृत्य आणि नाट्याबद्दल, आपण एकसारखे घोकत आलो आहोत की कलाकारांची शरीरे, अंगकाठी खेळाडूप्रमाणे असली पाहिजे. (आता आपल्या खेळाडूंचीही सुटलेले पोटे आपण पाहतो, ही वेगळी गोष्ट!) पीना बौशच्या एकूण एक कलाकारांची अंगकाठी प्रेक्षणीय होती. ती डोंबाऱ्याची मुले शोभावी किंवा सर्कसमध्ये तरी त्यांनी काही वर्षे घालवली असावीत किंवा ‘बाँडी लँग्वेज’ समजून, ती स्वत:मध्ये भिनवून घेण्यासाठी त्यांनी योगासने, योगाभ्यास केला असावा... अंगोपांगात लय खेळते म्हणजे काय, ते हा ‘बम्बू ब्लूज’ चा प्रयोग पाहताना क्षणोक्षणी जाणवत होते.

प्रयोगातील सौंदर्य टिपून घेता घेता. प्रयोगातूनच तत्त्वविचार झिरपत आपल्यापर्यंत पोचल्याची जाणीव होऊ शकते!

Tags: बम्बू ब्लूज पीना बौश नाट्य महोत्सव वामन केंद्रे जागतिक रंगभूमी राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके